Showing posts with label ShriRamcharitmans Part 36. Show all posts
Showing posts with label ShriRamcharitmans Part 36. Show all posts

Saturday, August 22, 2020

ShriRamcharitmans Part 36 श्रीरामचरितमानस भाग ३६

 

ShriRamcharitmans Part 36 
Doha 195 to 197 
श्रीरामचरितमानस भाग ३६ दोहा १९५ ते १९७ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--मास दिवस कर दिवस भा मरम न जानइ कोइ ।
रथ समेत रबि थाकेउ निसा कवन बिधि होइ ॥ १९५ ॥
एक महिन्याचा दीर्घ दिवस झाला. याचे रहस्य कुणाला समजले नाही. सूर्य आपल्या रथासह तेथेच थांबला. मग रात्र कशी होणार ? ॥ १९५ ॥
यह रहस्य काहूँ नहिं जाना । दिनमनि चले करत गुनगाना ॥
देखि महोत्सव सुर मुनि नागा । चले भवन बरनत निज भागा ॥
हे रहस्य कुणालाच कळले नाही. सूर्यदेव ( भगवान श्रीरामांचे ) गुणगान करीत गेला. हा महोत्सव पाहून देव, मुनी आणि नाग आपल्या भाग्याची प्रशंसा करीत आपापल्या घरी गेले. ॥ १ ॥
औरउ एक कहउँ निज चोरी । सुनु गिरिजा अति दृढ़ मति तोरी ॥
काकभुसुंडि संग हम दोऊ । मनुजरुप जानइ नहिं कोऊ ॥
हे पार्वती, तुझी बुद्धी ( श्रीरामांच्या चरणी ) पूर्ण रमलेली आहे. म्हणून मी आणखी एक गुपित तुला सांगतो ते ऐक. काकभुशुंडी आणि मी दोघेजण बरोबर होतो, परंतु आम्ही मनुष्यरुपात असल्यामुळे आम्हांस कोणी ओळखू शकले नाही. ॥ २ ॥
परमानंद प्रेम सुख फूले । बिथिन्ह फिरहिं मगन मन भूले ॥
यह सुभ चरित जान पै सोई । कृपा राम कै जापर होई ॥
परम आनंद आणि प्रेम-सुखाने प्रफुल्लित झालेले आम्ही आनंदमग्न मनाने नगरीच्या गल्ल्यांमधून स्वतःला विसरुन फिरत होतो. परंतु हे शुभ चरित्र श्रीरामांची ज्याच्यावर कृपा असेल, तोच जाणू शकेल. ॥ ३ ॥
तेहि अवसर जो जेहि बिधि आवा । दीन्ह भूप जो जेहि मन भावा ॥
गज रथ तुरग हेम गो हीरा । दीन्हे नृप नानाबिधि चीरा ॥
त्यावेळी जो जसा आला आणि ज्याला मनाला जे आवडले, ते राजांनी त्याला दिले. हत्ती, रथ, घोडे, सुवर्ण, गाई, हिरे आणि तर्‍हेतर्‍हेची वस्त्रें राजांनी वाटली. ॥ ४ ॥
 दोहा--मन संतोषे सबन्हि के जहँ तहँ देहिं असीस ।
सकल तनय चिर जीवहुँ तुलसिदास के ईस ॥ १९६ ॥
राजांनी सर्वांना संतुष्ट केले. ( त्यामुळे ) सर्व लोक सर्वत्र आशीर्वाद देत होते की, तुलसीदासाचे स्वामी असलेले सर्व पुत्र चिरंजीव होवोत. ॥ १९६ ॥
कछुक दिवस बीते एहि भॉंती । जात न जानिअ दिन अरु राती ॥
नामकरन कर अवसरु जानी । भूप बोलि पठए मुनि ग्यानी ॥
अशाप्रकारे काही दिवस निघून गेले. दिवस-रात्र कसे जात होते, हेच कळत नव्हते. तेव्हा नामकरण-संस्काराची वेळ झाल्याचे पाहून राजांनी ज्ञानी मुनी वसिष्ठांना बोलावणे पाठविले. ॥ १ ॥
करि पूजा भूपति अस भाषा । धरिअ नाम जो मुनि गुनि राखा ॥
इन्ह के नाम अनेक अनूपा । मैं नृप कहब स्वमति अनुरुपा ॥
मुनींची पूजा केल्यावर राजांनी सांगितले की, ' हे मुनी, तुमच्या मनात जो विचार असेल, त्याप्रमाणे नावे ठेवा. ' ( मुनी म्हणाले, ) ' हे राजा, यांची अनेक अनुपम नावे आहेत, तरीही मी आपल्या विचाराप्रमाणे सांगतो. ॥ २ ॥
जो आनंद सिंधु सुखरासी । सीकर तें त्रैलोक सुपासी ॥
सो सुखधाम राम अस नामा । अखिल लोक दायक बिश्रामा ॥
हा जो आनंदाचा सागर व सुखाचे भांडार आहे, ज्याच्या ( आनंद सिंधूच्या ) एका कणाने तिन्ही लोक सुखी होतात, त्या ( तुमच्या सर्वांत मोठ्या पुत्राचे ) नाव ' राम ' आहे, तो सुखाचे माहेर आणि संपूर्ण लोकांना शांती देणारा आहे. ॥ ३ ॥
बिस्व भरन पोषन कर जोई । ताकर नाम भरत अस होई ॥
जाके सुमिरन तें रिपु नासा । नाम सत्रुहन बेद प्रकासा  ॥
जो जगाचे भरण-पोषण करतो, त्या ( तुमच्या दुसर्‍या ) पुत्राचे नाव ' भरत ' असेल. ज्याच्या स्मरणानेच शत्रूचा नाश होतो, त्याचे वेदांमध्ये प्रसिद्ध असलेले ' शत्रुघ्न ' नाव आहे. ॥ ४ ॥
दोहा--लच्छन धाम राम प्रिय सकल जगत आधार ।
गुरु बसिष्ट तेहि राखा लछिमन नाम उदार ॥ १९७ ॥
जो शुभ लक्षणांचे धाम आहे, श्रीरामांचा आवडता आहे आणि जगाचा आधार आहे, त्याचे गुरु वसिष्ठांनी ' लक्ष्मण ' असे सुंदर नाव ठेवले. ॥ १९७ ॥
धरे नाम गुर हृदयँ बिचारी । बेद तत्व नृप तव सुत चारी ॥
मुनि धन जन सरबस सिव प्राना । बाल केलि रस तेहिं सुख माना ॥
गुरुंनी विचारपूर्वक ही नावे ठेवली ( आणि म्हटले ) ' हे राजा, तुमचे चारी पुत्र हे वेदाचे तत्त्वास्वरुप ( प्रत्यक्ष परात्पर भगवान ) आहेत. जे मुनिजनांचे धन, भक्तांचे सर्वस्व आणि श्रीशंकरांचे प्राण आहेत, ते ( या प्रसंगी तुम्हा लोकांच्या प्रेमापोटी ) बाललीलेमध्ये सुख मानत आहेत. ' ॥ १ ॥
बारेहि ते निज हित पति जानी । लछिमन राम चरन रति मानी ॥
भरत सत्रुहन दूनउ भाई । प्रभु सेवक जसि प्रीति बड़ाई ॥
लहानपणापासूनच श्रीरामांना आपले परम कल्याण करणारे स्वामी मानून लक्ष्मणाने त्यांच्या चरणी प्रेम केले. भरत व शत्रुघ्न या दोघा भावांमध्ये स्वामी-सेवकाच्या ज्या प्रेमाची प्रशंसा होते, तशी प्रीती होती. ॥ २ ॥
स्याम गौर सुंदर दोउ जोरी । निरखहिं छबि जननीं तून तोरी ॥
चारिउ सील रुप गुन धामा । तदपि अधिक सुखसागर रामा ॥
श्याम व गौर देहाच्या दोन्ही सुंदर जोड्यांचे लावण्य पाहून माता ( त्यांना दृष्ट लागू नये म्हणून ) मीठमोहर्‍या ओवाळून टाकत. तसे पाहाता चारीही पुत्र शील, रुप आणि गुणांचे निधाम होते, तरीही सुख-सागर श्रीराम हे सर्वांत श्रेष्ठ होते. ॥ ३ ॥
हृदयँ अनुग्रह इंदु प्रकासा । सूचत किरन मनोहर हासा ॥
कबहुँ उछंग कबहुँ बर पलना । मातु दुलारइ कहि प्रिय ललना ॥
त्यांच्या हृदयांत कृपारुपी चंद्र प्रकाशित होता. मनाला मोहून टाकणारे त्यांचे हास्य त्या कृपारुपी चंद्राच्या किरणांचे द्योतक होते. कधी मांडीवर ( घेऊन ) तर कधी सुंदर पाळण्यात ( घालून ) माता ' माझ्या लाडक्या ' म्हणून त्यांना जोजवत होती. ॥ ४ ॥



Custom Search