Dashak Atharava Samas Choutha Dehedullabha Nirupan
Samas Choutha Dehedullabha Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Deha. Deha means body. The importance of body is described here.
समास चौथा देहदुर्लभ निरुपण
श्रीराम ॥
देह्याकरितां गणेशपूजन । देह्याकरिता शारदावंदन ।
देह्याकरितां गुरु सज्जन । संत श्रोते ॥ १ ॥
१) मानवदेहामुळें गणेशपूजन, शारदावंदन, गुरु, संत, सज्जन व श्रोते हे असतात.
देह्याकरितां कवित्वें चालती । देह्याकरितां अधेनें करिती ।
देह्याकरितां अभ्यासिती । नाना विद्या ॥ २ ॥
२) देहामुळें कवित्व, अध्ययन, अनेक विद्यांचा अभ्यास या गोष्टी चालतात.
देह्याकरितां ग्रंथलेखन । नाना लिपीवोळखण ।
नाना पदार्थशोधन । देह्याकरितां ॥ ३ ॥
३) देहामुळें ग्रंथलेखन, लिपी ओळखण, पदार्थ शोधन ही चालतात.
देह्याकरितां माहांज्ञानी । सिद्ध साधु ऋषी मुनी ।
देह्याकरितां तीर्थाटणीं । फिरती प्राणी ॥ ४ ॥
४) देहामुळें महाज्ञानी, सिद्ध, साधु, ऋषि व मुनि होतात. देहामुळें लोक तीर्थाटन करुं शकतात.
देह्याकरितां श्रवण घडे । देह्याकरितां मननीण पवाडे ।
देह्याकरितां देहीं आतुडे । मुख्य परमात्मा ॥ ५ ॥
५) देहामुळें श्रवण घडतें. देहामुळें मनन खूप वाढतें. या देहांतच मुख्य परमात्मा आपलासा करुन घेतां येतो.
देह्याकरितां कर्ममार्ग । देह्याकरितां उपासनामार्ग ।
देह्याकरितां ज्ञानमार्ग । भूमंडळीं ॥ ६ ॥
६) देहाच्या साहायानेंच कर्मयोग, उपासनामार्ग आणि ज्ञानमार्ग जगांत आचरता येतात.
योगी वीतरागी तापसी । देह्याकरितां नाना सायासी ।
देह्याकरितां आत्मयासी । प्रगटणें घडे ॥ ७ ॥
७) योगी, विरक्त आणि तापसी हे देहाच्या साहायानें अनेक कष्ट करतात. देहांतून आत्मा प्रगट होऊं शकतो.
येहलोक आणी परलोक । देह्याकरितां सकळ सार्थक ।
देहेंविण निरार्थक । सकळ कांहीं ॥ ८ ॥
८) इहलोक असो किंवा परलोकअसो, दोन्हीकडे या देहामुळेंच सार्थक घडतें. देहांवाचून कशालाहि कांहीं अर्थ राहात नाहीं.
पुरश्र्चरणें अनुष्ठानें । गोरांजनें धूम्रपानें ।
सीतोष्ण पंचाग्नी साधनें । देह्याकरितां ॥ ९ ॥
९) पुरश्चरणें, अनुष्ठानें, गोरांजनें, धूम्रपानें, शीतोष्ण आणि पंचाग्निसाधनें हीं सारी देहाच्या साहाय्यानें घडतात.
देह्याकरितां पुण्यसीळ । देह्याकरितां पापी केवळ ।
देह्याकरितां अनर्गळ । सुचिस्मंत ॥ १० ॥
१०) माणूस देहामुळें पुण्यशील बनतो. देहामुळेंच केवळ पापी बनतो. देहामुळेंच तो स्वैराचारी किंवा सदाचारी बनतो.
देह्याकरितां अवतारी । देह्याकरितां वेषधारी ।
नाना बंडें बनतो. करी । देह्याकरितां ॥ ११ ॥
११) या देहाच्या साहायानेंच अवतार होतात. देहानेंच नाना वेष घेतां येतात. अनेक प्रकारची बंडें आणि पाखंडें देहाकडूनच करतां येतात.
देह्याकरितां विषयभोग । देह्याकरितां सकळ त्याग ।
होती जाती नाना रोग । देह्याकरितां ॥ १२ ॥
१२) यादेहामुळें विषयभोग भोगता येतात. देहानेंच सगळ्याचा त्याग करतां येतो. देहालाच अनेक रोग होतात व बरें होतात.
देह्यकरितां नवविधा भक्ती । देह्याकरितां चतुर्विधा मुक्ती ।
देह्याकरिताम नाना युक्ती । नाना मतें ॥ १३ ॥
१३) या देहाच्या साधनानें नवविधा भक्ति करतां येते, चार प्रकारच्या मुक्ति साधतां येतात. नाना प्रकारच्या युक्ति आणि मतें या देहामुळेंच शक्य होतात.
देह्याकरितां दानधर्म । देह्याकरितां नाना वर्म ।
देह्याकरितां पूर्वकर्म । म्हणती जनीं ॥ १४ ॥
१४) देहामुळें दानधर्म करतां येतो. देहामुळें अनेक रहस्यें उलगडतात.या देहसंबंधानेंच पूर्वकर्माची भाषा लोक बोलतात.
देह्याकरितां नाना स्वार्थ । देह्याकरितां नाना अर्थ ।
देह्याकरितां होईजे वेर्थ । आणी धन्य ॥ १५ ॥
१५) या देहाच्या साधनानें अनेक स्वार्थ साधतां येतात. देहानें अनेक वस्तु प्राप्त करुन घेतां येतात. या देहाच्या साहाय्यानें माणूस वाया जातो किंवा धन्य होतो.
देह्याकरितां नाना कळा । देह्याकरितां उणा आगळा ।
देह्याकरितां जिव्हाळा । भक्तिमार्गाचा ॥ १६ ॥
१६) या देहानें अनेक कला शिकता येतात. देहामुळें उणेपणा किंवा अधिकपणा येतो. या देहामध्येंच भक्तिमार्गाचा जिव्हाळा निर्माण होतो.
नाना सन्मार्गसाधनें । देह्याकरितां तुटती बंधनें ।
देह्याकरितां निवेदनें । मोक्ष ॥ १७ ॥
१७) या देहानें सन्मार्गाची अनेक साधनें साध्य होतात, देहानें अनेक बंधनें तुटतात. देहाच्या साहायानें आत्मनिवेदन करुन मोक्ष साधतो.
देहे सकळामधें उत्तमु । देहीं राहीला आत्मारामु ।
सकळां घटीं पुरुषोत्तमु । विवेकी जाणती ॥ १८ ॥
१८) मानवदेह सर्व देहांत उत्तम देह आहे. या देहामध्यें अंतरात्मा वास करतो. सर्व देहांमध्यें पुरुषोत्तम आहे. ही गोष्ट विवेकी पुरुष जाणतात.
देह्याकरितां नाना कीर्ती । अथवा नाना अपकीर्ती ।
देह्याकरितां होती जाती । अवतारमाळिका ॥ १९ ॥
१९) या देहानें उत्तम प्रकारची कीर्ति किंवा अनेक प्रकारें अपकीर्ति होऊं शकते. या देहाच्या आधारानेंच अनेक अवतारांची मालिका होऊन जाते.
देह्याकरितां नाना भ्रम । देह्याकरितां नाना संभ्रम ।
देह्याचेन उत्तमोत्तम । भोगिती पदें ॥ २० ॥
२०) या देहामुळें अनेक भ्रम होतात. तसेंच अनेक मोह होतात. या देहाच्या साहायानेंच अति उत्तम पदांचा भोग घेतां येतो.
देह्याकरितां सकळ कांहीं । देह्याविण कांहीं नाहीं ।
आत्मा विरे ठाईं ठाईं । नव्हता जैसा ॥ २१ ॥
२१) या दृश्य जगामध्यें मानव देहामुळें सगळें कांहीं साध्य करुन घेतां येते. हा देह नसेल तर कांहींच साधतां येत नाहीं. देहांतून प्रगट होणारा आत्मा देहाच्या अभावीं जेथल्या तेथें नाहींसा होऊन जातो.
देहे परलोकींचें तारुं । नाना गुणांचा गुणागरु ।
नाना रत्नांचा विचारु । देह्याचेनी ॥ २२ ॥
२२) हा देह जणूं काय परमार्थाचें तारु आहे, तो अनेक गुणांचे आश्रयस्थान आहे. या देहानेंच जगांतील अनेक रत्नांचा विचार करतां येतो.
देह्याचेन गायेनकळा । देह्याचेन संगीतकळा ।
देह्याचेन अंतर्कळा । ठांई पडे ॥ २३ ॥
२३) देहाच्या साहायानेंच गायनकला व संगीतकला शिकतां येतात. अंतर्यामीवास करणारी जीवनकला, देहाच्या साहायानें हस्तगत होते.
देहे ब्रह्मांडाचे फळ । देहे दुल्लभचि केवळ ।
परी या देह्यास निवळ । उमजावें ॥ २४ ॥
२४) हा देह म्हणजे या ब्रह्मांड वृक्षाचे सर्वोत्तम फळ आहे. मानव देह अत्यंत दुर्लभ आहे. पण या देहाला अगदी शाहाणें करावें.
देह्याकरितां लाहानथोर । करिती अपुलाले व्यापार ।
त्याहिमधें लाहानथोर । कितीयेक ॥ २५ ॥
२५) जगामधील लहानमोठी माणसें देहाच्या साहाय्यानेंच आपापली कर्में करतात. त्या कर्मांच्यामध्यें लहान कर्में व मोठी कर्में असा भेद असतो.
जे जे देहे धरुनी आले । ते ते कांहीं करुन गेले ।
हरिभजनें पावन जाले । कितीयेक ॥ २६ ॥
२६) जें जें जीव देह धारण करुन येतात, ते ते सर्व जीव कांहींतरी कर्में करुन जातात. त्यापैकीं कितीतरी जीव भगवंताच्या भजनानें पावन होऊन गेलें.
अष्टधा प्रकृतीचे मूळ । संकल्परुपचि केवळ ।
नाना संकल्पें देहेफळ । घेऊन आलें ॥ २७ ॥
२७) अगदी पहिला जो संकल्प उठला तोच अष्टधा प्रकृतीचे मूळ आहे. त्या मूळ संकल्पांतून जे अगदी छोटे छोटे संकल्प निर्माण होतात, त्यांचें दृश्य फळ देहांच्या रुपानें दिसते.
हरिसंकल्प मुळीं होता । तोचि फळीं पाहावा आतां ।
नाना देह्यांतरीं तत्वता । शोधितां कळे ॥ २८ ॥
२८) अगदी प्रथम जें मूळ स्फूरण आहे, तेंच जगामधील अनेक मानव देहांमध्यें पाहाणें योग्य आहे. अनेक देहांच्या अंतर्यामीं शोधून पाहिलें तर तो मूळ संकल्प दृष्टोपत्तीस येईल.
वेलाचे मुळीं बीज । उदकरुप वेली समज ।
पुढें फळामधें बीज । मुळींच्या अंशें ॥ २९ ॥
२९) एखाद्या वेलाच्या मुळांत बीज असतें. नंतर वेलाची वाढ होत जाते. ती वाढ सारी उदकरुपच असते. पण अखेर वेलाला जें फळ येते. त्याच्यामध्यें मूळाच्या अंशांतून आलेलें बीज आढळतें. त्याचप्रमाणें माणूस हा विश्ववेलाचा सर्वोत्तम फळ असल्यानें त्याच्या अंतर्यामीं विश्वाचा मूळ संकल्प प्रकर्षानें दृष्टीस पडतो.
मुळाकरितां फळ येतें । फळाकरितां मूळ होतें ।
येणेंकरितां होत जाते । भूमंडळ ॥ ३० ॥
३०) कोणत्याही वृक्षाचे मूळ त्याच्या बीजामध्यें असते. त्या बीजामधून वृक्षाची वाढ होऊन अखेर त्यास फळें येतात. या फळांमध्यें मूळचे बीज प्रगट होते. अगदी याच पद्धतीनें जगामध्यें सर्व घटना होतात व जातात.
असो कांहीं येक करणें । कैसें घडे देह्याविणें ।
देहे सार्थकीं लावणें । म्हणिजे बरें ॥ ३१ ॥
३१) असो, कांहीं जर करायचे असेल तर तें देहाशिवाय करतां येत नाहीं. म्हणून देह सार्थकी लावणें हेच योग्य आहे.
आत्म्याकरितां देहे जाला । देह्याकरितां आत्मा तगला ।
उभययोगें उदंड चालिला । कार्यभाग ॥ ३२ ॥
३२) आत्मा धारण करण्यासाठीं देह जन्मतो. देहाच्या योगानें आत्मा तगतो. दोघांच्या योगानें जगांत फार मोठे कार्य घडून येते.
चोरुन गुप्तरुपें करावें । तें आत्मयासी पडे ठावें ।
कर्तुत्व याचेन स्वभावें । सकळ कांहीं ॥ ३३ ॥
३३) अगदी चोरुन आणि गुप्तपणें जरी आपण कांहीं केलें तरी तें अंतरात्म्याला कळते. सगळें कर्तृत्व अखेर स्वाभाविकपणें अंतरात्म्याचेंच आहे.
देह्यामधें आत्मा असतो । देहे पूजितां आत्मा तोषतो ।
देहे पिडीतां आत्मा क्षोभतो । प्रतक्ष आता ॥ ३४ ॥
३४) आत्मा देहामध्यें राहातो. देहाची पूजा केल्यानें आत्मा संतोष पावतो. देहाला दुःख दिलें तर आत्म्याचा क्षोभ होतो. हा तर प्रत्यक्ष अनुभवच आहे.
देह्यावेगळी पूजा पावेना । देह्याविण पूजा फावेना ।
जनीं जनार्दन म्हणोनी जना । संतुष्ट करावें ॥ ३५ ॥
३५) देहाच्या अभावी आत्म्याला पूजा पावत नाहीं. देहाच्या अभावी आत्म्याची पूजा करतां येत नाहीं. सगळ्या जनांत जनार्दन भरलेला आहे, म्हणून जनांना संतुष्ट करावें. त्यानेंच परमात्मा संतोष पावतो.
उदंड प्रगटला विचार । धर्मस्थापना तदनंतर ।
तेथेंच पूजेस अधिकार । पुण्यशरीरीं ॥ ३६ ॥
३६) ज्या देहामध्यें थोर विचार पुष्कळ प्रमाणांत प्रगट होतात आणि ज्या देहाकडून नंतर आत्मज्ञानाचा प्रसार होतो, तो देह पुण्यमय असतो. त्याला पूजा घेण्याचा अधिकार आहे.
सगट भजन करुं येतें । तरी मूर्खपण आंगीं लागतें ।
गाढवासी पूजितां कळतें । काये त्याला ॥ ३७ ॥
३७) सगळ्यांनाच सरसगट आपण पूज्य मानूं लागलो, तर आपल्या अंगी मूर्खपण लागते. उदा. जर आपण एखाद्या गाढवाची पूजा केली तर त्यांत त्याला काहींच कळत नाहीं.
पूज्य पूजेसी अधिकार । उगेचि तोषवावे इतर ।
दुखऊं नये कोणाचें अंतर । म्हणिजे बरें ॥ ३८ ॥
३८) जो पूज्य असेल त्याला पूजा घेण्याचा खरा अधिकार असतो. पण इतर माणसांना मान देऊन संतुष्ट ठेवावें. कुणाचे मन न दुखावणें हें केव्हांही चांगलेच.
सकळ जगदांतरींचा देव । क्षोभता राहाव्या कोठें ठाव ।
जनावेगळा जनास उपाव । आणीक नाहीं ॥ ३९ ॥
३९) जगदंतरी सगळीकडे भरलेला अंतरात्मा जर क्षोभला तर जगामध्यें राहायला जागा राहणार नाहीं. माणसांशिवाय माणसाचें जीवन चालणें शक्य नाहीं.
परमेश्र्वराचे अनंत गुण । मनुष्यें काये सांगावी खूण ।
परंतु अध्यात्मग्रंथश्रवण । होतां उमजे ॥ ४० ॥
४०) परमेश्र्वराचे अक्षरशः अगणित गुण आहेत. माणसाला त्याच्या संपूर्ण खाणाखुणा सांगतां येणें शक्य नाहीं. पण अध्यात्मग्रंथांचें श्रवण केलें तर थोडे कांहीं परमात्मस्वरुप आकलन होते.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहेदुल्लभनिरुपणनाम समास चौथा ॥
Samas Choutha Dehedullabha Nirupan
समास चौथा देहदुर्लभ निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment