Dashak Atharava Samas Pahila BahuDevaSthana Nirupan
Samas Pahila BahuDevaSthana Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about BahuDevsthana.
समास पहिला बहुदेवस्थान निरुपण
श्रीराम ॥
तुज नमूं गजवदना । तुझा महिमा कळेना ।
विद्या बुद्धि देसी जना । लाहानथोरांसी ॥ १ ॥
१) गजवदना मी तुला नमस्कार करतो. तुझा महिमा कळत नाहीं. लहान आणि थोर माणसांना तूं विद्या व बुद्धि देतोस.
तुज नमूं सरस्वती । च्यारी वाचा तुझेन स्फूर्ती ।
तुझें निजरुप जाणती । ऐसे थोड़े ॥ २ ॥
२) सरस्वती, मी तुला नमन करतो. चारहि वाणी तुझ्या सत्तेनें स्फुरतात. तुझें खरें स्वरुप ओळखणारे जगांत फार कमी असतात.
धन्य धन्य चतुरानना । तां केली सृष्टीरचना ।
वेद शास्त्रें भेद नाना । प्रगट केले ॥ ३ ॥
३) ब्रह्मदेवा तूं धन्य आहेस. तूं सृष्टीरचना केलीस. वेद, शास्तरे व इतर अनेक भेद तूं प्रगट केलेस.
धन्य विष्णु पाळण करिसी । येकांशें सकळ जीवांसी ।
वाढविसी वर्तविसी । जाणजाणों ॥ ४ ॥
४) विष्णु, तूं धन्य आहेस, तूं पालन करतोस. आपल्या एका अंशानें सर्व जीवांना त्यांच्या अंतरंगाप्रमाणें वाढवतोस व वागवतोस.
धन्य धन्य भोळाशंकर । जयाच्या देण्यास नाहीं पार ।
रामनाम निरंतर । जपत आहे ॥ ५ ॥
५) भोळा शंकर धन्य होय. त्यच्या देण्याला कांहीं मर्यादाच नाहीं. तो निरंतर रामनाम जपत असतो.
धन्य धन्य इंद्रदेव । सकळ देवांचाहि देव ।
इंद्रलोकींचें वैभव । काये म्हणौनि सांगावें ॥ ६ ॥
६) इंद्रदेव धन्य होय.तो सर्व देवांचा देव आहे. इंद्रलोकांचे वैभव वर्णन करणें कठिण आहे.
धन्य धन्य येमधर्म । सकळ जाणती धर्माधर्म ।
प्राणीमात्रांचें वर्म । ठांई पाडिती ॥ ७ ॥
७) यमधर्म धन्य होय. सगळ्यांना तो धर्म व अधर्म यांचे ज्ञान तो करुन देतो. जीवानें धर्म किती पाळला व अधर्म किती केला याचा बरोबर हिशोब तो करतो.
वेंकटेसीं महिमा किती । भले उभ्या अन्न खाती ।
वडे धिरडी स्वाद घेती । आतळस आपालांचा ॥ ८ ॥
८) व्यंकटेशाचा महिमा फार आहे. तेथें चांगलीं माणसें उभ्यानें अन्न खातात. वडे, धिरडी व खमंग घारग्यांचा ते रसास्वाद घेतात.
धन्य तूं वो बनशंकरी । उदंड शाखांचिया हारी ।
विवरविवरों भोजन करी । ऐसा कैंचा ॥ ९ ॥
९) हे बनशंकरी तूं धन्य आहेस. तुझ्या नैवेद्याला खुप भाज्या असतात. त्यांतील प्रत्येक भाजीची चव घेऊन रसास्वाद घेणारा भक्त भेटणें कठीण आहे.
धन्य भीम गोलांगुळा । कोरवड्यंच्य उदंड माळा ।
दहि वडे खातां ं । समाधान होये ॥ १० ॥
१०) वानररुपी बलभीम हनुमान धन्य आहे. उडदाच्या पीठाचे वडे तळतात. व त्यांच्या माळा मारुतीरायास घालतात. दहिवडे खाऊन सर्वांचें समाधान होते.
धन्य तूं गा खंडेराया । भंडारें होये पिंवळी काया ।
कांदेभरीत रोटगे खाया । सिद्ध होती ॥ ११ ॥
११) खंडेराया तूं धन्य आहेस. तुझ्या दर्शनास आल्यावर भंडार्यानें सर्व अंग पिवळें होऊन जाते. मग कांद्याचे भरीत व रोडगे खायला सगळेजण आतुर होतात.
धन्य तुळजाभोवानी । भक्तां प्रसन्न होते जनीं ।
गुणवैभव गणी । ऐसा कैंचा ॥ १२ ॥
१२) तुळजाभवानी धन्य आहे. भक्तांवर ती प्रसन्न होते. तिचे अनंत गुण आहेत. त्यांची कल्पना कोणासच येत नाहीं.
धन्य धन्य पांडुरंग । अखंड कथेचा होतो धिंग ।
तानमाने रागरंग । नाना प्रकारीं ॥ १३ ॥
१३) पांडुरंग अतिशय धन्य आहे. त्याच्यासमोर कथाकिर्तनांचा गदारोळ अखंड चाललेला असतो. अनेक प्रकारचा तानमान आणि रागरंग तेथें अहर्निश चालतो.
धन्य तूं गा क्षत्रपाळा । उदंड जना लाविला चाळा ।
भावें भक्ति करितां फळा । वेळ नाहीं ॥ १४ ॥
१४) क्षेत्रपाळ बहिरोबा, तूं धन्य आहेस. अनेक लोकांस तूं प्रेम लावलें आहेस. मनापासून तुझी भक्ति केली तर फळ मिळण्यास उशीर लागत नाहीं.
रामकृष्णादिक अवतार । त्यांचा महिमा अपार ।
उपासनेस बहुत नर । तत्पर जाले ॥ १५ ॥
१५) राम, कृष्ण वगैरे हे अवतार आहेत. त्यांचा महिमा फारच मोठा आहे. पुष्कळ लोक अगदी त्यांची मनापासून उपासना करतात.
सकळ देवांचे मूळ । तो हा अंतरात्माचि केवळ ।
भूमंडळीं भोग सकळ । त्यासीच घडे ॥ १६ ॥
१६) सगळ्या देवांचे मूळ असेल तर तो हा अंतरात्माच आहे. या जगामधील सारे भोग अखेर अंतरात्म्यालाच घडतात.
नाना देव होऊन बैसला । नाना शक्तिरुपें जाला ।
भोक्ता सकळ वैभव । तोचि येक ॥ १७ ॥
१७) अंतरात्मा अनेक देवांच्या रुपांनी व शक्तींच्या रुपांनीं व्यक्त होतो. सर्व प्रकारचे वैभव भोगणारा फक्त तोच एक आहे.
याचा पाहावा विचार । उदंड लांबला जोजार ।
होती जाती देव नर । किती म्हणोनि ॥ १८ ॥
१८) हा विचार नीट करुन पाहावा. देवांचे वर्णन करायचें म्हणजे फार मोठा विस्तार आहे. देव आणि माणसें किती होऊन जातात याची गणती करणें शक्य नाहीं.
कीर्ति आणि अपकीर्ति । उदंड निंदा उदंड स्तुती ।
सर्वत्रांची भोगप्राप्ती । अंतरात्म्यासीच ॥ १९ ॥
१९) जगामध्यें होणारी कीर्ति आणि अपकीर्ति, अतिनिंदा आणि अति स्तुति, या सगळ्या गोष्टी अखेर अंतरात्म्यालाच भोगाव्या लागतात.
कोण देहीं काये करितो । कोण देहीं काये भोगितो ।
भोगी त्यागी वीतरागी तो । येकचि आत्मा ॥ २० ॥
२०) कांहीं देहांत तो कार्य करतो, कांहीं देहांत भोग भोगतो. भोग असो वा त्याग असो वा वीतराग असो, सर्वांचा अनुनय घेणरा तो अंतरात्मा एकच आहे.
प्राणी साभिमानें भुलले । देह्याकडे पाहात गेले ।
मुख्य अंतरात्म्यास चुकलें । अंतरीं असोनी ॥ २१ ॥
२१) माणसें देहाभिमानाला भुलतात. आणि केवळ देहाला पाहातात. देहालाच खरेपणा देतात. त्यामुळें अंतरात्मा देहामध्यें वास करीत असून देखील त्याला चुकतात.
आरे या आत्मयाची चळवळ पाहे । ऐसा भूमंडळीं कोण आहे ।
अगाध पुण्यें अनुसंधान राहे । कांहींयेक ॥ २२ ॥
२२) अहो, या अंतरात्म्याचे कर्तेपण समजणारा व जाणणारा माणूस फारच क्वचित आढळतो. फार मोठें पुण्य गांठी असेल तर त्याचे थोडेफार अनुसंधान राखता येते.
त्या अनुसंधानासरिसें । जळोनी जाईजे किल्मिषें ।
अंतरनिष्ठ ज्ञानी ऐसे । विवरोन पाहाती ॥ २३ ॥
२३)त्याचे अनुसंधान लागल्याबरोबर पाप जळून जातें. जो अंतरनिष्ट ज्ञानी असतो तो हे सगळें नीटपणें समजतो.
अंतरनिष्ठ तितुके तरले । अंतरभ्रष्ट तितुके बुडाले ।
बाह्याकारें भरंगळले । लोकाचारें ॥ २४ ॥
२४) जें अंतरनिष्ट पुरुष असतात, तेवढेंच तरतात. जे अंतरभ्रष्ट असतात ते सारे बुडतात. वाया जातात. कारण बहिर्मुख लोकाचाराच्या नादी लागून ते भरमसाट वागतात.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बहुदेवस्थाननिरुपणनाम समास पहिला ॥
Samas Pahila BahuDevaSthana Nirupan
समास पहिला बहुदेवस्थान निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment