Sunday, January 12, 2020

Kahani Pithorichi कहाणी पिठोरीची

Kahani Pithorich 
Kahani Pithorich is in Marathi. It is the story of Pithori Amavasya.
कहाणी पिठोरीची
आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहात होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावास्येला त्याच्या वडिलांचे श्राद्ध असे. दरवर्षी त्या श्राद्धाच्या दिवशी त्याच्या सुनेचे सकाळपासूनच पोट दुखू लागे आणि ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळी ती बाळंत होऊन झालेले बाळ मरुन जाई. असे झाले म्हणजे श्राद्धाच्या जेवणास आलेले ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे सहा वर्षे लागोपाठ होऊन आठव्या वर्षी तसेच झाले. तेव्हा सासरा फार रागावला. मेलेले बाळ सुनेच्या ओटीत घालून तिला रानांत हाकलून दिले. 
सुन पुढे जाता जाता तिला एक रान लागल. ते एक फार मोठे भयानक अरण्या होते. तिथे तीला झोटिंगाची बायको भेटली. तीने तिला विचारले बाई, बाई तू कोणाची कोण ? इथे येण्याचे काय कारण ? आलीस तशी ताबडतोप निघून जा. कारण आता माझा नवरा झोटिंग येण्याची वेळ झाली आहे. तो येऊन तुला मारुन खाईल. तेव्हा ब्राह्मणाची सुन म्हणाली मी तेवढ्याकरतांच येथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली बाई तू मरण्यास येवढी का तयार झाली आहेस ? तेव्हा ब्राह्मणाची सून सांगू लागली. ती म्हणाली की, मी एका ब्राह्मणाची सून आहे. दरवर्षी मी श्रावणी अमावास्येला बाळंत होते व माझे बाळ मरुन जाते. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासर्‍यांचे श्राद्ध असते. माझे असे झाले म्हणजे श्राद्धाच्या जेवणाला आलेले ब्राह्मण तसेच उपाशी निघून जातात. आता या सातव्या वेळीही तसेच झाले. तेव्हा सासर्‍यांना राग आला. ते म्हणाले माझा बाप सात वर्ष तुझ्या बाळंतपणामुळे उपाशी राहीला. म्हणून तू घरांतून चालती हो. म्हणून हे मेलेले बाळ माझ्या ओटींत घालून मला घरांतून हाकलुन दिले. नंतर मी येथे आले. आता मला जगुन तरी काय करायचे आहे? असे म्हणुन रडू लागली. तशी झोटिंगाची बायको म्हणाली बाई, तू घाबरु नकोस, रडू नकोस. 
अशीच थोडी पुढे जा. तुला एक शिव लिंग दिसेल. बेलाचे झाड दिसेल. तिथे एका झाडावर बसून रहा. रात्री नागकन्या, देवकन्या, सात अप्सरांबरोबर शिवलिंगाच्या पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे विचारल्यावर मी आहे, म्हणून म्हण. त्या तुला पाहून तू कोण, कोठची म्हणून विचारतील. तेव्हा तू तुझी सर्व हकीगत त्यांना सांग. 
ब्राह्मणाच्या सुनेने बर म्हटल. तिथुन उठून पुढे निघाली. तिला एक बेलाचे झाड लागले. तिथेच ती उभी राहून इकडेतिकडे बघू लागली. जवळच तिला एक शिवलिंग दिसले. मग ती बेलाच्या शेजारच्या झाडावर चढुन बसली. रात्र झाल्यावर नागकन्या, देवकन्या सात अप्सरांबरोबर तेथे आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली. नैवेद्य दाखविला आणि अथिती कोण आहे म्हणून विचारले. त्याबरोबर ब्राह्मणाची सून झाडावरुन खाली उतरली व त्यांना म्हणाली की, मी अथिती आहे. तेव्हा सगळ्यांनी आश्र्चर्याने मागे वळून पाहीले. तिला कोण, कोठची म्हणून तिला विचारले व तीची सर्व चौकशी केली. ब्राह्मणाच्या सूनेनी सर्व सांगितले. मग नागकन्या, देवकन्यानी तिच्या मुलांची ती कोठे आहेत म्हणून विचारल्यावर अप्सरांनी ब्राह्मणाच्या सुनेची ती मुले दाखविली. त्यांनी ब्राह्मणाच्या सुनेच्या सातही मुलांना जिवंत केले. व तिच्या स्वाधीन केले.
ब्राह्मणाच्या सुनेला त्यांनी एक व्रत सांगितले. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली. तशी सुनेने विचारले, ह्या व्रताने काय फळ मिळते ? अप्सरांनी सांगितले हे व्रत केल्याने मुलंबाळे दगावत नाहीत. सुखासमाधानांत राहातात.

पुढे ती त्यांना नमस्कार करुन आपल्या गावी मुलांसह आली. लोकांनी तीला पाहीले. त्यांनी ब्राह्मणाला जाऊन सांगितली की, तुमची सुन येत आहे. तसे ब्राह्मणानेही मुलाबाळांसह येणार्‍या सुनेला पाहीले. घरांत जाऊन तांदुळ आणुन सर्वांवरुन ओवाळुन टाकून घरांत घेतले. मग सुनेला सर्व विचारले. ते ऐकून सर्वांना आनंद झाला.  ती सर्व मग मुलाबाळांसह सुखाने नांदू लागली. ही पिठोरी आमावास्येची कहाणी येथे पूर्ण झाली. ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.


Custom Search

1 comment:

Unknown said...
This comment has been removed by a blog administrator.