This is a story of Bodan. Bodan is performed in many houses before or after any religious activity such as marriage and like in the family. It is a very old custom and many it is a Goddess Pooja performed with devotion..
कहाणी बोडणाची
आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण रहात होता. त्याला दोन सुना होत्या. एक आवडती होती. दुसरी नावडती होती. आवडतीला घरांत ठेवीत, चांगल-चुंगल खायला-प्यायला देत. चांगल ल्यायला नेसायला देत, तसे नावडतीला कांही देत नसत. तिला गोठ्यांत ठेवीत. फाटक तुटक नेसायला देत. उष्टमाष्ट खायला देत असत. नावडतीचे असे हाल करतअसत. एके दिवशी कुळधर्म-कुळाचार होता. तेव्हां ब्राह्मणाच्या बायकोने बोडणाची तयारी केली. सवाष्णींना बोलावले. देवीची पूजा करुन सर्वजणींनी बोडण भरले. कहाणी केली. देवाला- देवीला नैवेद्य दाखवीला. सवाष्णी व सर्व माणसे जेवली. नावडतीला उष्ट-माष्ट वाढून जेवायला दिले. तेव्हा तीला समजले की, आज घरांत बोडण भरले. तीला रडू आले. मला कोणी बोडण भरायला बोलावले नाही. सर्व दिवस तीने उपवास केला. रात्री देवीची प्रार्थना केली. घरांतील सर्वांसाठी देवीचे कृपाशिर्वाद मागितले. नंतर ती झोपी गेली.
रात्री तीला स्वप्न पडले. स्वप्नात एक सवाशीण आली. तिला पाहून नावडती रडू लागली. सवाशीण नावडतीला म्हणाली, मुली, मुली रडू नको. घाबरु नको. मला तुझ्या रडण्याचे कारण सांग. नावडती म्हणाली घरांत आज बोडण भरले, मला काही बोलावले नाही. म्हणून मला वाईट वाटत आहे. सवाष्णीने सर्व ऐकून घेतले. तीला सांगितले की, उद्या तू गोठ्यांत दही-दूध विरजून ठेव. एक खडा मांड. देवी म्हणून त्याची पूजा कर. तू एकटीच बोडण भर. संध्याकाळी गाई-गुरांना खाऊ घाल. इतके सांगून ती अदृश्य झाली. नावडती जागी झाली. तीने इकडे-तिकडे बघितले तर तीला कोणीच दिसले नाही. ती समजली की देवीनी मला दर्शन दिले. मग ती परत झोपी गेली.
सकाळी पहाटेसच उठली. सवाष्णीने सांगितल्या प्रमाणे दही-दूध विरजून ठेवले. अंग धुतले. एक खडा आणून देवी म्हणून त्याची मनोभावे पूजा केली. पाने-पत्री, फुले वाहीली. नंतर लाकडाची काथवट घेतली. विरजून ठेवलेले दही-दूध त्यांत घेतले. देवीची प्रार्थना केली. एकटीनेच बोडण भरले. देवीला नैवेद्य दाखविला. घरांतून आलेले उष्टमाष्ट जेवण जेवली. भरलेले बोडण झाकून ठेवले. दुपारी गुरांना घेऊन रानांत गेली.
इकडे काय झाले? नावडतीचा सासरा गोठ्यांत आला. झाकलेले काय आहे म्हणून पाहू लागला. तो लाकडाची काथवट सोन्याची झाली. आत हिरे-माणके दिसली. बाहेर उडालेल्या ठिपक्यांची मोत्ये झाली. ती त्याने आत भरली. तो मोठा आश्र्चर्यचकीत झाला. नावडतीने ही कोठून आणली म्हणून तो काळजींत पडला. इतक्यांत गुरांना घेऊन नावडती तेथे आली. तीला हाक मारुन काथवट तिला दाखविली, त्यांतील हिरे-माणके- मोती दाखविले व हे कोठून आणलेस म्हणून विचारले. नावडतीने त्याला तीला पडलेले स्वप्न सांगितले. त्याप्रमाणे बोडण भरल्याचे सांगितले. व रानांत गुरांना घेऊन जातांना काथवट झाकून ठेवल्याचे सांगितले. त्याचे हे असे झाले. काय असेल ते आता तुम्हीच पाहून घ्या. सासरा मनांत खजील झाला. नावडतीला घरांत घेतली. घरांतील सर्वजण तीच्यावर माया करु लागले. जशी नावडतीला देवी प्रसन्न झाली तशीच तुम्हाआम्हा सर्वांना होवो. ही साठाउत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
Custom Search
No comments:
Post a Comment