Thursday, October 26, 2017

Samas Dahava Shoonyatva Nirshan समास दहावा शून्यत्वनिर्शन


Dashak Aathava Samas Dahava Shoonyatva Nirshan 
Samas Dahava Shoonyatva Nirshan, It is in Marathi. There are various opinions about Parmarth in the people due to lack of true knowledge. These different opinions and experiences of people are described by Swami Samarth Ramdas.
समास दहावा शून्यत्वनिर्शन
श्रीराम ॥
जनाचे अनुभव पुसतां । कळहो उठिला अवचिता ।
हा कथाकल्लोळ श्रोतां । कौतुकें ऐकावा ॥ १ ॥
१) सामान्य लोकांची मतें, त्यांचे अनुभव जर बघितले तर ते परस्पर विरुद्ध असतात. कलह उत्पन्न होण्याची वेळ येते. या मतांचा गोंधळ व अनुभवांची आरडाओरड श्रोत्यांनी गमतीनें ऐकावी.  
येक म्हणती हा संसारु । करितां पावे पैलपारु ।
आपला नव्हे कीं जोजारु । जीव देवाचे ॥ २ ॥
२) एक म्हणतो कीं, आपण हा संसार करावा. तो करतां करतां त्यांतून पार पडता येते. जीवांवर देवाचें नियंत्रण असल्यनें हा व्याप आपल्या मालकीचा नव्हे.  
येक म्हणती हें न घडे । लोभ येऊन आंगीं जडे ।
पोटस्तें करणें घडे । सेवा कुटुंबाची ॥ ३ ॥
३) एक म्हणतो कीं, हे करुन चालणार नाहीं. संसार करतांना लोभ अंगी जडतो. मगआपल्या पोटासाठीं अपल्याला कुटुंबाची सेवा करावी लागते.  
येक म्हणती स्वभावें । संसार करावा सुखें नावें ।
कांहीं दान पुण्य करावें । सद्गतीकारणें ॥ ४ ॥
४) एक म्हणतो संसार सहजपणें व सुखानें करावा. पण त्यानें सद्गती मिळणार नाही. म्हणून सद्गतीसाठीं कांहीं दान पुण्य करावें. 
येक म्हणती संसार खोटा । वैराग्यें घ्यावा देशवटा ।
येणें स्वर्गलोकींच्या वाटा । मोकळ्या होती ॥ ५ ॥
५) एक म्हणतो कीं, संसार मुळीं खोटाच आहे. वैराग्य धारण करुन देशांतरास निघून जावें. असें केल्यानें स्वर्ग प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो.  
येक म्हणती कोठें जावे । वेर्थचि कासया हिंडावें ।
आपुले आश्रमी असावें । आश्रमधर्म करुनी ॥ ६ ॥
६) एक म्हणतो कीं, आपलें घर सोडून कोठें जायचे ? उगाच पायपीट करुन कशाला हिंडायचे ? आश्रमधर्म सांभाळून आपल्या घरींच असावें.
येक म्हणती कैंचा धर्म । अवघा होतसे अधर्म ।
ये संसारीं नाना कर्म । करणें लागे ॥ ७ ॥
७) एक म्हणतो कीं, कसला आला आहे धर्म ? जिकडे तिकडे अधर्म बोकाळला आहे. या संसारांत निरनिराळीं कर्मे ( भली बुरी ) करावी लागतात. 
येक म्हणती बहुतांपरी । वासना असावी बरी ।
येणेंचि तरिजे संसारीं । अनायासें ॥ ८ ॥
८) एक म्हणतो कीं, शक्य तितकीं वासना चांगली ठेववी. वासना शुद्ध ठेवल्यास माणूस फार सायास न होता संसार तरुन जातो.  
येक म्हणती कारण भाव । भावेंचि पाविजे देव ।
येर हें अवघेंचि वाव । गथागोवी ॥ ९ ॥
९) एक म्हणतो कीं, निष्ठा हवी तर संसार तरता येतो. निष्थेनेंच भगवंताची प्राप्ती होते. बाकी सर्व गोष्टी वायफळ समजाव्यात. 
येक म्हणती वडिलें जीवीं । अवघीं देवचि मानावीं ।
मायेबापें पूजीत जावीं । येकाभावें ॥ १० ॥
१०) एक म्हणतो कीं, आईबापांना मनापासून देव मानावें व शुद्ध निष्ठा ठेवून त्यांना पूजीत जावें. 
येक म्हणती देवब्राह्मण । त्यांचें करावें पूजन ।
मायेबाप नारायेण । विश्र्वजनाचा ॥ ११ ॥
११) एक म्हणतो कीं, देवाब्राह्मानांचे पूजन करावें. त्यामुळें सर्वांचा मायबाप नारायण प्रसन्न होतो. 
येक म्हणती शास्त्र पाहावें । तेथें निरोपिलें देवें ।
तेणें प्रमाणेंचि जावें । परलोकासी ॥ १२ ॥
१२) एक म्हणतो कीं, शास्त्रामचा अभ्यास करावा. भगवंतानें त्यांत जो उपदेश केला आहे त्याप्रमाणें वागावें. म्हणजे परलोक प्राप्त होतो. 
येक म्हणती अहो जना । शास्त्र पाहातां पुरवेना ।
याकारणें साधुजना । शरण जावें ॥ १३ ॥
१३) एक म्हणतो कीं, अहो, शास्त्रें पुष्कळ आहेत, त्यांचे अध्ययन संपणार नाही. म्हणून साधुला शरण जावें.    
येक म्हणती सांडा गोठी । वायांचि करिता चाउटी ।
सर्वांस कारण पोटीं । भूतदया असावी ॥ १४ ॥
१४) एक म्हणतो कीं, जाऊं द्या या सार्‍या गोष्टी, उगाच वायफळ बडबड नको. भूतदयेनें सर्वांनशीं वागावें.
येक म्हणती येकचि बरवें । आपुल्या आचारें असावें ।
अंतःकाळीं नाम घ्यावें । सर्वोत्तमाचे ॥ १५ ॥
१५) एक म्हणतो कीं, आपण आपल्या आचारधर्माप्रमाणें वागावें. अंतःकाळीं भगवंताचे नांव घ्यावें. 
येक म्हणती पुण्य असेल । तरीच नाम येईल । 
नाहीं तरी भुली पडेल । अंतकाळीं ॥ १६ ॥
१६) एक म्हणतो कीं, पुण्य केलें असेल तरच अंतःकाळीं भगवंताचे नांव तोंडांत येईल. नाहीतर तेव्हांच माणसाला भ्रम होतो. 
येक म्हणती जीत असावें । तंवचि सार्थक करावें ।
येक म्हणती फिरावें । तीर्थाटण ॥ १७ ॥
१७) एक म्हणतो कीं, आपण जिवंत असेंपर्यंत आपलें सार्थक करुन घ्यावें. एक म्हणतो कीं, तीर्थाटन करीत फिरावें.   
येक म्हणती हे अटाटी । पाणीपाषाणाची भेटी ।
चुबकळ्या मारितां हिंपुटी । कासाविस व्हावें ॥ १८ ॥  
१८) एक म्हणतो कीं, तीर्थाटनाची यातायात करण्याची जरुरी नाही. कारण शेवटी पाणी व पाषाण यांचेच दर्शन घ्यावें लागते. व नाकातोंडांत पाणी जाऊन जीव कासावीस होतो.           
येक म्हणती सांडीं वाचाळी । अगाध महिमा भूमंडळीं ।
दर्शनमात्रें होये होळी । माहापातकाची ॥ १९ ॥
१९) एक म्हणतो कीं, हा वाचाळपणा आवरा. तीर्थांचा महिमा थोर व अगाध आहे. नुसत्या दर्शनानें पापांची होळी होते.  
येक म्हणती तीर्थ स्वभावें । कारण मन अवरावें ।
येक म्हणती कीर्तन करावें । सावकास ॥ २० ॥
२०) एक म्हणतो कीं, मन आवरावें. हा सगळ्या साधनांचा हेतु आहे. शेवटीं मनच तीर्थ बनते. एक म्हणतो कीं, नेहमी सावकाश किर्तन करीत असावें. 
येक म्हणती योग बरवा । मुख्य तोचि आधीं साधावा ।
देहो अमरचि करावा । अकस्मात ॥ २१ ॥
२१) एक म्हणतो कीं, योगसाधन सर्वांत उत्तम आहे. म्हणून सर्व बाजुला ठेवून आधीं योगसाधना करावी. त्यानें देह अमर करुन टाकावा.  
येक म्हणती ऐसें काये । काळवंचना करुं नये ।
येक म्हणती धरावी सोये । भक्तिमार्गाची ॥ २२ ॥
२२) एक म्हणतो कीं, हें भलतेंच काय ? असें करुन काळाला फसवूं नये. एक म्हणतो कीं, भक्ती मार्गाचा अवलंब करावा.   
येक म्हणती ज्ञान बरवें । येक म्हणती साधन करावें ।
येक म्हणती मुक्त असावें । निरंतर ॥ २३ ॥
२३) एक म्हणतो कीं, ज्ञानमार्ग चांगला. एक म्हणतो कीं, साधना करावी. तर एक म्हणतो कीं, नेहमी मुक्तपनें वागावें.  
येक म्हणती अनर्गळा । धरीं पापाचा कंटाळा ।
येक म्हणती रे मोकळा । मार्ग आमुचा ॥ २४ ॥
२४) एक म्हणतो कीं, मुक्तपणें म्हणजे स्वैर वागणार्‍या माणसा पापाचा थोडासा तरी कंटाळा करावा. एक म्हणतो कीं, आमचा हा मार्ग बंधनरहित आहे. 
येक म्हणती हे विशेष । करुं नये निंदा द्वेष ।
येक म्हणती सावकास । दुष्टसंग त्यागावा ॥ २५ ॥
२५) एक म्हणतो कीं, परमार्थांत विशेष कांहीं म्हणजे कोणाची निंदा, द्वेष करुं नये. एक म्हणतो कीं, दुष्टांची संगत हळूहळू सोडून द्यावी.  
येक म्हणती ज्याचें खावें । त्या सन्मुखांचे मरावें ।
तेणें तत्काळचि पावावें । मोक्षपद ॥ २६ ॥
२६) एक म्हणतो कीं, आपण ज्याचे अन्न खातो. त्याच्याच चाकरींत त्याच्या समोर देह ठेवावा. असें करुन ताबडतोप मोक्षपद मिळवावें.   
येक म्हणती सांडा गोठी । आधीं पाहिजे ते रोटी ।
मग करावी चाउटी । सावकास ॥ २७ ॥
२७) एक म्हणतो कीं, या गोष्टीं राहूं द्या. आधीं खायला पोटभर अन्न हवें. तें मिळाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी सावकाश बोलाव्या.  
येक म्हणती पाउस असावा । मग सकळ योग बरवा ।
कारण दुष्काळ न पडावा । म्हणिजे बरें ॥ २८ ॥
२८) एक म्हणतो कीं, आधीं पाऊस चांगला झाला पाहिजे. मग सगळ्या गोष्टी छान चालतात. कारण दुष्काळ पडूं नये म्हणजे मग सगळें ठिक चालते.  
येक म्हणती तपोनिधी । होतां वोळती सकळ सिद्धी ।
येक म्हणती रे आधीं । इंद्रपद साधावें ॥ २९ ॥
२९) एक म्हणतो कीं, पुष्कळ तपश्चर्या करुन तप सांथवावें. त्यानें सर्व सिद्धी वश होतात. एक म्हणतो कीं, आधीं इंद्रपद साधून घ्यावें. 
येक म्हणती आगम पाहावा । वेताळ प्रसन्न करुन घ्यावा ।
तेणें पाविजे देवा । स्वर्गलोकीं ॥ ३० ॥
३०) एक म्हणतो कीं, तंत्रशास्त्राचा अभ्यास करुन वेताळ प्रसन्न करुन घ्यावा. त्याच्या सहाय्यानें स्वर्ग मिळवून देव बनून रहावें.
येक म्हणती म्हणती अघोरमंत्र । तेणें होईजे स्वतंत्र ।
श्रीहरी जयेचा कळत्र । तेचि वोळे ॥ ३१ ॥
३१) एक म्हणतो कीं, अघोरमंत्र साध्य करुन घ्यावा. म्हनजे त्यानें स्वतंत्र होता येईल. श्रीहरि जिचा आश्रय आहे ती लक्ष्मी मग प्रसन्न होईल. 
ती लागले सर्व धर्म । तेथें कैंचे क्रियाकर्म ।
येक म्हणती कुकर्म । तिच्या मदे ॥ ३२ ॥
३२)  लक्ष्मीच्या भोवतीं सर्व धर्म गोळा झालेले असतात. मग इतर क्रियाकर्मांची आवश्यकता राहात नाही. एक म्हणतो कीं, लक्ष्मीच्या मदानें सर्व वाईट कर्में घडतात. 
येक म्हणती येक साक्षप । करावा मृत्युंजयाचा जप ।
तेणें गुणें सर्व संकल्प । सिद्धीतें पावती ॥ ३३ ॥
३३) एक म्हणतो कीं, एकच करा ते म्हनजे मृत्युंजयाचा जप करा. त्याच्या सामर्थ्यानें सर्व संकल्प सिद्धीला जातात.  
येक म्हणती बटु भैरव । तेणें पाविजे वैभव ।
येक म्हणती झोटिंग सर्व । पुर्वितसे ॥ ३४ ॥
३४) एक म्हणतो कीं, बटुभैरवाच्या कृपेनें वैभव प्राप्त होते. एक म्हणतो कीं, झोटींग सर्व कांहीं पुरवितो. 
येक म्हणती काळी कंकाळी । येक म्हणती भद्रकाळी ।
येक म्हणती उचिष्ट चांडाळी । साहें करावी ॥ ३५ ॥
३५) एक म्हणतो कीं, काळी कंकाळी, एक म्हणतो कीं, भद्रकाळी, एक म्हणतो कीं, उचिष्ट चांडाळी प्रसन्न करुन घ्यावी. 
येक म्हणती विघ्नहर । येक म्हणती भोळा शंकर ।
येक म्हणती सत्वर । पावे भगवती ॥ ३६ ॥
३६) एक म्हणतो कीं, विघ्नहर गणपति, एक म्हणतो कीं, भोळा शंकर, एक म्हणतो कीं, भगवती या देवता  लवकर प्रसन्न होतात.  
येक म्हणती मल्लारी । सत्वरचि सभाग्य करी ।
येक म्हणती माहा बरी । भक्ति वेंकटेशाची ॥ ३७ ॥
३७) एक म्हणतो कीं, मल्हारी ताबडतोप भाग्यवान करतो. एक म्हणतो कीं, व्यंकटेशाची भक्ती सर्वांत उत्तम भक्ती आहे. 
येक म्हणती पूर्व ठेवा । येक म्हणती प्रेत्न करावा ।
येक म्हणती भार घालावा । देवाच वरी ॥ ३८ ॥
३८) एक म्हणतो कीं, पूर्वपुण्याईवर सर्व अवलंबून असते. एक म्हणतो कीं, पुष्कळ प्रयत्न करावा. एक म्हणतो कीं, देवावर भार घालून आपण स्वस्थ बसावें.   
येक म्हणती देव कैंचा । अंतचि पाहातो भल्यांचा ।
येक म्हणती हा युगात्मा । युगधर्म  ॥ ३९ ॥
३९) एक म्हणतो कीं, एक म्हणतो कीं, हा कसला सज्जनांचाअंत पाहणारा देव ? एक म्हणतो कीं,  हा देवाचा दोष नाही. हा तर युगाचा युगधर्मच आहे.  
येक म्हणती आश्र्चीर्य मानिती । येक विस्मयो करिती ।
येक कंटाळोन म्हणती । काये होईल तें पाहावें ॥ ४० ॥
४०) एक म्हणतो कीं, आश्र्चर्य आहे. तर दुसरे परिस्थिती पाहून थक्क होतात. कांहीं लोक कंटाळून जें काय होईल तें पहावें असें म्हणतात.
ऐसें प्रपंचिक जन । लक्षणें सांगतां गहन ।
परंतु कांहीं येक चिन्ह । अल्पमात्र बोलिलों ॥ ४१ ॥
४१) संसारिक माणसें अशा रीतीनें आपापली मतें सांगतात. ती सगळीं सांगता येणें शक्य नाही. त्यांची तर्‍हा ध्यानांत यावी म्हणून थोडे प्रकार वर्णान केले आहेत. 
आतां असो हा स्वभाव । ज्ञात्यांचा कैसा अनुभव ।
तोहि सांगिजेल सर्व । सावध ऐका ॥ ४२ ॥
४२) प्रापंचिक लोकांचा स्वभाव वर्णन आतां पुरें. ज्ञानी लोकांचे अनुभव किती प्रकारचे असतात. तें आतां सांगतो. तें लक्ष देऊन ऐका.     
येक म्हणती करावी भक्ती । श्रीहरी देईल सद्गती ।
येक म्हणती ब्रह्मप्राप्ती । कर्मेचि होये ॥ ४३ ॥
४३) एक म्हणतो कीं, भक्ति करावी म्हणजे भगवंत चांगली गति देतो. एक म्हणतो कीं, कर्म करण्यानेंच ब्रह्मप्राप्ती होते. 
येक म्हणती भोग सुटेना । जन्म मरण हें तुटेना ।
येक म्हणती उर्मी नाना । अज्ञानाच्या ॥ ४४ ॥
४४) एक म्हणतो कीं, भोग भोगल्यावाचून कांहीं सुटत नाही. एक म्हणतो कीं, अज्ञानांतून सर्व उर्मि येतात. अज्ञान आहे तोपर्यंत त्या येत राहणार. 
येक म्हणती सर्व ब्रह्म । तेथें कैंचें क्रियाकर्म ।
येक म्हणती हा अधर्म । बोलोंचि नये ॥ ४५ ॥ 
४५) एक म्हणतो कीं, एका ब्रह्मा.खेरीज जर दुसरें कांहीं नाहीं तर मग क्रियाकर्माची जरुरच काय ? एक म्हणतो कीं, क्रियाकर्माच्या बाबतींत अशी भाषा वापरणें हा अधर्म आहे. असे बोलू नये. 
येक म्हणती सर्व नासें । उरलें तेंचि ब्रह्म असे ।
येक म्हणती ऐसें नसे । समाधान ॥ ४६ ॥
४६) एक म्हणतो कीं, दृश्य सारें नाशवंत आहे. नंतर जें उरतें तेच ब्रह्म आहे. एक म्हणतो कीं, समाधानाचें स्वरुप असें नाही. 
सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म । दोनी पूर्वपक्षाचे भ्रम ।
अनुभवाचें वेगळें वर्म । म्हणती येक ॥ ४७ ॥
४७) सर्व ब्रह्म आहे असे म्हणणें व दृश्य नष्ट झाल्यावर उरणारे तें ब्रह्म आहे असें म्हणणें हे दोन्ही सिद्धान्त पूर्वपक्षाचे भ्रम आहेत. ब्रह्माच्या अनुभवाचे वर्म कांहीं वेगळेंच आहे.  
येक म्हणती हें न घडे । अनुर्वाच्य वस्तु घडे ।
जें बोलतां मोन्य पडे । वेदशास्त्रांसी ॥ ४८ ॥
४८) एक म्हणतो कीं, ब्रह्माचे वर्णन करुं जातां वेदशास्त्रे मौन होतात. बोलणें थांबवावें लागते. ब्रह्म मन आणी वाणी यांच्या कक्षेंमध्यें येत नाही. तें मनाच्या म्हणजे अनुभवाच्या आवाक्यामध्यें येणें शक्य नाही.  
तव श्रोता अनुवादला । म्हणे निश्र्चये कोण केला ।
सिद्धांतमतें अनुभवाला । उरी कैंची ॥ ४९ ॥   
४९) हें ऐकून श्रोत्यानें असेम विचारलें कीं, ब्रह्म असें आहें किंवा तसेआहे हा निश्र्चय कोणी केला ? कारण सिद्धान्तपक्षाप्रमाणें मी अनुभव घेतो असें द्वैत नसतें. तेथें अनुभव निर्माण होऊंच शकत नाही.  
अनुभव देहीं वेगळाले । हें पूर्वींच बोलिलें ।
आतां कांहीं येक केलें । नवचे कीं ॥ ५० ॥
५०) यावर वक्ता म्हणतो कीं, प्रत्येक माणसाचे अनुभव वेगळे निरनराळे असतात. हें पूर्वींच सांगितलें आहे. ते सगळे आतां एक करता येणार नाहींत.   
येक साक्षत्वें वर्तती । साक्षी वेगळाचि म्हणती ।
आपण द्रष्टा ऐसी स्थिती । स्वानुभवाची ॥ ५१ ॥
५१) एक साक्षित्वानें वागतो. साक्षी वेगळा आहे असें तो म्हणतो. आपण द्रष्टा आहोत. केवळ पाहणारे साक्षी आहोत. ही खरी स्वानुभवाची अवस्था आहे.  
दृश्यापासून द्रष्टा वेगळा । ऐसी अलिप्तपणाची कळा ।
आपण साक्षत्वें निराळा । स्वानुभवें ॥ ५२ ॥
५२) दृश्याहून द्रष्टा वेगळा आहे असा अनुभव स्थिर झाला. म्हणजे दृश्यांत स्थिर राहून त्यापासून अलिप्त राहण्याची कला साधते. साक्षीरुपानें आपण निराळें आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येतो. 
सकळ पदार्थ जाणतां । तो पदार्थाहून पर्ता ।
देहीं असोनी अलिप्तता । सहजचि आली ॥ ५३ ॥  
५३) सर्व पदार्थांना जो जाणतो तो त्या पदार्थांच्या पलिकडे असतो. त्यांच्याहून निराळा असतो. असा अनुभव आल्यावर देहांत असून देखील अगदीं सहज अलिप्तता साधते.  
येक ऐसें स्वानुभवें । म्हणती साक्षत्वें वर्तावें ।
दृश्य असोनि वेगळें व्हावें । द्रष्टेपणें ॥ ५४ ॥
५४) ज्याला हा अनुभव येतो, तो म्हणतो कीं, आपण साक्षीपणें वागावें. दृश्य बाजूला असले तरी द्रष्टेपणानें त्यापासून वेगळें होऊन राहावें. मी केवळ पाहणारा आहे या भूमिकेनें दृश्यांत वावरावें. 
येक म्हणती नाहीं भेद । वस्तु ठाईंच अभेद ।
तेथें कैंचा मतिमंद । द्रष्टा आणिला ॥ ५५ ॥
५५) यावर एक म्हणतो कीं, ब्रह्मवस्तूमध्यें मुळांत कसला भेद नाहीं. ती पूर्ण अभेद आहे. त्या अभेदरुप वस्तूमध्यें हा वेडा द्रष्टा कसा आणतां येईल? 
अवघी साकरचि स्वभावें । तेथें कडु काय निवडावें ।
द्रष्टा कैंचा स्वानुभवें । अवघेंचि ब्रह्म ॥ ५६ ॥
५६) समजा, एके ठिकाणी सगळीकडे साखरच भरली आहे. तिच्यामधून कडूपणा निवडून बाजूला काढता कसा येईल? त्याचप्रमाणें सगळीकडे घनदाट परब्रह्म भरलेलें असतां तेथें स्वानुभवानें द्रष्टा वेगळेपणानें बाजूला काढता येणार नाहीं. 
प्रपंच परब्रह्म अभेद । भेदवादी मानिती भेद ।
परी हा आत्मा स्वानंद । आकारला ॥ ५७ ॥
५७) प्रपंच व परब्रह्म, दृश्य, विश्र्व आणि परमात्मवस्तु यामध्यें यत्किंचितही भेद नाही. तसे मानणारे उगीच भेद मानतात. एकच एक स्वानंदघन आत्मा विश्वरुपानें आकारास आला आहे. 
विघुरलें तुप थिजलें । तैसें निर्गुणचि गुणा आलें ।
तेथें काय वेगळें केलें । द्रष्टेपणें ॥ ५८ ॥
५८) गरम तूप पातळ असतें. तें थंड झालें कीं थिजते. तुपांत कांहीं फरक पडत नाही. त्याचप्रमाणें मूळ निर्गुण परमात्मवस्तु सगुण होऊन आकारास आली. तिच्यांत फरक नाही. तेथें द्रष्टेपणानें वेगळे काय करतां येणार? कांहींच नाही.  
म्हणौनि द्रष्टा आणी दृश्य । अवघा येकचि जगदीश ।
द्रष्टेपणाचे सायास । कासयासी ॥ ५९ ॥
५९) म्हणून द्रष्टा व दृश्य दोन्ही मिळून एक परमेश्र्वर आहे. मग दृष्टेपणाची खटपट कशाला हवी?  
ब्रह्मचि आकारलें सर्व । ऐसा येकांचा अनुभव ।
ऐसे हे दोनी स्वभाव । निरोपिले ॥ ६० ॥
६०) थोडक्यांत हें दृश्यविश्र्व म्हणजे आकारास आलेले परब्रह्म होय. असा कामहीं लोकांचा अनुभव असतो. अशा प्रकारचे हे दोन अनुभव सांगितलें. एकअनुभव असा कीं, द्रष्टा दृश्याहून वेगळा आहे. तो साक्षीत्वानें दृश्य पाहातो. दुसरा अनुभव असा कीं, द्रष्टा वेगळेंपणानें नाहीच. द्रष्टा व दृश्य दोन्ही एकच परमात्मवस्तु आहेत.  
अवघा आत्मा आकारला । आपण भिन्न कैंचा उरला ।
दुसरा अनुभव बोलिला । ऐसियापरी ॥ ६१ ॥
६१) एकच एकआत्मस्वरुप जर विश्र्वरुपानें साकार झालेलें आहे तर द्रष्टेपणानें आपण वेगळें उरत नाहीं. हा दुसरा अनुभव प्रकार सांगितला.
ऐक तिसरा अनुभव । प्रपंच सारुनियां सर्व ।
कांहीं नाहीं तोचि देव । ऐसें म्हणती ॥ ६२ ॥
६२) अनुभवाचा तिसरा प्रकार सांगतो. तो ऐकावा. सर्व दृश्य प्रपंच अथवा दृश्य विश्र्व बाजुस सारावें. तें बाजुस सारल्यावर जें कांहीं शिल्लकउरलें नाही असे वाटते तोच देव समजावा. असें कांहीं लोक म्हणतात.   
दृश्य अवघें वेगळें केलें । केवळ अदृश्यचि उरलें ।
तेंचि ब्रह्म अनुभविलें । म्हणती येक ॥ ६३ ॥
६३) जेवढें दृश्य म्हणून आहे तें सगळें बाजुस सारल्यावर केवळ अदृश्य शिल्लक उरतें. त्याचा अनुभव हाच ब्रह्मस्वरुपाचा अनुभव होय असें कांहीं लोक म्हणतात.    
परी तें ब्रह्म म्हणो नये । उपायासारिखा अपाये ।
सुन्यत्वास ब्रह्म काये । म्हणों येईल ॥ ६४ ॥ 
६४) सगळें दृश्य बाजुस सारलें कीं शून्य उरतें. त्या शून्याला ब्रह्म म्हणतां येणार नाही. शून्याला ब्रह्म म्हटलें तर अपाय उपाय झाल्यासारखें होईल. ब्रह्मासारखें खरें अस्तित्व दुसरें नाहीं. तें ब्रह्म शून्य आहे म्हणजे ब्रह्माच्या अस्तित्वाला नाहींसे करण्यासारखेंच आहे. म्हणून ब्रह्म अनुभवण्यास जो उपाय केला तो अखेर अपाय ठरतो.  
दृश्य अवघें वोलांडिले । अदृश्य सुन्यत्वीं पडिलें ।
ब्रह्म म्हणौनि मुरडलें । तेथुनिच मागे ॥ ६५ ॥ 
६५) दृश्य सगळें ओलांडलें म्हणजे अदृश्य शिल्लक उरते. तें शून्यरुप आहे., तेच शून्यच ब्रह्म आहे असें समजून साधक मागें फिरतो.  
इकडे दृश्य तिकडे देव । मध्यें सुन्यत्वाचा ठाव ।
तयास मंदबुद्धिस्तव । प्राणी ब्रह्म म्हणे ॥ ६६ ॥
६६) वास्तविक या कडेला दृश्य विश्र्व आहे, त्या कडेला परब्रह्म आहे. या दोन्हीच्या मध्यें शून्याचें स्थान आहे. वेडा साधक या शून्यालाच ब्रह्म समजतो.  
रायास नाहीं वोळखिलें । सेवकास रावसें कल्पिलें ।
परी तें अवघें वेर्थ गेलें । राजा देखतां ॥ ६७ ॥
६७) एकजण राजाला भेटला गेला. त्याला राजाचा नोकर भेटला. त्या नोकराला तो राजा समजला. नंतर खरा राजा भेटला तेव्हां त्या माणसाची पहिली समजूत अगदी चुकीची होती हे समजले.   
तैसें सुन्यत्व कल्पिलें ब्रह्म । पुढें देखतां परब्रह्म ।
सुन्यत्वाचा अवघा भ्रम । तुटोन गेला ॥ ६८ ॥
६८) त्याचप्रमाणें दृश्य ओलांडल्यावर आढळलें शून्य ब्रह्म मानलें खरें. पण नंतर खरें परब्रह्मदर्शन झालें. तेव्हां शून्यपणाचा सर्व भ्रम नाहींसा झाला. 
परी हा सूक्ष्म आडताळा । वारी विवेकें वेगळा ।
जैसें दुग्ध घेऊन जळा । राजहंस सांडी ॥ ६९ ॥
६९) शून्याचा प्रांत हा सूक्ष्मांत येतो. परब्रह्म दर्शनांत येणारा हा अडथळा सूक्ष्म असतो. तो सूक्ष्म विवेकानें बाजुस सारावा लागतो. दूध व पाणी वेगळें करुन फक्त दूध ग्रहण करणार्‍या राजहंसाप्रमाणें विवेकानें शून्य बाजूस सारुन विवकी साधक ब्रह्मस्वरुप ग्रहण करतो.   
आधीं दृश्य सोडिलें । मग सुन्यत्व वोलांडिलें ।
मूळमायेपरतें देखिलें । परब्रह्म ॥ ७०  ॥
७०) आधीं सर्व दृश्य बाजूस सारायचें. मग अदृश्य शून्य ओलांडून जायचें. त्यानंतर मूळमायेच्या पलीकडे असणार्‍या परब्रह्माचें दर्शन घडतें.  
वेगळेपणें पाहाणें घडे । तेणे वृत्ती सुन्यत्वीं पडे ।
पोटीं संदेह पवाडे । सुन्यत्वाचा ॥ ७१ ॥
७१) आपण वेगळेंपणानें जोंपर्यंत पाहतों तों पर्यंत आपली वृत्ती शून्यपणापर्यंत जाऊन तेथें थांबते. त्यामुळें मनांत शून्यपणाची कल्पना वाढते.  
भिन्नपणें अनुभविलें । तयास सुन्य ऐसें बोलिलें ।
वस्तु लक्षितां अभिन्न जालें । पाहिजे आधीं ॥ ७२ ॥
७२) जें अदृश्य सूक्ष्म वेगळेंपणानें अनुभवतां येते त्यांस शून्य असें म्हणतात. पण परमात्मवस्तु अनुभवायची असेल तर प्रथम तिच्याशी तदाकार व्हावें लागते. तिच्याशीं अभिन्न होऊनच ती पाहतां येते.   
वस्तु आपणचि होणें । ऐसें वस्तूचें पाहाणें ।
निश्र्चयेंसीं भिन्नपणें । सुन्यत्व लाभे ॥ ७३ ॥
७३) आपण वस्तुरुप होऊन जाणें ही परमात्मवस्तु पाहण्याची रीत आहे. वेगळेपणानें पाहूं गेल्यास खात्रीनें शून्यदर्शनच घडते.   
याकारणें सुन्य कांहीं । परब्रह्म होणार नाहीं ।
वस्तुरुप होऊन पाहीं । स्वानुभवें ॥ ७४ ॥
७४) या सर्व विवेचनावरुन हें स्पष्टपणें ध्यानांत येईल कीं, कांहीं केल्या शून्य परब्रह्म होऊं शकणार नाही. परब्रह्माचे दर्शन हवें असल्यास ब्रह्माशी तदाकार होऊनच तें घ्यावें लागते. ब्रह्मरुप होऊनच ब्रह्माचा अनुभव येतो. 
आपण वस्तु सिद्धचि आहे । मन मी ऐसें कल्पूं नये ।
साधु सांगती उपाये । तूंचि आत्मा ॥ ७५ ॥   
७५) आपला खरा मी ब्रह्मस्वरुप आहे. मी आणि परब्रह्म यांचे ऐक्य स्वतःसिद्ध आहे. म्हणून मन मी आहे अशी कल्पना करुं नये. मी स्वतःसिद्ध आत्माच आहे अशी भावना करावी. हा उपाय सत्पुरुष सांगतात.   
मन मी ऐसें नाथिलें । संतीं नाहीं निरोपिलें ।
मानावें कोणाच्या बोलें । मन मी ऐसें ॥ ७६ ॥
७६) मुळांत मी मनरुप नाहींच. शिवाय संतांनी तसें कधींही सांगितलेंच नाही. मग उगाच कोणाच्यातरी सांगण्यावरुन किंवा बोलण्यावर विश्र्वास ठेवून मी मनरुप आहे असें मानूं नये.   
संतवचनीं ठेवितां भाव । तोचि शुद्ध स्वानुभव ।
मनाचा तैसाच स्वभाव । आपण वस्तु ॥ ७७ ॥
७७) संतवचनावर एकनिष्ठेनें श्रद्धा ठेवणें हाच शुद्ध स्वरुपानुभव येण्याचा मार्ग होय. मन पण मग ब्रह्मस्वरुप होऊंन जाते. 
जयाचा घ्यावा अनुभव । तोचि आपण निरावेव ।
आपुला घेती अनुभव । विश्र्वजन ॥ ७८ ॥
७८) ज्या स्वरुपाचा अनुभव घ्यायचा ते निरावेव. विश्र्वजन मग आपला अनुभव घेतात.  
लोभी धन साधूं गेले । तंव ते लोभी धनचि जाले ।
मग तें भाग्यपुरुषीं भोगिलें । सावकास ॥ ७९ ॥
७९) एखादा लोभी धन मिळविण्याच्या मागें लागतो इतका कीं तो धन मिळविण्याचा हेतुच विसरुन जातो. धनाचा उपभोग न घेता नुसतेच सांठवून ठेवतो. नंतर कोणी भाग्यवान त्या धनाचा यथेच्छ उपभोग घेतो.   
तैसें देहबुद्धी सोडितां । साधकास जालें तत्वता । 
अनुभवाची मुख्य वार्ता । ते हे ऐसी ॥ ८० ॥
८०) साधकाच्या बाबतींत असेंच घडतें. स्वानंदासाठीं साधक आधी परब्रह्माच्या नादीं लागतो. पुढें त्याची देहबुद्धि कमी होत जाते. स्वानंद भोगण्याचा त्याचा हेतु नाहींसा होतो. त्याची वृत्ती ब्रह्ममय होते. अर्थातच स्वानंद भोगायला मीपणाने तो उरतच नाही. मग त्याच्या ब्राह्मी स्थितीचा किंवा आध्यात्मिक श्रीमंतीचा फायदा इतर लोकांनाच मिळतो.  
आपण वस्तु मुळीं येक । ऐसा ज्ञानाचा विवेक ।
येथून हा ज्ञानदशक । संपूर्ण जाला ॥ ८१ ॥
८१) आपला खरा मी आणि परब्रह्म मुळांत एकरुपच आहेत. असा ज्ञानाचा स्वच्छ निर्णय आहे. या ठिकाणीं ज्ञानदशक संपूर्ण झाला. 
आत्मज्ञान निरोपिलें । येथामतीनें बोलिलें ।
न्यूनपर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ८२ ॥
८२) माझ्या बुद्धीप्रमाणें मी आत्मज्ञानाचें विवेचन केलें त्यामध्यें जें कमीजास्त असेल त्याबद्दल श्रोत्यांनी मला क्षमा करावी. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सुन्यत्वनिर्शननाम समास दहावा ॥
Samas Dahava Shoonyatva Nirshan 
समास दहावा शून्यत्वनिर्शन


Custom Search

No comments: