Sunday, June 3, 2018

Samas Dahava TonapSiddha Lakshan समास दहावा टोणपसिद्धलक्षण


Dashak Satarava Samas Dahava TonapSiddha Lakshan 
Samas Dahava TonapSiddha Lakshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about TonapSiddha Lakshan. Tonap means without Knowledge.
समास दहावा टोणपसिद्धलक्षण
श्रीराम ॥
आवर्णोदकीं हटकेश्र्वर । त्यास घडे नमस्कार ।
महिमा अत्यंतचि थोर । तया पाताळलिंगाचा ॥ १ ॥
१) पृथ्वीच्याभोवतीं सात समुद्रांचे आवरण आहे. त्या आवरणोदकामध्यें हतकेश्र्वर नांवाचे शिवलिंग आहे. त्याला मी नमस्कार करतो. त्या पाताळलिंगाचा महिमा फार थोर आहे.    
परंतु तेथें जाववेना । शरीरें दर्शन घडेना ।
विवेकें आणावें अनुमाना । तया ईश्र्वरासी ॥ २ ॥
२) पण तेथें स्थूलदेहानें जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेतां येत नाहीं. म्हणून त्या ईश्र्वराबद्दल विवेकानेंच कल्पना करावीं लागते.  
सातां समुद्रांचे वेडे । उदंड भूमि पैलिकडे ।
सेवटीं तुटले कडे । भूमंडळाचे ॥ ३ ॥
३) प्रथम सात सागरांचे वेढे आहेत. त्यांच्यापलीकडे विस्तीर्ण भूमी आहे. त्याच्याही पलीकडे भूमंडळाचे कडे तुटलेले आहेत. 
सात समुद्र वोलांडावे । तेथें जाणें कैसें फावे ।
म्हणोन विवेकी असावे । साधुजन ॥ ४ ॥
४) एवढें सात समुद्र ओलांडून जाणें कांहीं शक्य नाहीं.म्हणून साधु पुरुषांनीं विवेकानेंच त्याचे ज्ञान करुन घ्यावें.   
जें आपणांस नव्हे ठावें । तें जाणतयास पुसावें ।
मनोवेगें तनें फिरावें । हें तों घडेना ॥ ५ ॥
५) जी गोष्ट आपल्याला माहित नाहीं, ती जाणत्याकडून समजून घ्यावी. मन ज्या वेगानें फिरुं शकतें त्या वेगानें शरीर कांहीं फिरुं शकत नाहीं. 
जें चर्मदृष्टीस नव्हे ठावें । तें ज्ञाानदृष्टीनें पाहावें ।
ब्रह्मांड विवरोन राहावें । समाधानें ॥ ६ ॥
६) जें डोळ्यांच्या दृष्टीला दिसत नाहीं, तें ज्ञानदृष्टीनें पाहावें. ज्ञानदृष्टीनें सार्‍या ब्रह्मांडाचे विवरण करावें. आणि समाधानानें राहावें.
मध्यें आहे भूमीचे चडळ । म्हणौन आकाश आणी पाताळ ।
तें चडळ नस्तां अंतराळ । चहुंकडे ॥ ७ ॥
७) आपली ही पृथ्वी मध्येंच आहे. म्हणून वर आकाश व खालीं पाताळ असा भेद झाला. या पृथ्वीचा तुकडा जर मध्यें नसतां तर मग चोहोंकडे एकच रिकमें अंतराळ भरलेले दिसलें असतें.
तयास परब्रह्म म्हणावें । जें उपाधीवेगळें स्वभावें ।
जेथें दृश्यमायेच्या नांवें । सुन्याकार ॥ ८ ॥
८) जें स्वभावतःच उपाधीपासून मुक्त आहे आणि ज्याच्या ठिकाणी मिथ्या दृश्याचा मागमूस नाहीं. त्याला परब्रह्म असें नांव द्यावें. परब्रह्म अनंत आहे, अमर्याद आहे आणि दृश्यरहित आहे. 
दृष्टीचें देखणें दृश्य । मनाचें देखणें भास ।
मनातील निराभास । विवेकें जाणावें ॥ ९ ॥
९) जें डोळ्यांना दिसतें तें दृश्य होय. जें मनाला आकलन होतें तो भास होय. मनाच्यापलीकडे असलेले जें निराभास परब्रह्म तें विवेकानें जाणावें. 
दृश्य भास अवघा विघडे । विवेक तेथें पवाडे ।
भूमंडळीं ज्ञाते थोडे । सूक्ष्मदृष्टीचे ॥ १० ॥
१०) दृश्य पदार्थ आणि मनाचा भास हें दोन्ही जेथें मागे पडतात तेथें जो विवेकानें मजल मारतो, तो खरा ज्ञानदृष्टीनें पाहणारा होय. पण जगांत अशा सूक्ष्म दृष्टीचे ज्ञाते फार थोडे असतात. विज्ञान, तत्वज्ञान व आत्मज्ञान यांत ज्याच्या अंगी जितकी अधिक सूक्ष्म ज्ञानदृष्टी तितक्या प्रमाणांत तो मोठा द्रष्टा बनतो. ही सूक्ष्मव  विशाल ज्ञानदृष्टी असणे तर परमार्थाची चित्कलाच होय.     
वाच्यांश वाचेनें बोलावा । न बोलतां लक्ष्यांश जाणावा ।
निर्गुण अनुभवास आणावा । गुणाचेनयोगें ॥ ११ ॥
११) वाच्यंश वाचेनें बोलावा. पण लक्ष्यांश हा न बोलतां जाणावा. त्याचप्रमाणें गुणांच्या योगानें निर्गुणाचा अनुभव घ्यावा.  
नाना गुणास आहे नाश । निर्गुण तें अविनाश ।
ढोबळ्याहून विशेष । सूक्ष्म देखणें ॥ १२ ॥
१२) गुणांचा नाश होतो हें प्रत्यक्ष दिसते. निर्गुण तें अविनाशी असते. ते अविनाशी निर्गुण सूक्ष्म असतें. म्हणून त्याला पाहाण्याची स्थूल, ढोबळ दृष्टी कामास येत नाहीं.  
जें दृष्टीस न पडे ठावें । तें ऐकोन जाणावें ।
श्रवणमननें पडे ठावें । सकळ कांहीं ॥ १३ ॥  
१३) जें आपल्या स्थूल दृष्टीला दिसत नाहीं, त्याच्याबद्दल श्रवण करुन त्याचे ज्ञान करुन घ्यावें. श्रवण आणि मनन यांच्या सहायानें सर्व कांहीं आकलन करतां येते.    
अष्टधेचे जिनस नाना । उदंड पाहातां कळेना ।
अवघें सगट पिटावेना । कोणीयेकें ॥ १४ ॥
१४) पांच भूतें आणि तीन गुण यांच्यापासून अनेक प्रकारचे दृश्य पदार्थ निर्माण झालें. त्या सर्व पदार्थांचें ज्ञान करुन घेणें शक्य नाहीं. हें जरी खरें तरी सर्व पदार्थ कोणी सरसगट सारखेच मानू नयेत.   
सगट सारिखी स्थिती जाली । तेथें परीक्षाच बुडाली ।
चविनटानें कालविलीं । नाना अन्नें ॥ १५ ॥
१५) जर सर्व पदार्थ सरसकट सारखेंच असतें तर तेथें चांगलें वाईट, विनाशी अविनाशी, उत्तम अधम इत्यादि भेद नसल्यानें परीक्षेला कांहीं वावच उरला नसता. समजा एखाद्या माणसाच्या तोंडला चव नाहीं तर तो सर्व अन्न एकेठिकाणी कालवतो. त्यामध्यें प्रत्येक पदर्थाची वेगळी चव उरतच नाहीं. तसा हा प्रकार होतो.    
टोणपा नव्हे गुणग्राहिक । मूर्खास कळेना विवेक ।
विवेक आणी अविवेक । येकची म्हणती ॥ १६ ॥
१६) ज्ञानदृष्टीहीन माणूस गुणग्रहण करुं शकत नाहीं. मूर्ख माणूस विवेक करुं शकत नाहीं. विवेक व अविवेक या दोन्हीला हे लोक एकच समजतात.
उंच नीच कळेना ज्याला । तेथें अभ्यासचि बुडाला ।
नाना अभ्यासें प्राणीयाला । सुटिका कैंची ॥ १७ ॥
१७) श्रेष्ठ कोणतें आणि कनिष्ठ कोणतें हे ज्याला कळत नाहीं, त्याला परमार्थाचा अभ्यास करतां येत नाहीं. सूक्ष्म व श्रेष्ठ, स्थूल व कनिष्ठ, हे कळले पाहिजे, तर परमार्थ साधना होऊं शकते. हें न कळतां स्थूलामधील नाना प्रकारचे अभ्यास केले तर माणसाला बंधनांतून मुक्त होतां येणार नाहीं.   
वेड लागोन जालें वोंगळ । त्यास सारिखेंच वाटे सकळ ।
तें जाणावें बाश्कळ । विवेकी नव्हेती ॥ १८ ॥
१८) ज्या माणसाला वेड लागले तो स्वतः तारतम्यहीन बनतो. घाण काय आणि चांगलें पदार्थ काय दोन्ही त्याला सारखेंच वाटतात. त्याचप्रमाणें स्थूल आणि सूक्ष्म; शाश्वत आणि अशाश्वत यांतील फरक ज्यांना कळत नाहीं तें ज्ञानहीन समजावे. ते कांहीं विवेकी नव्हेत.  
ज्यास अखंड होतो नाश । त्यासीच म्हणती अविनाश ।
बहुचकीच्या लोकांस । काये म्हणावें ॥ १९ ॥
१९) ज्या दृश्य वस्तूंचा सतत नाश चालू आहे त्यानांच हे लोक अविनाश म्हणतात. असल्या अडाणी पण स्वतःला शहाणे समजणार्‍या माणसांना काय म्हणावें?   
ईश्र्वरें नाना भेद केले । भेदें सकळ सृष्टी चाले ।
आंधळे परीक्षवंत मिळाले । तेथें परीक्षा कैंची ॥ २० ॥
२०) ईश्र्वरानें पुष्कळ प्रकारचे भेद केलें आहेत. त्या भेदांच्या पार्श्वभूमीवर जग चालतें. हे प्रत्यक्षच आहे. पण परीक्षा करणारेच जर आंधळें असतील तर या दृश्य जगाची परीक्षा होणार कशी?   
जेथें परीक्षेचा अभाव । तो टोणपा समुदाव ।
गुणचि नाहीं गौरव । येईल कैंचें ॥ २१ ॥
२१) ज्या ठिकाणी परीक्षा करण्यास लागणारी ज्ञानदृष्टी नाहीं, तो टोणप्यांचा समूह असतो. त्यांच्या अंगी जरुर असणारे गुणच नसल्यानें परीक्षक म्हणून त्यांचा गौरव करता येत नाही.
खरें खोटें येकचि जालें । विवेकानें काये केलें ।
असार सांडून सार घेतलें । साधुजनीं ॥ २२ ॥
२२) मानवी जीवनांत खरें व खोटें यांचें मिश्रण झालेलें असतें. मग विवेक काय करणार? तर विवेक करणारे साधुपुरुष त्यांतील असार सोडून सार तेवढें ग्रहण करतात.  
उत्तम वस्तूची परीक्षा । कैसी घडे नतद्रष्टा ।
दीक्षाहीनापासीं दीक्षा । येईल कैंची ॥ २३ ॥
२३) नतद्रष्ट म्हणजे हलक्या प्रतीच्या माणसाला उत्तम वस्तुची परीक्षा करता येत नाही. जो स्वतः दीक्षाहीन आहे त्याच्यापाशीं दीक्षेचे तेज व सामर्थ्य आढळणें शक्य नाही. 
आपलेन वोंगळपणें । दिशा करुन शौच्या नेणे ।
वेद शास्त्रें पुराणें । त्यास काये करिती ॥ २४ ॥
२४) समजा एखादा माणूस शौच्यास गेला आणि ढुंगण न धुताच तसाच घणेरडा राहिला. तर वेद, शास्त्रें, पुराणें त्याच्यापुढें कांहींच करुं शकत नाहीत.
आधीं राखावा आचार । मग पाहावा विचार ।
आचारविचारें पैलपार । पाविजेतो ॥ २५ ॥
२५) प्रथम आचार उत्तम रीतीनें पाळावा. त्याचप्रमाणें उत्तम विचार करायला शिकावें. अशा आचारविचारानें संपन्न माणसाला पैलतीरास जाता येते. 
जें नेमकास न कळे । तें बाश्कळास केवी कळे ।
डोळस ठकती आंधळे । कोण्या कामाचे ॥ २६ ॥
२६) परमार्थाचा नियमानें व व्यवस्थितपणें अभ्यास करणार्‍यांना सुद्धां परमार्थस्वरुप कळणें कठीण पडतें. तें अभ्यास न करणार्‍या टोणप्यांना कळणें शक्य नाहीं. ज्या ठिकाणीं डोळस माणसें फसतात. तेथें आंधळें फसतील यांत नवल नाहीं. आंधळ्याचें कांहीं चालणार नाहीं.
पापपुण्य स्वर्गनर्क । अवघेंच मानिलें येक ।
विवेक आणी अविवेक । काये मानावें ॥ २७ ॥
२७) पापपुण्य, स्वर्गनर्क, हें सगळें जो एकच मानतो, तो विवेक आणि अविवेक यामद्ध्यें फरक मानणारच नाहीं.
अमृत विष येक म्हणती । परी विष घेतां प्राण जाती ।
कुकर्में होते फजिती । सत्कर्में कीर्ति वाढे ॥ २८ ॥
२८) अमृत व वीष एक म्हटलें तर कांहीं हरकत नाहीं. पण वीष घेतलें तर प्राण जातो. त्याचप्रमाणें वाईट कर्में केल्यानें फजिती होतें आणि चांगलीं कर्में केल्यानें प्रसिद्धी होते. कीर्ति वाढते हा प्रत्यक्ष अनुभव आहे.   
इहलोक आणि परलोक । जेथें नाहीं साकल्य विवेक ।
तेथें अवघेंच निरार्थक । सकळ कांहीं ॥ २९ ॥
२९) इहलोक आणि परलोक, प्रपंच आणि परमार्थ, यांबद्दल सर्वांगीण विवेक ज्यांच्यापाशी नाहीं, त्यांच्या जीवनांत कशालाच कांहीं अर्थ राहात नाहीं. सगळेंच निरर्थक होऊन जाते.  
म्हणौन संतसंगेंचि जावें । सत्शास्त्रचि  श्रवण करावें ।
उत्तम गुणास अभ्यासावें । नाना प्रयेत्नें ॥ ३० ॥
३०) म्हणून सत्संगानें जावें. सत्शास्त्राचे श्रवण करावें. आणि नानाप्रकारें प्रयत्न करुन उत्तम गुणांचा अभ्यास करावा. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे टोणपसिद्धालक्षणनाम समास दहावा ॥
Samas Dahava TonapSiddha Lakshan
समास दहावा टोणपसिद्धलक्षण


Custom Search

No comments: