Dashak Aekonvisava Samas Aathava Upadhi Lakshan Nirupan
Samas Aathava Upadhi Lakshan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Leader and his behavior with people. Name of this Samas is Upadhi Lakshan Nirupan.
समास आठवा उपाधिलक्षण निरुपण
श्रीराम ॥
सृष्टिमधें बहु लोक । परिभ्रमणें कळे कौतुक ।
नाना प्रकारीचे विवेक । आडळों लागती ॥ १ ॥
१) जगांमधें कितीतरी चांगलें लोक आहेत. आपण देशोंदेशी प्रवास केला म्हणजे त्यांचे कौतुक पहावयास मिळतें. अशा प्रवास करण्यानें निरनिराळ्या प्रकारचे विचारसुद्ध आपल्याला समजतात.
किती प्रपंची जन । अखंड वृत्ति उदासीन ।
सुखदुःखें समाधान । दंडळेना ॥ २ ॥
२) प्रपंचांत राहणारी कांहीं माणसें अशी आढळतात कीं त्यांची वृत्ति निरंतर उदासीन म्हणजे अलिप्त आसतें. सुखानें किंवा दुःखानें त्यांचे स्थान डळमळीत होत नाहीं.
स्वभावेंचि नेमक बोलती । सहजचि नेमक चालती ।
अपूर्व बोलण्याची स्थिती । सकळांसी माने ॥ ३ ॥
३) त्यांचा स्वभाव संयमी असतो. जेवढें जरुर तेवधेंच ती बोलतात. आणि नेहमी संयमानेंच वागतात. त्यांची बोलण्याची पद्धत अशी असतें कीं, त्यांचे बोलणें सर्वांना पटते.
सहजचि ताळज्ञान येतें । स्वभावेंचि रागज्ञान उमटतें ।
सहजचि कळत जातें । न्यायेनीतिलक्षण ॥ ४ ॥
४) एखादा माणूस असा आढळला कीं त्याच्या अंगी तालाचे ज्ञान अगदी सहजच आढळते. एखाद्याच्या अंगी रागांचे ज्ञान आपोआप प्रगट होते. तर एखाद्या माणसाला नीति व न्याय यांची लक्षणें कोणीं न सांगता सहज ध्यानांत येतात.
येखादा आडळे गाजी । सकळ लोक अखंड राजी ।
सदा सर्वदा आवडी ताजी । प्राणीमात्राची ॥ ५ ॥
५) एखादा असा पराक्रमी माणूस आढळतो कीं, त्याच्यावर सगळें लोक नेहमी खूष आसतात. त्याच्यावर असणारें जनतेचे प्रेम सदा ताजे असते.
चुकोन उदंड आडळतें । भारी मनुष्य दृष्टीस पडतें ।
महंताचें लक्षणसें वाटतें । अकस्मात ॥ ६ ॥
६) एखादेंवेळी चुकुन मोठें भांडार आढळतें. अशी भव्य व्यक्ति दृष्टीस पडते कीं तिला पाहिल्यावर महंताची सारी लक्षणें तिच्या ठिकाणीं स्पष्ट दिसतात.
ऐसा आडळतां लोक । चमत्कारें गुणग्राहिक ।
क्रिया बोलणें नेमक । प्रत्ययाचें ॥ ७ ॥
७) अशा पुरुषाच्या ठिकाणी आश्र्चर्यकारक गुणग्राहकता दिसून येते. उत्तम गुण आत्मसात करण्याची त्याची शक्ति पाहून चमत्कार वाटतो. त्यांचे बोलणें व वागणें अति नेमके आणि अनुभवाचे असते.
सकळ अवगुणामधें अवगुण । आपलें अवगुण वाटती गुण ।
मोठें पाप करंटपण । चुकेना कीं ॥ ८ ॥
८) आपल्या अवगुणांना गुण मानणें हा माणसाच्या अंगी असणार्या अवगुणांमधील सर्वांत मोठा अवगुण आहे. तें मोठे पाप आहे. त्यामुळें माणसाला करंटेपण चुकत नाहीं.
ढाळेंचि काम होतें सदा । जें जपल्यानें नव्हे सर्वदा ।
तेथें पीळपेंचाची आपदा । आढळेचिना ॥ ९ ॥
९) एखाद्या माणासाचे तेजच असें असतें कीं, तो कोणतेही काम धडाक्यानें करुन टाकतो. तेंच काम दुसर्यानें कितीही जपून केलें तरी त्यास ते जमत नाहीं. धडाक्यानें काम करणार्या माणसाला आंत एक बाहेर एक, लबाडी, व्यत्यय वगैरे अडचणी आड येत नाहींत.
येकासी अभ्यासितां न ये । येकासी स्वभावेंचि ये ।
ऐसा भगवंताचा महिमा काये । कैसा कळेना ॥ १० ॥
१०) जी गोष्ट एखाद्या माणसाला अभ्यास करुनही येत नाही, तीच गोष्ट दुसर्या एखाद्याला सहज जमतें. भगवंताचा हा अगाध महिमा आहे. त्याचा पत्ता लागत नाहीं.
मोठीं राजकारणें चुकती । राजकारणा वेढा लागती ।
नाना चुकीची फजीती । चहुंकडे ॥ ११ ॥
११) एखदा माणूस जर मोठें राजकारण चुकला तर त्यामुळें सगळें लोक अडचणीनी वेढलें जातात. अशा अनेक चुका घडल्या तर मोठी फजिती होतें.
याकारणें चुकों नये । म्हणिजे उदंड उपाये ।
उपायाचा अपाये । चुकतां होये ॥ १२ ॥
१२) म्हणून राजकारणीं माणसानें सहसा चूक करुं नये. मग त्याच्या हाताशी पुष्कळ उपाय असतात. राजकारणी माणूस चुकला तर उपायाचा देखील अपाय होतो.
काये चुकलें तें कळेना । मनुष्याचें मनचि वळेना ।
खवळला अभिमान गळेना । दोहिंकडे ॥ १३ ॥
१३) आपलें काय चुकलें तें स्वतःला कळत नाहीं. ज्या माणसाबरोबर राजकारण चालूं असते, त्याचे मन कांहीं केल्या वळत नाहीं. आपल्या म्हणण्याला तो मान्यता देत नाहीं, अशा परिस्थितींत दोन्हीकडे अभिमान खवळलेला असतो. तो कांहीं कमी होत नाहीं.
आवघे फडचि नासती । लोकांची मनें भंगती ।
कोठें चुकते युक्ती । कांहीं कळेना ॥ १४ ॥
१४) याच्यामुळें राजकारण नासतें. दोन्ही बाजूंची जनता नाराज होऊन विस्कळीत होते. लोकांची मनें भंगून जातात. इतकें होऊनसुद्धा आपलें राजकारण कोठें चुकले तें कळत नाहीं.
व्यापेंविण आटोप केला । तो अवघा घसरतचि गेला ।
अकलेचा बंद नाहीं घातला । दुरीदृष्टीनें ॥ १५ ॥
१५) विवेक करुन पूर्वयोजना न आखतां जर लोकसमुदाय जमवला तर तो सांभाळता येत नाहीं. तेथें राजकारण व नेतेपणा घसरत जातो. प्रथमच दूरदृष्टी वापरुन विवेकानें ज्या मर्यादा घालायला पाहिजे होत्या त्या न घातल्यानें असा प्रसंग येतो.
येखादें मनुष्य तें सिळें । त्याचें करणेंचि बावळें ।
नाना विकल्पांचें जाळें । करुन टाकी ॥ १६ ॥
१६) एखादा माणूस अगदींच कांहींतरी असतो. तो कळाहीन व कर्तृत्वहीन असतो. त्यावे सगळे करणें बावळटपणाचें असतें. आपल्या कामांत तो अनेक घोटाळ्यांचे जाळेंच निर्माण करुन ठेवतो.
तें आपणासी उकलेना । दुसर्यास कांहींच कळेना ।
नाचे विकल्पें कल्पना । ठांईं ठाईं ॥ १७ ॥
१७) ते जाळे त्याला स्वतःला उकलता येत नाहीं. दुसर्याला त्यांत कांहीं कळत नाहीं. आणि संशयाच्या पोटी कल्पना मात्र उगीच थैमान घालते.
त्या गुप्त कल्पना कोणास कळाल्या । कोणें येऊन आटोपाव्या ।
ज्याच्या त्यानें कराव्या । बळकट बुद्धि ॥ १८ ॥
१८) त्याच्या अंतरंगांतील त्या गुप्त कल्पना दुसर्या कोणास कळत नाहींत. दुसरा कोणी त्यांना आवर घालूं शकत नाहीं. ज्यानें त्यानेंच आपल्या बुद्धिला घट्ट करुन, स्थिर करुन मनांत उसळणार्या कल्पनांना आवर घातला पाहिजे.
ज्यासी उपाधी आवडेना । तेणें उपाधी वाढवावीना ।
सावचित करुनियां मना । समाधानें असावें ॥ १९ ॥
१९) ज्या माणसाला मोठ्या कामांची उपाधी आवरतां येत नसेल त्यानें मोठी कामें अंगावर घेऊन उपाधी वाढवूं नये. मनाला स्वस्थ करुन त्यानें समाधानांत राहावें.
धांवधांवों उपाधी वेष्टी । आपण कष्टी लोक हि कष्टी ।
हे माना नये गोष्टी । कुसमुसेची ॥ २० ॥
२०) एखादें काम घाईघाईनें कसेंतरी करुन टाकलें तर आपण कष्टी होतो. आणि लोकांनाही कष्टी करतो. अशा रीतीनें कसेंतरी काम करणें चांगलें नाही.
लोक बहुत कष्टी जाला । आपणहि अत्यंत त्रासला ।
वेर्थचि केला गल्बला । कासयासी ॥ २१ ॥
२१) समजा एखाद्या माणसाच्या कार्यानें लोकांना फार कष्ट झालें आणि तोहि अगदी त्रासून गेला, तर मग उगीच त्या कार्याची धडपड गडबड कशाला केली असें म्हणावें लागतें.
असो उपाधीचें काम । कांहीं बरें कांहीं काणोंसें ।
सकळ समजोन ऐसें । वर्ततां बरें ॥ २२ ॥
२२) असों. उपाधि म्हटली कीं, तिचें काम हें असेंच असतें. तिच्यामध्यें कांहीं चांगलें तर कांहीं उणे असायचेच. हें सगळें समजून वागणें केव्हांही बरें.
लोकांपासी भावार्थ कैचा । आपण जगवावा तयांचा ।
सेवट उपंढर कोणाचा । पडोंचि न ये ॥ २३ ॥
२३) जनतेपाशी कांहीं श्रद्धा किंवा निष्ठा नसतें. आपणच ती निर्माण करुन, जागृत ठेवावी लागते. शेवटी कोणाची फजिती होणार नाहीं याची काळजी घ्यावी.
अंतरात्म्याकडे सकळ लागे । निर्गुणीं हें कांहींच न लगे ।
नाना प्रकारीचे दगे । चंचळामधें ॥ २४ ॥
२४) चंचळामध्यें घडणारें सगळें अंतरात्म्यापर्यंत जाते. निर्गुणाशीं त्याचा कांहींच संबंध नाहीं. चंचळामधें अनेक प्रकारचे धोके असतात.
शुद्ध विश्रांतीचें स्थळ । तें एक निर्मळ निश्र्चळ ।
तेथें चिकारचि सकळ । निर्विकार होती ॥ २५ ॥
२५) निर्मळ व निश्र्चळ परब्रह्म तें एकच शुद्ध विश्रांतीचे स्थळ आहे. तेथें चंचळाचे सगळे विकारच मुळीं निर्विकार होऊन जातात.
उद्वेग अवघे तुटोनि जाती । मनासी वाटे विश्रांती ।
ऐसी दुल्लभ परब्रह्मस्थिती । विवेकें सांभाळावी ॥ २६ ॥
२६) तेथें सर्व दुःखें नाहींशी होऊन जातात. आणि मनाला एकदम विश्रांती मिळते. दुर्लभ असणारी अशीही परब्रह्मस्थिती, ही ब्राह्मी स्थिति विवेकाच्या जोरावर सांभाळावी. कायम टिकवावी.
आपणास उपाधी मुळींच नाहीं । रुणानुबंधे मिळाले सर्वहि ।
आल्यागेल्याची क्षिती नाहीं । ऐसें जालें पाहिजे ॥ २७ ॥
२७) आपल्याला मुळांत कांहीं उपाधि नाहीं. आपल्याभोवती असणारी माणसें हें सर्व ऋणानुबंधानें येतात. म्हणून कोणी येवो अगर जावो त्याची क्षिति होणें व तशी वृत्ति होणें जरुर आहे.
जो उपाधीस कंटाळला । तों निवांत होऊन बैसला ।
आटोपेना तो गलबला । कासयासी ॥ २८ ॥
२८) जो या उपाधिला खर्या अर्थानें कंटाळतो, तो तिला बाजूला सारतो. मग अगदी निवांत होऊन शांत बसतो. जी उपाधि आपल्याला आवरता येत नाहीं तिची गडबड हवीच कशाला?
कांहीं गल्बला कांहीं निवळ । ऐसा कठीण जावा काळ ।
जेणेंकरितां विश्रांती वेळ । आपणासी फावे ॥ २९ ॥
२९) कांहीं वेळेला उपाधिची गडबड असावी व कांहीं वेळ उपाधि अगदी नसावी. अशारीतीनें आपण काळ कंठीत जावा. त्यामुळें आपल्याला विश्रांती घेण्यास वेळ मिळतो.
उपाधी कांहीं राहात नाहीं । समाधानायेवढें थोर नाहीं ।
नरदेहे प्राप्त होत नाहीं । क्षणक्षणा ॥ ३० ॥
३०) जगांतील उपाधि आपल्याकरितां कांहीं अडून बसत नाहीं. मनाच्या समाधाना इतकी श्रेष्ठ गोष्ट जगामध्यें दुसरी नाहीं. मनावदेह परत परत मिळत नाहीं. माणसानें आपलें समाधान साधावें व टिकवावें.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उपाधीलक्षणनिरुपण नाम समास आठवा ॥
Samas Aathava Upadhi Lakshan Nirupan
समास आठवा उपाधिलक्षण निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment