Showing posts with label AyodhyaKanda Part 25. Show all posts
Showing posts with label AyodhyaKanda Part 25. Show all posts

Monday, May 10, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 25 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग २५

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 25 
Doha 143 to 148 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग २५ 
दोहा १४३ ते १४८
दोहा--भयउ निषादु बिषादबस देखत सचिव तुरंग ।
बोलि सुसेवक चारि तब दिए सारथी संग ॥ १४३ ॥
मंत्री व घोड्यांची झालेली दशा पाहून निषादराजाला विषाद वाटला. तेव्हा त्याने चार उत्तम सेवक बोलावून सारथ्यासोबत दिले. ॥ १४३ ॥
गुह सारथिहि फिरेउ पहुँचाई । बिरहु बिषादु बरनि नहिं जाई ॥
चले अवध लेइ रथहि निषादा । होहिं छनहिं छन मगन बिषादा ॥
निषादराज गुह सारथी सुमंत्र याला निरोप देऊन परतला. त्याचा विरह व दुःख यांचे वर्णन करणे अशक्य. ते चौघे निषाद-रथ घेऊन अयोध्येकडे निघाले. सुमंत्र व घोडे यांना पाहून तेसुद्धा क्षणोक्षणी विषादामध्ये बुडून जात होते. ॥ १ ॥'
सोच सुमंत्र बिकल दुख दीना । धिग जीवन रघुबीर बिहीना ॥
रहिहि न अंतहुँ अधम सरीरु । जसु न लहेउ बिछुरत रघुबीरु ॥
व्याकूळ व दुःखाने दीन झालेला सुमंत्र विचार करीत होता की, श्रीरघुवीरांच्या विना जिण्याचा धिक्कार असो. शेवटी हे अधम शरीर राहणार तर नाही. आत्ताच श्रीरामांचा वियोग होताच या देहाने नष्ट होऊन कीर्ती संपादन का केली नाही ? ॥ २ ॥
भए अजस अघ भाजन प्राना । कवन हेतु नहिं करत पयाना ॥
अहह मंद मनु अवसर चूका । अजहुँ न हृदय होत दुइ टूका ॥
हे प्राण अपकीर्ती आणि पापाचे भांडे आहेत. आता हे निघून का जात नाहीत ? अरेरे, नीच मनाने चांगली संधी घालविली. अजूनही हृदय दोन तुकडे होऊन फुटुन जात नाही. ॥ ३ ॥
मीजि हाथ सिरु धुनि पछिताई । मनहुँ कृपन धन रासि गवाँई ॥
बिरिद बॉंधि बर बीरु कहाई । चलेउ समर जनु सुभट पराई ॥
सुमंत्र हात चोळत व डोके बडवून घेत पश्चात्ताप करीत होता. जणू एखादा कंजूष माणूस धनाचा खजिना गमावून बसला होता. जणू एखादा वीराचा वेष घातलेला मोठा योद्धा आणि उत्तम शूर म्हणून मानला जात असलेला मनुष्य युद्धातून पळून निघाला होता. ॥ ४ ॥
दोहा--बिप्र बिबेकी बेदबिद संमत साधु सुजाति । 
जिमि धोखें मदपान कर सचिव सोच तेहि भॉंति ॥ १४४ ॥
ज्याप्रमाणे कुणा विेवेकशील, वेदसंपन्न, साधु-संमत वागणार्‍या कुलीन ब्राह्मनाने चुकून मद्य प्यावे आणि पश्चात्ताप करावा, त्याप्रमाणे मंत्री पश्चात्ताप करीत होता. ॥ १४४ ॥
जिमि कुलीन तिय साधु सयानी । पतिदेवता करम मन बानी ॥
रहै करम बस परिहरि नाहू । सचिव हृदयँ तिमि दारुन दाहू ॥ 
ज्याप्रमाणे एखादी कुलीन, सज्जल स्वभावाची, समजूतदार आणि मन, वचन व कर्माने पतीला देव समजणारी पतिव्रता असणार्‍या स्त्रीला दुर्दैवाने पतीला सोडून राहावे लागावे, त्यावेळी तिच्या मनात ज्याप्रमाणे भयानक यातना होतात, त्याप्रमाणे मंत्र्याच्या मनाची अवस्था झाली होती. ॥ १ ॥
लोचन सजल डीठि भइ थोरी । सुनइ न श्रवन बिकल मति भोरी ॥
सूखहिं अधर लागि मुहँ लाटी । जिउ न जाइ उर अवधि कपाटी ॥
डोळ्यांत पाणी भरले होते, दृष्टी मंद झाली होती, कानांना कांहीं ऐकू येत नव्हते, व्याकूळ झालेली बुद्धी भरकटत होती. ओठ सुकले होते, तोंड चिकटले होते. परंतु ही मृत्युची लक्षणें असूनही प्राण जात नव्हते, कारण अंतःकरणाला चौदा वर्षांचा अवधी संपल्यावर भगवंत पुन्हा भेटतील, या आशेचे दार लागले होते. ॥ २ ॥                   
बिबरन भयउ न जाइ निहारी । मारेसि मनहुँ पिता महतारी ॥
हानि गलानि बिपुल मन ब्यापी । जमपुर पंथ सोच जिमि पापी ॥
सुमंत्राचा चेहरा पडला होता. तो पाहावत नव्हता. असे वाटत होते की, त्याच्या हातून जणू आई-वडिलांची हत्या घडली असावी. त्याच्या मनात रामवियोगरुपी हानी झाल्याची मोठी वेदना होती. ज्याप्रमाणे एखादा पापी मनुष्य नरकात जाताना मार्गामध्ये काळजी करीत असतो, त्याप्रमाणे त्याची स्थिती झाली होती. ॥ ३ ॥
बचनु न आव हृदयँ पछिताई । अवध काह मैं देखब जाई ॥
राम रहित रथ देखिहि जोई । सकुचिहि मोहि बिलोकत सोई ॥
तोंडातून शब्द फुटत नव्हता. मनाला काळजी होती की, अयोध्येस गेल्यावर काय दिसेल ? श्रीराम नसलेला रथ जो कोणी पाहील, तो माझे तोंडही पाहाणार नाही. ॥ ४ ॥
दोहा--धाइ पूँछिहहिं मोहि जब बिकल नगर नर नारि ।
उतरु देब मैं सबहि तब हृदयँ बज्रु बैठारि ॥ १४५ ॥
नगरातील सर्व व्याकूळ स्त्री-पुरुष धावत येऊन मला विचारतील, तेव्हा छातीवर दगड ठेवून सर्वांना उत्तर द्यावे लागेल. ,॥ १४५ ॥
पुछिहहिं दीन दुखित सब माता । कहब काह मैं तिन्हहि बिधाता ॥
पूछिहि जबहिं लखन महतारी । कहिहउँ कवन सँदेस सुखारी ॥
जेव्हा दीन-दुःखी सर्व माता विचारु लागतील, तेव्हा हे विधात्या, मी त्यांना काय उत्तर देऊ ? जेव्हा लक्ष्मणाची माता मला विचारील, तेव्हा मी तिला कोणता सुखदायक निरोप देऊ ? ॥ १ ॥
राम जननि जब आइहि धाई । सुमिरि बच्छु जिमि धेनु लवाई ॥
पूँछत उतरु देब मैं तेही । गे बनु राम लखनु बैदेही ॥
श्रीरामांची माता नुकतीच व्यालेली गाय वासराची आठवण येताच धावत येते त्याप्रमाणे धावत येईल. तिने येऊन विचारल्यावर मला हेच उत्तर द्यावे लागणार की, श्रीराम, लक्ष्मण व सीता वनात निघून गेले. ॥ २ ॥
जोइ पूँछिहि तेहि ऊतरु देबा । जाइ अवध अब यहु सुखु लेबा ॥
पूँछिहि जबहिं राउ दुख दीना । जिवनु जासु रघुनाथ अधीना ॥
जो कोणी विचारील, त्याला हेच उत्तर द्यावे लागणार, अरेरे, अयोध्येस गेल्यावर आता हेच सुख मिळण्याचे माझ्या नशिबी आहे. ज्यांचे जीवन श्रीरघुनाथांच्या दर्शनावर अवलंबून आहे, ते दुःखामुळे दीन झालेले महाराज मला विचारतील, ॥ ३ ॥
देहउँ उतरु कौनु मुहु लाई । आयउँ कुसल कुअँर पहुँचाई ॥
सुनत लखन सिय राम सँदेसू । तृन जिमि तनु परिहरिहि नरेसू ॥
तेव्हा कोणत्या तोंडाने मी उत्तर देऊ की, मी राजकुमारांना सुखरुप पोहोचवून आलो. लक्ष्मण, सीता व श्रीरामांची वार्ता ऐकताच महाराज कस्पटाप्रमाणे आपले शरीर टाकून देतील. ॥ ४ ॥
दोहा--हृदय न बिदरेउ पंक जिमि बिछुरत प्रीतमु नीरु ।
जानत हौं मोहि दीन्ह बिधि यहु जातना सरीरु ॥ १४६ ॥
प्रियतम श्रीरामरुपी जलापासून दूर होताच माझे हृदय चिखला-प्रमाणे विदीर्ण झाले नाही, म्हणून वाटते की, विधात्याने मला हे ' यातना शरीर ' च नरक-यातना भोगण्यासाठी दिले आहे. ' ॥ १४६ ॥
एहि बिधि करत पंथ पछितावा । तमसा तीर तुरत रथु आवा ॥
बिदा किए करि बिनय निषादा । फिरे पायँ परि बिकल बिषादा ॥
सुमंत्र अशा प्रकारे वाटेमध्ये पश्चात्ताप करीत होता, इतक्यात रथ तमसा नदीच्या तीरावर येऊन पोहोचला. मंत्र्याने विनंती करुन सोबत आलेल्या चारी निषादांना परत पाठविले. तेही दुःखाने व्याकूळ होत सुमंत्राच्या पाया पडले. ॥ १ ॥
पैठत नगर सचिव सकुचाई । जनु मारेसि गुर बॉंभन गाई ॥
बैठि बिटप तर दिवसु गवॉंवा । सॉंझ समय तब अवसरु पावा ॥
जणू काही गुरु, ब्राह्मण किंवा गाय यांची हत्या करुन आल्याप्रमाणे नगरात प्रवेश करताना मंत्र्याला संकोच वाटत होता. त्याने दिवसभर एका झाडाखाली बसून घालविला. जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा संधि मिळाली. ॥ २ ॥
अवध प्रबेसु कीन्ह अँधिआरें । पैठ भवन रथु राखि दुआरें ॥
जिन्ह जिन्ह समाचार सुनि पाए । भूप द्वार रथु देखन आए ॥
अंधार झाल्यावर त्याने अयोध्येमध्ये प्रवेश केला आणि दरवाज्यासमोर रथ उभा करुन तो हळूच महालात गेला. ज्या लोकांना याची वार्ता लागली, ते सर्वजण रथ पाहण्यास राजद्वारी आले. ॥ ३ ॥
रथु पहिचानि बिकल लखि घोरे । गरहिं गात जिमि आतप ओरे ॥
नगर नारि नर ब्याकुल कैसें । निघटत नीर मीनगन जैसें ॥
रथ ओळखून आणि घोडे व्याकुळ झाल्याचे पाहून ज्याप्रमाणे उन्हामध्ये गारा वितळू लागतात, त्याप्रमाणे पाहणार्‍यांचे देह गळून जात होते. जळ आटल्यावर मासे व्याकूळ होतात, तसे नगरातील स्त्री-पुरुष व्याकुळ झाले होते. ॥ ४ ॥
दोहा--सचिव आगमनु सुनत सबु बिकल भयउ रनिवासु ।
भवनु भयंकर लाग तेहि मानहुँ प्रेत निवासु ॥ १४७ ॥
मंत्री एकटाच परत आल्याचे ऐकताच संपूर्ण अंतःपूर व्याकूळ झाले. त्यांना राजमहाल स्मशानाप्रमाणे भयंकर वाटू लागला. ॥ १४७ ॥
अति आरति सब पूँछहिं रानी । उतरु न आव बिकल भइ बानी ॥
सुनइ न श्रवन नयन नहिं सूझा । कहहु कहॉं नृपु तेहि तेहि बूझा ॥ 
अत्यंत आर्त होऊन सर्व राण्या विचारु लागल्या, परंतु सुमंत्राला काही उत्तर देता येईना. त्याची वाणी अडखळली. त्याला कानांनी काही ऐकू येत नव्हते, की डोळ्यांनी दिसत नव्हते. जो कोणी समोर येई त्याला तो विचारी की, महाराज कुठे आहेत ते सांगा.' ॥ १ ॥
दासिन्ह दीख सचिव बिकलाई । कौसल्या गृहँ गईं लवाई ॥
जाइ सुमंत्र दीख कस राजा । अमिअ रहित जनु चंदु बिराजा ॥
तो व्याकूळ झाल्याचे पाहून दासी त्याला कौसल्येच्या महालात घेऊन गेल्या. तेथे महाराज असे बसले होते की, जणू अमृताविना चंद्र तेजोहीन होऊन बसलेला असावा. ॥ २ ॥
आसन सयन बिभूषन हीना । परेउ भूमितल निपट मलीना ॥
लेइ उसासु सोच एहि भॉंती । सुरपुर तें जनु खँसेउ जजाती ॥
राजे आसन, शय्या व आभूषणें सोडून, खूप उदास होऊन जमिनीवर पडले होते. ते उसासे टाकत विचार करीत होते की, जणू ययाती स्वर्गातून पतन झाल्यामुळे काळजी करीत बसला असावा. ॥ ३ ॥
लेत सोच भरि छिनु छिनु छाती । जनु जरि पंख परेउ संपाती ॥
राम राम कह राम सनेही । पुनि कह राम लखन बैदेही ॥
राजे क्षणोक्षणी मनातून काळजी करीत होते, गृध्रराज जटायूचा भाऊ संपाती पंख जळून गेल्यावर जसा पडला होता, तशी राजाची विकल दशा झाली होती. राजे वारंवार ' राम, राम ', ' हे प्रिय राम ' म्हणत होते. नंतर ' हे राम, हे लक्ष्मण व हे जानकी ' असे म्हणू लागत. ॥ ४ ॥
दोहा--देखि सचिवँ जय जीव कहि कीन्हेउ दंड प्रनामु ।
सुनत उठेउ ब्याकुल नृपति कहु सुमंत्र कहँ रामु ॥ १४८ ॥
मंत्र्याने ' जय जीव ' असे म्हणून दंडवत प्रणाम केला. ऐकताच राजाने व्याकूळ होऊन विचारले, ' सुमंत्रा, राम कुठे आहे, ते सांग.' ॥ १४८ ॥
भूप सुमंत्रु लीन्ह उर लाई । बूड़त कछु अधार जनु पाई ॥
सहित सनेह निकट बैठारी । पूँछत राउ नयन भरि बारी ॥
राजांनी सुमंत्राला हृदयाशी कवटाळले. जणू बुडत्याला काठीचा आधार मिळावा. मंत्र्याला प्रेमाने जवळ बसवून व डोळ्यांत अश्रू आणून राजे विचारु लागले. ॥ १ ॥
राम कुसल कहु सखा सनेही । कहँ रघुनाथु लखनु बैदेही ॥
आने फेरि कि बनहि सिधाए । सुनत सचिव लोचन जल छाए ॥              
' हे माझ्या प्रेमळ मित्रा, श्रीरामाची खुशाली सांग, राम, लक्ष्ंमण व सीता कुठे आहेत, ते सांग. त्यांना परत आणलेस की ते वनात निघून गेले ? ' हे ऐकताच मंत्र्याचे नेत्र पाण्याने डबडबले. ॥ २ ॥
सोक बिकल पुनि पूँछ नरेसू । कहु सिय राम लखन संदेसू ॥
राम रुप गुन सील सुभाऊ । सुमिरि सुमिरि उर सोचत राऊ ॥
शोकामुळे व्याकूळ होऊन राजे पुन्हा विचारु लागले, ' सीता, राम व लक्ष्मण यांची वार्ता तर सांग.' श्रीरामांचे रुप, गुण, शील आणि स्वभाव यांची आठवण कर करुन राजे मनात शोक करु लागले. ॥ ३ ॥
 राउ सुनाइ दीन्ह बनबासू । सुनि मन भयउ न हरषु हरॉंसू ॥
सो सुत बिछुरत गए न प्राना । को पापी बड़ मोहि समाना ॥
ते म्हणाले, ' मी श्रीरामाला राजा करण्याचे सांगून वनवास दिला. ते ऐकून रामाच्या मनात हर्ष वा विषाद आला नाही. असा पुत्र सोडून गेल्यावरही माझे प्राण गेले नाहीत; मग माझ्यासारखा मोठा पापी कोण असेल ? ॥ ४ ॥



Custom Search