Wednesday, May 15, 2019

ShriShivaLilamrut Adhyay 5 श्रीशिवलीलामृत अध्याय पांचवा


ShriShivaLilamrut Adhyay 5 
ShriShivLilaMrut Adhyay 5 is in Marathi. It is from Skandha Purana, Brahmottar Khanda which is in Sanskrit. This Adhayay is very pious and tells us about Panchakshari Mantra, Pradosha Vrata and Shiv Poojan. After performing this vrata the devotee is blessec by God Shiva, His all desires are fulfilled and gets everything he wants.
ShriShivaLilamrut Adhyay 5
श्रीशिवलीलामृत अध्याय पांचवा


Custom Search



श्रीशिवलीलामृत अध्याय पांचवा
श्रीगणेशायनमः ॥
सदाशिव अक्षरें चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी ।
जो नित्य शिवार्चन करी । तो उद्धरी बहुतां जीवां ॥ १ ॥
बहुत प्रायश्र्चित्तांचे निर्धार । शास्त्रवक्ते करिती विचार ।
परी जे शिवनामें शुद्ध साचार । कासया इतर साधनें त्यां ॥ २ ॥
नामाचा महिमा परमाद्भुत । त्यावरी प्रदोषव्रत आचरत ।
त्यासी सर्वसिद्धि प्राप्त होत । सत्य सत्य त्रिवाचा ॥ ३ ॥
तुष्टि पुष्टि धृति आयुष्यवर्धन । संतति संपत्ति दिव्यज्ञान ।
पाहिजे तिंहीं प्रदोषव्रत पूर्ण । यथासांग करावें ॥ ४ ॥
प्रदोषव्रत भावें आचरितां । या जन्मीं प्रचीत पहावी तत्वतां ।
दारिद्र्य आणि महद्वयथा । निःशेष पळती षण्मासांत ॥ ५ ॥
एकसंवत्सरें होय ज्ञान । द्वादश वर्षी महद्भाग्य पूर्ण ।
हें जो असत्य मानील व्यासवचन । त्यासी बंधन कल्पांतवरी ॥ ६ ॥
त्याचा गुरु लटिका जाण । त्याची दांभिक भक्ति लटिकेंच ज्ञान ।
उमावल्लभचरणीं ज्याचें मन । त्याहूनि पावन कोणी नाहीं ॥ ७ ॥
मृत्यु गंडांतरें दारुण । प्रदोषव्रतें जाती निरसोन ।
येविषयीं इतिहास जाण । सूत सांगे शौनकां ॥ ८ ॥
विदर्भदेशींचा भूभुज । सत्यरथ नामें तेजःपुंज ।
सर्वधर्मरत पराक्रमी सहज । बंदीजन वर्णिती सदा ॥ ९ ॥
बहु दिवस राज्य करीत । परी शिवभजनीं नाहीं रत ।
त्यावरी शाल्वदेशींचा नृपनाथ । बळें आला चालूनियां ॥ १० ॥
आणीक त्याचे आप्त । क्षोणीपाल साह्य झाले बहुत । 
सप्त दिवसपर्यंत । युद्ध अद्भुत जाहलें ॥ ११ ॥
हा एकला ते बहुत । समरभूमीसी सत्यरथ । 
धारातीर्थी पावला मृत्यु । शत्रु नगरांत प्रवेशले ॥ १२ ॥
राजपत्नी गरोदर राजस । पूर्ण झाले नवमास ।
एकलीच पायीं पळतां वनास । थोर अनर्थ ओढवला ॥ १३ ॥
परम सुकुमार लावण्यहरिणी । कंटक सरांटे रुतती चरणीं ।
मूर्च्छना येऊनि पडे धरणीं । उठोनि पाहे मागें पुढें ॥ १४ ॥
शत्रु धरितील अकस्मात । म्हणोनि पुढती उठोनि पळत ।
किंवा ते विद्युल्लता फिरत । अवनीवरी वाटतसे ॥ १५ ॥
वस्त्रें अलंकारमंडित । हिर्‍यांऐसे दंत झळकत ।
जिचा मुखेंदु देखतां रतिकांत । तन्मय होवोनि नृत्य करी ॥ १६ ॥
पहा कर्माची गती गहन । जिच्या अंगुष्ठीं न पडे सूर्यकिरण ।
ते गरोदर हिंडे विपिन । मृगनेत्री गजगामिनी ॥ १७ ॥
वनीं हिंडे महासती । जेवीं नैषधरायाची दमयंती ।
कीं भिल्लीरुपें हैमवती । दुस्तरवनीं तैसी हिंडे ॥ १८ ॥
कर्मनदीच्या प्रवाहीं जाण । पडली तीस काढील कोण ।
असो एका वृक्षाखालीं येऊन । परम व्याकुळ पडियेली ॥ १९ ॥
शतांचीं शतें दासी । ओळंगती सदैव जियेपासीं ।
इंदुमती नाम जियेसी । ते भूमीवरी लोळत ॥ २० ॥
चहूंकडे पाहे दीनवदनीं । जिव्हा मुख वाळलें न मिळे पाणी ।
तों प्रसूत झाली तेचि क्षणीं । दिव्यपुत्र जन्मला ॥ २१ ॥
तृषेनें तळमळी अत्यंत । कोण उदक देईल तेथ ।
बाळ टाकूनि उठत बसत । गेली एका सरोवरा ॥ २२ ॥
उदकांत प्रवेशली तेच क्षणीं । अंजुळी भरुनि घेतलें पाणी ।
तंव ग्राहें नेली ओढोनि । विदारुनी भक्षिली ॥ २३ ॥
घोर कर्माचें विंदान । वनीं एकला रडे राजनंदन ।
तंव उमानामक विप्रपत्नी जाण । विगतधवा पातली ॥ २४ ॥
माता पिता बंधु पाहीं । तियेलागीं कोणी नाहीं ।
एका वर्षाचा पुत्र तीसही । कडिये घेवोनि आली तेथें ॥ २५ ॥
तों नाहीं केलें नालच्छेदन । ऐसें बाळ उमा देखोन ।
म्हणे आहा रे ऐसें पुत्ररत्न । कोणीं टाकिलें दुस्तर वनीं ॥ २६ ॥
म्हणे कोण याती कोण वर्ण । मी कैसें नेऊं उचलून ।
जावें जरी टाकून । वृक व्याघ्र भक्षितील कीं ॥ २७ ॥
स्तनीं दाटून फुटला पान्हा । नेत्रीं ढाळीत अश्रुजीवना ।
बाळ पुढें घेऊनी ते ललना । मुखकमळीं स्तन लावी ॥ २८ ॥
संशयसमुद्रीं पडली वेल्हाळ । म्हणे नेऊं कीं नको बाळ ।
तंव तो कृपाळु पयःफेनधवल । यतिरुप धरुनि पातला ॥ २९ ॥
उमेलागीं म्हणे त्रिपुरारी । बाळ नेईं संशय न धरी ।
महद्भाग्य तुझें सुंदरी । क्षत्रियराजपुत्र तुज सांपडला ॥ ३० ॥
कोणासी न सांगे हे मात । समान पाळीं दोघे सुत ।
भणंगासी परीस होय प्राप्त । तैसें तुज जाहलें ॥ ३१ ॥
अकस्मात निधी जोडत । कीं चिंतामणि पुढें येऊनि पडत ।
कीं मृताच्या मुखांत । पडे अमृत पूर्वदत्तें ॥ ३२ ॥
ऐसें बोलोनि त्रिपुरारी । गुप्त झाला ते अवसरीं ।
मग दोघे पुत्र घेवोनि ते नारी । देशग्रामांतरीं हिंडत ॥ ३३ ॥
ब्रह्मपुत्राचें नाम शुचिव्रत । राजपुत्राचें नाम ठेविलें धर्मगुप्त ।
घरोघरीं भिक्षा मागत । कडिये खांदीं घेऊनियां ॥ ३४ ॥
लोक पुसतां उमा सांगत । माझे पोटींचे दोघे सुत ।
ऐसी हिंडत हिंडत । एकचक्रनगरा पातली ॥ ३५ ॥
घरोघरीं भिक्षा मागत । तों शिवालय देखिलें अकस्मात ।
आंत द्विज दाटले बहुत । शांडिल्य त्यांत मुख्य ऋषी ॥ ३६ ॥
शिवाराधना करिती विधियुक्त । तों उमा आली शिवालयांत ।
क्षण एक पूजा विलोकीत । तों शांडिल्य ऋषी बोलिला ॥ ३७ ॥
अहा कर्म कैसें गहन । हा राजपुत्र हिंडे दीन होऊन । 
कैसें विचित्र प्राक्तन । उमा वचन ऐकती झाली ॥ ३८ ॥
ऋषीचे चरण उमा धरीत । म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत ।
त्रिकालज्ञानी महासमर्थ । भूतभविष्यज्ञान तुम्हां ॥ ३९ ॥
याची माता पिता कोण । आहेत कीं पावलीं मरण । 
यावरी शांडिल्य सांगे वर्तमान । याचा पिता जाण सत्यरथ ॥ ४० ॥
तो पूर्वी नृप होता जाण । प्रदोषसमयीं करी शिवार्चन । 
तों शत्रु आले चहूंकडोन । नगर त्याचें वेढिलें ॥ ४१ ॥
शत्रूची गजबज ऐकून । उठिला तैसीच पूजा सांडोन ।
तंव प्रधान आला पुढें धांवोन । शत्रु धरोनि आणिले ॥ ४२ ॥
त्यांचा शिरच्छेद करुन । पूजा पूर्ण न करितां उन्मत्तपणें ।
तैसाच जाऊनि करी भोजन । नाहीं स्मरण विषयांधा ॥ ४३ ॥
त्याकरितां या जन्मीं जाण । सत्यरथ अल्पायुषी होऊन ।
अल्पवयांत गेला मरोन । म्हणोनि पूजन न सोडावें ॥ ४४ ॥
याच्या मातेनें सवत मारिली । ती जळीं विवशी झाली ।
पूर्ववैरें वोढोनि नेली । क्रोधें भक्षिली विदारुनी ॥ ४५ ॥
हा राजपुत्र धर्मगुप्त । यानें कांहींच केलें नाहीं शिवव्रत ।
म्हणोनि मातापितारहित । अरण्यांत पडियेला ॥ ४६ ॥
याकरितां प्रदोषकाळीं । अव्यग्र पूजावा इंदुमौळी ।
पूजन सांडूनि कदाकाळीं । सर्वथाही न उठावें ॥ ४७ ॥
भवानीसी बैसवूनि कैलासनाथ । प्रदोषकाळीं पुढें नृत्य करीत ।
वाग्देवी वीणा वाजवीत । वेणु पुरुहुत वाजवीतसे ॥ ४८ ॥
अंबुजसंभव ताल सांवरी । भार्गवी गातसे मधुरस्वरीं ।
मृदंग वाजवी मधुकैटभारी । नृत्यगती पाहूनियां ॥ ४९ ॥
यक्षपति शिवप्राणमित्र । हस्त जोडोनि उभा समोर ।
यक्षगण गंधर्व किन्नर । सुरासुर उभे असती ॥ ५० ॥
ऐसा प्रदोषकाळींचा महिमा । अगोचर निगमागमां ।
मग काय बोले उमा । मम पुत्र दरिद्री कां झाला ॥ ५१ ॥
तुझ्या पुत्रें प्रतिग्रह बहुत । पूर्वीं घेतले दुष्ट अमित ।
दान केलें नाहीं किंचित । शिवार्चन न करी कदा ॥ ५२ ॥
परान्नें जिव्हा दग्ध यथार्थ । दुष्ट प्रतिग्रहें दग्ध हस्त ।
स्त्रीअभिलाषें नेत्र दग्ध होत । मंत्रासी सामर्थ्य मग कैंचें ॥ ५३ ॥
मग उमेने पुत्र दोन्ही । घातले ऋषीचे चरणीं ।
तेणें पंचाक्षर मंत्र उपदेशुनी । प्रदोषव्रत उपदेशिलें ॥ ५४ ॥
पक्षप्रदोष शनिप्रदोष । महिमा वर्णिला अतिविशेष ।
निराहार असावें त्रयोदशीस । दिवसा सत्कर्म आचरावें ॥ ५५ ॥
तीन घटिका झालिया रजनी । प्रदोषपूजा आरंभावी प्रीतीकरुनी ।
गोमयें भूमी सारवूनी । दिव्यमंडप उभारिजे ॥ ५६ ॥
चित्रविचित्र वितान । कर्दळीस्तंभ इक्षुदंडेकरुन ।
मंडप कीजे शोभायमान । रंगमाळा नानापरी ॥ ५७ ॥
शुभ्र वस्त्र नेसावें आपण । शुभ्र गंध सुवाससुमन । 
मग शिवलिंग स्थापून । पूजा करावी विधियुक्त ॥ ५८ ॥
प्राणायाम करुन देखा । अंतर्बाह्य न्यास मातृका ।
दक्षिणभागीं पूजावें मुरांतका । सव्यभागीं अग्नि तो ॥ ५९ ॥
वीरभद्र गजानन । अष्टमहासिद्धि अष्टभैरव पूर्ण ।
अष्टदिक्पालपूजन । सप्तावरणीं शिवपूजा ॥ ६० ॥
यथासांग शिवध्यान । मग करावें पूजन ।
राजोपचारें सर्व समर्पून । करावें स्तवन शिवाचें ॥ ६१ ॥
जयजय गौरीनाथ निर्मळ । जय जय कोटिचंद्र सुशीतळ ।
सच्चिदानंदघन अढळ । पूर्णब्रह्म सनातन ॥ ६२ ॥
ऐसें प्रदोषव्रत ऐकवून । बाळ उपदेशिले दोघेजण ।
मग ते एकमनेंकरुन । राहते झाले एकचक्रीं ॥ ६३ ॥
चार महिनेपर्यंत । दोघेही आचरती प्रदोषव्रत । 
गुरुवचनें यथार्थ । शिवपूजन करिती पैं ॥ ६४ ॥
शिवपूजा न द्यावी सर्वथा । न द्यावें प्रसादतीर्था । 
शतब्रह्महत्यांचें पाप माथां । होय सांगता शांडिल्य ॥ ६५ ॥
सर्व पापांहूनि पाप थोर । शिवपूजेचा अपहार ।
असो ते दोघे किशोर । सदा सादर शिवभजनीं ॥ ६६ ॥
ब्रह्मपुत्र शुचिव्रत । एकला नदीतीरीं क्रीडत ।
दरडी ढांसळतां अकस्मात । द्रव्यघट सांपडला ॥ ६७ ॥
घरासी आला घेऊन । माता संतोषली देखोन ।
म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण । ऐश्र्वर्य चढत चालिलें ॥ ६८ ॥
राजपुत्रास म्हणे ते समयीं । अर्ध द्रव्यविभाग घेईं ।
येरु म्हणे सहसाही । विभाग न घेईं अग्रजा ॥ ६९ ॥
या अवनींतील धन । आमुचेंचि आहे संपूर्ण ।
असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण । न विसरती कदाही ॥ ७० ॥
यावरी एकदां दोघेजण । गेले वनविहारालागून ।
तो गंधर्वकन्या येऊन । क्रीडतां दृष्टीं देखिल्या ॥ ७१ ॥
दोघेपाहती दुरुनी । परम सुंदर लावण्यखाणी ।
शुचिव्रत म्हणे राजपुत्रालागुनी । परदारा नयनीं न पहाव्या ॥ ७२ ॥
दर्शनें हरती चित्त । स्पर्शनें बळ वीर्य हरीत ।
कौटिल्यदंभसंयुक्त । महाअनर्थकारिणी ॥ ७३ ॥
ब्रह्मसुतासी तेथें ठेऊन । राजपुत्र चालिला सुलक्षण ।
स्वरुप सुंदर मन्मथाहून । आकर्णनयन कोमलांग ॥ ७४ ॥
जवळी येवोनि पाहात । तंव मुख्य नायिका विराजित ।
अंशुमती नामें विख्यात । गंधर्वकन्या पद्मिनी ॥ ७५ ॥ 
कोद्रविणनामा गंधर्वपती । त्याची कन्या अंशुमती ।
पिता पुसे महेशाप्रती । हे कन्या अर्पू कोणातें ॥ ७६ ॥   
मग बोले हिमनगजामात । धर्मगुप्त सत्यरथाचा सुत । 
तो माझा परम भक्त । त्यासी देईं अंशुमती ॥ ७७ ॥
हें पूर्वींचे शिववचन । असो यावरी अंशुमती पाहे दुरोन । 
न्याहाळीत राजनंदन । वाटे पंचबाण दुसरा ॥ ७८ ॥
क्षीरसिंधूंत रोहिणीरमण । काय आला कलंक धुवोन ।
तैसें राजपुत्राचें वदन । अंशुमती न्याहाळी ॥ ७९ ॥
बत्तीसलक्षण संयुक्त । अजानुबाहु चापशरमंडित ।
विशाळ वक्षःस्थळ चालत । करिनायक ज्यापरी ॥ ८० ॥
ऐसा तो गुणाढ्य देखूनि त्वरित । अंशुमती सखयांप्रति सांगत ।
तुम्ही दुज्या वनाप्रति जाऊनि समस्त । सुमनें आणावीं सुवासें ॥ ८१ ॥
अवश्य म्हणोनि त्या ललना । जात्या झाल्या आणिका वना ।
अंशुमती एकली जाणा । राजपुत्रा खुणावीत ॥ ८२ ॥
भूरुहपल्लव पसरुन । एकांतीं घातलें आसन ।
वरी वृक्षडाहाळिया भेदून । भूमीवरी पसरिल्या ॥ ८३ ॥ 
असो तेथें बैसला येऊन । राजपुत्र सुहास्यवदन ।
विशाळ भाळ आकर्णनयन । आरक्त ओष्ठ सुकुमार ॥ ८४ ॥
मंजुळभाषिणी नेत्रकटाक्षबाणीं । विंधिली ते लावण्यहरिणी ।
मनोजमूर्च्छना सांवरुनी । वर्तमान पुसे तयातें ॥ ८५ ॥
श्रृंगारसरोवरा तुजपासीं । मी वास करीन राजहंसी ।
देखतां तव वदन दिव्यशशी । मम मानसचकोर नृत्य करी ॥ ८६ ॥
तव मुखाब्ज देखतां आनंद । झेंपावती मम नेत्रमिलिंद ।
कीं तव वचन गर्जतां अंबुद । मम चित्तशिखी नृत्य करी ॥ ८७ ॥
कविगुरुंहुनि तेज विशाळ ।आत्मकंठींची काढिली मुक्ताफळमाळ ।
कंठीं सूदली तत्काळ । चरणीं भाळ ठेवीत ॥ ८८ ॥
म्हणे मी कायावाचामनेंकरुन । तुझी ललना झालें पूर्ण ।
यावरी धर्मगुप्त वचन । काय बोलता जाहला ॥ ८९ ॥
मी जनकजननीविरहित । राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत ।
तव पित्यासी कळतां मात । घडे कैसें वरानने ॥ ९० ॥
यावरी म्हणे अंशुमती । तीन दिवसां येईन या स्थळाप्रती ।
तुम्हीं यावें शीघ्रगती । लग्नसिद्धी साधावया ॥ ९१ ॥
ऐसें बोलून ते चातुर्यराशी । वेगें आली पितयापाशीं ।
झालें वर्तमान सांगे त्यासी । तो परम मानसीं संतोषला ॥ ९२ ॥
राजपुत्र गेला परतोन । बंधूप्रती सांगे सर्व वर्तमान । 
शांडिल्यगुरुचें वचन स्मरुन । म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा ॥ ९३ ॥
गुरुचरणीं ज्याचें मन । त्यासी ऐश्र्वर्यासी काय न्यून ।
काळमृत्युभयापासून । सर्वदा रक्षी देशेक तो ॥ ९४ ॥
यावरी ते दोघे बंधु येऊन । मातेसी सांगती वर्तमान ।
येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन । फळ देते चालिलें ॥ ९५ ॥
यावरी तिसरे दिवशीं । दोघेही गेले त्या वनासी ।
गंधर्वराज सहपरिवारेंसीं । सर्व सामग्री घेऊनि आला ॥ ९६ ॥
दृष्टीं देखतां जामात । गंधर्व आनंदसमुद्रीं पोहत ।
छत्र सेना सुखासन त्वरित । धाडूनि उमा आणविली ॥ ९७ ॥
यावरी यथासांग लग्न । चारी दिवस झालें पूर्ण । 
कोणी एक पदार्थ न्यून । पडिला नाहीं तेधवां ॥ ९८ ॥
स्वर्गीच्या दिव्य वस्तु अमोलिक सतेज । विहिणीस देत गंधर्वराज ।
लक्ष रथ दहा सहस्त्र गज । तेजःपुंज एक लक्ष वाजी ॥ ९९ ॥
एक लक्ष दास दासी । अक्षय कोश रत्नराशी । 
अक्षय भाते देत शक्तीसी । दिव्य चाप बहुसाल ॥ १०० ॥
अपार सेना संगे देत । एक सेनापतिगंधर्व बळिवंत ।
उमा दोघां पुत्रांसमवेत । मान देवोनि बोळविली ॥ १०१ ॥
सुखासनारुढ अंशुमती । पतीसवें चालली शीघ्रगती ।
कनकवेत्रपाणी पुढें धांवती । वाहनासवें जियेच्या ॥ १०२ ॥
चतुर्विध वाद्यांचे गजर । चतुरंग चालिला दळभार ।
येऊनि वेढिलें विदर्भनगर । सत्यरथ पितयाचें ॥ १०३ ॥
नगरदुर्गावरुन अपार । उल्हाटयंत्राचा होत भडिगार ।
परीगंधर्वांचें बळ फार । घेतलें नगर क्षणार्धें ॥ १०४ ॥
जेणें पूर्वीं पिता मारिला जाण । त्याचें नाम दुर्मर्षण ।
तो जिताची धरुनि जाण । आपला करुन सोडिला ॥ १०५ ॥
देशोदेशींचे प्रजाजन । धांवती करभार घेऊन ।
उत्तम मुहूर्त पाहून । सिंहासनारुढ जाहला ॥ १०६ ॥
माता उमा बंधु शुचिव्रत । त्यांसमवेत राज्य करीत । 
दहा सहस्त्र वर्षेंपर्यंत । यशवंत राज्य केलें ॥ १०७ ॥
शांडिल्य गुरु आणून । शतपद्म अर्पिलें धन ।
रत्नाभिषेक करुन । अलंकार वस्त्रें दीधलीं ॥ १०८ ॥
दुर्भिक्ष जळशोष अवर्षण । आधि व्याधि वैधव्य मरण ।
दुःख शोक कलह विघ्न । राज्यांतूनि पळालीं ॥ १०९ ॥
प्रजा भूदेव दायाद । देती रायासी आशीर्वाद ।
कोणासही नाहीं खेद । सदा आनंद घरोघरीं ॥ ११० ॥
ऐसा अंशुमती समवेत । धर्मगुप्त राज्य करीत ।
यौवराज्य शुचिव्रतातें देत । पारिपत्य सर्व करी ॥ १११ ॥
ऐसें दहा सहस्त्र वर्षें राज्य करुन । सुदत्तपुत्रासी राज्य देऊन ।
चिंतितां मनीं उमाधवचरण । दिव्य विमान धाडिलें ॥ ११२ ॥
दिव्य देह पावोनि नृपती । माताबंधूसमवेत अंशुमती ।
शिवविमानीं बैसती । करी स्तुति शिवाची ॥ ११३ ॥
कैलासपदासी जाऊन । जगदात्मा शिव विलोकून ।
जयजयकार करुन । लोटांगणें घालिती ॥ ११४ ॥
दीनबंधु जगन्नाथ । पतितपावन कृपावंत ।
हृदयीं धरुनी समस्त । अक्षयपदीं स्थापिलीं ॥ ११५ ॥
हें धर्मगुप्ताचें आख्यान । करिती श्रवण पठण ।
लेखन रक्षण अनुमोदन । तरी पंचवदन रक्षी तयां ॥ ११६ ॥
सकळ पापां होय क्षय । जेथें जाय तेथें विजय ।
धनधान्यवृद्धि होय । ऋण जाय निरसुनी ॥ ११७ ॥
प्रदोषमहिमा अद्भुत । जे आचरती ऐकूनि ग्रंथ ।
तेथें कैचें दारिद्र्य मृत्य । सत्यसत्य त्रिवाचा ॥ ११८॥
ज्याच्या घरीं शिवलीलामृत ग्रंथ । त्याची शिव पाठी राखीत ।
सदा हिंडे उमाकांत । अंतीं शिवपद प्राप्त तया ॥ ११९ ॥
हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस । पद्मरचनाफळें आलीं पाडास ।
कुतर्कवादी जे वायस । मुखरोग त्यांस नावडे ॥ १२० ॥
जय जय ब्रह्मानंदा विरुपाक्षा । श्रीधरवरद सर्वसाक्षा ।
दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्षा । न येसी लक्षा निगमागमा ॥ १२१ ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । पंचमोध्याय गोड हा ॥ १२२ ॥
इति पंचमोध्यायः ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
ShriShivaLilamrut Adhyay 5 
श्रीशिवलीलामृत अध्याय पांचवा


Custom Search

No comments: