Friday, December 12, 2014

DeviMahatmya Adhyay 2 श्रीदेवीमाहात्म्य अध्याय (२) दुसरा


DeviMahatmya Adhyay 2 
DeviMahatmya Adhyay 2 is in Marathi. It is translation of Durga SaptaShati Adhyay 2 very nicely done by Shri Rambaba Vernekar. The name of this adhyay is Mahishasoor Sainya Varnanam. In this Adhyay the second incarnation of Goddess; Mahalaxmi’s Birth is described. Her powers and parts of the body were formed by all Gods. They gave her weapons also. After receiving these weapons, Goddess Mahalaxmi became very powerful and she started roaring. That sound was so loud that many trees fallen down, many hills were shaking, Earth started trembling and it created a fear and restlessness among the demons. They started running here and there as they did not know from where that loud sound was coming. A very terrifying war started in between the demons and Goddess Mahalaxmi. Many demons were killed by the Goddess. Many demons fled from the battle field and went to the king demon Mahishasoor.
श्रीदेवीमाहात्म्य अध्याय (२) दुसरा 
श्रीगणेशाय नमः ॥ ॐ श्रीदेव्यै नमः ॥
मेधा सांगे त्या सुरथासी । मार्कंडेय सांगे शिष्यासी ।
सूत सांगे शौनकासी । श्रवण तुम्हीं करावें ॥ १ ॥
आतां महालक्ष्मीचें चरित्र । अवतार दुसरा जाण पवित्र ।
श्रवण करावयासी श्रोत्र । सादर करी शौनका ॥ २ ॥
श्रीमहाविष्णु नारायण । सर्वांचा मूळपुरुष जाण ।
तयापासूनि चतुरानन । नाभिकमळीं जन्मला ॥ ३ ॥
ब्रह्मयासी दहा कुमार । मरीचि अत्रि अंगिरा थोर ।
पुलस्ति पुलह ऋतु भृगुवर । वसिष्ठ नारद दक्षादि ॥ ४ ॥
मरीचीपासूनि कश्यप देख । त्याचा हिरण्यकशिपु ऐक ।
त्याचा अनुराध सम्यक । प्रल्हादबंधु जाणावा ॥ ५ ॥ तो अनुराध परम उन्मत्त । महिषीचे ठायीं जाहला रत ।
तेव्हां महिषासुर विख्यात । पुत्र होता जाहला ॥ ६ ॥
तयासी प्राप्त जाहला वर । तूं अजिंक्य होशील थोर ।
तेणें मेळवूनियां असुर । देवांशीं युद्ध मांडिलें ॥ ७ ॥
शतसंवत्सरांपर्यंत । अहोरात्र युद्ध करीत ।
युद्ध जाहलें परमाद्भुत । देवासुर नाम तयातें ॥ ८ ॥
थोर पराक्रमी असुर । युद्धीं देव केले जर्जर ।
तेव्हां पळाला शचीवर । ठाव न मिळे कोठेही ॥ ९ ॥
ऐरावत हिरोनि घेतला । महिषासुर इंद्र जाहला ।
सर्व दिक्पाळांचा मेळा । पळोनि गेला दशदिशा ॥ १० ॥
असो महिषासुर ते क्षणीं । नाना रुपें स्वयें धरुनी ।
अधिकार सर्व पावोनी । दिक्पाळ होता जाहला ॥ ११ ॥
चंद्र सूर्य अग्नि होऊनि । प्रकाश करी सर्व मेदिनीं ।
मेघ होऊनि ते क्षणीं । यथाकाळी वर्षत ॥ १२ ॥
असो सर्व दिक्पाळ दडाले । दैत्यासी इंद्रपद प्राप्त जाहलें ।
देवांचें सर्व ऐश्र्वर्य गेलें । दीन झाले सर्वथा ॥ १३ ॥
तेव्हां सर्व देव मिळोन । ब्रह्मयासी गेले शरण ।
ब्रह्मा म्हणे मजलागून । कांहींएक कळेना ॥ १४ ॥
मग ब्रह्मदेवातें पुढें करुनी । जात्या जाहल्या देवश्रेणी ।
जेथें महादेव-चक्रपाणी । तेथें शीघ्र पातले ॥ १५ ॥
हरि-हरांतें करुनि नमन । प्रार्थिते जाहले कर जोडून ।
महिषासुराचें वर्तमान । निवेदिलें सर्वही ॥ १६ ॥
सर्व देवांचे अधिकार । स्वयें करी महिषासुर ।
देव जर्जर जाहले समग्र । मृत्युलोकीं विचरती ॥ १७ ॥
हें सर्व केलेम निरुपण । आतां तुम्हांसी आलों शरण ।
जेणें होय असुरमरण । ऐसा उपाय चिंतावा ॥ १८ ॥
देवांचा ऐकोनि वृत्तांत । करिते जाहले क्रोध अद्भुत ।
जेवी प्रळयीं क्षोभे कृतांत । काळमृत्यु जयापरी ॥ १९ ॥
कोप पावला अधोक्षज । तंव मुखापासोनि महातेज ।
निघतें जाहलें सहज । ब्रह्मयाचे तैसेंचि ॥ २० ॥
शंकराच्या मुखापासून । महातेज निघालें जाण ।
सर्व देवांच्या मुखांतून । तेज अपार निघालें ॥ २१ ॥
तें सर्व एके ठायीं मिळत । दिसे जैसा ज्वलत्पर्वत ।
दाही दिशा व्यापिल्या समस्त । ज्वाला अपार निघाल्या ॥ २२ ॥
स्वर्ग मृत्यु आणि पाताळ । क्षणामध्यें व्यापिलें सर्वत्र ।
तें महातेज अतिबंबाळ । त्यासी उपमा असेना ॥ २३ ॥
तेजें व्यापिलें सर्वत्र । तेव्हां सकळीं झांकिले नेत्र । 
तों तें तेज मिळोनि ऐकत्र । नारी होती जाहली ॥ २४ ॥
तीच भवानी जगदंबा । त्रैलोक्याची जननी अंबा ।
जी हरिहरांतें स्वयंभा । उत्पन्न करिती जाहली ॥ २५ ॥
भक्तकार्यालागीं अवतार । जी धरिती जाहली साकार ।
' अजामेका 'मित्यादि प्रकार । वेद वर्णिता जाहला ॥ २६ ॥
असो शंभूच्या तेजेंकरुन । देवीचें मुख जाहलें निर्माण । 
यमाचिया तेजें जाण । केश होते जाहले ॥ २७ ॥
विष्णूचिया तेजें देख । बाहू होते जाहले सम्यक ।
स्तनद्वय जाहलें सुरेख । चंद्रतेजेंकरुनियां ॥ २८ ॥
इंद्राच्या तेजेंकरुन । मध्य होतें जाहले जाण ।
देवीचें जंघा-ऊरुस्थान । वरुणतेजें जाहलें ॥ २९ ॥
पृथ्वीचे तेज स्वयंभ । तेणें जाहला देवीनितंब ।
ब्रह्मतेज जें कां सुप्रभ । तेणें चरण जाहले ॥ ३० ॥
सूर्याच्या तेजेंकरुन । पायांच्या अंगुलिका उत्पन्न ।
अष्टवसुतेजें जाण । करांगुली जाहल्या ॥ ३१ ॥
कुबेराचें तेज जें कां । तेणे जाहली नासिका ।
प्रजापतीचें तेज देखा । तेणें दंत उद्भवले ॥ ३२ ॥
पावकाच्या तेजेंकरुन । देवीसी जाहले त्रिलोचन ।
उभय संध्यांचें तेज पूर्ण । तेणें भ्रुकुटी जाहल्या ॥ ३३ ॥
वायुदेवाच्या तेजें जाण । श्रवणेंद्रियें जाहली उत्पन्न ।
एवं सर्व देवांच्या तेजेंकरुन संभव देवीचा जाहला ॥ ३४ ॥
तीतें पाहूनि निश्र्चित । आनंदले त्रिभुवन समस्त ।
सर्व देव सुखी होत । हर्ष अत्यंत पावले ॥ ३५ ॥
तेव्हां शूलदैवतापासून । रुद्र शूलातें आकर्षून । 
देता जाहला देवीपासून । दैत्यवधाकारणें ॥ ३६ ॥
चक्रातें दिधलें विष्णूनें । शंख दिधला जाण वरुणें ।
अग्नि तो देवीकारणें । शक्ति देता जाहला ॥ ३७ ॥
बाण भाते चाप जाण । वायु देता जाहला आपण ।
इंद्र तो देवीलागून । वज्र देता जाहला ॥ ३८ ॥
इंद्रें ऐरावतापासून । घंटाही दिधली घेऊन ।
यम तो काळदंड जाण । देता जाहला देवीसी ॥ ३९ ॥
पाश देतसे अपापंती । अक्षमालेतें प्रजापती ।
ब्रह्मा तो कमंडलु निश्र्चितीं । देवीलागीं अर्पीतसे ॥ ४० ॥
सर्व रोमरंध्रीं सत्वर । रश्मीतें देतसे दिवाकर ।
काळ तोही ढाल तरवार । देत देवीसी आदरें ॥ ४१ ॥
असो तेव्हां क्षीरसागरें । मळरहित शुद्ध हार त्वरें ।
न फाटती ऐसीं अंबरें । देवीलागीं अर्पिलीं ॥ ४२ ॥
तेव्हां विश्र्वकर्मा सत्वर । देतसे सर्व अलंकार ।
मस्तकीं मुकुट सुंदर । शिरोरत्न दीधलें ॥ ४३ ॥
दिव्य कुंडले कटकें जाण । अर्धचंद्र शुभ्रवर्ण ।
बाहुपादभूषणें आपण । ग्रीवाभूषणें दीधलीं ॥ ४४ ॥
समस्त अंगुलिभूषणें । रत्नमय अर्पिलीं तेणें । 
परशु देऊनि निर्मलपणें । अस्त्रें अनेक अर्पिलीं ॥ ४५ ॥
विश्र्वकर्मा शेवटीं जाण । कवच अर्पी अभेद्य पूर्ण ।
समुद्र अम्लानकमलमाला दोन । शोभन कमळही देतसे ॥ ४६ ॥
तेव्हां पर्वत हिमवान । अर्पीतसे सिंहवाहन ।
आणिक नाना रत्नें आणून । देवीलागीं अर्पिलीं ॥ ४७ ॥
ज्यांतील मधु करितां प्राशन । न सरे कधीं सर्वदा पूर्ण ।
ऐसें पानपात्र अर्पण । कुबेर करी देवीसी ॥ ४८ ॥
तेव्हां शेष देवीप्रत । नागहारातें समर्पीत । 
शोभती नाना रत्नें ज्यांत । पुष्परागादि सर्वही ॥ ४९ ॥
ऐसें सर्व देवांनीं तये वेळीं । भूषणें आयुधें अर्पिली ।
सन्मानितां गर्जो लागली । उच्च अट्टहासांनीं ॥ ५० ॥
वारंवार गर्जना करुन । सर्व ब्रह्मांड जाहलें पूर्ण ।
प्रतिशब्द जाहला दारुण । प्रलयमेधासारिखा ॥ ५१ ॥
तैं सर्व लोक क्षोभ पावले । सप्तसमुद्र कांपूं लागले ।
दिग्गज भयभीत जाहले । चळ पावली वसुंधरा ॥ ५२ ॥
सर्व पर्वत थरारले । मेरुमंदार डोलों लागले ।
महाशेषासी भय वाटलें । टाकूं पाहे धरणीतें ॥ ५३ ॥
सप्तपाताळें दणाणलीं । सत्यलोकीं हांक वाजली ।
पंचभूतें हेलावलीं । कडाडलें ब्रह्मांड ॥ ५४ ॥
सिंहारुढ श्रीभगवती । देव जय जय शब्द करिती ।
सर्व ऋषि तेव्हां स्तविती । बद्धांजलि नम्र शिरें ॥ ५५ ॥
त्रैलोक्य क्षोभ पावलें । हें असुरांनीं देखिलें ।
दळभार सन्निध जाहले । कवच टोप बांधूनी ॥ ५६ ॥
कितीएक आयुधें उचलोनी । धांवते जाहले ते क्षणीं ।
महिषासुर मुख पसरोनी । आ करिता जाहला ॥ ५७ ॥
हें काय रे ऐसें सत्वर । क्रोधें बोलिला महिषासुर ।
मग तयापाठीं असुर । कोट्यवधि धांविन्नले ॥ ५८ ॥
जिकडे ब्रह्मांड गडबडले । जिकडे आकाश कडाडलें ।
तिकडे असुर धडाडले । धांवा धांवा म्हणोनी ॥ ५९ ॥
पाहते जाहले देवीतें । तेजें व्यापिलें त्रैलोक्यातें ।  
देवी पाद ठेवितां भूमीतें । डोलतसे क्षणक्षणीं ॥ ६० ॥
किरीट गेला असे गगनीं । त्रैलोक्यमर्यादा टाकोनी ।
तेव्हां सप्तपाताळश्रेणी । क्षोभविली धनुःशब्दें ॥ ६१ ॥
बाहु सहस्त्र असंख्यात । व्यापिल्या दाही दिशा समस्त ।
नभोमंडळ आसमंतांत । व्यापोनि देवी राहिली ॥ ६२ ॥
कोटी अर्बुद धांवले असुर । जैसे पतंग पडती दीपावर ।
देवी-दैत्यांत दुर्धर । युद्ध मांडलें ते काळीं ॥ ६३ ॥
आधींच तेजोमय अंबर । त्यांत  टाकिले शस्त्रदिनकर ।
तेणें झगमग जाहली थोर । दिगंतर व्यापिलें ॥ ६४ ॥
महिषासुराचे सेनापति । धांवले तेव्हां सत्वरगती ।
त्यांत मुख्य मुख्य निश्र्चितीं । नामें त्यांचीं सांगतों ॥ ६५ ॥
चिक्षुर आणि तो चामर । चतुरंग सेना अपार ।
घेऊनि देवीसह सत्वर । युद्ध करिती दोघेही ॥ ६६ ॥
दहा सहस्त्रांचें अयुत । दशलक्षांचें एक नियुत ।
दशकोटि सैन्य निश्र्चित । अर्बुद ऐसें म्हणती तया ॥ ६७ ॥
ऐसे सहा अयुत रथ । संगें घेऊनियां त्वरित ।
उदग्रनामा युद्ध करीत । घोरंदर देवीशीं ॥ ६८ ॥
सहस्त्र अयुत सेना घेऊन । महाहनु करी कंदन ।
पन्नास नियुतें घेऊन । असिलोमा युद्ध करी ॥ ६९ ॥
घेऊनि सहाशें अयुत बल । युद्ध करिता जाहला बाष्कल ।
तो वडिल राजबंधु केवळ । असंख्य दळ तयाचें ॥ ७० ॥
गजाश्र्व पदाति असंख्यांत । गणितां नाहीं ज्यांचा अंत ।
युद्धा घेऊनि कोटी रथ । येता जाहला ते काळी ॥ ७१ ॥
रथ घेऊनि पन्नास अयुत । बिडालनामा युद्ध करीत ।
अन्य सेनापति निश्र्चित । अंत नाहीं तत्सैन्या ॥ ७२ ॥
रथ हस्ती अश्र्व पदाती । कोटी कोटी सहस्त्र गणती ।
घेऊनि महिषासुर नृपती । युद्धालागीं मिसळला ॥ ७३ ॥
युद्ध करिते झाले बहुवस । टाकिले खङ्ग परशु पट्टिश ।
कितीएक टाकिती शक्तीस । कित्येक पाश टाकिती पैं ॥ ७४ ॥
देवीतें खङ्गप्रहारेकरुन । हाणिती तेव्हां वर्म लक्षोन ।
चंडिका स्वकीय शस्त्रास्त्रें टाकून । त्यांचीं शस्त्रें छेदीत ॥ ७५ ॥
लीलेंकरुनि चंडिका । मारिती जाहली कितीएकां ।
अश्रममुख पाहोनि अंबिका । देव स्तविते जाहले ॥ ७६ ॥
असुरांच्या देहांवरी । शस्त्रास्त्रें टाकीतसे ईश्र्वरी ।
क्रोधें देवीवाहन केसरी । असुरांते मारीतसे ॥ ७७ ॥
अग्नि करी तृण दहन । तेवीं सिंहें मांडिलें रण ।
तों देवीच्या श्र्वासापासून । अपार गण निघाले ॥ ७८ ॥
ते परशु भिंदिपाल आणि पट्टिश । यांहीं मारिते जाहले असुरांस ।
चंडिका आपुली शक्ति तयांस देती जाहली तये काळीं ॥ ७९ ॥
कितीएक शंख पटहांतें । वाजविते जाहले निगुते ।
कितीएक गण मृदंगातें । वाजविती रणांगणी ॥ ८० ॥
तेव्हां देवी त्रिशूलें जाण । आणि गदा शक्तिवृष्टि करुन ।
शतावधि असुर मारुन । टाकिती जाहली तें काळीं ॥ ८१ ॥
कित्येक घंटाशब्दें मोहिले । कांहीं खङ्गादिकीं वधिले ।
पाशें बांधोनि आकर्षिले । द्विधा केले खङ्गानें ॥ ८२ ॥
गदेंकरुनि ताडन केलें । कितीएकांचे प्राण गेले ।
मुसळेंकरुनि जे ताडिले । रक्त औकलें भडभडा ॥ ८३ ॥
कितीएक शूळेंकरुनी । विदारिले हृदयभुवनीं ।
कितीएक बाणें खंडोनी । रणाजिरीं पाडिले ॥ ८४ ॥
देवीचे सामर्थ्य पाहून । साह्य देव जाहले जाण ।
कितीएक सेनापति मारुन । टाकिते जाहलें ते काळीं ॥ ८५ ॥
कितीएकांचे बाहु तोडिले । ग्रीवा छेदूनि भिन्न केले ।
मस्तकरहितही पाडिले । असुर कित्येक ते काळी ॥ ८६ ॥
कितीएक मध्येंचि तोडिले । जंघा छेदूनि एक पाडिले ।
एक बाहु नेत्र पाद छेदिले । द्विधा केले कितीएक ॥ ८७ ॥
तेव्हां कबंधें शिररहित । नाचूं लागलीं असंख्यांत ।
किती सैन्य पडतां निश्र्चित । कबंध नाचे ते ऐका ॥ ८८ ॥
दहा सहस्त्र पडतां वारण । पदाति वीर शत कोटी जाण ।
दीडशें रथ अश्र्व पूर्ण । दहा लक्ष संख्याही ॥ ८९ ॥
इतुकें सैन्य पडे जंव । एकेक कबंध नाचे तंव । 
ऐसीं असंख्य कबंधे अभिनव । युद्ध करिती देवीशीं ॥ ९० ॥
युद्धीं रणवाद्यें वाजती । मंगलवाद्यें गर्जना करिती ।
कबंधे नाना शस्त्रें हाणिती । युद्ध करिती धांवोनी ॥ ९१ ॥
तिष्ठ तिष्ठ ऐसें बोलती । वीर देवीतें हांक मारिती ।
वाजी वारण रथ पदाती । असंख्यात पडले ते ॥ ९२ ॥
तेव्हां भूमि अगम्य जाहली । सकळांची वाट मोडली ।
रक्ताच्या नद्या ते वेळीं । शतावधी वाहिल्या ॥ ९३ ॥
वाजी वारण रथ असुर । त्यांत वाहूं लागले अपार ।
असुरसैन्याचा संहार । क्षणें केला देवीनें ॥ ९४ ॥
वणवा लागला जैसा तृणा । तैसी देवीनें मारिली सेना ।
असंख्य वीर आले रणा । करी गणना कोण त्यांची ॥ ९५ ॥
पिंजारुनि रोमावळी । देवीसिंह गर्जे निराळीं ।
दिग्गजांची बैसलीं टाळी । प्राण गेले असुरांचे ॥ ९६ ॥
सिंह आणि देवीचे गण । त्यांहीं युद्ध केलें निर्वाण ।
स्तविते जाहले देवगण । पुष्पवृष्टि करुनियां ॥ ९७ ॥
असो या प्रकारेंकरुन । महालक्ष्मी जाहली उत्पन्न ।
हा अवतार दुसरा जाण । सांगितला तुजलागीं ॥ ९८ ॥
आणिक दोन अध्याय जाण । असे इचे चरित्र पूर्ण ।
याच्या श्रवणपठनेंकरुन । सर्व बाधा निरसती ॥ ९९ ॥
सर्व मनोरथांचे फळ । प्राप्त होतसे केवळ । 
बारावे अध्यायीं सकळ । निरुपण होईल तें ॥ १०० ॥
श्र्लोकांतील सर्व भावार्थ । येथें वर्णिला यथार्थ ।
सज्जनीं मानोनि परमार्थ । श्रवण केला पाहिजे ॥ १०१ ॥
देवीनें जैसे बोलविलें । तैसेंचि येथें वर्णन केलें ।
सज्जनीं पाहिजे परिसिलें । कृपा करुनि सर्वदा ॥ १०२ ॥
श्रीजगदंबेसी नमस्कार । माझे असोत वारंवार ।
देवीनेंचि ग्रंथ साचार । राममुखें निरुपिला ॥ १०३ ॥
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरे देवीभगवतीमाहात्म्ये महिषासुरसैन्यवर्णनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ 
श्रीदेव्यर्पणमस्तु ॥

DeviMahatmya Adhyay 2 
श्रीदेवीमाहात्म्य अध्याय (२) दुसरा


Custom Search

No comments: