ShriShivaLilamrut Adhyay 3
ShriShivLilaMrut Adhyay 3 is in Marathi. It is from Skandha Purana, Brahmottar Khanda which is in Sanskrit. This Adhayay starts with a story of King Mitrasaha. He was cursed by Vasistha Rushi. According to the curse the king became Demon for twelve years. In the life of demon he killed a brahmin and again cursed by the Brahmin's wife. So after 12 years becoming as a king again the sin of Brahma hatya was unbearable and was very hard to remove. However as advised by Goutam Muni he become free from all his sin including sin of Brahma hatya,by surrendering to the God Shiva at Kshetra Gokaran Mahabaleshwar. In this Adhyaya the importance of Gokaran Mahabaleshwar is described.
ShriShivaLilamrut Adhyay 3
श्रीशिवलीलामृत अध्याय तिसरा
श्रीशिवलीलामृत अध्याय तिसरा
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय शिवमंगलधामा । निजजनहृदयआरामा ।
चराचरफलांकितद्रुमा । नामाअनामातीत तूं ॥ १ ॥
इंदिरावरभगिनीमनरंजना । षडास्यजनका शफरीध्वजदहना ।
ब्रह्मानंदा भाललोचना । भवभंजना त्रिपुरांतका ॥ २ ॥
हे शिव सद्योजात वामघोरा । तत्पुरुषा ईशान ईश्र्वरा ।
अर्धनारीनटेश्र्वरा । गिरिजारंगा गिरीशा ॥ ३ ॥
गंगाधरा भोगिभूषणा । सर्वव्यापका अंधकमर्दना ।
परमातीता निरंजना । गुणत्रयविरहित तूं ॥ ४ ॥
हे पयःफेनधवल जगज्जीवन । द्वितीयाध्यायीं कृपा करुन ।
अगाध सुरस आख्यान । शिवरात्रिमहिमा वर्णविला ॥ ५ ॥
यावरी कैसी कथेची रचना । वदवीं पंचमुकुट पंचानना ।
शौनकादिकां मुनिजनां । सूत सांगे नैमिषारण्यीं ॥ ६ ॥
इक्ष्वाकुवंशीं महाराज । मित्रसहनामें भूभुज ।
वेदशास्त्रसंपन्न सतेज । दुसरा बिडौजा पृथ्वीवरी ॥ ७ ॥
पृतनावसनेंकरुन । घातलें उर्वीसी पालाण ।
प्रतापसूर्य उगवला पूर्ण । शत्रुभगणें मावळलीं ॥ ८ ॥
तो एकदा मृगयाव्याजेंकरुन । निघाला धुरंधर चमू घेईन ।
घोरांदर प्रवेशला विपिन । तों सावजें चहूंकडून उठलीं ॥ ९ ॥
व्याघ्र वृक रीस वनकेसरी । मृग मृगी वनगौ वानर वानरी ।
शशकजंबुकांच्या हारी । संहारीत नृपवर ॥ १० ॥
चातक मयुर बदक । कस्तूरीकुरंग जवादिबिडालक ।
नकुल राजहंस चक्रवाक । पक्षी श्र्वापदें धांवती ॥ ११ ॥
नृपें मारिले जीव बहुवस । त्यांत एक मारिला राक्षस ।
महाभयानक तामस । गतप्राण होईनि पडियेला ॥ १२ ॥
त्याचा बंधु परम दारुण । तो लक्षिता झाला दुरोन ।
मनीं कापट्य कल्पून । म्हणे सूड घेईन बंधूचा ॥ १३ ॥
मित्रसह पातला स्वनगरास । असुरें धरिला मानववेष ।
कृष्णवसनवेष्टित विशेष । दर्वी स्कंधीं घेऊनियां ॥ १४ ॥
नृपासी भेटला येऊन । म्हणे मी सूपशास्त्रीं परम निपुण ।
अन्न शाका सुवास करीन । देखोन सुरनर भूलती ॥ १५ ॥
रायें ठेविला पाकसदनीं । त्यावरी पितृतिथी लक्षुनी ।
गुरु वसिष्ठ घरालागुनी । नृपश्रेष्ठें आणिला ॥ १६ ॥
भोजना आला अब्जनंदन । तो राक्षसें कापट्य स्मरुन ।
शाकांत नरमांस शिजवून । ऋषीस आणून वाढिलें ॥ १७ ॥
त्रिकालज्ञानी वसिष्ठमुनी । सकळ ऋषींमाजी शिरोमणी ।
कापट्य सकळ जाणुनी । मित्रसह शापिला ॥ १८ ॥
म्हणे तूं वनीं होई राक्षस । जेथें आहार न मिळे निःशेष ।
मी ब्राह्मण मज नरमांस । वाढिलें कैसें पापिया ॥ १९ ॥
राव म्हणे मी नेणें सर्वथा । बोलावा सूपशास्त्रीं जाणता ।
तंव तो पळाला क्षण न लगतां । गुप्तरुपें वना आपुल्या ॥ २० ॥
राव कोपला दारुण । म्हणे मज शापिलें काय कारण ।
मीही तुज शापीन म्हणोन । उदक करीं घेतलें ॥ २१ ॥
तंव रायाची पट्टराणी । मदयंती नामें पुण्यखाणी ।
रुपें केवळ लावण्यहरिणी । चातुर्य उपमे जेवीं शारदा ॥ २२ ॥
मदयंती म्हणे राया । दूरदृष्टीं पाहे विचारुनियां ।
शिष्यें गुरुसी शापावया । अधिकार नाहीं सर्वथा ॥ २३ ॥
गुरुसी शाप देतां निर्धारीं । आपण नरक भोगावे कल्पवरी ।
राव म्हणे चतुर सुंदरी । बोललीस साच तें ॥ २४ ॥
म्हणें हें उदक खालीं टाकूं जरी । तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री ।
मग आपल्याची प्रपदांवरी । जल टाकी मित्रसह ॥ २५ ॥
तो जानुपर्यंत चरण । दग्ध झालें कृष्णवर्ण ।
कुष्ठ भरला मग तेथून । कल्माषपाद नाम त्याचें ॥ २६ ॥
वसिष्ठें जाणोनि वृतांत । रायासी उःशाप देत ।
म्हणे द्वादशवर्षी होसील मुक्त । येसी स्वस्थाना आपुल्या ॥ २७ ॥
गुरु पावला अंतर्धान । मग कल्माषपाद राक्षस होऊन ।
क्षुधाक्रांत निशिदिनी । वनीं भक्षी जीव सर्व ॥ २८ ॥
परम भयानक असुर । विशाळ देह कपाळीं शेंदुर ।
विक्राळ वदन बाहेर शुभ्र । दंतदाढा वाढलिया ॥ २९ ॥
जीव भक्षिले आसमास । वनीं हिंडतां तो राक्षस ।
एक ब्राह्मणकुमर डोळस । द्वादश वर्षी देखिला ॥ ३० ॥
सवें त्याची ललना चिमणी । दोघें क्रीडती कौतुकें वनीं ।
तंव तो ब्राह्मणपुत्र राक्षसें धरुनी । भक्षावया सिद्ध झाला ॥ ३१ ॥
तंव त्याची वधू काकुळती येत । अरे तूं मित्रसह राजा पुण्यवंत ।
गोब्राह्मणप्रतिपाळक सत्य । माझा कांत मारुं नको ॥ ३२ ॥
गडबडां लोळे सुंदरी । करुणाभाकी पदर पसरी ।
सवेंचि जाऊनि चरण धरी । सोडी झडकरी पति माझा ॥ ३३ ॥
पतीस भक्षूं नको राजेंद्रा । महत्पाप घेऊं नको एकसरा ।
स्वर्गमार्ग तरी चतुरा । कैसा पावसी अंतकाळीं ॥ ३४ ॥
ऐसी करुणा भाकितां कामिनी । निर्दयें भक्षिला तेच क्षणीं ।
अस्थिपंजर टाकूनी । तियेपुढें दीधला ॥ ३५ ॥
तंव ती दुःखें करुनी । आक्रोश कपाळ पिटी धरणीं ।
मृत्तिका घेऊनि घाली वदनीं । कोण वनीं सांवरी तीतें ॥ ३६ ॥
मग तिनें शाप दीधला रायातें । जो अलोट विधिहरिहरातें ।
म्हणे मदयंती संगसुरतें । प्राण जाईल तेचि क्षणीं ॥ ३७ ॥
कोणे एके स्त्रीचा संगसोहळा । तुज न घडोरे चांडाळा ।
ऐसा शाप वदोनि ते वेळां । केल्या गोळा अस्थि पतीच्या ॥ ३८ ॥
तात्काळ प्रवेशली अग्नी । इकडे द्वादशवर्षीं शापमुक्त होऊनी ।
राव स्वनगरा येऊनी । वर्तमान सांगे स्त्रियेशीं ॥ ३९ ॥
येरी कपाळ पिटी आक्रोशें करुन । म्हणे झालें वंशखंडन ।
पतीसी म्हणे ब्रह्मचर्य धरुन । प्राण आपला रक्षीं कां ॥ ४० ॥
अनिवार अत्यंत मन । न करी कोणें स्त्रियेशी संभाषण ।
खदिरांगाराची शेज आजपासून । झाली तुजलागीं जाण पां ॥ ४१ ॥
परम तळमळी राजेंद्र । जैसा सांपळां कोंडिला व्याघ्र ।
कीं महाभुजंगाचे दंत समग्र । पाडोनि गारुडी दीन करी ॥ ४२ ॥
कीं नासिकीं वेसण । घालून महावृषभ करिती दीन ।
कीं वनीं निरंकुश वारण । धरुनि क्षीण करिती ॥ ४३ ॥
तैसा कल्माषपाद भूप । होऊनि राहिला दीनरुप ।
पुढें प्रकाशावया कुळदीप । आपण धर्मशास्त्र पाहातसे ॥ ४४ ॥
तेथेंचे पाहोनि प्रमाण । वासिष्ठें मदयंतीस भोग देऊन ।
अमोघ वीर्य पडतां पूर्ण । दिव्य पुत्र जाहला ॥ ४५ ॥
तेणें पुढें वंश चालिला । असो तो राव मृगयेस निघाला ।
यथारण्य तथा गृह वाटे नृपाला । भोग त्यजिले सर्वही ॥ ४६ ॥
मनांत मनोजविकार उठत । विवेकांकुशें कामइभ आवरीत ।
म्हणे स्त्रीस वैशव्य मज मृत्य । तें कर्म सहसा न करावें ॥ ४७ ॥
आपुली कर्मगती गहन । प्राक्तन विचित्र दारुण ।
देवावरी काय बोल ठेवून । भोगल्याविण न सुटेचि ॥ ४८ ॥
ऐसा राव उदासयुक्त । वनीं हिंडतां मागें पहात ।
तों पिशाच भयानक अत्यंत । रायापाठीं उभें सदा ॥ ४९ ॥
दंपत्यें पूर्वी मारिलीं । ती ब्रह्महत्या पाठीसी लागली ।
राजा तीर्थें हिंडतां सकळीं । परी कदाकाळीं न सोडी ॥ ५० ॥
न सोडी स्वप्नीं जागृतींत । महाविक्राळ दांत करकरां खात ।
रायें व्रतें केलीं बहुत । दाम देत बहुसाल ॥ ५१ ॥
ऐसा हिंडतां राव भागला । मिथुलानगरासमीप आला ।
वनश्री देखता आनंदला । परी ब्रह्महत्या पाठीसी उभी ॥ ५२ ॥
वृक्ष लागले बहुत । आम्रवृक्ष फळभारें डोलत ।
पोफळी रातांजन विराजित । केळी नारळी खर्जुरिया ॥ ५३ ॥
चंपक जाई जुई मालती । मोगरे पुन्नागराज शेवंती ।
मलयागर कृष्णागर जाती । जपा करवीर कोविदार ॥ ५४ ॥
वड पिंपळ औदुंबर । पारिजातक बकुळ देवदार ।
कपित्थ बिल्व अंजीर । अर्जुन पिचुमंद कदंब ते ॥ ५५ ॥
ऐसिया वनामाजी नृपती । क्षणएक पावला विश्रांती ।
परी ते पाठीसीं पापमती । ब्रह्महत्या उभी असे ॥ ५६ ॥
तों उगवला भाग्यवासरमणी । कीं निधान जोडे रंकालागुनी ।
कीं क्षुधितापुढें उचंबळोनी । क्षीराब्धि जैसा पातला ॥ ५७ ॥
कीं मरतियाच्या मुखांत । अकस्मात घातलें अमृत ।
कीं चिंताग्रस्तासी प्राप्त । चिंतामणी जाहला ॥ ५८ ॥
तैसा तापसियांमाजी मुकुटमणी । शिष्यमांदी सवें घेईनी ।
महाराज तपस्वी गौरममुनी । तये स्थानीं पातला ॥ ५९ ॥
रायें घातलें लोटांगण । दाटला अष्टभावेंकरुन ।
उभा ठाकला कर जोडून । करी स्तवन प्रीतीनें ॥ ६० ॥
सहज होतां संतदर्शन । पापें संहारती संपूर्ण ।
तूं विलोकिसी जरी कृपा करुन । तरी रंक सहस्त्रनयन होय ॥ ६१ ॥
यावरी तो महाराज गौतम । कल्माषपादा पुसे कुशलक्षेम ।
राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम । सुखेंकरुन नांदती कीं ॥ ६२ ॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । स्वधर्म आचरती कीं समग्र ।
पशु सेवक पुत्र कलत्र । समस्त सुखरुप आहेत कीं ॥ ६३ ॥
राव म्हणे आपले कृपेकरुन । समस्त आहेत क्षेमकल्याण ।
परंतु आलासी वाटतें दुरुन । आनंदघन दिसतोसी ॥ ६४ ॥
तुझ्या दर्शनें मज वाटे सत्वर । ब्रह्महत्या दूर होईल समग्र ।
मग पूर्व कर्म आपुलें दुस्तर । ऋषीप्रती निवेदिलें ॥ ६५ ॥
गौतम म्हणे परम पवित्र । भूकैलास गोकर्णक्षेत्र ।
तेथूनि मी आलों अपार । महिमा तेथींचा न वर्णवे ॥ ६६ ॥
ॐकाररुपें कैलासनाथ । भवानीसहित तेथें नांदत ।
सुर असुर किन्नर सेवित । अर्धमात्रापीठ जें ॥ ६७ ॥
त्या गोकर्णीचे शिवदर्शन । ब्रह्मादिकां दुर्लभ जाण ।
तेथें इंदिरेसहित जनार्दन । तप गहन आचरत ॥ ६८ ॥
कोटि सूर्याची प्रभा । मृडानीसहित शिव उभा ।
कैवल्यगर्भींचा पूर्ण गाभा । तेथींची शोभा न वर्णवे ॥ ६९ ॥
इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र । तेथेंचि वस्ती अहोरात्र ।
जेथींचे पाषाण तरुवर । समग्र निर्जर अवतरले ॥ ७० ॥
सत्यवतीहृदयरत्न । जेथें करी अनुष्ठान ।
वसिष्ठ भृगु जामदग्न्य । गोकर्णक्षेत्रीं सदा वसती ॥ ७१ ॥
पहावया मृडानी नायक । मंडपघसणी होतसे देख ।
नारद तुंबरु गायक । जेथें गाती शिवलीला ॥ ७२ ॥
गोकर्णाभोवतें समग्र । उभे अखंड देवांचे भार ।
मुखें गर्जती शिवहरहर । आनंद थोर होतसे ॥ ७३ ॥
ऋषि करिती वेदघोष । अष्टनायिकांचें नृत्य विशेष ।
किन्नरगंधर्व गायक सुरस । तोषविती महेशातें ॥ ७४ ॥
तें अति उत्तम स्थान । तेजोमय प्रकाश गहन ।
नाना वृक्ष लागले सघन । कैलासभुवन प्रत्यक्ष ॥ ७५ ॥
शुभ्र सिंहासन लखलखित । चारी द्वारें मणिमयखचित ।
ऐरावतारुढ अमरनाथ । पूर्वद्वारीं तिष्ठतसे ॥ ७६ ॥
दक्षिणेस रक्षी सूर्यनंदन । पश्र्चिमेसी वारुणीरमण ।
उत्तरेसी वैश्रवण । प्राणमित्र शिवाचा ॥ ७७ ॥
कर्पूरगौर भवानीसहित घवघवीत तेजें विराजीत ।
भूकैलास साक्षात माहेर संतसाधकांचें ॥ ७८ ॥
त्या मूर्तीचें करावें ध्यान । त्याभोवतें महासिद्धीचें पूजन ।
त्याभोंवतें कात्यायनी आवरण । अष्टभैरव पूजिजे ॥ ७९ ॥
द्वादश मित्र एकादश रुद्र । तेथेंचि वसती अहोरात्र ।
अष्टवसु दिक्पाळ समग्र । जोडोनि कर उभे तेथें ॥ ८० ॥
अष्टसिद्धि नवनिधि कर जोडूनी । अखंड आराधिति पिनाकपाणी ।
रायास म्हणे गौतममुनी । मीही वसतों सदा तेथें ॥ ८१ ॥
वरकड क्षेत्रीं लक्ष वरुषें जाण । तप आचरला निर्वाण ।
गोकर्णी एकदिन । होय प्रसन्न सदाशिव ॥ ८२ ॥
अमावास्या संक्रांति सोमवार । प्रदोष पर्वकाळ शिववासर ।
समुद्रस्नान करितां समग्र । फळ होय सकळ तीर्थांचें ॥ ८३ ॥
रावण कुंभकर्ण बिभीषण । यांहीं पूर्वीं केलें तेथें अनुष्ठान ।
तें निर्वाणलिंग दशाननें जाण । कैलासाहूनि आणिलें ॥ ८४ ॥
गणेशें स्थापिलें तें लिंग । ऋषि म्हणती सूतातें कथा सांग ।
ऐकावया लिला सुरंग । श्रवण वाट पाहती ॥ ८५ ॥
यावरी सूत वक्ता निपुण । रावणमातेसी कैकसी अभिधान ।
ती नित्य लिंगपूजनाविण जाण । उदक प्राशन न करीच ॥ ८६ ॥
पंचधान्यांचें पिष्ट करुन । लिंग करी कामना धरुन ।
व्हावें रावणाचें कल्याण । जय संपूर्ण प्राप्त व्हावा ॥ ८७ ॥
शक्रें तिचें लिंग नेऊन । समुद्रीं टाकिलें द्वेषेंकरुन ।
त्यालागीं रात्रंदिन । रावणमाता अन्न न घे ॥ ८८ ॥
रावण म्हणे मातेलागून । मी मुख्य आत्मलिंग आणितों जाऊन ।
कैलासाप्रती द्विपंचवदन । जाता झाला साक्षेपें ॥ ८९ ॥
तप आचरला दारुण । जो चतुःषष्टिकला प्रवीण ।
जेणें वेदांचीं खंडें करुन । सारासार निवडिलें ॥ ९० ॥
चतुर्दशविद्यापारंगत । शिवासी आवडे अत्यंत ।
दशमुखें गायन अद्भुत । केलें त्याणें स्वामीपुढें ॥ ९१ ॥
आपुलें शिर छेदून स्वहस्तें । शिरांच्या तंती करुनि स्वरयुक्त ।
दशमुख गात प्रेमभरित । उमानाथ संतोषे जेणे ॥ ९२ ॥
राग उपराग भार्यासहित । मूर्च्छना शरीर कंपित ।
सप्तस्वर ताल संगीत । शास्त्रप्रमाण गातसे ॥ ९३ ॥
गद्यपद्यरचना नाना कळा । गीत प्रबंध अखंड नाममाळा ।
गातां प्रीतीनें शिवलिला । शंभु तोषला अद्भुत ॥ ९४ ॥
म्हणे प्रसन्न झालों दशमुखा । इच्छित माग तुज प्रिय जें कां ।
दशकद्वयनयन म्हणे कामांतका ।आत्मलिंग मज देईं ॥ ९५ ॥
या त्रिभुवनांत जे सुंदर । ऐसी ललना देईं सुकुमार ।
ऐकून संतोषला कर्पूरगौर । भोळा उदार चक्रवर्ती ॥ ९६ ॥
कोटि चंद्रसूर्यांची प्रभा पूर्ण । ऐसें लिंग काढिलें हृदयांतून ।
कीं ब्रह्मानंदरस मुरोन । दिव्य लिंग ओतिलें ॥ ९७ ॥
सहस्त्र बालसूर्य न पवती सरी । ऐसी प्रभा पडली दशदिशांतरीं ।
दिधलें रावणाचें करी । जे अतर्क्य ब्रह्मादिकां ॥ ९८ ॥
जें मुनिजनांचें ध्येय ध्यान । जें सनकादिकांचें देवतार्चन ।
वेद शास्त्र पुराण । दिव्यलिंग वर्णिती ॥ ९९ ॥
जें त्रिगुणातीत परब्रह्म । जें अज अजित अनाम ।
सच्चिदानंद निर्वाणधाम । योगी आराम पावती जेथें ॥ १०० ॥
अनंत ब्रह्मांडें विचित्रें । जेणें रचिलीं इच्छामात्रें ।
ज्याकारणें भांडती वेदशास्त्रें । तें दिव्य लिंग पुरातन ॥ १०१ ॥
तें लिंग रावणें हातीं घेऊन । म्हणे हे त्रिलोचन त्रिदोषशमन ।
लावण्यसागरींचें निधान । त्रिभुवनसुंदर ललना दे ॥ १०२ ॥
जी अपर्णेची अपरप्रतिमा । ऐसी देईं मज सर्वोत्तमा ।
सच्चिदानंद पूर्णब्रह्मा । नामाअनामातीता तूं ॥ १०३ ॥
शिव म्हणे इची प्रतिमा विशेष । निर्मू न शके विधीश ।
भोळा चक्रवर्ती महेश । म्हणे हेचि नेईं अपर्णा तूं ॥ १०४ ॥
रावणें अवश्य म्हणोनी । स्कंधीं घेतली स्कंदजननी ।
दिव्यलिंग हातीं घेऊनी । लंकानाथ चालिला ॥ १०५ ॥
दक्षिंपंथे जातां सत्वर । गजबजिले सकळ सुरवर ।
गजानन स्कंद वीरभद्र । नंदिकेश्र्वर तळमळली ॥ १०६ ॥
म्हणती हे सदाशिवा त्रिनयना । हें कैसें तुझें उदारपण ।
भवानी बैसलासी देऊन । पंचवदन हांसतसे ॥ १०७ ॥
म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ । तो धांवेल आतां स्नेहभरित ।
इकडे भवानी स्तवन करीत । हे पद्मजतात धांव वेगीं ॥ १०८ ॥
वारिजनयना इंदिरावरा । निगमागमवंद्या सुहास्यवक्रा ।
हे नीलपयोधरगात्रा । धांव वेगीं सोडवीं मज ॥ १०९ ॥
हे मधुकैटभनरकमुरभंजना । हे दशावतारधरा पीतवसना ।
हे मदनांतकमानसरंजना । जनार्दना जगद्धुरु ॥ ११० ॥
हे कोटिमनोजतात श्रीधर । असुरमर्दन परम उदार ।
ऐसें स्तवन ऐकतां सर्वेश्र्वर । विप्ररुपें आडवा आला ॥ १११ ॥
म्हणे धन्य धन्य दद्विपंचवदना । कोठें मिळविली ऐसी ललना ।
दशमुख म्हणे हे अपर्णा । सदाशिवें दीधली ॥ ११२ ॥
विप्र म्हणे खालीं उतरुन । न्याहाळूनि पाहें इचें वदन ।
रावण पाहे तंव ते कुलक्षण । अत्यंत कुरुप देखिली ॥ ११३ ॥
भंवयांस आंठी अमंगळ पूर्ण । वृद्ध गाल बैसले दंतहीन ।
गदगदां विप्र हांसे देखून । टाकोनि रावण चालिला ॥ ११४ ॥
मग रमाधवें तये स्थळीं । स्थापिली माता भद्रकाळी ।
इकडे असुर शिवाजवळी । म्हणे स्त्री अमंगळ कैसी दीधली ॥ ११५ ॥
शिव म्हणे सत्य वचन । ते तुज नाटोपे कौटाळीण ।
अनंत ब्रह्मांडे दावून । सवेंचि लपवील तत्वतां ॥ ११६ ॥
मग श्रीधरें आंगींची मळी काढून । स्वहस्तें निर्मिली रुपसुंदर ।
मयासुराचे उदरी जाण । उत्पन्न झाली तेचि पै ॥ ११७ ॥
तिच्या स्वरुपाची प्रती । नाहीं नाहीं त्रिजगतीं ।
अंगींच्या सुवासें धांवती । काद्वेयचक्रें प्रीतीनें ॥ ११८ ॥
तिचें नाम मंदोदरी । तिची प्रतीमा नाहीं उर्वीवरी ।
विंशतिनेत्राचें चत्वरीं । पट्टमहिषी पतिव्रता ॥ ११९ ॥
मयासुर करील कन्यादान । वरी एक शक्ति देईल आंदण ।
सप्तकोटी मंत्रांचे गहन । सामर्थ्य असे जियेमाजी ॥ १२० ॥
ते निर्वाण सांगातीण शक्ती । तुज प्राप्त होईल लंकापती ।
महाशत्रूवरी नीर्वाणीं ती । प्रेरावी त्वां सत्य पैं ॥ १२१ ॥
ऐसें ऐकतांची रावण । परतला लिंग घेऊन ।
पूर्वस्थळासी आला जाण । तों गजानन गाई राखी ॥ १२२ ॥
गजाननाचें स्तवन । देव करिती कर जोडून ।
म्हणती दिव्यलिंग सोडवून । स्थापी अक्षयीं गणपती ॥ १२३ ॥
ऐसा देवीं प्रार्थिला एकदंत । तंव रावणासी मूत्र लागलें बहुत ।
पुढें पाऊल न घालवत । चरफडी मूत्रभरें ॥ १२४ ॥
भूमीवरी लिंग न ठेवावें । ऐसें पूर्वीं सांगीतलें उमाधवें ।
हातीं घेऊनि लघुशंकेसी बैसावें । हेंही कर्म अनुचित ॥ १२५ ॥
तंव तो सिद्धिबुद्धींचा दाता । विप्रवेषें गाई राखितां ।
त्यासी लंकानाथ म्हणे तत्वतां । लिंग हातीं धरीं हे ॥ १२६ ॥
विप्र म्हणे लंकापती । माझ्या गाई रानोरानीं पळती ।
तुझ्या मूत्रशंकेसी वेळ किती । लागेल हें न कळे मज ॥ १२७ ॥
रावण म्हणे न लगतां क्षण । येतों मूत्रशंका करुन ।
विप्र म्हणे तीन वेळां बाहीन । न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी ॥ १२८ ॥
अवश्य म्हणे लंकापती । लिंग देत विप्राच्या हातीं ।
दूर जाऊनि एकांतक्षितीं । लघुशंकेस बैसला ॥ १२९ ॥
अगाध गजमुखाचें चरित्र । जो साक्षात अवतरला इंदिरावर ।
शिवउपासना करावया पवित्र । जाहला पुत्र शंभूचा ॥ १३० ॥
असो रावणासी मूत्राचे पूर । लोटले न सांवरती अनिवार ।
एक घटिका लोटतां इभंवक्र । हांक फोडी गर्जोनी ॥ १३१ ॥
माझ्या गाई गेल्या दूरी । आपलें लिंग घेईं करीं ।
रावण न बोलेचि निर्धारीं । हस्तसंकेतें थांबा म्हणे ॥ १३२ ॥
दुसरी घटिका झाली पूर्ण । हांक फोडी गजानन ।
एवं घटिका झाल्या तीन । कदापि रावण न उठेचि ॥ १३३ ॥
जैसें पाखंडियाचें कुमत । न सरेचि वारितां पंडित ।
तैसें रावणाचें मूत्र न सरे सत्य । पुनः एकदंत हांक फोडी ॥ १३४ ॥
राक्षसा आपुले लिंग सांभाळीं । म्हणोनि ठेविलें भूमंडळीं ।
अक्षय स्थापिलें कदाकाळीं । ब्रह्मादिकां उपटेना ॥ १३५ ॥
पृथ्वीसहित अभंग । एकचि झालें दिव्य लिंग ।
रावण धांवें सवेग । अशौच अपवित्र क्रोधभरें ॥ १३६ ॥
लिंग उपटितां डळमळी कुंभिनी । महाबळें दशमुख पाहे उपटोनी ।
परी न उपटे तयालागुनी । अखंड अभंग जाहलें ॥ १३७ ॥
गुप्त जाहला गजानन । गाई पृथ्वींत जाती लपोन ।
रावणें एक गाईचा कर्ण । धांवोनिया धरियेला ॥ १३८ ॥
तोही न उपडे तयालागुन । मग तेथेंचि केलें लिंगपूजन ।
गोकर्णमहाबळेश्र्वर तेथून । नाम जाण पडियेलें ॥ १३९ ॥
रावणमाता तेथें येईन । ते नित्य करी शिवपूजन ।
आदिलिंग हें जाणोन । करिती अर्चन सुरऋषी ॥ १४० ॥
रावण कुंभकर्ण बिभीषण । तेथेंच करिती अनुष्ठान ।
त्याच्या बळेंकरुन । देव जिंकिले रावणें ॥ १४१ ॥
मयासुर मंदोदरी आणि शक्ती । देता झाला रावणाप्रती ।
लक्ष पुत्र नातु गणती । सवा लक्ष जयाचें ॥ १४२ ॥
इंद्रजिताऐसा पुत्र । अष्टदशाक्षौहिणी वाद्यभार ।
जेथींच्या अनुष्ठानें अपार । रावण पावला संपत्ती ॥ १४३ ॥
गौतम म्हणे राजोत्तमा । ऐसा गोकर्णींचा थोर महिमा ।
वर्णू न शके मधवा ब्रह्मा । येणें आम्हां तेथूनि जाहलें ॥ १४४ ॥
मिथुलेश्र्वराच्या यागाकारणें । आम्ही येत असतां त्वरेनें ।
अद्भुत एक वर्तलें तुजकारणें । कथा तेचि सांगतो ॥ १४५ ॥
एक वृक्ष न्यग्रोध विशाळ । त्याखाली आम्ही बैसलों सकळ ।
तों एक चांडाळीण अमंगळ । अति अपवित्र देखिली ॥ १४६ ॥
सर्वरोगवेष्टित पूर्ण । जन्मांध गलितकुष्ठ भरलें जाण ।
किडे पडले सर्वांगीं व्रण । दुर्गंधी उठली चहूंकडे ॥ १४७ ॥
रक्तपिती भरोन । हस्तपाद बोटें गेलीं झडोन ।
परम कुश्र्चित कुलक्षण । कैंचें अन्न उदक तियेतें ॥ १४८ ॥
दंतहीन कर्णहीन । गर्भींच तियेचे गेले लोचन ।
कर्ण नासिक झडोन । किडे पडले बुचबुचित ॥ १४९ ॥
अंगींचें चर्म गेलें झडोन । वस्त्र पडलें गळोन ।
धुळींत लोळे चांडाळीण । पाप पूर्वींचे भोगीत ॥ १५० ॥
तिचा मरणकाळ जवळी आला जाण । वरतें पाहिलें आम्हीं विलोकून ।
तों शिवें धाडिलें दिव्य विमान । तियेलागीं न्यावया ॥ १५१ ॥
दशभुज पंचवदन । शिवदूत बैसले चौघे जण ।
कोटिसूर्यतेज विराजमान । प्रभा शशिसमान एकाची ॥ १५२ ॥
कोणी अग्नितेजें विराजत । भालचंद्र शोभिवंत ।
दिव्य विमान लखलखित । वाद्यें वाजती चतुर्विध ॥ १५३ ॥
अष्टनायिका नृत्य करिती । किन्नर गंधर्व शिवलीला गाती ।
गौतम म्हणे ऐकें नृपती । मग तयांप्रती पूसिलें । १५४ ॥
हें दिव्य विमान घेऊन । कोणाचें करुं जातां उद्धरण ।
ते म्हणती तिये चांडाळणी लागून । शिवें आणूं पाठविलें निजपदा ॥ १५५ ॥
मग म्या तयांसी पुसिलें । इणें पूर्वीं काय तप केलें ।
मग ते शिवदूत बोलिले । पूर्वजन्मींचा वृत्तांत ॥ १५६ ॥
पूर्वी केकय नामा ब्राह्मण । त्याची कन्या सुमित्रा जाण ।
आपुल्या सौंदर्यगर्वेंकरुन । कोणासही मानीना ॥ १५७ ॥
ही बाळपणीं विधवा झाली । तारुण्यमदें स्वधर्म विसरली ।
जारकर्म करुं लागली । बापें शिकविल्या नायके ॥ १५८ ॥
तों हे जाहली गरोदर । लोक निंदा करिती समग्र ।
मग बापें केश धरुनि सत्वर । बाहेर घातलें इयेसी ॥ १५९ ॥
मग ही हिंडतां देशांतर । कोणी एक सभाग्य शूद्र ।
त्याणें इतें स्त्री करुन सत्वर । समग्र द्रव्य ओपिलें ॥ १६० ॥
तेथें अपत्यें झालीं बहुत । ही अत्यंत मद्यमांसीं रत ।
पुष्ट जाहली बहुत । घूर्णित लोचन उघडीना ॥ १६१ ॥
शूद्र घेवोनि दासीदास । गेला क्षेत्रीं कृषिकर्मास ।
हे क्षुधिंत आठवूनि मांसास । शस्त्र घेवोनि चालिली ॥ १६२ ॥
मद्यें माजली नुघडी लोचन । हा बस्तचि आहे म्हणोन ।
गोवत्साचे कंठी जाण । पापिणी सुरी घालीतसे ॥ १६३ ॥
तें अट्टहासें ओरडत । गाई हंबरोनि अनर्थ करीत ।
इणें कंठ छेदोनि गृहांत । वत्स नेलें त्वरेनें ॥ १६४ ॥
डोळे उघडूनि पाहे पापिणी । मग गोवत्स ओळखिलें ते क्षणीं ।
तेव्हां तिणे शिव शिव उच्चारुनी । म्हणे करणी न कळतां केली ॥ १६५ ॥
मग अर्धवत्समांस भक्षून । उरलें टाकी बाहेर नेऊन ।
लोकांत उठविलें पूर्ण । गोवत्स मारिलें व्याघ्रानें ॥ १६६ ॥
त्यावरी ही काळें मृत्यु पावत । तों येऊनि यमदूत ।
इयेसी नेलें मारीत । जाचिती बहुत निर्दयपणें ॥ १६७ ॥
कुंभीपाकीं घालिती । असिपत्रवनीं हिंडविती ।
तप्तभूमीवरी लोळविती । स्तंभ कवटाळविती तप्त जे कां ॥ १६८ ॥
चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन । इचें कांहीं आहे कीं नाहीं पुण्य ।
तो म्हणे शिव नाम उच्चारुन । गोवत्सवध इणें केला ॥ १६९ ॥
मग यमें दिधलें लोटून । चांडाळयोनींत पावली जनन ।
गर्भांध कुश्र्चल कुलक्षण । विष्ठामूत्रें भरली सदा ॥ १७० ॥
श्र्वानाचें उच्छिष्ट भक्षी जाण । तंव मायबापें गेलीं मरोन ।
मग ही हातीं काठी घेऊन । गांवोगांवीं हिंडतसे ॥ १७१ ॥
तों शिवरात्र पर्वकाळ लक्षून । गोकर्णक्षेत्राप्रति संपूर्ण ।
यात्रा चालिली घोष गहन । नानाविध वाद्यांचा होतसे ॥ १७२ ॥
शिवनामाचा घोष अपार । शिवभक्त करिती वारंवार ।
त्यांच्या संगें ही दुराचार । चांडाळीही चालिली ॥ १७३ ॥
गोकर्णक्षेत्रा गेली चांडाळी । पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी ।
म्हणे मज अन्न द्यावें ये वेळीं । बहुत पापिणी मी आहे ॥ १७४ ॥
हांका फोडीत हात पसरुन । तों प्रदक्षिणा करिती भक्तजन ।
एकें बिल्वपत्र नेऊन । तिचे हातीं घातलें ॥ १७५ ॥
तें त्रिदळ चांचपोन पाहत । मुखीं घालावयाची नाहीं वस्त ।
म्हणोनि रागें भिरकावीत । तें पडत शिवलिंगावरी ॥ १७६ ॥
शिवरात्रीस उपोषण । बिल्वदळें घडलें शिवपूजन ।
शिवभक्तांसवें जागरण । घडलें संपूर्ण चांडाळीस ॥ १७७ ॥
शिवनामें गर्जती जन । हेही करीत तैसेचि स्मरण ।
ती ही वडाखालीं येऊन । पडली आहे चांडाळी ॥ १७८ ॥
ऐसा तिचा पूर्ववृत्तांत । गौतमें सांगितला समस्त ।
मग ती दिव्य देह पावोनि बैसत । शिवविमानीं तेधवां ॥ १७९ ॥
आपुलें पूर्वकर्म आठवून । करुं लागली शिवस्मरण ।
मग शिवगणीं नेऊन । शिवपदीं स्थापिली ॥ १८० ॥
गौतम म्हणे ऐक राया सादर । तूं गोकर्णाप्रति जाई सत्वर ।
शिवरात्रीस पार्वतीपरमेश्र्वर । त्रिदळेंकरुनि अर्चीं कां ॥ १८१ ॥
ऐसें बोलोनि गौतम मुनी । गेला जनकाच्या यागालागुनी ।
कल्माषपाद तेच क्षणीं । गोकर्णक्षेत्रीं पातला ॥ १८२ ॥
शिवरात्रीस दिव्य लिंग । मित्रसहरायें पूजिलें सांग ।
अंतरीं सप्रेम अनुराग । उमारंग संतोषला ॥ १८३ ॥
ब्रह्महत्येचे पातक विशेष । जाऊनि राव झाला निर्दोष ।
तों कैलासाहूनि आदिपुरुष । पाठवीत दिव्य विमान ॥ १८४ ॥
विमानीं बैसलें शिवगण । परम तेजस्वी देदीप्यमान ।
अनंत विजांचे रस पिळोन । मूर्ती ओतिल्या वाटते ॥ १८५ ॥
अनंत वाद्यें गर्जती एक वेळां । तेणें रंगसुरंग दाटला ।
दिव्य सुमनांच्या माळा । वर्षती वरुनि वृंदारक ॥ १८६ ॥
मित्रसह दिव्य देह पावोन । झाला दशभुज पंचानन ।
इंद्रचंद्रादिपदें ओलांडून । नेला मिरवत शिवपदा ॥ १८७ ॥
सरुपता मुक्ति पावोन । शिवरुपीं मिळाला आनंदघन ।
धन्य शिवरात्रिव्रत पावन । धन्य गोकर्ण शिवमंदिर ॥ १८८ ॥
गौतम ऋषि परम धन्य । तेणें इतिहास सांगितला पावन ।
धन्य श्रोते तुम्ही सज्जन । श्रवणीं सादर बैसलां ॥ १८९ ॥
मानससरोवरवेष्टित । मराळ जैसे विराजीत ।
कीं निधानाभोंवते समस्त । साधक जैसे बैसती ॥ १९० ॥
तरी पंडीत तुम्ही चतुर । तुमचे अवधान दिव्यालंकार ।
देवोनि गौरवा श्रीधर । ब्रह्मानंदेकरुनियां ॥ १९१ ॥
श्रीमद्भीमातटविलासा । ब्रह्मानंदा आदिपुरुषा ।
श्रीधरवरदा कैलासविलासा । कथारस वदवीं पुढें ॥ १९२ ॥
श्रीशिवलिलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । तृतियाध्याय गोड हा ॥ १९३ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
ShriShivaLilamrut Adhyay 3
श्रीशिवलीलामृत अध्याय तिसरा
ShriShivaLilamrut Adhyay 3
श्रीशिवलीलामृत अध्याय तिसरा
No comments:
Post a Comment