Dashak Terava Samas Satava Pratyaya Vivaran
Samas Satava Pratyaya Vivaran, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Pratyaya means experience. Parmarth is based on ones’ experience. Sadhak when acquires knowledge, all his doubts are cleared.
समास सातवा प्रत्यय विवरण
श्रीराम ॥
निर्मळ निश्र्चळ निराभास । तयास दृष्टांत आकाश ।
आकाश म्हणिजे अवकाश । पसरला पैस ॥ १ ॥
१) परमात्मवस्तु निर्मळ, निश्र्चळ व निराभास आहे. तिला फक्त आकाशाची उपमा देता येते. पसरलेला अवकाश म्हणजे आकाश होय.
आधीं पैस मग पदार्थ । प्रत्यये पाहातां यथार्थ ।
प्रत्ययेंविण पाहाता वेर्थ । सकळ कांहीं ॥ २ ॥
२) आधी मोकळीं किंवा रिकामी जागा मग त्यांत पदार्थ उत्पन्न होऊन भरले जातात. असा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो. ज्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाहीं, ते सर्व व्यर्थच होय.
ब्रह्म म्हणिजे तें निश्र्चळ । आत्मा म्हणिजे तो चंचळ ।
तयास दृष्टांत केवळ । वायो जाणावा ॥ ३ ॥
३) ब्रह्म निश्र्चळ असते. अंतरात्मा चंचळ असतो. तो समजण्यासाठीं म्हणून त्यास केवळ वायुची उपमा देता येते.
घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा । घटबिंब दृष्टांत आत्म्याचा ।
विवरतां अर्थ दोहींचा । भिन्न आहे ॥ ४ ॥
४) घटाकाश ही उपमा ब्रह्माला देतात तर घटांतील पाण्यांत पडणार्या प्रतिबिंबाला अंतरात्मा म्हणतात. यावर विचार केल्यावर दोन्हीचा अर्थ वेगळा आहे हे समजते.
भूत म्हणिजे जितुकें जालें । जालें तितुकें निमालें ।
चंचळ आलें आणी गेलें । ऐसें जाणावें ॥ ५ ॥
५) जें जें झाले किंवा निर्माण झाले ते सारे भूत होय. जें उत्पन्न होते तें नाश पावते. यावरुन जें जें येते आणि जातें तें सारें चंचळ होय असें जाणावे.
अविद्या जड आत्मा चंचळ । जड कर्पूर आत्मा अनळ ।
दोनी जळोन तत्काळ । विझोन जाती ॥ ६ ॥
६) अविद्या जड तर अंतरात्मा चंचळ आहे. अविद्या जणूंकांहीं कापूर तर चंचळ आत्मा जणूं अग्नि आहे. दोन्ही जळून विझून जातात. म्हणून अविद्या नाहींशी झाली किं अंतरात्मा नाहींसा होऊन निश्र्चळ ब्रह्म तेवढें उरते.
ब्रह्म आकाश निश्र्चळ जाती । आत्मा वायो चंचळ जाती ।
परीक्षवंत परीक्षिती । खरें किं खोटें ॥ ७ ॥
७) ब्रह्म व आकाश हे निश्र्चळ आहेत. तर अंतरात्मा व वायु हें चंचळ आहेत. हें खरें कां खोटे याची परीक्षा केवळ परीक्षवंतच करतात.
जड अनेक आत्मा येक । ऐसा आत्मानात्माविवेक ।
जगा वर्तविता जगन्नायेक । तयास म्हणावें ॥ ८ ॥
८) जड किंवा स्थूल पदार्थ अनेक आहेत. तर सूक्ष्म आत्मा एकच आहे. ही धारणा होणें याला आत्मानात्मविवेक म्हणतात. त्या आत्म्यालाच जगाला चालवणारा जगन्नायक म्हणतात.
जड अनात्मा चेतवी आत्मा । सर्वीं वर्ते सर्वात्मा ।
अवघा मिळोन चंचळात्मा । निश्र्चळ नव्हे ॥ ९ ॥
९) जड सारें अनात्म समजावें. त्याला अंतरात्मा चेतना देतो. सर्व जडामध्यें राहून त्यास चेतना देतो म्हणून त्यास सर्वात्मा म्हणतात. पण हा सर्व मिळून चंचलात्माच होय. निश्र्चळात्मा नव्हें, निश्र्चळ ब्रह्म नव्हें.
निश्र्चळ तें परब्रह्म । जेथें नाहीं दृश्यभ्रम ।
विमळ ब्रह्म तें निभ्रम । जैसें तैसें ॥ १० ॥
१०) ज्याच्या ठिकाणीं थोडाही दृश्याचा भ्रम नाहीं, तें निश्र्चळ परब्रह्म समजावें. विमल ब्रह्म अत्यंत भ्रमरहित असतें. तें अगदीं जसेंच्या तसेंच राहातें.
आधीं आत्मानात्माविवेक थोर । मग सारासारविचार ।
सारासाविचारें संव्हार । प्रकृतीचा ॥ ११ ॥
११) प्रथम मोठा आत्मानात्मविचार करावा. यानंतर मग सारासार विचार करावा. सारासार विचारानें प्रकृतीचा संव्हार होतो.
विचारें प्रकृति संव्हारे । दृश्य अस्तांच वोसरे ।
अंतरात्मा निर्गुणी संचरे । अध्यात्मश्रवणें ॥ १२ ॥
१२) सारासार विचारानें प्रकृतीचा निरास झाला म्हणजे विवेकप्रलय साधतो. मग दृश्य विश्र्व असूनही नसल्यासारखें होते. अध्यात्म श्रवणानें अंतरात्मा निर्गुण ब्रह्मस्वरुपामध्यें अंतर्धान होतो.
चढता अर्थ लागला । तरी अंतरात्मा चढतचि गेला ।
उतरल्या अर्थें उतरला । भूमंडळीं ॥ १३ ॥
१३) सूक्ष्माकडे नेणारा ( वर चढणारा ) अर्थ आंत उदय पावला तर अंतरात्मा सूक्ष्माकडे जातो, स्वतः सूक्ष्म बनतो. सूक्ष्माकडे न जातां स्थूलाकडे ओढणारा अर्थ आंत प्रगट झाला तर अंतरात्मा स्थूलाकडे खालीं येतो, स्वतः अधिकाधिक स्थूल बनतो. मग तो जगांतील स्थूल वस्तूंना चिकटतो.
अर्थासारिखा आत्मा होतो । जिकडे नेला तिकडे जातो ।
अनुमानें संदेहीं पडतो । कांहींयेक ॥ १४ ॥
१४) अंतरात्म्याचा असा गुण आहे कीं, तो अर्थासारखें रुप घेतो. अर्थ जिकडे नेईल तिकडे तो जातो. कल्पना करीत गेले तर कोणत्या तरी संशयानें घेरला जातो.
निसंदेह अर्थ चालिला । तरी आत्मा निसंदेहचि जाला ।
अनुमानेअर्थें जाला । अनुमानरुपी ॥ १५ ॥
१५) आंतमधील अर्थ अगदी संशयरहित असेल तर अंतरात्मा देखील अत्यंत निःसंशय बनतो. अर्थ अनिश्र्चित असेल तर अंतरात्मा पण तसाच अनिश्र्चित स्वरुपाचा बनतो.
नवरसिक अर्थ चाले । श्रोते तद्रूपचि जाले ।
चाटपणें होऊन गेले । चाटचि अवघे ॥ १६ ॥
१६) शृगांर, करुण, भयानक वगैरे नवरसांचे वर्णन चालूं असेल तर श्रोत्यांचा आत्मा त्या त्या रसांशी तद्रूप होतो. चावटपणा चालू असेल तर तो चावटपणाशी तद्रूप होतो.
जैसा जैसा घडे संग । तैसे गुह्यराचे रंग ।
याकारणें उत्तम मार्ग । पाहोन धरावा ॥ १७ ॥
१७) सरड्याचा गुण असा कीं, ज्या रंगाशीं त्याची संगति होते तो रंग त्याच्यावर चढतो. माणसाच्या अंतरात्म्याचे असेंच आहे. म्हणून माणसानें उत्तम मार्ग शोधावा. व त्या मार्गानें जावें.
उत्तम अन्नें बोलत गेले । तरी मन अन्नाकारचि जालें ।
लावण्य वनितेचें वर्णिलें । तरी मन तेथेंचि बैसे ॥ १८ ॥
१८) उत्तम अन्नाविषयीं बोलणें निघालें तर मन त्या अन्नाशीं तद्रूप बनते. एखाद्या स्त्रीचें सौंदर्य वर्णन केलें तर मन त्याच्याशी तदाकार होतें.
पदार्थवर्णन अवघें । किती म्हणोन सांगावें ।
परंतु अंतरीं समजावें । होये किं नव्हे ॥ १९ ॥
१९) अशा रीतीनें ज्या पदार्थाचें वर्णन करावें त्या पदार्थाशीं मन एकाकार होऊन जातें. अशीं कितीतरी उदाहरणें देतां येतील. वर्ण्य वस्तूशीं मन तदाकार होतें का नाहीं हें ज्यानें त्यानें आपल्या अंतरींच्या अनुभवावरुन ओळखावें.
जें जें देखिलें आणी ऐकिलें । तें अंतरीं सदृढ बैसलें ।
हित अन्हित परीक्षिलें । परीक्षवंतीं ॥ २० ॥
२०) माणूस डोळ्यांनीं जें जें पाहातो आणि कानांनी जें जें ऐकतो तें त्याच्या अंतर्यामी घट्टपणें जाऊन बसते. त्यापैकी आपल्या हिताचे व अनहिताचे कोणते याची परीक्षा परिक्षवंत करतात.
याकारणें सर्व सांडावें । येक देवास धुंडावें ।
तरीच वर्म पडे ठावें । कांहींयेक ॥ २१ ॥
२१) म्हणून इतर सर्व कांहीं सोडून द्यावें व एका देवाचाच शोध घ्यावा. असें केलें तरच जीवनाचें रहस्य कांहीं प्रमाणांत उलगडेल.
नाना सुखें देवें केलीं । लोकें तयास चुकलीं ।
ऐसीं चुकतां च गेलीं । जन्मवरी ॥ २२ ॥
२२) देवानें अनेक प्रकारची उत्तम सुखें निर्माण केली आहेत. पण अज्ञानामुळें ती लोकांना मिळत नाहीत. मार्ग चुकल्यानें जन्मभर तीं सुखें त्यांना मिळत नाहीत. सर्व सांडून शोधा मजला । ऐसें देवचि बोलिला ।
लोकीं शब्द अमान्य केला । भगवंताचा ॥ २३ ॥
२३) " इतर सारें सोडून माझा शोध करा. " असें भगवंतच बोलून गेला आहे. पण लोक भगवंताच्या शब्दाला मानीत नाहीत.
म्हणोन नाना दुःखें भोगिती । सर्वकाळ कष्टी होती ।
मनीं सुखचि इच्छिती । परी तें कैचें ॥ २४ ॥
२४) याचा परिणाम असा होतो कीं, लोकांना नाना प्रकारची दुःखें भोगावी लागतात. त्यांना सर्व काळ कष्टांत काढावा लागतो. मनांत सुख मिळावें अशी इच्छा असतें पण तें मिळत नाहीं.
उदंड सुख जया लागलें । वेडें तयास चुकलें ।
सुख सुख म्हणताच मेलें । दुःख भोगितां ॥ २५ ॥
२५) वास्तविक माणसापाशी फार मोठा सुखाचा वाटा आहे. पण आपल्या अज्ञानानें त्या सुखास तो मुकतो. मला सुख हवें असा त्यास ध्यास असतो. पण जन्मभर तो दुःख भोगीतच मरुन जातो.
शाहाण्यानें ऐसें न करावें । सुख होये तेंचि करावें ।
देवासि धुंडित जावें । ब्रह्मांडापरतें ॥ २६ ॥
२६) तरी शहाण्या माणसानें असें करु नये. या जन्मांत भगवंताचें सुख आपल्याला मिळेल असें त्यानें वागावें. देवाचा शोध करण्यामध्यें ब्रह्मांड पालथे घालावें. ब्रह्मांडाच्या पलीकडे जावे.
मुख्य देवचि ठाईं पडिला । मग काये उणे तयाला ।
लोक वेडे विवेकाला । सांडून जाती ॥ २७ ॥
२७) मुख्य देव हस्तगत झाल्यानंतर मग कशाला कांहीं कमी पडत नाहीं. लोक वेडेपणा करतात.विवेकाला सोडून अविवेकानें वागतात.
विवेकाचें फळ तें सुख । अविवेकाचें फळ तें दुःख ।
यांत मानेल तें अवश्यक । केलें पाहिजे ॥ २८ ॥
२८) विवेकानें वागण्याचें फळ सुख तर अविवेकानें वागण्याचें फळ दुःख होय. यापैकीं मनाला जें पटेल तें माणसानें करावें. अगदी अवश्य करावें.
कर्तयासी वोळखावें । यास विवेक म्हणावें ।
विवेक सांडितां व्हावें । परम दुःखी ॥ २९ ॥
२९) खरा जो कर्ता आहे त्याला ओळखावें याचें नांव विवेक होय. ज्यानें हा विवेक सोडला तो अतिशय दुःखी होतो.
आतां असो हें बोलणें । कर्त्यास वोळखणें ।
आपलें हित विचक्षणें । चुकों नये ॥ ३० ॥
३०) आतां हें बोलणें पुरें झालें. खर्या कर्त्यास ओळखणें यामध्यें आपलें हित किंवा कल्यााण आहे. शाहाण्या माणसानें तें हित साधण्यास चुकूं नये.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रत्ययेविवरणनाम समास सातवा ॥
Samas Satava Pratyaya Vivaran
समास सातवा प्रत्यय विवरण
Custom Search
No comments:
Post a Comment