Monday, May 6, 2019

ShriShivaLilamrut Adhyay 4 श्रीशिवलीलामृत अध्याय चौथा


ShriShivaLilamrut Adhyay 4 
ShriShivLilaMrut Adhyay 4 is in Marathi. It is from Skandha Purana, Brahmottar Khanda which is in Sanskrit. This Adhayay starts with a story of King Vimarshan who was devotee of God Shiva. Vimarshan was not of a good character. However being God Shivas’ devotee, he was blessed by God and the king went to Shiv Loka at the end of his life. In this adhyay story of king Chandrasen is described who was also a devotee of God Shiva.
ShriShivaLilamrut Adhyay 4 
श्रीशिवलीलामृत अध्याय चौथा 


Custom Search


श्रीशिवलीलामृत अध्याय चौथा
श्रीशिवलीलामृत अध्याय चौथा 
श्रीगणेशायनमः ॥
धराधरेंद्रनंदिनीमानससरोवर- । मराळ उदार कर्पूरगौर ।
अगम्य गुण अपार । तुझेवर्णिती सर्वदा ॥ १ ॥
न कळे जयाचें मूळ मध्य अवसान । आपणचि सर्वकर्ता कारण ।
कोठें प्रगटेल ज्याचे आगमन । ठाईं न पडे ब्रह्मादिकां ॥ २ ॥
जाणोनि भक्तांचे मानस । तेथेंचि प्रगटे जगन्निवास ।
येचविषयीं सूतें इतिहास । शौनकादिकांप्रति सांगितला ॥ ३ ॥
किरातदेशींचा राजा विमर्शन । परम प्रतापी शत्रुभंजन ।
मृगया करीत हिंसक दारुण । मद्यमांसी रत सदा ॥ ४ ॥
चतुवर्णाच्या स्त्रिया भोगीत । निर्दय अधमेंचि वर्तत ।
परी शिवभजनीं असे रत । विधीनें पूजित नित्य शिवासी ॥ ५ ॥
त्याचे स्त्रियेचें नाम कुमुद्वती । परम चतुर गुणवती ।
पतीप्रति पुसे एकांतीं । कापट्यरीती टाकोनियां ॥ ६ ॥
म्हणे शिवव्रत आचरतां बहुवस । शिवरात्रि सोमवार प्रदोष ।
गीत नृत्य स्वयें करितां विशेष । शिवलिलामृत वर्णिता ॥ ७ ॥
दोषही घडती तुम्हांपासून । इलडे शिवभजनीं सावधान ।
मग तो राजा विमर्शन । वर्तमान सांगे पुरातन पैं ॥ ८ ॥
मी पूर्वीं पंप‌ानाम नगरीं । सारमेय होतों सुंदरी । 
तों माघ वद्य चतुर्दशी शिवरात्रीं । शिवमंदिरासमोर आलों ॥ ९ ॥
शिवपूजा पाहिली समस्त । द्वारीं उभे होते राजदूत ।
तिंहीं दंड मारितां त्वरित । सव्य पळत प्रदक्षिणा करीं ॥ १० ॥
आणीक आलों परतोनी । बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी ।
मागुती दाटावितां त्यांनीं । प्रदक्षिणा केल्या शिवसदना ॥ ११ ॥
मागुती बैसलों येऊन । तंव तिंहीं क्रोधें मारिला बाण ।
म्यां शिवलिंग पुढें लक्षून । तेथेंचि प्राण सोडिला ॥ १२ ॥
त्या पुण्यकर्मेंकरुन । आतां राजदेह पावलों जाण ।
परी श्र्वानाचे दुष्ट गुण । नाना दोष आचरें ॥ १३ ॥
कुमुद्वती म्हणे तुम्हांसी पूर्वज्ञान । तरी मी कोण होतें सांगा मजलागून । 
मग तो बोले विमर्शन । कपोती होतीस पूर्वी तूं ॥ १४ ॥
मांस पिंड नेतां मुखीं धरुन । पाठी लागला पक्षी श्येन ।
शिवालयास प्रदक्षिणा तीन । करुन बैसलीस शिखरीं ॥ १५ ॥
तूं श्रमलीस अत्यंत । तुज श्येनपक्षी मारीत। 
शिवसदनासमोर शरीर पडत । ती राणी सत्य झालीस तूं ॥ १६ ॥
मग कुमुद्वती म्हणे रायास । तूं त्रिकालज्ञानी पुण्यपुरुष ।
तुम्ही आम्ही जाऊं कोण्या जन्मास । सांगा समस्त वृत्तांत हा ॥ १७ ॥
यावरी तो राव म्हणे । ऐकें मृगनेत्रे इभगमने ।
सिंधुदेशींचा नृप इंदुवदने । होईन पुढिलिये जन्मीं मी ॥ १८ ॥
तूं जयानामें राजकन्या होसी । मजलागीं राजसे वरिसी ।
तिसरे जन्मीं सौराष्ट्रराव नेमेंसी । होईन सत्य गुणसरिते ॥ १९ ॥
तूं कलिंगकन्या होऊन । मज वरिसी सत्य जाण ।
चौथे जन्मीं गांधारराव होईन । तूं मागधकन्या होऊन वरिसी मज ॥ २० ॥
पांचवे जन्मीं अवंतीराज । दाशार्हकन्या तूं पावसी मज ।
सहावे जन्मीं आनर्तपति सहज । तूं ययतिकन्या गुणवती ॥ २१ ॥
सातवें जन्मीं पांड्यराजा होईन । तूं पद्मराजकन्या वसुमती पूर्ण ।
तेथें मी बहुत ख्याती करुन । शत्रु दंडीन शिवप्रतापें ॥ २२ ॥
महाधर्म वाढवीन । जन्मोजन्मीं शिवभजन करीन ।
मग त्या जन्मीं पुत्रास राज्य देऊन । तपास जाईन महावना ॥ २३ ॥
शरण रिघेन अगस्तीस । शैवदीक्षा घेऊनि निर्दोष ।
शुभवदने तुजसमवेत कैलास । पद पावेन निर्धारें ॥ २४ ॥
सूत म्हणे शौनकादिकांप्रती । तितुकेही जन्म घेवोनि तो भूपती ।
ब्रह्मवेत्ता होऊनि अंतीं । अक्षय शिवपद पावला ॥ २५ ॥
ऐसा शिवभजनाचा महिमा । वर्णू न शके द्रुहिण सुत्रामा ।
वेदशास्त्रांसी सीमा । न कळे ज्याची वर्णावया ॥ २६ ॥
ऐकूनि शिवगुणकीर्तन । सद्गद न होय जयाचें मन ।
अश्रुधारा नयन । जयाचे कदा न वाहती ॥ २७ ॥
धिक् त्याचें जिणें धिक्कर्म । धिक्विद्या धिग्धर्म ।
तो वांचोनि काय अधम । दुरात्मा व्यर्थ संसारीं ॥ २८ ॥
ऐक शिवभजनाची थोरी । उज्जयिनीनामें महानगरी ।
राव चंद्रसेन राज्य करी । न्यायनीतीकरुनियां ॥ २९ ॥
ज्योतिर्लिंग महाकाळेश्र्वर । त्याचे भजनीं रत नृपवर ।
मित्र एक नाम मणिभद्र । प्राणसखा रायाचा ॥ ३० ॥
मित्र चतुर आणि पवित्र । देशिक सर्वज्ञ दयासागर ।
शिष्य भाविक आणि उदार । पूर्वसुकृतें प्राप्त होय ॥ ३१ ॥
गृहीणी सुंदर आणि पतिव्रता । पुत्र भक्त आणि सभाग्यता ।
व्युत्पन्न आणि सुरस वक्ता । होय विशेष सुकृतें ॥ ३२ ॥
दिव्य हिरा आणि परिस । मुक्ताफळ सुढाळ सुरस ।
पिता ज्ञानी गुरु तोचि विशेष । हें अपूर्व त्रिभुवनीं ॥ ३३ ॥
ऐसा तो राव चंद्रसेन । मित्र मणिभद्र अति सुजाण ।
तेणें एक मणि दिधला आणोन । चंडकिरण दूसरा ॥ ३४ ॥
अष्टधातूंचा होतां स्पर्श । होय चामीकर बावनकस । 
सर्पव्याघ्रतस्करवास । राष्ट्रांत नसे त्याकरितां ॥ ३५ ॥
त्या मण्याचें होतां दर्शन । सर्व रोग जाती भस्म होऊन ।
दुर्भिक्ष शोक अवर्षण । दारिद्र्य नाहीं नगरांत ॥ ३६ ॥
तो कंठीं बांधितां प्रकाशवंत । राव दिसे जैसा पुरुहूत ।
समरांगणीं जय अद्भुत । न ये अपयश कालत्रयीं ॥ ३७ ॥
जे करावया येती वैर । ते आपणचि होती प्राणमित्र ।
आयुरारोग्य ऐश्र्वर्य अपार । चढत चालिलें नृपाचें ॥ ३८ ॥
भूप तो सर्वगुणी वरिष्ठ । कीं शिवभजनीं गंगेचा लोट ।
कीं विवेकभावरत्नांचा मुकुट । समुद्र सुभट चातुर्याचा ॥ ३९ ॥
कीं वैराग्यसरोवरींचा मराळ । कीं शांतिउद्यानींचा तपस्वी निर्मळ ।
कीं ज्ञानामृताचा विशाळ । कूपचि काय उचंबळला ॥ ४० ॥
ऐश्र्वर्य वाढतां प्रबळ । द्वेष करिती पृथ्वीचे भूपाळ ।
मणि मागों पाठविती सकळ । स्पर्धा बळें वाढविती ॥ ४१ ॥
बहुतांसि असह्य झालें । अवनीचे भूभुज एकवटले ।
अपार दळ घेवोनि आले । वेढिलें नगर रायाचें ॥ ४२ ॥
इंदिरावर कमलदलनयन । त्याचे कंठीं कौस्तुभ जाण । 
कीं मृडानीवरमौळीं रोहिणीरमण । प्रकाशघन मणी तैसा ॥ ४३ ॥
तो मणी आम्हांसी दे त्वरित । म्हणोनि नृपांनीं पाठविले दूत ।
मग राव विचारी मनांत । कैसा अनर्थ ओढवला ॥ ४४ ॥
थोर वस्तूंचे संग्रहण । तेंचि अनर्थासी कारण ।
ज्याकारणें जें भूषण । तेंचि विदूषणरुप होय ॥ ४५ ॥
अतिरुप अतिधन । अतिविद्या अतिप्रिति पूर्ण ।
अतिभोग अतिभूषण । विघ्नासी कारण तेंचि होय ॥ ४६ ॥
बोले राव चंद्रसेन । मणी जरी द्यावा यांलागून ।
तरी जाईल क्षात्रपण । युद्ध दारुण न करवे ॥ ४७ ॥
आतां स्वामी महाकाळेश्र्वर । करुणासिंधु कर्पूरगौर ।
जो दीनरक्षण जगदुद्धार । वज्रपंजर भक्तांसी ॥ ४८ ॥
त्यासी शरण जाऊं ये अवसरी । जो भक्तकाजकैवारी । 
जो त्रिपुरांतक हिमनगकुमारी- । प्राणवल्लभ जगदात्मा ॥ ४९ ॥
पूजासामग्री सिद्ध करुन । शिवमंदिरीं बैसला जाऊन । 
सकळ चिंता सोडून । विधियुक्त पूजन आरंभिलें ॥ ५० ॥
बाहेर सेना घेऊनि प्रधान । युद्ध करिती शिव स्मरुन ।
महायंत्रांचे नगरावरुन । मार होती अनिवार ॥ ५१ ॥
सर्व चिंता सोडूनि चंद्रसेन । चंद्रचूड आराधी प्रीतीकरुन ।
करी श्रौतमिश्रित त्र्यंबकपूजन । मानसध्यान यथाविधि ॥ ५२ ॥
बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ । परी चिंतारहित भूपति प्रेमळ ।
देवद्वारीं वाद्यांचा कल्लोळ । चतुर्विध वाद्यें वाजताती ॥ ५३ ॥
राव करीत महापूजन । पौरजन विलोकिती मिळोन ।
त्यांत एक गोपगृहिणी पतिहीन । कुमार कडिये घेऊन पातली ॥ ५४ ॥
सहा वर्षांचा बाळ । राजा पूजा करितां पाहे सकळ ।
निरखोनियां वाढवेळ । गोपगृहिणी आली घरा ॥ ५५ ॥
कुमार कडेखालता उतरुन । आपण करी गृहींचें कारण ।
शेजारीं उद्वसतृणसदन । बाळ जाऊन बैसला तेथें ॥ ५६ ॥
लिंगाकृति पाषाण पाहून । मृत्तिकेची वेदिका करुन ।
दिव्य शिवप्रतिमा मांडून । करी स्थापना प्रीतीनें ॥ ५७ ॥
कोणी दुजें नाहीं तेथ । लघुपाषाण आणोनि त्वरित ।
पद्मासनीं पूजा यथार्थ । पाषाणची वाहे प्रीतीनें ॥ ५८ ॥
राजपूजा मनांत आठवून । पदार्थमात्राविषयीं वाहे पाषाण ।
धूप दीप नैवेद्य पूर्ण । तेणेंचिकरुनि करितसे ॥ ५९ ॥
आर्द्रतृणपुष्प सुवासहीन । तेंचि वाहे आवडीकरुन ।
नाहीं ठउकें मंत्र ध्यान आसन । प्रेमभावें पूजीतसे॥ ६० ॥
परिमळद्तव्यें कैंचीं जवळी । शिवावरी मृत्तिका उधळी ।
मृत्तिकाची घेऊनि करकमळीं । पुष्पांजुळी समर्पित ॥ ६१ ॥
एवं रायाऐसें केलें पूजन । मग मानसपूजा कर जोडून । 
ध्यान करी नेत्र झांकून । शंकरीं मन दृढ जडलें ॥ ६२ ॥
मातेनें स्वयंपाक करुन । ये बा करी पुत्रा भोजन ।
बहुवेळां हांक फोडोन । पाचारितां नेदी प्रत्युत्तर ॥ ६३ ॥
म्हणोनि बाहेर येवोनि पाहे । तंव शून्यगृहीं बैसला आहे ।
म्हणे अर्भका मांडिलें काये । चाल  भोजना झडकरी ॥ ६४ ॥
परी नेदी प्रत्युत्तर । मातेनें क्रोधेंकरुनि सत्वर ।
त्याचें लिंग आणि पूजा समग्र । निरखुनियां झुगारिलीं ॥ ६५ ॥
चाल भोजना त्वरित । म्हणोनि हस्तकीं धरुनि वोढीत ।
बाळ नेत्र उघडोनि पाहत । तंव शिवपूजा विदारिली ॥ ६६ ॥
अहा शिव शिव म्हणोन । घेत वक्षःस्थळ बडवून ।
दुःखें पडला मूर्च्छा येऊन । म्हणे प्राण देईन मी आतां ॥ ६७ ॥
गालिप्रदानें देऊन । माता जाऊनि करी भोजन ।
जीर्णवस्त्रें पांघरुन । तृणसेजे पहुडली ॥ ६८ ॥
इकडे पूजा भंगली म्हणून । बाळ रडे शिवनाम घेऊन ।
तंव तो दयाळ उमारमण । अद्भुत नवल पैं केलें ॥ ६९ ॥
तृणगृह होतें जें जर्जर । झालें रत्नखचित शिवमंदिर । 
हिर्‍यांचे स्तंभ वरी शिखर । नाना रत्नांचे कळस झळकती ॥ ७० ।
चारी द्वारें रत्नखचित । मध्यें मणिमय दिव्यलिंग विराजीत ।
चंद्रप्रभेहूनि अमित । प्रभा ज्योतिर्लिंगाची ॥ ७१ ॥
नेत्र उघडोनि बाळ पहात । तंव राजोपचारें पूजा दिसत ।
सिद्ध करोनि ठेविली समस्त । बाळ नाचत ब्रह्मानंदें ॥ ७२ ॥
यथासांग महापूजन । बाळें केलें प्रीतीकरोन ।
षोडशोपचारें पूजा समर्पून । पुष्पांजुळी वाहतसे ॥ ७३ ॥
शिवनामावळी उच्चारीत । बाळ कीर्तनरंगीं नाचत ।
शिव म्हणे माग त्वरित । प्रसन्न झालों बाळका रे ॥ ७४ ॥
बाळक म्हणे ते वेळीं । मम मातेनें तुझी पूजा भंगिली ।
तो अन्याय पोटांत घालीं । चंद्रमौळी अवश्य म्हणे ॥ ७५ ॥
मातेसि दर्शना आणितों येथ । म्हणोनि गेला आपुले गृहांत ।
तंव तें देखिलें रत्नखचित । माता निद्रिस्त दिव्यमंचकीं ॥ ७६ ॥
पहिलें स्वरुप पालटून । झाली ते नारी पद्मीण ।
सर्वालंकारेंकरुन शोभायमान पहुडली ॥ ७७ ॥
तीस बाळकें जागें करुन । म्हणे चाल घेई शिवदर्शन ।
तंव ती पाहे चहूंकडे विलोकून । अद्भुत करणी शिवाची ॥ ७८ ॥
हृदयीं धरुनि दृढ बाळ । शिवालया आली तात्काळ ।
म्हणे धन्य तूं शिव दयाळ । धन्य बाळ भक्त हा ॥ ७९ ॥
गोपदारा गेली राजगृहा धांवून । चंद्रसेना सांगे वर्तमान ।
राव वेगें आला प्रीतीकरुन । धरी चरण बाळकाचे ॥ ८० ॥
शंकराची अद्नभुत करणी । राव आश्र्चर्य करुनि पाहे नयनीं ।
नागरिकजनांच्या श्रेणी । धांवती बाळा पहावया ॥ ८१ ॥
दिगंतरीं गाजली हांक बहुत । बाळकासी पावला उमानाथ ।
अवंतीनगरा येती धांवत। जन अपार पहावया ॥ ८२ ॥
चंद्रसेन रायाप्रती । नृप अवनीचे सांगोनि पाठविती ।
धन्य धन्य तुझी भक्ती । गिरिजावर प्रसन्न तूंतें ॥ ८३ ॥
आम्ही टाकूनि द्वेष दुर्वासना । तुझ्या भेटीसी येऊं चंद्रसेना ।
तो बाळ पाहूं नयना । कैलासराणा प्रसन्न ज्यासी ॥ ८४ ॥
ऐसें ऐकतां चंद्रसेन । प्रधानासमेत बाहेर येऊन ।
सकळ रायांसी भेटून । आला मिरवत घेऊनि ॥ ८५ ॥
अवंतीनगरींची रचना । पाहतां आश्र्चर्य वाटे मना ।
सप्तपुरींत श्रेष्ठ जाणा। उज्जयिनी नाम तियेचें ॥ ८६ ॥
राजे सकळ कर जोडून । शिवमंदिरापुढें घालिती लोटांगण ।
त्या बाळकासी वंदून । आश्र्चर्य करिती सर्वही ॥ ८७ ॥
म्हणतीव जैं शिव प्रसन्न । तैं तृणकुटी होय सुवर्णसदन ।
शत्रु ते पूर्ण मित्र होऊन । वोळंगती सर्वस्वें ॥ ८८ ॥
गृहींच्या दासी सिद्धी होऊन । न मागतां पुरविती इच्छिलें पूर्ण ।
आंगणींचे वृक्ष कल्पतरु होऊन । कल्पिलें फळ देती ते ॥ ८९ ।
मुका होईल पंडित । पांगुळ पवनापुढें धांवत । 
जन्मांध रत्नें पारखीत । मूढ अत्यंत होय वक्ता ॥९० ॥
रंकभणंगा भाग्य परम । तोचि होईल सार्वभौम । 
न करितां सायास दुर्गम । चिंतामणि येत हाता ॥ ९१ ॥
त्रिभुवनभरी कीर्ति होय । राजे समग्र वंदिती पाय ।
जेथें जेथें खणूं जाय । तेथें तेथें निधानें सांपडती ॥ ९२ ॥
अभ्यास न करितां बहुवस । सांपडे वेदांचा सारांश ।
सकळ कळा येती हातास । उमाविलास भेटे जेव्हां ॥ ९३ ॥
गोपति म्हणें गोरक्षबाळा । त्यासी गोवाहन प्रसन्न झाला ।
गो विप्र प्रतिपाळीं स्नेहाळा । धन्य नृपराज चंद्रसेन ॥ ९४ ॥
यात्रा दाटली बहुत । सर्व राजे आश्र्चर्य करीत ।
तों तेथें प्रगटला हनुमंत । वायुसुत अंजनीप्रिय जो ॥ ९५ ॥
जो राघवचरणारविंदभ्रमर । भूगर्भरत्नमानदसंतापहर ।
वृत्रारिशत्रुजनकनगर-। दहन मदनदमन जो ॥ ९६ ॥
द्रोणाचळाउत्पाटण । ऊर्मिलाजीवनप्राण रक्षण ।
ध्वजस्तंभीं बैसोन । पाळी तृतीयनंदन पृथेचा ॥ ९७ ॥
ऐसा प्रगटतां मारुती । समस्त क्षोणीपाळ चरणीं लागती ।
राघवप्रियकर बाळाप्रती । हृदयीं धरुनी उपदेशी ॥ ९८ ॥
शिवपंचाक्षरी मंत्र । उपदेशीत साक्षात रुद्र ।
न्यास मातृका ध्यानप्रकार । प्रदोष सोमवार व्रत सांगे ॥ ९९ ॥
हनुमंतें मस्तकीं ठेविला हात । झाला चतुर्दशविद्यावंत ।
चतुःषष्टिकळा आकळीत । जैसा आमलक हस्तकीं ॥ १०० ॥
त्याचें नाम श्रीकर । ठेविता झाला वायुकुमर ।
सकळ राव करिती जयजयकार । पुष्पें सुरवर वर्षती ॥ १०१ ॥
यावरी अंजनीहृदयाब्जमिलिंद । श्रीकरास म्हणे तुजहो आनंद ।
तुझे आठवे पिढीस नंद । जन्मेल गोपराज गोकुळीं ॥ १०२ ॥
त्याचा पुत्र पीतवसन । होईल श्रीकृष्ण कंसदमन ।
शिशुपालांतक कौरवमर्दन । पांडवपाळक गोविंद ॥ १०३ ॥
श्रीहरीच्या अनंत अवतारपंक्ती । मागें झाल्या पुढेंही होती ।
जेवीं जपमाळेचे मणी परतोनी येती । अवतारस्थिती तैसीच ॥ १०४ ॥
कीं संवत्सर मास तिथि वार । तेच परतती वारंवार ।
तैसा अवतार धरी श्रीधर । श्रीकरा सत्य जाण पां ॥ १०५ ॥
ऐसें हरिकुळभूषण बोलून । पावला तेथेंचि अंतर्धान ।
सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य । सभाग्यपण श्रीकराचें ॥ १०६ ॥
ज्याचा गुरु हनुमंत । त्यासी काय न्यून पदार्थ ।
श्रीकर चंद्रसेन नृपनाथ । बोळवीत सर्व भूपांतें ॥ १०७ ॥
वस्त्रें भूषणें देऊनी । बोळविले पावले स्वस्थानीं ।
मग सोमवार प्रदोष प्रीतीकरुनी । श्रीकर चंद्रसेन आचरती ॥ १०८ ॥
शिवरात्रीउत्साह करिती । याचकांचें आर्त पुरविती ।
शिवलीलामृत श्रवण करिती । अंतीं शिवपदाप्रती पावले ॥ १०९ ॥
हा अध्याय करितां पठण । संतति संपत्ति आयुष्यवर्धन ।
शिवार्चनी रत ज्याचें मन । विघ्नें भीती तयासी ॥ ११० ॥
शिवलीलामृतग्रंथवासरमणी । देखोनि विकसती सज्जनकमळिणी ।
जीवशिव चक्रवाकें दोनी । ऐक्या येती प्रीतीनें ॥ १११ ॥
निंदक दुर्जन अभक्त । ते अंधारीं लपती दिवाभात ।
शिवनिंदकांसी वैकुंठनाथ । महानरकांत नेऊनि घाली ॥ ११२ ॥
विष्णुनिंदक जे अपवित्र । त्यांसी कुंभीपाकीं घाली त्रिनेत्र ।
एवं हरिहरनिंदकांसी सूर्यपुत्र । नानाप्रकारें जाच करी ॥ ११३ ॥
ब्रह्मानंदा यतिवर्या । श्रीभक्तकैलासाचळनिवासिया ।
श्रीधरवरदा मृडानीप्रिया । तुझी लीला वदवीं तूं ॥ ११४ ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । चतुर्थाध्याय गोड हा ॥ ११५ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥  
ShriShivaLilamrut Adhyay 4 
श्रीशिवलीलामृत अध्याय चौथा 


Custom Search

No comments: