Friday, October 1, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 20 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग २०

 

Shri Dnyaneshwari
Adhyay 9 Part 20
Ovya 517 to 535
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग २० 
ओव्या ५१७ ते ५३५

मूळ श्लोक

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।

मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण: ॥ ३४ ॥

३४) माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो, माझा भक्त

 हो; माझें यजन करणारा हो, ( सर्वत्र ) मला ( एकाला )

 वंदन कर. अशा रीतीनें मत्परायण होत्साता ( माझें

 ठिकाणीं ) चित्त योजल्यावर तूं माझ्याप्रतच येशील. 

तूं मन हें मीचि करीं । माझां भजनीं प्रेम धरीं ।

सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें ॥ ५१७ ॥

५१७) तूं आपलें मन मद्रूप कर; माझ्या भजनाच्या ठिकाणीं प्रेम धर; आणि सर्व ठिकाणीं माझेंच स्वरुप आहे, असे समजून मला एकाला नमस्कार कर.

माझेनि अनुसंधानें देख । संकल्पु जाळणें निःशेख ।

मद्याजी चोख । याचि नांव ॥ ५१८ ॥

५१८) पाहा; जो माझ्या वेधानें संकल्प पूर्णपणें जाळतो, त्यालाच माझें चांगलें भजन करणारा म्हणावें. 

ऐसा मियां आधिला होसी । तेथ माझियाचि स्वरुपा पावसी ।

हें अंतःकरणींचें तुजपासीं । बोलिजत असे ॥ ५१९ ॥

५१९) याप्रमाणें तूं माझ्या अंतःकरणांतील ( गुह्य गोष्ट ) तुझ्याजवळ मी सांगत आहे.

अगा आवाघिया चोरिया आपुलें । जें सर्वस्व आम्हीं असे ठेविलें ।

तें पावोनि सुख संचले । होऊनि ठासी ॥ ५२० ॥

५२०) अरे, सर्वांपासून लपवून ठेवलेलें असें जें आमचें सर्व भांडवल, तें तुला प्राप्त झालें आहे त्यामुळें तूं सुखरुप होऊन राहाशील. 

ऐसें सांवळेनि परब्रह्में । भक्तकामकल्पदुमें ।

बोलिलें आत्मारामें । संजयो म्हणे ॥ ५२१ ॥

५२१) भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे कल्पतरु जे मेघश्याम परब्रह्म श्रीकृष्ण, ते असें बोलले, असें संजय म्हणाला.

अहो ऐकिजत असे कीं अवधारा । तंव इया बोला निवांत म्हातारा ।

जैसा म्हैसा नुठी कां पुरा । तैसा उगाचि असे ॥ ५२२ ॥

५२२) ( ज्ञानेश्र्वरमहाराज श्रोत्यांना म्हणतात, ऐका: ) संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐकत आहां काय ? तेव्हां वृद्ध धृतराष्ट्र, ज्याप्रमाणें पाण्याच्या पुरांत असलेला रेडा हालत नाहीं त्याप्रमाणें चित्तांत कांहीहि हालचाल न होतां या बोलण्याविषयीं  निवांत असलेला दिसला.

तेथ संजयें माथा तुकिला । अहा अमृताचा पाऊस वर्षला ।

कीं हा एथ असतुचि गेला । सेजिया गांवा ॥ ५२३ ॥

५२३) त्या वेळी संजयानें मान डोलावली आणि ( आपल्याशीच ) म्हणाला, ‘ अहा ! आज अमृताची वृष्टि झाली; परंतु हा धृतराष्ट्र येथेंच असूनहि शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे.

तर्‍ही दातारु हा आमुचा । म्हणोनि हें बोलतां मैळेल वाचा ।

काइ झालें ययाचा । स्वभावोचि ऐसा ॥ ५२४ ॥

५२४) पण हा आमचा मालक आहे, त्याच्याविषयीं असें बोललें असतां वाचेस दोष लागेल; काय करावें ? याचा स्वभावच  असा आहे.

परि बाप भाग्य माझें । जें वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजें ।

कोसा रक्षिलों मुनिराजें । श्रीव्यासदेवें ॥ ५२५ ॥

५२५) परंतु धन्य माझें भाग्य कीं, महामुनि व्यासदेवांनीं धृतराष्ट्राला युद्धांतील वृत्तान्त सांगावयाच्या निमित्तानें माझें कसें रक्षण केलें ! ( म्हणजे ज्ञानपूर्ण संवादश्रवणानें जन्ममृत्युपासून माझें रक्षण केलें. )    

येतुलें हें वाडें सायासें । जंव बोलत असे दृढें मानसें ।

तंव न धरवेचि आपुलिया ऐसें । सात्त्विकें केलें ॥ ५२६ ॥

५२६) मोठ्या कष्टानें मन आंवरुन धरुन, तो संजय इतकें बोलत होता तोंच अष्ट सात्त्विक भाव उत्पन होऊन, त्यांनीं संजयास असें आपल्या आधीन करुन घेतलें कीं, त्यास ते अष्ट सात्त्विक आवरुन धरवेनात.  

चित्त चाकाटलें आटु घेत । वाचा पांगुळली जेथिंची तेथ ।

आपादकंचुकित । रोमांच आले ॥ ५२७ ॥

५२७) चित्त चकित होऊन आटूं लागलें आणि वाचा जागच्या जागीं कुंठित होऊन राहिली व पायापासून मस्तकापर्यंत अंगरखा घातल्यासारखें सर्व अंगावर रोमांच आले.

अर्धोन्मीलित डोळे वर्पताति आनंदजळें ।

आंतुलिया सुखोमींचेनि बळें । बाहेरि कांपे ॥ ५२८ ॥

५२८) अर्धवट उघडलेले डोळे आनंदाचा वर्षाव करुं लागले व आंत होणार्‍या सुखाच्या लाटेच्या जोरामुळें त्यांचे बाहेरील शरीर कांपू लागलें..

पैं आघवांचि रोगमूळीं । आली स्वेदकणिका निर्मळी ।

लेइला मोतियांचीं कडियाळीं । आवडे तैसा ॥ ५२९ ॥

५२९) सर्व रोमांचांच्या बुडाशीं निर्मळ घामाचे थेंब आले, त्यामुळें जसा एखाद्यानें मोत्यांचा जाळीदार अंगरखा घालावा, तसा तो दिसूं लागला.   

ऐसा महासुखाचेनि अतिरसें । जेथ आटणी होईल जीवदशे ।

तेथें निरोविलें व्यासें । तें नेदीच ॥ ५३० ॥

५३०) याप्रमाणें महासुखाच्या भरानें जेव्हां जीवदशेचीं आटणी होण्याची वेळ आली, तेव्हां व्यासांनीं युद्धवृत्तांत सांगण्याची केलेली आज्ञा ती आटणी होऊं देईना.

आणि कृष्णार्जुनाचें बोलणें । घों करी आलें श्रवणें ।

कीं देहस्मृतीचा तेणें । वापसा केला ॥ ५३१ ॥

५३१) आणि त्यावर श्रीकृष्ण व अर्जुन यांचें बोलणें घों घों अशी गर्जना करीत संजयाच्या कानावर आलें व त्या बोलण्यानें संजयाच्या ठिकाणीं देहस्मृतीचा वाफसा केला. ( संजय देहस्मृतीवर आला. )

तेव्हां नेत्रींचें जळ विसर्जी । सर्वांगींचा स्वेदु परिमार्जी ।

तेवींच अवधान म्हणे हो जी । धृतराष्ट्रातें ॥ ५३२ ॥

५३२) तेव्हां डोळ्यांतील आनंदाश्रु त्यानें पुसले व सर्व अंगास आलेला घाम पुसून टाकला व त्याप्रमाणें ‘ महाराज लक्ष द्या ‘ असें तो धृतराष्ट्राला म्हणाला.

आतां कृष्णवाक्यबीजा निवाडु । आणि संजय सात्त्विकाचा बिवडु ।

म्हणोनि श्रोतया होईल सुरवाडु । प्रमेयपिकाचा ॥ ५३३ ॥

५३३) आतां श्रीकृष्णांची वाक्यें हीच कोणी एक उत्तम बीजें आणि त्यांस संजय हीच अष्ट सात्त्विक भावरुपी पिकाच्या बिवडाची जमीन मिळाली; त्यामुळें श्रोत्यांना प्रमेयपिकाचा सुकाळ होईल.  

अहो अळुमाळ अवधान देयावें । येतुलेनि आनंदाचिया राशीवरी बैसावें ।

बाप श्रवणेंद्रिया दैवें । घातली माळ ॥ ५३४ ॥

५३४) अहो थोडकेसें लक्ष द्यावें आणि एवढ्यानें आनंदाच्या राशीवर बसावें. धन्य आहे त्या कानांची कीं, आज त्यांस भाग्यानें माळ घातली आहे !

म्हणोनि विभूतींचा ठावो । अर्जुना दावील सिद्धांचा रावो ।

तो ऐका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥ ५३५ ॥

५३५) म्हणून ( आपल्या ) विभूतींची जीं स्थानें आहेत, ती सिद्धांचा राजा जो श्रीकृष्ण, तो अर्जुनास दाखवील. निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्र्वर म्हणतात, तो प्रसंग श्रोत्यांनी ऐकावा.

इति श्रीमद् भगवद् गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥ श्लोक ३४; ओव्या ५३५ )

ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।


Custom Search

No comments: