Tuesday, December 9, 2014

DeviMahatmya Adhyay 1 श्रीदेवीमहात्म्य अध्याय १ पहिला


DeviMahatmya Adhyay 1 
DeviMahatmya Adhyay 1 is in Marathi. It is translation of Durga SaptaShati Adhyay 1 very nicely done by Shri Rambaba Vernekar. In this Adhyay ShriMahaKali had woke up God Vishnu from mahamaya deep sleep and made him to kill Demons Madhu and Kaitabha. For killing them Mahakali helped God Vishnu. Mahakali with her mahamaya made demons powerless. Thus this is a adhyay of first incarnation namely ShriMahakali.
श्रीदेवीमहात्म्य अध्याय १ पहिला
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ 
श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीदेव्यै नमः ॥
ॐ श्रीगणपते बुद्धिदायका । सकळ विद्यांच्या नायका ।
नमस्कार तुज एका । करिती आरंभीं सर्वही ॥ १ ॥
त्रिपुराचे वधालागून । शिवें केले तुझे ध्यान ।
करावया बलिबंधन । वामन ध्याता जाहला ॥ २ ॥
सृष्टि करितां चतुरानन । आधीं करीं तुझे ध्यान ।
पृथ्वी धरावयालागून । शेष ध्याता जाहला ॥ ३ ॥
महिषाससुराच्या वधाप्रती । तुज ध्याती झाली पार्वती ।
मुक्तीकारणें निश्र्चितीं । सिद्धादिकीं ध्यायिलें ॥ ४ ॥
विश्र्वाच्या जयालागून । मदन तुझे करी ध्यान ।
त्या तुज साष्टांग नमन । माझें असो सर्वदा ॥ ५ ॥ 
मज बुद्धि देऊनि रम्य । तुवां वदवावें देवीमाहात्म्य ।
तुझे देवा गुण अगम्य । ब्रह्मादिक वर्णिती ॥ ६ ॥
नमो शारदे ब्रह्मनंदिनी । तूं सर्व विद्यांची स्वामिनी । 
आणि ब्रह्मादिकांची जननी । प्रणवरुपिणी तुज नमो ॥ ७ ॥
तूं मूकासी करिसी वाचाळ । पंगूसी लंघविसी अचळ ।
ऐसी तुझी कृपा सबळ । महाविष्णो तुज नमो ॥ ८ ॥
ब्रह्ममुखीं सरस्वती । तुवां स्थापिली निश्र्चितीं ।
तेव्हां ब्रह्मावेदांप्रती । उच्चारितां जाहला ॥ ९ ॥
शिव सूर्य शक्ति गणपती । विष्णु तूंचि जाहलासी निश्र्चितीं ।
तुझी पंचायतन आकृति । तुजलागीं नमन असो ॥ १० ॥
श्रीदत्त वसिष्ठ वाल्मीक । व्यास नारद शुकादिक ।
पंचायतन भक्त अनेक । यांसी नमन सर्वदा ॥ ११ ॥
असो जिचा हा ग्रंथ जाण । त्या देवीसी करुनि नमन ।
करीतसें ग्रंथारंभन । प्रेमभावें करिनियां ॥ १२ ॥
श्रोतियांसी नमस्कार । माझा असो निरंतर ।
सर्वत्रीं होऊनि सादर । न्यून तें पूर्ण करावें ॥ १३ ॥
द्वापारीं नैमिषारण्यीं जाण । सूत सांगे शौनकालागून ।
सहस्त्र वर्षें सत्र करुन । ऋषि सर्वही ऐकती ॥ १४ ॥
तेव्हां निर्विघ्न व्हावें म्हणून । आधिव्याधीनें न व्हावें मरण ।
मूर्तिमंत काळ मृत्यु वश करुन । बैसविला ऐकावया ॥ १५ ॥
ऋग्यजुःसामाथर्वण । या चहूं वेदांचें तात्पर्य जाण ।
त्याचे ठायीं परम निपुण । शौनकादिक सर्वही ॥ १६ ॥
आयुर्वेद धनुर्वेद । ज्योतिर्वेद गंधर्ववेद । 
हे चारी उपवेद प्रसिद्ध । यांचे जाणते सर्वही ॥ १७ ॥
वेदान्त न्याय मीमांसक । तर्क नैयायिक चार्वाक ।
हीं सहा शास्त्रें मुख्य । यांचे ज्ञाते सर्वही ॥ १८ ॥
व्याकरण सांख्य योग देख । शिल्प सूप काम कोक ।
वैद्यक पतंजलि धर्मैक । हीं उपशास्त्रें जाणावीं ॥ १९ ॥
वेदशास्त्रीं परम कुशल । शौनकादि ब्राह्मण सकळ ।
सूत्रभाष्यकर्ते केवळ । ऐसे सर्वही मिळाले ॥ २० ॥
ते सूतासी करिती प्रश्र्न । तूं व्यासाचा शिष्य जाण ।
व्यासें सर्व पुराणें करुन । तुजलागीं उपदेशिलीं ॥ २१ ॥
भविष्योत्तर भागवत । मत्स्य मार्कंडेय निश्र्चित ।
वराह वायु वामन सात । विष्णुपुराण आठवें ॥ २२ ॥
ब्रह्मांडपुराण ब्रह्मपुराण । ब्रह्मवैवर्त नारद जाण ।
लिंग पद्म अग्निपुराण । कूर्म स्कंद सतरावें ॥ २३ ॥
अठरावें तें गरुडपुराण । यांचे ठायीं तूं परम निपुण ।
उपपुराणांचेही ज्ञान । तुज असे सर्वही ॥ २४ ॥
शिव नारसिंह सनत्कुमार । भार्गव वासिष्ठ माहेश्र्वर ।
सौर नारदीय पाराशर । दुर्वास कापिल अकरावें ॥ २५ ॥
औशनस मानव वारुण । सांब नंदी आदित्य जाण ।
तुलसी गणेश देवीपुराण । कालिकापुराण एकविसावें ॥ २६ ॥
देवीभागवत रेणुका जाण । तेविसावें उपपुराण । 
यांचे ठायीं तूं परम निपुण । व्यासकृपेंकरुनियां ॥ २७ ॥
व्यासाचे आज्ञेंकरुन । तूं सांगता जाहलासी पुराण ।
आम्हीं तुझ्या मुखें श्रवण । केलें बहुत ग्रंथांचें ॥ २८ ॥
आम्ही जे जे केले प्रश्र्न । ते ते केलेसी निरुपण ।
आतां श्रीदेवीमाहात्म्य जाण । आम्हांलागीं सांगावें ॥ २९ ॥
त्वां जीं जीं माहात्म्यें सांगितली । तीं तीं ऐकूनि तृप्ति जाहली ।
आतां देवीमाहात्म्यीं उरली । श्रवणेच्छा आमुची ॥ ३० ॥
आदिमाया प्रणवरुपिणी । जी अनंतशक्तिंची स्वामिनी ।
जी अनंत अवतार घेऊनि । भक्तांप्रती रक्षीतसे ॥ ३१ ॥
श्रीविष्णूच्या देहापासून । महाकाली अवतार घेऊन ।
मधु-कैटभदैत्यमर्दन । विष्णुहस्तें करविलें ॥ ३२ ॥
हा देवीचा प्रथम अवतार । सांग आम्हां याचा विस्तार ।
द्वितीय अवतारीं महिषासुर । महालक्ष्मीनें मारिला ॥ ३३ ॥
सर्व देवांच्या तेजापासून । महालक्ष्मी जाहली उत्पन्न ।
तयाचे सांग आम्हां कथन । विस्तारुनी सर्वथा ॥ ३४ ॥
पार्वतीच्या देहापासून । महासरस्वती अवतार घेऊन ।
शुंभ निशुंभ दैत्य दारुण । तिसरें अवतारीं मारिले ॥ ३५ ॥
सांगावें तें सर्व चरित्र । श्रवणें पापी होती पवित्र । 
आणिकही अवतार सर्वत्र । कोण कोण जाहले ॥ ३६ ॥
त्या सर्व अवतारांचे कथन । आम्हांलागीं करावें जाण ।
तुज असे त्रिकालज्ञान । व्यासप्रसादेंकरुनियां ॥ ३७ ॥
ऐकूनि शौनकादिकांच्या बोला । सूत मानसीं आनंदला ।
मग वर्णन करिता जाहला । देवीमहिमा अपार ॥ ३८ ॥
सूत म्हणे शौनकादिकांसी । तुम्हीं जैसें पुसिलें आम्हांसी ।
तैसेंचि मिळोनि सर्व ऋषी । पूर्वी मार्कंडेया प्रश्र्न केला ॥ ३९ ॥
मार्कंडेय जाहला सांगता । ही मार्कंडेयपुराणीं कथा ।
बादरायण जाहला वर्णि्ता । तैसेंचि तुम्हां सांगतों ॥ ४० ॥
हें देवीमाहात्म्य पवित्र । सप्तशती महास्तोत्र । 
सातशें मुख्य महामंत्र । वेदव्यास बोलिला ॥ ४१ ॥
सातशें मंत्रांचा विस्तार । याचा महिमा असे थोर ।
वर्णन करितां अंतपार । ब्रह्मादिकां कळेना ॥ ४२ ॥
या देवीमाहात्म्याचें पठण । जो विश्र्वास धरुनि करी पूर्ण ।
सर्व पुरुषार्थ त्यालागून । प्राप्त होती निश्र्चयें ॥ ४३ ॥
जो जो काम धरी मनीं । तो तो प्राप्त होय जनीं ।
निष्कामी जो त्यासी भवानी । मोक्षपद देतसे ॥ ४४ ॥
कृष्णचतुर्दशीचे दिवशीं । अथवा कृष्णअष्टमीसी ।
अथवा नवरात्रीं विशेषीं । फल अपार पठणाचें ॥ ४५ ॥
नित्य याचें पठण करितां । देवी श्रवण करी तत्त्वतां ।
ऐसी वेदांची एकवाक्यता । वदली असे पुराणीं ॥ ४६ ॥
असो मार्कंडेयासी सम्यक । ब्रह्मा सांगता झाला देख ।
कवच अर्गलास्तुति कीलक । अनुक्रमें पठण करा ॥ ४७ ॥
या तिहीचें पठण करुन । मग महास्तोत्र करावें पठण ।
स्वयें अथवा ब्राह्मणद्वारा जाण । पठण याचें करावें ॥ ४८ ॥
निष्काम भावार्थेंकरुन । पठण करितां देवी होत प्रसन्न ।
याचें अशुद्ध अनुक्रमण । परी संतुष्ट देवता ॥ ४९ ॥
जो शुद्ध पठण करीत । परी भावार्थ नाहीं चित्तांत ।
त्याचें सर्व व्यर्थ जात । देवता क्षोभे त्यावरी ॥ ५० ॥
हरिहरब्रह्मादि देव तिन्ही । कवच रचिते जाहले जनीं ।
ज्याच्या पठणमात्रेंकरुनी । साधती सर्व पुरुषार्थ ॥ ५१ ॥
जो पठण करी अर्गलास्तुती । त्यासी प्रसन्न होय भगवती ।
सातशें वर निश्र्चितीं । भक्ताकारणें अर्पीतसे ॥ ५२ ॥
महादेवकृत कीलक । जो पठण करी आवश्यक ।
त्यासी सर्व मंत्र-यंत्रादिक । अनायासें साधती ॥ ५३ ॥
कवच अर्गलास्तुति कीलक । मार्कंडेय जपोनि सम्यक ।
चौदा कल्प आयुष्य देख । होतें जाहलें तयासी ॥ ५४ ॥
चौदा स्मार्तांमध्ये जाण । चौथा होता जाहला आपण ।
चौदा शैवांचीं मानाभिधानें । सांगतो मी तुजलागीं ॥ ५५ ॥
दुर्वास विश्र्वामित्र चतुरानन । चौथा मार्कंडेय आपण ।
इंद्र बाणासुर नारायण । कार्तिकेय आठवा ॥ ५६ ॥
दधीचि राम कण्व भार्गव । बृहस्पति गौतम हे सर्व ।
चौदा स्मार्तांचीं हीं नांवें । तुजलागीं सांगितलीं ॥ ५७ ॥
या चौदांचें करितां स्मरण । आधि व्याधि जाती निरसून ।
प्रसन्न होय पार्वतीरमण । शैवभक्त म्हणोनियां ॥ ५८ ॥
सूत म्हणे शौनकादिकांसी । तो मार्कंडेय सांगे धर्मासी ।
आणि म्हणे सर्व ऋषींसी । एकाग्रचित्ते श्रवण करा ॥ ५९ ॥
देवीच्या अवतारांचें कारण । सांगतों मी तुम्हांलागून । 
तुम्ही एकाग्र चित्त करुन । श्रवण आतां करावें ॥ ६० ॥
ब्रह्मा विष्णु महेश्र्वर । तिघे देवीचे पुत्र साचार ।
तिघांसी पडतां संकट घोर । देवी अवतार घेतसे ॥ ६१ ॥
अवतार घेऊनियां जाण । दुष्टांचे करी निर्दलन ।
अधर्मनाशन धर्मस्थापन । करुनि भक्तांसी संरक्षी ॥ ६२ ॥
याचिविषयीं पुरातन । इतिहास सांगतो जाण ।
सावर्णि मनु तो सूर्यनंदन । चौदांमध्यें आठवा ॥ ६३ ॥
चौदा मनूंचीं नामाभिधानें । तुजलागीं सांगतो जाण ।
पहिला मनु तो स्वयंभू आपण । स्वारोचिष दूसरा ॥ ६४ ॥
उत्तम तामस रैवत । चाक्षुष आणि वैवस्वत । 
हीं सप्त मन्वंतरें निश्र्चित । सावर्णि तो आठवा ॥ ६५ ॥
दक्षसावर्णि ब्रह्मसावर्णी । धर्मसावर्णि रुद्रसावर्णि ।
देवसावर्णि इंद्रसावर्णी । हे चौदा मनु अनुक्रमें ॥ ६६ ॥
या ब्रह्मकल्पामाझारी । चौदा मनु अवधारीं ।
एकाहत्तर चौकड्यांवरी । राज्य एकएकाचें ॥ ६७ ॥
सावर्णि मनु तो अष्टम । सांगतों त्याचें जन्मकर्म ।
देवीचा प्रसाद उत्तम । होता जाहला त्यावरी ॥ ६८ ॥
महामायेचा प्रभाव । तेणें मनु जाहला स्वयें राव ।
मन्वंतरापिवैभव । होतें जाहलें तयासी ॥ ६९ ॥
देवीच्या प्रसादेकरुनी । सूर्यपुत्र जाहला सावर्णी ।
ध्रुवाऐसें राज्य पावोनी । चिरंजीव जाहला ॥ ७० ॥
महाप्रलयीं नाशिवंत । ब्रह्मसृष्टि होत जात ।
परी सावर्णि मनु तो निश्र्चित । राज्य तयाचें अक्षयी ॥ ७१ ॥
त्याचें पूर्वजन्मींचें कथन । सांगतो मी तुम्हांलागून ।
तुम्ही एकाग्रचित्तेकरुन । सविस्तर श्रवण करा ॥ ७२ ॥
पूर्वी स्वारोषिचमन्वंतरी । तयाचेचि वंशामाझारी ।
राजा जाहला पृथ्वीवरी । सुरथ नाम तयाचे ॥ ७३ ॥
पन्नास कोटी विस्तीर्ण मही । त्याचें राज्य असे सर्वही ।
पुत्राचे परी पाहीं । पालन करीं प्रजेचें ॥ ७४ ॥
तो राज्य करीत असता जाण । शत्रु जाहले तया निर्माण ।
क्षत्रिय राक्षस आणि यवन । युद्ध दारुण मांडलें ॥ ७५ ॥
सुरथ राजा युद्ध करीत । परी जय जाहला नाहीं प्राप्त ।
शत्रु सर्वही बलवंत । उपाय तेथें चालेना ॥ ७६ ॥
दंड करुनि शत्रूंनीं । राजा पळविला समरांगणी ।
मग तो स्वपुरासी येऊनी । राज्य करी स्वदेशींचे ॥ ७७ ॥
तेथें येऊनि शत्रु प्रबळ । युद्ध करिते जाहले तुंबळ ।
प्रधानासहित राज्य सकळ । हिरोनि घेतलें तयाचें ॥ ७८ ॥
सर्व सैन्य स्वाधीन केलें । द्रव्यभांडार हिरोनि नेलें ।
मग रायाचें व्यापिलें । चित्त चिंतेकरुनियां ॥ ७९ ॥
काय करावें कोठे जावें । जनासी मुख केवीं दावावें ।
मृगया निमित्त करुनि पळावें । हेंचि आतां उत्तम ॥ ८० ॥
ऐसें चिंतूनियां मनीं । सुरथराजा तेचि क्षणीं ।
एकटा घोड्यावरी बैसोनी । घोर वनीं प्रवेशला ॥ ८१ ॥
तेथें मेधाऋषीचा आश्रम । पाहता जाहला तो परम ।
सांडोनि स्वधर्म । जेथें शांत वर्तती ॥ ८२ ॥
धेनु व्याघ्र एके ठायी । वर्तती परी वैर नाहीं ।
हंस कारंडव पक्षी सर्वही । शब्द करिती मधुरस्वरें ॥ ८३ ॥
पुष्पें तुळसी बिल्व कमळ । वेदघोष करिती सकळ ।
मुनि शिष्य मिळोनि केवळ । मेधाऋषीतें उपासिती ॥ ८४ ॥
सुरथ राजा तेथें येऊन । सांष्टांग करुनियां नमन ।
सांगता जाहला वर्तमान । मेधामुनीसी सर्वही ॥ ८५ ॥
मुनीनें सत्कार करुन । राहविला नृपनंदन ।
परी चिमताक्रांत असे मन । आश्रमी हिंडे सभोंवता ॥ ८६ ॥
फार जाहला चिंतातुर । स्नेहें व्यापिला अपार ।
वडिलीं पाळिलें माझे पुर । तें शत्रूंनीं घेतलें ॥ ८७ ॥
प्रधान माझा शूरहस्ती । शत्रूंनीं तो घेतला हस्तीं ।
राजस्त्रियां प्रजेची वस्ती । कैसी राहिली कळेना ॥ ८८ ॥
शूरहस्ती माझा प्रधान । शत्रूसी मिळाला जाऊन ।
आतां भोग पावेल कोण । हें काहीं कळेना ॥ ८९ ॥
जें वडिलोवडिलीं पाळिले । परमकष्टें संपादिलें । 
तें आजि शत्रूंनी घेतलें । द्रव्यकोश सर्वही ॥ ९० ॥
ऐसी नाना चिंता करीत । तंव वैश्य पाहे अकस्मात ।
तोही एकटा चिंताक्रांत । समाधि नाम तयाचें ॥ ९१ ॥
सुरथ राजा पुसे त्यासी । सांग तूं कवण आहेसी ।
कारण येथें यावयासी । सांग आम्हांसी काय तें ॥ ९२ ॥
दिसतोसी तूं शोकाक्रांत । अंतःकरण असे दुःखित ।
याचें कारण काय वृत्तांत । आम्हांलागीं निवेदीं ॥ ९३ ॥
ऐसें ऐकोनि वैश्य जाण । बोलता जाहला नृपालागून ।
समाधि नाम हें माझें पूर्ण । वैश्यकुळीं जन्मलों ॥ ९४ ॥
धनवंताचे कुळी जाहलों । धनवंत होऊनि जन्मलों ।
पुत्र-स्त्रियांनीं बाहेर घातलों । धनलोभेंकरुनियां ॥ ९५ ॥
मजला बाहेर घातलें । माझें सर्व धन घेतलें ।
मग मीं वनीं वास्तव्य केलें । येऊनियां सर्वदा ॥ ९६ ॥
येथें सेवूनियां वन । न जाणें त्यांचे वर्तमान ।
कल्याण किंवा अकल्याण । त्यांचे कांहीं कळेना ॥ ९७ ॥
स्त्री-पुत्र उत्तम वागती । किंवा अधर्में वर्तती । 
हें कांहीं न कळे निश्र्चितीं । म्हणोनि शोक होतसे ॥ ९८ ॥
सुरथराजा म्हणे वैश्यासी । ज्यांनीं तुज घालविलें वनासी ।
त्यांचा स्नेह तुझे मानसीं । कैसा येतो कळेना ॥ ९९ ॥
वैश्य म्हणे नृपालागून । तूं बोलतोसी जें वचन ।
तें सत्य परी माझें मन । स्नेह न सोडी सर्वथा ॥ १०० ॥
ज्यांनीं बाहेर घालविलें । स्नेह सोडोनि द्रव्य घेतलें ।
पुनः त्यांच्या स्नेहें झगटलें । मन कैसें कळेना ॥ १०१ ॥
असो या मोहाचें कारण । न कळे न कळे मज जाण ।
जाणत असतां मोह पूर्ण । किमर्थ होतो कळेना ॥ १०२ ॥
मार्कंडेय म्हणे शिष्यालागुन । तेव्हां मग ते दोघेही मिळोनी ।
मेधाब्राह्मणाजवळी येऊनी । नमस्कार करिते जाहले ॥ १०३ ॥
मग यथान्यायें बैसोनी । प्रार्थिते जाहले ऋषीलागुनी ।
राजा बोलता जाहला तत्क्षणीं । प्रार्थूनियां ऋषीतें ॥ १०४ ॥
सुरथ म्हणे तुम्हांलागून । एक प्रश्र्न करितों जाण ।
तो सांगावा कृपा करुन । कळे ऐसा सर्वथा ॥ १०५ ॥
स्वामी चित्त हें परम चंचळ । क्षणोक्षणीं होतसे प्रबळ ।
स्नेहबळें मोह विकळ । करोनि पाडी अधःपाती ॥ १०६ ॥
राज्यादि पदार्थ हे सकळ । नाशवंत असती केवळ ।
ऐसें जाणत असतां प्रेमळ । स्नेह यांचा तुटेना ॥ १०७ ॥
सांगावें याचें कारण । मोह होतो कैसा निर्माण ।
मजऐसाचि हा वैश्य जाण । मोहग्रस्त जाहला ॥ १०८ ॥ 
स्त्री-पुत्रांनीं हेळसांडिला । धन हिरोनि बाहेर घालविला ।
तथापि याच्या स्नेहममतेला । अंतर न पडे कदाही ॥ १०९ ॥
हा स्त्री-पुत्रांसाठी शोक करीत । तैसाचि मीहि जाहलों दुःखित ।
विषय दोषांतें असे पाहत । तथापि ममता सुटेना ॥ ११० ॥
आम्ही दोघे ज्ञानी असून । मोह न सोडी आम्हांलागून ।
सांगावें मोहाचे कारण । कोणतें तें ऋषिवर्या ॥ १११ ॥
मेधा सांगे सुरथासी । मार्कंडेय सांगे शिष्यासी ।
सूत म्हणे शौनकादिकांसी । तेंचि आतां निरुपितों ॥ ११२ ॥
विषयज्ञान सर्वांसी गोचर । पशु पक्षी जाणती नर ।
विषय तोही दैवानुसार । पृथक् पृथक् सर्वांसी ॥ ११३ ॥
दिवांध प्राणी जे कां असती । दिवसा न दिसे तयांप्रती ।
उलूक-वाघुळादि निश्र्चितीं । दिवांध प्राणी जाणावें ॥ ११४ ॥
रात्रंध प्राणी काकादिक । त्यांसी रात्रीं न दिसे सम्यक ।
गर्भांध प्राणी जे त्यांसी देख । रात्रि दिवस सारिखा ॥ ११५ ॥
धेनु अश्र्व वृषभ श्र्वान । त्यांसी दिवस-रात्री सारखी जाण ।
आहार निद्रा भय मैथुन । समसमान सर्वांसी ॥ ११६ ॥
ज्ञान जें कां मनुष्यासी । तेंचि असे मृग-पक्ष्यांसी ।
पहा पक्षी हे शावचंचूंसी । कण आणोनि अर्पिती ॥ ११७ ॥
आपुल्या प्रत्युपकाराकारणें । पुत्रादिकांशी स्नेह करणे ।
आब्रह्मस्तंबपर्यंत जाणें । स्नेहभाव सारिखा ॥ ११८ ॥
सर्वांसी सारिखें विषयज्ञान । स्नेह मोह ममता समान ।
तुज कळावयालागून । निरुपण केलें असे ॥ ११९ ॥
असो त्वां आम्हांसी केला प्रश्र्न । त्याचें सांगतो निरुपण ।
मोह कोणापासूनि निर्माण । ऐसें पुसिलें आम्हांसी ॥ १२० ॥
या मोहगर्तेमध्ये जाण । पडले असती ब्रह्मादि जन ।
महामाया जी तिजपासून । मोह निर्माण जाहला ॥ १२१ ॥
महामायेचा प्रभाव । तेणें संसार पावले सर्व । 
उत्पत्ति-स्थिति-प्रलयभाव । मायेंकरुनि होतसे ॥ १२२ ॥
येथें आश्र्चर्य नसे कांही । योगनिद्रा प्रभूची पाहीं ।
ती महामाया तिनें सर्वही । ब्रह्मादि देव मोहिले ॥ १२३ ॥
मेधा म्हणे सुरथाराया । मार्कंडेय म्हणे शिष्यवर्या ।
सूत म्हणे शौनकादिक आचार्या । मंत्रराज आतां सांगतों ॥ १२४ ॥
जो वेदव्यासें प्रकट करुन । सप्तशतींत घातला नेऊन ।
त्या मंत्राचा अर्थ सांगून । सिद्धिही सांगेन तुजलागीं ॥ १२५ ॥
(मंत्रार्थ) ती देवी भगवती बलेंकरुन । ज्ञानियांच्याही चित्तांतें आकर्षून । 
मोहाकारणें अर्पीतसे जाण । महामाया हरीची ॥ १२६ ॥
अर्थ सांगितला हा जाण । आतां सिद्धि सांगतों तुजलागून ।
प्रथम हा मंत्र गुरुपासून । शुद्ध ग्रहण करावा ॥ १२७ ॥
याची सिद्धि असे मानसीं । तरी युक्ति सांगतो तुजसी ।
बरव्या पहावें मुहूर्तासी । उपदेशमुहूर्त योजावा ॥ १२८ ॥
गायत्रीचा उपदेश । ज्या मुहूर्ती करिती विशेष । 
तोचि मुहूर्त या मंत्रास । जपारंभीं योजावा ॥ १२९ ॥
ऐसिया मुहूर्ती जाण । मंत्रराज करावा ग्रहण ।
अथवा नवरात्रीं जाण । जपारंभ करावा ॥ १३० ॥
आधीं षोडशोपचारेंकरुनी । भावें आराधावी श्रीभवानी । 
मग देवीच्या पुढें बैसोनी । याचा संकल्प करावा ॥ १३१ ॥
मोहनसिद्धिफलप्रार्प्त्थ । संकल्पाचा निश्र्चयार्थ ।
मनीं धरोनियां स्वार्थ । न्याय ध्यान करावें ॥ १३२ ॥
असो षडंगन्यास करोनी । जप करावा बैसोनी मोनी ।
रुद्राक्षमाला घेऊनी । मालासंस्कार करावा ॥ १३३ ॥
हविष्यान्न भक्षूनियां नित्य । षड्रिपु वर्जूनियां अगत्य ।
जप करावा याचा सत्य । एक लक्ष नेम हा ॥ १३४ ॥
जपदशांश होम तर्पण । धेनूच्या दुग्धें करावें जाण । 
मग करावें ब्राह्मणभोजन । पूर्णाहुति योजावी ॥ १३५ ॥
मंत्राचे आदि-अंतीं जाण । प्रणव योजावा धरुनि स्मरण ।
अथवा व्याहृती योजून । शीघ्र सिद्धि होतसे ॥ १३६ ॥
असो मंत्राचें विधान । संक्षेपें सांगितलें पूर्ण ।
मंत्र ज्यावरी टाकावा योजून । त्यासी मोहन होतसे ॥ १३७ ॥
राजमोहन सभामोहन । विश्र्वमोहन ज्ञानीमोहन ।
सर्व देवांचे होत मोहन । इतर कथा कायसी ॥ १३८ ॥
ऐसा सिंहावलोकनेंकरुन । सांगितला तुझा प्रश्र्न ।
मोह व्हावयाचें कारण । महामाया निर्धारें ॥ १३९ ॥
ती या विश्र्वा चराचरा । उत्पन्न करी सैरावैरां ।
प्रसन्न झालिया भक्तवरा । चार्‍ही पुरुषार्थ देतसे ॥ १४० ॥
ती आदिमाया ज्ञानरुपिणी । अनंतब्रह्मांडांची स्वामिनी ।
जिच्या इच्छामात्रेंकरुनी । बद्ध मुक्त होतसे ॥ १४१ ॥
ब्रह्मा विष्णु महेश्र्वर । हे तिघे जियेचे कुमर ।
उत्पत्ति स्थिति प्रलय थोर । तिघांसी तीन निरुपिलीं ॥ १४२ ॥
राजा बोले ऋषीलागून । महामाया ऐसें अभिधान । 
जिचें असे ती उत्पन्न । कैसी होती जाहलीं ॥ १४३ ॥
तिचें स्वरुप स्वभाव । सांगा तियेचें वैभव सर्व ।
कोणापासूनि उद्भव । तिचा होता जाहला ॥ १४४ ॥
हें सर्व तुजपासून । तिचें चरित्र करावें श्रवण ।
ऐसी इच्छा जाहली जाण । तरी आतां निरोपीं ॥ १४५ ॥
यापरी ऐकोनियां प्रश्र्न । बोलता जाहला मेधा ब्राह्मण ।
आतां सांगेन तुज निरुपण । एकाग्रचित्तें श्रवण करीं ॥ १४६॥
ती महामाया नित्य जाण । तियेसी नाहीं जन्म-मरण ।
जगन्मूर्तिस्वरुपेंकरुन । विश्र्वसर्व व्यापिलें ॥ १४७ ॥
तिच्या इच्छामात्रे निश्र्चितीं । उत्पत्ति स्थिति प्रलय होती ।
तथापि तियेची उत्पत्ती । बहुप्रकारें ऐकिजे ॥ १४८ ॥
देवांच्या कार्यासाठीं जाण । जगदंबा होतसे उत्पन्न ।
एर्‍हवीं तरी जन्म-मरण । नाहीं नाहीं तियेसी ॥ १४९ ॥
इच्छामात्रें सर्व संहारीत । परी गुणानुवाद व्हावा निश्र्चित ।
आपुला सर्व या जगतांत । म्हणोनि उत्पन्न होतसे ॥ १५० ॥
गुणांचे जें श्रवण पठन । तेणें उद्धरती सर्व जन ।
म्हणोनि होतसे उत्पन्न । योगनिद्रा हरीची ॥ १५१ ॥
प्रलयीं घालोनि शेषशयन । निजता जाहला नारायण ।
तेव्हां त्याच्या कर्णमळांतून । दोघे असुर जन्मले ॥ १५२ ॥
मधु-कैटभ नामाभिधानें । होतीं जाहलीं तयांलागून ।
आपणातें सर्व मानिती म्हणोन । मधु ऐसें नाम एकाचें ॥ १५३ ॥
किट्ट म्हणजे कर्णमळ । तयांत जन्मला केवळ ।
म्हणोनि कैटभ हें नाम तत्काळ । होतें जाहलें एकासी ॥ १५४ ॥
असो तेव्हां दोघे असुर । मधु-कैटभ भयंकर ।
ब्रह्मयासी करावया मार । वधालागीं धांवले ॥ १५५ ॥
ब्रह्मा विश्र्वाचा प्रजापती । नाभिकमळीं त्याची स्थिती ।
असुर पाहोनियां निश्र्चितीं । भयभीत जाहला ॥ १५६ ॥
निजला असे चक्रपाणी । पाठिराखा नाहीं कोणी ।
योगनिद्रा वरिली नयनीं । तेणें हरि व्यापिला ॥ १५७ ॥
देव सावध व्हावा म्हणोन । योगनिद्रेचें करी स्तवन ।
बद्धांजलि चतुरानन । होता जाहला ते काळीं ॥ १५८ ॥
चौदा श्र्लोकांचें रात्रिसूक्त । तेणें स्तविता जाहला निश्र्चित ।
म्हणे जय जय जगदंबे सतत । नमस्कार असो माझा ॥ १५९ ॥
स्वाहा स्वधा वषट्कार । तूंचि अससी सर्व स्वर ।
सुधा तूं नित्य अक्षर । त्रिधा ॐकार अससी तूं ॥ १६० ॥
तिघां देवांतें धारण करिसी । म्हणोनि त्रिधा हें नाम तुजसी ।
अर्धमात्रा तूं आहेसी । उच्चाररहित ॥ १६१ ॥
लक्ष्मी पार्वती सावित्री । तूंचि अससी जगाची धात्री ।
प्रणवरुपिणी गायत्री । वेदमाता आहेस ॥ १६२ ॥
तूं या विश्र्वातें धारण करिसी । उत्पन्न करोनियां पाळिसी ।
आणि अंती संहारिसी । तिन्ही रुपें तुझींच ॥ १६३ ॥
विद्या माया मेधा स्मृती । मोहरुप तूं प्रकृती ।
काळरात्रि तूं निश्र्चितीं । महारात्रि आहेस ॥ १६४ ॥
मोहरात्रि तूं दारुण । शोभा लज्जा बुद्धि जाण ।
तुष्टि पुष्टि शांति आपण । शांतिरुपा अससी तूं ॥ १६५ ॥
तूं खङ्गशूलगदाचक्रिणी । तूं भुशुंडीचापशंखिणी ।
तूं बाणपरिघधारिणी । नमस्कार माझा असो ॥ १६६ ॥
स्थावर जंगम विश्र्व सकळ । तुझें स्वरुप असे केवळ ।
पंचमहाभूतें शक्ति काळ । तुझ्या सत्तें वर्तती ॥ १६७ ॥
मन-वागादि इंद्रियेंकरुन । जें जें कांहीं करावें ग्रहण ।
तें तें मायास्वरुपजाण । मायामय सर्वही ॥ १६८ ॥
बाण तो सर्वभेद न करी । परी वेधकाची शक्ति खरी ।
तेवीं सद्सद्वस्तूमाझारीं । शक्ति तुझी जगदंबे ॥ १६९ ॥
जगत्स्त्राष्ट्रा जो नारायण । तो त्वां केलासी निद्राधीन ।
तुझें करावया स्तवन । कोण समर्थ आहें कीं ॥ १७० ॥
ब्रह्मा विष्णु आणि त्रिपुरारी । त्वां केलेस शरीरधारी ।
त्यातुजलागीं स्तव करी । ऐसा समर्थ दिसेना ॥ १७१ ॥
यथाशक्ति केले स्तवन । आतां असुरांसी करीं मोहन ।
सावध करावा नारायण । असुरवधाकारणें ॥ १७२ ॥
हा रात्रिसूक्ताचा अभिप्राय । ब्रह्मा करी हाचि उपाय ।
चिंतोनि असुरांसी अपाय । स्तविता जाहला देवीतें ॥ १७३ ॥
मेधा म्हणे सुरथासी । ऐसी स्तविली देवी तामसी ।
मग वधावया असुरांसी । प्रकट जाहली तत्काळ ॥ १७४ ॥
विष्णूच्या मुखनेत्रनाकांतून । बाहुहृदयउरापासून ।
निघोनि ब्रह्मयासी दर्शन । देती जाहली ते काळीं ॥ १७५ ॥
देवीनें मुक्त केल्यावर । मग जागा जाहला श्रीधर ।
एकार्णवीं सर्व सागर । मिळते जाहले तये वेळीं ॥ १७६ ॥
सोडोनियां शेषशयन । उठता जाहला नारायण ।
तंव मधु कैटभ दोघेजण । ग्रासूं धांवती ब्रह्मयातें ॥ १७७ ॥
ते दुर्धर परम असुर । क्रोधें तीव्र धांवले सत्वर । 
रक्तनेत्र अतिभयंकर । पराक्रमी असती पैं ॥ १७८ ॥
ब्रह्मा देवीकडे पहात । देवीस्वरुप असे ध्यात । 
दशपाद आणि दहा हात । दशमुखें जियेसी ॥ १७९ ॥
काजळाऐसी दिसे काळी । म्हणोनि नाम महाकाळी ।
कुंकुमतिलक रेखिला भाळीं । स्वरुप अतिभयंकर ॥ १८० ॥
दाही हस्तीं आयुधें विशाळ । खङ्ग बाण आणि गदाशूळ ।
चक्र शंख भुशुंडी सकळ । परिघ कार्मुक शोभती ॥ १८१ ॥
दहावे हस्तीं धरिलें शिर । गळत असे ज्यांत रुधिर ।
स्वरुप सौभाग्य कांति थोर । प्रतिष्ठा असे जियेची ॥ १८२ ॥
पूजा करी जो अहर्निशीं । त्रलोक्य अर्पण करी त्यासी ।
दुरत्यय वैष्णवमायेसी । पहाता जाहला चतुरानन ॥ १८३ ॥
मधु-कैटभांचा व्हावा नाश । म्हणोनि प्रार्थिती विधि-रमेश ।
तयांसी सामर्थ्य देत विशेष । असुरवधा कारणें ॥ १८४ ॥
मग असुर आले धांवुनी । तेव्हां उठला चक्रपाणी ।
असुरांसी मिळोनि ते क्षणीं । युद्ध करिता जाहला ॥ १८५ ॥
बाहुप्रहार जानुप्रहार । पादप्रहार मुष्टिप्रहार ।
शस्त्रप्रहार अतिनिष्ठुर । परस्परां हाणिती ॥ १८६ ॥
नांगर टाकोनि आकर्षीत । गदा-मुसळें ताडण करीत ।
तेही असुर मदोन्मत्त । तैसेचि हाणिती तयासी ॥ १८७ ॥
पंचसहस्त्र वर्षेंपर्यंत । युद्ध जाहलें परमाद्भुत । 
मधु-कैटभ बळवंत । नाटोपती कदाही ॥ १८८ ॥
मग महामायेनें मोहिलें । तेव्हां विष्णूसी बोलते जाहले ।
जर्जर जाहला सामर्थ्य गेलें । तरी ऐक सांगतो पैं ॥ १८९ ॥
देवा तूं आम्हांपाशीं निश्र्चित । आतां वर मागावा इच्छित ।
जो कां तुझे मानसीं वर्तत । तोचि देऊं तुजलागीं ॥ १९० ॥
ऐकोनियां देव बोलिला । तुम्ही मजसीं जरी तुष्टलां ।
तरी पाहिजे वर दिधला । मृत्यु आतां पावावें ॥ १९१ ॥
हाचि वर मागतों जाण । तुम्हीं आतां पावावें मरण ।
दुसर्‍या वराचें कारण । आम्हांलागीं असेना ॥ १९२ ॥
मेधा म्हणे सुरथासी । ऐसें वंचिलें असुरांसी ।
मग उदकमय सर्व जगासी । पाहूनि बोलते जाहले ॥ १९३ ॥
आपोमय धरा नसे जेथें । देवा आम्हांसी वधावें तेथें ।
ऐसें ऐकोनि जगन्नाथें । तथास्तु बोलता जाहला ॥ १९४ ॥
मग आपुल्या कटीवर । घेऊनि छेदिले असुरशिर ।
चक्रेंकरुनि भिन्न सत्वर । क्षणमात्रें टाकिलें ॥ १९५ ॥
असुर मधु मारिला जाण । नाम जाहलें मधुसूदन ।
कैटभ मारिला म्हणोन । कैटभारी बोलती ॥ १९६ ॥
असो या प्रकारेंकरुन । महाकाळी जाहली उत्पन्न ।
हा प्रथम अवतार जाण । दुसरा आतां श्रवण करीं ॥ १९७ ॥
हें महाकाळीचें आख्यान । याचें करीं श्रवण पठन । 
सर्व बाधा जाती निरसून । संशय कांहीं असेना ॥ १९८ ॥
या तिहीं अवतारांचे तत्काळ । श्रवणपठनाचें जें फळ ।
तें बाराव्या अध्यायीं सकळ । व्यास वर्णिता जाहला ॥ १९९ ॥
त्याचि अनुक्रमेंकरुन । येथें करुं सर्व वर्णन ।
आतां दुसरा अवतार जाण । सांगतो मी श्रवण करीं ॥ २०० ॥
देवीनें जैसें बोलविलें । तैसेंचि येथें वर्णन केलें । 
सज्जनीं पाहिजे परिसिलें । कृपा करुनि सर्वदा ॥ २०१ ॥
व्यासाचा अर्थ तो अनंत । त्याचा सारांश हा निश्र्चित ।
देवीकारणें असंख्यात । नमस्कार असोत माझे ॥ २०२ ॥
श्रीदेवी ग्रंथ करणार । निमित्तमात्र हा राम द्विजवर ।
देवीनेंचि हा ग्रंथ साचार । निजमुखें निरोपिला ॥ २०३ ॥
कृष्णातटाकासन्निध जाण । वर्णें ग्रामींचा राम ब्राह्मण ।
अग्निहोत्रपरायण । देवीसी शरण सद्भावें ॥ २०४ ॥
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरे देवीभगवतीमाहात्म्ये श्रीमहाकाली चरित्रवर्णनं नाम प्रथमोऽध्यायः ॥

॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥

DeviMahatmya Adhyay 1 
श्रीदेवीमहात्म्य अध्याय १ पहिला


Custom Search

No comments: