Dashak Visava Samas Pahila PoornaaPoorna Nirupan
Samas Dahava Vivek Lakshan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Leader and his behavior with people. Name of this Samas is PoornaaPoorna Nirupan.
समास पहिला पूर्णापूर्ण निरुपण
श्रीराम ॥
प्राणी व्यापक मन व्यापक । पृथ्वी आप तेज व्यापक ।
वायो आकाश त्रिगुण व्यापक । अंतरात्मा मूळमाया ॥ १ ॥
१) प्राणी व्यापक आहे. न मन व्यापक आहे. त्याचप्रमाणें पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, हीं पंचभूतें आणि त्रिगुण, अंतरात्मा व मूळमाया हीं सारीं तत्वें व्यापक आहेत.
निर्गुण ब्रह्म तें व्यापक । ऐसें आवघेंच व्यापक ।
तरी हें सगट किं काये येक । भेद आहे ॥ २ ॥
२) निर्गुण ब्रह्म देखील व्यापक आहे. अशा रीतीनें चंचळांतील सर्व तत्वें आणि निश्र्चळ ब्रह्म सगळेंच व्यापक आहेत. मग येथें प्रश्र्ण असा कीं, हे सारे एकसारखेच व्यापक आहेत किंवा यांच्या व्यापकपणांत कांहीं फरक आहे?
आत्मा आणि निरंजन । येणेंहि वाटतो अनुमान ।
आत्मा सगुण किं निर्गुण । आणि निरंजन ॥ ३ ॥
३) आत्मा आणि निरंजन याविषयीं देखिल मनांत कांहीं संदेह उत्पन्न होतो. आत्मा सगुण आहे किंवा निर्गुण, निरंजन आहे? असा प्रश्र्ण पुढें उभा राहतो.
श्रोता संदेही पडिला । तेणें संदेह वाढला ।
अनुमान धरुन बैसला । कोण तो कैसा ॥ ४ ॥
४) श्रोत्याच्या मनांत असा संदेह निर्माण झाला आणि तो वाढतच चालला. कोण कसा आहे? याबद्दल श्रोता कल्पना करीत बसला.
ऐका पहिली आशंका । अवघा गल्बला करुं नका ।
प्रगट करुन विवेका । प्रत्यये पाहावा ॥ ५ ॥
५) प्रथम पहिल्या शंकेचे उत्तर ऐका. सगळा गोंधळ करुं नका. विवेकानें विचार व विवरण करुन प्रत्यक्ष अनुभव पाहावा.
शरीरपाडें सामर्थ्यपाडें । प्राणी व्याप करी निवाडें ।
परी पाहातां मनायेवढें । चपळ नाहीं ॥ ६ ॥
६) प्राण्याचे शरीर लहानमोठें असतें. त्यामानानें त्याचे सामर्थ्य असते. आपल्या सामर्थ्याला अनुसरुन प्राणी लहानमोठे व्यापार करतो.परंतु त्याचे शरीर स्थूल असतें. तें मनाइतके चपळ असूं शकत नाहीं.
चपळपण येकदसी । पूर्ण व्यापकता नव्हे त्यासी ।
पाहातां पृथ्वीच्या व्यापासी । सीमा आहे ॥ ७ ॥
७) परंतु चपळपणा किंवा चंचळपणा एकदेशी असतो.तेथें पूर्ण व्यापकपणा असूं शकत नाहीं. म्हणून मनाच्या व्यापकपणाला मर्यादा आहे. पृथ्वीची व्यापकता बघितली तरी तिलाहि सीमा आहे. अर्थांत प्राणी, मन आणि पृथ्वी संपूर्ण व्यापक नाहीं.
तैसैंचि आप आणि तेज । अपूर्ण दिसती सहज ।
वायो चपळ समज । येकदेसी ॥ ८ ॥
८) त्याचप्रमाणें आप आणि तेज हीं दोन्हीं सहज अपूर्ण आहेत असें आढळतें. पृथ्वीप्रमाणें पाण्याला आणि अगनीला मर्यादा असल्यानें त्यांना संपूर्ण व्यापकपणा नाहीं. वायु तर मुळीं चपळ व चंचळ आहे. म्हणून तो सहजच एकदेशी आहे.
गगन आणि निरंजन । तें पूर्ण व्यापक सघन ।
कोणीयेक अनुमान । तेथें असेचिना ॥ ९ ॥
९) आकाश आणि निरंजन हीं दोन्ही पूर्णपणें व्यापक आहेत. आणि घनदाट आहेत. त्यांच्याबद्दल कांहीं संदेह असण्याचें कारणच नाहीं.
त्रिगुण गुणक्षोभिणी माया । माईक जाईल विलया ।
अपूर्ण येकदेसी तया । पूर्ण व्यापकता न घडे ॥ १० ॥
१०) त्रिगुण आणि गुणक्षोभिणी माया ही दोन्ही मायिक आहेत. जें मायिकअसतें तें नाशवंत असतें. जें नाशवंत असतें तें अपूर्ण व एकदेशी असते. त्यास पूर्ण व्यापकता असूं शकत नाहीं. म्हणून त्रिगुण व गुणक्षोभिणी माया पूर्ण व्यापक नाहींत.
आत्मा आणि निरंजन । हें दोहिकडे नामाभिधान ।
अर्थसन्वये समजोन । बोलणें करावें ॥ ११ ॥
११) आत्मा आणि निरंजन हीं नांवें दोन्हीकडे एकच आहेत. परंतु अर्थाचा संदर्भ बघून मग बोलावें. आत्मा हा शब्द जीवात्मा या अर्थानें वापरतात. तर निरंजन हा शब्द ब्रह्म या अर्थानेंही वापरतात. म्हणून आत्मा शब्द कोणत्या अर्थानें वापरला आहे तें ध्यांनांत घेऊन बोलावें.
आत्मा मन अत्यंत चपळ । तरी हें व्यापक नव्हेचि केवळ ।
सुचित अंतःकर्ण निवळ । करुन पाहावें ॥ १२ ॥
१२) आत्मा म्हणजे जीवात्मा असा अर्थ घेतला तर मग आत्मा व मन चपळ व चंचळ आहेत. त्यामुळें जीवात्मा व्यापकअसू शकत नाहीं. आपलें अंतज्ञकरण स्वस्थ आणि स्वच्छ करुन हें पाहावें म्हणजे कळेल.
अंतराळीं पाहातां पाताळीं नाहीं । पाताळीं पाहातां अंतराळीं नाहीं ।
पूर्णपणें वसत नाहीं । चहूंकडे ॥ १३ ॥
१३) जीवात्मा अंतराळांत जातो तेव्हां तो पाताळांत नसतो; तसेंच तो पाताळांत जातो तेव्हां अंतराळांत नसतो. या कारणामुळें तो एकाच वेळीं सर्व ठिकाणीं व्यापून नसतो.
पुढें पाहातां मागें नाहीं । मागें पाहातां पुढें नाहीं ।
वाम सव्य व्याप नाहीं । दशदिशा ॥ १४ ॥
१४) तों पुढें असेल तर मागें नसतो. तो मागें असेल तर पुढें नसतो. तो डाव्या किंवा उजव्या बाजूला असतो. एकाचवेळीं दशदिशा व्यापून तो असत नाहीं.
चहुंकडे निशाणें मांडावीं । येकसरीं कैसीं सिवावीं ।
याकारणें समजोन उगवी । प्रत्ययें आपणासी ॥ १५ ॥
१५) समजा, चारहि बाजूला निशाणें उभारलीं. एकाचवेळीं एक माणूस त्या सर्वांना स्पर्श करुं शकत नाहीं. म्हणजे माणूस एकदेशी असतो. तो सर्व व्यापीं असूं शकत नाहीं. यावरुन जीवात्मा एकदेशी आहे हें समजून घ्यावें. आणि या अनुभवावरुन आपण आपल्या संदेहाचे निरसन करावें.
सूर्य आला प्रतिबिंबला । हाहि दृष्टांत न घडे वस्तुला ।
वस्तुरुप निर्गुणाला । म्हणिजेत आहे ॥ १६ ॥
१६) सूर्य उदय पावतो, त्याचे प्रतिबिंबही दृष्टीस पडतें. पण हाहि दृष्टांत वस्तुला म्हणजे ब्रह्माला लागूं पडत नाहीं. परब्रह्म वस्तूचे रुप निर्गुण असल्यानें त्यास हा दृष्टांत लागूं पडत नाहीं. हें म्हणणे योग्य आहे.
घटाकाश मठाकाश । हाहि दृष्टांत विशेष ।
तुळूं जातां निर्गुणास । साम्यता येते ॥ १७ ॥
१७) घताकाश व मठाकाश हा दृष्टांत त्यांतल्ता त्यांत अधिक बरोबर आहे. कारण तुलना केलीं तर आकाशाचें निर्गुणाशीं साम्य आहे. मूळ आकाश संपूर्णपणें व्यापक आहे. त्यचप्रमाणें निर्गुण परब्रह्म संपूर्णपणें व्यापकआहे.
ब्रह्मींचा अंश आकाश । आणी आत्म्याचा अंश मानस ।
दोहींचा अनुभव प्रत्ययास । येथें घ्यावा ॥ १८ ॥
१८) आकाश परब्रह्माचा अंश आहे. आणि मन आत्म्याचा अंश आहे. असें जरी आपण म्हटलें तरी आपली खात्री पटण्यास या दोन्हींचा अनुभव आपण घ्यावा.
गगन आणि हें मन । कैसे होती समान ।
मननसीळ महाजन । सकळहि जाणती ॥ १९ ॥
१९) आकाश आणि मन यांची बरोबरी होऊं शकत नाहीं. मननशील थोर पुरुषांना ही गोष्ट माहीत असते. केव्हांही मन हें व्यक्तिला म्हणजे जीवात्म्याला धरुन असते. पण आकाश नेहमी व्यक्तिनिरपेक्ष असतें. म्हणून मन केंव्हाही आकाशाची बरोबरी करुं शकत नाहीं. हें ओळखावें.
मन हें पुढें वावडे । मागें आवघेंचि रितें पडे ।
पूर्ण गगनास साम्यता घडे । कोण्या प्रकारें ॥ २० ॥
२०) मन पुढें भरकटूं लागलें म्हणजे मागें त्याचे अस्तित्व उरत नाहीं. तें एकदेशी असल्यानें एकतर तें पुढें तरी असतें किंवा मागें तरी असते. पण आकाश एकाचवेळीं मागें आणि पुढें असतें. तें सर्वदेशी आहे. सर्व व्यापक आहे. म्हणून पूर्ण व्यापक आकाशाशी मनाची बरोबरी होऊं शकत नाहीं.
परब्रह्महि अचळ । आणि पर्वतासहि म्हणती अचळ ।
दोनीही येक केवळ । हें कैसें म्हणावें ॥ २१ ॥
२१) अचळ म्हणजे न चळणारें अचळ शब्द परब्रह्माला लावतात आणि पर्वतालाही अचल म्हणतात. पण हें दोन्ही एकच आहेत अेम म्हणता येत नाहीं.
ज्ञान अज्ञान विपरीतज्ञान । तिनी कैसीं होती समान ।
याचा प्रत्ययो मनन । करुन पाहावा ॥ २२ ॥
२२) ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान या तिन्हीं मधें ज्ञान शब्द आढळतो. पण तिन्ही कांहीं सारखीं नव्हेत. नीट मनन करुन अनुभवानें हें समजून घ्यावें.
ज्ञान म्हणिजे जाणणें । अज्ञान म्हणिजे नेणणें ।
विपरीतज्ञान म्हणिजे देखणें । येकाचें एक ॥ २३ ॥
२३) ज्ञान म्हणजे वस्तु जशीं आहे तशी जाणणें. अज्ञान म्हणजे वस्तु आहे हें न जाणणें, वस्तुचे गुणधर्म न जाणणें. परंतु वस्तुचेरुप एक प्रकारचे असतां तें भलतेंच जाणणें, याचे नांव विपरित ज्ञान होय. ( साप व दोरी दृष्टांताचा विचार करावा. )
जाणणें नेणणें वेगळें केलें । ढोबळें पंचभूतिक उरलें ।
विपरीतज्ञान समजलें । पाहिजे जीवीं ॥ २४ ॥
२४) जाणणें बाजूला केलें. अज्ञान किंवा न जाणणें बाजूला केलें मग ज्ञान व अज्ञान याहून वेगळें असें स्थूल पंचभूतात्मक दृश्य उरतें. त्या दृश्याच्या पसार्याला खरें मानणें हें जीवाच्या ठिकाणीं आढळणारें विपरीत ज्ञान होय.
द्रष्टा साक्षी अंतरात्मा । जीवात्माचि होये शिवात्मा ।
पुढें शिवात्मा तोचि जीवात्मा । जन्म घेतो ॥ २५ ॥
२५) वास्तविक अंतरात्मा द्रष्टा आणि साक्षी आहे. तो सर्व पिंडांमधें समान आहे. एकाच पिंडापुरता पाहिला म्हणजे त्यास जीवात्मा म्हणतात. जीवात्मा देहबुद्धींतून बाहेर पडला म्हणजे त्यास सर्वव्यापक असा शिवात्मा बनतो. पण शिवात्मा जेंव्हा आपलें साक्षीपण घालवतो, आपलें व्यापकपण विसरतो, आणि आत्मबुद्धी सोडून देहबुद्धींत शिरतो,तेव्हां तो जीवात्मा बनून जन्म घेतो
आत्मत्वीं जन्ममरण लागे । आत्मत्वीं जन्ममरण न भंगे ।
संभवामि युगे युगे । ऐसें हें वचन ॥ २६ ॥
२६) " मी आत्मा आहे " ही जाणीव उत्पन्न झाली कीं जन्ममरण पाठीस लागते. देहच आत्मा आहे असे मानणारा जीवात्मा आणि मी आत्मस्वरुप आहे असें मानणारा शिवात्मा, या दोघांना जन्ममरण चुकत नाहीं. जीवात्मा कर्माच्या आधीन होऊन देह धारण करतो तर शिवात्मा म्हणजे ईश्र्वर कर्माला आधीन ठेवून देह धारण करतो. ईश्र्वरहि युगानुयुगें भक्तांच्या रक्षणासाठीं अवताररुपानें जन्म घेतो.
जीव येकदेसी नर । विचारें जाला विश्र्वंभर ।
विश्र्वंभरास संसार । चुकेना कीं ॥ २७ ॥
२७) जीव हा एकदेशी, परीछिन्न व अपूर्ण माणूस होय. समजा तो विवेकानें विश्र्व व्यापक शिवात्मा बनला. विश्र्वव्यापी ईश्र्वर जरी झाला तरी त्याला दृश्य विश्र्वाची उपाधी असतेच. म्हणून त्याला देखील अवताररुपी संसार चुकत नाहीं.
ज्ञान आणि अज्ञान । वृत्तिरुपें हें समान ।
निवृत्तिरुपें विज्ञान । जालें पाहिजे ॥ २८ ॥
२८) " मी ब्रह्म आहे " ही भावना म्हणजे ज्ञान व " मी देह आहे " ही भावना म्हणजे अज्ञान. ज्ञान आणि अज्ञान दोन्ही वृत्तिरुपानें समान आहेत. त्या दोन्ही वृत्तिंची निवृत्ती होऊन ज्ञानाचें विज्ञानांत रुपांतर झालें पाहिजे. ज्ञानांत आणि अज्ञानांत मीपणा असतो. तो संपूर्णपणें विलीन होऊन केवळ अनुभवरुप बनणें हेंच निर्वृत्तीस्वरुप विज्ञान होय.
ज्ञानें येवढें ब्रह्मांड केलें । ज्ञानें येवढें वाढविलें ।
नाना विकारांचे वळलें । तें हें ज्ञान ॥ २९ ॥
२९) एका ज्ञानानें एवढें ब्रह्मांड निर्माण केलें आणि ज्ञानानेंच तें वाढवलें व चालचलें आहे. तें ज्ञान अनेक विकारांनीं भरलेलें आहे. परब्रह्मामधील मूळ स्फूरण तेंच ज्ञानस्वरुप आहे. त्याच्यातून अष्टधा प्रकृति प्रगट झाली आणि सबंध विश्र्व रचलें गेलें. म्हणून ज्ञान विकारांनी भरलेलें आहे.
आठवें देह ब्रह्मांडीचें । तें हें ज्ञान साचें ।
विज्ञानरुप विदेहाचें । पद पाविजे ॥ ३० ॥
३०) ब्रह्माडांतील आठवा देह म्हणजे मूळमाया, म्हणजे प्रथम संकल्प, तो खरोखर हें ज्ञान होय. प्रथम ज्ञानानें अज्ञानाचा नाश करायचा, नंतर विज्ञानानें ते ज्ञान ओलांडायचें आणि मग केवळ विज्ञानरुप विदेहपण प्राप्त करुन घ्यायचें.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पूर्णापूर्णनिरुपणनाम समास पहिला ॥
Samas Pahila PoornaaPoorna Nirupan
समास पहिला पूर्णापूर्ण निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment