Dnyaneshwari Adhyay 3
Ovya 51 to 75
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ३
ओव्या ५१ ते ७५
आणि आपुलालिया चाडे । आपादिलें हें मांडे ।
की त्यजिलें कर्म सांडे । ऐसें आहे ॥ ५१ ॥
५१) आणखी ( असें पाहा कीं, ) आपल्या इच्छेप्रमाणें कर्माचा स्वीकार केला असतां तें घडतें आणि कर्म सोडल्यानें कर्माचा त्याग होतो, असें आहे काय ?
हें वायांचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखों पाहिजे ।
परी त्यजितां कर्म न त्यजे । निभ्रांत मानीं ॥ ५२ ॥
५२) हें उगीच कांहींतरी बोलणें आहे. याचा नीट विचार करुन पाहिलें, तर कर्म करण्याचें टाकलें म्हणजे कर्म त्याग होतो असें नाहीं, हें तूं निःसंशय समज.
जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान ।
जे चेष्टा ते गुणाधीन । आपैसी असे ॥ ५३ ॥
५३) जोंपर्यंत शरीराचा आश्रय आहे, तोपर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन हें म्हणणें मूर्खपणाचें आहे. कारण कीं, जेवढें म्हणून कर्म घडणें आहे, ते स्वभावतः गुणांच्या अधीन आहे.
देखें विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें ।
तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥ ५४ ॥
५४) पाहा, जेवढें म्हणून विहित कर्म आहे तेवढें हट्टानें जरी करावयाचें सोडून दिलें, तरी इंद्रियांचें स्वभाव नाहींसे झाले आहेत काय ?
सांगें श्रवणीं ऐकावें ठेलें । की नेत्रींचें तेज गेलें ।
हें नासारंध्र बुझलें । परिमळु नेघे ॥ ५५ ॥
५५) सांग, कानांनीं ऐकण्याचे बंद झालें आहे काय ? अथवा डोळ्यांतील पाहाण्याचें सामर्थ्य गेलें आहे काय ? या नाकपुड्या बुजुन वास घेईनाशा झाल्या आहेत काय ?
ना तरी प्राणापानगति । कीं निर्विकल्प जाहली मति ।
की क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया ॥ ५६ ॥
५६) अथवा प्राण व अपान, या दोन वायूंच्या क्रिया थांबल्या आहेत काय ? किंवा बुद्धीनें कल्पना करण्याचें सोडले आहे काय ? किंवा भूक, तहान इत्यादिकांची पीडा होण्याचें थांबलें आहे काय ?
हे स्वप्नावबोधु ठेले । कीं चरण चालों विसरले ।
हें असो काय निमाले । जन्ममृत्यू ॥ ५७ ॥
५७) जागृति व स्वप्न ह्या अवस्था थांबल्या का ? अथवा पाय चालावयाचें विसरले काय ? हें सर्व असूं दे. जन्म आणि मरण संपली आहेत काय ?
हें न ठकेचि जरी कांहीं । तरी सांडिलें तें कायी ।
म्हणोनि कर्मत्यागु नाहीं । प्रकृतिमंतां ॥ ५८ ॥
५८) हें जर कांहीं राहात नाहीं तर मग त्याग तो काय केला ? म्हणून शरीराच्या आश्रयानें असणार्यांना कर्मत्याग ( केव्हांहि ) घडत नाही.
कर्म पराधीनपणें । निपजतसे प्रकृतिगुणें ।
येरीं घरीं मोकली अंतःकरणें । वाहिजे वायां ॥ ५९ ॥
५९) कर्म हें परतंत्र असल्यामुळें तें शरीरांतील सत्त्वादि गुणांनुसार उत्पन्न होत असतें. म्हणून एखाद्यानें मी कर्म करीन अथवा कर्म टाकीन, असा अंतःकरणांत अभिमान बाळगणें, हें व्यर्थ आहे.
देखें रथीं आरुढिजे । मग निश्र्चळा बैसिजे ।
तरी चळा होऊनि हिंडिजे । परतंत्रा ॥ ६० ॥
६०) पाहा. रथावर स्वार होऊन, मग जरी स्वस्थ बसलें, तरी तेथें बसणारा रथाच्या अधीन असल्यानें सहजच रथाच्या हालचालींमुळें त्यास प्रवास घडतो.
कां उचलिलें वायुवशें । चळे शुष्क पत्र जैसें ।
निचेष्ट आकाशे । परिभ्रमे ॥ ६१ ॥
६१) अथवा, वायूच्या सपाट्यांत सांपडून उंच उडालेलें वाळलेलें पान ज्याप्रमाणें आपण स्वतः हालचाल न करतां वायुवेगामुळें आकाशांत इकडे तिकडे फिरत असतें;
तैसें प्रकृतिआधारें । कर्मेंद्रियविकारें ।
निष्कर्म्युही व्यापारे । निरंतर ॥ ६२ ॥
६२) त्याप्रमाणें कर्मातीत अवस्थेस प्राप्त झालेला पुरुषहि शरीराच्या आश्रयानें कर्मेंद्रियांच्या द्वारां, नेहमीं कर्में करीत असतो.
म्हणऊनि संगु जंव प्रकृतीचा । तंव त्यागु न घडे कर्माचा ।
ऐसियाहि करुं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरें ॥ ६३ ॥
६३) म्हणून जेथपर्यंत शरीराशी संबंध आहे, तेथपर्यंत कर्मांचा त्याग घडणें शक्य नाहीं; असें असूनहि ' त्याग करुं ' असें जे कोणी म्हणतील, तर त्यांचा हट्ट मात्र उरणार आहे.
जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती ।
परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधुनी ॥ ६४ ॥
६४) जे पुरुष आपल्या वांट्याला आलेलें कर्म टाकतात व त्यायोगें कर्मातीत अवस्थेला पोहोंचूं पाहतात; परंतु केवळ कर्मेंद्रियप्रवृत्तीचा निरोध करुनच !
तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सांपडे ।
वरी नटती तें फुडें । दरिद्र जाण ॥ ६५ ॥
६५) त्यांस कर्मत्याग तर घडत नाहीं, कारण त्यांच्या अंतःकरणांत कर्तव्यबुद्धि असते; असे असूनहि तें बाह्यात्कारीं कर्मत्यागाचा जो डौल आणतात, तें खरोखर दैन्य आहे, असे समज.
ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा ।
ओळखावे तत्त्वत्ता । येथ भ्रांति नाहीं ॥ ६६ ॥
६६) अर्जुना, असे ते लोक खरोखरच केवळ विषयासक्त आहेत, असें निःसंशय समज.
आतां देईं अवधान । प्रसंगें तुज सांगेन ।
या नैराश्याचें चिन्ह । धनुर्धरा ॥ ६७ ॥
६७) अर्जुना, प्रसंग आलेला आहे, म्हणुन तुला या निष्काम पुरुषाचें लक्षण सांगतों. इकडे तूं लक्ष दे.
जो अंतरीं दृढु । परमात्मरुपीं गूढु ।
बाह्य तरी रुढु । लौकिकु जैसा ॥ ६८ ॥
६८) जों अंतर्यामीं निश्चळ व परमात्म्याच्या स्वरुपांत गढलेला असतो आणि बाहेरुन मात्र लोकांप्रमाणें व्यवहार करीत असतो;
तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचें भय न धरी ।
प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जें जें ॥ ६९ ॥
६९) तो इंद्रियांना हुकूम करीत नाहीं आणि विषय बांधतील अशी त्यास भीति नसते. तो अधिकारपरत्वें प्राप्त झालेलें जें जें विहित कर्म त्याचा अनादर करीत नाहीं.
तो कर्मेंद्रियें कर्मीं । राहटतां तरी न नियमी ।
परी तेथिचेनि उर्मी । झांकोळेना ॥ ७० ॥
७०) कर्मेंद्रियें कर्में करीत असली तरी त्यांना तो पुरुष आवरीत नाहीं; पण त्यामुळें उत्पन्न होणार्या विकारांनीं तो लिप्त होत नाहीं.
तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपे ।
जैसें जळीं जळें न शिंपे । पद्मपत्र ॥ ७१ ॥
७१) ज्याप्रमाणें पाण्यांतील कमलाचें पान पाण्यानें लिप्त होत नाहीं, त्याप्रमाणें तो कोणत्याही कामनेनें लिप्त होत नाहीं व अविवेकरुपी मलाच्या योगानें तो मलिन होत नाहीं.
तैसा संसर्गामाजि असे । सकळांसारिखा दिसे ।
जैसें तोयसंगें आभासे । भानुबिंब ॥ ७२ ॥
७२) त्या कमलाच्या पानाप्रमाणें तो अलिप्तपणानें संगामध्यें राहातो. तो दिसण्यांत सामान्य लोकांप्रमाणें दिसतो. ज्याप्रमाणें सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनहि ( प्रतिबिंबामुळें ) पाण्याच्या संगतींत राहतांना दिसतें,
तैसा सामान्यत्वें पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे ।
येरवीं निर्धारितां नेणिजे । सोय जयाची ॥ ७३ ॥
७३) त्याप्रमाणें वरवर पाहिलें तर, तो इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो. बाकी त्याच्यासंबंधीं निश्चित विचार ठरवूं म्हटलें तर त्याच्या स्थितीविषयीं कांहींच कल्पना करतां येत नाहीं.
ऐसां चिन्हीं चिन्हितु । देखसी तोचि मुक्तु ।
आशापाशरहितु । वोळख पां ॥ ७४ ॥
७४) अशा लक्षणांनीं युक्त असलेला जो तुला दिसेल, तोच आशापाशरहित व मुक्त आहे. असें तूं ओळख.
अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं ।
म्हणोनि ऐसा होय यालागीं । म्हणिपे तूतें ॥ ७५ ॥
७५) अर्जुना, जगामध्यें ज्याचें विशेष वर्णन केलें जातें, असा तोच योगी होय. याकरितांच तूं असा हो, म्हणून मी तुला म्हणतों.
Custom Search
No comments:
Post a Comment