Thursday, June 28, 2018

Samas Choutha Aatma Niupan समास चौथा आत्मा निरुपण


Dashak Visava Samas Choutha Aatma Niupan 
Samas Choutha Aatma Niupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Aatma. Sadhak is reqyired to know about Aatma so as to advanced further on to the road of Mukti.
समास चौथा आत्मा निरुपण
श्रीराम ॥
सकळ जनास प्रार्थना । उगेंच उदास करावेना । 
निरुपण आणावें मना । प्रत्ययाचें ॥ १ ॥
१) सर्व लोकांना माझी प्रार्थना अशी आहे कीं, कोणीहि उगीच उदासीन होऊं नये. मी सांगतो हें निरुपण स्वानुभवाचें आहे. तें नीट समजून घ्यावें. 
प्रत्यये राहिला येकेकडे । आपण धांवतो भलतेकडे ।
तरी सारासाराचे निवाडे । कैसे होती ॥ २ ॥
२) स्वानुभव राहिला एकीकडे आणि आपण धांवतों भलतीकडे. अशा परिस्थितींत सार व असार यांच्या बरोबर निवाडा करतां येणें शक्य नाहीं.  
उगिच पाहातां सृष्टी । गल्बला दिसतो दृष्टीं ।
परी ते राजसत्तेची गोष्टी । वेगळीच ॥ ३ ॥
३) सृष्टीकडे जर आपण सहज पाहिलें तर जिकडे तिकडे गोंधळ नजरेस पडतो. पण राजसत्तेची गोष्टच निराळी असते. ज्याप्रमाणें व्यवहारांत गोंधळ आढळला तरी त्याच्या पाठीशीं अदृश्य राजसत्ता असते, त्याचप्रमाणें या जगांत आपल्या दृष्टीला गोंधळ किंवा अव्यवस्था आढळतें. तरी त्याच्यामागें ईश्र्वरी सत्ता कार्य करत असते. हें अगदी खरें आहे. 
पृथ्वीमधें जितुकीं शरीरें । तितुकीं भगवंताची घरें ।
नाना सुखें येणें द्वारें । प्राप्त होती ॥ ४ ॥
४) पृथ्वीवर जेवढीं म्हणून शरीरें आहेत तेवढी सारी भगवंताची घरें आहेत. प्रत्येक शरीरांत भगवंत राहतो. त्या शरीराच्या द्वारानें जीव अनेक प्रकारची सुखें भोगतो.
त्याचा महिमा कळेल कोणाला । माता वांटून कुपाळु जाला ।
प्रत्यक्ष जगदीश जगाला । रक्षितसे ॥ ५ ॥  
५) त्या ईश्र्वराचा महिमा कोणालाही कळलेला नाहीं. भगवंतानें आपला कृपाळूपणा जगांतील अयांच्या ठिकाणीं वाटला आहे. प्रत्यक्ष ईश्र्वरच जगाचे रक्षण करतों. ज्या कृपाळूपणानें ईश्र्वर जगाचे रक्षण करतअसतो, त्याची कल्पना येण्यास मातेचे कृपाळूपण बघावें.
सत्ता पृथ्वीमध्यें वांटली । जेथें तेथें विभागली ।
कळेनें सृष्टि चालिली । भगवंताचे ॥ ६ ॥
६) ईश्र्वराची सत्ता जगामधें वातलेली आहे. जेथें ते थें ती विभागलेली आहे. भगवंताच्या कलेनेंच सर्व सृष्टी चाललेली आहे. ईश्र्वरी सत्ता जाणीवरुप आहे. जगांमधील प्रत्येक वस्तूंत ती अंतर्यामीं वास करते. तिच्या सामर्थ्यानेंच वस्तूची हालचाल होत असते. 
मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता । शरीरीं विभागली तत्वता ।
सकळ कळा चातुर्यता । तेथें वसे ॥ ७ ॥  
७) मूळ पुरुष जो ज्ञानी अंतरात्मा त्याची सत्ता सर्व ठिकाणीं वावरते, सर्व जीवांच्या देहामध्यें जाणीवरुपानें ती विभागली आहे. जीवांच्या ठिकाणी आढळणारें कौशल्य व चातुर्य या सत्तेचाच परिणाम आहे. 
सकळ पुराचा ईश । जगामध्यें तो जगदीश ।
नाना शरीरीं सावकास । करुं लागे ॥ ८ ॥
८) सगळ्या देहरुपी नगरांचा तो स्वामी असून जगामधील जगदीश किंवा जागाचा स्वामी देखील तोच आहे. तो अनेक शरीरांत वास करतो आणि जीवनाचा व्यवहार स्वस्थपणें चालवतो.  
पाहातां सृष्टिची रचना । ते येकाचेन चालेना ।
येकचि चालवी नाना । देह धरुनी ॥ ९ ॥
९) सृष्टीची रचना पाहिली तर असें दिसतें कीं, एवढा हा विशाल पसारा एखाददुसर्‍याला आवरणें अशक्य आहे. मूळ चालवणारा एकच असला तरी तो अनेक देह धारण करुन एवढा अवाढव्य पसारा चालवीत असतो.
नाही उंच नीच विचारिलें । नाहीं बरें वाईट पाहिलें ।
कार्ये चालों ऐसें जालें । भगवंतासी ॥ १० ॥
१०) सृष्टि निर्माण केली त्यावेळीं ईश्र्वरानें श्रेष्ठ व कनिष्ठ हा विचार केला नाहीं. किंवा चांगलें वाईट हा भेद पाहिला नाहीं. कोणीकडून तरी सृष्टीचें कार्य चालावें, अशा हेतुनें त्यानें अनेक देह निर्माण केले आणि त्यांच्यांत आपलें अधिष्ठान ठेवलें.  
किंवा नेणणें आडवें केलें । किंवा अभ्यासी घातलें । 
हें कैसें कैसें केलें । त्याचा तोचि जाणे ॥ ११ ॥
११) कांहीं जीवांच्या आड अज्ञान घातलेंकांहीं जीवांना त्यानें अभ्यासांत घातलें तें कां घातलें? अशा रीतीनें त्यानें जग कसें कसें निर्माण केलें हें त्याचा तोच जाणे.  
जगदांतरी अनुसंधान । बरें पाहाणें हेंचि ध्यान ।
ध्यान आणी तें ज्ञान । येकरुप ॥ १२ ॥
१२) जगांत घडणार्‍या घटनांच्या अंतर्यामीं ईश्र्वराची सत्ता कार्य करते असें सतत भान ठेवणें, हें भगवंताचे अनुसंधान होय. अनुसंधानामध्यें स्वतःचा विसर पडणें हें ध्यान होय. स्वतःचा पूर्ण विसर पडून ध्यान परिपक्व झालें म्हणजें तेंच ज्ञान होय. ध्यान आणि ध्यान अखेर एकरुपच आहेत.  
प्राणी संसारास आला । कांहीं येक शाहाणा जाला ।
मग तो विवेरों लागला । भूमंडळीं ॥ १३ ॥
१३) माणूस जगामध्यें जन्माला येतो. तो थोडाबहुत शहाणा होतो. आणि मग तो जगाबद्दल विचार करुं लागतो. 
प्रगट रामाचें निशाण । आत्माराम ज्ञानघन ।
विश्र्वंभर विद्यमान । भग्यें कळे ॥ १४ ॥
१४) त्या अंतरात्म्याचे निशाण जगांत प्रगट आहे. म्हणजे त्याच्या सत्तेची खूण प्रगटपणें जगांत अनुभवास येते. तो ज्ञानमय आहे. ज्ञानानें आंतबाहेर दाटपणें भरलेला आहे. विश्वाला सांभाळणारा तो अंतरात्मा सर्व ठिकाणीं विद्यमान आहे. परंतु त्याच्या अस्तित्वाचें ज्ञान एखाद्यालाच भाग्यानें प्राप्त होतें.  
उपासना धुंडून वासना धरिली । तरी ते लांबतचि गेली ।
महिमा न कळे बोलिली । येथार्थ आहे ॥ १५ ॥
१५) एखाद्यानें आपल्याला हवी तशी उपासना शोधून काढली, पण ती करीत असतां कांहीं वासना मनांत धरली, तर ती वासना नाहींशी होत नाही. उलट वाढतच जाते. त्यामुळें अंतरात्म्याचा महिमा कळत नाहीं. असें जें म्हणतात तें अगदी बरोबर आहे. उपासनेमधें जोपर्यंत वासना प्रधान आहे तोपर्यंत मन अधोमुख राहते. तें उर्ध्वमुख झाल्यावांचून ईश्र्वराचा महिमा कळत नाहीं. आणि वासना असे पर्यंत मन ऊर्ध्वमुख होत नाही.
द्रष्टा म्हणिजे पाहाता । साक्षी म्हणिजे जाणता ।
अनंतरुपी अनंता । वोळखावें ॥ १६ ॥   
१६) अंतरात्मा द्रष्टा व साक्षी आहे. द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि साक्षी म्हणजे जाणणारा. अनंतरुपांनी द्रष्टेपणा व साक्षीपणा दाखवणारा असा अनंत अंतरात्मा आपण ओळखावा.     
संगती असावी भल्यांची । धाटी कथा निरुपणाची ।
कांहीं येक मनाची । विश्रांती आहे ॥ १७ ॥
१७) सज्जनांची संगत ठेवावी आणि कथा निरुपणें ऐकण्याची संवय असावी. त्या योगानें मनाला थोडीफार विश्रांति लाभते.
त्याहिमधें प्रत्ययेज्ञान । जाळून टाकिला अनुमान । 
प्रचितीविण समाधान । पाविजेल कैंचे ॥ १८ ॥
१८) त्यातल्यां त्यांत अनुभवाचे ज्ञान असावें. त्या ज्ञानानें अनुमानाचें भस्म होऊन जातें. प्रत्यक्ष अनुभवावांचून मनाला समाधान मिळत नाहीं.
मूळ संकल्प तो हरिसंकल्प । मूळमायेमधील साक्षेप ।
जगदांतरीं तेंचि रुप । देखिजेतें ॥ १९ ॥
१९) मूळ संकल्प तोच हरिसंकल्प होय. मूळमायेचा सारा खटाटोप या संकल्पामुळें चालतो. जगाच्या अंतरंगांत हा मूळ संकल्प भरलेला आहे. त्या संकल्पाप्रमाणें जगांतील सार्‍या घटना घडतात.  
उपासना ज्ञानस्वरुप । ज्ञानी चौथा देह आरोप ।
याकारणें सर्व संकल्प । सोडून द्यावा ॥ २० ॥
२०) मूळमाया हा ब्रह्मांडाचा चौथा व महाकारणदेह आहे. तो ज्ञानस्वरुप आहे. तोच उपासनेचा ईश्र्वर होय. ईश्र्वराची उपासना म्हणजे ज्ञानस्वरुपाचीच उपासना असते. पण ही मूळमाय  संकल्परुप आहे. परब्रह्मावर आरोप आहे. यासाठी साधकानें सर्व संकल्पांचा त्याग करायला पाहिजे. 
पुढें परब्रह्म विशाळ । गगनासारिखें पोकळ ।
घन पातळ कोमळ । काये म्हणावें ॥ २१ ॥
२१) सर्व संकल्पांचा त्याग केल्यावर मूळमाया बाजूस सरते. मग त्याच्या पुढें आकाशासारखें विशाल व पोकळ परब्रह्म जिकडे तिकडे अनुभवास येते. त्या स्वरुपाला घनदाट म्हणावें कां पातळ म्हणावें किंवा नाजूक कोमल म्हणावें, काय म्हणावें तें कळत नाहीं. 
उपासना म्हणिजे ज्ञान । ज्ञानें पाविजे निरंजन ।
योगियांचें समाधान । येणें रीतीं ॥ २२ ॥
२२) उपासना ही ज्ञानाची पूर्वावस्था आहे. उपासनेचे पर्यवसान ज्ञानामध्यें होतें. ज्ञानानें नंतर निरंजन ब्रह्माची प्राप्ती होते. अशा रीतीनें योग्यांना समाधान लाभतें. 
विचार नेहटूनसा पाहे । तरी उपासना आपणचि आहे ।
येक जाये एक राहे । देह धरुनी ॥ २३ ॥
२३) निश्र्चयानें नेट लावून जर विचार केला तर असें आढळेल कीं, ज्याची उपासना करायची तें उपास्य आपणच आहोंत. उपासनेला द्वैत लागते. पण उपासक उपास्याची उपासना करतां करतां स्वतः आपण उपास्यामध्यें विलिन होतो. अर्थात एक जातो व एक राहतो. ज्या देहांत उपासक राहात होता त्याच देहांत आतां उपास्य राहतो.     
अखंड ऐसी घालमेली । पूर्वापार होत गेली ।
आताम हि तैसीच चालिली । उत्पत्ति स्थिती ॥ २४ ॥
२४) अशी ही उलाढाल पूर्वींपासून होत आली आहे. आतांहि उत्पत्ति व स्थिति तशीच चालली आहे.  
वनावरी वनचरांची सत्ता । जळावरी जळचरांची सत्ता ।
भूमंडळीं भूपाळां समस्तां । येणेंचि न्यायें ॥ २५ ॥
२५) वनावर वनचरांची सत्ता चालते, जलावर जलचरांची सत्ता चालते, याच न्यायानें पृथ्वीवर सगळ्या राजांची सत्ता चालते. अर्थात सर्व विश्र्वावर भगवंताची सत्ता चालते.  
सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥ २६ ॥
२६) कर्मामध्यें सामर्थ्य आहे. जो जो कर्म करील त्यास सामर्थ्य प्राप्त होईल. परंतु त्या कर्मास भगवंताच्या अनुसंधानाचा आधार पाहिजे. आपण निमित्तमात्र आहोत, खरा कर्ता भगवंत आहे. त्याच्या सत्तेनें कर्म घडणार व फळ प्राप्त होणार. अशी निष्ठा असणें हें भगवंताचे अधिष्ठान होय. अशा निष्ठेनें माणूस कर्म उत्तम करुन देखील त्यापासून अलिप्त राहील, त्यास कर्तेपणाचा अभिमान होणार नाहीं.   
कर्ता जगदीश हें तों खरें । परी विभाग आला पृथकाकारें ।
तेथें अहंतेचें काविरें । बाधिजेना ॥ २७ ॥
२७) खरा कर्ता जगदीश्र्वर भगवंत आहे. ही गोष्ट पूर्णपणें खरीं आहे. परंतु त्याची सत्ता प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणीं विभागली आहे. ईश्र्वर स्वतः वेगळेपणानें कांहीं करत नाहीं. निरनिराळ्या प्राण्यांकडून तो आपल्या सत्तेनें कर्में घडवून आणतो. म्हणून आपल्या हातून जें जें कर्म घडतें, त्याच्या अहंकाराचे वेड जाणत्याला बाधत नाहीं.  
हरिर्दाता हरिर्भोक्ता । ऐसें चालतें तत्वता ।
ये गोष्टीचा आतां । विचार पाहावा ॥ २८ ॥
२८) भगवंत दाता तसा भोक्ता पण आहे. ही खरी वस्तुस्थिति आहे. या गोष्टीचा नीट विचार करावा. 
सकळ कर्ता परमेश्र्वरु । आपला माइक विचारु ।
जैसें कळेल तैसें करुं । जगदांतरें ॥ २९ ॥
२९) परमेश्र्वर सकळ कर्ता आहे. आपण मायिक आहोत, आपलें कर्तेपण मायिक आहे. खोटें आहे. म्हणून जगाचा अंतर्यामी ईश्र्वर जेवढें ज्ञान देईल तेवढें समजून जें कर्म करतां येईल तें करावें. 
देवायेवढें चपळ नाहीं । ब्रह्मायेवढें निश्र्चळ नाहीं ।
पाइरीनें पाइरी चढोन पाहीं । मूळपरियंत ॥ ३० ॥
३०) देवाइतकें म्हणजे अंतरात्म्याइतकें चपळ दुसरें कोणी नाहीं. परब्रह्मा इतकें निश्र्चळ दुसरें कांहीं नाहीं, पण हे कळण्यासाठीं पायरी पायरीनें चढत मूळमायेपर्यंत जावें. आणि तेथें स्वानुभवानें पहावें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मानिरुपणनाम समास चौथा ॥ 
Samas Choutha Aatma Niupan
समास चौथा आत्मा निरुपण


Custom Search

No comments: