Dashak Atharava Samas Tisara Nispruha Shikavan
Samas Tisara Nispruha Shikavan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Nispruha Shikavan.
समास तिसरा निस्पृह शिकवण
श्रीराम ॥
दुल्लभ शरीरीं दुल्लभ आयुष्य । याचा करुं नये नास ।
दास म्हणे सावकास । विवेक पाहावा ॥ १ ॥
१) माणसाचा देह मिळणें दुर्लभ असते. त्यांत आयुष्य मिळणें दुर्लभ असते. म्हणून त्याचा नाश करुं नये. श्रीरामदास म्हणतात स्वस्थपणें विचार करुन पाहावा.
न पाहातां उत्तम विवेक । आवघा होतो अविवेक ।
अविवेकें प्राणी रंक । ऐसा दिसे ॥ २ ॥
२) माणसानें नीटपणें विचार केला नाहीं, तर सारा अविचार होतो. विवेकहीन माणूस दीन बनतो.
हे आपले आपण केलें । आळसें उदास नागविलें ।
वाईट संगतीनें बुडविलें । देखत देखतां ॥ ३ ॥
३) असें घडून येण्याला आपलें आपणच कारण असतो. उदासीन वृत्तीचा माणूस आळसानें नागवला जातो. वाईट संगतीनें माणूस पाहातां पाहातां बुडतो.
मूर्खपणाचा अभ्यास जाला । बाश्कलपणें घातला घाला ।
काम चांडाळ उठिला । तरुणपणीं ॥ ४ ॥
४) मूर्खोपणा अंगवळणी पडला, पोरकटपणानें वागूं लागला, तरुणपण आल्यानें कामवासना बळावली,
मूर्ख आळसी आणी तरुणा । सर्वांविषीं दैन्यवाणा ।
कांहीं मिळेना कोणा । काये म्हणावें ॥ ५ ॥
५) अशा प्रकारचा मूर्ख, आळशी आणि तरुण सर्व बाबतींत दैन्यवाणा बनतो. त्याला कांहीं मिळवतां येत नाहीं. याला काय म्हणावें?
जें जें पाहिजे तें तें नाहीं । अन्नवस्त्र तेंहि नाहीं ।
उत्तम गुण कांहींच नाहीं । अंतर्यामी ॥ ६ ॥
६) जीवनाला जें जें आवश्यक आहे, त्यापैकीं कांहींच त्याच्याजवळ नसतें. त्याच्यापाशी धड अन्न वस्त्र नसतें. त्याच्या अंतर्यामीं उत्तम गुण वगैरे कांहींच नसतात.
बोलता येना बैसतां येना । प्रसंग कांहींच कळेना ।
शरीर मन हे कळेना । अभ्यासाकडे ॥ ७ ॥
७) नीट बोलतां येत नाहीं. बसता येत नाहीं. प्रसंग वगैरे कांहींच कळत नाहीं, शरीर आणी मन अभ्यासाकडे वळत नाहीं.
लिहिणें नाहीं वाचणें नाहीं । पुसणें नाहीं सांगणें नाहीं ।
नेमस्तपणाचा अभ्यास नाहीं । बाष्कळपणं ॥ ८ ॥
८) लिहिणें नाहीं, वाचनें नाहीं, कोणाला विचारणें नाहीं किंवा सांगणें नाहीं. पोरकटपणानें नियमितपणाचा अभ्यास नाहीं, अशी त्याची दयनीय अवस्था असते.
आपणास कांहींच येना । आणी सिकविलेंहि मानेना ।
आपण वेडा आणी सज्जना । बोल ठेवी ॥ ९ ॥
९) स्वतःला कांहींच येत नसतें. अणि जर कोणीं शिकवूं लागलें तर तेंहि आवडत नाहीं. असा माणूसआपण वेडा असतो आणि सज्जनांचा मात्र तो उगीच दोष देतो.
अंतरी येक बाहेर एक । ऐसा जयाचा विवेक ।
परलोकाचें सार्थक । कैंसे घडे ॥ १० ॥
१०) मनांत एक व जनांत एक असा त्याचा विवेक असतो. त्याच्या हातून परलोकाचे सार्थक किंवा परमार्थ कसा घडणार?
आपला संसार नासला । मनामधें प्रस्तावला ।
तरी मग अभ्यास केला । पाहिजे विवेकाचा ॥ ११ ॥
११) अशा रीतीनें संसारांत फसगत झाल्यावर माणसाच्या मनाला पश्र्चाताप होतो.मग त्यानें विवेकाचा अभ्यास करावा.
येकाग्र करुनियां मन । बळेंचि धरावें साधन ।
येत्नीं आळसाचें दर्शन । होऊंच नये ॥ १२ ॥
१२) अशा माणसानें मन एकाग्र करावें. आणि जबरदस्तीनें परमार्थ साधना करण्यास लागावें. आपल्या प्रयत्नामध्यें चुकूनसुद्धा आळसाचा शिरकाव होऊं देऊं नये.
अवगुण अवघेचि सांडावें । उत्तम गुण अभ्यासावे ।
प्रबंद पाठ करीत जावे । जाड अर्थ ॥ १३ ॥
१३) आपल्या अंगचे सगळे अवगुण सोडावें. उत्तम गुणांचा अभ्यास करावा. ग्रंथ पाठ करावें. आणि त्यांतील मोठा व खोल अर्थ ध्यानांत धरावा.
पदप्रबंद श्र्लोकप्रबंद । नाना धाटी मुद्रा छंद ।
प्रसंगज्ञानेंचि आनंद । होत आहे ॥ १४ ॥
१४) नाना प्रकारची रचना असलेले श्लोक आणि पदें, तसेंच अनेक धाटी, मुद्रा आणि छंद पाठ करावे. योग्य प्रसंगी त्यांचा उचित उपयोग केला तर सर्वांना आनंद होतो.
कोणे प्रसंगीं काये म्हणावें । ऐसें समजोन जाणावें ।
उगेंचि वाऊगें सिणावें । कासयासी ॥ १५ ॥
१५) कोणत्या प्रसंगीं काय म्हणणें योग्य आहे हे बरोबर समजून असावें. उगीच व्यर्थ गैरलागू म्हणण्यांत केवळ शीण होतो.
दुसर्याचें अंतर जाणावें । आदर देखोन म्हणावें ।
जें आठवेल तें गांवें । हें मूर्खपण ॥ १६ ॥
१६) श्रोत्यांचे अंतरंगांत काय आहे तें आधी ओळखावें. आपण जें म्हणतो, त्याबद्दल त्यांची उत्सुकता दिसली तरच तें म्हणावें. उगीच जें आठवेल तें गाणें किंवा म्हणणें हें मूर्खपण होय.
ज्याची जैसी उपासना । तेंचि गावें चुकावेना ।
रागज्ञाना ताळज्ञाना । अभ्यासावें ॥ १७ ॥
१७) ज्याची जशी उपासना असेल तेंच त्यानें गांवें. त्यामध्यें चूक करुं नये. रागाचा व तालाचा अभ्यास करावा.
साहित संगीत प्रसंग मानें । करावीं कथेंचीं घमशानें ।
अर्थांतर श्रवणमननें । काढीत जावें ॥ १८ ॥
१८) साहित्य, संगीत, योग्य प्रसंग यांचा मेळ बसवून मोठ्य धडाक्यानें कथा करावी. श्रवण, मनन करुन ग्रंथांमधील निरनिराळे अर्थ काढावें.
पाठ उदंडचि असावें । सर्वकाळ उजळीत जावें ।
सांगितलें गोष्टीचें असावें । स्मरण अंतरीं ॥ १९ ॥
१९) सपाटून पाठांतर असावें. सतत त्याची उजळणी करावी. जी गोष्ट सांगितली असेल तिचेअंतरी स्मरण ठेवावें.
अखंड येकांत सेवावा । ग्रन्थमात्र धांडोळावा ।
प्रचित येईल तो घ्यावा । अर्थ मनीं ॥ २० ॥
२०) निरंतर एकांत सेवन करावा. एकामतामध्यें सगळें ग्रंथ सूक्ष्मपणें अभ्यासावें. आणि जोअर्थ अनुभवाला जुळेल तो ध्यानांत ठेवावा.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निस्पृहसिकवणनाम समास तिसरा ॥
Samas Tisara Nispruha Shikavan
समास तिसरा निस्पृह शिकवण
Custom Search
No comments:
Post a Comment