Dashak Terava Samas Pachava Kahani Nirupan
Samas Pachava Kahani Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us Kahani i.e. Story.
समास पांचवा कहाणी निरुपण
श्रीराम ॥
कोणी येक दोघे जण । पृथ्वी फिरती उदासीन ।
काळक्रमणें लागून । कथा आरंभिली ॥ १ ॥
१) एकदां दोन मित्र अनासक्तपणें पृथ्वीवर फिरत होते. वेळ जावा, करमणूक व्हावी म्हणून एकानें दुसर्याला गोष्ट सांगायला सुरवात केली.
श्रोता पुसे वक्तयासी । काहाणी सांगा जी बरवीसी ।
वक्ता म्हणे श्रोतयासी । सावध ऐकें ॥ २ ॥
२) ऐकणारा संगणार्यास म्हणाला कीं, तुम्हीं एखादी चांगली गोष्ट सांगा. त्यावर सांगणारा म्हणाला कीं, मी अशी गोष्ट सांगतो, पण ती तूं लक्ष देऊन ऐकली पाहिजेस.
येकें स्त्रीपुरुषें होतीं । उभयेतांमधें बहु प्रीति ।
येकरुपेंचि वर्तती । भिन्न नाहीं ॥ ३ ॥
३) एक स्त्री-पुरुष असें जोडपें होतें. त्यांचें एकमेकांवर अतिशय प्रेम होते. ते येवढें कीं, दोघांमध्यें वेगळेंपण मुळींच नव्हतें.
ऐसा कांहीं येक काळ लोटला । तयांस येक पुत्र जाला ।
कार्यकर्त आणि भला । सर्वविषीं ॥ ४ ॥
४) बराच काळ गेल्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. त्याचें नांव विष्णु. सर्वच बाबतींत तो चांगला असून मोठा कार्यकर्ता होता.
पुढें त्यासहि जाला कुमर । तो पित्याहून आतुर ।
कांहीं तदर्ध चतुर । व्यापकपणें ॥ ५ ॥
५) पुढें विष्णुला पण मुलगा झाला. बापापेक्षां तो उतावीळ व चंचळ होता. तो अर्धा शाहाणा होता पण त्यानें व्याप फार वाढवला.
तेणें व्याप उदंड केला । बहुत कन्यापुत्र व्याला ।
उदंड लोक संचिला । नाना प्रकारें ॥ ६ ॥
६) त्यानें व्याप फार केला. त्याला खूप मुलगें व मुली अशी संतती झाली. नाना प्रकारचे पुष्कळ लोक त्यानें निर्माण केलें.
त्याचा पुत्र जेष्ठ । तो अज्ञान आणि रागिट ।
अथवा चुकता नीट । संव्हार करी ॥ ७ ॥
७) त्याचा मोठा मुलगा रुद्र. तो फार रागीट व अज्ञानी होता. कोणाचें कांहीं चुकलें कीं, संहार करणें हेच त्याचे काम होते.
पिता उगाच बैसला । लेकें बहुत व्याप केला ।
सर्वज्ञ जाणता भला । जेष्ठ पुत्र ॥ ८ ॥
८) मूळपुरुष पिता स्वस्थ बसला होता. त्याच्या मुलानें म्हणजें विष्णुनें पुष्कळ व्याप केला. पण तो सर्वज्ञ, जाणता, चांगला व सर्वांत वडिल होता.
नातु त्याचें अर्ध जाणे । पणतु तो कांहींच नेणें ।
चुकतां संव्हारणें । माहा क्रोधी ॥ ९ ॥
९) नातु, ब्रह्मदेव अर्धा जाणता होता. आणि पणतु रुद्र तर कांहींच जाणता नव्हता. तो भयंकर रागीट असल्यानें जरा चूक झाली कीं, संहार करण्यास तयार होता.
लेक सकळांचें पाळण करी । नातु मेळवी वरिचावरी ।
पणतु चुकल्यां संव्हार करी । अकस्मात ॥ १० ॥
१०) मुलगा सगळ्यांचे पालन-पोषण करतो. नातु परस्पर मिळवून खातो, तर पणतु चुकलेल्यांचा तत्काळ संहार करतो.
नेमस्तपणें वंश वाढला । विस्तार उदंडचि जाला ।
ऐसा बहुत काळ गेला । आनंदरुप ॥ ११ ॥
११) आपल्या या कुटुंबाचा वंश नियमितपणें वाढत गेला. आणि खूप पसारा वाढला. पसारा वाढला तरी प्रथम बराच काळ मोठ्या आनंदांत गेला.
विस्तार वाढला गणवेना । वडिलांस कोणीच मानीना ।
परस्परें किंत मना । बहुत पडिला ॥ १२ ॥
१२) पण विस्तार जेव्हां अमर्याद वाढला. तेव्हां मात्र काळ बदलला. वडिलांचें कोणी ऐकेना. त्यांना कोणी मान देईना. देवाला लोक विसरले. संशयानें आपापसांत कलह लागलें.
उदंड घरकळ्हो लागला । तेणें कित्येक संव्हार जाला ।
विपट पडिलें थोरथोरांला । बेबंद जालें ॥ १३ ॥
१३) फार मोठ्या प्रमाणांत गृहकलह निर्माण झाला. कुटुंबसंस्था विघटीत होऊं लागली. त्यामुळें पुष्कळ लोक मारलें गेलें. मोठ्यांचें एकमेकांशी पटेना. त्यामुळें बेबंदशाही माजली.
नेणपणें भरीं भरले । मग ते अवघेच संव्हारले ।
जैसे यादव निमाले । उन्मत्तपणें ॥ १४ ॥
१४) आपल्या वागण्याचा परिणाम फार वाईट होईल हें अज्ञानानें न कळल्यानें सारेजण भलत्या भरीस पडले व उन्मत्तपणानें यादव जसें समूल नाश पावलें तसाच यांचाही संहार झाला.
बाप लेक नातु पणतु । सकळांचा जाला निपातु ।
कन्या पुत्र हेतु मातु । अणुमात्र नाहीं ॥ १५ ॥
१५) बाप, मुलगा, नातु, पणतु या सगळ्यांचा निःपात झाला. त्यामुळें त्यांच्या मुलीं, त्यांचे मुलगे, त्या मुलाबाळांचे हेतु व त्यांच्या जीवनकथा , यापैकीं कांहींही शिल्लक उरलें नाहीं.
ऐसी काहाणी जो विवरला । तो जन्मापासून सुटला ।
श्रोता वक्ता धन्य जाला । प्रचितीनें ॥ १६ ॥
१६) ही कहाणी मी सांगितली. तिचें मनन करणारा जन्ममरणाच्या चक्रांतून मुक्त होतो. श्रोता व वक्ता स्वानुभवानें धन्य होतात.
ऐसी काहाणी अपूर्व जे ते । उदंड वेळ होत जाते ।
इतुकें बोलोन गोसावी ते । निवांत जाले ॥ १७ ॥
१७) ही कहाणी मोठी अपूर्व आहे. ती सारखी घडत राहातें. इतकें सांगून स्वामींनी आपलें बोलणें थांबवले.
आमची काहाणी सरो । तुमचे अंतरीं भरो ।
ऐसें बोलणें विवरो । कोणीतरी ॥ १८ ॥
१८) आमची कहाणी सरो. ती तुमच्या अंतःकरणांत भरो. या कहाणीवर कोणीतरी मनन करो.
चुकत वांकत आठवलें । इतुकें संकळित बोलिलें ।
न्यूनपूर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ १९ ॥
१९) चुकतमाकत जेवढें आठवलें तेवढें एकत्र करुन सांगितलें. त्यांत जें कमीजास्त झालें असेल त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी.
ऐसी काहाणी निरंतर । विवेकें ऐकती जे नर ।
दास म्हणे जग्गोधार । तेचि करिती ॥ २० ॥
२०) अशी ही कहाणी जे निरंतर विवेकानें ऐकतात तेच जगाचा उद्धार करतात. असें श्रीरामदास म्हणतात.
त्या जगोद्धारचें लक्षण । केलें पाहिजे विवरण ।
सार निवडावें निरुपण । याास बोलिजे ॥ २१ ॥
२१) जगाचा उद्धार म्हणजें काय याचें विवेचन करणें जरुर आहे. सारअसारांच्या मिश्रणांतून सार निवडून बाजूस काढणें याचे नांव निरुपण होय.
निरुपणीं प्रत्ययें विवरावें । नाना तत्वकोडें उकलावें ।
समजतां समजतां व्हावें । निःसंदेह ॥ २२ ॥
२२) माणसानें निरुपण ऐकावें. आपण जें ऐकलें तें प्रत्यक्ष अनुभव घेऊन समजून घ्यावें. विश्र्वरचनेंत आढळणार्या अनेक तत्वांची गुंतागुंत उकलावी. आणि कहाणी समजतां समजतां संपूर्ण संदेहरहित होऊन जावें.
विवरोन पाहातां अष्ट देह । पुढें सहजचि निःसंदेह ।
अखंड निरुपणें राहे । समाधान ॥ २३ ॥
२३) पिंड व ब्रह्मांड मिळून असणारें हें आठ देह आहेत. त्यांचें विवरण केलें असतां माणसाला आपोआपच निःसंदेहता प्राप्त होते. साररुप ब्रह्म हातीं लागल्यानें मग अखंड समाधान मिळतें.
तत्वांचा गल्बला जेथें । निवांत कैंचें असेल तेथें ।
याकारणें गुल्लिपरतें । कोणीयेकें असावें ॥ २४ ॥
२४) ज्या ठिकाणीं तत्वांची गडबड आहे त्या ठिकाणीं निवांतपणा असणें शक्य नाहीं. म्हणून ज्याला समाधान हवें त्यानें या गोंधळाच्या अलीकडेच राहणें अवश्य आहे.
ऐसा सूक्ष्म संवाद । केलाचि करावा विशद ।
पुढिले समासीं लघुबोध । सावध ऐका ॥ २५ ॥
२५) असें जें सूक्ष्म विवेचन आहे तें पुनः स्पष्ट करुन समजून घ्यावें. पुढील समासांत लघुबोध सांगणार आहे. तो लक्ष देऊन ऐकावा.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कहाणीनिरुपणनाम समास पांचवा ॥
Samas Pachava Kahani Nirupan
समास पांचवा कहाणी निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment