Wednesday, June 27, 2018

Samas Tisara Sookshma Namabhidhan Niupan समास तिसरा सूक्ष्मनामाभिधान निरुपण


Dashak Visava Samas Tisara Sookshma Namabhidhan Niupan 
Samas Tisara Sookshma Namabhidhan Niupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us Srushti. Srushti means Chachal Dasha. Sadhak is required to reach to Nishchal. Nishchal means ParBrahma. Aimof Sadhak is to attain ParBrahma. Name of this Samas is Sookshma Namabhidhan Niupan.
समास तिसरा सूक्ष्मनामाभिधान निरुपण
श्रीराम ॥ 
मुळींहून सेवटवरी । विस्तार बोलिला नानापरी ।
पुन्हा विवरत विरत माघारी । वृत्ति न्यावी ॥ १ ॥
१) मूळमायेपासून चार प्रकारच्या जीवप्राण्यांपर्यंत या सृष्टीचा विस्तार अनेक प्रकारानें सांगितला आहे. त्याच्यावर पुनः पुनः मनन करुन आपली वृत्ति माघारी फिरवावी. आणि अखेर ती मूळमाये पर्यंत नेऊन सोडावी.   
च्यारी वाणी च्यारी खाणी । चौर्‍यासि लक्ष जीवयोनी । 
नाना प्रकारीचे प्राणी । जन्मास येती ॥ २ ॥
२) च्यार वाणी व च्यार खाणी मिळून चौर्‍याशीं लक्ष जीवयोनी आहेत. त्यांमधील अनेक प्रकारचे प्राणी जगांत जन्मास येतात. 
अवघे होती पृथ्वीपासुनी । पृथ्वीमधें जाती नासोनी ।
अनेक येती जाती परी अवनी । तैसीच आहे ॥ ३ ॥
३) हे सगळे प्राणी पृथ्वीपासून जन्मास येतात व अखेर पृथ्वींतच नाश पावतात. अनेक प्राणी आले आणी गेले पण पृथ्वी मात्र जशींच्या तशींच राहिली आहे. 
ऐसें हें सेंड्याकडिल खांड । दुसरें भूतांचें बंड ।
तिेसरें नामाभिधानें उदंड । सूक्ष्मरुपें ॥ ४ ॥
४) पृथ्वी आणी तिच्यावरील जीवप्राणी हा ब्रह्मांडवृक्षाचा शेंड्याकडील म्हणजे टोकाचा विभाग आहे. तो आतां सांगितला. पंचभूतांचा अफाट विस्तार हा दुसरा विभाग आहे. मूळमायेपासून त्रिगुणापर्यंत अनेक सूक्ष्मत्तत्वांची नामें सांगितलीं. तो त्या वृक्षाचा तिसरा विभाग होय.    
स्थूळ अवघें सांडून द्यावे । सूक्ष्मरुपें वोळखावें ।
गुणापासून पाहिलेच पाहावें । सूक्ष्मदृष्टीं ॥ ५ ॥  
५) जेवढें स्थूल आहे तेवढें सगळें टाकून द्यावें. शुद्ध जाणीव सत्वगुण जें सूक्ष्म आहे त्याचे गुणधर्म ओळखावें. गुणापासून मूळमायेपर्यंत वारंवार सूक्ष्म दृष्टीनें चिंतन करीत जावें.   
गुणांचीं रुपें जाणीव नेणीव । पाहिलाच पाहावा अभिप्राव ।
सूक्ष्मदृष्टीचें लाघव । येथून पुढें ॥ ६ ॥
६) गुणांच्यामध्यें जाणीव आणि नेणीव दोन्ही आहेत. त्रिगुणांवर पुनः पुनः विचार करावा आणि हे रहस्य समजून घ्यावें. सूक्ष्मदृष्टीचें कौशल्य तर खरें येथून पुढेंच आहे.   
शुद्ध नेणीव तमोगुण । शुद्ध जाणीव सत्वगुण । 
जाणीवनेणीव रजोगुण । मिश्रित चालिला ॥ ७ ॥
७) तमोगुण म्हणजे शुद्ध अज्ञान, सत्वगुण म्हणजे शुद्ध ज्ञान, रजोगुण म्हणजे ज्ञान व अज्ञान यांचे मिश्रण होय. 
त्रिगुणाचीं रुपें ऐसीं । कळों लागलीं अपैसीं ।
गुणापुढील कर्दमासी । गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥
८) त्रिगुणांचा मूळ स्वभाव कसा आहे हें बरोबर कळलें म्हणजे त्यांच्यापुढें जो काला आहे त्यास गुणक्षोभिणी म्हणतात हें समजेल.  
रज तम आणि सत्व । तिहींचें जेथें गूढत्व । 
तें जाणिजे महत्तत्व । कर्दमरुप ॥ ९ ॥
९) रज, तम आणि सत्व हे तिन्ही गुण ज्या ठिकाणीं अत्यंत गुप्तपणानें राहतात त्या अवस्थेला महत् तत्व म्हणतात. महत् तत्व चिखलाप्रमाणें मिश्रणरुप आहे.  
प्रकृति पुरुष शिवशक्ति । अर्धनारीनटेश्र्वर म्हणती ।
परी याची स्वरुपस्थिती । कर्दमरुप ॥ १० ॥
१०) प्रकृतिपुरुष, शिवभक्ति, अर्धनारी नटेश्र्वर हीं नांवें देखील वापरतात. पण त्यांचे स्वरुप मिश्रणमयच आहे. 
सूक्ष्मरुपें गुणसौम्य । त्यास बोलिजे गुणसाम्य ।
तैसेंचि चैतन्य अगम्य । सूक्ष्मरुपी ॥ ११ ॥
११) गुणक्षोभिणीमध्यें तिन्ही गुण अत्यंत सूक्ष्मरुपांत असतात. तसेच ते सौम्य असतात. त्या अवस्थेला गुणसाम्य म्हणतात. त्याचप्रमाणें अत्यंत सूक्ष्मरुप चैतन्य तेथेंच असतें. तें कळयाला फार कठीण असते. 
बहुजिनसी मूळमाया । माहांकारण ब्रह्मांडीची काया ।
ऐसिया सूक्ष्म अन्वया । पाहिलेंचि पाहावें ॥ १२ ॥
१२) मूळमाया अनेक तत्वांनी भरलेली आहे, मूळमाया म्हणजे ब्रह्मांडाचा माहाकारण देह होय. हीं तत्वें आणि त्यांचें संबंध सूक्ष्म आहेत. वारंवार विचार करुन त्यांचें दर्शन करुन घ्यावें. 
च्यारी खाणी पांच भूतें । चौदा सूक्ष्म संकेतें ।
काये पाहाणें तें येथें । शोधून पाहावें ॥ १३ ॥
१३) चार खाणी, पांच महाभूतें आणि मायेची चौदा सूक्ष्म संकेतमय नांवें, यांच्यावर विचार करुन सारी सृष्टीरचना शोधून पहावी.
आहाच पाहातां कळेना । गरज केल्यां समजेना ।
नाना प्रकारीं जनाच्या मना । संदेह पडती ॥ १४ ॥
१४) नुसतें वारंवार पाहिलें तर हें कळायचे नाहीं. उगीच तात्पुरता किंवा कामापुरता विचार केला तरी हे कळायचे नाहीं. सामान्यतः लोक अशा रीतीनें विचार करतात, म्हणून त्यांच्या मनांत अनेक संदेह उत्पन्न होतात. 

चौदा पांच येकोणीस । येकोणीस च्यारी तेविस ।
यांमधें मूळ चतुर्दश । पाहिलेंचि पाहावें ॥ १५ ॥
१५) मूळमायेची चौदा नांवें, त्यांत पांच महाभूतें मिळवली म्हणजे एकोणीस, त्यांत चार खाणी मिळवल्या म्हणजे एकंदर तेवीस तत्वें होतात. यापैकी मूळमायेच्या चौदा संकेतांचा पुनः पुनः विचार करावा आणि त्यांचें स्वरुप समजून घ्यावें.   
जो विवरोन समजला । तेथें संदेह नाहीं उरला ।
सकजल्याविण जो गल्बला । तो निरार्थक ॥ १६ ॥
१६) जो अत्यंत सूक्ष्म मनन करुन मूळमायेचे व त्रिगुणांचें स्वरुप समजून घेतो, त्यास कोणताहि संदेह उरत नाहीं. तें न समजतां बडबड करणें व्यर्थ होय. 
सकळ सृष्टीचें बीज । मूळमायेंत असे सहज ।
अवघें समजतां सज्ज । परमार्थ होतो ॥ १७ ॥
१७) या सगळ्या विश्र्वाचे बीज मूळमायेंत अगदी सहजपणानें आहे. आणि हें जर नीटपणानें कळलें तर परमार्थ सिद्ध होतो. 
समजले माणूस चावळेना । निश्र्चइ अनुमान धरीना ।
सावळगोंदा करीना । परमार्थ कदा ॥ १८ ॥
१८) मूळमाया आणि त्रिगुण यांचें खरें स्वरुप ज्याला कळतें त्याच्या मनांत घोटाळा शिल्लक राहात नाहीं. त्याचा निश्रचय पक्का झाल्यानें तो उगीच कल्पना करीत राहात नाहीं. त्याच्या परमार्थामध्यें सावळागोंधळ आढळत नाहीं. 
शब्दातीत बोलतां आलें । त्यास वाच्यांश बोलिलें ।
शुद्ध लक्ष्यांश लक्षिलें । पाहिजे विवेकें ॥ १९ ॥
१९) जें शब्दातींतच आहे, त्याच्याबद्दल कांहीं बोलता आलें तरी तो वाच्यांश समजावा. जो शुद्ध लक्षांश आहे तो अखेर विवेकाच्या ज्ञानदृष्टीनेंच पाहावा लागतो.  
पूर्वपक्ष म्हणिजे माया । सिद्धांतें जाये विलया ।
माया नस्तां मग तया । काये म्हणावें ॥ २० ॥
२०) मायेला पूर्वपक्ष म्हणतात. सिद्धांतानें पूर्वपक्ष विलयास जातो. म्हणजे परब्रह्माच्या साक्षात्कारानें माया नाश पावतें. माया नाहीशीं झाल्यावर जें कांहीं उरतें त्यास नांव तरी काय द्यावें? नांव देणें मायेच्या अलीकडचा प्रकार आहे. म्हणून माया विलीन झाल्यावर शब्दसुद्धां उरत नाहींत.
अन्वये आणी वीतरेक । हा पूर्वपक्षाचा विवेक ।
सिद्धांत म्हणिजे शुद्ध येक । दुसरें नाहीं ॥ २१ ॥
२१) मााया हयात असतांना अन्वय आणि व्यतिरेक या पद्धतीनें विवेकाची क्रिया चालते. तेथें द्वैत असल्यानें हें शक्य होते. पण माया विलिन झाल्यावर " शुद्ध असेम एकमेव ब्रह्म आहे, दुसरें मुळीं नाहींच " असा प्रत्यक्ष अनुभव येतो. तेथेम संपूर्ण अद्वैत असतें.    
अधोमुखें भेद वाढतो । ऊर्धमुखें भेद तुटतो । 
निःसंगपणें निर्गुणी तो । माहांयोगी ॥ २२ ॥
२२) जीव अधोमुख असतो तेव्हां म्हणजे, मायेकडे तोंड करुन असतो तेव्हां भेद वाढतो. अनेकपणाच अनुभवास येतो. जीव ऊर्ध्वमुख होतो तेव्हां, भेद कमी होतो, एकपणाचा अनुभव येऊं लागतो. सर्वसंग सोडून जो अलिप्तपणानें निर्गुणाशीं समरस होतो, त्यालाच महायोगी म्हणतात.
माया मिथ्या ऐसी कळली । तरी मग भीड कां लागली ।
मायेचे भिडेनें घसरली । स्वरुपस्थिती ॥ २३ ॥
२३) माया खरी नाहीं. हें एकदा कळल्यावर मग तीचे दडपण जीवावर पडूं नये. पण मायेचे दडपण पडतें आणि जीव आपल्या स्वस्वरुपावस्थेंतून खालीं घसरतो.   
लटके मायेनें दपटावें । सत्य परब्रह्म सांडावें ।
मुख्य निश्र्चयें हिंडावें । कासयासी ॥ २४ ॥
२४) मिथ्या मायेच्या दडपणाखालीं सांपडल्यानें सत्य परब्रह्म सोडणें बरोबर नाहीं. परब्रह्म तेवढेंच सत्य आहे अशी खात्री झाल्यावर मग संशयाच्या नादानें इकडेतिकडे हिंडणें बरोबर नाहीं.
पृथ्वीमधें बहुत जन । त्यामध्यें असती सज्जन ।
परी साधूस वोळखतो कोण । साधुवेगळा ॥ २५ ॥
२५) जगांत पुष्कळ मानसें आहेत. त्यामधें साधुपुरुष पण असतात. हें जरी खरें तरी साधूला साधूवांचून दुसरा कोणी ओळखूं शकत नाहीं. 
म्हणौन संसार सांडावा । मग साधूचा शोध घ्यावा ।
फिरफिरों ठाइं पाडावा । साधुजन ॥ २६ ॥
२६) म्हणून ज्याला परमार्थाची तहान आहे, त्यानें संसार सोडावा. आणि साधूचा शोध करावा. ठिकठिकाणीं फिरावें आणि साधुपुरुष धुंडून काढावे.  
उदंड हुडकावे संत । सांपडे प्रचितीचा महंत ।
प्रचितीविण स्वहित । होणार नाहीं ॥ २७ ॥   
२७) असे पुष्कळ संत पाहिले म्हणजे त्यांच्यांतच एखादा मोठा स्वानुभवी महात्मा आढळतो. साक्षात्कारावांचून आत्महित होत नाहीं. 
प्रपंच अथवा परमार्थ । प्रचितीविण अवघें वेर्थ ।
प्रत्ययेज्ञानी तो समर्थ । सकळांमध्यें ॥ २८ ॥
२८) प्रपंच असो किंवा परमार्थ असो, प्रत्यक्ष अनुभव नसेल तर दोन्ही व्यर्थ जातात. सर्वांच्यामध्यें स्वानुभवाच्या ज्ञानानें संपन्न असलेला पुरुष हाच समर्थ पुरुष होय.
रात्रंदिवस पाहावा अर्थ । अर्थ पाहेल तो समर्थ ।
परलोकींचा निजस्वार्थ । तेथेंचि घडे ॥ २९ ॥
२९) साधकानें रात्रंदिवस अर्थाचे मनन करीत असावें. अशा रीतीनें मनन करुन जो अर्थ शोधून काढतो, तोच समर्थ पुरुष होय. परमार्थामधील आत्मज्ञानाचा स्वार्थ त्यालाच हस्तगत होतो.  
म्हणौन पाहिलेंचि पाहावें । आणि शोधिलेंचि ।
अवघें कळतां स्वभावें । संदेह तुटती ॥ ३० ॥
३०) म्हणून साधकानें जो अर्थ समजला आहे, त्याच्यावरच पुनः पुनः मनन करावें. ज्या स्वरुपाचा शोध केला आहे त्याचाच पुनः पुनः शोध करावा. या मार्गानें वाटचाल केली असतां सहजच सगळें कळलें म्हणजे सारें संदेह नाहींसे होतात.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मनामाभिधाननाम समास तिसरा ॥  
 Samas Tisara Sookshma Namabhidhan Niupan
समास तिसरा सूक्ष्मनामाभिधान निरुपण


Custom Search

No comments: