Dashak Atharava Samas Dusara Sarvadnya Sanga Nirupan
Samas Dusara Sarvadnya Sanga Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Sarvadnya Sanga.
समास दुसरा सर्वज्ञसंग निरुपण
श्रीराम ।
नेणपणें जालें तें जालें । जालें तें होऊन गेलें ।
जाणतेपणें वर्तलें । पाहिजे नेमस्त ॥ १ ॥
१) आपण अज्ञानी असल्यानें अजाणतेपणानें आजपर्यंत जें कांहीं घडलें, तें घडून गेलें. आतां यापुढें जाणतेपणानें नीट व्यवस्थित वागावें.
जाणत्याची संगती धरावी । जाणत्याची सेवा करावी ।
जाणत्याची सद्बुद्धि घ्यावी । हळुहळु ॥ २ ॥
२) जाणत्याची संगत धरावी. त्याची सेवा करावी. त्याची सद्बुद्धि आपण हळुहळु आपलीशी करुन घ्यावी. सूक्ष्म ज्ञानदृष्टीनें अंतरात्मा पाहण्याची जी बुद्धीची स्थिती तिला सद्बुद्धि म्हणतात.
जाणत्यापासीं लेहों सिकावें । जाणत्यापासीं वाचूं सिकावें ।
जाणत्यापासीं पुसावें । सकळ कांहीं ॥ ३ ॥
३) जाणत्यापाशी लिहायला, वाचायला शिकावें. सगळें कांहीं त्याला विचारावें.
जाणत्यास करावा उपकार । जाणत्यास झिजवावें शरीर ।
जाणत्याचा पाहावा विचार । कैसा आहे ॥ ४ ॥
४) जाणत्या माणसाशी उपकार करावा. त्याच्यासाठी शरीर झिझवावें. तो कसा विचार करतो तें पाहावें.
जाणत्याचे संगतीनें भजावें । जाणत्याचे संगतीनें झिजावें ।
जाणत्याचे संगतीनें रिझावें । विवरविवरों ॥ ५ ॥
५) जाणत्याच्या संगतीनें भजन करावें. दुसर्यासाठीं झिझावें. पुनः पुनः मनन करुन मनाला प्रसन्न करावें.
जाणत्यापासीं गांवें गाणें । जाणत्यापासीं बाजवणें ।
नाना आळाप सिकणें । जाणत्यापासीं ॥ ६ ॥
६) जाणत्यापाशीं गाणें बजावणें शिकावें. आलाप कसें घ्यावे ते त्याच्याजवळ शिकावें.
जाणत्याचे कासेसी लागावें । जाणत्याचे औषध घ्यावें ।
जाणता सांगेल तें करावें । पथ्य आधीं ॥ ७ ॥
७) जाणत्याचा आधार घ्यावा, तो सांगेल तें औषधपाणी करावें. तो सांगेल तें पथ्य करावें.
जाणत्यापासीं परीक्षा सिकणें । जाणत्यापासीं तालिम करणें ।
जाणत्यापासीं पोहणें । अभ्यासावें ॥ ८ ॥
८) जाणत्यापाशी परीक्षा करायला शिकावें. त्याच्यापाशी तालीम करावी. व्यायाम शिकावा. तसेंच त्याच्यापाशीं पोहण्याचा अभ्यास करावा.
जाणता बोलेल तैसें बोलावें । जाणता सांगेल तैसें चालावें ।
जाणत्याचें ध्यान घ्यावें । नाना प्रकारीं ॥ ९ ॥
९) जाणता जसें बोलतों तसें बोलायला शिकावें. तो सांगेल तसें आपण वागावें. तो जसें ध्यान करतो तसें ध्यान करण्याचा प्रयत्न आपण करावा.
जाणत्याच्या कथा सिकाव्या । जाणत्याच्या युक्ति समजाव्या ।
जाणत्याच्या गोष्टी विवराव्या । सकळ कांहीं ॥ १० ॥
१०) जाणत्याच्या कथा शिकाव्या. त्याच्या युक्त्या समजून घ्याव्या. त्याच्या सगळ्या गोष्टींचे विवरण करावें.
जाणत्याचे पेंच जाणावे । जाणत्याचे पीळ उकलावे ।
जाणता राखेल तैसे राखावे । लोक राजी ॥ ११ ॥
११) जाणता पेच कसें घालतो तें समजून घ्यावें. त्याचे पीळ उकलावे. तो लोकांना जसें खूष ठेवतो तसें आपण पण लोकांना खूष ठेवावे.
जाणत्याचे जाणावे प्रसंग । जाणत्याचे घ्यावे रंग ।
जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग । अभ्यासावे ॥ १२ ॥
१२) जाणत्यावर आलेले प्रसंग ओळखावें. निरनिराळ्या प्रसंगांत त्याचे वागण्याचे प्रकार शिकून घ्यावें. त्याला जी स्फूर्ति येते तिचा सर्वांगीण अभ्यास करावा.
जाणत्याचा साक्षेप घ्यावा । जाणत्याचा तर्कजाणावा ।
जाणत्याचा उल्लेख समजावा । न बोलतांचि ॥ १३ ॥
१३) जाणत्याचा प्रयत्न करण्याचा स्वभाव घ्यावा. त्याची विचारपद्धती समजून घ्यावी. आणि त्याच्या शब्दांवरुन त्यानें न सांगतांच त्याचा सगळा भावार्थ समजून घ्यावा.
जाणत्याचें धूर्तपण । जाणत्याचें राजकारण ।
जाणत्याचें निरुपण । ऐकत जावें ॥ १४ ॥
१४) जाणत्याचे धूर्तपण व राजकारण पाहावें. त्याचे निरुपण ऐकत जावें.
जाणत्याचीं कवित्वें सिकावीं । गद्यें पद्यें वोळखावीं ।
माधुर्यवचनें समजावीं । अंतर्यामी ॥ १५ ॥
१५) जाणत्याचे कवित्व शिकावें. त्याचे गद्य व पद्य शिकून घ्यावें. त्याची मधुर वचनें आपल्या अंतर्यामीं समजावी.
जाणत्याचें पाहावें प्रबंद । जाणत्याचे वचनभेद ।
जाणत्याचे नाना संवाद । बरे शोधावे ॥ १६ ॥
१६) जाणत्याचे प्रबंद पाहावें. त्याची निरनिराळी वचनें पाहावी. त्याचे अनेक संवाद नीट शोधून पाहावें.
जाणत्याची तीक्षणता । जाणत्याची सहिष्णुता ।
जाणत्याची उदारता । समजोन घ्यावी ॥ १७ ॥
१७) जाणत्याची तीक्ष्ण बुद्धी, त्याची सहनशीलता, त्याची उदारता समजून घ्यावी.
जाणत्याची नाना कल्पना । जाणत्याची दीर्घ सूचना ।
जाणत्याची विवंचना । समजोन घ्यावी ॥ १८ ॥
१८) जाणत्याच्या अनेक कल्पना, त्याची दीर्घसूचना, त्याची विवंचना आपण समजून घ्यावी.
जाणत्याचा काळ सार्थक । जाणत्याचा अध्यात्मविवेक ।
जाणत्याचे गुण अनेक । आवघेच घ्यावे ॥ १९ ॥
१९) जाणता आपला काळ कसा सार्थकीं लावतो, अध्यात्माचा विवेक तो कसा करतो या गोष्टी व त्याचे अनेक गुण समजून घ्यावें.
जाणत्याचा भक्तिमार्ग । जाणत्याचा वैराग्ययोग ।
जाणत्याचा अवघा प्रसंग । समजोन घ्यावा ॥ २० ॥
२०) जाणत्याचा भक्तिमार्ग, त्याची वैराग्यपद्धती, निरनिराळ्या प्रसंगी त्याचे वागणें आपण समजून घ्यावें.
जाणत्याचें पाहावें ज्ञान । जाणत्याचे सिकावें ध्यान ।
जाणत्याचें सूक्ष्म चिन्ह । समजोन घ्यावें ॥ २१ ॥
२१) जाणत्याचे ज्ञान पाहावें. त्याचे ध्यान शिकावें. जाणत्याच्या ज्या सूक्ष्म खूणा आहेत त्या आपण समजून घ्याव्या.
जाणत्याचें अलिप्तपण । जाणत्याचें विदेहलक्षण ।
जाणत्याचें ब्रह्मविवरण । समजोन घ्यावें ॥ २२ ॥
२२) जाणता अलिप्तपणें कसा राहतो, त्याच्या विदेहावस्थेचे लक्षण कोणतें, तो ब्रह्मविवरण कसेम करतो हें सगळें आपण समजून घ्यावें.
जाणता येक अंतरात्मा । त्याचा काये सांगावा महिमा ।
विद्याकळागुणसीमा । कोणें करावी ॥ २३ ॥
२३) अंतरात्मा तेवढा खरा जाणता आहे. त्याचा महिमा सांगणें शक्य नाहीं. त्याची विद्या, कला व गुण याचा अंत कोणास लागत नाहीं. तो सत्य आहे, ज्ञानमय आहे, आणि अनंत आहे.
परमेश्र्वराचे गुणानुवाद । अखंड करावा संवाद ।
तेणेंकरिता आनंद । उदंड होतो ॥ २४ ॥
२४) अशा अंतरात्मारुपी परमेश्र्वराचे गुणानुवाद करावे. त्याच्याच विषयीं सतत संभाषण करावें. असें केल्यानें अतिशय आनंद अनुभवास येतो.
परमेश्र्वरें निर्मिलें तें । अखंड दृष्टीस पडतें ।
विवरविवरों समजावें तें । विवेकी जनीं ॥ २५ ॥
२५) परमेश्र्वरानें निर्माण केलेलें हें विश्र्व सतत आपल्या दृष्टीस पडते. विवेकी माणसें जाणत्या पुरुषाकडून वारंवार विवरण करुन तें समजून घेतात.
जितुकें कांहीं निर्माण जालें । तितुकें जगदेश्र्वरें निर्मिलें ।
निर्माण वेगळें केलें । पाहिजे आधीं ॥ २६ ॥
२६) जें जें कांहीं निर्माण झालें आहे, तें तें सगळें जगदीश्र्वरानें निर्माण केलें आहे. पण ते जगनिर्मात्या जगदीश्र्वराहून निराळें आहे. हें प्रथम कळलें पाहिजे.
तो निर्माण करतो जना । परी पाहों जातां दिसेना ।
विवेकबळें अनुमाना । आणीत जावा ॥ २७ ॥
२७) तो लोकांना निर्माण करतो, हें खरें. पण तो सूक्ष्म असल्यानें पाहूं गेल्यास दृष्टीस पडत नाहीं. म्हणून विवेकाच्या शक्तीनें त्याला आपण आपल्या कल्पनेंच्या कक्षेंत आणावा.
त्याचें अखंड लागतां ध्यान । कृपाळुपणें देतो आशन ।
सर्वकाळ संभाषण । तदांशेंचि करावें ॥ २८ ॥
२८) अंतरात्म्याचे जर अखंड ध्यान लागलें तर तो कृपाळूपणानें योगक्षेम चालवतो. खायला प्यायला घालतो. साधकाला जें जें कांहीं बोलायचे असेल तें तें त्यानें अंतरात्म्याच्या अनुसंधाने बोलावें.
ध्यान धरीना तो अभक्त । ध्यान धरील तो भक्त ।
संसारापासुनी मुक्त । भक्तांस करी ॥ २९ ॥
२९) जो ध्यान धरीत नाही, तो अभक्त होय. तर जो ध्यान धरतो तो भक्त होय. अंतरात्मा आपल्या भक्ताला संसारांतून मोकळा करतो.
उपासनेचे सेवटीं ॥ देवां भक्तां अखंड भेटी ।
अनुभवी जाणेल गोष्टी । प्रत्ययाची ॥ ३० ॥
३०) उपासना करतां करतां देवाची व भक्ताची अखंड ऐक्यता होते. ही अनुभवाची गोष्ट आहे. अनुभवी लोकच तें जाणतात.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सर्वज्ञसंगनिरुपणनाम समास दुसरा ॥
Samas Dusara Sarvadnya Sanga Nirupan
समास दुसरा सर्वज्ञसंग निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment