Saturday, June 16, 2018

Samas Dusara Vivaran Nirupan समास दुसरा विवरण निरुपण


Dashak Aekonvisava Samas Dusara Vivaran Nirupan 
Samas Dusara Vivaran Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about qualities of the leader are described here.
समास दुसरा विवरण निरुपण
श्रीराम ॥
मागां बोलिले लेखनभेद । आतां ऐका अर्थभेद ।
नाना प्रकारीचे संवाद । समजोन घ्यावे ॥ १  ॥
१) मागील समासांत ग्रंथ कसा लिहून काढायचा तें सांगितलें. आतां या समासांत ग्रंथाचा अर्थ कसा समजून घ्यावा तें सांगतो. समाजनेत्यानें अनेक प्रकारचे संवाद समजून घ्यावें. 
शब्दभेद अर्थभेद । मुद्राभेद प्रबंदभेद ।
नाना शब्दाचे शब्दभेद । जाणोनी पाहावे ॥ २ ॥
२) शब्दांचे वेगवेगळे प्रकार, अर्थाचे निरनिराळे प्रकार, मुद्रांचें वेगवेगळे प्रकार, काव्याचे निरनिराळे प्रकार, निरनिराळ्या शब्दांचे निरनिराळे अर्थ त्यानें समजून घ्यावें. 
नाना आशंका प्रत्योत्तरें । नाना प्रचित साक्षात्कारें ।
जेणेंकरितां जगदांतरें । चमत्कारती ॥ ३ ॥
३) नाना प्रकारच्या शंका आणि त्यांची उत्तरें, अनेक प्रकारच्या अनुभवाच्या गोष्टी व अनेक प्रकारच्या साक्षात्काराच्या घटना त्यानें समजून घ्याव्या, त्यास त्या माहित असाव्या. त्या गोष्टी व घटना ऐकून लोकांना आश्र्चर्य वाटते.  
नाना पूर्वपक्ष सिद्धांत । प्रत्ययो पाहावा नेमस्त ।
अनुमानाचें खस्तवेस्त । बोलोंचि नये ॥ ४ ॥
४) अनेक प्रकारचे पूर्वपक्ष व सिद्धान्त यांचा स्वतः खात्रीपूर्वक अनुभव घेतलेला असावा. असें असलें म्हणजे लोकांना ठासून सांगता येते. नाहींतर निश्र्चयपूर्वक सांगता येत नाही. समाजनेत्यानें केवळ अनुमानानें उगीच कांहींतरी अस्ताव्यस्त बोलूं नये.
प्रवृत्ति अथवा निवृत्ती । प्रचितीविण अवघी भ्रांती ।
गळंग्यामधील जगज्जोति । चेतेल कोठें ॥ ५ ॥
५) प्रवृत्ति असो वा निवृत्ति असो, प्रपंच असो वा परमार्थ असो, दोन्हीकडे जर अनुभव नसेल तर सगळा भ्रमाचा घोटाळा असतो. ज्याप्रमाणें चघळचोथ्यामध्यें अग्नि पेट घेत नाहीं, त्याचप्रमाणें केवळ अनुमानाच्या वक्तृत्वानें आणि ज्ञानानें लोकांच्या अंतःकरणांतील जगत्ज्योत पेटणार नाहीं. लोकांच्या अंतरांतील अंतरात्मा जागा होणार नाहीं.  
हेत समजोन उत्तर देणें । दुसर्‍याचे जीवीचे समजणें ।
मुख्य च्यातुर्याचीं लक्षणें । तें हें ऐसीं ॥ ६ ॥
६) प्रश्र्ण विचारणार्‍याचा हेतु ओळखून उत्तर द्यावें. दुसर्‍याचे अंतर्गत समजून घ्यावें. चतुरपणाची लक्षणें ही अशी आहेत. 
च्यातुर्येविण खटपट । ते विद्याचि फलकट ।
सभेमधें आटघाट । समाधान कैचें ॥ ७ ॥
७) ज्याच्या अंगी असा चतुरपणा नाहीम त्याची खटपट व्यर्थ आहे. त्याची विद्या फोलकट असते. सभेमध्यें विनाकारण वाटाघाट केल्यानें समाधान होणार नाहीं.
बहुत बोलणें ऐकावें । तेथें मोन्यचि धरावें ।
अल्पचिन्हें समजावें । जगदांतर ॥ ८ ॥
८) दुसर्‍याचे पुष्कळ बोलणें ऐकून घ्यावें. पण आपण मात्र मौन धरावें. लहानशा खुणेवरुन लोकांच्या मनांत काय आहे तें ओळखावें.
बाष्कळामध्यें बैसों नये । उद्धटासीं तंडों नये ।
आपणाकरितां खंडों नये । समाधान जनाचें ॥ ९ ॥
९) वात्रट लोकांत बसूं नये. उद्धट माणसाच्या तोंडी लागूं नये. आपल्या वागण्यानेम लोकांचे समाधान कधीं मोडूं नये. 
नेणतपण सोडूं नये । जाणपणें फुगों नये ।
नाना जनाचें हृदये । मृद शब्दें उकलावें ॥ १० ॥
१०) आपले अजाणतेपण सोडूं नये. जाणतेपणानें कधीहीं ताठा धरुं नये. गोड व मृदु शब्दांनीं अनेक लोकांच्या अंतःकरणांतील भाव उकलावा.   
प्रसंग जाणावा नेटका । बहुतांसी जाझु घेऊं नका ।
खरें असतांचि नासका । फड होतो ॥ ११ ॥
११) प्रसंग कसाआहे, तें बरोबर ओळखावें. फार माणसांबरोबर उगीच हुज्जत घालूं नये. अशा हुज्जतीमुळें आपले म्हणने खरें असूनही लोकांना पटत नाही. आणि त्यामुळें समुहामध्यें बेदिली होते.    
शोध घेतां आळसों नये । भ्रष्ट लोकीं बैसों नये ।
बैसलें तरी टाकूं नये । मिथ्या दोष ॥ १२ ॥
१२) कोणत्याही गोष्टीचा शोध घेण्याचा कंटाळा करुं नये. भ्रष्ट लोकांत बसूं नये. बसावेच लागले तर त्यांच्यावर खोटे आरोप करुं नयेत.  
अंतर आर्ताचें शोधावें । प्रसंगीं थोडें चि वाचावें ।
चटक लाउनी सोडावें । भल्या मनुष्यासी ॥ १३ ॥
१३) जें दुःखी लोक असतील त्यांच्या अंतरांत शिरुन त्यांचे दुःख हलके  करावें. वेळप्रसंगी थोडेंच वाचावें. पण भलत्या माणसांना आपली चटक लावूं नये. 
मज्यालसींत बैसों नये । समाराधनेसी जाऊं नये ।
जातां लेळीलवाणें होये । जिणें आपुलें ॥ १४ ॥
१४) सभेमध्यें बसूं नये. यात्रा किंवा अनुष्ठान यांच्या उद्यापनास जावूं नये. अशा प्रसंगाना आपण जात राहिलो तर आपल्या अंगी मिंधेपणा उत्पन्न होतो.  
उत्तम गुण प्रगटवावे । मग भलत्यासी बोलतां फावे ।
भले पाहोन करावे । शोधून मित्र ॥ १५ ॥
१५) प्रथम आपल्या अंगचे उत्तम गुण प्रगट करावें. आणि मगआपण कोणाशीही बोललो तरी त्याची किंमत होते. सज्जन माणसें पाहून त्यांच्याशी स्नेह जोडावा.  
उपासनेसारिखें बोलावें । सर्व जनासी तोषवावें ।
सगट बरेंपण राखावें । कोण्हीयेकासी ॥ १६ ॥
१६) उपासनेला शोभेल असेंच बोलाचें. सर्व लोकांना संतुष्ट करावें. सरसगट सर्व लोकांशी चांगलें संबंध ठेवावेत. 
ठाईं ठाईं शोध घ्यावा । मग ग्रामीं प्रवेश करावा ।
प्राणीमात्र बोलवावा । आप्तपणें ॥ १७ ॥
१७) ज्या गावांत जायचे त्या गावाबद्दल आधीं माहिती मिळवावी. मग त्या गावांत जावें. गांवांतील लोकांना आपलेपणानें स्वतःकडे बोलवावें. 
उंच नीच म्हणों नये । सकळांचें निववावें हृदये ।
अस्तमानीं जाऊं नये । कोठें तर्‍ही ॥ १८ ॥
१८) आपल्याकडे आलेल्या लोकांमधे उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, असा भेद करुं नये. सगळ्यांचे अंतःकरण शांत करावें. सूर्यास्त झाल्यावर उगीच कोठेंतरी जाऊं नये.  
जगामधें जगमित्र । जिव्हेपासीं आहे सूत्र ।
कोठें तर्‍ही सत्पात्र । शोधून काढावें ॥ १९ ॥
१९) जगांत जगन मित्र व्हायचे असेल तर त्याचे वर्म आपल्या जिभेपाशी आहे. आपण कोठेंही गेलो तरी तेथें उत्तम माणसें शोधून काढावीत.    
कथा होती तेथें जावें । दुरी दीनासारिखें बैसावें ।
तेथील सकळ हरद्र घ्यावें । अंतर्यामीं ॥ २० ॥
२०) जेथें कथा होत असेल तेथें आपण जावें. पण नम्रतेनें सामान्यासारखें अगदी दूर बसावें. त्या कथेंमधील सर्व रहस्य आपल्या अंतरी घ्यावें. 
तेथें भले आडळती । व्यापक ते हि कळों येती ।
हळुहळु मंदगती । रीग करावा ॥ २१ ॥
२१) या समुदायामधें भली माणसें आढळतात. व्यापक किंवा विशाल मनाचें कोण आहे तेंहि कळतें. अशा रीतीनें हळुहळु गावांतील लोकांत शिरकाव करुन घ्यावा. 
सकळांमधें विशेष श्रवण । श्रवणाहुनी थोर मनन ।
मननें होये समाधान । बहुत जनाचें ॥ २२ ॥
२२) सर्व उपायांमधे विशेष असेल तर तें श्रवण होय. पण श्रवणापेक्षा मनन श्रेष्ठ आहे. मननामुळें पुष्कळ लोकांचे समाधान होतें.
धूर्तपणें सकळ जाणावें । अंतरीं अंतर बाणावें ।
समजल्याविण सिणावें । कासयासी ॥ २३ ॥
२३) चाणाक्षपणें सर्व गोष्टी समजून घ्याव्या. आपल्या अंतःकरणांत दुसर्‍याच्या अंतःकरणाची बरोबर कल्पना असावी. कोणतीही गोष्ट समजल्याखेरीज उगीच श्रम करणें म्हणजे स्वतःला उगीच शिणवणें होय. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विवरणनिरुपणनाम समास दुसरा ॥ 
Samas Dusara Vivaran Nirupan
समास दुसरा विवरण निरुपण


Custom Search

No comments: