Friday, June 15, 2018

Samas Pahila LekhanKriya Nirupan समास पहिला लेखनक्रिया निरुपण


Dashak Aekonvisava Samas Pahila LekhanKriya Nirupan 
Samas Pahila LekhanKriya Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Lekhan Kriya. Lekhan Kriya means art of writing.
समास पहिला लेखनक्रिया निरुपण
श्रीराम ॥
ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसुनी करावें सुंदर ।
जें देखतांचि चतुर । समाधान पावती ॥ १ ॥
१) ब्राह्मणानें बाळबोध अक्षर घोटून घोटून सुंदर करावें. तें अक्षर पाहून चतुरांना समाधान वाटावें.    
वाटोळें सरळें मोकळें । वोतलें मसीचें काळें ।
कुळकुळीत वळी चालिल्या ढाळें । मुक्तमाळा जैशा ॥ २ ॥
२) अक्षर वाटोळें, मोकळें, सरळ असावें. तें काळ्या शाईनें लिहिलेले असावें. काळें कुळकुळीत दिसावें. ओळी जणूं मोत्यांच्या माळेप्रमाणें दिसाव्यात.
अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट ।
आडव्या मात्रा त्या हि नीट । आर्कुलीं वेलांड्या ॥ ३ ॥
३) प्रत्येक अक्षर नीट लिहिलेले असावें. प्रत्येक शब्दांत सारखें अंतर असावें. काने व आडव्या मात्रासुद्धा नीट असाव्यात. त्याचप्रमाणें रफार व वेलांट्या नीट हव्यात. 
पहिलें अक्षर जें काढिलें । ग्रंथ संपेतों पाहात गेलें ।
येका टांकेंचि लिहिलें । ऐसें वाटे ॥ ४ ॥
४) ग्रंथ आरंभ करतांना पहिल्या अक्षराचे जे वळण आहे, तेच वळण ग्रंथ संपेपर्यंत असावें. ग्रंथ एक टाकी लिहिलेला आहे असें वाटलें पाहिजे.  
अक्षराचें काळेपण । टांकाचें ठोसरपण ।
तैसेंचि वळण वांकाण । सारिखेंचि ॥ ५ ॥
५) ग्रंथांतील अक्षरांचा काळेपणा, टाकाचा टणकपणा आणि अक्षरांची वळणें व वांकणें हीं आरंभापासून अखेरपर्यंत एकसारखीं असावी. 
वोळीस वोळी लागेना । आर्कुली मात्र भेदीना ।
खालिले वोळीस स्पर्शेना । अथवा लंबाक्षर ॥ ६ ॥
६)ओळीला ओळ लागूं नये. रफारानें मात्रेचा घेद करुं नये. अक्षरांच्या खालच्या ओळीला स्पर्श होऊं नये. तसेंच अक्षर लांबट असूं नये. 
पान शिषानें रेखाटावें । त्यावरी नेमकचि ल्याहावें ।
दुरी जवळी न व्हावें । अंतर वोळीचें ॥ ७ ॥
७) शिशानें पानावर रेघा आखाव्या. त्यावर ठरलेली शब्दसंख्याच प्रत्येक ओळींत लिहावी. सर्व ओळींच्यामधील अंतर अगदी सारखें असावें. ओळी दूर व जवळ नसाव्यात.   
कोठें शोधासी आडेना । चुकी पाहातां सांपडेना ।
गरज केली हें घडेना । लेखकापासुनी ॥ ८ ॥
८) कोठें शोध घालायचा असेल तर अडचण पडूं नये. लिहिण्यामधें शोधूनही चूक सापडूं नये. लिहिण्यामधें लेखकानें हेळसांड केली असें कधीं वाटूं नये.
ज्याचें वय आहे नूतन । त्यानें ल्याहावें जपोन ।
जनासी पडे मोहन । ऐसें करावें ॥ ९ ॥
९) ज्याचे वय लहान आहे त्यानें फार जपून लिहावें. आपण लिहिलेले लोकांना पाहाण्याचा मोह होईल असें लिहावें. 
बहु बारिक तरुणपणीं । कामा नये म्हातारपणीं ।
मध्यस्त लिहिण्याची करणी केली पाहिजे ॥ १० ॥
१०) तरुणपणीं फार बारीकअक्षर लिहिलेले चालेल. पण म्हातारपणीं तें उपयोगी पडत नाहीं. म्हणून मध्यम आकाराचें अक्षर काढण्याची सवय करावी.
भोंवलें स्थळ सोडून द्यावें । मधेंचि चमचमित ल्याहावें ।
कागद झडतांहि झडावें । नलगेचि अक्षर ॥ ११ ॥
११) आपण जें लिहितो त्याच्याभोवतीं मोकळी जागा सोडावी. मध्यें छान, स्पष्ट व ठसठशीत लिहावें. कालांतरानें कागद झडला तरी अक्षरें सुरक्षित राहावीत. 
ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा । प्राणीमात्रास उपजे हेवा ।
ऐसा पुरुष तो पहावा । म्हणती लोक ॥ १२ ॥
१२) अशारीतीनें ग्रंथ अगदी जपून लिहुन काढावा. लोकांनात्याचा हेवा वाटला पाहिजे. इतका सुंदर ग्रंथ लिहुन काढणारा कोण पुरुष आहे, त्याला एकदा पाहावा असें लोकांना वाटले पाहिजे.    
काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी ।
चटक लाउनी सोडावी । कांहीं येक ॥ १३ ॥
१३) अशा प्रकारे ग्रंथ लिहून देण्यामधें आपले शरीर खूप झिझवावे. आपल्या मागें आपली उत्तम कीर्ति उरेल असें वागावें. लोकांना आपल्याबद्दल उत्कंठा लागेल असेंच आपण करावें. 
घट्य कागद आणावे । जपोन नेमस्त खळावे ।
लिहिण्याचे सामे असावे । नानापरी ॥ १४ ॥
१४) चांगला घट्ट कागद असावा. तो काळजीपूर्वक नीट खळावा. त्याच्यावर लिहिण्यासाठीं लागणारें नाना प्रकारचे सामान जवळ असावें.  
सुर्‍या कातर्‍या जागाईत । खळी घोंटाळें तागाईत ।
नाना सुरंग मिश्रित । जाणोनि घ्यावें ॥ १५ ॥ 
१५) सुर्‍या, कातर्‍या, समास, फळ्या, खळ, घोटा, खळ लावण्याचा ब्रश,चाकूला व सुरीला धार लावण्याचे सुरेख रंगाचे दगड, यावस्तु चांगल्या नीट पाहून घ्याव्या.          
नाना देसीचे बरु आणावे । घटी बातिक सरळे घ्यावे ।
नाना रंगाचे आणावे । नाना जिनसी ॥ १६ ॥
१६) निरनिराळ्या देशांतून बोरु मागवावे. त्यापैकी जे घट्ट, टणक, बारीक व सरळ असतील ते वापरायला घ्यावे.अनेक रंगाचें अनेक प्रकारचे बोरु जवळ असावेत. 
नाना जिनसी टांकतोडणी । नाना प्रकारें रेखाटणी ।
चित्रविचित्र करणी । सिसेंलोळ्या ॥ १७ ॥
१७) बोरुची टोकें तोडण्यासाठीं अनेक प्रकारच्या टांक तोडणी असाव्या. अनेक प्रकारच्या ओळी आखण्यासाठीं पट्ट्या किंवा रुळ असावेत. अनेल प्रकारची चित्रें ग्रंथामधें काढावी. वजनासाठीं शिश्याच्या गोळ्या जवळ ठेवाव्या. 
हिंगुळ संग्रहीं असावे । वाळले आळिते पाहोन घ्यावे ।
सोपें भिजऊनी वाळवावे । संग्रह मसीचे ॥ १८ ॥
१८) हिंगुळ आपल्याजवळ ठेवावा. वाळलेला अळता म्हणजे कापसाचा वाळलेला रंगीतबोळा पाहून जवळ ठेवावा. निरनिराळ्या शाईचे सोपे भिजवून वाळवावे.  व जवळ ठेवावे. 
तगटी इतिश्र्या कराव्या । बंदरी फळ्या घोटाव्या ।
नाना चित्रीं चिताराव्या । उंच चित्रें ॥ १९ ॥
१९) ग्रंथ लिहून पूर्ण झाला कीं शेवटी " इतिश्री " असें लिहावें. बंदरावरुन अणलेल्या उत्तम प्रतीच्या सागवान घोटीव फळ्यांवर सुंदर चित्रें काढावीत. 
नाना गोप नाना बासनें । मेणकापडें सिंदुरवर्णे ।
पेट्या कुलपें जपणें । पुस्तकाकारणें ॥ २० ॥
२०) ग्रंथ लिहून झाल्यावर तो गोफ, रेशमाचे विणलेले दोर, ग्रंथ बांधण्यासाठीं अनेक वस्त्रें, मेणकापड वगैरे जवळ असावें. ग्रंथ ठेवण्यासाठीं पेट्या, कुलुपें जवळ असावी.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे लेखनक्रिया निरुपण नाम समास पहिला ॥
Samas Pahila LekhanKriya Nirupan 
 समास पहिला लेखनक्रिया निरुपण



Custom Search

No comments: