Showing posts with label Kahani Annapoornechi. Show all posts
Showing posts with label Kahani Annapoornechi. Show all posts

Monday, October 7, 2019

Kahani Annapoornechi कहाणी अन्नपूर्णेची


Kahani Annapoornechi 
कहाणी अन्नपूर्णेची Kahani Annapoornechi कहाणी अन्नपूर्णेची is in Marathi. It is astory of Goddaess Annapoorna. who looks after our food.
कहाणी अन्नपूर्णेची
काशी नगरींत धनंजय नावाचा विद्वान ब्राह्मण राहात होता. त्याच्या बायकोचे नांव होते सुलक्षणा. त्यांच्या घरांत अठराविश्वे दारिद्र्य होते. एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयला वाईट वाटले व त्याने शंकराची तपश्र्चर्या करावयास सुरुवात केली. तीन दिवस झाल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा, अन्नपूर्णा, अन्नपूर्णा असे शब्द उच्चारले. त्याला त्याचा अर्थ कळला नाही. म्हणून त्याने पुन्हा तपश्र्चर्येला सुरवात केली. तेव्हा रात्री शंकरांनी त्याला दृष्टांत दिला, " मुला तू पूर्व दिशेला जा. तुझे मनोरथ पूर्ण होतील. " दुसर्‍या दिवशी तो पूर्वेकडे निघाला.बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो एका सरोवराजवळ पोहोचला. तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या. त्याने त्यांना पाहून विचारले, हे तुम्ही कसले व्रत करीत आहात ? 
अप्सरा म्हणाल्या, " आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत. हे व्रत कोणीही करु शकतो. २१ दिवसांसाठी २१ गाठी असलेला दोरा घ्यावा. एकवीस दिवस उपवास करावा. ते जमणार नसेल तर एक दिवस तरी उपवास करावा. हे सुद्धा जमणार नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा. उपवास करुन कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा तेवत ठेवावा. आणि शंकर-पार्वतीला साक्ष ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकीने अन्नग्रहण झाल्यास परत दुसर्‍या दिवशी उपवास करावा. व्रत करावयाच्या दिवशी रागावू नये, खोटे बोलू नये. हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी येते. लुळ्याला पाय येतात. निर्धन व्यक्त्तीला धन मिळते. अपुत्रीकाल पुत्र लाभ होतो. जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते. जी जी इच्छा धरुन व्रत केलेा असेल ती ती इच्छा पूर्ण होते. 
ब्राह्मण म्हणाला, " बाई, मला खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही, विद्येचे नाव नाही. मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे. आपण मला व्रताचे सूत द्याल कां ? "
अप्सरा म्हणाल्या देऊ, पण तू त्याचा अपमान करता कामा नये. त्याची हेळसांड करता कामा नये. 
ब्राह्मणाने ते मान्य केले.
मग अप्सरा म्हणाल्या, " हे घे ते पवित्र सूत."
धनंजयाने व्रत केले. ते पुर्ण झाल्यावर सरोवरांतून २१ पायर्‍या असलेली सोन्याची शिडी वर आली. धनंजय शिडीवरु खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले. सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती. आणि श्रीशंकर हात जोडून याचकवृत्तीने तिच्यासमोर उभे होते. किन्नरी देवीवर छत्रचामरे ढाळीत होत्या. यक्षस्रिया सशास्त्र पहारा करीत होत्या. ते पाहून आश्र्चर्यचकित झालेल्या धनंजयाने पुढे होऊन अन्नपूर्णा मातेचे चरण धरिले. 
देवी हसून म्हणाली, " वत्सा, धनंजया तू माझे व्रत केले आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू सुखी होशील.सारे जग तुझी वाहवा करेल. तुला काही कमी पडणार नाही. "
देवीने आपला वरद हस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला. त्याबरोबर विद्यादेवी धनंजयाच्या जिव्हेवर नाचू लागली. त्याला अत्यानंद झाला. त्यामुळे त्याला मूर्छा आली. शुद्धीवर आल्यावर आपण काशी-विश्र्वेश्र्वराच्या मंदिरांत आहोत असे त्याला आढळून आले. तो घरी गेला व त्याने सर्व हकिगत बायकोला सांगितली. मातेच्या आशीर्वादाने संपत्ती भरभरुन त्याच्या घरी येऊ लागली. त्याचे दुःख, दारिद्र्य दूर झाले. मानसन्मान वाढला. नातेवाईक मान देऊ लागले. पुढे मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले. तो वेगळे घर बांधून राहू लागला. 
एके दिवशी त्याची प्रथम पत्नी सुलक्षणा त्याला म्हणाली, " महाराज, माझे आपल्यापाशी एकच मागणे आहे. आपणाला हे सुख व वैभव अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे. तरी आपण तिचे व्रत सोडू नये. 
तिचे बोलणे धनंजयाला पटले. तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला. त्याच्या दुसर्‍या बायकोला ही गोष्ट माहित नव्हती. एक-दोन असे करतां करतां अठरा दिवस होऊन गेल्यावर तिला ही गोष्ट समजली. ती रागाने लाल झाली व तीने धनंजयाला धरुन घरी आणले. व्रताचे अजून तीन दिवस बाकी होते. या बायकोने तो झोपला असता व्रताचा दोरा तोडून जाळून टाकाला. अजून व्रताचे तीन दिवस बाकी होते. झाले देवी अन्नपूर्णेचा कोप झाला. धनंजयाचे घर सामानासुमानासकट जळून गेले. सुलक्षणाला समजले की देवीच्या कोपामुळे हे झाले आहे. तीने धनंजयाला आपल्या घरी बोलाविले. सवत मात्र माहेरी निघून गेली. 
सुलक्षणेच्या सांगण्यावरुन धनंजयाने परत देवी अन्नपूर्णेचे व्रत सरोवराच्या काठी पूर्ण केले. सरोवरांतून परत शिडी वर आली. हा शिडीवरुन खाली गेला. देवीचे दूत त्याला मारावयास धावून आले. मात्र अन्नपूर्णा देवीने त्यांना थांबवले व सांगितले की, तो ब्राह्मण आहे. अवध्य आहे. त्याने माझे व्रत केले आहे. 
नंतर देवी धनंजयाला म्हणाली, " मला सर्व माहित आहे. त्याला एक सोन्याची तीचीच मूर्ति देऊन सांगितले की, रोज  हिची पूजा करीत जा. तू परत सुखी होशील. तुला माझा आशीर्वाद आहे. तुझी पहिली पत्नी सुलक्षणा हीने माझी मनोभावे सेवा केली आहे. व्रत केले आहे. तिला सर्वगुणसंपन्न असा पुत्र होईल. 
प्रसन्न अंतःकरणाने धनंजय घरी परतला. तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णामातेची पूजा करु लागला. पुढे काही महि्यांनी सुलक्षणेला मुलगा झाला. सारे गांवकरी आश्र्चर्यचकित झाले. धनंजय त्यांना म्हणाला. बाबानो मी अन्नपूर्णा मातेचे व्रत केले. त्याने देवी प्रसन्न झाली. तिच्या आशीर्वादाने मला आजचे वैभव, मानसन्मान आणि पुत्रलाभ झाला. 
ते ऐकून त्या गावांतील श्रीमंत शेटजीने देवीचे व्रत केले. त्यालाही देवीच्या कृपेने पुत्र लाभ झाला. त्याने देवी अन्नपूर्णेचे मंदिर बांधले. त्या ममदिरांत देवीची स्थापना करुन धनंजयाला त्या देवळांत पुजारी म्हणून नेमले. आता धनंजय सुलक्षणा व मुलासह तेथेच राहू लागला. त्याला पुष्कळ धनदौलत मिळाली. 
इकडे धनंजयाच्या दुसर्‍या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घर-दार चोरांनी लुटून नेले. सवतीच्या अन्ननदशेची हकिगत सुलक्षणेच्या कानावर पडली. तिला तीने घरी आणून न्हावूमाखू घालून नविन कपडे दिले. आणि आपल्याजवळच ठेवून घेतले. 

अन्नपूर्णामातेच्या कृपाप्रसादाने धनंजय-सुलक्षणा त्यांचा मुलगा यांना जसे धन-दौलत, सुख-समाधान मिळाले तसेच तुम्हााम्हा मिळो ही साठा उत्तराची कहाणी पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण. 
                        

Custom Search