Wednesday, October 30, 2019

ShriShivlilamrut Adhyay 12 श्रीशिवलिलामृत अध्याय बारावा


ShriShivlilamrut Adhyay 12 
ShriShivlilamrut Adhyay 12 this Adhyay is in Marathi. It is from Skandha Purana, Brahmottar Khanda which is in Sanskrit. Here in this Adhyay the importance of chanting of holy Panchakshri Mantra Om Namaha Shivay is described from the story of Bhula and Vidur. Them the importance of Bhasma in God Shiva pooja is also described. The end of demon Bhasmsoor and Mohini Roop of God Vishnu to kill Bhasmsoor is also in here.
ShriShivlilamrut Adhyay 12 
श्रीशिवलिलामृत अध्याय बारावा

श्रीशिवलिलामृत अध्याय बारावा
श्रीगणेशाय नमः ॥
ब्राह्म्ण क्षत्रिय वैश्य शूद्रवर्ण । ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण ।
स्री बाल वृद्ध तरुण । सर्वीं शिवकिर्तन करावें ॥ १ ॥
शिवस्मरण नावडे अणुमात्र । तो अत्यंजाहूनि अपवित्र ।
तो लेइला वस्त्रें अलंकार । जेवीं प्रेत श्रृगांरिलें ॥ २ ॥
तेणें भक्षिलें जें अन्न । जैसें पशु भक्षिती यथेष्ट तृण ।
जैसे मयूराअंगीं नयन । तैसेचि नेत्र तयाचें ॥ ३ ॥
वल्मीकछिद्रवत कर्ण । द्रुमशाखावत हस्त चरण ।
त्याची जननी व्यर्थ जाण । विऊनी वांझ जाहली ॥ ४ ॥
जो शिवभजनाविण । तो जावोसमुद्रांत बुडोन ।
अथवा भस्म करोवडवाग्न । कां सर्प डंखो तयासी ॥ ५ ॥
तरी श्रवणीं धरावी आवडी । जैसी पिपीलिका गुळासी न सोडी ।
अर्ध तुटे परी न काढी । मुख तेथूनि सर्वदा ॥ ६ ॥
कीं चुकला बहुत दिवस सुत । तेवढाचि पोटीं प्रीतिवंत । 
त्याची शुभवार्ता ऐकतां अकस्मात । धांवती जेवीं मातापिता ॥ ७ ॥
अमृताहूनि व्राड । गोष्टी लागती कर्णासी गोड ।
तैसें कथाश्रवणीं ज्याचें न पुरे कोड । सर्व टाकोनि जाईजे ॥ ८ ॥
गांवासी गेला प्राणनाथ । प्रिया पतिव्रता वाट पाहात ।
तों पत्र आलें अकस्मात । धांवे श्रवण करावया ॥ ९ ॥
निर्धनासी सांपडे धन । कीं जन्मांधासी आले नयन ।
कीं तृषेनें जातां प्राण । शीतळ जीवन मिळालें ॥ १० ॥
ऐसें ऐकावया कथा पुराण । धांवावें सर्व काम टाकून ।
चिंता निद्रा दूर करुन । श्रवणीं सादर बैसावें ॥ ११ ॥
वक्ता पंडित चातुर्यखाणी । नमावा तो सद्गुरु म्हणोनी ।
कीं हा शंकरचि मानूनी । धरिजे पूजनीं आदर ॥ १२ ॥
सुरभीच्या स्तनांतूनि अवधारा । सुटती जैशा सुधारसधारा ।
तैसा वक्ता वदतां शिवचरित्रा । कर्णद्वारें प्राशिजे ॥ १३ ॥
वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावें भलतें पाखंडमत । 
नसते कुतर्क  घेवोनि चित्त । न शिणवावें सर्वथाा ॥ १४ ॥
न कळे तरी पुसावें आदरें । सांगेल तें श्रवण करावें सादरें ।
उगेच छळितां पामरें । तरी ते पिशाचजन्म पावती ॥ १५ ॥
वक्त्यासी छळितां अवधारा । तरी दोष घडे त्या नरा ।
पुराणिकावेगळें नमस्कारा । न करावें सभेंत कोणासी ॥ १६ ॥
मध्येंचि टाकूनि कथाश्रवण । उगाचि गर्वे जाय उठोन ।
तरी अल्पायुषी जाण । संसारीं आपदा बहु भोगी ॥ १७ ॥
कुटिल खळ पापी धूर्त । तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ ।
दुग्ध पितां सर्वांगीं पुष्ट होत । परी नवज्वरिता विषवत ॥ १८ ॥
तैसा श्रवणीं बैसोन । कुतर्क घेवोनि करी कथाखंडण ।
त्याचें व्यर्थ गेलें श्रवण । नरकासी कारण पुढें केलें ॥ १९ ॥
कथेंत न बोलावें इतर । मन करावें एकाग्र ।
कथेची फलश्रुति साचार । तरीच पावती बैसतां ॥ २० ॥
वस्त्रें अलंकार दक्षिणासहित । वक्ता पूजावा प्रीतीं अत्यंत । 
धन देतां कोश बहुत । भरे आपुला निर्धारें ॥ २१ ॥
रत्नें देतां बहुत । नेत्र होती प्रकाशवंत ।
अलंकारें प्रतिष्ठा अत्यंत । श्रोतयांची वाढतसे ॥ २२ ॥
एवं पूजितां षोडशोपचार । तेणें तुष्टमान होय उमावर ।
जे जे पदार्थ अर्पावे साचार । त्यांचे कोटिगुणें प्राप्त होती ॥ २३ ॥
त्यासी कदा नाहीं दरिद्र । शेवटीं स्वपदा नेईल भालचंद्र ।
कथेसी येतां पाउलें  टाकी निर्धार । [आपदासंहार पदोपदीं ॥ २४ ॥
मस्तकीं उष्णीष घालूनि ऐकती । तरी जन्मांतरीं बाळपक्षी होती ।
म्हणाल उष्णीष काढितां नये सभेप्रती । तरी मुख्य पल्लव सोडावा ॥ २५ ॥
जे विडा घेवोनी ऐकती । तरी यमकिंकर त्यांसी जाचिती ।
नाना यातना भोगविती । मूळ व्यासवचन प्रमाण हें ॥ २६ ॥
एक बैसती उगेचि श्रवणीं । निद्रा मोडावी बहुत प्रकारेंकरुनी ।
अंतर सद्गद नेत्रीं यावें पाणी । मग निद्रा कैंची स्पर्शेल ॥ २७ ॥
वरी जीवन काय व्यर्थ लावून । जैसें एकांतीं द्रव्य आपुलें पूर्ण ।
तेथें घडतां जागरण । निद्रा न ये प्राणियां ॥ २८ ॥
निद्रा लागली दारुण । तरी उभें ठाकावें कर जोडून ।
निद्रा न ये तो उपाय करुन । मुख्य श्रवण करावें ॥ २९ ॥
वक्तयाहूनि उंच आसन तत्त्वतां । तेथें न बसावें धरुनि अहंता ।
हें न मानिती ते काग तत्त्वतां । जगपुरीष भक्षिती ॥ ३० ॥
जे बैसती वीरासन घालून । ते होती वृक्ष अर्जुन ।
पाय पसरिती त्यांसी सूर्यनंदन । शुष्ककाष्ठें झोडी बळें ॥ ३१ ॥
जे सांगताही न ऐकती । बळेंचि जेठा घालूनि बैसती ।
त्यांसी यमदूत बांधोनि नेती । नेऊनि टाकिती नरककुंडीं ॥ ३२ ॥
जो श्रवणीं निजे दाटून । तो उपजे अजगर होऊन ।
बैसे नमस्कार केलियावांचून । वंशवृक्ष होय तो ॥ ३३ ॥
कथेंतबोले भलत्या गोष्टी । तो मंडूक होय सदा वटवटी ।
हर्षें टाळिया न वाजवी हटी । होय कष्टी संसारीं ॥ ३४ ॥
जे शिवकिर्तन हेळसिती । ते शतजन्मीं सारमेय होती ।
दुरुत्तरें बोलती निश्र्चितीं । जन्मा येती सरड्याच्या ॥ ३५ ॥
जे श्रवणीं न होती सादर । ते अन्य जन्मीं होती सूकर । 
जे इच्छेदिती शिवचरित्र । ते वृकयोनी पावती ॥ ३६ ॥
वक्त्यासी देतां आसन । शिवसन्निध बैसे जावोन । 
वस्त्रें देतां अन्न । प्राप्त होय तयातें ॥ ३७ ॥
करितां कथापुराणश्रवण । भक्ति वैराग्य ये आंगीं पूर्ण ।
यदर्थीं कथा सुगम जाण । जेणें अनुताप उपजे मनीं ॥ ३८॥
दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ । त्याचें नांव मुळींच बाष्कळ ।
सर्वधर्मविवर्जित केवळ । स्रीपुरुष जारकर्मी ॥ ३९ ॥
धर्म नाहींच अणुमात्र । अनाचारी परमअपवित्र ।
जपतपविवर्जित अग्निहोत्र । वेदशास्त्र कैंचे तेथें ॥ ४० ॥
वेद आणि शास्त्र । हे विप्राचे उभय नेत्र ।
एक नाहीं तरी साचार । एकाक्ष तयासी बोलिजे ॥ ४१ ॥
वेदशास्त्र उभयहीन । तो केवळ अंधचि जाण ।
असो त्या नगरींचे लोक संपूर्ण । सर्वलक्षणीं अपवित्र ॥ ४२ ॥
तस्कर चाहाड आणि जार । मद्यपी मार्गघ्न दुराचार ।
मातापितयांचा द्रोह करणार । एवं सर्वदोषयुक्त जे ॥ ४३ ॥
त्या ग्रामींचा एक विप्र । नाम तयांचें विदुर । 
वेश्येसीं रत अहोरात्र । कामकर्दमीं लोळत ॥ ४४ ॥
त्याची स्री बहुला नाम । तीही जारिणी अपवित्र परम ।
एके जारासीं असतां सकाम । भ्रताारें जपोनि धरियेली ॥ ४५ ॥
जार पळाला सत्वर । तीस भ्रतारें दिधला मार ।
यथेष्ट लत्ता मुष्टिप्रहार । देतां बोले काय ते ॥ ४६ ॥
म्हणे तूं झालासी जार । मीही तेंचि करितें निरंतर ।
मग बोले तो विप्र विदुर । तुवां द्रव्य अपार मेळविलें ॥ ४७ ॥
तें द्रव्य दे मजलागून । मी देईन वारांगनेसी नेऊन ।          
ती म्हणे मी देऊं कोठून । ऐकतां मारी पुढती तो ॥ ४८ ॥
मग तिचे अलंकार हिरोनी घेत । घरची सर्व संपत्ति नेतां ।
ते वारांगनेसी देत । तेही समयीं जारातें ॥ ४९ ॥
ऐसें दोघेंही पाप आचरत । तों विदुर विप्र पावला मृत्य ।
यमदूतीं नेला मारीत । बहुत जाचिती तयातें ॥ ५० ॥
कुंभीपाकादि परम दुःख । भोगूनियां तो शतमूर्ख ।
मग विंध्याचळाच्या दरींत देख । भयानक पिशाच जाहला ॥ ५१ ॥
आळेपिळे आंगासी देत । हिंडे क्षुधातृषापीडित ।
रक्तवर्ण अंग त्याचे समस्त । जेवीं शेंदूर चर्चिला ॥ ५२ ॥
वृक्षासी घेत टांगून । सवेंचि हांक देत फिरे वन ।
रक्तपिती भरोन । सर्वांग त्याचें नासलें ॥ ५३ ॥
कंटकवन परम दुर्धर । न मिळे कदा फळमूळ आहार ।
आपुल्या पापाचे भोग समग्र । भोगी विदुर विप्र तो ॥ ५४ ॥
इकडे बहुला धवरहित । एक होता तियेसी सुत ।
तो कोणापासोनि झाला त्वरित । तें स्मरण नाहीं तियेसी ॥ ५५ ॥
तंव आलें शिवरात्रिपर्व । गोकर्णयात्रेसी चालिले सर्व ।
नानावाद्यें वाजती अभिनव । ध्वज पताका मिरविती ॥ ५६ ॥
शिवनामें गर्जती दास । वारंवार करिती घोष ।
कैंचा उरेल पापलेश । सर्वदा निर्दोष सर्व जन ॥ ५७ ॥
त्यांच्या संगतीं बहुला निघत । सवें घेवोनि धाकटा सुत ।
गोकर्णक्षेत्र देखिलें पुण्यवंत । झालें पुनीत सर्व जन ॥ ५८ ॥
बहुलेनें स्नान करुन । घेतलें महाबळेश्र्वराचें दर्शन ।
पुराणश्रवणीं बैसली येऊन । तों निरुपण निघालें ॥ ५९ ॥
जी वनिता जारीण । तीस यमदूत नेती धरोन ।
लोहपरिघ तप्त करुन । स्मरगृहामाजी घलिती ॥ ६० ॥
ऐसे बहुला ऐकोनी । भयभीत झाली तेचि क्षणीं ।
अनुताप अंगीं भरोनी । रडों लागली अट्टहासें ॥ ६१ ॥
मग पुराणिकासी समस्त । आपुला सांगे वृत्तांत । 
झाले जे जे पापाचे पर्वत । ते निजमुखे उच्चारी ॥ ६२ ॥
अंतकाळीं यमकिंकर । ताडण करितील मज अपार ।
ते वेळीं मज कोण सोडविणार । दुःख अपार सोसूं किती ॥ ६३ ॥
स्वामीं माझें कांपतें शरीर । काय करुं सांगा विचार ।
गळां पाश घालूनि यमकिंकर । करिती मार तप्तशस्त्रें ॥ ६४ ॥
नानापरी विटंबिती । असिपत्रवनीं हिंडविती ।
उफराटें बांधोनि टांगिती । नरककुंडीं अधोमुख ॥ ६५ ॥
ताम्रभूमी तापवून । त्यावरी लोळविती नेऊन ।
तीक्ष्ण शस्त्रें आणोन । पोटामाजी खोंविती ॥ ६६ ॥
तीक्ष्ण धूम्र करुन । वरी टांगिती नेऊन । 
भूमींत मज रोंवून । तप्तशरें मार करिती ॥ ६७ ॥
तप्तशूळावरी घालिती । पायीं चंडशिळा बांधिती ।
महानरकीं बुडविती । सोडवी कोण तेथूनी ॥ ६८ ॥
बहुलेसी गोड न लागे अन्न । दुःखें रडे रात्रंदिन ।
म्हणे मी कोणासी जाऊं शरण । आश्रय धरुं कोणाचा ॥ ६९ ॥
कोण्या नरकीं पडेन जाऊन । मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण ।
सद्गुरु मज तारीं येथून । आलें शरण अनन्य मी ॥ ७० ॥
मग गुरु पंचाक्षर मंत्र । सांगे बहुलेप्रति सत्वर ।
शिवलीलामृत सुरस फार । श्रवण करवी शिवद्वारीं ॥ ७१ ॥
मग तिणें सर्व ग्रंथ । गुरुमुखें ऐकिला प्रेमयुक्त ।
श्रवणभक्ति अवघ्यांत । श्रेष्ठ ऐसें जाणिजे ॥ ७२ ॥
सत्संगें होय निःसंग । निःसंगें निर्मोह सहज मग ।
निर्मोहत्वें निश्र्चित उद्वेग । कैंचा मग तयासी ॥ ७३ ॥
बहुला झाली परम पवित्र । शिवनाम जपेअहोरात्र ।
दोष न उरे तिळमात्र । शुचिर्भूत सर्वदा ॥ ७४ ॥
तव्याचा जाय बुरसा । मग तो सहजचि होय आरसा ।
कीं लोह लागतां परिसा । चामीकर सहजचि ॥ ७५ ॥
कीं अग्नींत काष्ठ पडलें । मग सहजचि अग्निमय झालें । 
गंगेसी वोहळ मिळाले । गंगाजळ सहजचि ॥ ७६ ॥
जप करितां पाप जाय निःशेष । ज्ञानाहूनि ध्यान विशेष ।
श्रवणाहूनि मननास । सतेजता सहजचि ॥ ७७ ॥
मननाहूनि निदिध्यास । त्याहूनि साक्षात्कार समरस ।
मग तो शिवस्वरुप निर्दोष । संशय नाहीं सर्वथा ॥ ७८ ॥
बहुला निर्दोष होऊन । श्रवणें झाली सर्वपावन ।
जिव्हेनें करुं लागली शिवकीर्तन । मग कैंचे बंधन तियेसी ॥ ७९ ॥
श्रवणें थोर पावन होत । श्रवणें याचि जन्मीं मुक्त ।
नलगे तीर्थाटन श्रम बहुत । श्रवणें सार्थक सर्वही ॥ ८० ॥
ज्यासी न मिळे सत्समागम श्रवण । त्याणें करुं जावें तीर्थाटण ।
नलगे अष्टांगयोगसाधन । करावें श्रवण अत्यादरें ॥ ८१ ॥
योग याग व्रत साधन । नलगे कांहींच करावें जाण ।
नवविद्या भक्ति पूर्ण । श्रवणेंचि हाता येतसे ॥ ८२ ॥
चारी वर्ण चारी आश्रम । श्रवणेंचि पावन परम  ।
असो बहुलेसी संतसमागम । सर्वांहूनि थोर वाटे ॥ ८३ ॥
गुरुची सेवा अखंड करी । त्यावरी राहिली गोकर्णक्षेत्रीं ।
जटावल्कलाजिनधारी । तीर्थी करी नित्य स्नान ॥ ८४ ॥
सर्वांगी भस्मलेपन । करीं पुण्यरुद्राक्षधारण ।
सर्व प्राप्त सोडोनियां जाण । गुरुसेवा केली तिणें ॥ ८५ ॥
नित्य गोकर्णलिंगाचें दर्शन । गोकर्णक्षेत्र पुण्यपावन ।
तेथींचा महिमा विशेष पूर्ण । तृतीयाध्यायीं वर्णिला ॥ ८६ ॥
स्वयातिकीर्तिपुष्टीवर्धन । भुलेनें तिन्ही देह जाळून ।
तेंचि भस्म अंगीं चर्चून । झाली पावन शिवरुपी ॥ ८७ ॥
शंकरें विमान धाडिलें तें काळीं । बहुला शिवपदाप्रती नेली ।
एवढी पापीण उद्धरिली । चतुर्दश लोक नवल करिती ॥ ८८ ॥
सदाशिवापुढें जाऊन । बहुलेनें केलें बहुत स्तवन ।
मग अंबेची स्तुति करितां पावन । झाली प्रसन्न हिमनगकन्या ॥ ८९ ॥
म्हणे इच्छित वर माग त्वरित । येरी म्हणे पति पडला अधोगतींत ।
कोठें आहे न कळे निश्र्चित । पावन करोनि आणीं येथें ॥ ९० ॥
मग ते त्रिजगजननी । अंतरीं पाहे विचारुनी ।
तों विंध्याचळी पिशाच होऊनी । रडत हिंडे पापिष्ट ॥ ९१ ॥
मग बहुलेसी म्हणे भवानी । जाईं सवें तुंबर घेऊनी ।
पतीसआणीं विंध्याद्रीहूनी । श्रवण करवीं शिवकथा ॥ ९२ ॥
मग गेली विंध्याचळा । तंव पिशाच नग्न देखिला । 
धरोनि वृक्षासी बांधिला । तुंबरें बळें करोनियां ॥ ९३ ॥
मग वल्लकी काढून । सप्तस्वर मेळवून ।
आरंभिलें शिवकीर्तन । ऐकतां पशुपक्षी उद्धरती ॥ ९४ ॥
शिवकीर्तन रसराज । तुंबरें मात्रा देतां सतेज ।
सावध झाला विदुरद्विज। म्हणे मज सोडा आतां ॥ ९५ ॥
मग सोडितांचि धांवोन धरिले तुंबराचे चरण ।        
म्हणे स्वामी धन्य धन्य । केलें पावन पापियातें ॥ ९६ ॥
स्रियेसी म्हणे धन्य तूं साचार । केला माझा आजि उद्धार । 
मग तुंबरें शिवपंचाक्षर । त्यासी मंत्र उपदेशिला ॥ ९७ ॥
त्याचा करितां जप । तंव विमान आलें सतेजरुप ।
विदुर झाला दिव्यरुप । स्रीसहित विमानीं बैसला॥ ९८ ॥
आणिलीं शिवापाशीं मिरवत। दोघेंहीं शिवचरणीं लागत ।
लवण जळीं विरत । तैसीं मिळत शिवरुपीं ॥ ९९ ॥
जळीं विराली जळगार । नभीं नाद विरे सत्वर । 
तैसीं बहुला आणि विदुर । शिवस्वरुप जाहलीं ॥ १०० ॥
ज्योती मिळाली कर्पूरीं । गंगा सामावलीं सागरीं ।
ब्रह्मस्वरुपीं निर्धारीं । विरालीं ऐक्य होऊनियां ॥ १०१ ॥
शिवमंत्र शिवकथाश्रवण । शिवदीक्षा रुद्राक्षधारण ।
भस्मलेपनें उद्धरोन । गेलीं किती संख्या नाहीं ॥ १०२ ॥
भस्मांतूनि निघाला भस्मासूर । शिवद्रोही परम पामर ।
त्याचा कैसा केला उद्धार । तें चरित्र सांग कैसें ॥ १०३ ॥
हे शिवपुराणीं कथा सुरस । श्रोतीं ऐकावी सावकाश ।
कैलासी असतां महेश । प्रदोषकाळीं एकदां ॥ १०४ ॥
भस्म स्वकरीं घेऊन । आंगीं चर्ची उमारमण ।
तंव एक खडा लागला तों शिवें जाण । भूमीवरी ठेविल ॥ १०५ ॥
नवल शिवाचें चरित्र । तेथेंचि उत्पन्न झाला असुर ।
नाम ठेविलें भस्मासुर । उभा सदा कर जोडूनी ॥ १०६ ॥
म्हणे वृषभध्वजा सदाशिवा । मज कांहीं सांगिजे सेवा ।
शंभु म्हणे मज नित्य येधवां । चिताभस्म आणोनि देइंजे ॥ १०७ ॥
नित्य नूतन आणीं भस्म । हीच सेवा करी उत्तम ।
ऐसी आज्ञा होतां परम । भस्मासुर संतोषला ॥ १०८ ॥
कर्मभूमीस नित्य येवोन । वसुंधरा शोधी संपूर्ण ।
जो शिवभक्त परायण । लिंगार्चन घडलें ज्यासी ॥ १०९ ॥
शिवरात्री सोमवार प्रदोष । सदा ऐके शिवकीर्तन सुरस ।
त्याचेंचि भस्म भवानीश । अंगीकारी आदरें ॥ ११० ॥
जे कां भक्त अभेद प्रेमळ । त्यांच्या मुंडांची करी माळ ।
स्मशानीं वैराग्य वाढे प्रबळ । म्हणोनि दयाळ राहे तेथें ॥ १११ ॥
लोक स्मशानाहूनि घरा येती । वैराग्य जाय विषयीं जडे प्रीती ।
म्हणोनि उमावल्लभें वस्ती । केली महास्मशानीं ॥ ११२ ॥
पंचभूतें तत्त्वांसहित । पिंडब्रह्मांड जाळोनि समस्त ।
सर्व निेरसूनि जें उरत । स्वात्मसुख भस्म तेंचि ॥ ११३ ॥
तेंचि ब्रह्मानंदसुख सोज्वळ । तें भस्म चर्ची दयाळ ।
तो अमूर्तमूर्त कृपाळ । षड्विकाररहित जो ॥ ११४ ॥
अस्ति जायते वर्धते विपरिणमते । अपक्षीयते निधन षड्विकार समस्त ।
शिव परब्रह्म शाश्र्वत । विकाररहित निर्विकार जो ॥ ११५ ॥
जो षडगुणैश्र्वर्यसंपन्न । यशःश्रीकीर्तिविज्ञान ।
औदार्य वैराग्य संपूर्ण । ऐसे कोठें असेना ॥ ११६ ॥
आणिक षट्चिन्हीं मंडित । ती ऐका सर्वज्ञ पंडित ।
कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व । विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पैं ॥ ११७ ॥
या चिन्हीं मंडित शुद्ध । शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद । 
मायाचक्रचाळक शुद्ध । त्रिविधभेदरहित जो ॥ ११८ ॥
भक्तरक्षणार्थ सगुण । शंभु झाला चैतन्यघन ।
तेणें भस्मासुर निर्मून । धाडिला आणावया ॥ ११९ ॥
ऐसें नित्य आणितां चिताभस्म । असुर मातला मदें परम ।
गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम । म्हणे संहारुनियां टाकूं हे ॥ १२० ॥
हे संहारुनियां सकळ । असुराराज्य करावें सबळ ।
जाऊनियां निर्जरमंडळ । शक्र कमलोद्भव जिंकावें ॥ १२१ ॥
विष्णु आणि धूर्जटी । हेही संहारावे शेवटीं ।
त्रिभुवन जिंकिल्यापाठीं । मीच इंद्र होईन ॥ १२२ ॥
ऐसी मनीं बांधोनि गांठी । कैलासा गेला तो कपटी ।
म्हणे ऐकतोस धूर्जटी । भस्म सृष्टीं न मिळे कोठें ॥ १२३ ॥
चार लक्ष मनुष्य योनी पाहे । नित्य सवा लक्ष घडामोड होये ।
शोधिली सर्व अवनी हे । परी भस्म शुद्ध न मिळेचि ॥ १२४ ॥
ऐसी कपटभक्ति दावी परम । म्हणे माझा टळतो नित्यनेम ।
तुज अर्पावें चिताभस्म । तरी एकवर्म सुगम असे ॥ १२५ ॥
म्हणे हरा पंचवदना । विरुपाक्षा त्रिपुरच्छेदना । 
उमावल्लभा नागभूषणा । वरप्रदान दे मातें ॥ १२६॥
मज देई एक वर । ज्याच्या माथां ठेवीन कर ।
तो भस्म व्हावा निर्धार । कार्य फार साधे येणें ॥ १२७ ॥
म्हणोनि लोटांगण घालित । इतुकें माझें चालवीं व्रत ।
निष्कपट शिव भोळानाथ । वर द्यावया सिद्ध झाला ॥ १२८ ॥
मग बोले हिमनगराजकुमारी । हा नष्ट परम दुराचारी । 
यासी वर देतां धरित्री । भस्म करील निर्धारें ॥ १२९ ॥
महाशब्द करावयाची हौस । तो पातला फाल्गुनमास ।
आधींच वाटपाड्या चोरास । निरोप दिधला भूभुजें ॥ १३० ॥
आधींच जारकर्मीं रत। त्यासी प्रभुत्व दिधलें स्रीराज्यांत ।
कीं मद्यपियासी दावीत । सिंदीवन साक्षेपें ॥ १३१ ॥
मर्कटासी मद्यपान । त्यांतझालें वृश्र्चिकदंशन ।
त्याहीवरी भूत संचरलें दारुण । मगअन्योन्य वर्ते जेवीं ॥ १३२ ॥
यालागीं हा तामसी असुर । यास न द्यावा कदापि वर ।
षडास्य गजास्य वीरभद्र । नंदिकेश्र्वर हेंचि सांगे ॥ १३३ ॥
परम भोळा शंकर । आमचें लेंकरुं भस्मासुर ।
यासी द्यावा अगत्य वर । तो अन्यत्र रहाटी न करीच ॥ १३४ ॥
म्हणे बाळकाला तुज दिधला वर । ऐसें ऐकतांचि असुर । 
उडे नाचे आनंदे थोर । त्रिभुवनामाजी न समाये ॥ १३५ ॥
मृत्युलोकासी आला सत्वर । मग करीत चालिला संहार ।
संत भक्त गो विप्र । शोधून भस्म करीतसे ॥ १३६ ॥
मस्तकीं हस्त ठेवितां तत्काळ । भस्म होय न लगे वेळ ।
ऋषिचक्र शोधूनि सकळ । भस्म करी एकदांचि ॥ १३७ ॥
छप्पन्न देश शोधीत । चमूसहित भूभुज समस्त ।
भस्म करी क्षणांत । थोर अनर्थ ओढवला ॥ १३८ ॥
कुटुंबासहित ब्राह्मण । गिरिविवरीं बैसती लपोन ।
पृथ्वी उध्वस्त संपूर्ण । बाहेर कोण न फिरेचि ॥ १३९ ॥
जैसा श्येनपक्षी अकस्मात । पक्षी धरोनि संहारीत ।
तैसा अंतरिक्ष येवोनि त्वरित । मस्तकीं हस्तस्पर्श करी ॥ १४० ॥
महायोद्धा रणपंडित । समरीं जिंकी कृतांत ।
परी भस्मासुरापुढें बलहत । कांहींच न चले युक्ती त्या ॥ १४१ ॥
जैसा पाखांडी खळ तत्वतां । तो नावरे बहुतां पंडितां ।
तैसी त्या असुरापुढें पाहतां । न चले युक्ति कवणाची ॥ १४२ ॥
असुर करितो नित्य संहार । शिवासी न कळे समाचार ।
भस्म नेऊनि दे सत्वर । महानम्र होय तेथें ॥ १४३ ॥
सवेंचि ये मृत्युलोका । मनी धरिला ऐसा आवांका ।
त्रिदशांसहित शचीनायका । भस्म करावें यावरी ॥ १४४ ॥
मग कमलोद्भव कमलाकर । शेवटीं भस्म करावा गंगाधर ।
उमा त्रिभुवनांत सुंदर । हिरोनि घ्यावी वृद्धाची ॥ १४५ ॥
पृथ्वी पडली उद्वस । मिळाल्या प्रजा ऋषि आसमास ।
सर्वांचें भय पावलें मानस । पुरुहुतास शरण आले ॥ १४६ ॥
मग मघवा सकळांसहित । पद्मजाप्रति गार्‍हाणें सांगत ।
तों म्हणे क्षीराब्धिजामात । त्यास सांगूं चला आतां ॥ १४७ ॥
अक्षज नाम इंद्रियज्ञान । तें ज्यानें केलें आधीं दमन ।
म्हणोनि अधोक्षज नाम त्यालागून । अतींद्रियद्रष्टा तो ॥ १४८ ॥
ऐसा जोअधोक्षज । जवळी केला वैकुंठराज ।
गार्‍हाणें सांगती प्रजा द्विज । भस्मासुराचें समस्त ॥ १४९ ॥
मग समस्तांसहित नारायण । शिवाजवळी सांगे वर्तमान । 
भस्मासुरें जाळून । भस्म केले सर्वही ॥ १५० ॥
उरलों आम्ही समस्त । इतुक्यांचाही करील अंत ।
सदाशिवा तुझााही प्रांत । बरा न दिसे आम्हांतें॥ १५१ ॥            
हैमवती करीं जतन । ऐकोनि हांसला भाललोचन । 
म्हणे भस्मासुरासी मरण । जवळीं आलें यावरी ॥ १५२ ॥
तुम्हीं जावें स्वस्थाना सत्वर । ऐसें बोले जों कर्पूरगौर ।
तों अकस्मात आला असुर । भस्म घेऊन तेधवां ॥ १५३ ॥
आपुलें गार्‍हाणें आणिलें येथ । मिळाले ते देखिले समस्त।
असुर मान तुकावीत । सरड्याऐसी तयांवरी ॥ १५४ ॥
म्हणे जे जे आले येथ । उद्यां भस्म करीन समस्त ।
मग क्रोधें बोले उमानाथ । भस्मासुरासी तेधवां ॥ १५५ ॥
अरे तूं अधम असुर । केला पृथ्वीचा संहार । 
तुज आम्हीं दिधला वर । परिणाम त्याचा बरा केला ॥ १५६ ॥
असुर क्रोधें बोले ते समयीं । तुझी सुंदर दारा मज देईं ।
नातरी तव मस्तकीं लवलाहीं । हस्त आतांचि ठेवितों ॥ १५७ ॥
भवानी उठोनि गेली सदनांत । असुर ग्रीवां तुकावीत ।
शिवाच्या माथां ठेवोनि हस्त । तुज नेईन क्षणार्धें ॥ १५८ ॥
शिवमस्तकीं ठेवावया कर । वेगें धांविन्नला भस्मासुर ।
प्रजा आणि ऋषीश्र्वर । पळूं लागले दशदिशां ॥ १५९  ॥
जो भक्तजनभवभंग । मायालाघवी उमारग ।
पळता झाला सवेग । घोरांदर वन घेतलें ॥ १६० ॥
पाठीं लागला भस्मासुर । म्हणे जोगड्या उभा धरीं धीर ।
आजि तुझा करीन संहार । रक्षा लावीन अंगासी ॥ १६१ ॥
वेदशास्त्रां न कळे पार । मायाचक्रचाळक अगोचर ।
त्यासी पार भस्मासुर । धरीन म्हणे निजबळें ॥ १६२ ॥
जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान । सनकादिकांचें देवतार्चन ।
त्यासी भस्मासुर आपण । धरीन म्हणे पुरुषार्थे ॥ १६३ ॥
त्यासी वाटे धरीन मी आतां । दिसे जवळी परी नाटोपे सर्वथा ।
ऐसा कोटिवर्षे धांवतां । न लगे हाता सर्वेश्र्वर ॥ १६४ ॥
उणेपुरे शब्द बोलत । शब्दां नातुडे गिरिजाकांत ।
तर्क कुतर्क करितां बहुत । हांक फोडितां नातुडे ॥ १६५ ॥
वेदशास्त्रांचा तर्क चाचरे । घोकितां शास्त्रज्ञ झाले म्हातारे ।
सकळ विद्या घेतां एकसरें । मदनांतक नाटोपे ॥ १६६ ॥
जे प्रेमळ शुद्ध भाविक । त्यांचा विकला कैलासनायक ।
उमेसहित त्यांचे घरीं देख । वास करी सर्वदा ॥ १६७ ॥
तप बल विद्या धन । या बळें धरुं म्हणती ते मूर्ख पूर्ण ।
कल्पकोटि जन्ममरण । फिरतां गणित न होय ॥ १६८ ॥
असो अहंकारें भस्मासुर । धांवतां नाटोपे शंकर ।
इकडे भवानी इंदिरावर । बंधु आपुला स्तवी तेव्हां ॥ १६९ ॥
म्हणे कमलोद्भवजनका कमलनयना । कमलनाभा सुरमर्दना ।
कमलधारका कमलशयना । कमलाभरणा कमलाप्रिया ॥ १७० ॥
जगद्वंद्या जगद्व्यापका । जनजराज्ममोचका ।
जनार्दना जगरक्षका । जगदुद्धाराजलाब्धिशयना ॥ १७१ ॥
ऐसें ऐकतां माधव । मोहिनीरुप धरोनि अभिनव ।
शिवमनरंजन केशव । आडवा आला असुरातें ॥ १७२ ॥
शिव न्यग्रोध होऊनि देख । दुरुन पाहता झाला कौतुक ।
मोहिनी देखतां असुर निःशंक । भुलोनि गेला तेधवां ॥ १७३ ॥
विमानीं पहाती समस्त देव । म्हणती हें कैंचें रुप अभिनव ।
अष्टनायिकांचें वैभव । चरणांगुष्ठीं न तुळेचि ॥ १७४ ॥
नृत्य करीत मोहिनी । असुर तन्मय झाला देखोनी ।
म्हणे ललने तुजवरुनी । कमला अपर्णा ओंवाळिजे ॥ १७५ ॥
तुझें देखतां वदन । वाटे ओंवाळूनी संडावा प्राण ।
तुवां नयनकटाक्षबाणेंकरुन । मनमृग माझा विंधिला ॥ १७६ ॥
तुझें पदकमळ जेथें उमटलें । तेथें सुवास घ्यावया वसंत लोळे ।
तुवां पसरोनि श्रृंगारजाळें । आकळिलें चित्तमीना ॥ १७७ ॥
मज माळ घालीं सत्वर । तुझें दास्य करीन निरंतर ।
मायावेषधारी मुरहर । हास्यवदनें बोलतसे ॥ १७८ ॥
म्हणे मी तुज वरीम त्वरित । पैल तो न्यग्रोधतरु दिसत । 
माझें त्यांत आहे आराध्य दैवत । नवस तेथें केला म्यां ॥ १७९ ॥
लग्नाआधीं पतिसहित । तेथें करावें गायन नृत्य ।
परी मी जेथें ठेवीन हस्त । तुवां तेथेंचि ठेवावा ॥ १८० ॥
मी जे दावीन हावभाव । तूंही तैसेंच दावीं सर्व । 
तेथें अणुमात्र उणें पडतां देव । क्षोभेल तुजवरी ॥ १८१ ॥
महाखडतर माझें दैवत । सकळ ब्रह्मांड जाळील क्षणांत ।
असुर तियेसी अवश्य म्हणत । सांगसी तैसा वर्तेन मी ॥ १८२ ॥
ऐसा भुलवूनि तयासी । आणिला तो वटच्छायेसी । 
मग नमूनि दैवतासी । आरंभी नृत्य मोहिनी ॥ १८३ ॥
मोहिनी नृत्य करीत । अष्टनायिका तटस्थ पाहत ।
किन्नर गंधर्व तेथ । गायन ऐकतां भुलले ॥ १८४ ॥
देव सर्व षट्पद होऊनी । सुवासा तिच्या वेधूनी ।
गुप्तरुपें गुंजारव करिती वनीं । परी ते कामिनी कोणा नेणवे ॥ १८५  ॥
तिचें सुस्वर ऐकतां गायन । विधिकुरंग गेला भुलोन ।
कुंभिनी सोडूनि करावया श्रवण । कद्रूतनय येऊं पाहे ॥ १८६ ॥
मोहिनी जेथें ठेवी हस्त । असुरही तैसेंच करीत ।
आपुले मस्तकीं ठेवीत । आत्मकर मोहिनी ॥ १८७ ॥
मग असुरेंही शिरीं हात । ठेवितां भस्म झाला तेथ ।
मोहिनीरुप त्यागूनि भगवंत । चतुर्भुज जाहला ॥ १८८ ॥
वटरुप सोडोनि देख । प्रगट झाला तेथें मदनांतक ।
हरिहर भेटले झाले एक । देव वर्षती सुमनमाळा ॥ १८९ ॥
मोहिनीरुप जेव्हा धरिलें । पाहोनि शिवाचें वीर्य द्रवलें ।
भूमीवरी पडतां अष्टभाग झाले । अष्टभैरव अवतार ते ॥ १९० ॥
असितांग रुरु चंड क्रोध । उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध । 
संहारभैरव आठवा सुसिद्ध । अंशावतार शिवाचे ॥ १९१ ॥
भस्मासुर वधिला हे मात । प्रगटतां त्रैलोक्य आनंदभरित ।
हस्त धरोनि रमाउमानाथ । येते झाले कैलासा ॥ १९२ ॥
अंबिका तात्काळ प्रगटोन । करी हरिहरांतें वंदन ।
दोनी मूर्ति बैसवून । करी पूजन हैमवती ॥ १९३ ॥
हरिहर नारायण नागभूषण । शिव सीतावल्लभ नाम सगुण ।
पंचवदन पन्नगशयन । कर्पूरगौर कमलोद्भवपिता ॥ १९४ ॥
पिनाकपाणि पीतांबरधर । नीलकंठ नीरदवर्णशरीर ।
वृंदारकपति वृंदावनासी मधुहर । गोवाहन हरगोविंद ॥ १९५ ॥
चंद्रशेखर शंखचक्रधर । विश्र्वनाथ विश्र्वंभर ।
कपालनेत्र कमनीयगात्र । लीला विचित्र दोघांची ॥ १९६ ॥
मुरहर मायामल्लहर । व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर ।
अंधक मर्दन अघबकहर । असुरमर्दन दोघेही ॥ १९७ ॥
सिद्धेश्र्वर सिंधुजावर । निःसार निरहंकार । 
नगतनयावर नंदकिशोर । ईशान ईश्र्वर इंदिरापती ॥ १९८ ॥
क्षारवर्णतनु क्षीराब्धिशयन । एक ब्रह्मादिवंद्य एक ब्रह्मानंदपूर्ण ।
त्या दोघांसी पूजोन । आनंदमय जगदंबा ॥ १९९ ॥
आतां श्रोते सावधान । पुढें सुरसकथा अमृताहून ।
वीरभद्रजन्म शिवपार्वतीलग्न । आणि षडाननजन्म असे ॥ २०० ॥
शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ । गौतमी स्वर्धुनी भेटों येत ।
या अध्यायीं कैलासवैकुंठनाथ । एके ठायीं मिळाले ॥ २०१ ॥
तरी ह्या सिंहस्थीं भाविक जन । ग्रंथगौतमी करिती स्नान ।
अर्थजीवनीं बुडी देवोन । अघमर्षणीं निमग्न जे ॥ २०२ ॥
श्रीधरस्वामी ब्रह्मानंद । सुखावला तेथेंचि प्रसिद्ध ।
जेथें नाहीं भेदाभेद । अक्षय अभंग सर्वदा ॥ २०३ ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत श्रोते अखंड । द्वादशाध्याय गोड हा ॥ २०४ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
ShriShivlilamrut Adhyay 12
श्रीशिवलिलामृत अध्याय बारावा


Custom Search

No comments: