Tuesday, March 13, 2018

Samas Navava Aatma Vivaran समास नववा आत्माविवरण


Dashak Terava Samas Navava Aatma Vivaran 
Samas Navava Aatma Vivaran, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Aatma. Aatma leaves in the body. Aatma and body both are essential for the life of anybody. Without Aatma body can’t leave nor can Aatma leave without body.
समास नववा आत्माविवरण 
श्रीराम ॥
आत्मयास शेरीरयोगें । उद्वेग चिंता करणे लागे ।
शरीरयोगें आत्मा जगे । हें तो प्रगटचि आहे ॥ १ ॥
१) शरीराशी संबंध आल्यानें जीवात्म्याला दुःख व चिंता करावी लागते. शरीराच्या साहायानें जीवात्मा जगतो. हें तर अगदी प्रत्यक्षच आहे. 
देह अन्नचि खायेना । तरी आत्मा कदापि जगेना ।
आत्म्याविण चेतना । देहास कैंची ॥ २ ॥
२) देहानें अन्न खाल्लें नाहीं तर जीवात्मा कधींच जगूं शकत नाहीं. तसेंच जीवात्मा नसेल तर देहाला जिवंतपणा असत नाहीं. 
हें येकावेगळें येक । करुं जातां निरार्थक ।
उभयेयोगें कोणीयेक । कार्य चाले ॥ ३ ॥
३) देह व जीवात्मा एकमेकांपासून वेगळें करायला जाणें व्यर्थ आहे. कारण दोघांच्या संयोगानेंच माणसाच्या जीवनांत सारी कार्ये घडतात. 
देहाला नाहीं चेतना । आत्म्यास पदार्थ उचलेना ।
स्वप्नभोजनें भरेना । पोट कांहीं ॥ ४ ॥
४) नुसत्या देहाला जीवंतपण नसतें तर नुसत्या जीवात्म्याला पदार्थ उचलता येत नाहीं. एखादा माणूस स्वप्नामधें जेवला तर त्याचे पोट कांहीं भरत नाहीं. 
आत्मा स्वप्नअवस्थेंत जातो । परन्तु देहामध्यें हि असतो ।
निदसुरेपणें खाजवितो । चमत्कार पाहा ॥ ५ ॥
५) जीवात्मा जेव्हा स्वप्नामधें जातो, तेव्हां तो देहामध्येंही असतो. झोपेंत तो शरीर खाजवतो. हें याचें प्रमाण होय. हा एक चमत्कार आहे.   
अन्नरसें वाढें शरीर । शरीरप्रमाणें विचार ।
वृद्धपणीं तदनंतर । दोनी लाहानाळती ॥ ६ ॥
६) अन्नरसानें शरीर वाढतें. जसें जसें शरीर वाढतें तसा तसा विचारही वाढतो. त्यानंतर म्हातारपणीं शरीर व विचार दोन्हींचा संकोच होतो. दोन्ही लहान होतात.     
उत्तम द्रव्य देह खातो । देहयोगें आत्मा भुलतो ।
विस्मरणें शुद्धि सांडितो । सकळ कांहीं ॥ ७ ॥
७) देह मादक पदार्थ सेवन करतो, त्याचा अम्मल जीवात्म्यावर होऊन तो भ्रमतो. त्याचे भान नाहींसें होते. आणि त्याची सगळी शुद्धि लोपते. 
देहानें घेतलें वीष । आत्मा जाये सावकास ।
वाढणें मोडणें आत्मयास । नेमस्तआहे ॥ ८ ॥
८) देहानें विष घेतलें तर त्याचा परीणाम होऊन जीवात्मा देह सोडतो. वाढणें, मोडणें या गोष्टी जीवात्म्यास निश्र्चिपणें भोगाव्या लागतात. 
वाढणें मोडणें जाणें येणें । सुख दुःख देहाचेनि गुणें ।
नाना प्रकारें भोगणें । आत्मयास घडे ॥ ९ ॥
९) वाढणें, मोडणें, जाणें, येणें, सुख आणि दुःख या गोष्टी देहाशी संयोग झाल्यानें जीवात्म्याला अनेक रीतीनें भोगाव्या लागतात.   
वारुळ म्हणिजे पोकळ । मुंग्यांचे मार्गचि सकळ ।
तैसेंचि हें केवळ । शरीर जाणावें ॥ १० ॥
१०) मुंग्यांचें वारुळ आंतमधून पोकळ असतें. त्यांत मुंग्यांना जाण्यायेण्याचे मार्गच असतात. आपला देहसुद्धा वारुळासारखाच आहे. 
शरीरीं नाडीचा खेटा । नाडीमध्यें पोकळ वाटा ।
लाहान थोर सगटा । दाटल्या नाडी ॥ ११ ॥
११) आपल्या शरीरांत नाड्यांचा गुंतडा आहे. नाड्या आंतून पोकळ असतात. अशा लहान व मोठ्या पुष्कळ नाड्या शरीरांत आहेत.  
प्राणी अन्नोदक घेतो । त्याचा अन्नरस होतो ।
त्यास वायो प्रवर्ततो । स्वासोस्वासें ॥ १२ ॥
१२) प्राणी अन्न खातो व पाणी पितो. त्याचा अन्नरस तयार होतो. त्या अन्नरसाला वायु श्वासोच्छ्वासानें प्रवाहित करतो. 
नाडीद्वारां धांवे जीवन । जीवनामधें खेळें पवन ।
त्या पवनासरिसा जाण । आत्मा हि विवरे ॥ १३ ॥
१३) शरीरांतील नाड्यांतून पाणी वाहते. त्या पाण्यामध्यें वायुदेखील वाहतो. त्या वायुबरोबर जीवात्मासुद्धां नाड्यांमधून संचार करतो. नाड्यांमधून जाणीवेचा प्रवाह पण असतो, हें सांगण्याचा हेतु आहे. 
तृषेनें शोकले शरीर । आत्म्यास कळे हा विचार ।
मग उठवून शरीर । चालवी उदकाकडे ॥ १४ ॥
१४) तहान लागून शरीराला शोष पडला कीं, तें जीवात्म्याला समजतें मग तो शरीराला उठवून पाण्याकडे नेतो. 
उदक मागे शब्द बोलवी । मार्ग पाहोन शरीर चालवी ।
शरीर अवघें च हालवी । प्रसंगानुसार ॥ १५ ॥
१५) " मला पाणी पाहिजे " असें शब्द जीवात्मा शरीराकडून बोलवतो. रस्ता नीट बघून तो शरीरास चालवतो. जसाजसा  प्रसंग येईल तशी तशी शरीराकडून हालचाल करवितो.   
क्षुधा लागते ऐसें जाणतो । मग देहास उठवितो ।
आच्यावाच्या बोलवितो । ज्यासी त्यासी ॥ १६ ॥
१६) भूक लागली असें जीवात्मा जाणतो. मग तो देहाला उटवतो. आणि जेवायला उशीर झाला म्हणून तो ज्याला त्याला अद्वातद्वा बोलायला लावतो. 
बायेकांत म्हणे जालें जालें । देह सोवळें करुन आणिलें ।
पायांत भरुन चालविलें । तांतडीं तांतडीं ॥ १७ ॥
१७) बायकोच्या शरीरांतील जीवात्म्याला म्हणतो, " झालें जेवण तयार झालें चला " मग हा देहाला सोवळे नेसवतो. आणि पायांकडून चालवून तातडीनें जेवायला नेतो.   
त्यासी पात्रावरी बैसविलें । नेत्रीं भरोन पात्र पाहिलें ।
हाताकरवीं आरंभिलें । आपोशन ॥ १८ ॥
१८) देहाला तो पानावर बसवतो. मग डोळ्यांत भरुन वाढलेले पान बघतो. आणि हाताला आपोशन करायला लावतो. 
हाताकरवीं ग्रास उचलवी । मुखीं जाऊन मुख पसरवी ।
दातांकरवीं चाववी । नेटें नेटें ॥ १९ ॥
१९) नंतर जीवात्मा हाताला घास उचलावयाला लावतो. तोंडापाशीं नेल्यावर तोंड उघडावयास लावतो. आणि दांतांकडून नीटपणें चाववून घेतो.   
आपण जिव्हेमधें खेळे । पाहतो परिमळसोहळे ।
केंस काडी खडा कळे । तत्काळ थुंकी ॥ २० ॥
२०) हाच जीवात्मा जीभेमध्यें संचार करुन स्वाद आणि सुवास यांचा आनंद भोगतो. अन्नांत केस, काडी किंवा खडा लागला तर जाणतो व लगेच थुंकुन टाकतो.   
आळणी कळतां मीठ मागे । बायलेसि म्हणे आगे कांगे ।
डोळे ताऊन पाहों लागे । रागें रागें ॥ २१ ॥ 
२१) पदार्थ आळणी झाला असेल तर जीवात्मा मीठ मागतो. " असे कां गें " असें ओरडून बायकोकडे डोळे वटारुन रागानें पाहातो.         
गोडी लागतांच आनंदे । गोड नस्तां परम खेदे ।
वांकडी गोष्टी अंतरीं भेदे । आत्मयासी ॥ २२ ॥
२२) गोड पदार्थ खातांना जीवात्म्याला आनंद होतो. पदार्थ गोड नसेल तर त्याला मोठें वाईट वाटते. वाईट गोष्टीनें जीवात्म्याच्या अंतर्यामी क्लेश होतात. 
नाना अन्नाची गोडी । नाना रसें स्वाद निवडी ।
तिखट लागतां मस्तक झाडी । आणी खोंकीं ॥ २३ ॥
२३) हा जीवात्मा अनेक प्रकारच्या अन्नाची गोडी घेतो. अनेक रसांची चव निवडतो. पदार्थ तिखट लागला तर डोकें झाडतो. आणि त्याला ठसका लागतो. 
मिरपुडी घातली फार । कायसें करितों खापर । 
जिव्हेकरवीं कठिणोत्तर । बोलवी रागें ॥ २४ ॥
२४) मग तो रागावून बोलायला लावतो कीं, " मिरपूड फार घातली, खापरासारखा हा काय पदार्थ केला आहे.    
आज्य उदंड जेविला । सवेंच तांब्या उचलिला ।
घळघळां घेऊं लागला । सावकास ॥ २५ ॥
२५) तुपाचे पक्वान्न फार खाल्ल्याने तहान फार लागते. म्हणून तो लगेच तांब्या उचलायला लावतो आणि घटाघटा पाणी प्यायला लावतो.     
देहीं सुखदुःखभोक्ता । तो येक आत्माचि पाहातां ।
आत्म्याविण देह वृथा । मडें होये ॥ २६ ॥
२६) देहामध्यें राहणारा आणि सुखदुःखें भोगणारा एक जीवात्माच होय. जीवात्मा देहांत नसेल तर देह केवळ प्रेत बनतो.   
मनाच्या अनंत वृत्ति । जाणणें तेचि आत्मस्थिती ।
त्रैलोकीं जितुका वेक्ती । तदांतरीं आत्मा ॥ २७ ॥
२७) मनामध्यें अनंत वृत्ति निर्माण होतात. जीवात्मा त्या सर्व जाणतो. सर्व वृत्ति जाणणें, हाच त्याचा खरा धर्म होय. त्रैलोक्यामध्यें जितक्या व्यक्ति आहेत तितक्या सर्वांच्या अंतर्यामी जीवात्मा वास करतो.   
जगामध्यें जगदात्मा । विश्र्वामधें विश्र्वात्मा ।
सर्व चालवी सर्वात्मा । नाना रुपें ॥ २८ ॥
२८) जगाच्या अंतर्यामी असणारा तो जगदात्मा, विश्र्वाच्या अंतर्यामीं असणारा तो विश्र्वात्मा होय. अंतरात्मा अथवा सर्वात्मा अशारीतीनें अनेक रुपें घेऊन सर्वांना चालवितो. 
हुंगे चाखे ऐके देखे । मृद कठिण वोळखे ।
शीत उष्ण ठाउकें । तत्काळ होये ॥ २९ ॥
२९) त्या अंतरात्म्याला सर्व कांहीं ओळखता येतें. तो वास घेतो, स्वाद घेतो, ऐकतो, पाहतो, मऊ आणि कठीण ओळखतो. गरम आणि थंड त्याला तत्काळ समजते.   
सावधपणें लाघवी । बहुत करी उठाठेवी ।
या धूर्ताच्या उगवी । धूर्तचि करी ॥ ३० ॥  
३०) अत्यंत चतुर असणारा असा हा जीवात्मा लक्ष देऊन कितीतरी प्रकारच्या खटपटी करतो. त्या चतुर जीवात्म्याचा उलगडा, खरा चतुर पुरुषच करुं शकतो. 
वायोसरिसा परिमळ येतो । परि तो परिमळ वितळोन जातो ।
वायो धुळी घेउनी येतो । परी ते हि जाये ॥ ३१ ॥
३१) वारा जेव्हां वाहतो तेव्हां त्याच्याबरोबर सुगंध येतो. पण तो सुगंध कांहीं काळानेम विरुन जातो. वाराजेव्हां वाहतो तेव्हां त्याच्याबरोबर धूळ येते. पण ती देखील नाहींशी होते. 
शीत उष्ण वायोसरिसें । सुवासें अथवा कुवासें ।
असिजे परी सावकासें । तगणे न घडे ॥ ३२ ॥
३२) गरम आणी थंड, सुगंध आणी दुर्गंध वगैरे गोष्टी वायुबरोबर वाहात येतात. परंतु त्या हार वेळ टिकत नाहींत. 
वायोसरिसे रोग येती । वायोसरिसी भूतें धांवती ।
धूर आणी धुकटें येती । वायोसवें ॥ ३३ ॥ 
३३) वायुबरोबर रोग येतात. भुतें धांवतात, त्याचप्रमाणें धूर व धूकेंसुद्धां येतात.
वायोसवें कांहींच जगेना । आत्म्यासवें वायो तगेना ।
आत्म्याची चपळता जाणा । अधिक आहे ॥ ३४ ॥ 
३४) पण यापैकी कोणतीही गोष्ट वायुबरोबर कायम टिकत नाहीं. जीवात्म्या बरोबर तुलना केली तर वायु त्याच्यासमोर टिकत नाही. वायूपेक्षां जीवात्मा अधिक सूक्ष्म व चपळ आहे.   
वायो कठिणास आडतो । आत्मा कठिण भेदून जातो ।
कठिण पाहों तरी तो । छेदेहिना ॥ ३५ ॥
३५) कठिण पदार्थांमध्यें वायु अडतो. पण आपल्या आड येणारा कठिण पदार्थ भेदून जीवात्मा पलीकडे जातो. जीवात्म्याचा कठिणपणा इतका आहे कीं, त्याचा छेद करतां येत नाहीं. 
वायो झडझडां वाजे । आत्मा कांहींच न वाजे ।
मोनेंचि अंतरीं समजे । विवरोन पाहातां ॥ ३६ ॥
३६) वार्याचा झडझड असा आवाज येतो, जीवात्म्याचा मुळींच आवाज येत नाहीं. जो कोणीं मौन धरुन त्याचे चिंतन व मनन करील त्याला स्वतःच्या अंतर्यामीच तो कळून येईल. 
शरीरास बरें केलें । तें आत्मयास पावलें ।
शरीरयोगें जालें । समाधान ॥ ३७ ॥ 
३७) शरीराला कांहीं चांगलें उपचार केलें तर ते जीवात्म्याला पावतात. शरीराच्याद्वारे जीवात्म्याला समाधान मिळतें.
देहावेगळे उपाये नाना । करितां आत्मयास पावेना ।
समाधान पावे वासना । देहाचेनि ॥ ३८ ॥
३८) देहा व्यतिरिक्त अनेक उपचार केले तर ते जीवात्म्याला पोचत नाहींत. फक्त देहाच्याद्वारेच जीवात्म्याला वासनेचे समाधान मिळते. 
देहआत्मयाचें कौतुक । पाहों जातां हें अनेक ।
देहावेगळी आडणुक । आत्मयास होये ॥ ३९ ॥
३९) देह व जीवात्मा यांच्या संयोगाचें कौतुक असें अनेक प्रकारचे आहे. देह नसेल तर जीवात्म्याची अनेक प्रकारे अडचण होतें. त्याला अडल्यासारखें होते.  
येक असतां उदंड घडे । वेगळें पाहातां कांहींच न घडे ।
विवेकें त्रैलोकीं पवाडे । देहात्मयोगें ॥ ४० ॥
४०) देह व जीवात्मा एकत्र असतां असंख्य गोष्टी होऊं शकतात. दोघांना वेगळें केल्यास एकेकट्याच्या हातून कांहींच होऊं शकत नाहीं. दोघांचा संयोग असेल तर विवेकाच्या बळावर त्रैलोक्यााचा ठाव घेतां येतो.    
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मविवरणनाम समास नववा ॥
Samas Navava  Aatma Vivaran
समास नववा आत्माविवरण 


Custom Search

No comments: