Sunday, October 3, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 44 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ४४

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 44 
Doha 257 to 262
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ४४ 
दोहा २५७ आणि २६२

दोहा—सब के उर अंतर बसहु जानहु भाउ कुभाउ ।

पुरज जननी भरत हित होइ सो कहिअ उपाउ ॥ २५७ ॥

तुम्ही सर्वांच्या ह्रदयात निवास करता आणि सर्वांचे चांगले-वाईट भाव जाणता. तेव्हा पुरवासी, माता व भरत यांचे भले होईल, असा उपाय सांगा. ॥ २५७ ॥

आरत कहहिं बिचारि न काऊ । सूझ जुआरिहि आपन दाऊ ॥

सुनि मुनि बचन कहत रघुराऊ । नाथ तुम्हारेहि हाथ उपऊ ॥

दुःखी लोक कधी विचार करुन बोलत नाहीत. जुगार्‍याला आपल्या डावाचाच विचार असतो.’ मुनींचे बोलणे ऐकून श्रीरघुनाथ म्हणू लागले-‘ गुरुवर्य ! उपाय तर तुमच्याच हाती आहे. ॥ १ ॥

सब कर हित रुख राउरि राखें । आयसु किएँ मुदित फुर भाषें ॥

प्रथम जो आयसु मो कहुँ होई । माथें मानि करौं सिख सोई ॥

तुमचे मनोगत राखण्यात व तुमची आज्ञा सत्य मानून प्रसन्नतेने तिचे पालन करण्यामध्येच सर्वांचे हित आहे. प्रथम मला जी आज्ञा असेल, ती मी शिरोधार्य मानून त्याप्रमाणे करीन. ॥ २ ॥

पुनि जेहि कहॅं जस कहब गोसाईं । सो सब भॉंति घटिहि सेवकाईं ॥

कह मुनि राम सत्य तुम्ह भाषा । भरत सनेहँ बिचारु न राखा ॥

तसेच हे स्वामी, तुम्ही ज्याला जसे सांगाल तसेच तो सर्व प्रकारे आज्ञेचे पालन करील. ‘ वसिष्ठ मुनी म्हणू लागले, ‘ हे राम, तुम्ही म्हणता ते खरे आहे. परंतु भरताच्या प्रेमापुढे माझा स्वतंत्र विचार टिकू शकत नाही. ॥ ३ ॥

तेहि तें कहउँ बहोरि बहोरी । भरत भगति बस भइ मति मोरी ॥

मोरें जान भरत रुचि राखी । जो कीजिअ सो सुभ सिव साखी ॥

म्हणून मी वारंवार म्हणतो की, माझी बुद्धी भरताच्या भक्तीच्या अधीन झाली आहे. माझ्या मते भरताची आवड सांभाळून जे काही केले जाईल, भगवान शंकर साक्षीला आहेत, ते सर्व शुभच होईल. ॥ ४ ॥

दोहा—भरत बिनय सादर सुनिअ करिअ बिचारु बहोरि ।

करब साधुमत लोकमत नृपनय निगम निचोरि ॥ २५८ ॥

प्रथम भरताची विनंती आदराने ऐकून घ्या, आणि त्यावर विचार करा. नंतर साधुमत, लोकमत, राजनीती आणि वेदांचे सार काढून त्याप्रमाणे करा.’ ॥ २५७ ॥

गुर अनुरागु भरत पर देखी । राम हृदयँ आनंदु बिसेषी ॥

भरतहि धरम धुरंधर जानी । निज सेवक तन मानस बानी ॥

गुरुंचे भरतावरील प्रेम पाहून श्रीरामांच्या मनास विशेष आनंद झाला. भरत हा धर्मधुरंधर व तन-मन-वचनाने आपला सेवक आहे, असे समजून, ॥ १ ॥

बोले गुर आयस अनुकूला । बचन मंजु मृदु मंगलमूला ॥

नाथ सपथ पितु चरन दोहाई । भयउ न भुअन भरत सम भाई ॥

श्रीरामचंद्र गुरुंच्या आज्ञेला अनुकूल, मनोहर, कोमल व कल्याणाचे मूळ असलेले वचन बोलले-‘ हे गुरुवर्य ! मी तुमची शपथ घेऊन व वडिलांच्या चरणांची आण घेऊन सत्य सांगतो की, विश्वामध्ये भरतासारखा भाऊ कोणी झालाच नाही. ॥ २ ॥

जे गुर पद अंबुज अनुरागी । ते लोकहुँ बेदहुँ बड़भागी ॥

राउर जा पर अस अनुरागू । को कहि सकइ भरत कर भागू ॥

जे लोक गुरुंच्या चरण-कमलांच्या ठायी अनुराग बाळगतात, ते लौकिक दृष्ट्या आणि वैदिक पारमार्थिक दृष्ट्या मोठ्या भाग्याचे होत. मग ज्याच्यावर तुमच्यासारख्या गुरुंचे असे प्रेम आहे, त्या भरताच्या भाग्याची वाखाणणी कोण करु शकेल ? ॥ ३ ॥

लखि लघु बंधु बुद्धि सकुचाई । करत बदन पर भरत बड़ाई ॥

भरतु कहहिं सोइ किएँ भलाई । अस कहि राम रहे अरगाई ॥

लहान भाऊ समजून भरताच्या तोंडावर त्याची प्रशंसा करण्यामध्ये माझ्या बुद्धीला संकोच वाटतो. तरीही मी सांगतो की, भरत जे काही सांगेल, त्याप्रमाणे करणे चांगले होय.’ एवढे बोलून श्रीरामचंद्र गप्प बसले. ॥ ४ ॥

दोहा—तब मुनि बोले भरत सन सब सँकोचु तजि तात ।

कृपासिंधु प्रिय बंधु सन कहहु हृदय कै बात ॥ २५९ ॥

तेव्हा मुनी भरताला म्हणाले, ‘ हे पुत्र ! सगळा संकोच सोडून कृपेचा सागर असलेल्या आपल्या प्रिय भावाला आपल्या मनातील विचार सांग. ‘ ॥ २५९ ॥

सुनि मुनि बचन राम रुख पाई । गुरु साहिब अनुकूल अघाई ॥

लखि अपनें सिर सबु छरु भारु । कहि न सकहिं कछु करहिं बिचारु ॥

मुनींचे वचन ऐकून आणि श्रीरामांचा कल पाहून, आणि ते दोघे आपल्याला अनुकूल असल्याचे पाहून, सर्व ओझे आपल्याच शिरावर आहे, असे भरताला वाटले व तो काही बोलू शकला नाही. विचार करु लागला. ॥ १ ॥

पुलकि सरीर सभॉं भए ठाढ़े । नीरज नयन नेह जल बाढ़े ॥

कहब मोर मुनिनाथ निबाहा । एहि तें अधिक कहौं मैं काहा ॥

पुलकित शरीराने तो सभेत उभा राहिला. कमल-नेत्रांतून प्रेमाश्रूंचा पूर आला. तो म्हणाला, ‘ माझे म्हणणे मुनिनाथांनी सांगून टाकले. यापेक्षा जास्त मी काय बोलू ? ॥ २ ॥

मैं जानउँ निज नाथ सुभाऊ । अपराधिहु पर कोह न काऊ ॥

मो पर कृपा सनेहु बिसेषी । खेलत खुनिस न कबहूँ देखी ॥

मी आपल्या स्वामींचा स्वभाव जाणतो. ते अपराध्यावरही कधी रागवत नाहीत. माझ्यावर तर त्यांची खास कृपा आणि प्रीति आहे. मी खेळामध्येही कधी त्यांना नाराज झालेले पाहिले नाही. ॥ ३ ॥

सिसुपन तें परिहरेउँ न संगू । कबहुँ न कीन्ह मोर मन भंगू ॥

मैं प्रभु कृपा रीति जियँ जोही । हारेहुँ खेलु जितावहिं मोही ॥

मी लहानपणापासून त्यांची सोबत सोडत नाही व त्यांनीही माझे मन कधी दुखवले नाही. मी प्रभूंच्या कृपेची रीत चांगल्या प्रकारे पाहिली आहे. खेळात मी हरलो, तरीही प्रभू मला जिंकू देत. ॥ ४ ॥

दोहा—महूँ सनेह सकोच बस सनमुख कही न बैन ।

दरसन तृपित न आजु लगि पेम पिआसे नैन ॥ २६० ॥

मी प्रेमामुळे व संकोचामुळे कधी त्यांच्यासमोर तोंड उघडले नाही. प्रेमाचे भुकेले माझे नेत्र प्रभूंचे दर्शन घेऊन आजवर कधी तृप्त झाले नाहीत. ॥ २६० ॥

बिधि न सकेउ सहि मोर दुलारा । नीच बीचु जननी मिस पारा ॥

यहउ कहत मोहि आजु न सोभा । अपनीं समझि साधु सुचि को भा ॥

परंतु विधात्याला श्रीरामांचे माझ्यावरील प्रेम सहन झाले नाही. त्याने माझ्या दुष्ट मातेच्या निमित्ताने आम्हा दोघांमध्ये अंतर निर्माण केले हे सांगणेही मला आज शोभत नाही; कारण स्वतःच्या समजुतीने कोणी साधू पवित्र झाला आहे काय ? ॥ १ ॥

मातु मंदि मैं साधु सुचाली । उर अस आनत कोटि कुचाली ॥

फरइ कि कोदव बालि सुसाली । मुकता प्रसव कि संबुक काली ॥

माता दुष्ट आहे आणि मी सदाचारी व साधू आहे, असे मनात आणणे हेच कोट्यावधी दुराचारांसारखे आहे. कदन्नाचे कणीस कधी उत्तम भात उत्पन्न करील काय ? काळा शिंपला कधी मोती उत्पन्न करील काय ? ॥ २ ॥

सपनेहुँ दोसक लेसु न काहू । मोर अभाग उदधि अवगाहू ॥

बिनु समुझें निज अघ परिपाकू । जारिउँ जायँ जननि कहि काकू ॥

स्वप्नातही कुणामध्येच दोषाचा लेशमात्रही नाही. माझे दुर्दैव हाच अथांग समुद्र आहे. मी आपल्या पायांचा परिणाम लक्षात न घेता मातेला कटू वचन बोलून विनाकारण दुखावले. ॥ ३ ॥

हृदयँ हेरि हारेउँ सब ओरा । एकहि भॉंति भलेहिं भल मोरा ।

गुर गोसाइँ साहिब सिय रामू । लागत मोहि नीक परिनामू ॥

मी आपल्या मनाला सर्व बाजूंनी धुंडाळून पाहिले व मी हरलो. माझ्या कल्याणाचा एकहि उपाय सुचत नाही. एकाच प्रकारे निश्चितपणे माझे भले होईल. ते म्हणजे गुरुमहाराज सर्वसमर्थ आहेत आणि श्रीसीताराम माझे स्वामी आहेत. यामुळे परिणाम चांगला होईल, असे मला वाटते. ॥ ४ ॥

दोहा—साधु सभॉं गुर प्रभु निकट कहउँ सुथल सतिभाउ ।

प्रेम प्रपंचु कि झूठ फुर जानहिं मुनि रघुराउ ॥ २६१ ॥

या साधूंच्या सभेमध्ये आणि गुरुजी व स्वामींच्या जवळ या पवित्र तीर्थ-स्थानात मी सत्य भावनेने सांगतो. हे प्रेम आहे की कपट ? खोटे आहे की खरे ? हे सर्वज्ञ मुनी वसिष्ठ आणि अन्तर्यामी श्रीरघुनाथ जाणतात. ॥ २६१ ॥

भूपति मरन पेम पनु राखी । जननी कुमति जगतु सबु साखी ॥

देखि न जाहिं बिकल महतारीं । जरहिं दुसह जर पुर नर नारीं ॥

प्रेमाचा पण पाळून पिताजींचे मरण ओढवणे आणि मातेची दुर्बुद्धी, यांच्या साक्षीला हे जग आहे. माता व्याकूळ आहेत, त्यांना पाहावत नाही. अयोध्यापुरीचे स्त्री-पुरुष दुःसह दुःखाने जळत आहेत. ॥ १ ॥

महीं सकल अनरथ कर मूला । सो सुनि समुझि सहिउँ सब सूला ॥

सुनि बन गवनु कीन्ह रघुनाथा । करिमुनि बेष लखन सिय साथा ॥

बिनु पानहिन्ह पयादेहि पाएँ । संकरु साखि रहेउँ एहि घाएँ ॥

बहुरि निहारि निषाद सनेहू । कुलिस कठिन उर भयउ न बेहू ॥

या सर्व अनर्थांचे मूळ मीच आहे. हे ऐकून आणि जाणून घेतल्यापासून मी सर्व दुःख भोगले आहे. श्रीरघुनाथ, लक्ष्मण आणि सीतेसोबत मुनींचा वेष धारण करुन अनवाणी पायी वनात गेले, हे ऐकून भगवान शंकर साक्षीला आहेत की, हा प्रहार झेलूनही मी जिवंत राहिलो. नंतर निषादराजाचे प्रेम पाहूनही माझे हे वज्राहून कठोर हृदय विदीर्ण झाले नाही. ॥ २-३ ॥

अब सबु आँखिन्ह देखेउँ आई । जिअत जीव जड़ सबइ सहाई ॥

जिन्हहि निरखि मग सॉंपिनि बीछी । तजहिं बिषम बिषु तामस तीछी ॥

आता येथे आल्यावर डोळ्यांनी सर्व पाहिले. माझा हा जड जीव जिवंत राहून मला पिडणार. ज्यांना पाहिल्यावर वाटेतील सर्पीण आणि विंचू हेसुद्धा आपले विष व आपला तीव्र क्रोध सोडून देतात, ॥ ४ ॥

दोहा—तेइ रघुनंदनु लखनु सिय अनहित लागे जाहि ।

तासु तनय तजि दुसह दुख दैउ सहावइ काहि ॥ २६२ ॥

तेच रघुनंदन, लक्ष्मण व सीता हे जिला शत्रू वाटले, त्या कैकेयीचा पुत्र असलेल्या मला सोडून दुःसह दुःख दुसर्‍या कोणाला सतावणार ? ॥ २६२ ॥

सुनि अति बिकल भरत बर बानी । आरति प्रीति बिनय नय सानी ॥

सोक मगन सब सभॉं खभारु । मनहुँ कमल बन परेउ तुसारु ॥

अत्यंत व्याकूळ व दुःख, प्रेम, विनय आणि नीती यांनी भरलेली भरताची वाणी ऐकून सर्व लोक शोक-मग्न झाले. सार्‍या सभेत विषाद पसरला. जणू कमलवनावर हिमपात झाला. ॥ १ ॥

कहि अनेक बिधि कथा पुरानी । भरत प्रबोधु कीन्ह मुनि ग्यानी ॥

बोले उचित बचन रघुनंदू । दिनकर कुल कैरव बन चंदू ॥

तेव्हा ज्ञानी मुनी वसिष्ठांनी अनेक प्रकारच्या प्राचीन कथा सांगून भरताचे समाधान केले. नंतर सूर्यकुलरुपी कुमुदवनाला प्रफुल्ल करणारे चंद्रमा श्रीरघुनाथ योग्य प्रकारे सांगू लागले. ॥ २ ॥

तात जायँ जियँ करहु गलानी । ईस अधीन जीव गति जानी ॥

तीनि काल तिभुअन मत मोरें । पुन्यसिलोक तात तर तोरें ॥

‘ हे भरता ! आपल्या मनात तू विनाकारण अपराधीपणा बाळगत आहेस. जीवाची गती ही ईश्र्वराच्या अधीन आहे, हे जाणून घे. माझ्या मते त्रिकालातील व त्रैलोक्यातील सर्व पुण्यात्मे पुरुष हे तुझ्याहून खालचे आहेत. ॥ ३ ॥

उर आनत तुम्ह पर कुटिलाई । जाइ लोकु परलोकु नसाई ॥

दोसु देहिं जननिहि जड़ तेई । जिन्ह गुर साधु सभा नहिं सेई ॥

मनातही तुझ्यावर आरोप केल्यास इहलोक व परलोक हे

 दोन्हीही नष्ट होतील. ते मूर्ख लोकच कैकेयी मातेला दोष

 देतात की, ज्यांनी गुरु व साधूंचा सत्संग केलेला नाही. ॥

 ४ ॥  


Custom Search

Friday, October 1, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 20 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग २०

 

Shri Dnyaneshwari
Adhyay 9 Part 20
Ovya 517 to 535
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग २० 
ओव्या ५१७ ते ५३५

मूळ श्लोक

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।

मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण: ॥ ३४ ॥

३४) माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो, माझा भक्त

 हो; माझें यजन करणारा हो, ( सर्वत्र ) मला ( एकाला )

 वंदन कर. अशा रीतीनें मत्परायण होत्साता ( माझें

 ठिकाणीं ) चित्त योजल्यावर तूं माझ्याप्रतच येशील. 

तूं मन हें मीचि करीं । माझां भजनीं प्रेम धरीं ।

सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें ॥ ५१७ ॥

५१७) तूं आपलें मन मद्रूप कर; माझ्या भजनाच्या ठिकाणीं प्रेम धर; आणि सर्व ठिकाणीं माझेंच स्वरुप आहे, असे समजून मला एकाला नमस्कार कर.

माझेनि अनुसंधानें देख । संकल्पु जाळणें निःशेख ।

मद्याजी चोख । याचि नांव ॥ ५१८ ॥

५१८) पाहा; जो माझ्या वेधानें संकल्प पूर्णपणें जाळतो, त्यालाच माझें चांगलें भजन करणारा म्हणावें. 

ऐसा मियां आधिला होसी । तेथ माझियाचि स्वरुपा पावसी ।

हें अंतःकरणींचें तुजपासीं । बोलिजत असे ॥ ५१९ ॥

५१९) याप्रमाणें तूं माझ्या अंतःकरणांतील ( गुह्य गोष्ट ) तुझ्याजवळ मी सांगत आहे.

अगा आवाघिया चोरिया आपुलें । जें सर्वस्व आम्हीं असे ठेविलें ।

तें पावोनि सुख संचले । होऊनि ठासी ॥ ५२० ॥

५२०) अरे, सर्वांपासून लपवून ठेवलेलें असें जें आमचें सर्व भांडवल, तें तुला प्राप्त झालें आहे त्यामुळें तूं सुखरुप होऊन राहाशील. 

ऐसें सांवळेनि परब्रह्में । भक्तकामकल्पदुमें ।

बोलिलें आत्मारामें । संजयो म्हणे ॥ ५२१ ॥

५२१) भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे कल्पतरु जे मेघश्याम परब्रह्म श्रीकृष्ण, ते असें बोलले, असें संजय म्हणाला.

अहो ऐकिजत असे कीं अवधारा । तंव इया बोला निवांत म्हातारा ।

जैसा म्हैसा नुठी कां पुरा । तैसा उगाचि असे ॥ ५२२ ॥

५२२) ( ज्ञानेश्र्वरमहाराज श्रोत्यांना म्हणतात, ऐका: ) संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐकत आहां काय ? तेव्हां वृद्ध धृतराष्ट्र, ज्याप्रमाणें पाण्याच्या पुरांत असलेला रेडा हालत नाहीं त्याप्रमाणें चित्तांत कांहीहि हालचाल न होतां या बोलण्याविषयीं  निवांत असलेला दिसला.

तेथ संजयें माथा तुकिला । अहा अमृताचा पाऊस वर्षला ।

कीं हा एथ असतुचि गेला । सेजिया गांवा ॥ ५२३ ॥

५२३) त्या वेळी संजयानें मान डोलावली आणि ( आपल्याशीच ) म्हणाला, ‘ अहा ! आज अमृताची वृष्टि झाली; परंतु हा धृतराष्ट्र येथेंच असूनहि शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे.

तर्‍ही दातारु हा आमुचा । म्हणोनि हें बोलतां मैळेल वाचा ।

काइ झालें ययाचा । स्वभावोचि ऐसा ॥ ५२४ ॥

५२४) पण हा आमचा मालक आहे, त्याच्याविषयीं असें बोललें असतां वाचेस दोष लागेल; काय करावें ? याचा स्वभावच  असा आहे.

परि बाप भाग्य माझें । जें वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजें ।

कोसा रक्षिलों मुनिराजें । श्रीव्यासदेवें ॥ ५२५ ॥

५२५) परंतु धन्य माझें भाग्य कीं, महामुनि व्यासदेवांनीं धृतराष्ट्राला युद्धांतील वृत्तान्त सांगावयाच्या निमित्तानें माझें कसें रक्षण केलें ! ( म्हणजे ज्ञानपूर्ण संवादश्रवणानें जन्ममृत्युपासून माझें रक्षण केलें. )    

येतुलें हें वाडें सायासें । जंव बोलत असे दृढें मानसें ।

तंव न धरवेचि आपुलिया ऐसें । सात्त्विकें केलें ॥ ५२६ ॥

५२६) मोठ्या कष्टानें मन आंवरुन धरुन, तो संजय इतकें बोलत होता तोंच अष्ट सात्त्विक भाव उत्पन होऊन, त्यांनीं संजयास असें आपल्या आधीन करुन घेतलें कीं, त्यास ते अष्ट सात्त्विक आवरुन धरवेनात.  

चित्त चाकाटलें आटु घेत । वाचा पांगुळली जेथिंची तेथ ।

आपादकंचुकित । रोमांच आले ॥ ५२७ ॥

५२७) चित्त चकित होऊन आटूं लागलें आणि वाचा जागच्या जागीं कुंठित होऊन राहिली व पायापासून मस्तकापर्यंत अंगरखा घातल्यासारखें सर्व अंगावर रोमांच आले.

अर्धोन्मीलित डोळे वर्पताति आनंदजळें ।

आंतुलिया सुखोमींचेनि बळें । बाहेरि कांपे ॥ ५२८ ॥

५२८) अर्धवट उघडलेले डोळे आनंदाचा वर्षाव करुं लागले व आंत होणार्‍या सुखाच्या लाटेच्या जोरामुळें त्यांचे बाहेरील शरीर कांपू लागलें..

पैं आघवांचि रोगमूळीं । आली स्वेदकणिका निर्मळी ।

लेइला मोतियांचीं कडियाळीं । आवडे तैसा ॥ ५२९ ॥

५२९) सर्व रोमांचांच्या बुडाशीं निर्मळ घामाचे थेंब आले, त्यामुळें जसा एखाद्यानें मोत्यांचा जाळीदार अंगरखा घालावा, तसा तो दिसूं लागला.   

ऐसा महासुखाचेनि अतिरसें । जेथ आटणी होईल जीवदशे ।

तेथें निरोविलें व्यासें । तें नेदीच ॥ ५३० ॥

५३०) याप्रमाणें महासुखाच्या भरानें जेव्हां जीवदशेचीं आटणी होण्याची वेळ आली, तेव्हां व्यासांनीं युद्धवृत्तांत सांगण्याची केलेली आज्ञा ती आटणी होऊं देईना.

आणि कृष्णार्जुनाचें बोलणें । घों करी आलें श्रवणें ।

कीं देहस्मृतीचा तेणें । वापसा केला ॥ ५३१ ॥

५३१) आणि त्यावर श्रीकृष्ण व अर्जुन यांचें बोलणें घों घों अशी गर्जना करीत संजयाच्या कानावर आलें व त्या बोलण्यानें संजयाच्या ठिकाणीं देहस्मृतीचा वाफसा केला. ( संजय देहस्मृतीवर आला. )

तेव्हां नेत्रींचें जळ विसर्जी । सर्वांगींचा स्वेदु परिमार्जी ।

तेवींच अवधान म्हणे हो जी । धृतराष्ट्रातें ॥ ५३२ ॥

५३२) तेव्हां डोळ्यांतील आनंदाश्रु त्यानें पुसले व सर्व अंगास आलेला घाम पुसून टाकला व त्याप्रमाणें ‘ महाराज लक्ष द्या ‘ असें तो धृतराष्ट्राला म्हणाला.

आतां कृष्णवाक्यबीजा निवाडु । आणि संजय सात्त्विकाचा बिवडु ।

म्हणोनि श्रोतया होईल सुरवाडु । प्रमेयपिकाचा ॥ ५३३ ॥

५३३) आतां श्रीकृष्णांची वाक्यें हीच कोणी एक उत्तम बीजें आणि त्यांस संजय हीच अष्ट सात्त्विक भावरुपी पिकाच्या बिवडाची जमीन मिळाली; त्यामुळें श्रोत्यांना प्रमेयपिकाचा सुकाळ होईल.  

अहो अळुमाळ अवधान देयावें । येतुलेनि आनंदाचिया राशीवरी बैसावें ।

बाप श्रवणेंद्रिया दैवें । घातली माळ ॥ ५३४ ॥

५३४) अहो थोडकेसें लक्ष द्यावें आणि एवढ्यानें आनंदाच्या राशीवर बसावें. धन्य आहे त्या कानांची कीं, आज त्यांस भाग्यानें माळ घातली आहे !

म्हणोनि विभूतींचा ठावो । अर्जुना दावील सिद्धांचा रावो ।

तो ऐका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥ ५३५ ॥

५३५) म्हणून ( आपल्या ) विभूतींची जीं स्थानें आहेत, ती सिद्धांचा राजा जो श्रीकृष्ण, तो अर्जुनास दाखवील. निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्र्वर म्हणतात, तो प्रसंग श्रोत्यांनी ऐकावा.

इति श्रीमद् भगवद् गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥ श्लोक ३४; ओव्या ५३५ )

ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।


Custom Search

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 45 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ४५

 

ShriRamCharitManas
AyodhyaKanda Part 45
Doha 263 to 268
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ४५ 
दोहा २६३ ते २६८

दोहा—मिटिहहिं पाप प्रपंच सब अखिल अमंगल भार ।

लोक सुजसु परलोक सुखु सुमिरत नामु तुम्हार ॥ २६३ ॥

हे भरता, तुझे नाम-स्मरण करताच सर्व पापे, अज्ञान आणि अमंगळ यांच्या राशी नष्ट होतील आणि या लोकी सुंदर कीर्ती व परलोकी सुख मिळेल. ॥ २६३ ॥

कहउँ सुभाउ सत्य सिव साखी । भरत भूमि रह राउरि राखी ॥

तात कुतरक करहु जनि जाएँ । बैर पेम नहिं दुरइ दुराएँ ॥

हे भरता, मी भगवान शिवांना साक्षीला ठेवून खरे सांगतो की, ही पृथ्वी तुझ्यावरच आधारित आहे. बाबा रे ! तू विनाकारण खिन्न होऊ नकोस. वैर आणि प्रेम हे लपविल्याने लपत नसते. ॥ १ ॥

मुनिगन निकट बिहग मृग जाहीं । बाधक बधिक बिलोकि पराहीं ॥

हित अनहित पसु पच्छिउ जाना । मानुष तनु गुन ग्यान निधाना ॥

पशु-पक्षी हे मुनींच्याजवळ बिनधास्त जातात, परंतु शिकार्‍याला पाहून पळून जातात. पशु-पक्षीसुद्धा मित्र कोण व शत्रू कोण हे ओळखतात, मग मनुष्य शरीर तर गुण व ज्ञानाचे भांडार आहे. ॥ २ ॥

तात तुम्हहि मैं जानउँ नीकें । करौं काह असमंजस जीकें ॥

राखेउ रायँ सत्य मोहि त्यागी । तनु परिहरेउ पेम पन लागी ॥

वत्सा ! मी तुला चांगला ओळखतो. काय करु. मनाची मोठी द्वि        

द्विधा अवस्था झाली आहे. राजांनी माझा त्याग करुन सत्याचे रक्षण केले आणि माझ्या प्रेमापोटी शरीराचा त्याग केला. ॥ ३ ॥

तासु बचन मेटत मन सोचू । तेहि तें अधिक तुम्हार सँकोचू ॥

ता पर गुर मोहि आयसु दीन्हा । अवसि जो कहहु चहउँ सोइ कीन्हा ॥

त्यांचे वचन खोटे पडू नये, असे मला वाटते. त्याहीपेक्षा तुझी भीड मला जास्त वाटते. शिवाय गुरुजींनी तुझ्या सांगण्याप्रमाणे वागण्याची आज्ञा केली आहे. म्हणून आता तू जे काही सांगशील, त्याप्रमाणे करण्याची माझी इच्छा आहे. ॥ ४ ॥

दोहा—मनु प्रसन्न करि सकुच तजि कहहु करौं सोइ आजु ।

सत्यसंध रघुबर बचन सुनि भा सुखी समाजु ॥ २६४ ॥

तू मन प्रसन्न ठेवून आणि संकोच सोडून जे काही सांगशील, तेच मी आज करीन.’ सत्यप्रतिज्ञ रघुकुल श्रेष्ठ श्रीरामांचे वचन ऐकून सर्व समाज सुखावून गेला. ॥ २६४ ॥

सुर गन सहित सभय सुरराजू । सोचहिं चाहत होन अकाजू ॥

बनत उपाउ करत कछु नाहीं । राम सरन सब गे मन माहीं ॥

देवगणांसह देवराज इंद्र घाबरुन विचार करु लागला की, योजलेले कार्य बिघडू पाहात आहे. काही उपाय करता येत नाही. तेव्हा तो मनातल्या मनात श्रीरामांना शरण गेला. ॥ १ ॥

बहुरि बिचारि परस्पर कहहीं । रघुपति भगत भगति बस अहहीं ॥

सुधि करि अंबरीष दुरबासा । भे सुर सुरपति निपट निरासा ॥

मग ते आपसात विचार करुन म्हणू लागले की, श्रीरघुनाथ हे भक्ताच्या भक्तीला वश असतात. अंबरीष व दुर्वास यांची आठवण झाल्यावर तर देव व इंद्र फारच निराश झाले. ॥ २ ॥

सहे सुरन्ह बहु काल बिषादा । नरहरि किए प्रगट प्रहलादा ॥

लगि लगि कान कहहिं धुनि माथा । अब सुर काज भरत के हाथा ॥

पूर्वी देवांनी फार काळ दुःख भोगले. भक्त प्रल्हादानेच तेव्हा भगवान नृसिंह यांना प्रकट केले. सर्व देव परस्परांच्या कानांत कुजबुजून आणि डोकी हालवून म्हणाले की, ‘ यावेळी देवांचे कार्य भरताच्या हाती आहे. ॥ ३ ॥

आन उपाउ न देखिअ देवा । मानत रामु सुसेवक सेवा ॥

हियँ सपेम सुमिरहु सब भरतहि । निज गुन सील राम बस करतहि ॥

हे देवांनो, आणखी कोणताही उपाय दिसत नाही. श्रीराम हे आपल्या श्रेष्ठ सेवकाची सेवा मान्य करुन त्याच्यावर फार प्रसन्न होतात. म्हणून आपले गुण आणि शील यांनी श्रीरामांना वश करुन घेणार्‍या भरताचे सर्वजण आपापल्या मनात प्रेमाने स्मरण करा. ‘ ॥ ४ ॥

 दोहा—सुनि सुरमत सुरगुर कहेउ भल तुम्हार बड़ भागु ।

सकल सुमंगल मूल जग भरत चरन अनुरागु ॥ २६५ ॥

देवांचे मत ऐकून देवगुरु बृहस्पती म्हणाले, ‘ चांगला विचार केलात. तुमचे भाग्य मोठे आहे. भरताच्या चरणांचे प्रेम हे जगात सर्व मांगल्याचे मूळ आहे. ॥ २६५ ॥

सीतापति सेवक सेवकाई । कामधेनु सय सरिस सुहाई ॥  

भरत भगति तुम्हरें मन आई । तजहु सोच बिधि बात बनाई ॥

सितानाथ श्रीरामांच्या सेवकाची सेवा ही शेकडो कामधेनूंप्रमाणे सुंदर आहे. तुमच्या मनात भरताची भक्ती आली, आता काळजी सोडा. विधात्याने सर्व जुळवून आणले. ॥ १ ॥

देखु देवपति भरत प्रभाऊ । सहज सुभायँ बिबस रघुराऊ ॥

मन थिर करहु देव डरु नाहीं । भरतहि जानि राम परिछाहीं ॥

हे देवराज, भरताचा प्रभाव तर बघा. श्रीरघुनाथ हे मनापासून त्याला पूर्णपणे वश झाले आहेत. हे देवांननो, भरताला श्रीरामांच्या सावलीप्रमाणे अनुकरण करणारा मानून मन शांत ठेवा. घाबरण्याचे काही कारण नाही. ‘ ॥ २ ॥

सुनि सुरगुर सुर संमत सोचू । अंतरजामी प्रभुहि सकोचू ॥

निज सिर भारु भरत जियँ जाना । करत कोटि बिधि उर अनुमाना ॥

बृहस्पती आणि देवांची संमती, तसेच त्यांची काळजी ऐकून अंतर्यामी श्रीरामांना संकोच वाटू लागला. तर भरताला सर्व भार आपल्या शिरी आला, असे मनात वाटले. तो मनामध्ये असंख्य प्रकारचे अंदाज बांधू लागला. ॥ ३ ॥

करि बिचारु मन दीन्ही ठीका । राम रजायस आपन नीका ॥

निज पन तजि राखेउ पनु मोरा । छोहु सनेहु कीन्ह नहिं थोरा ॥

सर्व प्रकारे विचार केल्यावर शेवटी त्याने मनातल्या मनात हेच ठरविले.की, श्रीरामांच्या आज्ञेमध्येच आपले कल्याण आहे. त्यांनी स्वतःची प्रतिज्ञा सोडून माझी प्रतिज्ञा राखली. हे करुन त्यांनी काही कमी कृपा आणि प्रेम केलेले नाही. ॥ ४ ॥

दोहा—कीन्ह अनुग्रह अमित अति सब बिधि सीतानाथ ।

करि प्रनामु बोले भरतु जोरि जलज जुग हाथ ॥ २६६ ॥

श्रीजानकीनाथांनी सर्व प्रकारे माझ्यावर अपार कृपा केलेली आहे. त्यानंतर भरताने दोन्ही करकमल जोडून प्रणाम केला व म्हटले. ॥ २६६ ॥

कहौं कहावौं का अब स्वामी । कृपा अंबुनिधि अंतरजामी ॥

गुर प्रसन्न साहिब अनुकूला । मिटी मलिन मन कलपित सूला ॥

‘ हे स्वामी, हे कृपासागर, हे अंतर्यामी, आता मी अधिक काय सांगू ? आणि काय म्हणवून घेऊ ? गुरुमहाराज प्रसन्न आणि स्वामी हे मला अनुकूल आहेत, हे पाहून माझ्या मलिन मनातील कल्पित दुःख नष्ट झाले. ॥ १ ॥

अपडर डरेउँ न सोच समूलें । रबिहि न दोसु देव दिसि भूलें ॥

मोर अभागु मातु कुटिलाई । बिधि गति बिषम काल कठिनाई ॥

मी उगीचच भ्यालो होतो. माझी चिंता निर्मूळ होती. दिशा विसरल्या तर त्यात हे देवा, सूर्याचा दोष नाही. माझे दुर्भाग्य, माझे दुर्भाग्य, मातेची कुटिलता, विधात्याची वाकडी चाल आणि काळाचा कठोरपणा, ॥ २ ॥

पाउ रोपि सब मिलि मोहि घाला । प्रनतपाल पन अपन पाला ।

यह नइ रीति न राउरि होई । लोकहुँ बेद बिदित नहिं गोई ॥

या सर्वांनी मिळून पाय रोवून मला नष्ट केले. परंतु शरणागताचे रक्षक असलेल्या तुम्ही आपले शरणागताच्या रक्षणाचे ब्रीद पाळून मला वाचवले. ही काही तुमची नवी रीत नाही. ही लोक व वेद यांत प्रत्यक्ष प्रकट आहे. लपून राहिलेली नाही. ॥ ३ ॥

जगु अनभल भल एकु गोसाईं । कहिअ होइ भल कासु भलाईं ॥

देउ देवतरु सरिस सुभाऊ । सनमुख बिमुख न काहुहि काऊ ॥

सारे जग वाईट करणारे असो, परंतु हे स्वामी, केवळ तुम्हीच एक भले करणारे आहात. मग सांगा की, कुणाच्या भलाईमुळे भले होईल ? हे देवा, तुमचा स्वभाव कल्पवृक्षासारखा आहे. तो कधी कुणाला अनुकूल नसतो व प्रतिकूलही नसतो. ॥ ४ ॥

दोहा—जाइ निकट पहिचानि तरु छाहँ समनि सब सोच ।

मागत अभिमत पाव जग राउ रंकु भल पोच ॥ २६७ ॥

त्या कल्पवृक्षाला ओळखून कोणी त्याच्याजवळ गेला, तर त्याची केवळ सावलीच सर्व चिंता नाहीशी करणारी आहे.राजा-रंक, चांगले-वाईट, असे जगातील लोक त्या वृक्षाजवळ मागूनच मन मानेल ती वस्तू प्राप्त करतात. ॥ २६७ ॥

लखि सब बिधि गुर स्वामि सनेहू । मिटेउ छोभु नहिं मन संदेहू ॥

अब करुनाकर कीजिअ सोई । जन हित प्रभु चित छोभु न होई ॥

गुरु आणि स्वामी यांचा सर्व प्रकारे स्नेह असलेला पाहून माझा क्षोभ नाहीसा झाला. मनात कोणताही संशय उरला नाही. हे दयानिधाना, आता असे करा की, त्यामुळे या दासासाठी प्रभूंच्या मनाला क्षोभ होऊ नये. ॥ १ ॥

जो सेवकु साहिबहि सँकोची । निज हित चहइ तासु मति पोची ॥

सेवक हित साहिब सेवकाई । करै सकल सुख लोभ बिहाई ॥

जो सेवक स्वामीला भीड घालून आपले भले व्हावे, असे इच्छितो, त्याची बुद्धी नीच होय. सर्व सुखे व लोभ सोडून स्वामीची सेवा करावी, यातच सेवकाचे हित आहे. ॥ २ ॥

स्वारथु नाथ फिरें सबही का । किएँ रजाइ कोटि बिधि नीका ॥

यह स्वारथ परमारथ सारु । सकल सुकृत फल सुगति सिंगारु ॥

हे नाथ, तुम्ही परत येण्यामध्ये सर्वांचाच स्वार्थ आहे आणि तुमची आज्ञा पाळण्यामध्ये कोट्यावधी प्रकारचे कल्याण आहे. हेच स्वार्थ व परमार्थ यांतील सार आहे. हेच सर्व पुण्यांचे फळ व संपूर्ण शुभ गतींचा शृंगार आहे. ‘ ॥ ३ ॥

देव एक बिनती सुनि मोरी । उचित होइ तस करब बहोरी ॥

तिलक समाजु साजि सबु आना । करिअ सुफल प्रभु जौं मनु माना ॥

हे देव ! तुम्ही माझी एक विनंति ऐकून मग जे योग्य असेल ते करा. रजतिलकासाठी सर्व सामग्री तयार करुन आणली आहे. प्रभूंच्या मनात असेल, तर कृपा करुन तिचा उपयोग करा. ॥ ४ ॥

दोहा—सानुज पठइअ मोहि बन कीजिअ सबहि सनाथ ।

नतरु फेरिअहिं बंधु दोउ नाथ चलौं मैं साथ ॥ २६८ ॥

लहान भाऊ शत्रुघ्नाबरोबर मला वनात पाठवा आणि तुम्ही अयोध्येला परतून सर्वांना सनाथ करा. नाहीतर हे नाथ, लक्ष्मण व शत्रुघ्न या दोघांना पाठवून द्या आणि मला तुमच्याबरोबर येऊ द्या. ॥ २६८ ॥

नतरु जाहिं बन तीनिउ भाई । बहुरिअ सीय सहित रघुराई ॥

जेहि बिधि प्रभु प्रसन्न मन होई । करुना सागर कीजिअ सोई ॥

किंवा आम्ही तिन्ही भाऊ वनात जाऊ आणि हे रघुनाथ ! सीतादेवीसह  आपण अयोध्येला जा. हे दयानिधी ! ज्या रीतीने आपले मन प्रसन्न होईल, ते आपण करा. ॥ १ ॥

देवँ दीन्ह सबु मोहि अभारु । मोरें नीति न धरम बिचारु ॥

कहउँ बचन सब स्वारथ हेतू । रहत न आरत कें चित चेतू ॥

हे देवा, सर्व जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकली. परंतु माझ्यामध्ये नीतीचा विचार नाही की धर्माचा नाही. मी आपल्या स्वार्थासाठी सर्व गोष्टी सांगत आहे. दुःखी मनुष्याच्या मनात विवेक राहात नाही. ॥ २ ॥

उतरु देइ सुनि स्वामि रजाई । सो सेवकु लखि लाज लजाई ॥

अस मैं अवगुन उदधि अगाधू । स्वामि सनेहँ सराहत साधू ॥

स्वामींची आज्ञा ऐकल्यावर जो उलट उत्तर देतो, अशा सेवकाला पाहून लाजेलाही लाज वाटते. मी अवगुणांचा अथांग समुद्र आहे, परंतु स्वामी, तुम्ही मला स्नेहामुळे ‘ साधू ‘ म्हणून माझी वाखाणणी करता. ॥ ३ ॥

अब कृपाल मोहि सो मत भावा । सकुच स्वामि मन जाइँ न पावा ॥

प्रभु पद सपथ कहउँ सति भाऊ । जग मंगल हित एक उपाऊ ॥

हे कृपाळू, ज्यामुळे स्वामींच्या मनाला भीड न पडेल, तोच विचार मला आवडेल. प्रभूंच्या चरणांची शपथ, मी सत्य भावनेने सांगतो की, जगताच्या कल्याणाचा हाच एक उपाय आहे. ॥ ४ ॥ 

  


Custom Search