Showing posts with label :. Show all posts
Showing posts with label :. Show all posts

Friday, June 1, 2018

Samas Aathava Tatva Nirsan समास आठवा तत्वनिरसन


Dashak Satarava Samas Aathava Tatva Nirsan 
Samas Aathava Tatva Nirsan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Pancha Tatva and their nirsan.
समास आठवा तत्वनिरसन  
श्रीराम ॥
नाभीपासून उन्मेषवृत्ती । तेचि परा जाणिजे श्रोतीं ।
ध्वनिरुप पश्यंती । हृदईं वसे ॥ १ ॥
१) बेंबीजवळ जें प्रथम स्फुरण होतें, त्यास परा वाणी म्हणतात. ती स्फूरणरुप वृत्ति हृदयांत येऊन ध्वनिरुप बनते. तिला पश्यन्ति वाणी असें म्हणतात.  
कंठापासून नाद जाला । मध्यमा वाचा बोलिजे त्याला ।
उच्चार होतां अक्षराला । वैखरी बोलिजे ॥ २ ॥
२) हृदयांतील ध्वनि कंठांत येऊन नादाचें रुप धारण करतो. त्यास मध्यमा वाणी असें म्हणतात. जिभेनें नादाचा शब्दरुप उच्चार होतो. त्यास वैखरी वाणी असें म्हणतात. 
नाभिस्थानीं परा वाचा । तोचि ठाव अंतकर्णाचा ।
अंतःकर्णपचंकाचा । निवाडा ऐसा ॥ ३ ॥
३) बेंबीपाशी राहणारी, केवळ स्फुरणरुप असणारी परा वाणी, हेंच अंतःकरणाचें स्थान होय. आतां अंतःकरण पंचकाचें स्वरुप ऐकावें.  
निर्विकल्प जें स्फुरण । उगेंच असतां आठवण ।
तें जाणावें अंतःकर्ण । जाणतीकळा ॥ ४ ॥
४) आपण उगीच बसलों असतां सहज एखादी आठवण व्हावी, त्याचप्रमाणें ज्याच्यामध्यें कल्पना नाहींअसे जें स्फुरण तें अंतःकरण जाणावें. जाणीव किंवा जागृति कळा ती हीच होय. जाणिवेचें अगदी स्वच्छ स्वरुप म्हणजे अंतःकरण होय. कोणत्याही प्रकारचे रुप न घेतलेली आणि केवळ जीवाच्या असणेपणाची आठवण ठेवणारी जी शुद्ध, कल्पनारहित जाणीव तिचें नांव अंतःकरण होय.    
अंतःकर्ण आठवलें । पुढें होये नव्हेसें गमलें ।
करुं न करु ऐसें वाटलें । तेंचि मन ॥ ५ ॥
५) अंतःकरणांत सहज आठवलें तेथें अंतःकरण प्रत्ययास आलें. पण जें आठवलें तें होईल का नाहीं, करावें कां न करावें अशी जाणीवेची दोलायमान स्थिति नंतर झाली, तेंच मन होय.  
संकल्प विकल्प तेंचि मन । जेणेंकरितां अनुमान ।
पुढें निश्र्चयो तो जाण । रुप बुद्धीचें ॥ ६ ॥
६) संकल्पविकल्प करणारी जी जाणीव तेंच मन समजावें. अंतरी जेव्हां अनुमान करणें चालतें. आणि त्यांतूनच जेव्हां निश्र्चय घडतो, तेव्हां जाणीवेला बुद्धीचें रुप आलें असें समजावें. 
करीनचि अथवा न करी । ऐसा निश्र्चयोचि करी ।
तेचि बुद्धि हे अंतरीं । विवेकें जाणावी ॥ ७ ॥
७) " मी हें करीन " किंवा " मी हें करणार नाहीं " असा जी निश्र्चय करते तीच बुद्धि होय. विवेकानें आपल्या अंतर्यामी हें जाणावें.  
जे वस्तुचा निश्र्चये केला । पुढें तेचि चिंतूं लागला ।
तें चित्त बोलिल्या बोला । येथार्थ मानावें ॥ ८ ॥
८) बुद्धीनें ज्या गोष्टीचा निश्र्चय केलेला असतो त्या गोष्टीचें मग चिंतन सुरु होते. असें चिंतन करणें तें चित्त होय. येथें जे सांगितलें आहे तें खरें मानावें. 
पुढें कार्याचा अभिमान धरणें । हें कार्ये तों अगत्य करणें ।
ऐस्या कार्यास प्रवर्तणें । तोचि अहंकार ॥ ९ ॥
९) नंतर त्या कार्याचा अभिमान धरुन " हें कार्य मी अवश्य करीन " अशा आग्रहानें कार्यास आरंभ करणें याचें नांव अहंकार होय. अहंकारामध्यें जाणीवेला एक स्वरुपाचें घट्ट स्वरुप येते. म्हणून त्यामध्यें हट्ट किंवा आग्रह आढळतो. 
ऐसे अंतःकर्णपंचक । पंच वृत्ती मिळोन येक ।
कार्येभागे प्रकारपंचक । वेगळाले ॥ १० ॥  
१०) मूळ अंतःकरण एकच आहे. पण निरनिराळ्या कार्यामुळें एकाच अंतःकरणाची पांच रुपें आढळतात. प्रत्येक रुपाला वृत्ति म्हणतात. पांच वृत्ति मिळून अंतःकरण एकच आहे.    
जैसे पांचहि प्राण । कार्येभागे वेगळाले जाण ।
नाहीं तरी वायोचें लक्षण । येकचि असे ॥ ११ ॥
११) निरनिराळ्या कार्यामुळें पांच प्राण वेगळाले भासतात. परंतु हे वायूचे विभाग आहेत. आणि तो वायु मुळांत एकच असतो. 
सर्वांगीं व्यान नाभीं समान । कंठी उदान गुदीं अपान ।
मुखीं नासिकीं प्राण । नेमस्त जाणावा ॥ १२ ॥
१२)व्यान नांवाचा प्राण सर्वांग व्यापून असतो. समान प्राण नाभीच्या ठिकाणीं राहातो. उदान प्राण कंठात राहतो. अपान प्राण गुदस्थानीं वस्ती करतो. आणि प्रण हा तोंडांत आणि नाकांत राहातो. हें निश्र्चितपणें जाणावें.  
बोलिलें हें प्राणपंचक । आतां ज्ञानइंद्रियेंपंचक ।
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा नासिक । ऐसीं हें ज्ञानेंद्रियें ॥ १३ ॥
१३) प्राणपंचक सांगून झालें. आतां ज्ञानेंद्रियपंचक सांगतो. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक हीं पांच ज्ञानेंद्रियें आहेत. 
वाचा पाणी पाद शिस्न गुद । हे कर्मइंद्रियें प्रसिद्ध ।
शब्द स्परुष रुप रस गंध । ऐसें हें विषयपंचक ॥ १४ ॥
१४) वाणी, हात, पाय, जननेंद्रिय आणि गुद हीं पांच कर्मेंद्रिय म्हणून प्रसिद्ध आहेत. शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध असें पांच विषय आहेत.  
अंतःकर्ण प्राणपंचक । ज्ञानेंद्रियें कर्मेंद्रियें पंचक ।
पांचवें विषयपंचक । ऐसीं हे पांच पंचकें ॥ १५ ॥
१५) अंतःकरणपंचक, प्राणपंचक, ज्ञानेंद्रियपंचक, कर्मेंद्रियपंचक आणि विषयपंचक अशी पांच पंचकें आहेत.  
ऐसे हे पंचविस गुण । मिळोन सूक्ष्म देह जाण ।
याचा कर्दम बोलिला श्रवण । केलें पाहिजे ॥ १६ ॥
१६) या पांच पंचकांची मिळून पंचवीस तत्वें होतात. ही पंचवीस तत्वें एकमेकांत मिसळून सूक्ष्म देह बनतो. या मिश्रणाची माहिती ऐकणें जरुर आहे.   
अंतःकर्ण व्यान श्रवण वाचा । शब्दविषये आकाशाचा ।
पुढें विस्तार वायोचा । बोलिला असे ॥ १७ ॥
१७) अंतःकरण, व्यान, कान, वाणी व शब्द यांचा संबंध आकाशाशी आहे. पुढें वायूचा विस्तार सांगतो.   
मन समान त्वचा पाणी । स्पर्श रुप हा पवनीं ।
ऐसे हे अडाखे साधुनी । कोठा करावा ॥ १८ ॥
१८) मन, समान, त्वचा, हात, स्पर्श व रुप यांचा संबंध वायूशी आहे. असें परस्पर संबंध मनामध्यें जुळवून एक कोष्टक तयार करावें.   
बुद्धि उदान नयेन चरण । रुपविषयाचें दर्शन ।
संकेतें बोलिलें मन । घालून पाहिजे ॥ १९ ॥
१९) बुद्धि, उदान, डोळे, पाय व रुपाचें दर्शन, हें खुणेनें सांगितलें. त्यांत लक्ष घालून विचार करावा. 
चित्त अपान जिव्हा शिस्न । रसविषये आप जाण ।
पुढें ऐका सावधान । पृथ्वीचें रुप ॥ २० ॥
२०) चित्त, अपान, जीभ, जननेंद्रिय आणि रस यांचा संबंध पाण्याशी आहे. आतां पृथ्वीचें रुप सांगतों तें लक्षपूर्वक ऐका.
अहंकार प्राण घ्राण । गुद गंधविषये जाण ।
ऐसें केलें निरुपण । शास्त्रमतें ॥ २१ ॥
२१) अहंकार, प्राण, नाक, गुद आणि गंध यांचा पृथ्वीशी संबंध आहे. शास्त्राच्या आधारानें वरील प्रतिपादन केलेलें आहे.  
ऐसा हा सूक्ष्म देहे । पाहातां होईजे निसंदेहे ।
येथें मन घालून पाहे । त्यासीच हें उमजे ॥ २२ ॥
२२) आपला सूक्ष्मदेह हा असा आहे. तो जर नीट बघितला तर माणूस निःसंदेह होतो. या विषयांत मन घालून जो पाहिल त्यालाच हें बरोबर ध्यानांत येईल.  
ऐसें सूक्ष्म देहे बोलिलें । पुढें स्थूळ निरोपिलें ।
आकाश पंचगुणें वर्तलें । कैसें स्थुळीं ॥ २३ ॥
२३) अशा रीतीनें सूक्ष्मदेहाचे वर्णन केलें. यानंतर स्थूलाचा विचार सांगतो. स्थूलामध्यें आकाश पांच गुणांनी कसें व्यक्त रुप धारण करतें तें आतां सांगतो.   
काम क्रोध शोक मोहो भये । हा पंचविध आकाशाचा अन्वये ।
पुढें पंचविध वायो । निरोपिला ॥ २४ ॥
२४) कान, क्रोध, शोक, मोह, आणि भय या पांच गोष्टींचा आकाशाशीं संबंध असतो. पुढें वायूचे पांच प्रकार सांगतो. 
चळण वळण प्रासारण । निरोध आणि अकोचन ।
हें पंचविध लक्षण । प्रभंजनाचें ॥ २५ ॥
२५) चळण, वळण, प्रसारण, निरोध आणि आकुंचन हें पांच गुण वायूचे आहेत.  
क्षुधा त्रुषा आलस्य निद्रा मैथुन । हे तेजाचे पंचविध गुण ।
आतां पुढें आपलक्षण । निरोपिलें पाहिजे ॥ २६ ॥
२६) भूक, तहान, आळस, झोप, मैथुन हे पांच गुण तेजाचे आहेत. आतां पाण्याचे गुण सांगतो.  
शुक्लीत श्रोणीत लाळ मूत्र स्वेद । हा पंचविध आपाचा भेद ।
पुढें पृथ्वी विशद । केली पाहिजे ॥ २७ ॥
२७) रेत, रक्त, लाळ, मूत्र व घाम हें पाण्याचे पांच भेद आहेत. आतां पृथ्वीचे भेद स्पष्ट करतो.
अस्ति मांष त्वचा नाडी रोम । हे पृथ्वीचे पंचविध धर्म ।
ऐसे स्थूळ देहाचें वर्म । बोलिलें असे ॥ २८ ॥
२८) हाडें, मांस, त्वचा, नाडी व रोम हे पांच पृथ्वीचे धर्म आहेत. असें हें स्थूल देहाचे वर्म सांगितलें.  
पृथ्वी आप तेज वायो आकाश । हे पांचाचे पंचविस ।
ऐसें मिळोन स्थूळ देहास । बोलिजेतें ॥ २९ ॥
२९) पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश यापंचभूतांचे पंचवीस गुण मिळून स्थूल देह बनतो.  
तिसरा देह कारण अज्ञान । चौथा देह माहांकारण ज्ञान ।
हे च्यारी देह निर्शितां विज्ञान । परब्रह्म तें ॥ ३० ॥
३०) तिसरा देह कारण देह होय. हा अज्ञानरुप असतो. चौथा देह माहाकारण देह होय. हा ज्ञानरुप असतो. स्थूल, सूक्ष्म, कारण, व माहाकारण हे चारही देह  निरसन केलें म्हणजे विज्ञान प्राप्त होते. जीव परब्रह्मरुप बनतो.   
विचारें चौदेहावेगळें केलें । मीपण तत्वासरिसें गेलें ।
अनन्य आत्मनिवेदन जालें । परब्रह्मीं ॥ ३१ ॥
३१) विचारानें चौदेहावेगळें व्हावें. तत्वांच्या बरोबर मीपण नाहींसे करावें. म्हणजे परब्रह्माशी अनन्य आत्मनिवेदन साधतें.
विवेकें चुकला जन्म मृत्य । नरदेहीं साधिलें महत्कृत्य ।
भक्तियोगें कृत्यकृत्य । सार्थक जालें ॥ ३२ ॥
३२) आत्मानात्म विवेकानें जन्ममृत्युच्या चक्रांतून सुटका होतें. मरदेहांत येऊन फार मोठें कार्य साधतें. भक्तीच्या योगानें कृतकृत्यता येऊन जन्माचें सार्थक होतें. 
इति श्री पंचीकर्ण । केलेंचि करावें विवर्ण ।
लोहाचें जालें सुवर्ण । परिसाचेनयोगें ॥ ३३ ॥
३३) पंचीकरण येथें संपलें. त्याचे पुनः पुनः विवरण करावें. परिसाशी स्पर्श झाल्यानें लोखंडाचें सोनें होतें. त्याचप्रमाणें पंचीकरण विवेकानें जीव ब्रह्मस्वरुप बनतो. 
हाहि दृष्टांत घडेना । परिसाचेन परीस करवेना ।
शरण जातां साधुजना । साधुच होइजे ॥ ३४ ॥
३४) पण हा दृष्टंत देखील अपुरा आहे. परीसाला परीस बनवता येत नाहीं. पण माणुस साधुला शरण गेला तर तो स्वतः साधु बनतो. साधु स्वतः परब्रह्मस्वरुप असतो. शरणागताला तो स्वतःसारखा परब्रह्मस्वरुप बनवून टाकतो.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तत्वनिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathava Tatva Nirsan
समास आठवा तत्वनिरसन  


Custom Search

Sunday, January 28, 2018

Samas Aathava Antaratma Vivaran समास आठवा अंतरात्मा विवरण


Dashak Aakarava Samas Aathava Antaratma Vivaran 
Samas Aathava Antaratma Vivaran, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us Atma in this Samas
समास आठवा अंतरात्मा विवरण
श्रीराम ॥
आधीं वंदूं सकळकर्ता । समस्त देवांचा जो भर्ता ।
त्याचे भजनीं प्रवर्ता । कोणीतरी ॥ १ ॥
१) सर्व घटनांचा कर्ता, तसेंच सर्व देवांचा मालक असा जो अंतरात्मा त्याचें ज्ञान करुन घेण्याचा कोणीतरी प्रयत्न करावा.
तेणेविण कार्य न चले । पडिलें पर्ण तेंहि न हाले ।
अवघें त्रैलोक्येचि चाले । जयाचेनी ॥ २ ॥  
२) त्याच्याशिवाय कांहींही कार्य होत नाही. त्याच्या सत्तेवाचून झाडाचे पडलेले पानही हालत नाहीं. त्याच्यापासून मिळणार्‍या शक्तीनेंच त्रैलोक्य चालते.  
तो अंतरात्मा सकळांचा । देवदानवमानवांचा ।
चत्वारखाणीचत्वारवाणीचा । प्रवर्तकु ॥ ३ ॥
३) देव, दानव, मानव, चार खाणी व चार वाणी या सर्वांचा प्रवर्तक एकटा तो अंतरात्मा आहे. 
तो येकलाचि सकळां घटीं । करी भिन्नभिन्ना राहाटी ।
सकळ सृष्टीची गोष्टी । किती म्हणौन सांगावी ॥ ४ ॥
४) सर्व प्राण्यांच्या देहामध्यें तोच वास करतो. आणि त्यांना निरनिराळ्या प्रकारे वागायला शक्ति व प्रेरणा देतो. सार्‍या विश्र्वाचे चालन करणार्‍या त्याचें संपूर्ण कर्तृत्व सांगता येणार नाही.  
ऐसा जो गुप्तेश्र्वर । त्यास म्हणावें ईश्र्वर ।
सकळ ऐश्र्वर्य थोर थोर । जयाचेनि भोगिती ॥ ५ ॥
५) असा जो गुप्त मालक आहे त्यालाच ईश्र्वर म्हणतात. त्याच्या सत्तेनेंच लोक मोठी ऐश्र्वर्य भोगतात.  
ऐसा जेणें वोळखिला । तो विश्र्वंभरचि जाला ।
समाधी सहजस्थितीला । कोण पुसे ॥ ६ ॥
६) अशा अंतरात्म्याचें ज्याला ज्ञान होतें तो स्वतः विश्र्वव्यापी विश्र्वंभर बनतो. मग समाधि व सहजस्थिति यांचें कांहीं महत्व उरत नाही. ईश्र्वराशी तदाकार होण्याची स्थिति इतर सर्व अवस्थांच्या मानानें फारच पलीकडची असते. 
अवघें त्रैलोक्य विवरावें । तेव्हां वर्म पडेल ठावें ।
आवचतें घबाड सिणावें । नलगेचि कांहीं ॥ ७ ॥
७) या सगळ्या दृश्य विश्र्वाचे विवरण करीत गेल्यानें अंतरात्म्याचें रहस्य आपोआप आकलन होते. एकाएकी प्रचंड लाभ हातीं येतो. त्यासाठीं निराळे श्रम करावें लागत नाहींत.
पाहातां ऐसा कोण आहे । जो अंतरात्मा विवरोन पाहे ।
अल्प स्वल्प कळोन राहे । समाधानें ॥ ८ ॥
८) बुद्धीनें विवरण करुन अंतरात्म्याचे ज्ञान करुन घेणें कोणासहि शक्य नाही. त्याचे ज्ञान होण्यासाठीं बुद्धीनें धडपडणार्‍यांना त्याचें येवढेंतेवढें ज्ञान होते. व त्यावरच तें समाधान मानतात. 
आरे हें पाहिलेंच पाहावें । विवरलेंचि मागुतें विवरावें ।
वाचिलेंचि वाचावें । पुन्हपुन्हा ॥ ९ ॥
९) अल्पस्वल्प ज्ञानानें अंतरात्म्याचें जें किंचित दर्शन झालें असेल तें वारंवार पुन्हपुन्हा घ्यावे. पुन्हपुन्हा त्याचे विवरण करावें. त्याच्याबद्दल वाचलेले पुन्हपुन्हा वाचावे.   
अंतरात्मा केवढा कैसा । पाहाणाराची कोण दशा ।
देखिल्या ऐकिल्या ऐसा । विवेक सांगे ॥ १० ॥
१०) हा अंतरात्मा केवढा आहे व कसा आहे, त्याला जो पाहातो त्याची दशा काय होते.,याबद्दल जो सांगतो तें अपूर्ण असते. कारण त्यानें जें पाहिले असते व ऐकलेले असतें तेवढेच तो सांगतो. 
उदंड ऐकिलें देखिलें । अंतरात्म्यास नवचे पुरविलें ।
प्राणी देहधारी बाउलें । काये जाणे ॥ ११ ॥
११) माणसानें कितीही ऐकलें आणि पाहिलें तरी अंतरात्म्याचे संपूर्ण वर्णन करण्यास तें पुरें पडत नाही. देहधारी माणूस अनंत व अपार अंतरात्म्यास संपूर्णपणें जाणणे शक्य नसते.  
पूर्णास अपूर्ण पुरेना । कां जें अखंड विवरेना ।
विवरतां विवरतां उरेना । देवावेगळा ॥ १२ ॥
१२) माणूस अपूर्ण तर अंतरात्मा पूर्ण आहे. पूर्णाला अपूर्ण आकलन करुं शकत नाहीं. याचें कारण असें कीं माणूस पूर्णाचे अखंड चिंतन करीत नाही. तसें जर केलें तर माणूस देवाहून वेगळेपणानें उरत नाहीं. 
विभक्तपणें नसावें । तरीच भक्त म्हणवावें ।
नाहींतरी वेर्थचि सिणावें । खटाटोपें ॥ १३ ॥
१३) देवाशी वेगळेपण नसावें. म्हणजेच मग भक्त म्हणून घेणें शोभतें. देवाशीं तादात्म्य साधलें नाहीं तर खटाटोप श्रम व्यर्थ वाया जातात.  
उगाच घर पाहोन गेला । घरधनी नाहीं वोळखिला ।
राज्यामधूनचि आला । परी राजा नेणे ॥ १४ ॥
१४) एक माणूस घर पाहून गेला पण त्यानें घराच्या मालकास पाहिलेंच नाहीं. ओळखलें नाही. दुसरा एक माणूस एका राज्यामधून आला, पण येथील राजा कोण याची चौकशी त्यानें केली नाहीं.  
देहसंगें विषये भोगिले । देहसंगे प्राणी मिरवलें ।
देहधर्त्यास चुकलें । नवल मोठें ॥ १५ ॥
१५) हें जसें घडतें त्याचप्रमाणें माणूस देहाच्या संगतीनें इंद्रियांचे सुख भोगतो, जन्मभर देहाच्या संगतीनें मिरवतो. पण जो अंतरात्मा देहास चालवतो त्याला माणूस जाणत नाहीं. हें एक मोठें नवलच आहे.   
ऐसे लोक अविवेकी । आणि म्हणती आम्ही विवेकी ।
बरें ज्याची जैसी टाकी । तैसें करावें ॥ १६ ॥
१६) अशा रीतीनें लोक विवेकहीन असून देखील स्वतःला मोठे विवेकी म्हणवतात. एकंदरींत ज्याला जशी जगण्याची सवय लागते तसें तो जगतो.  
मूर्ख अंतर राखों नेणे । म्हणौन असावें शाहाणे ।   
ते शाहाणेहि दैन्यवाणे । होऊन गेले ॥ १७ ॥
१७) ज्याला आपलें अंतरंग सांभालता येत नाहीं तो मूर्ख होय. म्हणून माणसानें शहाणपण शिकावें असें म्हणतात. म्हणून शहाण्यास पाहावे तर ते देखील अंतरंगाचें ज्ञान नसल्यानें दिनवाणें झालेलें असतात.  
अंतरीं ठेवणें चुकलें । दारोदारीं धुंडूं लागलें ।  
तैसें अज्ञानास जालें । देव न कळे ॥ १८ ॥
१८) समजा, एखाद्याच्या घरांतच संपत्ती ठेवलेली आहे. ती तो विसरला आणि मग संपत्तीसाठीं दारोदार हिंडूं लागला. त्याच प्रमाणें अज्ञानी माणसाची अवस्था होते. स्वतःच्या अंरंगात असलेला ईश्र्वर त्यास कळत नाहीं, तो त्यास बाहेर शोधायला जातो.   
या देवाचें ध्यान करी । ऐसा कोण सृष्टीवरी ।
वृत्ती येकदेंसी तर्तरी । पवाडेल कोठें ॥ १९ ॥
१९) अनंत अंतरात्म्याचे ध्यान करणारा या विश्र्वांत कोणीही नाही. माणसाची जाणण्याची वृत्ती एकदेशी आहे. तिची झेप दृश्यापर्यंत मर्यादित आहे. अशा स्थळकालांनीं मर्यादित असणार्‍या वृत्तीची चपळता अंतरात्म्याचें ध्यान करण्याइतकी पुरीं पडत नाहीं. 
ब्रह्मांडीं दाटले प्राणी । बहुरुपें बहुवाणी ।
भूगर्भीं आणि पाषाणीं । कितीयेक ॥ २० ॥
२०) या जगामध्यें जीवप्राणी नुसतें गर्दी करुन आहेत. त्यांची रुपें व भाषा नाना तर्‍हांची आहेत. पृथ्वीच्या पोटांत व पाषाणांत देखील असे कितीतरी प्राणी आहेत.  
इतुके ठाईं पुरवला । अनेकीं येकचि वर्तला ।
गुप्त आणि प्रगटला । कितीयेक ॥ २१ ॥
२१) या सर्वांमध्यें अंतरात्मा भरुन पुनः उरला आहे. अशा रीतीनें अनेकांमध्यें एकच एक अंतरात्मा नटला आहे. कांहीं ठिकाणीं तो गुप्त असतो तर कांहीं ठिकाणी तो प्रगटपणें दिसतो. 
चंचळें न होईजे निश्र्चळ । प्रचित जाणावी केवळ ।
चंचळ तें नव्हे निश्र्चळ । परब्रह्म तें ॥ २२ ॥
२२) आपण अशाश्र्वत मायेमध्यें जोपर्यंत आहोत तोपर्यंत शाश्र्वत ब्रह्मवस्तु हस्तगत होणार नाही. प्रत्यक्ष अनुभवानें आपण हें ओळखावें. जें अशाश्र्वत आहें तें शाश्र्वत परब्रह्म मुळींच नव्हें.     
तत्वें तत्व जेंव्हां उडे । तेव्हां देहबुद्धि झडे ।
निर्मळ निश्र्चळ चहुंकडे । निरंजन ॥ २३ ॥
२३) एका तत्वानें दुसर्‍या तत्वाचा जेव्हां निरास होत जातो तेव्हां देहबुद्धीचा क्षय होतो. मग चोहीकडे एक निर्मल, निश्र्चल व निरंजन ब्रह्म अनुभवास येते.  
आपण कोण कोठें कैंचा । ऐसा मार्ग विवेकाचा ।
प्राणी जो स्वयें काचा । त्यास हें  कळेना ॥ २४ ॥
२४) विवेकाचा जो मार्ग आहे त्यामध्यें " मी कोण, मी कोठून आलो व मी कसा आहे  " हे प्रश्र्ण सोडवावे लागतात. जो माणूस स्वतः विवेकानें कच्चा आहे. त्याला हें कळत नाहीं. 
भल्यानें विवेक धरावा । दुस्तर संसार तरावा ।
अचघा वंशचि उधरावा । हरिभक्ती करुनी ॥ २५ ॥
२५) म्हणून भल्या माणसानें विवेकाची कास धरावी. तरण्यास कठीण असा हा संसार विवेकाच्या बळावर तरुन जावा. भगवंताची भक्ती करुन आपल्या वंशाचा उद्धार करावा. 
इति श्रीदासबोधे गुरुशिश्यसंवादे अंतरात्माविवरण नाम समास आठवा ॥
Samas Aathava Antaratma Vivaran  
समास आठवा अंतरात्मा विवरण


Custom Search

Thursday, November 16, 2017

Samas Dahava Sthiti Nirupan समास दहावा स्थितिनिरुपण


Dashak Navava Samas Dahava Sthiti Nirupan 
Samas Dahava Sthiti Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Sthiti. Janiva and Neniva are two sthitis of the people. Janiva means means a person who has become Dyani. Neniva means person who has no knowledge.
समास दहावा स्थितिनिरुपण
श्रीराम ॥
देउळामधें जगन्नाथयेक । आणी देउलावरी बैसला काक ।
परी तो देवाहून अधिक । म्हणों नये कीं  ॥ १ ॥
१) एखाद्या देवळांत गाभार्‍यांत देव व देवळाच्या शिखरावर कावळा बसला तर तो कावळा देवापेक्षां श्रेष्ठ असें कोणी म्हणत नाहीं.
सभा बैसली राजद्वारीं । आणी मर्कट गेलें स्तंभावरी ।
परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरीं । कैसें मानावें ॥ २ ॥
२) राजवाड्यांत राजसभा भरली आहे. अशावेळी सभामंडपाच्या खांबावर माकड चढून बसले तर सभासद खाली बसलेले असून माकड त्यांच्यापेक्षां उंच जागी बसले म्हणून माकडाला सभासदांहून मोठा मानीत नाहीत. 
ब्राह्मण स्नान करुन गेले । आणी बक तैसेंचि बैसले ।
परी ते ब्राह्माणास भले । कैसे मानावे ॥ ३ ॥
३) कांहीं ब्राह्मण तळ्यावर स्नान करुन व ध्यान करुन गेले. तेथेंच बगळेसुद्धा डोळें बंद करुन बसून राहीले. तर त्यांना ब्राह्मणांहून श्रेष्ठ मानता येत नाहीत.  
ब्राह्मणामधें कोणी नेमस्त । कोणी जाले अव्यावेस्त ।
आणी स्वान सदा ध्यानस्त । परी तें उत्तम नव्हे ॥ ४ ॥
४) ब्राह्मणांमधें कांहींजण नियम पाळणारे तर कांहीं न पाळणारे अव्यवस्थित आहेत. कुत्रा तर सदा ध्यानस्त बसलेला. तरी तो कांहीं ब्राह्मणांहून श्रेष्ठ मानता येत नाही. 
ब्राह्मण लक्षमुद्रा नेणें । मार्जर लक्षविषईं शाहाणें ।
परी ब्राह्मणापरीस विशेष कोणें । म्हणावें तयासी ॥ ५ ॥
५) एखाद्या वस्तूकडे एकाग्र होऊन बघण्याची संवय कित्येक ब्राह्मणांपाशी नसते. पण मांजर एखाद्या वस्तुकडे एकाग्र होऊन बघूं शकते म्हणून तें कांहीं ब्राह्मणांपेक्षां श्रेष्ठ मानता येत नाही. 
ब्राह्मण पाहे भेदाभेद । मक्षिका सर्वांस अभेद । 
परी तीस जाला ज्ञानबोध । हें तो न घडे कीं ॥ ६ ॥
६) ब्राह्मण भेदाभेद पाहून वागतो. पण माशी कोणताही भेद पाळत नाहीं. तिला उकिरडा व उत्तम अन्न दोन्ही सारखेंच असतात. असें असलें तरी माशीला आत्मज्ञान झालें असें कधी होत नाही. 
उंच वस्त्रें नीच ल्याला । आणि समर्थ उघडाच बैसला ।
परी तो आहे परीक्षिला । परीक्षवंतीं ॥ ७ ॥
७) समजा, एखाद्या कनिष्ठ प्रतीच्या माणसानें भारी कपडे घातले आहेत व एखादा थोर पुरुष उघडाच बसला आहे. तर खरी परीक्षा करणारे जाणते लोक श्रेष्ठ कोण व कनिष्ठ कोण हें बरोबर ओळखतात.  
बाह्याकार केला अधीक । परी तो अवघा लोकिक ।
येथें पाहिजे मुख्य येक । अंतरनिष्ठा ॥ ८ ॥
८) बाहेरुन पुष्कळ देखावा केला तर तो व्यवहारांत चालतो. पण परमार्थांत मुख्य अंतर्निष्ठा लागते. ती नसेल तर परमार्थ लटका पडतो. अंतर्निष्ठा म्हणजे आत्मनिष्ठा होय.  
लोकिक बरा संपादिला । परी अंतरीं सावध नाहीं जाला ।
मुख्य देवास चुकला । तो आत्मघातकी ॥ ९ ॥
९) एखाद्यानें व्यवहारांमध्यें उत्तम लौकिक मिळवला. पण अंतर्यामींच्या स्वरुपाकडे लक्ष दिलें नाहीं, तर मुख्य देव त्यास प्राप्त होत नाहीं. असा मनुष्य आत्मघातकी होय. तो स्वतःच स्वतःचा घात करुन घेतो. 
देवास भजतां देवलोक । पित्रांस भजतां पित्रलोक ।
भूतांस भजतां भूतलोक । पाविजेतो ॥ १० ॥
१०) देवतांची उपासना केली तर देवलोक मिळतो. पितरांची उपासना केली तर पितृलोक मिळतो. भूतांची उपासना केली तर भूतलोक मिळतो.
जेणें जयास भजावें । तेणें त्या लोकासी जावें ।
निर्गुणीं भजतां व्हावें । निर्गुणचि स्वयें ॥ ११ ॥
११) जो ज्याची उपासना करतो त्यास तो लोक मिळतो. निर्गुणाची उपासाना केल्यास माणूस स्वतः निर्गुणी बनतो. 
निर्गुणाचें कैसें भजन । निर्गुणीं असावें अनन्य ।
अनन्य होतां होईजे धन्य । निश्र्चयेंसीं ॥ १२ ॥
१२) श्रोत्यांनी विचारलें निर्गुणाची उपासना कशी करावी ? वक्त्यानें सांगितलें कीं, आपण निर्गुणाशी अनन्य व्हावें, मीपणा बाजूस सारुन त्यांत मिसळून जावें. अशा रीतीनें निर्गुणाशी समरस होणारा निश्र्चितपणें धन्य होऊन जातो.   
सकळ केलियाचें सार्थक । देव वोळखावा येक ।
आपण कोण हा विवेक । पाहिला पाहिजे ॥ १३ ॥
१३) एक देव ओळखण्यामध्यें जीवनांतील सगळ्या खटपटीचें सार्थक आहे.  मी कोण आहे ? यावर सूक्ष्म विचार करावा.  
देव पाहातां निराकार । आपला तों माईक विचार ।
सोहं आत्मा हा निर्धार । बाणोन गेला ॥ १४ ॥   
१४) देव पाहावा तर तो निर्गुण व निराकार आहे. मीपणाचा विचार केला तर तो खरा नाहीं. अशा रीतीनें खोल विचार केला तर  " मी तोच आहे. मी आत्माच आहे. असा निःसंशय निर्धार अंगीं बाणतो.      
आतां अनुमान तो काई । वस्तु आहे वस्तुचा ठाईं ।
देहभाव कांहींच नाहीं । धांडोळितां ॥ १५ ॥
१५) मग कल्पना करण्याची गरज नसते. ब्रह्म जसें आहे. तसेंच स्वस्थानीं निःश्चल असतें. त्याच्यावर आरोपलेल्या देहबुद्धीचा शोध केला कीं, ती खरी नाहीं. असा अनुभव येतो.  
सिद्धास आणी साधन । हा तों अवघाच अनुमान ।
मुक्तास आणी बंधन । आडळेना ॥ १६ ॥
१६) " मी आत्माच आहे " असा साक्षात्कार होऊन जो सिद्ध बनला त्यास साधन चिकटवणें म्हणजे केवळ कल्पना होय. जो खरोखर मुक्त झाला त्याला साधनाचें बंधन असणें शक्य नाहीं.   
साधनें जें कांहीं साधावें । तें तों आपणचि स्वभावें ।
आतां साधकाच्या नावें । सुन्याकार ॥ १७ ॥
१७) साधन करुन जें कांहीं साधायचें तें आत्मस्वरुप स्वतःच बनल्यावर साधन संपतें. तेथें साधकावस्था संपते.
कुल्लाळ पावला राजपदवी । आतां रासभें कासया राखावीं ।
कुल्लाळपणाची उठाठेवी । कासया पाहिजे ॥ १८ ॥
१८) समजा एका कुंभाराला राज्यपद मिळालें तर तो गाढवें सांभळण्याचें काम करत नाहीं. कुंभाराच्या व्यवसायाची उठाठेव तो करत नाहीं. 
तैसा अवघा वृत्तीभाव । नाना साधनांचा उपाव ।
साध्य जालियां कैंचा ठाव । साधनांसी ॥ १९ ॥
१९) त्याचप्रमाणें कोनतेही साधन करायचें म्हणजे त्याचा वृत्तीशी अती निकट संबंध असतो. आणि आत्मस्वरुप बनण्यासाठीं वृत्तीरहित व्हावें लागतें. यामुळें आत्मज्ञान साध्य झाल्यावर वृत्ति निर्माण होत नाहीं म्हणून साधन होऊं शकत नाहीं.  
साधनें काये साधावें । नेमें काये फळ घ्यावें ।
आपण वस्तु भरंगळावें । कासयासी ॥ २० ॥
२०) साधनानें आपल्याला काय साधावयाचें आहे. आणि नियमानें वागून आपल्याला कोणते फळ मिळवायचे आहे. याबद्दल आपला समज अगदी स्वच्छ व योग्य असावा. आपण आत्मस्वरुप असल्यानें उगीच भलत्या कल्पनांनी चूकीच्या मार्गानें जाऊं नये.  
देह तरी पांचा भूतांचा । जीव तरी अंश ब्रह्मींचा ।
परमात्मा तरी अनन्याचा । ठाव पाहा ॥ २१ ॥
२१) देहाचा विचार केला तर तो आहे पांच भूतांचा. जीवाचा विचार केला तर तर तो अंश आहे ब्रह्माचा. आणि जो अनन्य होतो तोच परमात्म्यापर्यंत पोहोचतो हें लक्षांत ठेवावें.  
उगेंचि पाहातां मीपण दिसे । शोध घेता कांहींच नसे ।
तत्वें तत्व निरसे । पुढें निखळ आत्मा ॥ २२ ॥
२२) उगीच पाहिलें तर मीपण दिसते. पण विचारानें त्याचा शोध घ्यावयास गेल्यावर तें खरें नाहीं असें आढळतें. एका तत्वानें दुसर्‍या तत्वाचें निरसन करत गेले असतां सगळें दृश्य खरें नाहीं असे अनुभवास येते. नंतर शुद्ध निर्भेळ आत्मस्वरुप तेवढें शिल्लक उरते.  
आत्मा आहे आत्मपणें । जीव आहे जीवपणें ।
माया आहे मायापणें । विस्तारली ॥ २३ ॥
२३) आत्मा- स्वस्वरुप हे आत्मपणानें असतें. जीव जीवपणानें राहतो. माया मिथ्यापणानें सगळीकडें पसरुन राहते.  
ऐसें अवघेंचि आहे । आणी आपण हि कोणीयेक आहे ।
हें सकळ शोधून पाहे । तोचि ज्ञानी ॥ २४ ॥  
२४) असें हें सगळें आहेपणानें दिसतें. आणि त्याचबरोबर मी कोणीतरी एक आहे असें वाटतें. यांपैकी खरें आहेपण कशाला आहे, शुद्ध अस्तित्व किंवा खरेपण कोणास आहे, हे शोधून काढतो तो खरा ज्ञानी होय.  
शोधूं जाणें सकळांसी । परी पाहों नेणे आपणासी ।
ऐसा ज्ञानी येकदेसी । वृत्तीरुपें ॥ २५ ॥
२५) ज्ञाता आणि ज्ञेय यांच्या द्वैतामध्यें वावरणारा शोधक ज्ञेयरुपानें पुढें येणारें सर्व जग जाणतो. त्याचा शोध घेतो. पण मीपणानें जगाचा शोध घेणारा जो ज्ञाता त्याचा शोध कोणी करत नाहीं. जगाचें ज्ञान वृत्तिरुप असल्यानें मीपणाचा शोध न घेणारा ज्ञाता अपूर्णज्ञानी समजावा.    
तें वृत्तिरुप जरी पाहिलें । तरी मग कांहींच नाहीं राहिलें ।
प्रकृतिनिरासें अवघें चि गेलें । विकारवंत ॥ २६ ॥
२६) देहबुद्धीचे ज्ञान वृत्तिरुप असतें. त्या वृत्तिचें नीट परीक्षण केलें तर सगळ्या वृत्ति कल्पनेनें भरलेल्या आहेत हें लक्षांत येईल. कल्पनेनें निर्माण केलेलें खरें असूं शकत नाहीं. अशा रीतीनें प्रकृतीनें निर्माण केलेलें सर्व दृश्य विकारवंत व चंचल म्हणून खोटें ठरते.  
उरलें तें निखळ निर्गुण । विवंचितां तेंचि आपण ।
ऐसी परमार्थाची खूण । अगाध आहे ॥ २७ ॥
२७) एकदेशी व परिछिन्न दृश्य लय पावलें कीं शेवटी केवळ शुद्ध निर्गुण स्वस्वरुप उरते. अधिक विवेक केल्यास तें स्वरुप आपण स्वतः आहोत असा आत्मसाक्षात्कार होतो. परमार्थाची ही अशी अत्यंत खोल व गहन खूण आहे. 
फळ येक आपण येक । ऐसा नाहीं हा विवेक ।
फळाचें फळ कोणीयेक । स्वयेंचि होईजे ॥ २८ ॥
२८) परमार्थाचा विचार वेगळा आहे. वस्तु जाणणारा ज्ञाता आणि जाणायची वस्तु ज्ञेय ही दोन्ही या विचारांमध्यें वेगळे राहात नाहीत. या विचारामध्यें ज्ञाता स्वतः ज्ञेयरुप बनून जातो. ज्ञाता ज्ञेयाशी अनन्य होऊन तें ज्ञान घडते.  
रंक होता राजा जाला । बरें पाहातां प्रत्यये आला ।
रंकपणाचा गल्बला । रंकीं करावा ॥ २९ ॥
२९) एक भिकारी होता. तो राजा झाला. आपण खरोखर राजे आहोत असा त्यास अनुभव आला. मग भिकारीपणाची धडपड करणें त्यास शोभणार नाहीं. त्याचप्रमाणें आत्मज्ञानी पुरुष वृत्तिरुप ज्ञानाची धडपड करणार नाहीं. 
वेद शास्त्रें पुराणें । नाना साधनें निरुपणें ।
सिद्ध साधु ज्याकारणें । नाना सायास करिती ॥ ३० ॥ 
३०) वेद, शास्त्रें, पुराणें, नाना प्रकारची साधनें, निरुपणें, सिद्ध आणी साधु ज्याची प्राप्ती व्हावी यासाठी धडपडतात, 
तें ब्रह्मरुप आपणचि आंगें । सारासारविचारप्रसंगें ।
करणें न करणें वाउगें । कांहींच नाहीं ॥ ३१ ॥
३१) तें ब्रह्मस्वरुप आपण स्वतःच आहोंत असा अनुभव आल्यानंतर कर्म-अकर्माची समस्या उरत नाहीं. प्रसंग आला असतां सारासार विचार करुन हें करणें बरें कीं तें करणें बरें हा प्रश्र्ण लटका होऊन कांहीं कर्तव्यच शिल्लक उरत नाही.    
रंक राजआज्ञेसि भ्याले । तेंचि पुढें राजा जालें ।
मग तें भयेचि उडालें । रंकपणासरिसें ॥ ३२ ॥
३२) एक गरिब माणूस राजाज्ञेला भीत असे. पुढें तो स्वतःच राजा झाला. राजा होताक्षणीच त्याची गरीबी जशी नाहीशीं झाली तसें त्याचे भयही नाहीसें झाले. 
वेदें वेदाज्ञेने चालावें । सच्छास्त्रें शास्त्र अभ्यासावें ।
तीर्थें तीर्थास जावें । कोण्या प्रकारें ॥ ३३ ॥
३३)  आत्मज्ञानी पुरुष स्वतः वेदशास्त्रांचे मूळ बनतो. तीर्थस्वरुप होतो. वेदानें वेदांची आज्ञा पाळावीत. वेदांतशास्त्रानें शास्त्रांचा अभ्यास करावा, तीर्थानें तीर्थयात्रा करावी, हे जसें अशक्य व अयोग्य असते तसें ज्ञानी पुरुषास दृश्याची बंधनें किंवा मर्यादा घालणें योग्य नसतें.    
अमृतें सेवावें अमृत । अनंतें पाहावा अनंत ।
भगवंतें लक्षावा भगवंत । कोण्या प्रकारें ॥ ३४ ॥
३४) तसेंच अमृतानें अमृत प्यावें. अनंतानें अनंत पाहावा. भगवंतानें भगवंताचे ध्यान करावें. हें घडणें शक्य नसतें.  
संतें असंत त्यागावे । निर्गुणें निर्गुणासी भंगावें ।
स्वरुपें स्वरुपीं रंगावें । कोण्या प्रकारें ॥ ३५ ॥
३५) संत म्हणजे सदा, सर्वत्र पूर्णपणें व्यापून असणारें ब्रह्मस्वरुप होय. असंत म्हणजे जें कधी नव्हतेंच नव्हतें तें भासरुप होय. जे सदा आहेच आहे त्याने जे कदा नाहींच नाहीं तें टाकावें, निर्गुणानें निर्गुणाचा भंग करावा. स्वस्वरुपानें स्वरुपामध्येंच रंगून जावें , हें घडणें शक्य नसतें.   
अंजनें ल्यावें अंजन । धनें साधावें धन ।
निरंजनें निरंजन । कैसें अनुभवावें ॥ ३६ ॥
३६) अंजनानें स्वतःला अंजन घालावें. धनानेंच धनाची प्राप्ती करुन घ्यावी. शुद्ध परमात्मस्वरुपानें तशाच परमात्स्वरुपाचा अनुभव घ्यावा. हें घडणें शक्य नसतें.   
साध्य करावें साधनासी । ध्येंयें धरावें ध्यानासी ।
उन्मनें आवरावें मनासी । कोण्या प्रकारें ॥ ३७ ॥
३७) जें स्वतः साध्य आहे त्यानेंच साधना करावी. जें स्वतः ध्येय आहे त्यानेंच घ्यान लावावें. जो स्वतः उन्मन बनला आहे त्यानें मन आवरावें या गोष्टी घडणें शक्य नसतें. संगण्याचा भावार्थ असा कीं, आत्मसाक्षात्कारी ज्ञानी पुरुष त्रिगुणांच्या व पंचमहाभूतांच्या कक्षेपलीकडे गेलेला असतो. दृश्याच्या सार्‍या कल्पना तेथें लटक्या पडतात. आपण त्याच्याबद्दल जी जी कांहीं कल्पना करुं ती देहबुद्धीची असल्यानें द्वैतप्रधान असते. आणि तो तर संपूर्ण अद्वैतसाम्राज्यांत राहतो. म्हणून अशा परस्पर विरोधी भाषेनें त्याच्या स्थितिची कल्पना द्यावी लागते.     
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्थितिनिरुपणनाम समास दहावा ॥ 
Samas Dahava  Sthiti Nirupan
समास दहावा स्थितिनिरुपण


Custom Search

Saturday, October 28, 2017

Samas Pahila Aakaksha समास पहिला आशंकानाम


Dashak Navava Samas Pahila Aakaksha 
Samas Pahila Aakaksha, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us what is Parabrahma in this Samas.
समास पहिला आशंकानाम
श्रीराम ॥
निराकार म्हणिजे काये। निराधार म्हणिजे काये ।
निर्विकार म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ १ ॥
१) निराकार, निराधार, निर्विकार म्हणजे काय तें मला सांगावें. 
निराकार म्हणिजे आकार नाहीं  । निराधार म्हणिजे आधार नाहीं ।
निर्विकार म्हणिजे कल्पना नाहीं । परब्रह्मासी ॥ २ ॥
२) परब्रह्माला आकार नाहीं, आधार नाहीं. त्याच्या ठिकाणी कल्पना नाहीं. 
निरामय म्हनिजे काये । निराभास म्हणिजे काये ।
निरावेव म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ३ ॥
३) निरामय, निराभास, निरावेव म्हणजे काय तें मला सांगावें. 
निरामय म्हनिजे जळमये नाहीं । निराभास म्हणिजे भासचि नाहीं ।
निरावेव म्हणिजे अवेव नाहीं । परब्रह्मासी ॥ ४ ॥   
४) आमय म्हणजे रोग, नाश किंवा विकार. रोग हा पिंडाचा विकार तर प्रलयकालीं जलमय होणें हा ब्रह्मांडाचा विकार होय. परब्रह्माला सृष्टीच्या शेवटीं व आधीं हा विकार बाधत नाहीं. म्हणून तें निरामय आहे. परब्रह्माच्या ठिकाणीं भास नाहीं. त्यास आकार नाहीं. म्हणून अवयव नाहींत.   
निःप्रपंच म्हणिजे काये । निःकळंक म्हणिजे काये ।
निरोपाधी न्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ५ ॥
५) निःप्रपंच, निःकलंक, निरुपाधि म्हणजे काय तें मला सांगावें. 
निःप्रपंच म्हणिजे प्रपंच नाहीं । निःकळंक म्हणिजे कळंक नाहीं ।
निरोपाधी म्हणिजे उपाधी नाहीं । परब्रह्मासी ॥ ६ ॥ 
६) परब्रह्माला संसार नाहीं. कसलाही कलंक नाहीं. व कोणतीही उपाधी किंवा मर्यादा नाहीं. 
निरोपम्य म्हणिजे काये । निरालंब म्हणिजे काये ।
निरापेक्षा म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ७ ॥
७) निरुपम, निरालंब, निरपेक्ष म्हणजे काय तें मला सांगावें. 
निरोपम्य म्हणिजे उपमा नाहीं । निरालंब म्हणिजे अवलंब नाही ।
निरापेक्षा म्हणिजे अपेक्षा नाहीं । परब्रह्मासी ॥ ८ ॥
८) परब्रह्माला उपमा नाहीं. तें कशावर अवलंबून नाहीं. त्याला कशाची अपेक्षा नाही. 
निरंजन म्हणिजे काये । निरंतर म्हणिजे काये।
निर्गुण म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ९ ॥
९) निरंजन, निरंतर, निर्गुण म्हणजे काय तें मला सांगावें. 
निरंजन म्हणिजे जनचि नाहीं । निरंतर म्हणिजे अंतर नाहीं ।
निर्गुण म्हणिजे गुणचि नाहीं । परब्रह्मासी ॥ १० ॥
१०) परब्रह्मास प्राणीमात्रांचा संसर्कनाही. परब्रह्मामध्यें अवकाश किंवा मोकळी जागा नाहीं. तें सगळीकडे सारखें भरलेलें आहे. त्याला गुण नाहीत.  
निःसंग म्हणिजे काये । निर्मळ म्हणिजे काये ।
निश्र्चळ म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ११ ॥
११) निःसंग, निर्मळ, निश्र्चळ म्हणजे काय तें मला सांगावें. 
निःसंग म्हणिजे संगचि नाहीं । निर्मळ म्हणिजे मळचि नाहीं ।
निश्र्चळ म्हणिजे चळण नाहीं । परब्रह्मासी ॥ १२ ॥
१२) परब्रह्मास आसक्ती नाहीम. कसलाही मल नाही. त्याला स्वस्थितीपासून चळण नाहीं.
निःशब्द म्हणिजे काये । निर्दोष म्हणिजे काये ।
निवृत्ती म्हणिजे काये । मज निरोपावरं ॥ १३ ॥
१३) निःशब्द, निर्दोष, निर्वृत्ति म्हणजे काय तें मला सांगावें. 
निशब्द म्हणिजे शब्दचि नाहीं । निर्दोष म्हणिजे दोषची नाहीं ।
निःवृत्ती म्हणिजे वृत्तिच नाहीं । परब्रह्मासी ॥ १४ ॥
१४) परब्रह्माच्या ठिकाणीं शब्दाला किंवा भाषेला वाव नाहीं. कोणताही दोष नाही. कोणतीही वृत्ती नाही.   
निःकाम म्हणिजे काये । निर्लेप म्हणिजे काये ।
निःकर्म म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ १५ ॥
१५) निःकाम, निर्लेप, निहकर्म म्हणजे काय तें मला सांगावें. 
निःकाम म्हणिजे कामचि नाहीं । निर्लेप म्हणिजे लेपचि नाहीं ।
निःकर्म म्हणिजे कर्मचि नाहीं । परब्रह्मासी ॥ १६ ॥
१६) परब्रह्माला कोणतीही इच्छा नाहीं. त्याला कांहीं चिकटत नाहीं. त्याच्या ठिकाणीं कोणतेही कर्म नाहीं.
अनाम्य म्हणिजे काये । अजन्मा म्हणिजे काये ।
अप्रत्यक्ष म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ १७ ॥
१७) अनामा, आजन्मा, अप्रत्यक्ष म्हणजे काय तें मला सांगावें. 
आनाम्य म्हणिजे नामचि नाहीं । अजन्मा म्हणिजे जन्मचि नाहीं ।
अप्रत्यक्ष म्हणिजे प्रत्यक्ष नाहीं । परब्रह्म तें ॥ १८ ॥
१८) परब्रह्मास कांहीं नाव नाही. कारण त्यास रुप नाहीं. त्यास जन्म नाहीं. परब्रह्म इंद्रियांना गोचर नाहीं. 
अगणीत म्हणिजे काये । अकर्तव्य म्हणिजे काये ।
अक्षै म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ १९ ॥
१९) अगणित, अकर्तव्य, अक्षय म्हणजे काय तें मला सांगावें. 
अगणीत म्हणिजे गणीत नाहीं । अकर्तव्य म्हणिजे कर्तव्यता नाहीं ।
अक्षै म्हणिजे क्षयचि नाहीं । परब्रह्मासी ॥ २० ॥
२०) परब्रह्माचे मोजमाप करतां येत नाही. तें नीतिअनीतीच्या पलीकडे आहे. त्यास कधींच झीज नाहीं. 
अरुप म्हणिजे काये । अलक्ष म्हणिजे काये ।
अनंत म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ २१ ॥
२१) अरुप, अलक्ष्य, अनंत म्हणजे काय तें मला सांगावें. 
अरुप म्हणिजे रुपचि नाहीं । अलक्ष म्हणिजे लक्षत नाहीं ।
अनंत म्हणिजे अंतचि नाहीं । परब्रह्मासी ॥ २२ ॥
२२) परब्रह्मास कोणतेंच रुप नाहीं. तें मनाला आकलन होत नाहीं. त्यास कधीं अंत नाहीं. 
अपार म्हणिजे काये । अढळ म्हणिजे काये ।
अतर्क्ये म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ २३ ॥
२३) अपार, अधळ, अतर्क्य म्हणजे काय तें मला सांगावें.  
अपार म्हणिजे पारचि नाहीं । अधळ म्हणिजे ढळचि नाहीं ।
अतर्क्ये म्हणिजे तर्कत नाहीं । परब्रह्म तें ॥ २४ ॥
२४) परब्रह्म अमर्याद आहे. त्याचा परतीर गाठंता येत नाही. परब्रह्म आपल्या स्थानापासून कधींच ढळत नाहीं. भ्रष्ट होत नाहीं. बुद्धीला त्याच्या स्वरुपाबद्दल कल्पना करतां येत नाहीं. 
अद्वैत म्हणिजे काये । अदृश्य म्हणिजे काये ।
अच्युत म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ २५ ॥
२५) अद्वैत, अदृश्य, अच्युत म्हणजे काय तें मला सांगावें. 
अद्वैत म्हणिजे द्वैतचि नाहीं । अदृश्य म्हणिजे दृश्यचि नाहीं ।
अच्युत म्हणिजे चेवत नाहीं । परब्रह्म तें ॥ २६ ॥
२६) परब्रह्म अगदी एकच एकआहे. तेथें दुसरें कांहीं नाहीं. परब्रह्म अतिंद्रिय आहे. इंद्रियांना कधीं गोचर होत नाहीं. तसेंच तें स्वस्थानापासून कधींही खाली घसरत नाहीं. 
अछेद म्हणिजे काये । अदाह्य म्हणिजे कये ।
अक्लेद म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ २७ ॥
२७) अच्छेद, अदाह्य, अक्लेद्य म्हणजे काय तें मला सांगावें.     
अछेद म्हणिजे छेदेना । अदाह्य म्हणिजे जळेना ।
अक्लेद म्हणिजे कालवेना । परब्रह्म तें ॥ २८ ॥
२८) परब्रह्माला तोडता येत नाहीं. तें जळत नाहीं. तें भिजत नाहीं.
परब्रह्म म्हणिजे सकळांपरतें । तपास पाहातां आपणचि तें ।
हें कळें अनुभवमतें । सद्गुरु केलियां ॥ २९ ॥
२९) सांगण्याचें तात्पर्य असें कीं, परब्रह्म सार्‍या दृश्य विश्र्वाच्या पलीकडे आहे. त्याच्यासारखें तेंच आहे. दुसरें काहींहीं त्याच्यासारखें नाही. सद्गुरुची संगत केल्यानें अनुभव येतो. आणि मग परब्रह्माचें स्वरुप समजते.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आशंकानाम समास पहिला ॥
Samas Pahila Aakaksha

समास पहिला आशंकानाम




Custom Search