Sunday, August 9, 2020

ShriRamCharit Manas Part 31 श्रीरामचरितमानस भाग ३१


 ShriRamCharit Manas Part 31

श्रीरामचरितमानस भाग ३१

दोहा १८० ते १८२

Doha 180 to 182

श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा--कुमुख अकंपन कुलिसरद धूमकेतु अतिकाय ।

एक एक जग जीति सक ऐसे सुभट निकाय ॥ १८० ॥

( याशिवाय ) दुर्मुख, अकंपन, वज्रदंत, धूमकेतू, अतिकाय इत्यादी असे अनेक योद्धे होते. ते एक-एकटेच सर्व जगाला जिंकणारे होते. ॥ १८० ॥

कामरुप जानहिं सब माया । सपनेहुँ जिन्ह कें धरम न दाया॥

दसमुख बैठ सभाँ एक बारा । देखि अमित आपन परिवारा॥

सर्व राक्षस हवे तसे रुप घेऊ शकत होते आणि आसुरी ( माया ) जाणत होते. दया, धर्म हे कधी त्यांच्या स्वप्नातच येत नसत. एकदा सभेत बसलेल्या रावणाने आपला असंख्य परिवार पाहिला. ॥ १ ॥

  , सुत समूह जन परिजन नाती । गनै को पार निसाचर जाती ॥

सेन बिलोकि सहज अभिमानी । बोला बचन क्रोध मद सानी ॥

पुत्र, पौत्र, कुटुंबीय आणि सेवक अगणित होते. त्या संपूर्ण राक्षस जातीला मोजणार कोण ? आपली सेना पाहून स्वभावतःच घमेंडखोर रावण रागाने व गर्वाने म्हणाला, ॥ २ ॥

सुनहु सकल रजनीचर जूथा । हमरे बैरी बिबुध बरुथा ॥

ते सनमुख नहिं करहिं लराई । देखि सबल रिपु जाहिं पराई ॥

' हे सर्व राक्षसगण हो ! ऐका. देव हे आपले शत्रू आहेत. ते समोर येऊन युद्ध करीत नाहीत. बलाढ्य शत्रू पाहिला की, पळून जातात. ॥ ३ ॥

तेन्ह कर मरन एक बिधि होई । कहउँ बुझाइ सुनहु अब सोई ।

द्विजभोजन मख होम सराधा । सब कै जाइ करहु तुम्ह बाधा ॥

त्यांना एकाच उपायाने मारता येते. तो मी तुम्हांला सांगतो. ऐका. ( त्यांना बळ देणारे ) ब्राह्मणभोजन, यज्ञ, हवन आणि श्राद्ध हे आहेत. या सर्वांमध्यें तुम्ही जाऊन विघ्न आणा. ॥ ४ ॥

 दोहा--छुधा छीन बलहीन सुर सहजेहिं मिलिहहिं आइ ।

तब मरिहउँ कि छाड़िहउँ भली भाँति अपनाइ ॥ १८१ ॥

भुकेने दुर्बळ आणि अशक्त झाल्यावर देव सहजपणें शरण येतील. त्यांना मी ठार मारीन किंवा पूर्णपणे आपल्या अधीन करुन सोडून देईन. ' ॥ १८१ ॥

मेघनाद कहुँ पुनि हँकरावा । दीन्हीं सिख बलु बयरु बढ़ावा ॥

जे सुर समर धीर बलवाना । जिन्ह कें लरिबे कर अभिमाना ॥

मग त्याने मेघनादाला बोलावले. सांगून समजावून त्याचे सामर्थ्य वाढेल व देवांविषयी शत्रुभाव वाढेल, असे प्रोत्साहन दिले. ( मग तो म्हणाला, ) ' हे पुत्रा, जे देव युद्धवीर आहेत, बलवान आहेत आणि ज्यांना लढण्याची खुमखुमी आहे, ॥ १ ॥

तिन्हहि जीति रन आनेसु बाँधी । उठि सुत पितु अनुसासन काँधी ॥

एहि बिधि सबही अग्या दीन्ही । आपुन चलेउ गदा कर लीन्ही ॥

त्यांना युद्धांत जिंकून पकडून आण.' मुलाने उठून पित्याची आज्ञा शिरोधार्य मानली. त्याने सर्वांना आज्ञा दिली आणि तो स्वतः हातात गदा घेऊन निघाला. ॥ २ ॥

चलत दसानन डोलति अवनी । गर्जत गर्भ स्त्रवहिं सुर रवनी ॥

रावन आवत सुनेउ सकोहा । देवन्ह तके मेरु गिरि खोहा ॥

रावण चालू लागला, तेव्हा त्याच्या चालण्याने पृथ्वी डळमळू लागली आणि गर्जनेमुळे देवांगनांचे गर्भपात होऊ लागले. रावण रागारागाने येत असल्याचे पाहून देवगण सुमेरु पर्वतातील गुहांमधून आसरा शोधू लागले. ॥ ३ ॥

दिगपालन्ह के लोक सुहाए । सूने सकल दसानन पाए ॥

पुनि पुनि सिंघनाद करि भारी । देइ देवतन्ह गारि पचारी ॥

दिक्पालांचे जे लोक होते, ते रावणाला ओसाड पडलेले दिसले. तो वारंवार प्रचंड सिंहगर्जना करुन देवांना ललकारुन शिव्या देत होता. ॥ ४ ॥

रन मद मत्त फिरइ जग धावा । प्रतिभट खोजत कतहुँ न पावा ॥

रबि ससि पवन बरुन धनधारी । अगिनि काल जम सब अधिकारी ॥

मदाने उन्मत्त झालेला रावण रणामध्ये आपल्या जोडीचा योद्धा शोधत जगभर फिरला, परंतु त्याला आपल्या तोडीचा योद्धा कुठेही मिळाला नाही. सूर्य, चंद्र, वायू, वरुण, कुबेर, अग्नी, काल, यम इत्यादी सर्व अधिकारी, ॥ ५ ॥

किंनर सिद्ध मनुज सुर नागा । हठि सबही के पंथहिं लागा ॥

ब्रह्मसृष्टि जहँ लगि तनुधारी । दसमुख बसबर्ती नर नारी ॥

किन्नर, सिद्ध, मनुष्य, देव आणि नाग या सर्वांच्या मागे तो हट्टाने लागला. ( कुणालाही त्याने शांतपणे बसू दिले नाही. ) ब्रह्मदेवाच्या सृष्टीतील जितके शरीरधारी स्त्री-पुरुष होते, ते सर्व रावणाच्या अधीन झाले. ॥ ६ ॥

आयसु करहिं सकल भयभीता । नवहिं आइ नित चरन बिनीता ॥

भयामुळे सर्वजण त्याची आज्ञा पाळत होते आणि नित्य येऊन त्याच्या पायांवर मस्तक ठेवीत होते. ॥ ७ ॥

दोहा--भुजबल बिस्व बस्य करि राखेसि कोउ न सुतंत्र ।

मंडलीक मनि रावन राज करइ निज मंत्र ॥ १८२ ( क) ॥

रावणाने बाहुबलाने संपूर्ण विश्र्वाला आपल्या ताब्यात घेतले. कुणालाही स्वतंत्र ठेवले नाही. अशा प्रकारे मांडलिक राजांचा अधिपती सार्वभौम सम्राट असलेला रावण मन मानेल तसे राज्य करु लागला. ॥ १८२ ( क) ॥

देव जच्छ गंधर्व नर किंनर नाग कुमारि ।

जीति बरीं निज बाहुबल बहु सुंदर बर नारि ॥ १८२ ( ख ) ॥

देव, यक्ष, गंधर्व, मनुष्य, किन्नर आणि नाग यांच्या कन्या व इतरही सुंदर तसेच उत्तम स्त्रिया त्याने बाहुबलाने जिंकून आणून त्यांच्याशी विवाह केला. ॥ १८२ ( ख ) ॥

इंद्रजीत सन जो कछु कहेऊ । सो सब जनु पहिलेहिं करि रहेऊ ॥

प्रथमहिं जिन्ह कहुँ आयसु दीन्हा । तिन्ह कर चरित सुनहु जो कीन्हा ॥

मेघनादाला त्याने जे सांगितले होते, ते त्याने ( मेघनादाने ) पूर्वीच करुन टाकलेले असे ( अर्थात रावणने सांगताच मेघनाद आज्ञा पाळण्यास जरासुद्धा वेळ लावत नसे. ) ज्यासाठी त्याला पूर्वीच आज्ञा दिल्या होत्या, त्या पाळताना त्याने गाजविलेले कर्तृत्व ऐका. ॥ १ ॥

देखत भीमरुप सब पापी । निसिचर निकर देव परितापी ॥

करहिं उपद्रव असुर निकाया । नाना रुप धरहिं करि माया ॥

सर्व राक्षसांचे समुदाय दिसायला भयंकर, पापी आणि देवांना दुःख देणारे होते. ते समुदाय फार उपद्रव देत व मायेने अनेक प्रकारची रुपे धरीत असत. ॥ २ ॥

जेहि बिधि होइ धर्म निर्मूला । सो सब करहिं बेद प्रतिकूला ॥

जेहिं जेहिं देस धेनु द्विज पावहिं । नगर गाउँ पुर आगि लगावहिं ॥

ज्यामुळे धर्म समूळ नष्ट होईल, अशी वेदविरुद्ध सर्व कामे ते करीत. ज्या ज्या ठिकाणी गाई व ब्राह्मण दिसत, त्या नगरांना, गावांना व वस्त्यांना ते आगी लावत. ॥ ३ ॥

सुभ आचरन कतहुँ नहिं होई । देव बिप्र गुरु मान न कोई ॥

नहिं हरिभगति जग्य तप ग्याना । सपनेहुँ सुनिअ न बेद पुराना ॥

त्यांच्या भयानें कुठेही शुभ आचरण ( ब्राह्मण भोजन, यज्ञ, श्राद्ध इत्यादी ) होत नसे. देव, ब्राह्मण, गुरु यांना कोणीही जुमानत नसे. हरिभक्ती नव्हती, यज्ञ नव्हते, तप व ज्ञान नव्हते. वेद आणि पुराणांचे नाव स्वप्नातही ऐकू येत नसे. ॥ ४ ॥





Custom Search

No comments: