Dashak Atharava Samas Aathava AntarDev Nirupan
Samas Aathava AntarDev Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Antar Dev. Antar Dev means real Dev. Sadhak or Bhakat has to think and decide which true God is.
समास आठवा अंतर्देव निरुपण
श्रीराम ॥
ब्रह्म निराकार निश्र्चळ । आत्म्यास विकार चंचळ ।
तयास म्हणती सकळ । देव ऐसें ॥ १ ॥
१) ब्रह्म निराकार व निश्चळ आहे. आत्मा चंचळ असून त्यास विकार आहे. त्याला सगळे लोक देव म्हणतात.
देवाचा ठावचि लागेना । येक देव नेमस्त कळेना ।
बहुत देवीं अनुमानेना । येक देव ॥ २ ॥
२) वस्तुस्थिति अशी आहे कीं, देवाचा पत्ता लागत नाहीं. एक देव कोणता हें निश्चयपूर्वक कळत नाहीं.पुष्कळ देव पाहिलें कीं, यापैकीं खरा एक देव कोणता त्याची कल्पना करतां येत नाहीं.
म्हणोनी विचार असावा । विचारें देव शोधावा ।
बहुत देवांचा गोवा । पडोंचि नये ॥ ३ ॥
३) म्हणून माणसापाशीं विचार असावा. विचारानें देव शोधावा. पुष्कळ देवांचा गोंधळ होऊं देऊं नये.
देव क्षत्रीं पाहिला । त्यासारिखा धातूचा केला ।
पृथ्वीमधें दंडक चालिला । येणें रीतीं ॥ ४ ॥
४) एकानें एका क्षेत्रांत एक देव पाहिला.त्यासारखी धातूची एक मूर्ति तयार केली.जगांध्यें हा असा प्रकार चालत आला आहे.
नाना प्रतिमादेवांचें मूळ । तो हा क्षत्रदेवचि केवळ ।
नाना क्षत्रें भूमंडळ । शोधून पाहावें ॥ ५ ॥
५) क्षेत्रामधील देव अनेक प्रतिमादेवांचे मूळ आहे. पृथ्वीवर अनेक क्षेत्रें आहेत ती शोधून पाहावीत.
क्षत्रदेव पाषाणाचा । विचार पाहातां तयाचा ।
तंत लागला मुळाचा । अवताराकडे ॥ ६ ॥
६) क्षेत्रांतील देव पाशाणाचा केलेला असतो. तो कसा झाला याचा विचार केला तर त्याचे मूळ एखाद्या अवतारापर्यंत पोचतें.
अवतारी देव संपले । देहे धरुनी वर्तोन गेले ।
त्याहून थोर अनुमानले । ब्रह्मा विष्णु महेश ॥ ७ ॥
७) अवतारी देव तर संपले, ते देहांत आलें आणि मोठें कार्य करुन गेलें, ब्रह्मा, विष्णु व महेश हे तीन देव त्यांच्याहून मोठें अशी कल्पना केली.
त्या तिही देवांस ज्याची सत्ता । तो अंतरात्माचि पहातां ।
कर्ता भोक्ता तत्वता । प्रतक्ष आहे ॥ ८ ॥
८) पण या तिन्ही देवांवर अंतरात्म्याची सत्ता चालते. खरें पाहिलें तर तोच प्रत्यक्ष कर्ता आहे व भोक्ता आहे.
युगानयुगें तिन्ही लोक । येकचि चालवी अनेक ।
हा निश्र्चयाचा विवेक । वेदशास्त्रीं पाहावा ॥ ९ ॥
९) हा अंतरात्मा अनेक युगें तिन्ही लोक चालवतो आहे. तो स्वतः एकटा असून अनेकांस चालवतो. वेदशास्त्रांत असा निश्र्चयपूर्वक निर्णय केलेला आढळेल.
आत्मा वर्तवितो शरीर । तोचि देव उत्तरोत्तर ।
जाणीवरुपें कळिवर । विवेकें वर्तवी ॥ १० ॥
१०) अंतरात्मा शरीर चालवतो. त्याचा शोध केला तर जाणिवेच्या रुपानें व विवेकानें तोच देव शरेर चालवतो अशी प्रचीति येईल.
तो अंतर्देव चुकती । धांवा घेऊन तीर्था जाती ।
प्राणी बापुडे कष्टती । देवास नेणतां ॥ ११ ॥
११) त्या अंतर्देवाला लोक चुकतात. आणि तीर्थाकडे धांव घेतात. खरा देव कोणता तें न कळल्यानें बिचारीं माणसें कष्ट भोगतात.
मग विचारिती अंतःकर्णी । जेथें तेथें धोंडा पाणी ।
उगेंचि वणवण हिंडोनि । काये होतें ॥ १२ ॥
१२) तीर्थांत जाऊन न भेटल्यावर मगात्यांच्या मनांत असा विचार येतो कीं, प्रत्येक तीर्थामध्यें धोंडा व पाणी याशिवाय देसरें कांहींच नसतें. हें जर खरें तर उगीच वणवण फिरुन कांहींच फायदा नाहीं.
ऐसा ज्यासी विचार कळला । तेणें सत्संग धरिला ।
सतसंगें देव सांपडला । बहुत जनासी ॥ १३ ॥
१३) हा विचार बरोबर ज्याला कळतो,तो मग सतसंग धरतो. पुष्कळ लोकांना सत्संगानें देव सापडलेला आहे.
ऐसीं हे विवेकाचीं कामें । विवेकी जाणतील नेमें ।
अविवेकी भुलले भ्रमें । त्यांस हें कळेना ॥ १४ ॥
१४) अशीं हीं विवेकाची कामें आहेत. विवेकशील माणसांना ती बरोबर समजतात. भ्रमानें भुरळ पडलेली जीं विवेकहीन माणसें असतात, त्यांना हे कळत नाहीं.
अंतरवेधी अंतर जाणे । बाहेरमुद्रा कांहींच नेणें ।
म्हणोन विवेकी शाहाणे । अंतर शोधिती ॥ १५ ॥
१५) अंतर्मुख होऊन जो आंत बघायला शिकतो त्यालाच अंतरंगामधून सूक्ष्माचें ज्ञान होतें. जो बहिर्मुख असतो त्याला या गोष्टी कांहींच कळत नाहींत. म्हणून जे विवेकी व शहाणें असतात तें आपलें अंतरंग शोधतात.
विवेकेंविण जो भाव । तो भावचि अभाव ।
मूर्खस्य प्रतिमा देव । ऐसें वचन ॥ १६ ॥
१६) विवेकपूर्ण म्हणजे नीट समजून श्रद्धा ठेवणें आवशक आहे. विवेक न वापरता जी श्रद्धा ठेवली जाते ती एकप्रकारें अश्रद्धाच होय. " प्रतिमा मूर्खांचा देव असतो. " असें एक वचन आहे.
पाहात समजत सेवटा गेला। तोचि विवेकी भला ।
तत्वें सांडुनी पावला । निरंजनीं ॥ १७ ॥
१७) विचारानें व साधनानें जो आंत पाहात गेला आणि अंतरंग समजत गेला तो शेवटास जातो. तो आत्मस्वरुपापर्यंत पोचतो. तोच उत्तम विवेकवान होय. अशाश्वत तत्वांना मागें टाकून तो निर्मळ ब्रह्मापर्यंत पोचतो.
आरे जे आकारासी येतें । तें अवघेंच नासोन जातें ।
मग गल्बल्यावेगळें तें । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥
१८) अरें, जें जें कांहीं आकाराला येते, तें तें सर्व नाश पावतें. आकारमय अशाशव्ताच्या गोंधळापलीकडे राहणारें तें परब्रह्म होय.
चंचळ देव निश्र्चळ ब्रह्म । परब्रह्मीं नाहीं भ्रम ।
प्रत्ययज्ञानें निभ्रम । होईजेतें ॥ १९ ॥
१९) देव चंचळ तर परब्रह्म निश्र्चळ आहे. परब्रह्माच्या ठिकाणीं भ्रम नाहीं. आपण भ्रमांत आहोंत. म्हणून ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपण भ्रमरहित व्हावें.
प्रचीतीविण जें केलें । तें तें अवघें वेर्थ गेलें ।
प्राणी कष्टकष्टोंचि मेलें । कर्मकचाटें ॥ २० ॥
२०) अनुभव न घेतां जें जें कांहीं आपण करतों तें सारें व्यर्थ जातें. कर्माच्या कचाट्यांत सापडून माणूस कष्ट भोगीत मरुन जातो.
कर्मवेगळें न व्हावें । तरी देवास कासया भजावें ।
विवेकी जाणती स्वभावें । मूर्ख नेणे ॥ २१ ॥
२१) कर्माहून जर वेगळें व्हायचे नाहीं, तर मग देवाचे भजन कशासाठीं करायचे? विवेकी पुरुषांना हें बरोबर समजतें. मूर्खांना नाहीं.
कांहीं अनुमानलें विचारें । देव आहे जगदांतरें ।
सगुणाकरितां निर्धारें । निर्गुण पाविजे ॥ २२ ॥
२२) विचार केला तर देव जगाच्या अंतर्यामी भरुन आहे अशी कल्पना येते. त्याला भजण्यास सगुणाचाच आधार घेतला पाहिजे. अशारीतीनें सगुणाची उपासना केली कीं, निश्र्चयानें निर्गुणाची प्राप्ती होते.
सगुण पाहातां मुळास गेला । सहजचि निर्गुण पावला ।
संगत्यागें मोकळा जाला । वस्तुरुप ॥ २३ ॥
२३) नामरुप सगुणाचा शोध घेतां घेतां उपासक मूळमायेपर्यंत पोचतो. तेथें त्याला सहजच निर्गुणाची प्राप्ती होते. उपासनेच्या शेवटीं उपासक मीपणानें संपूर्ण नाहींसा होतो. म्हणजेच तो सर्व दृश्यरुप सगुणापासून मोकळा होतो. असा मोकळा होऊन तो ब्रह्मरुप होतो.
परमेश्र्वरीं अनुसंधान । लावितां होईजे पावन ।
मुख्य ज्ञानेंचि विज्ञान । पाविजेतें ॥ २४ ॥
२४) अमतरात्म्याचे अखंड अनुसंधान लावावें. तें लागलें कीं, मनुष्य पावन होतो. त्याला आत्मज्ञान होतें. पुढें विज्ञान प्राप्त होतें.
ऐसीं हे विवेकाचीं विवर्णें । पाहावीं सुचित अंतःकर्णें ।
नित्यानित्यविवेकश्रवणें । जगदोदहार ॥ २५ ॥
२५) अंतःकरण एकाग्र करावें आणि विवेकानें अशा प्रकारचे विवरण करावें. नित्यानित्यविवेकाच्या श्रवणानें जगाचा उद्धार होतो.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अंतर्देवनिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathava AntarDev Nirupan
समास आठवा अंतर्देव निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment