Tuesday, June 26, 2018

Samas Dusara SrushtiTrividha Lakshan Niupan समास दुसरा सृष्टीत्रिविध लक्षण निरुपण


Dashak Visava Samas Dusara SrushtiTrividha Lakshan Niupan 
Samas Dusara SrushtiTrividha Lakshan Niupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us Srushti. Srushti means Chachal Dusha. Sadhak is required to reach to Nishchal. Nishchal means ParBrahma. Aimof Sadhak is to attain ParBrahma. Name of this Samas is SrushtiTrividha Lakshan Niupan.
समास दुसरा सृष्टीत्रिविध लक्षण निरुपण
श्रीराम ॥
मूळमाया नस्तां चंचळ । निर्गुण ब्रह्म तें निश्र्चळ ।
जैसें गगन अंतराळ । चहुंकडे ॥ १ ॥
१) ज्याप्रमाणें रिकामें आकाश चोहोंकडे असतें त्याचप्रमाणें चंचळ मूळमाया उत्पन्न होण्यापूर्वी निर्गुण ब्रह्म निश्र्चळपणें असतें. 
दृश्य आलें आणि गेलें । परी तें ब्रह्म संचलें । 
जैसें गगन कोंदाटलें । चहुंकडे ॥ २ ॥  
२) दृश्य विश्र्व आलें आणि गेलें तरी निश्र्चळ परब्रह्म जसेंच्या तसेंच सांचलेले राहते.  ज्याप्रमाणें अवकाशमय आकाश सगळीकडे कोंदाटलेलें असतें, त्याचप्रमाणें परब्रह्म सगळीकडे साचलेले असते.  
जिकडे पाहावें तिकडे अपार । कोणेकडे नाहीं पार ।
येकजिनसी स्वतंत्र । दुसरें नाहीं ॥ ३ ॥
३) ज्या बाजूनें परब्रह्म पहावें त्या बाजूनें तें अपार असतें. कोणत्याही बाजूला त्याचा अंत लागत नाहीं. परब्रह्म अगदी एकजिनसी आहे, स्वतंत्र आहे. त्याच्यावाचून दुसरें कांहीं नाहीं. 
ब्रह्मांडावरतें बैसावें । अवकाश भकास अवलोकावें । 
तेथें चंचळ व्यापकाच्या नांवें । सुन्याकार ॥ ४ ॥ 
४) विवेकानें ब्रह्मांडाच्या पलीकडे जावें. तेथून ब्रह्मांड झालेंच नाहीं अशी कल्पना करावी.केवळ अवकाशमय रिकामें आकाश पहावें. विश्र्वाला व्यापून असणारा एवढा चंचलपणा तेथें नाहींसा होईल, शून्यवत होईल.   
दृश्य विवेकें काढिलें । मग परब्रह्म कोंदाटलें । 
कोणासीच अनुमानलें । नाहीं कदा ॥ ५ ॥
५) नित्यानित्याचा विवेक करुन दृश्य नाहींसे करावें. मग जिकडेतिकडे परब्रह्म भरुन राहिल्याचा अनुभव येईल. पण ब्रह्मांची संपूर्ण कल्पना कधींच कोणालाही करतां येणार नाहीं. 
अधोर्ध पाहातां चहुंकडे । निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे ।
मन धांवेल कोणेकडे । अंत पाहावया ॥ ६ ॥
६) खालीं, वर, चोहींकडे पाहिलें, जिकडे तिकडे निर्गुण ब्रह्मच घनदाट भरुन आहे, असें आढळेल. जें मन त्याला आकलन करायला जातें तें एकदेशी असल्यामुळें ब्रह्माचा शेवट पाहण्यासाठीं तें धांवेल तरी कोठें? 
दृश्य चळे ब्रह्म चळेना । दृश्य कळे ब्रह्म कळेना ।
दृश्य आकळे ब्रह्म आकळेना । कल्पनेसी ॥ ७ ॥
७) दृश्य चळतें, नाश पावतें, विकार पावतें याउलट ब्रह्म चळत नाहीं, नाश पावत नाहीं, विकार पावत नाहीं. दृश्य मनाला कळतें, आकलन होतें, तर ब्रह्म मनाला कळत नाहीं, आकलन होत नाहीं. दृश्य कल्पनेच्या कक्षेंत येते तर ब्रह्म कल्पनेच्या कक्षेंत येत नाहीं. 
कल्पना म्हणिजे कांहींच नाहीं । ब्रह्म दाटले ठाईं ठाईं ।
वाक्यार्थ विवरत जाई । म्हणिजे बरें ॥ ८ ॥
८) कल्पना म्हणजे कांहीं नाहीं. कल्पनेनें उभारलेलीं वस्तु प्रत्यक्ष अस्तित्वांत नसते. परब्रह्म सर्व ठिकाणीं अगदी दाटपणें भरलेलें आहे. " तत् त्वम् असि " अहम् ब्रह्मासी " या महावाक्यांचा अर्थ सतत मनांत ठेवावा. त्या योगानें साधनेला सहाय होईल. 
परब्रह्मायेवढें थोर नाहीं । श्रवणापरतें साधन नाहीं ।
कळल्याविण कांहींच नाहीं । समाधान ॥ ९ ॥  
९) खरें पांहिलें तर परब्रह्माएवढी श्रेष्ठ वस्तु नाहीं. श्रावणासारखें दुसरें साधन नाहीं. वस्तुरुप कळल्याशिवाय माणसाला खरें समाधान मिळत नाहीं.  
पिप्लीकामार्गे हळु हळु घडे । विहंगमें फळासी गांठी पडे ।
साधक मननीं पवाडे । म्हणिजे बरें ॥ १० ॥
१०) जो पिपीलिका मार्गानें जातो किंवा जो मुंगीच्या पावलानें जातो, त्याला साध्य हस्तगत होण्यास वेळ लागतो. कारण तो हळुहळु वाटचाल करतो. जो विहंगम मार्गानें जातो किंवा पक्ष्याप्रमाणें उडून चटकन फळापर्यंत जातो, त्याला साध्य हस्तगत होण्यास वेळ लागत नाहीं. कारण तो एकदम सूक्ष्मांत शिरतो. म्हणून साधकानें मननांत आपली वाढ करुन घ्यावी हें उत्तम.
परब्रह्मासारिखें दुसरें । कांहींच नाही खरें ।
निंदा आणी स्तुतिउत्तरें । परब्रह्मीं नाहीं ॥ ११ ॥
११) परब्रह्मासारखें दुसरें कांहींच नाहीं. ही गोष्ट अगदी खरीं आहे. स्तुति आणि निंदा यांचे शब्द परब्रह्मापर्यंत पोचूंच शकत नाहींत.  
ऐसें परब्रह्म येकजिनसी । काहींच तुळेनाा तयासी ।
माहानुभव पुण्यरासी । तेथें पवाडती ॥ १२ ॥  
१२) परब्रह्म अशाप्रकारचें एककजिनसी आहे. त्याच्या बरोबर तुलना करतां येण्यासारखें दुसरें कांहींच नाहीं. महा पुण्यवान थोर पुरुष परब्रह्माचा अनुभव घेऊन महान होतात.    
चंचळें होतें दुःखप्राप्ती । निश्र्चळायेवढी नाहीं विश्रांती ।
निश्र्चळ प्रत्ययें पाहाती । माहानुभाव ॥ १३ ॥
१३) चंचळाच्या नादानें दुःख प्राप्त होते. निश्र्चळाच्या नादानें परमविश्रांति प्राप्त होते. अतिशय थोर पुरुष निश्र्चळाचा प्रत्यक्ष अनुभव घेतात.   
मुळापासुन सेवटवरी । विचारणा केलीच  करी ।
प्रत्ययाचा निश्र्चयो अंतरीं । तयासी फावे ॥ १४ ॥
१४) जो पुरुष मुळापासून थेट शेवटपर्यंत सारखा विचार करतो, त्यालाच अनुभवाचे निश्र्चयात्मक ज्ञान प्राप्त होते. प्रथम स्फूरण किंवा संकल्प हें मूळ आणि अनेक सजीव प्राणी हा शेवट. म्हणून जो साधक मूळमायेपासून ते थेट प्राणीमात्रांपर्यंत अहोरात्र विवरण करतो, त्याला प्रत्यक्ष अनुभव येतो. आणि त्याचे ज्ञान निश्र्चयात्मक बनतें.   
कल्पनेची सृष्टी जाली । त्रिविध प्रकारें भासली ।
तिक्ष्ण बुद्धीनें आणिली । पाहिजे मना ॥ १५ ॥
१५) मुळांत कल्पनेपासून हीं सृष्टी झाली. तीनप्रकारें ती अनुभवास येतें. तीक्ष्ण बुद्धीनें आपण आपल्या मनांत विचार मात्र केला पाहिजे.
मूळमायेपासून त्रिगुण । अवघें येकदेसी लक्षण ।
पांचा भूतांचा ढोबळा गुण । दिसत आहे ॥ १६ ॥
१६) मूळमायेपासून त्रिगुणापर्यंत हा प्रथम वर्ग, हा एकदेशीय आहे. मर्यादित आहे. एकदेशी म्हणजे एका वेळीं एकाच ठिकाणीं असणारा. स्पष्ट दशा पावलेलीं पंचभूतें हा दुसरा वर्ग. पंचभूतांचें व्यापार स्पष्टपणें दिसतात.    
पृथ्वीपासून च्यारी खाणी । चत्वार वेगळाली करणी ।
सकळ सृष्टीची चाली येथुनी । पुढें नाहीं ॥ १७ ॥
१७) पृथ्वीपासून उत्पन्न होणारे चार प्रकारचे जीवप्राणी हा तिसरा वर्ग होय. चार प्रकारच्या जीवांचे चार प्रकारचे व्यवहार असतात. सगळीं सृष्टीरचना येथें संपते. याच्यापुढें सृष्टिरचना नाहीं.
सृष्टीचें विविध लक्षण । विशद करुं निरुपण ।
श्रोतीं सुचित अंतःकर्ण । केलें पाहिजे ॥ १८ ॥
१८) सृष्टिरचनेमधें आढळणारें जे तीन वर्ग सांगितलें त्याचे स्पष्ट विवेचन आतां करतो. श्रोत्यांनी आपलें अंतःकरण स्थिर करुन तें आतां ऐकावें.    
मूलमाया जाणीवेची । मुळीं सूक्ष्म कल्पनेची ।
जैसी स्थिती परे वाचेची । तद्रूपची ते ॥ १९ ॥
१९) मूळमाया जाणीवमय आहे. मुळामध्यें ती अत्यंत सूक्ष्म कल्पना आहे. परा वाचा जशी केवळ स्फुरणरुप असते. तशी ती आहे. किंबहुना मूळमाया नुसती स्फुरणस्वरुप असते.
अष्टधा प्रकृतीचें मूळ । ते हे मूळमायाच केवळ ।
सूक्ष्मरुप बीज सकळ । मुळींच आहे ॥ २० ॥
२०) ही मूळमायाच अष्टधा प्रकृतीचे मूळ आहे. सगळ्या सृष्टीचें सूक्ष्मरुप बीज मूळमायेंतच असते.  
जड पदार्थ चेतवितें तें । म्हणौन चैतन्य बोलिजेतें ।
सूक्ष्म रुपें संकेतें । समजोन घ्यावीं ॥ २१ ॥ 
२१) जड पदार्थांना ती चेतना देते. म्हणून तिला चैतन्य असें नांव देतात. तिची जी सूक्ष्मरुपें आहेत. तीं खूणांवरुनच ओळखावीं.  
प्रकृतिपुरुष विचार । अर्धनारीनटेश्र्वर । 
अष्टधा प्रकृतीचा विचार । सकळ कांहीं ॥ २२ ॥
२२) प्रकृतिपुरुषाचा विचार, अर्धनारी नटेश्र्वर, अष्टधा प्रकृतीचा विचार हें तिन्ही मूळमायेंतच येतात.   
गुप्त त्रिगुणाचें गूढत्व । म्हणौन संकेत महत्तत्व ।
गुप्तरुपें शुद्धसत्व । तेथेंचि वसे ॥ २३ ॥
२३) मूळमायेमधें त्रिगुण गुप्तरुपानें वास करतात. त्या गूढत्वाला संकेतानें महत् तत्व असें म्हणतात. शुद्ध सत्वगुण देखील गुप्तरुपानें तेथेंच वास करतो.   
जेथून गुण प्रगटती । तीस गुणक्षोभिणी म्हणती ।
त्रिगुणाचीं रुपें समजती । धन्य ते साधु  ॥ २४ ॥
२४) जेव्हां त्रिगुण व्यक्त दशेला येऊं लागतात, तेव्हां मूळमायेला गुणक्षोभिणी असेम म्हणतात. त्रिगुणांची रुपें ज्यांना बरोबर समजतात तें साधु धन्य होत. 
गुप्तरुपें गुणसौम्य । म्हणौनि बोलिजे गुणसाम्य ।
सूक्ष्म संकेत अगम्य । बहुतांस कैंचा ॥ २५ ॥
२५) गुण हें गुप्तरुपानें म्हणजे अव्यक्त दशेमधें समान असतात. म्हणून गुणक्षोभिणीला गुणसाम्य असें नांव आहे. हा संकेत सूक्ष्म आहे. तो समजण्यास सोपा नाहीं. त्यामुळें पुष्कळांना तो कळत नाहीं.
मूळमायेपासून त्रिगुण । चंचळ येकदेसी लक्षण ।
प्रत्ययें पाहातां खूण । अंतरीं येते ॥ २६ ॥
२६) मूळमायेपासून त्रिगुणांपर्यंत असणारीं तत्वें चंचळ आणि एकदेशी आहेत. तीं सर्वव्यापी नाहींत. अनुभव घेतला कीं त्याची खूण मनाला पटते. 
पुढें पंचभूतांचीं बंडें । वाढलीं विशाळें उदंडें ।
सप्तद्वीपें नवखंडें । वसुंधरा हे ॥ २७ ॥
२७) त्यानंतर पांच भूतांचा अवाढव्य आणि अपार विस्तार होतो. सात बेटांची आणि नऊ खंडे असलेली पृथ्वी या पंचभूतांपासून निर्माण होते.   
त्रिगुणापासून पृथ्वीवरी । दुसर्‍या जिनसान्याची परी ।
दोनी जिनस याउपरी । तिसरा ऐका ॥ २८ ॥
२८) अशा रीतीनें त्रिगुणांपासून पुथ्वीपर्यंत चंचळाचा दुसरा वर्ग झाला. दोघांची माहिती सांगून झाली आतां तिसरा वर्ग ऐका.
पृथ्वी नाना जीनसाचें बीज । अंडज जारज श्र्वेतज उद्भिज ।
च्यारी खाणी च्यारी वाणी सहज । निर्माण जाल्या ॥ २९ ॥
२९) पृथ्वीवर अनेक वस्तुंचे बीज असतें. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज असे जीवांचे चार प्रकार आणि चार वाणी. पृथ्वीतत्वांतून निर्माण झाल्या.
खाणी वाणी होती जाती । परन्तु तैसीच आहे जगती ।
ऐसे होती आणी जाती । उदंड प्राणी ॥ ३० ॥
३०) खाणी, वाणी उत्पन्न होतात व नाश पावतात. अनेक जीव जन्मास येतात व नाश पावतात. पण पृथ्वीमात्र जशींच्या तशी राहते. त्याचप्रमाणें सर्व चराचर सृष्टि उत्पन्न होते आणि नाश पावते. परंतु परब्रह्म मात्र जसेंच्या तसेंच राहतें.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सृष्टित्रिविधलक्षणनिरुपणनाम समास दुसरा ॥ 
Samas Dusara SrushtiTrividha Lakshan Niupan
समास दुसरा सृष्टीत्रिविध लक्षण निरुपण


Custom Search

No comments: