Friday, June 1, 2018

Samas Aathava Tatva Nirsan समास आठवा तत्वनिरसन


Dashak Satarava Samas Aathava Tatva Nirsan 
Samas Aathava Tatva Nirsan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Pancha Tatva and their nirsan.
समास आठवा तत्वनिरसन  
श्रीराम ॥
नाभीपासून उन्मेषवृत्ती । तेचि परा जाणिजे श्रोतीं ।
ध्वनिरुप पश्यंती । हृदईं वसे ॥ १ ॥
१) बेंबीजवळ जें प्रथम स्फुरण होतें, त्यास परा वाणी म्हणतात. ती स्फूरणरुप वृत्ति हृदयांत येऊन ध्वनिरुप बनते. तिला पश्यन्ति वाणी असें म्हणतात.  
कंठापासून नाद जाला । मध्यमा वाचा बोलिजे त्याला ।
उच्चार होतां अक्षराला । वैखरी बोलिजे ॥ २ ॥
२) हृदयांतील ध्वनि कंठांत येऊन नादाचें रुप धारण करतो. त्यास मध्यमा वाणी असें म्हणतात. जिभेनें नादाचा शब्दरुप उच्चार होतो. त्यास वैखरी वाणी असें म्हणतात. 
नाभिस्थानीं परा वाचा । तोचि ठाव अंतकर्णाचा ।
अंतःकर्णपचंकाचा । निवाडा ऐसा ॥ ३ ॥
३) बेंबीपाशी राहणारी, केवळ स्फुरणरुप असणारी परा वाणी, हेंच अंतःकरणाचें स्थान होय. आतां अंतःकरण पंचकाचें स्वरुप ऐकावें.  
निर्विकल्प जें स्फुरण । उगेंच असतां आठवण ।
तें जाणावें अंतःकर्ण । जाणतीकळा ॥ ४ ॥
४) आपण उगीच बसलों असतां सहज एखादी आठवण व्हावी, त्याचप्रमाणें ज्याच्यामध्यें कल्पना नाहींअसे जें स्फुरण तें अंतःकरण जाणावें. जाणीव किंवा जागृति कळा ती हीच होय. जाणिवेचें अगदी स्वच्छ स्वरुप म्हणजे अंतःकरण होय. कोणत्याही प्रकारचे रुप न घेतलेली आणि केवळ जीवाच्या असणेपणाची आठवण ठेवणारी जी शुद्ध, कल्पनारहित जाणीव तिचें नांव अंतःकरण होय.    
अंतःकर्ण आठवलें । पुढें होये नव्हेसें गमलें ।
करुं न करु ऐसें वाटलें । तेंचि मन ॥ ५ ॥
५) अंतःकरणांत सहज आठवलें तेथें अंतःकरण प्रत्ययास आलें. पण जें आठवलें तें होईल का नाहीं, करावें कां न करावें अशी जाणीवेची दोलायमान स्थिति नंतर झाली, तेंच मन होय.  
संकल्प विकल्प तेंचि मन । जेणेंकरितां अनुमान ।
पुढें निश्र्चयो तो जाण । रुप बुद्धीचें ॥ ६ ॥
६) संकल्पविकल्प करणारी जी जाणीव तेंच मन समजावें. अंतरी जेव्हां अनुमान करणें चालतें. आणि त्यांतूनच जेव्हां निश्र्चय घडतो, तेव्हां जाणीवेला बुद्धीचें रुप आलें असें समजावें. 
करीनचि अथवा न करी । ऐसा निश्र्चयोचि करी ।
तेचि बुद्धि हे अंतरीं । विवेकें जाणावी ॥ ७ ॥
७) " मी हें करीन " किंवा " मी हें करणार नाहीं " असा जी निश्र्चय करते तीच बुद्धि होय. विवेकानें आपल्या अंतर्यामी हें जाणावें.  
जे वस्तुचा निश्र्चये केला । पुढें तेचि चिंतूं लागला ।
तें चित्त बोलिल्या बोला । येथार्थ मानावें ॥ ८ ॥
८) बुद्धीनें ज्या गोष्टीचा निश्र्चय केलेला असतो त्या गोष्टीचें मग चिंतन सुरु होते. असें चिंतन करणें तें चित्त होय. येथें जे सांगितलें आहे तें खरें मानावें. 
पुढें कार्याचा अभिमान धरणें । हें कार्ये तों अगत्य करणें ।
ऐस्या कार्यास प्रवर्तणें । तोचि अहंकार ॥ ९ ॥
९) नंतर त्या कार्याचा अभिमान धरुन " हें कार्य मी अवश्य करीन " अशा आग्रहानें कार्यास आरंभ करणें याचें नांव अहंकार होय. अहंकारामध्यें जाणीवेला एक स्वरुपाचें घट्ट स्वरुप येते. म्हणून त्यामध्यें हट्ट किंवा आग्रह आढळतो. 
ऐसे अंतःकर्णपंचक । पंच वृत्ती मिळोन येक ।
कार्येभागे प्रकारपंचक । वेगळाले ॥ १० ॥  
१०) मूळ अंतःकरण एकच आहे. पण निरनिराळ्या कार्यामुळें एकाच अंतःकरणाची पांच रुपें आढळतात. प्रत्येक रुपाला वृत्ति म्हणतात. पांच वृत्ति मिळून अंतःकरण एकच आहे.    
जैसे पांचहि प्राण । कार्येभागे वेगळाले जाण ।
नाहीं तरी वायोचें लक्षण । येकचि असे ॥ ११ ॥
११) निरनिराळ्या कार्यामुळें पांच प्राण वेगळाले भासतात. परंतु हे वायूचे विभाग आहेत. आणि तो वायु मुळांत एकच असतो. 
सर्वांगीं व्यान नाभीं समान । कंठी उदान गुदीं अपान ।
मुखीं नासिकीं प्राण । नेमस्त जाणावा ॥ १२ ॥
१२)व्यान नांवाचा प्राण सर्वांग व्यापून असतो. समान प्राण नाभीच्या ठिकाणीं राहातो. उदान प्राण कंठात राहतो. अपान प्राण गुदस्थानीं वस्ती करतो. आणि प्रण हा तोंडांत आणि नाकांत राहातो. हें निश्र्चितपणें जाणावें.  
बोलिलें हें प्राणपंचक । आतां ज्ञानइंद्रियेंपंचक ।
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा नासिक । ऐसीं हें ज्ञानेंद्रियें ॥ १३ ॥
१३) प्राणपंचक सांगून झालें. आतां ज्ञानेंद्रियपंचक सांगतो. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक हीं पांच ज्ञानेंद्रियें आहेत. 
वाचा पाणी पाद शिस्न गुद । हे कर्मइंद्रियें प्रसिद्ध ।
शब्द स्परुष रुप रस गंध । ऐसें हें विषयपंचक ॥ १४ ॥
१४) वाणी, हात, पाय, जननेंद्रिय आणि गुद हीं पांच कर्मेंद्रिय म्हणून प्रसिद्ध आहेत. शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध असें पांच विषय आहेत.  
अंतःकर्ण प्राणपंचक । ज्ञानेंद्रियें कर्मेंद्रियें पंचक ।
पांचवें विषयपंचक । ऐसीं हे पांच पंचकें ॥ १५ ॥
१५) अंतःकरणपंचक, प्राणपंचक, ज्ञानेंद्रियपंचक, कर्मेंद्रियपंचक आणि विषयपंचक अशी पांच पंचकें आहेत.  
ऐसे हे पंचविस गुण । मिळोन सूक्ष्म देह जाण ।
याचा कर्दम बोलिला श्रवण । केलें पाहिजे ॥ १६ ॥
१६) या पांच पंचकांची मिळून पंचवीस तत्वें होतात. ही पंचवीस तत्वें एकमेकांत मिसळून सूक्ष्म देह बनतो. या मिश्रणाची माहिती ऐकणें जरुर आहे.   
अंतःकर्ण व्यान श्रवण वाचा । शब्दविषये आकाशाचा ।
पुढें विस्तार वायोचा । बोलिला असे ॥ १७ ॥
१७) अंतःकरण, व्यान, कान, वाणी व शब्द यांचा संबंध आकाशाशी आहे. पुढें वायूचा विस्तार सांगतो.   
मन समान त्वचा पाणी । स्पर्श रुप हा पवनीं ।
ऐसे हे अडाखे साधुनी । कोठा करावा ॥ १८ ॥
१८) मन, समान, त्वचा, हात, स्पर्श व रुप यांचा संबंध वायूशी आहे. असें परस्पर संबंध मनामध्यें जुळवून एक कोष्टक तयार करावें.   
बुद्धि उदान नयेन चरण । रुपविषयाचें दर्शन ।
संकेतें बोलिलें मन । घालून पाहिजे ॥ १९ ॥
१९) बुद्धि, उदान, डोळे, पाय व रुपाचें दर्शन, हें खुणेनें सांगितलें. त्यांत लक्ष घालून विचार करावा. 
चित्त अपान जिव्हा शिस्न । रसविषये आप जाण ।
पुढें ऐका सावधान । पृथ्वीचें रुप ॥ २० ॥
२०) चित्त, अपान, जीभ, जननेंद्रिय आणि रस यांचा संबंध पाण्याशी आहे. आतां पृथ्वीचें रुप सांगतों तें लक्षपूर्वक ऐका.
अहंकार प्राण घ्राण । गुद गंधविषये जाण ।
ऐसें केलें निरुपण । शास्त्रमतें ॥ २१ ॥
२१) अहंकार, प्राण, नाक, गुद आणि गंध यांचा पृथ्वीशी संबंध आहे. शास्त्राच्या आधारानें वरील प्रतिपादन केलेलें आहे.  
ऐसा हा सूक्ष्म देहे । पाहातां होईजे निसंदेहे ।
येथें मन घालून पाहे । त्यासीच हें उमजे ॥ २२ ॥
२२) आपला सूक्ष्मदेह हा असा आहे. तो जर नीट बघितला तर माणूस निःसंदेह होतो. या विषयांत मन घालून जो पाहिल त्यालाच हें बरोबर ध्यानांत येईल.  
ऐसें सूक्ष्म देहे बोलिलें । पुढें स्थूळ निरोपिलें ।
आकाश पंचगुणें वर्तलें । कैसें स्थुळीं ॥ २३ ॥
२३) अशा रीतीनें सूक्ष्मदेहाचे वर्णन केलें. यानंतर स्थूलाचा विचार सांगतो. स्थूलामध्यें आकाश पांच गुणांनी कसें व्यक्त रुप धारण करतें तें आतां सांगतो.   
काम क्रोध शोक मोहो भये । हा पंचविध आकाशाचा अन्वये ।
पुढें पंचविध वायो । निरोपिला ॥ २४ ॥
२४) कान, क्रोध, शोक, मोह, आणि भय या पांच गोष्टींचा आकाशाशीं संबंध असतो. पुढें वायूचे पांच प्रकार सांगतो. 
चळण वळण प्रासारण । निरोध आणि अकोचन ।
हें पंचविध लक्षण । प्रभंजनाचें ॥ २५ ॥
२५) चळण, वळण, प्रसारण, निरोध आणि आकुंचन हें पांच गुण वायूचे आहेत.  
क्षुधा त्रुषा आलस्य निद्रा मैथुन । हे तेजाचे पंचविध गुण ।
आतां पुढें आपलक्षण । निरोपिलें पाहिजे ॥ २६ ॥
२६) भूक, तहान, आळस, झोप, मैथुन हे पांच गुण तेजाचे आहेत. आतां पाण्याचे गुण सांगतो.  
शुक्लीत श्रोणीत लाळ मूत्र स्वेद । हा पंचविध आपाचा भेद ।
पुढें पृथ्वी विशद । केली पाहिजे ॥ २७ ॥
२७) रेत, रक्त, लाळ, मूत्र व घाम हें पाण्याचे पांच भेद आहेत. आतां पृथ्वीचे भेद स्पष्ट करतो.
अस्ति मांष त्वचा नाडी रोम । हे पृथ्वीचे पंचविध धर्म ।
ऐसे स्थूळ देहाचें वर्म । बोलिलें असे ॥ २८ ॥
२८) हाडें, मांस, त्वचा, नाडी व रोम हे पांच पृथ्वीचे धर्म आहेत. असें हें स्थूल देहाचे वर्म सांगितलें.  
पृथ्वी आप तेज वायो आकाश । हे पांचाचे पंचविस ।
ऐसें मिळोन स्थूळ देहास । बोलिजेतें ॥ २९ ॥
२९) पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश यापंचभूतांचे पंचवीस गुण मिळून स्थूल देह बनतो.  
तिसरा देह कारण अज्ञान । चौथा देह माहांकारण ज्ञान ।
हे च्यारी देह निर्शितां विज्ञान । परब्रह्म तें ॥ ३० ॥
३०) तिसरा देह कारण देह होय. हा अज्ञानरुप असतो. चौथा देह माहाकारण देह होय. हा ज्ञानरुप असतो. स्थूल, सूक्ष्म, कारण, व माहाकारण हे चारही देह  निरसन केलें म्हणजे विज्ञान प्राप्त होते. जीव परब्रह्मरुप बनतो.   
विचारें चौदेहावेगळें केलें । मीपण तत्वासरिसें गेलें ।
अनन्य आत्मनिवेदन जालें । परब्रह्मीं ॥ ३१ ॥
३१) विचारानें चौदेहावेगळें व्हावें. तत्वांच्या बरोबर मीपण नाहींसे करावें. म्हणजे परब्रह्माशी अनन्य आत्मनिवेदन साधतें.
विवेकें चुकला जन्म मृत्य । नरदेहीं साधिलें महत्कृत्य ।
भक्तियोगें कृत्यकृत्य । सार्थक जालें ॥ ३२ ॥
३२) आत्मानात्म विवेकानें जन्ममृत्युच्या चक्रांतून सुटका होतें. मरदेहांत येऊन फार मोठें कार्य साधतें. भक्तीच्या योगानें कृतकृत्यता येऊन जन्माचें सार्थक होतें. 
इति श्री पंचीकर्ण । केलेंचि करावें विवर्ण ।
लोहाचें जालें सुवर्ण । परिसाचेनयोगें ॥ ३३ ॥
३३) पंचीकरण येथें संपलें. त्याचे पुनः पुनः विवरण करावें. परिसाशी स्पर्श झाल्यानें लोखंडाचें सोनें होतें. त्याचप्रमाणें पंचीकरण विवेकानें जीव ब्रह्मस्वरुप बनतो. 
हाहि दृष्टांत घडेना । परिसाचेन परीस करवेना ।
शरण जातां साधुजना । साधुच होइजे ॥ ३४ ॥
३४) पण हा दृष्टंत देखील अपुरा आहे. परीसाला परीस बनवता येत नाहीं. पण माणुस साधुला शरण गेला तर तो स्वतः साधु बनतो. साधु स्वतः परब्रह्मस्वरुप असतो. शरणागताला तो स्वतःसारखा परब्रह्मस्वरुप बनवून टाकतो.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तत्वनिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathava Tatva Nirsan
समास आठवा तत्वनिरसन  


Custom Search

No comments: