Dashak Atharava Samas Pachava KarantPariksha Nirupan
Samas Pachava KarantPariksha Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Karanta.
समास पांचवा करंटपरीक्षा निरुपण
श्रीराम ॥
धान्य उदंड मोजिलें । परी त्या मापें नाहीं भक्षिलें ।
विवरल्याविण तैसें जालें । प्राणीमात्रासी ॥ १ ॥
१) समजा, एखाद्या मापानें खूप धान्य मोजलें. तें माप कांहीं तें धान्य खात नाहीं. त्याचप्रमाणें जो माणूस विचार करीत नाहीं, त्यास त्याच्या ज्ञानाचा कांहीं उपयोग होत नाहीं.
पाठ म्हणतां आवरेना । पुसतां कांहींच कळेना ।
अनुभव पाहातां अनुमाना- । मधें पडें ॥ २ ॥
२) एका माणसाचें मोठें पाठांतर होतें. एकदाका तो पाठ म्हणूं लागला कीं, त्याला तें आवरत नसे. पण त्याचा अर्थ विचारला तर त्याला कांहींच कळत नव्हतें. त्याचा अनुभव पाहिला तर तो केवळ कल्पना करतो असें आढळतें.
शब्दरत्नें परीक्षावीं । प्रत्ययाचीं पाहोन घ्यावीं ।
येर ते अवघीं सांडावीं । येकीकडे ॥ ३ ॥.
३) ग्रंथ वाचतांना त्यांतील शब्दांची नीट परीक्षा करावी. त्यामध्यें जी स्वानुभवाची वचनें असतील ती ग्रहण करावी. बाकीचा ग्रंथ बाजूस सोडावा. तो ग्रहण करुं नये.
नांवरुप आवघें सांडावें । मग अनुभवास मांडावें ।
सार असार येकचि करावें । हें मूर्खपण ॥ ४ ॥
४) नामरुपांनीं भरलेलें दृश्य सगळें मागें टाकावें. आणि मग अनुभवाच्या मागें लागावें. दृश्य हें असार आहे. अदृश्य अंतरात्मा सार आहे. सार व असार दोन्हीं एकच करणें मूर्खपणाचें आहे.
लेखकें कुळ समजवावें । किंवा उगेंच वाचावें ।
येणें दृष्टांतें समजावें । कोणींतरी ॥ ५ ॥
५) जो मजकूर लिहिलेला आहे तो लेखकानें कुळाला बरोबर समजावून सांगावा. जें लिहिलेलें नाहीं तें म्हणजे उगीच कांहींतरी वाचूं नये. या दृष्टांतावरुन प्रत्येकानें योग्य काय ते नीट समजावें,
जेथें नाहीं समजावीस । तेथें आवघी कुसमुस ।
पुसों जातां वसवस । वक्ता करी ॥ ६ ॥
६) ज्याला एखादा ग्रंथ लोकांना नीट समजावून सांगता येत नाहीं, त्याच्या सांगण्यामुळें लोक नाराज होतात. आणि वक्त्याला प्रश्र्ण विचारायला गेलें तर तो वसकन् अंगावर येतो.
नाना शब्द येकवटिले । प्रचीतीवीण उपाव केले ।
परी ते अवघेचि वेर्थ गेले । फडप्रसंगीं ॥ ७ ॥
७) एखादा माणूस पुष्कळ शब्द बोलला पण त्याच्यामधें प्रचितीचें कांहींच नसेल तर पुष्कळ लोक जमलेले असले तरी त्याचें सगळें बोलणें वाया जाते.
पसेवरी वैरण घातलें । तांतडीनें जातें वोडिलें ।
तेणें पीठ बारीक आलें । हे तों घडेना ॥ ८ ॥
८) जसें कीं, जात्यावर दळण एखाद्यानें भासाभस वैरण-धन्य घातलें आणि भराभर जातें फिरवलें तर पीठ बारीक येणें शक्य नाहीं.
घांसामागें घांस घातला । आवकाश नाहीं चावायाला ।
अवघा बोकणा भरिला । पुढें कैसें ॥ ९ ॥
९) किंवा एखादा माणूस जेवायला बसला आणि त्यानें एकामागून एक घासावर घास तोंडांत घातलें. घास चावायलाही तो थांबला नाहीं, नुसता बोकाणाच भरला, तर तें अन्न नीट पचत नाहीं. पुष्कळ शिकतच गेला, पन त्यावर चिंतन, मनन न केल्यानें त्याला तें ज्ञान नीट आत्मसात करतां येत नाही.
ऐका फडनिसीचें लक्षण । विरंग जाऊं नेदी क्षण ।
समस्तांचें अंतःकर्ण । सांभाळीत जावें ॥ १० ॥
१०) फडणीसाचे मुख्य लक्षण असें कीं, तो कोणत्याही प्रसंगीं बेरंग होऊ देत नाहीं. म्हणून सर्वांचे अंतःकरण सांभाळीत जावें. फडणीस म्हणजे प्रतिनीधी. येथें वक्ता हा संतांचा प्रतिनिधी समजावा.
सूक्ष्म नामें सुखें घ्यावीं । तितुकीं रुपें वोळखावीं ।
वोळखोन समजवावीं । श्रोतयांसी ॥ ११ ॥
११) अध्यात्माचें विवेचन करतांना सूक्ष्म तत्वांची नांवें वापरावीत. पण आपण जें शब्द वापरतो त्यांचा अर्थ आणि त्या शब्दांनीं दर्शविलेल्या तत्वांचे स्वरुप आपल्याला बरोबर माहीत असावें. आपण तें जाणून श्रोत्यांना समजावून द्यावें.
समशा पुरतां सुखी होती । श्रोते अवघे आनंदती ।
अवघे क्षणक्षणा वंदिती । गोसावियांसी ॥ १२ ॥
१२) श्रोत्यांची जी समस्या आहे ती जर व्यवस्थितपणें सोडविली तर सर्वांना आनंद होतो. आणि सर्व श्रोते वक्त्याला वंदन करतात.
समशा पुरतां वंदिती । समशा न पुरतां निंदिती ।
गोसांवी चिणचिण करिती । कोण्या हिशेबें ॥ १३ ॥
१३) समस्या सोडविली तर श्रोते वंदन करतात. समस्या सोडविली नाहीं तर श्रोते निंदा करतात. मग वक्त्यानें उगीच चिडचिड करण्याचें कारण नाहीं.
शुध सोनें पाहोन घ्यावें । कसीं लाउनी तावावें ।
श्रवणमननें जाणावें । प्रत्ययासी ॥ १४ ॥
१४) सोनें शुद्ध पाहून घ्यावें. तें कसाला लावावें, तापवून परीक्षावें. त्याचप्रमाणें श्रवण व मनन या साधनांनी प्रत्ययाची परीक्षा करावी.
वैद्याची प्रचित येना । वेथा परती होयेना ।
आणी रागेजावें जना । कोण्या हिशेबें ॥ १५ ॥
१५) एखाद्याला त्याच्या रोगावर वैद्याच्या औषधाचा गुण आला नाहीं, तर इतर लोकांवर त्याचा राग काढायचा हा कोठचा न्याय?
खोटें कोठेंचि चालेना । खोटें कोणास मानेना ।
याकारणें अनुमाना । खरें आणावें ॥ १६ ॥
१६) जें खोटें असतें तें कुठेंच चालत नाहीं. तें कुणालाच आवडत नाहीं. या कारणानें जें खरें आहे त्याचेंच प्रतिपादन करावें.
लिहिणें न येतां व्यापार केला। कांहीं येक दिवस चालिला ।
पुसता सुरनीस भेटला । तेव्हां खोटें ॥ १७ ॥
१७) एका माणासाला लिहीतां येत नव्हतें त्यानें व्यापार केला. तो कांहीं दिवस चालला. पुढें त्याला हिशेब तपासणीस भेटला, त्यानें हिशेब तपासले. तेव्हां व्यापार खोटा आहे असें लक्षांत आलें.
सर्व आवघें हिशेबीं ठावें । प्रत्यय साक्षीनें बोलावें ।
मग सुरनीसें काये करावें । सांगाना कां ॥ १८ ॥
१८) हिशेबावरुन व्यापाराबद्दल सर्व कांहीं लक्षांत येते. त्याचप्रमाणें वक्त्यानें बोलतांना आपल्या अनुभवाच्या पुराव्यानें बोलावें. हिशेब जर बरोबर ठेवलें असतील तर हिशेब तपासणीस काय करुं शकणार? सांगा कीं.
स्वये आपणचि गुंते । समजावीस कैसी होते ।
नेणतां कोणीयेक ते । आपदों लागती ॥ १९ ॥
१९) जो स्वतःच घोटाळ्यांत अडकतो तो दुसर्याला समजावून देणें कठीण असते. त्याच्या नादी लागणारे अडाणी लोक अडचणींत सापडतात.
बळेंविण युद्धास गेला । तो सर्वस्वें नागवला ।
शब्द ठेवावा कोणाला । कोण कैसा ॥ २० ॥
२०) एखाद्या माणसाजवळ बळ नाहीं. तो लढायला गेला, तर तो सर्वस्वीं नागवला जातो. अशा प्रसंगामध्यें कोणी कोणाला दोष द्यायचा.
जें प्रचीतीस आलें खरें । तेंचि घ्यावें अत्यादरें ।
अनुभवेंविण जें उतरें । तें फलकटें जाणावीं ॥ २१ ॥
२१) जें खरें म्हणून आपल्या प्रचितीला येतें, त्याचे मोठ्या आदरानें आपण ग्रहण करावें. अनुभवाशिवाय बोललेली किंवा लिहिलेली वचनें फुसकी समजावीत.
सिकऊं जाता राग चढे । परंतु पुढें आदळ घडे ।
खोटा निश्र्चय तात्काळ उडे । लोकामधें ॥ २२ ॥
२२) अशी वचनें बोलणार्याला कोणी शिकवूं लागलें तर त्यास राग येतो. परंतु पुढें त्याला अद्दल घडते. खोट्या गोष्टी लोकांसमोर खर्या म्हणून कितीही निश्र्चयानें मांडल्या तरी ते लगेच खोट्या ठरतात.
खरें सांडुनी खोटे घेणें । भकाधेस काये उणें ।
त्रिभुवनीं नारायणे । न्याय केला ॥ २३ ॥
२३) जर एखादा माणूस खरें सोडून मुद्दम खोटें घेऊं लागला, तर निंदा लगेचच होते. तिन्ही लोकांमध्यें देवानें हा न्याय करुन ठेवला आहे.
तो न्याय सांडितां सेवटीं । अवघें जगचि लागे पाठीं ।
जनीं भांडभांडों हिंपुटीं । किती व्हावें ॥ २४ ॥
२४) तो न्याय जर माणसानें सोदला तर सगळे जग त्याच्या पाठीस लागतें. लोकांशी भांडता भांडता तो अगदी बेजार होतो.
अन्यायें बहुतांस पुरवलें । हें देखिलें ना ऐकिलें ।
वेडें उगेंचि भरीं भरलें । असत्याचे ॥ २५ ॥
२५) अन्यायानें पुष्कळ लोकांना आधार दिला असें आजपर्यंत कोणी ऐकलें नाहीं. किंवा पाहिलें नाही. पण वेडी माणसें उगीच खोट्या किंवा असत्याच्या भरीस पडतात.
असत्य म्हणिजे तेंचि पाप । सत्य जाणावें स्वरुप ।
दोहींमधें साक्षप । कोणाचा करावा ॥ २६ ॥
२६) सत्य हेंच स्वस्वरुप आहे असें समजावें. तर असत्य हेंच पाप होय.या दोन्हीमध्यें सत्याचाच उद्योग करावा.
मायेमधें बोलणें चालणें साचें । माया नस्तां बोलणें कैंचें ।
याकारणें निशब्दाचें । मूळ शोधावे ॥ २७ ॥
२७) माणसाचें सारें बोलणें चालणें मायेच्या क्षेत्रामध्यें खरें असते. जेथे माया नाहीं तेथें बोलण्यास स्थान नसतें. म्हणून आपण निःशब्दाचे मूळ शोधावें.
वाच्यांश जाणोनी सांडावा । लक्ष्यांश विवरोन घ्यावा ।
याकारणें निशब्द मुळाचा गोवा । आढळेना ॥ २८ ॥
२८) शब्दाचा अर्थ समजून घ्यावा. व शब्द मागें टाकावा. असें केल्यानें निःशब्द मूळ जें स्वरुप त्याबद्दल कांहींच घोटाळा उरत नाहीं. स्वरुपची अगदी स्पष्ट कल्पना येते.
अष्टधा प्रकृती पूर्वपक्ष । सांडून अलक्षीं लावावें लक्ष ।
मननसीळ परम दक्ष । तोचि जाणे ॥ २९ ॥
२९) अष्टधा प्रकृती किंवा दृश्य विश्र्व हें मिथ्या असल्यानें तो पूर्वपक्ष होय. तो पूर्वपक्ष सोडावा. नंतर अलक्ष जें स्वरुप किंवा परब्रह्म त्याच्या ठिकाणीं लक्ष लावावें. जो अतिशय दक्ष व मननशील आहे, त्याला हें कसें करावें हें समजते.
नाना भूस आणि कण । येकचि म्हणणें अप्रमाण ।
रस चोवडिया कोण । शाहाणा सेवी ॥ ३० ॥
३०) मूस व कण हीं दोन्ही एकच आहेत असें म्हनणें अयोग्य आहे. उसाचा रस सोडून शहाणा माणूस चोयट्या चोखीत बसणार नाहीं.
पिंडीं नित्यानित्य विवेक । ब्रह्मांडीं सारासार अनेक ।
सकळ शोधूनियां येक । सार घ्यावें ॥ ३१ ॥
३१) पिंडासाठीं आत्मानात्मविवेक अथवा नित्यानित्यविवेक करावा. ब्रह्मांडासाठीं सारासारविवेक करावा. अशा रीतीनें सगळ्याचा शोध घेऊन जें सार असेल तें ग्रहण करावें.
मायेकरितां कोणीयेक । अन्वय आणी वीतरेक ।
ते माया नस्तां विवेक । कैसा करावा ॥ ३२ ॥
३२) माया आहे तोपर्यंत अन्वय आणि व्यतिरेक करावा लागतो. ' अ ' असला तर ' ब ' असतो. हा अन्वय. तर ' अ ' असला तर ' ब ' नसतो. हा व्यतिरेक होय. पण जेथें माया नाहींशी होते तेथें अन्वय व्यतिरेक उरतच नाहीं. तेथें तर्काचे प्रयोजन संपतें.
तत्वें तत्व सर्व शोधावें । माहांवाकीं प्रवेशावें ।
आत्मनिवेदनें पावावें । समाधान ॥ ३३ ॥
३३) एका तत्वानें दुसरें अशा रीतीनें सर्व तत्वांचा शोध घ्यावा. नंतर महावाक्यांच्या अर्थाशीं तदाकार होऊन जावें. आणि संपूर्ण आत्मनिवेदन करुन समाधान पावावें.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे करंटपरीक्षानिरुपणनाम समास पांचवा ॥
Samas Pachava KarantPariksha Nirupan
समास पांचवा करंटपरीक्षा निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment