कहाणी ललितादेवीची
कहाणी ललितापंचमीची
आटपाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण होता. त्याला दोन आवळेजावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईबाप मरुन गेले. भाऊबंदांनी त्यांच काय होते नव्हते ते सगळे हिरावून घेतले. मुलांना देशोधडीस लावले. पुढे ती मुले जातां जातां एका नगरांत आली. दोन प्रहराची वेळ झाली आहे. दोघेही दमून गेले आहेत, भुकेने कळवळले आहेत. तोंड सुकुन गेली आहेत, असे ते दोघे त्या नगरांत आले. इतक्यात एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण काकबळी टाकण्यासाठी घरातून बाहेर आला. त्याने त्या मुलांना पाहिले. आपल्या घरी बोलावून नेले. जेवू घातले. नंतर त्यांची सगळी हकीगत विचारली. त्या मुलांनी आपली सर्व हकिगत त्या ब्राह्मणाला सांगितली. ब्राह्मणाने त्या मुलांना घरी ठेवून घेतले. त्यांना तो वेदाध्यन शिकवू लागला. ती मुलेही वेद शिकू लागली. असे करता करता बरेच दिवस. महिने, वर्ष गेली. पुढे तो ब्राह्मण ललिता पंचमीचे व्रत करु लागला. शिष्यांनी (त्या मुलांनी ) गुरुंना (त्या ब्राह्मणाला ) विचारले. हे आपण काय करत आहात ? तेव्हा गुरुजी म्हणाले हे उपांगललिता पंचमीचे व्रत आहे. ह्यामुळे धन मिळते, विद्या प्राप्त होते. इच्छित हेतु साध्य होतात. हे त्या शिष्यांनी ऐकले. यथाशक्ती त्यांनी व्रत केले. त्यामुळे त्यांना विद्या लवकर प्राप्त झाली. नंतर त्यांची लग्ने झाली. ते आपल्या नगरांत परत आले. श्रिमंत झाले. सुखासमाधानांत राहून विद्येच्या योगे धन व कीर्ती मिळवू लागले.
पुढे काय चमत्कार झाला. दोघे भाऊ वेगळे निघाले. थोरला भाऊ आपला दर वर्षी ललिता पंचमी व्रत करी. त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहीली. धाकट्या भावाने व्रताची हेळसांड केली. त्यामुळे देवीला राग आला. पुढे धाकट्या भावास दारिद्र्य आले. तो बायकेला घेऊन मोठ्या भावाकडे राहायला गेला. एके दिवशी वडिल भावाची बायको दिराला काही बोलली. त्यामुळे त्याला राग आला. मोठा पश्र्चाताप झाला. आपल्या बायकोला म्हणाला, मी उपांगललितेचे व्रत टाकले, त्यामुळे हे फळ मिळाले. आता अपमान सहन करुन इथे राहणे शक्य नाही. मी आता देवीला प्रसन्न करुन घेईन तेव्हांच घरी परत येईन. असे बोलून तो निघून गेला.
पुढे वडिल भावाने त्याचा पुष्कळ शोध घेतला. परंतु तो कांही मिळाला नाही. हा धाकटा भाऊ हिंडत हिंडत एका नगरांत आला. नगराबाहेर त्याला गुराखी भेटले. त्यांना त्याने नगराचे नांव विचारले. कोणता राजा इथे राज्य करतो? उतरायला जागा कोठे मिळेल? ते गुराखी म्हणाले. या गावाचे नांव उपांग आहे. येथे राजाही उपांगच आहे. इथे एक ललितेचे देऊळ आहे. तेथे मोठी धर्मशाळा आहे. तेथे उतरावयास जागा मिळेल. आम्ही त्याच गावांतून आलो आहोत. आम्हाला तिकडेच जायचे आहे. तुम्हालाही आमच्याबरोबर यायचे असेल तर चला.
मग तो त्यांच्याबरोबर नगरांत गेला. धर्मशाळेंत उतरला. देवीचे दर्शन घेतले. अनन्यभावाने तिला शरण गेला. रात्री देवळांतच निजला. देवीने स्वप्नांत येऊन ह्याला दृष्टांत दिला. राजाकडे जा. माझ्या पूजेच्या करंड्याचे झाकण माग. त्याची नेहमी पूजा कर. म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होतील. इतके सांगून देवी गुप्त झाली. दुसरे दिवशी तो राजाकडे गेला. त्याला झालेला देवीचा दृष्टांत त्याने राजाला सांगितला. पूजेंतील देवीच्या करंड्याचे झाकण मागितले. राजाने ते त्याला दिले. ब्राह्मण ते घेऊन घरी आला. त्या देवीच्या करंड्याच्या झाकणाची पूजा करुं लागला. ललितादेवीचे व्रत करुं लागला. तसे परत सुखाचे दिवस आले. त्याचे सर्व इच्छित मनोरथ पूर्ण झाले. पुढे देवीच्या आशिर्वादाने त्याला मुलगी झाली. तीचे नाव त्याने ललिता ठेविले. दिवसेंदिवस ललिता मोठी होऊ लागली. मैत्रिणींबरोबर खेळायला जाऊ लागली.
पुढे काय चमत्कार झाला. एके दिवशी मुलीनेते झाकण घेतले. नदीवर खेळायला गेली. तिथे जाऊन आंघोळ करु लागली. इतक्यांत एक ब्राह्मणाचे प्रेत वाहात आले. हिने त्या झाकणाने त्यावर पाणी उडविले. तसा तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या कृपेने त्याला सुंदर रुप प्राप्त झाले. तिने ते पाहिले. आपल्याला असा पति असावा असे तिला वाटले. आपला हेतु त्याला कळविला. तेव्हा त्याने तिला विचारले ही गोष्ट घडेल कशी ?
तशी ती म्हणाली, मी तुम्हाल घरी जेवायला बोलावते. जेवायच्या वेळी आपोष्णी हातांत घ्या. आणि अडून बसा. बाबा तुम्हांला विचारतील भटजी, भटजी आपोषणी का घेत नाही? तेव्हा तुम्ही सांगा की, आपली कन्या मला द्याल तर जेवतो नाही तर असाच उठतो. म्हणजे ते देतील. त्याप्रमाणे तिने त्याला जेवायला बोलाविले. ब्राह्मणाने आपोषणीला अडून मुलीचा हात मागून घेतला. बापाने मुलगी देण्याचे कबूल केले. सुखासमाधानांत जेवण झाले. पुढे शुभ मुहूर्त पाहून लग्न झाले. बोळवणीच्यावेळी मुलगी देवीच्या प्रसादाचे झाकण घेऊन गेली. त्यामुळे बाप परत दरिद्री झाला. त्याच्या बायको मुलीकडे ते झाकण परत मागितले. पण मुलीने ते दिले नाही. तीने तो राग मनांत ठेवून संधी साधून जावयास मारले व झाकण घेऊन घरी आली.
इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्याईने जावई जिवंत झाला. उठून घरी आला. बायकोला झालेली हकीगत समजली. पुढे ही सर्व हकिगत सासूला समजली. तशी ती जावयाच्या घरी आली. सर्वांच्या पाया पडू लागली. स्वतःचा अपराध कबूल केला. तीला फार पश्र्चाताप झाला. या कर्मामुळेच परत गरिबी आली. तिचा नवरा ही आश्र्चर्य करु लागला की हे असे वारंवार कां होते? ह्याचे कारण त्याच्या लक्षांत येईना. म्हणून तो वडिल भावाकडे गेला. त्याला सर्व हकिगत सांगितली. तो वडिल भाऊ म्हणाला, तूं ललितापंचमी व्रताची हेळसांड करतोस. त्यामुळे हे असे होते. व्रतनेम व्यवस्थित कर. देवीची पूजा कर. म्हणजे तुझे कल्याण होईल. मग लहान भावाने तसेच करण्याचा निश्र्चय केला.घरी आला. यथासांग उपांगललिता व्रत करु लागला. कांही काळाने त्याचे दारिद्र्य गेले, श्रीमंती आली. त्याच्या मनातले सर्व हेतु पूर्ण झाले. तसे तुमचे आमचेही होवोत. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. ललितामातेस वारंवार आमचे नमस्कार असोत.
Custom Search
No comments:
Post a Comment