ShriShivaLilamrut Adhyay 7
ShriShivLilaMrut Adhyay 7 is in Marathi. It is from Skandha Purana, Brahmottar Khanda which is in Sanskrit. This Adhayay is very pious and tells us about Simantini and her power of God Shiva’s blessings. Simantini used to worship God Shiva and goddess Parvati on every Monday. A married couple is worshiped by her assuming them as God Shiva and Goddess Parvati. Then couple is honoured with money, ornaments and other offerings by her. Hence king of Virdharbha asked Sumedha and Somavant to go to Simantini on Monday as a couple then she will give them whatever they want. The story goes on is very pious.
ShriShivaLilamrut Adhyay 7
श्रीशिवलीलामृत अध्याय सातवा
Custom Search
श्रीशिवलीलामृत अध्याय सातवा
श्रीगणेशायनमः ॥
जय जय किशोरचंद्रशेखरा । उर्वीधरेंद्रनंदिनीवरा ।
भुजंगभूषणा सप्तकनेत्रा । लीला विचित्रा तुझिया ॥ १ ॥
भानुकोटितेज अपरिमिता । विश्र्वव्यापका विश्र्वनाथा ।
रमाधवप्रिया भूताधिपते अनंता । अमूर्तमूर्ता विश्र्वपते ॥ २ ॥
परमानंदा पंचवक्रा । परात्परा पंचदशनेत्रा ।
परमपावना पयःफेनगात्रा । परममंगला परब्रह्मा ॥ ३ ॥
मंदस्मितवदन दयाळा । षष्ठाध्यायीं अतिनिर्मळा ।
सीमंतिनीआख्यानलीळा । स्नेहळा तूं वदलासी ॥ ४ ॥
श्रीधरमुख निमित्त करुन । तूंचि वदलासी आपुले गुण ।
व्यासरुपें सूतास स्थापून । रसिक पुराण सांगविसी ॥ ५ ॥
ऐसें ऐकतां दयाळ । वदता झाला श्रीगोपाळ ।
विदर्भनगरीं एक सुशीळ । वेदमित्र नामें द्विज होता ॥ ६ ॥
तो वेदशास्त्र संपन्न । त्याचा मित्र सारस्वत नामें ब्राह्मण ।
वेदमित्रास पुत्र सुगुण । सुमेधा नामें जाहला॥ ७ ॥
सारस्वतसुत सोमवंत । उभयतांचें मित्रत्व अत्यंत ।
दशग्रंथीं ज्ञान बहुत । मुखोद्गत पुराणें ॥ ८ ॥
संहिता पद क्रम अरण्य ब्राह्मण । छंद निघंट शिक्षा जाण ।
ज्योतिष कल्प व्याकरण । निरुक्त पूर्ण दशग्रंथीं ॥ ९ ॥
ऐसा विद्याभ्यास करितां । षोडश वर्षें झालीं तत्वतां ।
दोघांचे पिते म्हणती आतां । भेटा नृपनाथा वैदर्भासी ॥ १० ॥
विद्या दावूनि अद्भुत । मेळवावें द्रव्य बहुत ।
मग वधू पाहूनि यथार्थ । लग्नें करुं तुमचीं ॥ ११ ॥
यावरी ते ऋषिपुत्र । विदर्भरायासी भेटले सत्वर ।
विद्याधनाचें भांडार । उघडोनि दाविती नृपश्रेष्ठा ॥ १२ ॥
विद्या पाहतां तोषला राव । परी विनोद मांडिला अभिनव ।
म्हणे मी एक सांगेन भाव । धरा तुम्ही दोघेही ॥ १३ ॥
नैषधपुरीचा नृपनाथ । त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात ।
मृत्युंजयमृडानीप्रीत्यर्थ । दंपत्यपूजा करी बहू ॥ १४ ॥
तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी । होवोनि जावें ये क्षणीं ।
दिव्य अलंकार बहुत धनीं । पूजील तुम्हांकारणें ॥ १५ ॥
तेथोनि यावें परतोन । मग मीही देईन यथेष्ट धन ।
मातापितागुरुनृपवचन । कदा अमान्य करुं नये ॥ १६ ॥
तंव बोलत दोघे किशोर । हें अनुचित कर्म निंद्य फार ।
पुरुषास स्त्री देखतां साचार । सचैल स्नान करावें ॥ १७ ॥
पुरुषासी नारीवेष देखतां । पाहणार जाती अधःपाता ।
वेष घेणारही तत्त्वतां । जन्मोजन्मीं स्त्री होय ॥ १८ ॥
हेंही परत्रीं कर्म अनुचित । तैसेंचि शास्त्र बोलत ।
त्याहीवरी आम्ही विद्यावंत । धन अमित मेळवूं ॥ १९ ॥
आमुची विद्यालक्ष्मी सतेज । तोषवूं अवनीचे भूभुज ।
आमुचे नमूनि चरणांबुज । धन देती प्रार्थूनियां ॥ २० ॥
पंडितांची विद्या माय सद्गुणी । विद्या अकाळीं फळदायिनी ।
विद्या कामधेनु सांडूनी । निंद्य कर्म न करुं कदा ॥ २१ ॥
मातापित्यांहूनि विद्या आगळी । संकटीं प्रवासीं प्रतिपाळी ।
पृथ्वीचे प्रभु सकळी । देखोनियां जोडिती कर ॥ २२ ॥
विद्याहीन तो पाषाण देख । जिताची मृत तो शतमूर्ख ।
त्याचें न पाहावें मुख । जननी व्यर्थ श्रमविली ॥ २३ ॥
राव म्हणे दोघांलागुनी । माझें मान्य करावें एवढें वचन ।
परम संकट पडलें म्हणून । अवश्य म्हणती तेधवां ॥ २४ ॥
रायें वस्त्रें अलंकार आणून । एकासी स्त्रीवेष दे ऊन ।
सोमवारीं यामिनीमाजी जाण । पूजासमयीं पातले ॥ २५ ॥
जे सकळ प्रमदांची ईश्र्वरी । जिची प्रतिमा नाहीं कुंभिनीवरी ।
जीस देखोनि नृत्य करी । पंचशर प्रीतीनें ॥ २६ ॥
रंभा उर्वशी चातुर्यखाणी । परी लज्जा पावती जीस देखोनी ।
रेणुका जानकी श्रीकृष्णभगिनी । उपमा शोभे जियेसी ॥ २७ ॥
तिणें हें दंपत्य देखोनी । कृत्रिम पाहूनि हांसे मनीं ।
परी भावार्थ धरुनि चातुर्यखाणी । हरभवानी म्हणोनि पूजित ॥ २८ ॥
अलंकार वस्त्रें यथेष्ट धन । षड्रस अन्नें देत भोजन ।
शिवगौरी म्हणोन । नमस्कार करुनि बोळवी ॥ २९ ॥
जातां ग्रामपंथ लक्षूनी । पुढें भ्रतार मागें कामिनी ।
नाना विकार चेष्टा भाषणीं । बहुत बोले तयासी ॥ ३० ॥
म्हणे आहे हें एकांतवन । वृक्ष लागले निबिड सघन ।
मी कामनळेंकरुन । गेलें आहाळून प्राणपति ॥ ३१ ॥
तूं वर्षोनि सुरतमेघ । शीतल करी ममांग ।
मी नितंबिनी झालें अभंग । जवळी पाहे येईनियां ॥ ३२ ॥
तो म्हणे कां चेष्टा करिसी विशेष । फेडीं वस्त्र होय पुरुष ।
विनोद करिसी आसमास । हांसती लोक मार्गींचे ॥ ३३ ॥
तंव ते कामें होवोनि मूर्छित । मेदिनीवरी अंग टाकीत ।
म्हणे प्राणनाथा धांव त्वरित । करीं शांत कामज्वरातें ॥ ३४ ॥
तंव तो परतोनि आला सवेग । म्हणे हें नसतें काय मांडिलें सोंग ।
तुम्ही आम्ही गुरुबंधू निःसंग । ब्रह्मचारी विद्यार्थी ॥ ३५ ॥
येरी म्हणे बोलसी काये । माझे अवयव चांचपोनि पाहें ।
गेलें पुरुषत्व लवलाहें । भोगीं येथें मज आतां ॥ ३६ ॥
हातीं धरुनि तयासी । आडमार्गें नेलें एकांतासी ।
वृक्ष गेले गगनासी । पल्लव भूमीसी पसरले ॥ ३७ ॥
साल तमाल देवदार । आम्र कदंबादि तरुवर ।
त्या वनीं नेऊनि सत्वर । म्हणे शंका सांडीं सर्वही ॥ ३८ ॥
मी स्त्री तूं भ्रतार निर्धार । नाहीं येथें दुसरा विचार ।
येरु म्हणे हें न घडे साचार । तुम्ही आम्ही गुरुबंधू ॥ ३९ ॥
शास्त्र पढलासी सकळ । त्याचें काय हेंचि फळ ।
परत्रसाधन सुकृत । निर्मळ विचार करुनि पाहें पां ॥ ४० ॥
आधींच स्त्री वरी तारुण्य । परम निर्लज्ज एकांतवन ।
मिठी घाली गळां धांवून । देत चुंबन बळेंचि ॥ ४१ ॥
घेऊनियां त्याचा हात । म्हणे पाहें हे पयोधर कमंडलुवत ।
तंव तो झिडकारुनि मागें सारीत । नसता अनर्थ करुं नको ॥ ४२ ॥
धन्य धन्य ते पुरुष जनीं । परयोषिता एकांतवनी ।
सभाग्य सधन तरुणी । प्रार्थितां मन चळेना ॥ ४३ ॥
वृत्तीस नव्हे विकार । तरी तो नर केवळ शंकर ।
त्यापासीं तीर्थें समग्र । येवोनि राहती सेवेसी ॥ ४४ ॥
जनरहित घोर वनीं । द्रव्यघट देखिला नयनीं ।
देखतां जाय वोसंडोनी । तरी तो शंकर निर्धारें ॥ ४५ ॥
सत्यवचनीं सत्कर्मीं रत । निगमागमविद्या मुखोद्गत ।
इतकें आसोनि गर्वरहित । तरी तो शंकर निर्धारें ॥ ४६ ॥
आपणा देखतां वर्म काढूनी । निंदक विंधिती वाग्बाणीं ।
परी खेदरहित आनंद मनीं । तरी तो शंकर निर्धारें ॥ ४७ ॥
दुसरियाचे कूटदोष गुण । देखे एके जरी अनुदित ।
परी ते मुखास नाणी गेलिया प्राण । तरी तो शंकर निर्धारें ॥ ४८ ॥
न दिसे स्त्रीपुरुषभान । गुरुरुप पाहे चराचर संपूर्ण ।
न सांगे आपुलें सुकृत दान । तरी तो शंकर निर्धारें ॥ ४९ ॥
पैल मूर्ख हा पंडित । निवडूं नेणें समान पाहत ।
कीर्ति वाढवावी नावडे मनांत । तरी तो शंकर निर्धारें ॥ ५० ॥
अभ्यासिलें न मिरवी लोकांत । शिष्य करावे हा नाहींच हेत ।
कोणाच संग नावडे आवडे एकांत । तरी तो शंकर निर्धारें ॥ ५१ ॥
विरोनि गेल्या चित्तवृत्ती । समाधी अखंड गेली भ्रांती ।
अर्थ बुडालिया नाहीं खंती । तरी तो शंकर निर्धारें ॥ ५२ ॥
श्रीधर म्हणे ऐसे पुरुष । ते ब्रह्मानंद परमहंस ।
त्यांच्या पायींच्या पादुका निःशेष । होऊनि राहावें सर्वदा ॥ ५३ ॥
वेदमित्रपुत्र साधु परम । धैर्यशस्त्रें निवटोनि काम ।
म्हणे ग्रामास चला जाऊं उत्तम । विचार करुं या गोष्टीचा ॥ ५४ ॥
ऐसें बोलोनि सारस्वतपुत्र । स्त्रीरुपें सदना आणिला सत्वर ।
श्रुत केला समाचार । गतकतार्थ वर्तला जो ॥ ५५ ॥
सारस्वतें मांडिला अनर्थ । रायाजवळी आला वक्षःस्थळ बडवीत ।
म्हणे दुर्जना तुवां केला घात । हत्या करीन तुजवरी ॥ ५६ ॥
वेदशास्त्रसंपन्न । येवढाचि पुत्र मजलागुन ।
अरे तुवां निर्वंश केला पूर्ण । काळें वदन झालें तुझें ॥ ५७ ॥
विदर्भ अधोगतमुख पाहात । म्हणे कृत्रिम केवीं झालें सत्य ।
शिवमाया परम अद्भुत । अघटित कर्तृत्व तियेचे ॥ ५८ ॥
रायें मेळवूनि सर्व ब्राह्मण । म्हणे सतेज करा अनुष्ठान ।
द्यावें यासि पुरुषत्व आणून । तरीच धन्य होईन मी ॥ ५९ ॥
विप्र म्हणती हे ईश्र्वरी कळा । आमुचेनि न पालटे भूपाळा ।
तेव्हां विदर्भराव तये वेळां । आराधिता झाला देवीतें ॥ ६० ॥
हवन मांडिलें दुर्धर । राव सप्तदिन निराहार ।
देवी प्रसन्न झाली म्हणे माग वर । मग बोले विदर्भ तो ॥ ६१ ॥
म्हणे हा सोमवंत स्त्रीवेष । यासी पुनः करीं पुरुष ।
देवी म्हणे ही गोष्ट निःशेष । न घडे सहसा कालत्रयीं ॥ ६२ ॥
निःसीम पतिव्रता सीमंतिनी । परम भक्त सद्गुणखाणी ।
तिचे कर्तृत्व माझेनी । न मोडवे सहसाही ॥ ६३ ॥
या सारस्वतासी दिव्य नंदन । होईल सत्य वेदपरायण ।
ईस सुमेधा वर जाण । लग्न करुनि देईजे ॥ ६४ ॥
देवीच्या आज्ञेवरुन । त्यासींच दिधलें लग्न करुन ।
अंबिकेचे वचनें जाण । पुत्र जाहला सारस्वता ॥ ६५ ॥
धन्य सीमंतिनीची शिवभक्ती । उपमा नाहीं त्रिजगतीं ।
जिचे कर्तृत्व हैमवंती । मोडूं न शके सर्वथा ॥ ६६ ॥
सूत म्हणे ऐका सावधान । अंवतीनगरीं एक ब्राह्मण ।
अत्यंत विषयी नाम मदन । श्रृंगारसुगंधमाल्यप्रिय ॥ ६७ ॥
पिंगलानामें वेश्या विख्यात । तिसीं झाला सदा रत ।
सांडूनि ब्रह्मकर्म समस्त । मातापिता त्यागिलीं ॥ ६८ ॥
धर्मपत्नी टाकूनि दुराचारी । तिच्याच घरीं वास करी ।
मद्यमांसरत अहोरात्रीं । कामकर्दमीं लोळत ॥ ६९ ॥
करावया जगदुद्धार । आपणचि अवतरला शंकर ।
ऋषभनामें योगीश्र्वर । होवोनि विचरत महीवरी ॥ ७० ॥
आपुले जे जे निर्वाणभक्त । त्यांचीं दुःखें संकटें निवारीत ।
पिंगलेच्या सदनांत अकस्मात । पूर्वपुण्यास्तव पातला ॥ ७१ ॥
तो शिवयोगींद्र दृष्टीं देखोन । दोघेंहि धांवती धरिती चरण ।
षोडशोपचारेंकरुन । सप्रेम होऊन पूजिती ॥ ७२ ॥
शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध । चतुर्विध अन्नें उत्तम स्वाद ।
भोजन देऊनि बहुविध । अलंकार वस्त्रें दीधली ॥ ७३ ॥
करुनियां दिव्य शेज । निजविला तो शिवयोगीराज ।
तळहातें मर्दिती दोघें चरणांबुज । सुपर्णाग्रजउदय होय तों ॥ ७४ ॥
एक निशी क्रमोनि जाण । शिवयोगी पावला अंतर्धान ।
दोघें म्हणती उमारमण । देऊनि दर्शन गेला आम्हां ॥ ७५ ॥
मग पिंगला आणि मदन । कालांतरीं पावली मरण ।
परी गांठीस होतें पूर्वपुण्य । शिवयोगीपूजनाचें ॥ ७६ ॥
दाशार्हदेशींचा नृपती । वज्रबाहुनामें विशेषकीर्ती ।
त्याची पट्टराणी नामें सुमती । जेवीं दमयंती नळाची ॥ ७७ ॥
तो मदननामें ब्राह्मण । तिच्या गर्भी राहिला जाऊन ।
सीमंतिनीच्या पोटीं कन्यारत्न । पिंगला वेश्या जन्मली ॥ ७८ ॥
कीर्तिमालिनी तिचें नांव । पुढें कथा ऐका अभिनव ।
इकडे सुमतीचे पोटीं भूदेव । असतां विचित्र वर्तलें ॥ ७९ ॥
तिच्या सवती होत्या अपार । ही पट्टराणी ईस होईल पुत्र ।
त्यांहीं तीस विष दुर्धर । गर्भिणी असतां घातलें ॥ ८० ॥
तीस तत्काळ व्हावा मृत्य । परी रोग लागला झाली प्रसूत ।
विष अंगावरी फुटलें बहुत । बाळकासहित जननीच्या ॥ ८१ ॥
क्षतें पडलीं झाले व्रण । रक्त पू गळे रात्रंदिन ।
रायें बहुत वैद्य आणून । औषधें देतां बरें नोहे ॥ ८२ ॥
रात्रंदिवस रडे बाळ । सुमती राणी शोकें विव्हळ ।
मृत्युही नोहे व्यथा सबळ । बरी नव्हेचि सर्वथा ॥ ८३ ॥
लेंकरुं सदा करी रुदन । रायासी निद्रा न लागे रात्रंदिन ।
कंटाळला मग रथावरी घालून । घोर काननीं सोडिलीं ॥ ८४ ॥
जेथें मनुष्याचें नाहीं दर्शन । वसती व्याघ्र सर्प दारुण ।
सुमता बाळककडे घेऊन । सव्यअपसव्य हिंडतसे ॥ ८५ ॥
कंटक पाषाण रुतती चरणीं । मूर्च्छा येऊनि पडे धरणीं ।
आक्रंदे रडे परी न मिळे पाणी । व्रणेंकरुनि अंग तिडके ॥ ८६ ॥
म्हणे जगदात्म्या कैलासपती । जगदवंद्या ब्रह्मानंदमूर्ती ।
भक्तवज्रपंजरा तुझी कीर्ती । सदा गाती निगमागम ॥ ८७ ॥
जय जय त्रिदोषशमना त्रिनेत्रा । जगदंकुरकंदा पंचवक्रा ।
अज अजिता पयःफेनगात्रा । जन्मयात्रा चुकवीं कां ॥ ८८ ॥
अनादिसिद्धां अपरिमिता । मायाचक्रचालका सद्गुणभरिता ।
विश्र्वव्यापका गुणातीता । धांव आतां जगद्गुरो ॥ ८९ ॥
ऐसा धांवा करितां सुमती । तंव वनीं सिंह व्याघ्र गर्जती ।
परम भयभीत होऊनि चित्तीं । बाळासहित क्षितीं पडे ॥ ९० ॥
श्रावणारितनयें नेऊन । वनीं सांडिलें उर्वीगर्भरत्न ।
कीं वीरसेनस्नुषा घोर कानन । पतिवियोगें सेवी जैसें ॥ ९१ ॥
सुमताची करुणा ऐकून । पशु पक्षी करिती रुदन ।
धरणीं पडतां मूर्च्छा येऊन । वृक्ष पक्षी छाया करिताती ॥ ९२ ॥
चंचू भरुनियां जळ । बाळावरी शिंपिती वेळोवेळ ।
एकीं मधुर रस आणोनि स्नेहाळ । मुखीं घालोनि तोषविती ॥ ९३ ॥
वनगाई स्वपुच्छेंकरुनि । वारा घालिती रक्षिती रजनीं ।
असो यावरी ते राजपत्नी । हिंडतां अपूर्व वर्तले ॥ ९४ ॥
तों वृषभभार वणिक घेवोनी । पंथें जातां देख नयनीं ।
त्यांचिया संगेंकरुनी । वैश्यनगरा पातली ॥ ९५ ॥
तेथील अधिपति वैश्य साचार । त्याचें नांव पद्माकर ।
परम सभाग्य उदार । रक्षक नाना वस्तूंचा ॥ ९६ ॥
तेणें सुमतीस वर्तमान । पुसिलें तूं कोठील कोण ।
तिणें जें वर्तलें मुळींहुन । श्रुत केलें तयातें ॥ ९७ ॥
तें ऐकूनि पद्माकर । त्याचे अश्रुधारा स्रवती नेत्र ।
श्र्वासोश्र्वास टाकूनि घोर । म्हणे गति थोर कर्माची ॥ ९८ ॥
वज्रबाहुची पट्टराणी । पतिव्रता अवनीची स्वामिणी ।
अनाथापरी हिंडे वनीं । दीनवदन आली येथें ॥ ९९ ॥
नग पद्माकर म्हणे सुमती । तूं माझी धर्मकन्या निश्र्चितीं ।
शेजारीं घर देऊनि अहोरातीं । परामर्श करी तियेचा ॥ १०० ॥
बहुत वैद्य आणून । देता झाला रसायन ।
केले बहुत प्रयत्न । परी व्याधी न राहेचि ॥ १०१ ॥
सुमती म्हणे ताता । श्रीशंकर वैद्य न होतां ।
कवणासही हे व्यथा । बरी न होय कल्पांतीं ॥ १०२ ॥
असो पुढें व्यथा होतां कठिण । गेला राजपुत्राचा प्राण ।
सुमती शोक करी दीनवदन । म्हणे रत्न गेलें माझें ॥ १०३ ॥
पद्माकर शांतवी बहुतां रीतीं । नगरजन मिळाले सभोंवतीं ।
तों निशांतीं उगवला गभस्ती । तेवीं शिवयोगी आला तेथें ॥ १०४ ॥
जैसें दुर्बळाचें सदन शोधीत । चिंतामणि ये अकस्मात ।
कीं क्षुधेनें प्राण जात । तों क्षीराब्धि पुढें धांविन्नला ॥ १०५ ॥
पद्माकरें धरिले चरण । पूजिला दिव्यासनीं बैसवून ।
त्यावरी सुमतीप्रति दिव्य निरुपण । शिवयोगी सांगता झाला ॥ १०६ ॥
म्हणे वत्से सुमती ऐक । कां हो रडसी करिसी शोक ।
तुझे पूर्वजन्मींचे पति पुत्र जनक । कोठें आहेत सांग पां ॥ १०७ ॥
आलीस चौर्यायशीं लक्ष योनी फिरत । तेथींचे स्वजन सोयरे आप्त ।
आले कोठून गेले कोठें त्वरित । सांग मजपाशीं वृत्तांत हा ॥ १०८ ॥
तूं नाना योनी फिरसी । पुढेंही किती फेरे घेसी ।
कोणाचे पुत्र तूं रडसी । पाहें मानसीं विचारुनी ॥ १०९ ॥
शरीर धरावें ज्या ज्या वर्णीं । त्या त्या कुळाभिमानें नाचती प्राणी ।
परी आपण उत्पन्न कोठूनी । तें विचारुनी न पाहती ॥ ११० ॥
त्वां पुत्र आणिला कोठून । कोण्या स्थळा गेला मृत्यु पावोन ।
तूं आणि हे अवघे जन । जातील कोठें कवण्या देहा ॥ १११ ॥
आत्मा शिव शाश्वत । शरीर क्षणभंगुर नाशवंत ।
तरी तूं शोक करिसी व्यर्थ । विचारुनि मनीं पाहे पां ॥ ११२ ॥
आत्मा अविनाशी शाश्र्वत । तो नव्हे कोणाचा बंधु सुत ।
शरीरकारणें शोक करिसी व्यर्थ । तरी पडलें प्रेत तुजपुढें ॥ ११३ ॥
जळीं उठती तरंग अपार । सवेंचि फुटती क्षणभंगुर ।
मृगजळचि मिथ्या समग्र । तरी बुडबुडे सत्य कैसेनी ॥ ११४ ॥
चित्रींच्या वृक्षछाये बैसला कोण । चित्राग्नीनें कोणाचें जाळिलें सदन ।
तेथे गंगा लिहिली सहितमीन । कोण वाहोनि गेला तेथें ॥ ११५ ॥
वंध्यासुतें द्रव्य आणून । भीष्मकन्या मारुतीस देऊन ।
गंधर्व नगरींचे वर्हाडी आणून । लग्न कोणें लाविलें ॥ ११६ ॥
वार्याचा मंडप शिवून । सिकतादोरें बांधिला आंवळून ।
शुक्तिकारजताचें पात्र करुन । खपुष्पें कोणीं भरियेलें ॥ ११७ ॥
कांसवीचें घालून घृत । मृगजळीचे मीन पाजळती पोत ।
तें चरणीं नूपुरें बांधोनि नाचत । जन्मांध पाहत बैसले ॥ ११८ ॥
अहिकर्णींचीं कुंडलें हिरोनी । चित्रींचे चोर आले घेवोनी ।
हा प्रपंच लटिका मुळींहूनी । तो साच कैसा जाणावा ॥ ११९ ॥
मुळींच लटकें अशाश्वत । त्याचा शोक करणें व्यर्थ ।
केशतरुचें उद्यान समस्त । शरीर हें उद्भवलें ॥ १२० ॥
सकळ रोगांचें भांडार । कृमीकीटकांचे माहेर ।
कीं पापाचा समुद्र । कीं अंबर भ्रांतीचें ॥ १२१ ॥
मूत्र श्र्लेष्म मांस रक्त । अस्थींची मोळी चर्मवेष्टित ।
मातेचा विटाळ पितृरेत । अपवित्र असत्य मुळींच हें ॥ १२२ ॥
ऐसें हें शरीर अपवित्र । तें पशुमूत्रें झालें पवित्र ।
क्षुरें मूर्धज छेदिले समग्र । इतुकेनि पावन केवीं होय ॥ १२३ ॥
शरण न जाती देशिकाप्रति । तरी कैसेनि प्राणी तरती ।
कल्पकोटी फेरे घेती । मुक्त होती कधीं हे ॥ १२४ ॥
सुमती तूं सांगे सत्वर । तुझे जन्मोजन्मींचें कोठें आहेत भ्रतार ।
अवघा हा मायापूर । सावध सत्वर होईं कां ॥ १२५ ॥
जयाचें हें सकळ लेणें । मागतां देतां लाजिरवाणें ।
तनुघर बांधिलें त्रिगुणें । पांच वांसे आणोनियां ॥ १२६ ॥
याचा भरंवसा नाहीं जाण । केधवां लागेल न कळे अग्न ।
कीं हें झालें वस्त्र जीर्ण । ऋणानुबंध तंव तगे ॥ १२७ ॥
मिथ्या जैसें मृगजळ । कीं स्वप्नींचे राज्य ढिसाळ ।
अहा प्राणी पापी सकळ । धन धान्य पुत्र इच्छिती ॥ १२८ ॥
गंगेमाजी काष्ठें मिळती । एकवट होती मागुती बिघडती ।
तैसीं स्त्रीपुरुषें बोलिजेती । खेळ मुळींच असत्य हा ॥ १२९ ॥
वृक्षावरी पक्षी येती । कितीएक बैसती कितीएक जाती ।
आणिक्या तरुवरी बैसती । अपत्यें तैसीं जाण पां ॥ १३० ॥
पथिक वृक्षातळीं बैसत । उष्ण सरलिया उठूनि जात ।
सोयरे बंधू आप्त । तैसेचि जाण निर्धारें ॥ १३१ ॥
मायामय प्रपंचवृक्षीं । जीव शिव बैसले दोन पक्षी ।
शिव सावधान सर्वसाक्षी । जीव भक्षी विषय फळें ॥ १३२ ॥
तीं भक्षितांच भुलोनि गेला । आपण आपणासी विसरला ।
ऐसा अपरिमित जीव भ्रमला । जन्ममरण भोगीतसे ॥ १३३ ॥
त्यांमाजी एखादा पुण्यवंत । सद]गुरुसी शरण रिघत ।
मग तो शिव होवोनि भजत । शिवालागीं अत्यादरें ॥ १३४ ॥
ऐसें ऐकतां दिव्य निरुपण । पद्माकर सुमती उठोन ।
अष्टभावें दाटोन । वंदिती चरण तयाचे ॥ १३५ ॥
म्हणती एवढें तुझें ज्ञान । काय न करिसी इच्छेंकरुन ।
तूं साक्षात उमारमण । भक्तरक्षणा धांवलासी ॥ १३६ ॥
मग मृत्युंजयमंत्र राजयोगी । सुमतीस सांगे शिवयोगी ।
मंत्रून भस्म लावितां अंगीं । व्यथारहित जाहली ते ॥ १३७ ॥
रंभा उर्वशीहून वहिलें । दिव्य शरीर तिचें झालें ।
मृत्युंजय मंत्रें भस्म चर्चिलें । बाळ उठिलें तत्काळ ॥ १३८ ॥
व्रणव्यथा जावोनि सकळ । बत्तीसलक्षणी झाला बाळ ।
मग शिवध्यान उपासना निर्मळ । सुमतीबाळ उपदेशिलें ॥ १३९ ॥
परिस झगडतां पूर्ण । लोह तत्काळ होय सुवर्ण ।
तैसीं दोघें दिव्यरुप जाण । होतीं झालीं ते काळीं ॥ १४० ॥
आश्र्चर्य करी पद्माकर । म्हणे धन्य धन्य गुरुमंत्र ।
काळ मृत्युभय अपार । त्यांपासूनि रक्षी गुरुनाथ ॥ १४१ ॥
गुरुचरणीं रत होती सदा । त्यांसी कैंची भवभयआपदा ।
धनधान्यांसी नाहीं मर्यादा । भेद खेदां वारिलें ॥ १४२ ॥
बाळ चरणावरी घालोनी । सुमती लागे सप्रेम चरणीं ।
म्हणे सद्गुरु तुजवरुनी । शरीर सांडणें हें माझें ॥ १४३ ॥
या शरीराच्या पादुका करुन । तुझिया दिव्य चरणीं लेववीन ।
तरी मी नव्हें उत्तीर्ण । उपकार तुझे गुरुमूर्ती ॥ १४४ ॥
मग शिवयोगी बोलत । आयुरारोग्य ऐश्र्वर्य अद्भुत ।
तुझिया पुत्रासी होईल प्राप्त । राज्य पृथ्वीचें करील हा ॥ १४५ ॥
त्रिभुवनभरी होईल कीर्ति । निजरज्य पावेल पुढती ।
भद्रायु नाम निश्र्चिती । याचें ठेविलें मी जाण ॥ १४६ ॥
थोर होय भद्रायु बाळ । तंववरी क्रमी येथेंचि काळ ।
मृत्युंजय मंत्रजप त्रिकाळ । निष्ठा धरुनि करीत जा॥ १४७ ॥
हा राजपुत्र निश्र्चित । लोकांशी प्रगटों नेदीं मात ।
हा होईल विद्यावंत । चतुःषष्ठीकळाप्रवीण ॥ १४८ ॥
ऐसें शिवयोगी बोलोन । पावला तेथेंचि अंतर्धान ।
गुरुपदांबुज आठवून । सुमती सद्गद क्षणक्षणां ॥ १४९ ॥
पद्माकरासी सुख अत्यंत । सुनय पुत्राहूनि बहुत ।
भद्रायु त्यासी आवडत । सदा पुरवीत लाड त्याचा ॥ १५० ॥
पद्माकरें आपुली संपत्ती वेचून । दोघांचें केलें मेखलाबंधन ।
दोघांसी भूषणें समान । केलें संपन्न वेदशास्त्रीं ॥ १५१ ॥
द्वादश वर्षांचा झाला बाळ । धीर गंभीर परम सुशीळ ।
मातेच्या सेवेसी सदाकाळ । जवळी तिष्ठत सादर ॥ १५२ ॥
पदरीं पूर्वसुकृताचे पर्वत । शिवयोगी प्रगटला अकस्मात ।
सुमती भद्रायु धांवत । पाय झाडीत मुक्तकेशीं ॥ १५३ ॥
नयनोदकें चरणक्षालन । केशवसनें पुसिलें पूर्ण ।
जें सुगंधभरित जाण । स्नेह तेंचि लाविलें ॥ १५४ ॥
वारंवार करिती प्रदक्षिणा । दाटती अष्टभावेंकरुन ।
षोडशोपचारीं पूजन । सोहळा करिती अपार ॥ १५५ ॥
स्तवन करीतसे तेव्हां सुमती । प्रसादेंकरुन मी पुत्रवंती ।
यावरी भद्रायुसी नीति । शिवयोगी शिकवीतसे ॥ १५६ ॥
श्रुतिस्मृति पुराणोक्त पाहीं । धर्मनीतीं वर्तत जाईं ।
माता पितागुरुपायीं । निष्ठा असों दे सर्वदा ॥ १५७ ॥
गोभूदेवप्रजापाळण । सर्वांभूतीं पहावा उमारमण ।
वर्णाश्रमस्वधर्माचरण । सहसाहि न सांडावें ॥ १५८ ॥
विचार केल्यावांचूनियां । सहसा न करावी आनक्रिया ।
मागें पुढें पाहोनियां । शब्द बोलावा कुशलत्वें ॥ १५९ ॥
काळ कोण मित्र किती । कोण द्वेषी शत्रू किती ।
आय काय खर्च किती । पाहावें चित्तीं विचारुनियां ॥ १६० ॥
माझें बळ किती काय शक्ती । आपुले सेवक कैसे वर्तती ।
यश कीं अपयश देती । पहावें चित्तीं विचारुनी ॥ १६१ ॥
अतिथी देव मित्र । स्वामी वेद अग्निहोत्र ।
पशु कृषि धन विद्या सर्वत्र । घ्यावा समाचार क्षणाक्षणां ॥ १६२ ॥
लेंकरुं भार्या अरि दास । सदन गृहवार्ता रोगविशेष ।
येथें उपेक्षा करितां निःशेष । हानि क्षणांत होत पैं ॥ १६३ ॥
ज्या पंथे गेले विद्वज्जन । आपण जावें तोचि पंथ लक्षून ।
मातापितायति निंदा जाण । प्राणांतींही न करावी ॥ १६४ ॥
वैश्र्वदेवसमयीं अतिथी । आलिया त्यासी न पुसावी याती ।
अन्नवस्त्र सर्वांभूतीं । द्यावें प्रीत्यर्थ शिवाचिया ॥ १६५ ॥
परोपकार करावा पूर्ण । परपीडा न करावी जाण ।
करावें गोब्राह्मणरक्षण । सत्य सुजाण म्हणती तया ॥ १६६ ॥
निंदा वाद टाकोन । सर्वदा कीजे शिवस्मरण ।
तेंचि म्हणावें मौन । शिवसेवन तप थोर ॥ १६७ ॥
परदारा आणि परधन । हें न पहावें जेवीं वमन ।
करावें शास्त्र श्रवण । शिवपूजन यथाविधि ॥ १६८ ॥
स्नान होम जपाध्ययन । पंचयज्ञ गो विप्रसेवन ।
श्रवण मनन निजध्यास पूर्ण । अनालस्यें करावीं ॥ १६९ ॥
सुरत निद्रा भोजन । येथें असावें प्रमाण ।
दान सत्कर्म अभ्यास श्रवण । आळस येथें न करावा ॥ १७० ॥
काम पूर्ण धर्मपत्नीसी । निषिद्ध जाण परयोषितेसी ।
क्रोधें दंडावें शत्रूसी । साधुविप्रांसी नमिजे सदा ॥ १७१ ॥
द्वेषियांसी धरावा मद । संतभक्तांसी नम्रता अभेद ।
संसाररिपूंसीं मत्सर प्रसिद्ध । असावें निर्मत्सर सर्वांभूतीं ॥ १७२ ॥
दुर्जनासी दंभ दाविजे । भल्याचें पदरज वंदिजे ।
अहंकारें पृथ्वी जिंकिजे । निरहंकार द्विजांसी ॥ १७३ ॥
वाचा सावध शिवस्मरणीं । पाणी सार्थक दानेंकरुनी ।
पाद पावन देवालययात्रागमनीं । नित्य शिवध्यानीं बैसावें ॥ १७४ ॥
पुराणश्रवणीं श्रोत्र सादर । त्वचा संतआलिंगनीं पवित्र ।
सार्थक शिवध्यानीं नेत्र । जिव्हेनें स्तोत्र वर्णावें ॥ १७५ ॥
शिवनिर्माल्यवास घेईजे घ्राणीं । ये रीतीं इंद्रियें लावावीं भजनीं ।
दीन अनाथ अज्ञान देखोनी । तयावरी कृपा कीजे ॥ १७६ ॥
ईश्र्वरीं प्रेम संतांसीं मैत्री । देवाचे द्वेषी त्यांची उपेक्षा करीं ।
युक्तनिद्रा युक्ताहारी । मृगया करीं परम नीतीनें ॥ १७७ ॥
अतिविद्या अतिमैत्री । अतिपुण्य अतिस्मृती ।
उत्साह धैर्य दान धृती । वर्धमान असावीं ॥ १७८ ॥
आपुलें वित्त आयुष्य गृहछिद्र । मैथुन औषध सुकृत मंत्र ।
दान मान अपमान हीं सर्वत्र । गुप्त असावीं जाणिजे ॥ १७९ ॥
नष्ट पाखंडी शठ धूर्त । पिशुन तस्कर जार पतित ।
चंचळ कपटी नास्तिक अनृत । ग्राम्य सभेसी नसावे ॥ १८० ॥
निंदक शिवभक्तिउच्छेदक । मद्यपानी गुरुतल्पक ।
मार्गपीडक कृतघ्न धर्मलोपक । त्यांचें दर्शन न व्हावें ॥ १८१ ॥
दारा धन आणि पुत्र । यांसीं आसक्त नसावें अणुमात्र ।
अलिप्तपणें संसार । करोनि असक्त असावें ॥ १८२ ॥
बंधु सोयरे श्र्वशुर स्वजन । यांसी स्नेह असावा साधारण ।
भलता विषय देखोन । आसक्ति तेथें न करावी ॥ १८३ ॥
करावें रुद्राक्ष धारण । मस्तकीं कंठीं दंडीं करभूषण ।
गेलिया प्राण शिवपूजन । सर्वथाही न सांडावें ॥ १८४ ॥
शिवकवच सर्वांगीं । लेऊं शिकवी शिवयोगी ।
भस्म चर्चितां रणरंगीं । शस्त्रास्त्रबाधा न होय ॥ १८५ ॥
काळमृत्युभयापासुन । रक्षी मृत्युंजयऔपासन ।
आततायी मार्गघ्न ब्रह्मघ्न । यांसीं जीवें मारावें ॥ १८६ ॥
सोमवारव्रत शिवरात्र प्रदोष । विधियुक्त आचरावें विशेष ।
शिवहरिकीर्तन निर्दोष । सर्व सांडूनि ऐकावें ॥ १८७ ॥
महापर्व कुयोग श्राद्ध दिनीं । व्यतीपात वैधृति संक्रमणीं ।
न प्रवर्तावें मैथुनीं । ग्रहणीं भोजन न करावें ॥ १८८ ॥
सत्पात्रीं देतां दान । होय ऐश्र्वर्य वर्धमान ।
अपात्रीं दानें दारिद्र्य पूर्ण । शास्त्रप्रमाण जाणिजे ॥ १८९ ॥
वेद शास्त्र पुराण कीर्तन । गुरुब्राह्मणमुखें करावें श्रवण ।
दान दिधल्याचें पाळण । करितां पुण्य त्रिगुणहोय ॥ १९० ॥
अपूज्याचें पूजन । पूज्य त्याचा अपमान ।
तेथें भय दुर्मिक्ष मरण । होतें जाण विचारें ॥ १९१ ॥
महाडोहीं उडी घालणें । महापुरुषासीं विग्रह करणें ।
बळवंतासीं स्पर्धा बांधणें । हीं द्वारें अनर्थाचीं ॥ १९२ ॥
दानें शोभे सदा हस्त । कंकणमुद्रिका भार समस्त ।
श्रवणीं कुंडलें काय व्यर्थ । श्रवणसार्थक श्रवणेंचि ॥ १९३ ॥
ज्याची वाचा रसवंती । भार्या रुपवती सती ।
औदार्य गुण संपत्ती । सफल जीवित्व तयाचें ॥ १९४ ॥
देईन अथवा नाहीं सत्य । हें वाचेसि असावें व्रत ।
विद्यापात्रें येतील अमित । सद्यःदान त्यां दीजे ॥ १९५ ॥
विपत्तिकाळीं धैर्य धरी । वादीं जयवंत वैखरी ।
युद्धामाजी पराक्रम करी । याचकांसी पृष्ठी न दाविजे ॥ १९६ ॥
ब्राह्मणमित्रपुत्रां समवेत । तेंचि भोजन उत्तम यथार्थ ।
गजतुरंगासहित पंथ । चालणें तेंचि श्रेष्ठ होय ॥ १९७ ॥
ज्या लिंगाचें नाहीं पूजन । तेथें साक्षेपें पूजा करावी जाऊन ।
अनातहप्रेतसंस्कार जाण । करणें त्या पुण्यासी पार नाहीं ॥ १९८ ॥
ब्रह्मद्वेषाएवढें विशेष । मारक नाहीं कदा विष ।
सत्यमागम रात्रंदिवस । तुच्छ सुधारस त्यापुढें ॥ १९९ ॥
प्रतापें न व्हावें संतप्त । परसौख्यें हर्षभरित ।
सद्वार्ता ऐकतां सुख अत्यंत । तोचि भक्त शिवाचा ॥ २०० ॥
पाषाण नाम रत्नें व्यर्थ । चार रत्नें आहेत पृथ्वींत ।
अन्न उदक सुभाषित । औदार्य रत्न चौथें पैं ॥ २०१ ॥
वर्म कोणाचें न बोलावें । सद्भक्तांचे आशिर्वाद घ्यावे ।
भाग्याभाग्य येत स्वभावें । स्वधर्म ध्रुव न ढळावा ॥ २०२ ॥
पूर्वविरोधी विशेष । त्याचा न धरावा विश्र्वास ।
गर्भिणी पाळी गर्भास । तेवीं प्रजा पाळीं कां ॥ २०३ ॥
गुरु आणि सदाशिव । यांसीं न करावा भेदभाव ।
भाग्यविद्या गर्व सर्व । सोडोनि द्यावा जाण पां ॥ २०४ ॥
नराची शोभा स्वरुप पूर्ण । स्वरुपाचें सद्गुण आभरण ।
गुणाचे अलंकार ज्ञान । ज्ञानाचें भूषण क्षमा शांती ॥ २०५ ॥
कुलशील विद्याधन । राज्य तप रुप यौवन ।
या अष्टमदेंकरुन । मन भुलों न द्यावें ॥ २०६ ॥
ऐसा नानापरी शिवयोगी । बोधिता झाला भद्रायुलागीं ।
हे नीति ऐकतां जगीं । सांकडे न पडे सर्वथा ॥ २०७ ॥
सातवा अध्याय गिरीकैलास । यावरी वास्तव्य करी उमाविलास ।
पारायणप्रदक्षिणा करिती विशेष । निर्दोष यश जोडे तयां ॥ २०८ ॥
कीं हा अध्याय हिमाचळ । भक्तिभवानी कन्या वेल्हाळ ।
तीसी वरोनि पयःफेनधवल । श्र्वशुरगृहीं राहिला ॥ २०९ ॥
पुढील अध्यायीं कथा सुरस । शिवयोगी दया करील भद्रायुस ।
ब्रह्मानंदे निशिदिवस । श्रवण करोत विद्वज्जन ॥ २१० ॥
भवगजविदारक मृगेंद्र । श्रीधरवरद आनंदसमुद्र ।
तो शिव ब्रह्मानंद यतींद्र । जो जगद्गुरु जगदात्मा ॥ २११ ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । सप्तमाऽध्याय गोड हा ॥ २१२ ॥
॥ इति सप्तमोऽध्यायः ॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
ShriShivaLilamrut Adhyay 7
श्रीशिवलीलामृत अध्याय सातवा
Custom Search
No comments:
Post a Comment