ShriRamCharitManas
दोहा—मिटिहहिं पाप प्रपंच
सब अखिल अमंगल भार ।
लोक सुजसु परलोक सुखु
सुमिरत नामु तुम्हार ॥ २६३ ॥
हे भरता, तुझे
नाम-स्मरण करताच सर्व पापे, अज्ञान आणि अमंगळ यांच्या राशी नष्ट होतील आणि या लोकी
सुंदर कीर्ती व परलोकी सुख मिळेल. ॥ २६३ ॥
कहउँ सुभाउ सत्य सिव साखी ।
भरत भूमि रह राउरि राखी ॥
तात कुतरक करहु जनि जाएँ ।
बैर पेम नहिं दुरइ दुराएँ ॥
हे भरता, मी भगवान
शिवांना साक्षीला ठेवून खरे सांगतो की, ही पृथ्वी तुझ्यावरच आधारित आहे. बाबा रे !
तू विनाकारण खिन्न होऊ नकोस. वैर आणि प्रेम हे लपविल्याने लपत नसते. ॥ १ ॥
मुनिगन निकट बिहग मृग जाहीं
। बाधक बधिक बिलोकि पराहीं ॥
हित अनहित पसु पच्छिउ जाना
। मानुष तनु गुन ग्यान निधाना ॥
पशु-पक्षी हे
मुनींच्याजवळ बिनधास्त जातात, परंतु शिकार्याला पाहून पळून जातात.
पशु-पक्षीसुद्धा मित्र कोण व शत्रू कोण हे ओळखतात, मग मनुष्य शरीर तर गुण व
ज्ञानाचे भांडार आहे. ॥ २ ॥
तात तुम्हहि मैं जानउँ
नीकें । करौं काह असमंजस जीकें ॥
राखेउ रायँ सत्य मोहि
त्यागी । तनु परिहरेउ पेम पन लागी ॥
वत्सा ! मी तुला चांगला
ओळखतो. काय करु. मनाची मोठी द्वि
द्विधा अवस्था झाली
आहे. राजांनी माझा त्याग करुन सत्याचे रक्षण केले आणि माझ्या प्रेमापोटी शरीराचा
त्याग केला. ॥ ३ ॥
तासु बचन मेटत मन सोचू ।
तेहि तें अधिक तुम्हार सँकोचू ॥
ता पर गुर मोहि आयसु दीन्हा
। अवसि जो कहहु चहउँ सोइ कीन्हा ॥
त्यांचे वचन खोटे पडू
नये, असे मला वाटते. त्याहीपेक्षा तुझी भीड मला जास्त वाटते. शिवाय गुरुजींनी
तुझ्या सांगण्याप्रमाणे वागण्याची आज्ञा केली आहे. म्हणून आता तू जे काही सांगशील,
त्याप्रमाणे करण्याची माझी इच्छा आहे. ॥ ४ ॥
दोहा—मनु प्रसन्न करि सकुच
तजि कहहु करौं सोइ आजु ।
सत्यसंध रघुबर बचन सुनि भा
सुखी समाजु ॥ २६४ ॥
तू मन प्रसन्न ठेवून
आणि संकोच सोडून जे काही सांगशील, तेच मी आज करीन.’ सत्यप्रतिज्ञ रघुकुल श्रेष्ठ
श्रीरामांचे वचन ऐकून सर्व समाज सुखावून गेला. ॥ २६४ ॥
सुर गन सहित सभय सुरराजू ।
सोचहिं चाहत होन अकाजू ॥
बनत उपाउ करत कछु नाहीं ।
राम सरन सब गे मन माहीं ॥
देवगणांसह देवराज इंद्र
घाबरुन विचार करु लागला की, योजलेले कार्य बिघडू पाहात आहे. काही उपाय करता येत
नाही. तेव्हा तो मनातल्या मनात श्रीरामांना शरण गेला. ॥ १ ॥
बहुरि बिचारि परस्पर कहहीं
। रघुपति भगत भगति बस अहहीं ॥
सुधि करि अंबरीष दुरबासा ।
भे सुर सुरपति निपट निरासा ॥
मग ते आपसात विचार करुन
म्हणू लागले की, श्रीरघुनाथ हे भक्ताच्या भक्तीला वश असतात. अंबरीष व दुर्वास
यांची आठवण झाल्यावर तर देव व इंद्र फारच निराश झाले. ॥ २ ॥
सहे सुरन्ह बहु काल बिषादा
। नरहरि किए प्रगट प्रहलादा ॥
लगि लगि कान कहहिं धुनि माथा
। अब सुर काज भरत के हाथा ॥
पूर्वी देवांनी फार काळ
दुःख भोगले. भक्त प्रल्हादानेच तेव्हा भगवान नृसिंह यांना प्रकट केले. सर्व देव
परस्परांच्या कानांत कुजबुजून आणि डोकी हालवून म्हणाले की, ‘ यावेळी देवांचे कार्य
भरताच्या हाती आहे. ॥ ३ ॥
आन उपाउ न देखिअ देवा ।
मानत रामु सुसेवक सेवा ॥
हियँ सपेम सुमिरहु सब भरतहि
। निज गुन सील राम बस करतहि ॥
हे देवांनो, आणखी
कोणताही उपाय दिसत नाही. श्रीराम हे आपल्या श्रेष्ठ सेवकाची सेवा मान्य करुन
त्याच्यावर फार प्रसन्न होतात. म्हणून आपले गुण आणि शील यांनी श्रीरामांना वश करुन
घेणार्या भरताचे सर्वजण आपापल्या मनात प्रेमाने स्मरण करा. ‘ ॥ ४ ॥
दोहा—सुनि सुरमत सुरगुर कहेउ भल तुम्हार बड़ भागु ।
सकल सुमंगल मूल जग भरत चरन
अनुरागु ॥ २६५ ॥
देवांचे मत ऐकून
देवगुरु बृहस्पती म्हणाले, ‘ चांगला विचार केलात. तुमचे भाग्य मोठे आहे. भरताच्या
चरणांचे प्रेम हे जगात सर्व मांगल्याचे मूळ आहे. ॥ २६५ ॥
सीतापति सेवक सेवकाई ।
कामधेनु सय सरिस सुहाई ॥
भरत भगति तुम्हरें मन आई ।
तजहु सोच बिधि बात बनाई ॥
सितानाथ श्रीरामांच्या
सेवकाची सेवा ही शेकडो कामधेनूंप्रमाणे सुंदर आहे. तुमच्या मनात भरताची भक्ती आली,
आता काळजी सोडा. विधात्याने सर्व जुळवून आणले. ॥ १ ॥
देखु देवपति भरत प्रभाऊ ।
सहज सुभायँ बिबस रघुराऊ ॥
मन थिर करहु देव डरु नाहीं
। भरतहि जानि राम परिछाहीं ॥
हे देवराज, भरताचा
प्रभाव तर बघा. श्रीरघुनाथ हे मनापासून त्याला पूर्णपणे वश झाले आहेत. हे
देवांननो, भरताला श्रीरामांच्या सावलीप्रमाणे अनुकरण करणारा मानून मन शांत ठेवा.
घाबरण्याचे काही कारण नाही. ‘ ॥ २ ॥
सुनि सुरगुर सुर संमत सोचू
। अंतरजामी प्रभुहि सकोचू ॥
निज सिर भारु भरत जियँ जाना
। करत कोटि बिधि उर अनुमाना ॥
बृहस्पती आणि देवांची
संमती, तसेच त्यांची काळजी ऐकून अंतर्यामी श्रीरामांना संकोच वाटू लागला. तर
भरताला सर्व भार आपल्या शिरी आला, असे मनात वाटले. तो मनामध्ये असंख्य प्रकारचे
अंदाज बांधू लागला. ॥ ३ ॥
करि बिचारु मन दीन्ही ठीका
। राम रजायस आपन नीका ॥
निज पन तजि राखेउ पनु मोरा
। छोहु सनेहु कीन्ह नहिं थोरा ॥
सर्व प्रकारे विचार केल्यावर
शेवटी त्याने मनातल्या मनात हेच ठरविले.की, श्रीरामांच्या आज्ञेमध्येच आपले कल्याण
आहे. त्यांनी स्वतःची प्रतिज्ञा सोडून माझी प्रतिज्ञा राखली. हे करुन त्यांनी काही
कमी कृपा आणि प्रेम केलेले नाही. ॥ ४ ॥
दोहा—कीन्ह अनुग्रह अमित
अति सब बिधि सीतानाथ ।
करि प्रनामु बोले भरतु जोरि
जलज जुग हाथ ॥ २६६ ॥
श्रीजानकीनाथांनी सर्व
प्रकारे माझ्यावर अपार कृपा केलेली आहे. त्यानंतर भरताने दोन्ही करकमल जोडून
प्रणाम केला व म्हटले. ॥ २६६ ॥
कहौं कहावौं का अब स्वामी ।
कृपा अंबुनिधि अंतरजामी ॥
गुर प्रसन्न साहिब अनुकूला
। मिटी मलिन मन कलपित सूला ॥
‘ हे स्वामी, हे
कृपासागर, हे अंतर्यामी, आता मी अधिक काय सांगू ? आणि काय म्हणवून घेऊ ?
गुरुमहाराज प्रसन्न आणि स्वामी हे मला अनुकूल आहेत, हे पाहून माझ्या मलिन मनातील
कल्पित दुःख नष्ट झाले. ॥ १ ॥
अपडर डरेउँ न सोच समूलें ।
रबिहि न दोसु देव दिसि भूलें ॥
मोर अभागु मातु कुटिलाई ।
बिधि गति बिषम काल कठिनाई ॥
मी उगीचच भ्यालो होतो.
माझी चिंता निर्मूळ होती. दिशा विसरल्या तर त्यात हे देवा, सूर्याचा दोष नाही.
माझे दुर्भाग्य, माझे दुर्भाग्य, मातेची कुटिलता, विधात्याची वाकडी चाल आणि काळाचा
कठोरपणा, ॥ २ ॥
पाउ रोपि सब मिलि मोहि घाला
। प्रनतपाल पन अपन पाला ।
यह नइ रीति न राउरि होई ।
लोकहुँ बेद बिदित नहिं गोई ॥
या सर्वांनी मिळून पाय रोवून मला नष्ट केले. परंतु
शरणागताचे रक्षक असलेल्या तुम्ही आपले शरणागताच्या रक्षणाचे ब्रीद पाळून मला
वाचवले. ही काही तुमची नवी रीत नाही. ही लोक व वेद यांत प्रत्यक्ष प्रकट आहे. लपून
राहिलेली नाही. ॥ ३ ॥
जगु अनभल भल एकु गोसाईं । कहिअ होइ भल कासु भलाईं ॥
देउ देवतरु सरिस सुभाऊ । सनमुख बिमुख न काहुहि काऊ ॥
सारे जग वाईट करणारे असो, परंतु हे स्वामी, केवळ तुम्हीच एक
भले करणारे आहात. मग सांगा की, कुणाच्या भलाईमुळे भले होईल ? हे देवा, तुमचा
स्वभाव कल्पवृक्षासारखा आहे. तो कधी कुणाला अनुकूल नसतो व प्रतिकूलही नसतो. ॥ ४ ॥
दोहा—जाइ निकट पहिचानि तरु
छाहँ समनि सब सोच ।
मागत अभिमत पाव जग राउ रंकु
भल पोच ॥ २६७ ॥
त्या कल्पवृक्षाला
ओळखून कोणी त्याच्याजवळ गेला, तर त्याची केवळ सावलीच सर्व चिंता नाहीशी करणारी
आहे.राजा-रंक, चांगले-वाईट, असे जगातील लोक त्या वृक्षाजवळ मागूनच मन मानेल ती
वस्तू प्राप्त करतात. ॥ २६७ ॥
लखि सब बिधि गुर स्वामि
सनेहू । मिटेउ छोभु नहिं मन संदेहू ॥
अब करुनाकर कीजिअ सोई । जन
हित प्रभु चित छोभु न होई ॥
गुरु आणि स्वामी यांचा
सर्व प्रकारे स्नेह असलेला पाहून माझा क्षोभ नाहीसा झाला. मनात कोणताही संशय उरला
नाही. हे दयानिधाना, आता असे करा की, त्यामुळे या दासासाठी प्रभूंच्या मनाला क्षोभ
होऊ नये. ॥ १ ॥
जो सेवकु साहिबहि सँकोची ।
निज हित चहइ तासु मति पोची ॥
सेवक हित साहिब सेवकाई । करै
सकल सुख लोभ बिहाई ॥
जो सेवक स्वामीला भीड
घालून आपले भले व्हावे, असे इच्छितो, त्याची बुद्धी नीच होय. सर्व सुखे व लोभ
सोडून स्वामीची सेवा करावी, यातच सेवकाचे हित आहे. ॥ २ ॥
स्वारथु नाथ फिरें सबही का
। किएँ रजाइ कोटि बिधि नीका ॥
यह स्वारथ परमारथ सारु ।
सकल सुकृत फल सुगति सिंगारु ॥
हे नाथ, तुम्ही परत
येण्यामध्ये सर्वांचाच स्वार्थ आहे आणि तुमची आज्ञा पाळण्यामध्ये कोट्यावधी
प्रकारचे कल्याण आहे. हेच स्वार्थ व परमार्थ यांतील सार आहे. हेच सर्व पुण्यांचे
फळ व संपूर्ण शुभ गतींचा शृंगार आहे. ‘ ॥ ३ ॥
देव एक बिनती सुनि मोरी ।
उचित होइ तस करब बहोरी ॥
तिलक समाजु साजि सबु आना ।
करिअ सुफल प्रभु जौं मनु माना ॥
हे देव ! तुम्ही माझी
एक विनंति ऐकून मग जे योग्य असेल ते करा. रजतिलकासाठी सर्व सामग्री तयार करुन आणली
आहे. प्रभूंच्या मनात असेल, तर कृपा करुन तिचा उपयोग करा. ॥ ४ ॥
दोहा—सानुज पठइअ मोहि बन
कीजिअ सबहि सनाथ ।
नतरु फेरिअहिं बंधु दोउ नाथ
चलौं मैं साथ ॥ २६८ ॥
लहान भाऊ
शत्रुघ्नाबरोबर मला वनात पाठवा आणि तुम्ही अयोध्येला परतून सर्वांना सनाथ करा.
नाहीतर हे नाथ, लक्ष्मण व शत्रुघ्न या दोघांना पाठवून द्या आणि मला तुमच्याबरोबर
येऊ द्या. ॥ २६८ ॥
नतरु जाहिं बन तीनिउ भाई ।
बहुरिअ सीय सहित रघुराई ॥
जेहि बिधि प्रभु प्रसन्न मन
होई । करुना सागर कीजिअ सोई ॥
किंवा आम्ही तिन्ही भाऊ
वनात जाऊ आणि हे रघुनाथ ! सीतादेवीसह आपण
अयोध्येला जा. हे दयानिधी ! ज्या रीतीने आपले मन प्रसन्न होईल, ते आपण करा. ॥ १ ॥
देवँ दीन्ह सबु मोहि अभारु
। मोरें नीति न धरम बिचारु ॥
कहउँ बचन सब स्वारथ हेतू ।
रहत न आरत कें चित चेतू ॥
हे देवा, सर्व जबाबदारी
तुम्ही माझ्यावर टाकली. परंतु माझ्यामध्ये नीतीचा विचार नाही की धर्माचा नाही. मी
आपल्या स्वार्थासाठी सर्व गोष्टी सांगत आहे. दुःखी मनुष्याच्या मनात विवेक राहात
नाही. ॥ २ ॥
उतरु देइ सुनि स्वामि रजाई
। सो सेवकु लखि लाज लजाई ॥
अस मैं अवगुन उदधि अगाधू ।
स्वामि सनेहँ सराहत साधू ॥
स्वामींची आज्ञा
ऐकल्यावर जो उलट उत्तर देतो, अशा सेवकाला पाहून लाजेलाही लाज वाटते. मी अवगुणांचा
अथांग समुद्र आहे, परंतु स्वामी, तुम्ही मला स्नेहामुळे ‘ साधू ‘ म्हणून माझी
वाखाणणी करता. ॥ ३ ॥
अब कृपाल मोहि सो मत भावा ।
सकुच स्वामि मन जाइँ न पावा ॥
प्रभु पद सपथ कहउँ सति भाऊ
। जग मंगल हित एक उपाऊ ॥
हे कृपाळू, ज्यामुळे स्वामींच्या मनाला भीड न पडेल, तोच विचार मला आवडेल. प्रभूंच्या चरणांची शपथ, मी सत्य भावनेने सांगतो की, जगताच्या कल्याणाचा हाच एक उपाय आहे. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment