Wednesday, October 4, 2017

Samas Tisara Sukshma Aashanka Nirupan 1 समास तिसरा सूक्ष्मआशंका निरुपण १


Dashak Aathava Samas Tisara Sukshma Aashanka Nirupan 1 
Samas Tisara Sukshma Aashanka Nirupan 1, It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Maya. How Maya is created. What are the different opinions about creation of Maya.
समास तिसरा सूक्ष्मआशंका निरुपण १ 
श्रीराम ॥
अरे जे जालेंचि नाहीं । त्याची वार्ता  पुससी कायी ।
तथापि सांगों जेणें कांहीं । संशय नुरे ॥ १ ॥ 
१) अरे जें उत्पन्न झालेंच नाही त्या विश्वाचे विवेचन करा असें म्हणतोस. तें कसेम करतां येईल ? तरीसुद्धा तुझी शंका फिटेल असें कांहीं सांगतो.    
दोरीकरितां भुजंग । जळाकरितां तरंग ।
मार्तंडााकरितां चांग । मृगजळ वाहे ॥ २ ॥
२) दोरीवर सर्पाचा , पअन्यावर लाटांचा भास होतो. सूर्य प्रकाशानें मृगजळ भासतें. 
कल्पनेकरितां  स्वप्न दिसे । सिंपीकरितां रुपें भासे ।
जळाकरितां गार वसे । निमिष्य एक ॥ ३ ॥
३) कल्पनेनें स्वप्न दिसतें, शिंपीवर चांदीचा भास होतो, पाण्यावर थोडावेळ बर्फ पडते. 
मातीकरितां भिंती जाली । सिंधुकरितां लहरी आली ।
तिळाकरितां पुतळी । दिसों लागे ॥ ४ ॥
४) माती असुन भिंत दिसते, समुद्र असुन लाटा भासतात. डोळ्यांतील बाहुलीमुळें पदार्थ दिसतो. 
सोन्याकरितां आळंकार । तंतुकरितां जालें चीर ।
कासवाकरितां विस्तार । हातापायांचा ॥ ५ ॥ 
५) सोन्यावर दागिनें भासतात, तंतूमुळें धागे असून वस्त्र दिसते. कासवानें हातपाय पसरले कीं, नविन कांहीं असल्याचा भास होतो.   
तूप होतें तरी थिजलें । तरीकरितां मीठ जालें ।
बिंबाकरितां बिंबलें । प्रतिबिंब ॥ ६ ॥
६) पातळ असलेलें तूप थिजलें कीं, नवीन कांहीं उत्पन्न झाल्याचा भास होतो. खाडीमधील समुद्राचे पाणी वाढलें कीं, मीठ तयार होते. बिंबाचें प्रतिबिंब पडलें कीं नवीन कांहीं झाल्याचा भास होतो.  
पृथ्वीकरितां जलें झाड । झाडाकरितां छ्याया वाड ।
धातुकरितां पवाड । उंच नीच वर्णाचा ॥ ७ ॥
७) पृथ्वींतून झाड येतें तेव्हां तें निराळें असल्याचा भास होतो. झाडाचीच छाया पडते. धतु धातुपणानें एकच असतात. पण त्यांच्या रंगानेम ते कमीजास्त मूल्याचे मानले जातात. 
आतां असो हा दृष्टांत । अद्वैतास कैंचे द्वैत । 
द्वैतेंविण अद्वैत । बोलतांच न ये ॥ ८ ॥  
८) दृष्टांत देणें आताम पुरे झाले. जें अद्वैत आहे त्यामध्यें द्वैत असूं शकत नाही. तेथें द्वैतअसल्याचा नुसता भास होतो. खरी अडचण अशी आहे कीं, अद्वैत सांगण्यासाठीं द्वैताचा आश्रय घेतल्याखेरीज चालतच नाही.  
भासाकरितां भास भासे । दृध्याकरितां अदृश्य दिसे ।
अदृश्यास उपमा नसे । म्हणोनि निरोपम ॥ ९ ॥
९) आपल्यावर अज्ञानाचें आवरण आहे. त्यामुळें जें मुळांत नाहीं तें दिसतें. भ्रम झाल्यानें भ्रमरुप विश्व आपल्याला भासते. दृश्य विश्र्व आपल्या अनुभवास येते म्हणून अदृश्य ब्रह्मस्वरुपाचा विचार करतां येतो. अदृश्य ब्रह्मस्वरुपासारखीं वस्तुच नाही. त्यामुळें ते निरुपमेय आहे. 
कल्पनेविरहित हेत । दृश्यावेगळा दृष्टांत ।
द्वैतावेगळें द्वैत । कैसें जालें ॥ १० ॥ 
१०) या दृश्य विश्वाच्या क्षेत्रामध्यें कल्पनेशिवाय हेतु असुंच शकत नाही. दृश्य पदार्थांखेरीज दृष्टांत देतां येत नाहीं. द्वैत असल्याखेरीज द्वैताचा अनुभव येऊं शकत नाहीं.  
 विचित्र भगवंताची करणी । वर्णवेना सहस्त्रफणी ।
तेणें केली उभवणी । अनंत ब्रह्मांडाची ॥ ११ ॥
११) भगवमताची करणी फार विलक्षण आहे. हजार तोंडें असलेल्या शेषाला देखील तिचें वर्णन करणें कठीण आहे. त्या भगवंतानें या विश्वाची निर्मिति केली आहे.  
परमात्मा परमेश्र्वरु । सर्वकर्ता जो ईश्र्वरु । 
तयापासूनि विस्तारु । सकळ जाला ॥ १२ ॥
१२) परमात्मा परमेश्र्वर असा जो सर्व कर्ता ईश्र्वर त्याच्यापासून या सर्व विश्र्वाचा विस्तार झालेला आहे.  
ऐसी अनंत नामें धरी । अनंत शक्ती निर्माण करी ।
तोचि जाणावा चतुरीं । मूळपुरुष ॥ १३ ॥
१३) ईश्र्वराची अशी अनंत नांवें आहेत. त्याच्या अंगीं अनंत प्रकारच्या शक्तीं आहेत. अनंत शक्तीनीं संपन्न असणारा जो ईश्र्वर तोच मूळ पुरुष होय. हें शहाण्यांनी ओळखावें.  
त्या मूळपुरुषाची वोळखण । ते मूळमायाचि आपण ।
सकळ कांहीं कर्तेपण । तेथेंचि आलें ॥ १४ ॥
१४) मूळ माया हें त्या मूळ पुरुषाचे दुसरे नांव आहे. कारण मूळ मायेची ओळखण म्हणजे मूळ पुरुषाची ओळखण आहे. सगळें कर्तेंपण मूळमायेमध्यें असतें. 
श्र्लोक ॥
कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरच्यते ॥
अर्थ
कार्य, कारण व कर्तृत्व यांचें मूळ प्रकृति हीच आहे. साधकाच्या आणि सिद्धच्या दृष्टीमधें फरक असल्यानें साधकाला समजेल, पचेल व आचरणांत आणतां येईल अशा रीतीनेंच अंतीम तत्व सांगावें लागतें. अंतिम तत्व उघडपणें सांगितलें तर साधनेला बाध येण्याचा संभव असतो.  
हे उघड बोलतां न ये । मोडों पाहातो उपाये ।
येरवीं हें पाहातां काय । साच आहे ॥ १५ ॥
१५) सिद्धांना येणारा शुद्ध परमात्मस्वरुपाचा अनुभव उघडपणें सांगितला तर साधनाची हानी होण्याचा संभव असतो. एरवी विचार केला तर हें दृश्य विश्व खरें नाहीं.  
देवापासून सकळ जालें । हें सर्वांस मानलें ।
परी त्या देवास वोळखिलें । पाहिजे कीं ॥ १६ ॥
१६) देवापासून हें सगळें विश्व निर्माण झाले हा विचार सर्वांना मानवतो. पण ज्या देवानें विश्व निर्मिलें त्याला ओळखायला हवें. 
सिद्धांचे जें निरुपण । तें साधकांस न मने जाण ।
पक्व नाहीं अंतःकर्ण । म्हणोनियां ॥ १७ ॥
१७) सिद्धाच्या भूमिकेवरुन केलेले ब्रह्मनिरुपण साधकाला आकलन होत नाही. त्याच्या बुद्धीला तें पेलत नाही. कारण त्याच्या अंतःकरणाची तयारी झालेली नसते. 
अविद्यागुणें बोलिजे जीव । मायागुणें बोलिजे शिव ।
मूळमायागुणें देव । बोलिजेतो ॥ १८ ॥
१८) मूळ आत्मस्वरुप चैतन्य एकच आहे. अविद्येच्या आवरणानें त्यास जीव म्हणतात. तो देहांत राहातो. विद्या व अविद्या यांनीं संपन्न मायेच्या सहवासानें त्याच चैतन्यास शिव म्हणतात. तो विष्वांत राहातो. आणि केवळ ज्ञानमय व शक्तिमय चैतन्यास देव किंवा परमेश्र्वर म्हणतात. त्याच्या ज्ञानमय अंगास मूळपुरुष व शक्तिमय अंगास मूळमाया म्हणतात.    
म्हणौनि कारण मूळमाया । अनंत शक्ती धरावया ।
तेथीचा अर्थ जाणावया । अनुभवी पाहिजे ॥ १९ ॥
१९) म्हणून विश्वामध्यें ज्या अनंत शक्ति असतात त्याचें मूळ कारण मूळमाया होय. या म्हणण्याचा अर्थ ध्यानांत येण्यास अनुभवी पुरुषच पाहिजे.  
मूळमाया तोचि मूळपुरुष । तोचि सर्वांचा ईश ।
अनंतनामी जगदीश । तयासीचि बोलिजे ॥ २० ॥
२०) मूळमाया व मूळपुरुष हीं दोन्हीं एकच समजावीं. तोच सर्वांचा नियंता  व स्वामी ईश्र्वर होय. अनंत नांवें असणारा ईश्र्वरच जगदीश नांवानें प्रसिद्ध आहे.  
अवघी माया विस्तारली । परी हे निशेष नाथिली ।
ऐसिया वचनाची खोली । विरुळा जाणे ॥ २१ ॥
२१) या विश्वामध्यें सगळीकडे मायेचा विस्तार आहे. पण तीं अगदी सर्वस्वीं खरी नाही. या म्हणण्याचा जो खोल सूक्ष्म अर्थ आहे तो बरोबर जाणणारा क्वचित आढळतो. 
ऐसें अनुर्वाच्य बोलिजे । परी हें स्वानुभवें जाणिजे ।
संतसंगेंविण नुमजे । कांहीं केल्यां ॥ २२ ॥
२२) या मायेला अनिर्वाच्य म्हणतात. शब्दानें ती समजावून देता येत नाही. परंतु हें स्वानुभवानें जाणावें लागतें. संतसंगति केली तर तें आकलन होतें. तसें केलें नाहीं तर खूप प्रयत्न करुनही मायेचे स्वरुप समजत नाही.  
माया तोचि मूळपुरुष । साधकां न मने हें निशेष ।
परी अनंतनामी जगदीश । कोणास म्हणावें ॥ २३ ॥  
२३) मूळमाया तीच मूळपुरुष व मूळपुरुष तोच मूळ माया. हे साधकाला कांहीं केल्या आकलन होत नाही. तो म्हणतों असें जर आहे तर अनंत नांवें असणारा जगदीश कोणाला म्हणायचें ?        
नामरुप माये लागलें  । तरी हें बोलणें नीटचि जालें ।
येथें श्रोतीं अनुमानिलें । कासयासी ॥ २४॥
२४) मूळ चैतन्य अनाम व अरुप आहे. मायेनेम त्यास अनेक रुपें व अनेक नामें दिली. तेव्हा माया नामरुपाचें मूळ आहे हें म्हणणें बरोबर आहे. याविषयीं श्रोत्यांना शंका येण्याचे कारण नाही.  
आतां असो हे सकळ बोली । मागील आशंका राहिली ।
निराकारीं कैसी जाली । मूळमाया ॥ २५ ॥
२५) हें अवांतर बोलणें पुष्कळ झाले. तें आतां पुरें. मूळ प्रश्र्ण असा कीं, " निराकारी मूळ माया कशी झाली ? "  
दृष्टीबंधन मिथ्या सकळ । परी तो कैसा जाला खेळ ।
हेंचि आतां अवघें निवळ । करुन दाऊं ॥ २६ ॥
२६) नजरबंदीचा खेळ करतात. त्यामधें अनेक वस्तु प्रत्यक्ष निर्माण करतात. पण त्या मिथ्या असतात. तसेंच हें विश्व म्हणजे नजरबंदीचा एक खेळच आहे. तो खेळ कसा खेळला गेला व हे दृश्यानें भरलेले जग कसें निर्माण झाले हें स्पष्ट विवेचन करुन सांगतो.    
आकाश असतां निश्र्चळ । मधें वायो जाला चंचळ ।
तैसी जाणावी केवळ । मूळमाया ॥ २७ ॥
२७) आकाश अत्यंत निश्चळ आहे. त्यामध्यें चंचळ वायु निर्माण झाला. हालणारा वायु उत्पन्न झाला तरी आकाश न हालतां अगदी जसेंच्या तसें राहते. त्याचप्रमाणें अगदी निराकार व निश्चल ब्रह्मामध्यें मूळमाया उत्पन्न झाली.  
रुप वायोचें जालें । तेणें आकाश भंगलें ।
ऐसें हें सत्य मानलें । नवचे किं कदा ॥ २८ ॥
२८) वायु उत्पन्न झाल्यानें आकाशाला तडा गेला, आकाश भंगलें असें कधींच अनुभवास येत नाही.   
तैसी मूळमाया जाली । आणी निर्गुणता संचली ।
येणें दृष्टांतें तुटली । मागील आशंका ॥ २९ ॥
२९) त्याचप्रमाणें मूळ माया उत्पन्न झाली तरी परब्रह्माच्या निर्गुणामध्यें यत्किंचितदेखील भंग होत नाहीं. तें अगदी जसेंच्या तसें राहतें. या दृष्टांतानें पहिली शंका निरसन करुन घ्यावी.   
वायु नव्हता पुरातन । तैसी मूळमाया जाण ।
साच म्हणतां पुन्हा लीन । होतसे ॥ ३० ॥
३०) वायु हा कांहीं आकाशाइतका पुरातन नाहीं,त्याचप्रमाणें मूळ माया कांहीं परब्रह्मासारखीं सनातन नाहीं. शिवाय वायु जसा आकाशांत लीन होतो त्याचप्रमाणें मूळमाया परब्रह्मामध्यें लीन होऊन जाते. म्हणून उत्पन्न होणारी व लीन होणारी माया संपूर्णपणें  खरी नाही. 
वायो रुपें कैसा आहे । तैसी मूळमाया पाहें ।
भासे परी तें न लाहे । रुप तयेचें ॥ ३१ ॥
३१) वायूचे रुप कसें आहें तर तो वाहूं लागला म्हणजे तो आहे असें भासते. परंतु त्यास रुप असें नाही. त्याचप्रमाणें मूळमाया कर्तृत्वानें आहे असें भासते. पण तिचें रुप अमुक आहे असें दाखवता येत नाही. 
वायो सत्य म्हणों जातां । परी तो न ये दाखवितां ।
तयाकडे पाहों जातां । धुळीच दिसे ॥ ३२ ॥
३२) वायु खरा आहे तो दाखवा असें म्हटलें तर दाखवता येत नाही. त्याला पाहायला गेलें तर नुसती धूळ दिसते.
तैसी मूळमाया भासे । भासे परी ते न दिसे ।
पुढें विस्तारली असे । माया अविद्या ॥ ३३ ॥
३३) त्याचप्रमाणें मूळमाया आपलें अस्तित्व जाणवते, पण ती आहे असें जाणवून दिसत मात्र नाही. तिला पहायला गेलें तर दृश्य पदार्थांच्या रुपानें माया व अविद्या दिसतें.    
जैसें वायोचेनि योगें । दृश्य उडे गगनमार्गे ।
मूळमायेच्या संयोगें । तैसें जग ॥ ३४ ॥
३४) वायूच्या वहाण्यानें दृश्य वस्तु आकाशांत उडतात. त्याचप्रमाणें मूळ मायेच्या संयोगानें निर्गुण ब्रह्मामध्यें दृश्य जग दिसूं लागते.  
गगनीं अभाळ नाथिलें । अकस्मात उद्भवलें ।
मायेचेनि गुणें जालें । तैसें जग ॥ ३५ ॥
३५) आकाश स्वच्छ असतें, निरभ्र असतें. त्यामध्यें ढग येतात. त्याचप्रमाणें मूळ परब्रह्म एकजिनसी निर्मळ असते. त्यामध्यें मायेमुळें दृश्य जग दिसूं लागते.   
नाथिलेंचि गगन नव्हतें । अकस्मात आलें तेथें ।
तैसें दृश्य जालें येथें । तैसियापरी ॥ ३६ ॥
३६) वास्तविक आकाशामध्यें मूळांत कांहींच नसते. पण मूळमायेमुळें तेथें दृश्य जग भासते. 
परी त्या आभाळाकरितां । गगनाची गेली निश्र्चळता ।
वाटे परी ते तत्वता । तिसीच आहे ॥ ३७ ॥
३७) आकाशांत अभ्र आल्यावर त्याची निश्र्चळता भंगली असें वाटते. पण ती आकाशाची निश्र्चळता पूर्ववतच असते.   
तैसें मायेकरितां निर्गुण । वाटे जालें सगुण ।
परी तें पाहतां संपूर्ण । जैसें तैसें ॥ ३८ ॥  
३८) त्याच प्रमाणें मूळमाया प्रगट झाल्यावर निर्गुण परब्रह्म सगुण साकार झाल्यासारखें वाटतें. पण सूक्ष्म दृष्टीनें पाहिल्यास परब्रह्म संपूर्णपणें जसेंच्या तसें निर्गुणच असते.  
आभाळ आलें आणि गेलें । तरी गगन तें संचलें ।
तैसें गुणा नाहीं आलें । निर्गुण ब्रह्म ॥ ३९ ॥
३९) आभाळ आलें आणि गेलें तर आकाश ज्याप्रमाणें जसेंच्या तसें अभंग राहतें, त्याचप्रमाणें मायेमुळें दृश्य विश्व आलें आणि गेलें तरी निर्गुण ब्रह्म सगुण न होतां अगदी जसेंच्या तसेंच राहतें. 
नभ माथं लागलें दिसे । परी तें जैसें तैसें असे । 
तैसें जाणावें विश्र्वासें । निर्गुण ब्रह्म ॥ ४० ॥
४०) क्षितिजापाशीं आकाश अगदीं डोक्याला टेकलेले दिसतें. पण तें खाली आलेले नसते. जसेंच्या तसेंच असते. तसेंच दृश्य विश्वामध्यें ब्रह्माला सगुणपणा आल्यासारखें वाटते. पण त्याचा निर्गुणपणा अगदीं जसाच्या तसाच असतो. तसा विश्र्वास बाळगा. 
ऊर्ध पाहातां आकाश । निळिमा दिसे सावकास ।
परी तो जाणिजे मिथ्या भास । भासलासे ॥ ४१ ॥
४१) आकाशामध्यें वर पाहिले तर सगळीकडे निळारंग दिसतो. पण तो रंग तेथें नसतो. तो केवळ भास असतो. 
आकाश पालथें घातलें । चहूंकडे आतोपलें ।
वाटे विश्र्वास कोडिलें । परी तें मोकळेंचि असे ॥ ४२ ॥
४२) आकाश एखाद्या झाकणासारखें पालथे घातलेले आहे. सगळें विश्र्व त्यांत कोंडून धरल्यासारखें वाटते. पण हें खरें नाही. सर्व दिशांनी तें मोकळे आहे. 
पर्वती निळा रंग दिसे । परी तो तया लागला नसे ।
अलिप्त जाणावें तैसें । निर्गुण ब्रह्म ॥ ४३ ॥ 
४३) लांबून पाहिले तर पर्वतांचा रंग निळा दिसतो. पण तो रंग त्यांना लावलेला नसतो. त्याचप्रमाणें हें दृश्य विश्व परब्रह्माला चिकटलेले दिसते पण निर्गुण ब्रह्म त्यापासून अगदी अलिप्त राहतें.    
रथ धावतां पृथ्वी चंचळ । वाटे परी ते असे निश्र्चळ ।
तैसें परब्रह्म केवळ । निर्गुण जाणावें ॥ ४४ ॥
४४) रथ धावतांना पृथ्वी धावते असें वाटते. पण पृथ्वी स्थिरच असते. त्याचप्रमाणें सगुण विश्व पाहून परब्रह्म सगुण झाल्यासारखें वाटते. पण परब्रह्माची सगुण अवस्था अगदी जसींच्यातशींच असते. 
अभाळाकरितां मयंक । वाटे धावतो निशंक ।
परी तें अवघें माईक । अभाळ चळे ॥ ४५ ॥  
४५) चांदण्या असतांना ढग आलें तर चंद्र पळतो आहे असें वाटते पण तसें नसते तो भ्रम असतो. चंद्र स्थिर असून ढगच धांवत असतात. 
झळे अथवा अग्निज्वाळ । तेणें कंपित दिसे अंत्राळ ।
वाटे परी तें निश्र्चळ । जैसें तैसें ॥ ४६ ॥
४६) उन्हाची झळ किंवा आगीच्या ज्वाळा वर गेल्या म्हणजे आकाश कंप पावल्यासारखें दिसते. पण हा भ्रम असतो. कारण आकाश अगदी जसेंच्यातसे निश्र्चळ असते.  
तैसें स्वरुप हें संचलें । असतां वाटे गुणा आलें ।
ऐसें कल्पनेसि गमलें । परी तें मिथ्या ॥ ४७ ॥
४७) त्याचप्रमाणें निर्गुण व निश्र्चळ परब्रह्म एकच एकपणें जिकडे तिकडे पसरले आहे. तें दृश्य विश्र्वामुळें सगुण झाले असें आपल्याला वाटते. पण तें खरें नसतें. ब्रह्म जसेंच्या तसे निर्गुणपणें राहतें.  
दृष्टिबंधनाचा खेळ । तैसी माया हे चंचळ ।
वस्तु शाश्र्वत निश्र्चळ । जैसी तैसी ॥ ४८ ॥
४८) नजरबंदिच्या खेळामध्यें निरनिराळ्या वस्तु तात्पुरत्या निर्माण केल्या जातात. त्याचप्रमाणें माया चंचल असून अनेक दृश्य पदार्थ निर्माण करते. पण ते सर्व तात्पुरतें असतात. दृश्य पदार्थ आले आणि गेले तरी परात्पर परब्रह्म अगदी जसेंच्या तसे शाश्वत आणि निश्र्चळ टिकते.  
ऐसी वस्तु निरावेव । माया दाखवी अवेव ।
ईचा ऐसाच स्वभाव । नाथिलीच हे ॥ ४९ ॥   
४९) वास्तविक परमात्मवस्तु अखंड आहे. अवयवरहित आहे. तिच्यामध्यें माया खंड पडल्याचा भास निर्माण करते. मुळांत जें नाहीं तें आहें असा भास निर्माण करणें हेच मायेचे काम आहे. म्हणून मायेची सृष्टी खरी नसते.   
माया पाहातां मुळींच नसे । परी हे साचाऐसी भासे ।
उद्भवे आणि निरसे । अभाळ जैसें ॥ ५० ॥
५०) माया मूल ब्रह्मस्वरुपांत नाहीं. पण ती खरी आहे असा भ्रम निर्माण होतो. आकाशांत आभाळ येतें आणी जातें. त्याचप्रमाणें माया मूळ स्वरुपांत दिसते आणि नासते. परंतु स्वरुपाला त्याचा धक्का लागत नाही.  ऐसी माया उद्भवली । वस्तु निर्गुण संचली । 
अहं ऐसी स्फूर्ति जाली । तेचि माया ॥ ५१ ॥
५१) आभाळाप्रमाणें ब्रह्मामध्यें माया निर्माण झाली तरी ब्रह्मस्वरुप जसेंच्या तसें राहते. ब्रह्माच्या ठिकाणी अहं अशी जी स्फूर्ति होते ती माया होय.
गुणमायेचे पवाडे । निर्गुणीं हें कांहींच न घडे ।
परी हें घडे आणी मोडे । सस्वरुपीं ॥ ५२ ॥
५२) गुणमायेचा सगळा खटाटोप चालतो. त्याचा आणी निर्गुण स्वरुपाचा कांहींच संबंध नसतो. स्वस्वरुपांत हें सर्व घडून येते.  
जैसी दृष्टी तरळली । तेणें सेनाच भासली ।
पाहातां आकाशींच जाली । परी ते मिथ्या ॥ ५३ ॥
५३) एखाद्या माणसाची नजर चंचल झाली म्हणजे त्यास आकाशांतील ढगामध्यें सैन्य दिसतें. पण तें आकाशांतील आभाळ आहे हें कळल्यावर सगळेंच खोटे असें कळतें. 
मिथ्या मायेचा खेळ । उद्भव बोलिला सकळ ।
नाना तत्वांचा पाल्हाळ । सांडूनियां ॥ ५४ ॥
५४) अशा रीतीनें मायेचा खेळ कसा मिथ्या असतो हें सांगितलें. अनेक तत्वांचा विस्तार न करतां माया कशी उत्पन्न झाली हें सुद्धां  समजावून सांगितले.  
तत्वें मुळींच आहेती । वोंकार वायोची गती ।
तेथीचा अर्थ जाणती । दक्ष ज्ञानी ॥ ५५ ॥
५५) अहं ही जी मूळ स्फूर्ति तें स्फुरण वायुमय असते. तोच ओंकार होय. त्यामध्यें पंचमहाभूतें बीजरुपानें असतात. चतुर ज्ञानी पुरुषांना हे बरोबर माहित असते. 
मूळमायेचे चळण । तेंचि वायोचें लक्षण ।
सूक्ष्म तत्वें तेंचि जाण । जडत्वा पावलीं ॥ ५६ ॥
५६) निश्चल ब्रह्मामध्येम जी हालचाल होतें ती मूलमाया होय. तें चळण शक्तिमान आहे. शक्ति हेंच वायूचें लक्षण होय. वायूंतील शक्तीमुळें सूक्ष्म तत्वें स्थूल रुप घेतात.   
ऐसीं पंचमाहांभूतें । पूर्वीं होती अवेक्तें ।
पुढें जालीं वेक्तें । सृष्टिरचनेसी ॥ ५७ ॥
५७) पंचमहाभूतें प्रथम अव्यक्त होतीं. पण नंतर विश्वरचना होण्यासाठीं ती व्यक्त झाली.  
मूळमायेचें लक्षण । तेंचि पंचभूतिक जाण ।
त्याची पाहें वोळखण । सूक्ष्मदृष्टीं ॥ ५८ ॥
५८) मूळमायेमध्यें जर विश्वरचनेंचे बीज आहे तर तिच्यामध्यें सूक्ष्मरुपानें पंचमहाभूतें असली पाहिजेत. जो सूक्ष्म विचार करील त्याच्या हे ध्यानांत येईल. 
आकाश वायोविण । इछ्याशब्द करी कोण ।
इछाशक्ति तेचि जाण । तेजस्वरुप ॥५९ ॥
५९) आकाश आणि वायु हीं तत्वें मूळमायेंमध्यें असली पाहिजेत. शब्द हा आकाशाचा गुण म्हणून अहंचे स्फूरण ओंकार नादरुपानें प्रगट झालें. चळण हा वायुचा गुण. म्हणून मी एक आहे अनेक व्हावें हीं इच्छा निर्माण झाली. बल हा तेजाचा गुण म्हणुन त्या इच्छेला सामर्थ्य प्राप्त झालें.    
मृदपण तेंचि जळ । जडत्व पृथ्वी केवळ ।
ऐसी मूळमाया सकळ । पंचभूतिक जाणावी ॥ ६० ॥
६०) तें सामर्थ्य जीवाला बोचत नाही. तें मृद आहे. मृदुपण हा जळाचा गुण ,आणि हा सर्व खेळ जडद्रव्याच्या आधारानें चालतो. जडत्व हा पृथ्वीचा गुण. अशा प्रकारें मूळमायेंमध्यें पंचमाहाभूतें सूक्ष्मपणें व अव्यक्तपणें वास करतात. 
येक येक भूतांपोटीं । पंचभूतांची राहाटी ।
सर्व कळे सूक्ष्मदृष्टी । घालून पाहातां ॥ ६१ ॥
६१) हीं पंचमाहाभूतें अव्यक्त असतांना किंवा व्यक्त असतांना एकमेकांपासून वेगळीं राहूं शकत नाहीत. एकमेकांत ती मिसळलेली असतात. विश्वरचनेकडे सूक्ष्म दृष्टीनें बघितलें तर हें सर्व ध्यानांत येईल. 
पुढें जडत्वास आलीं । तरीं असतीं कालवलीं ।
ऐसी माया विस्तारली । पंचभूतिल ॥ ६२ ॥
६२) पंचमाहाभूतें व्यक्त स्वरुपांत आल्यावरसुद्धां एकमेकांत मिसळलेली असतात. याप्रमाणें पंचमाहाभूतांच्या पोटांत असलेली ही माया संपूर्ण विश्वभर पसरलेली आहे.  
मूलमाया पाहातां मुळीं । अथवा अविद्या भूमंडळीं ।
स्वर्ग मृत्य पाताळीं । पांचचि भूतें ॥ ६३ ॥
६३) मूळमायेच्या बुडाशी जाऊन पाहा किंवा स्वर्ग, मृत्यु, पाताळांत पहा सगळीकडें पंचमहाभूतांचाच विस्तार आहे असें तुम्हाला आढळेल. 
श्र्लोक 
स्वर्गे मृत्यौ पाताले वा यत्किंचित्सचराचरं ।
सर्वं पंचभूतकं राम षष्ठें किंचिन्न दृश्यते ॥
रामा, स्वर्ग, मृत्यु पाताळ किंवा जे थोडे सचराचर आहे तें सारें पंचभूतांनीं भरलेलें आहे. त्याहून सहावें असें कांहीं नाही. 

सत्य स्वरुप आदिअंतीं । मध्यें पंचभूतें वर्तती ।
पंचभूतिक जाणिजे श्रोतीं । मूळमाया ॥ ६४ ॥
६४) आरंभी व शेवटीं सत्य असें परमात्मस्वरुप आहे. मध्येम पंचभूतांच्या घडामोडी चालतात. मूळमाया पंचभूतात्मक आहे. हें श्रोत्यांनी ओळखून रहावें. 
येथें उठिली आशंका । सावध होऊन ऐका ।
पंचभूतें जालीं येका । तमोगुणापासुनी ॥ ६५ ॥
६५) येथें एक शंका आली. ती लक्ष देऊन ऐका. एका तमोगुणापासून पंचभूतें निर्माण होतात. 
मूळमाया गुणापरती । तेथें भूतें कैंचीं होतीं ।
ऐसी आशंका हे श्रोतीं । घेतली मागां ॥ ६६ ॥
६६) मूळमायेमध्यें त्रिगुणांना स्थान नाही. मग येथें पंचभूतांचा उगम कसा काय होतो ? अशीही शंका श्रोत्यांनी आधीच घेतली. 
ऐसें श्रोतीं आक्षेपिलें । संशयास उभें केलें ।
याचें उत्तर दिधलें । पुढिले समासीं ॥ ६७ ॥
६७) श्रोत्यांनी ही शंका घेतली आहे. पुढील समासामध्येम त्याचे उत्तर दिलें आहे. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मआक्षंकानाम समास तिसरा ॥
Samas Tisara Sukshma Aashanka Nirupan 
 समास तिसरा सूक्ष्मआशंका निरुपण



Custom Search

No comments: