Dashak Visava Samas Sahava AatmaGuna Nirupan
Samas Sahava AatmaGuna Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us the vitues of Aatma. Name of this Samas is AatmaGuna Nirupan.
समास सहावा आत्मागुण निरुपण
श्रीराम ॥
पाहों जातां भूमंडळ । ठाईं ठाईं आहे जळ ।
कितेक तेम निर्मळ माळ । जळेंविण पृथ्वी ॥ १ ॥
१) पृथ्वी फिरुन पाहिली तर आपल्याला ठिकठिकाणीं पाणी आढळतें. कांहीं ठिकाणीं मुळींच पाणी नसतें. केवळ उजाड माळजमीन असतें.
तैसें दृश्य विस्तारलें । कांहीयेक जाणीवेनें शोभलें ।
जाणीवरहित उरलें । कितीयेक दृश्य ॥ २ ॥
२) दृश्याचा विस्तार हा असाच आहे. दृश्यांपैकीं कांहीं भाग जाणिवेनें शोभतो तर कांहीं भाग जाणिवरहित असतो. दृश्याचा जाणिवरहित भाग बराच आहे.
च्यारी खाणी च्यारी वाणी । चौर्यासी लक्ष जीवयोनी ।
शास्त्रीं अवघें नेमुनी । बोलिलें असे ॥ ३ ॥
३) जाणीवेनें शोभणारें जें दृश्य आहे, त्याच्या चार खाणी चार वाणी,चौर्यांशी लक्ष जीवयोनी आहेत. शास्त्रामध्यें हें सारे व्यवस्थितपणें सांगितलेलें आहे.
श्र्चोक
जलजा नवलक्षााश्च दशलक्षाश्च पक्षिणः ।
कृमयोरुद्रलक्षाश्च विंशल्लक्षा गवादयः ।।
स्थावरास्त्रिंशल्लक्षाश्च चतुर्लक्षाश्च मानवाः ।
पापपुण्यं समं कृत्वा नरयोनिषु जायते ॥ १ ॥
श्लोकाचा अर्थ
१) पाण्यांत जन्मणारे नऊ लाख, पक्षी दहा लाख, कृमी किटक अकरा लाख, गाईबैलांसारखें पशु वीस लाख, वृक्षादि स्थावर तीस लाख, माणसें चार लाख, पाप पुण्य सारख्याप्रमाणांत असेल तेव्हां नरदेहाची प्राप्ति होते.
मनुष्यें च्यारी लक्ष । पशु वीस लक्ष ।
क्रिम आक्रा लक्ष । बोलिलें शास्त्रीं ॥ ४ ॥
४) माणसें चार लक्ष, पशु वीस लक्ष, कृमी अकरा लक्ष, असें शास्त्रांत सांगितलें आहे.
दाहा लक्ष ते खेचर । नव लक्ष जळचर ।
तीस लक्ष स्थावर । बोलिलें शास्त्रीं ॥ ५ ॥
५) दहा लाख पक्षी, नऊ लाख जलचर, तीस लाख स्थावर असें शास्त्र सांगतें.
ऐसी चौर्यासी लक्ष योनी । जितुका तितुका जाणता प्राणी ।
अनंत देह्याची मांडणी । मर्यादा कैंची ॥ ६ ॥
६) चौर्यांशी लक्ष योनींचा हिशेब हा असा आहे. त्या मध्यें जितके प्राणी आहेत त्यांना जाणीव आहे, जाणतेपणा आहे. प्राण्यांच्या देहाची रचना अनंत प्रकारची आहे. त्या विविध प्रकारांना मुळी मर्यादा नाहीं.
अनंत प्राणी होत जाती । त्यांचें अधिष्ठान जगती ।
जगतीवेगळी स्थिती । त्यास कैंची ॥ ७ ॥
७) अक्षरशः अनंत प्राणी जन्मास येतात आणि मृत्यु पावतात. पृथ्वी हा त्यांचा आधार आहे. पृथ्वीवांचून त्यंना जीवन जगणें शक्य नाहीं.
पुढें पाहातां पंचभूतें । पावलीं पष्टदशेतें ।
कोणी विद्यमान कोणी तें । उगीच असती ॥ ८ ॥
८) यानंतर पुढें विचार केला तर व्यक्त दशेला आलेली पंचभूतें आढळतात. पंचभूतांपैकीं कांहीं इंद्रियगोचर आहेत. तर कांहीं इंद्रियांना दिसत नाहींत. गुप्त असतात.
अंतरात्म्याची वोळखण । तेचि जेथें चपळपण ।
जाणीवेचें अधिष्ठान । सावध ऐका ॥ ९ ॥
९) जेथें चंचलपणा आहे तेथें अंतरात्मा आहे असें ओळखावें. आतां जाणीवेचे राहाणें कोठें कोठें असतें तें सावधपणें ऐका.
सुखदुख जाणता जीव । तैसाचि जाणावा सदाशिव ।
अंतःकर्णपंचक अपूर्व । अंश आत्मयाचा ॥ १० ॥
१०) सुख आणि दुःख याची जाणीव जीवाला असते. त्याचप्रमाणें ती सदाशिवाला म्हणजे जगदीश्वराला पण असते. विलक्षण असें अंतःकरणपंचक म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार हा अंतरात्म्याचा अंश होय.
स्थुळीं आकाशाचे गुण । अंश आत्मयाचे जाण ।
सत्व रज तमोगुण । गुण आत्मयाचे ॥ ११ ॥
११) स्थूलामध्यें आकाशाचे गुण म्हणजे काम, क्रोध, भय, शोक, मोह असे आत्म्याचे अंश समजावें. तसेंच सत्त्व, रज व तम हेहि आत्म्याचे गुण आहेत.
नाना चाळणा नाना धृती । नवविधा भक्ति चतुर्विधा मुक्ती ।
अलिप्तपण सहजस्थिती । गुण आत्मयाचे ॥ १२ ॥
१२) अनेक प्रकारचे विवेकयुक्य विचार, धैर्य, नवविधा भक्ति, चार प्रकारच्या मुक्ति अलिप्तपणा सहजस्थिति,
द्रष्टा साक्षी ज्ञानघन । सत्ता चैतन्य पुरातन ।
श्रवण मनन विवरण । गुण आत्मयाचे ॥ १३ ॥
१३) द्रष्टा, साक्षी, ज्ञानघन, सत्ता, चैतन्य, पुरातन, श्रवण, मनन, विवरण,
दृश्य द्रष्टा दर्शन । ध्येय ध्याता ध्यान ।
ज्ञेय ज्ञाता ज्ञान । गुण आत्मयाचे ॥ १४ ॥
१४) दृश्य, द्रष्टा-दर्शन, ध्येय, ध्याता, ध्यान, ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान,
वेदशास्त्रपुराणअर्थ । गुप्त चालिला परमार्थ ।
सर्वज्ञपणें समर्थ । गुण आत्मयाचे ॥ १५ ॥
१५) वेद, शास्त्र, पुराणें, यांचा अर्थ, गुप्तपणें चाललेला परमार्थ, सर्वज्ञपणानें आलेलें सामर्थ्य,
बद्ध मुमुक्ष साधक सिद्ध। विचार पाहाणें शुद्ध ।
बोध आणि प्रबोध । गुण आत्मयाचे ॥ १६ ॥
१६) बद्ध,मुमुक्ष, साधक, सिद्ध, शुद्ध, विचार करणें, बोध प्रबोध,
जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या । प्रकृतिपुरुष मूलमाया ।
पिंड ब्रह्मांड अष्टकाया । गुण आत्मयाचे ॥ १७ ॥
१७) जागृति, स्वप्न, सुषुप्ति, तुर्या, प्रकृतिपुरुष, मूळमाया, पिंड, ब्रह्मांड, आठ देह,
परमात्मा आणि परमेश्र्वरी । जगदात्मा आणी जगदेश्र्वरी ।
महेश आणी माहेश्र्वरी । गुण आत्मयाचे ॥ १८ ॥
१८) परमात्मा व परमेश्र्वरी; जगदात्मा व जगदीश्वरी; महेश व माहेश्र्वरी,
सूक्ष्म जितुकें नामरुप । तितुकें आत्मयाचें स्वरुप ।
संकेतनामाभिधानें अमूप । सीमा नाहीं ॥ १९ ॥
१९) हे सर्व प्रकार आत्म्याचे गुण आहेत. जेवढें म्हणून सूक्ष्म नामरुप आहे, तेवढें सर्व अंतरात्म्याचें स्वरुप आहे. अशा सूक्ष्म नामरुपाच्या संकेतांची नांवें खूपच आहेत. त्यांना मर्यादा नाहीं. सूक्ष्माच्या प्रातांत अंतरात्मा जाणिवेची इतकी अनंत रुपें घेतों, कीं त्यांना कांहीं सीमाच नाहीं.
आदिशक्ती शिवशक्ती । मुख्य मूळमाया सर्वशक्ती ।
नाना जीनस उत्पत्ती स्थिती । तितुके गुण आत्मयाचे ॥ २० ॥
२०) आदिशक्ति, शिवशक्ति, मुख्य मूळमाया, सर्व प्रकारच्या शक्ति, नाना पदार्थाची उत्पत्ति व स्थिति,
पूर्वपक्ष आणी सिद्धांत । गाणें वाजवणें संगीत ।
नाना विद्या अद्भुत । गुण आत्मयाचे ॥ २१ ॥
२१) पूर्वपक्ष आणि सिद्धान्त, गाणेंबजावणें, संगीत, नाना अद्भुत विद्या,
ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान । असद्वृत्ति सद्वृत्ति जाण ।
ज्ञेप्तिमात्र अलिप्तपण । गुण आत्मयाचे ॥ २२ ॥
२२) ज्ञान, अज्ञान, विपरित ज्ञान, असद्वृत्ति, सद्वृत्ति, ज्ञानमात्र, अलिप्तपणा,
पिंड ब्रह्मांड तत्वझाडा । नाना तत्वांचा निवाडा ।
विचार पाहाणें उघडा । गुण आत्मयाचे ॥ २३ ॥
२३) पिंडब्रह्मांडांतील तत्वांचा शोध, अनेक तत्वांचा निवाडा, स्पष्टपणें विचार करणें,
नाना ध्यानें अनुसंधानें । नाना स्थिति नाना ज्ञानें ।
अनन्य आत्मनिवेदनें । गुण आत्मयाचे ॥ २४ ॥
२४) नाना प्रकारचे ध्यान, अनुसंधान, अनेक प्रकारच्या स्थिति, अनेक प्रकारचें ज्ञान, अनन्य आत्मनिवेदन,
तेतिस कोटी सुरवर । आठ्यासी सहश्र ऋषेश्र्वर ।
भूत खेचर अपार । गुण आत्मयाचे ॥ २५ ॥
२५) तेहतीस कोटी देव, अठ्ठ्याऐशी हजार ऋषी, असंख्य भूतपिशाच्चें,
भूतावळी औट कोटी । च्यामुंडा छपन्न कोटी ।
कात्यायेणी नव कोटी । गुण आत्मयाचे ॥ २६ ॥
२६) साडेतीन कोटी भुतावळ, छप्पन कोटी चामुंडा, नऊ कोटी कात्यायनी,
चंद्र सूर्य तारामंडळें । नाना नक्षत्रें ग्रहमंडळें ।
शेष कूर्म मेघमंडळें । गुण आत्मयाचे ॥ २७ ॥
२७) चंद्र, सूर्य, तारामंडळ, अनेक नक्षत्रें, ग्रहमंडळें, शेष, कूर्म, मेघमंडळें,
देव दानव मानव । नाना प्रकारीचे जीव ।
पाहातां सकळ भावाभाव । गुण आत्मयाचे ॥ २८ ॥
२८) देव, दानव, मानव, अनेक प्रकारचे जीव, सर्व प्रकारचे भाव आणि अभाव असणें आणि नसणें, हे सगळें आत्म्याचेच गुण आहेत.
आत्मयाचे नाना गुण । ब्रह्म निर्विकार निर्गुण ।
जाणणें येकदेसी पूर्ण । गुण आत्मयाचे ॥ २९ ॥
२९) अशा रीतीनें त्या अंतरात्म्याचे अनेक गुण आहेत. ब्रह्म मात्र निर्गुण आणि निर्विकार आहे. जाणणें किंवा जाणीव असणें हा अंतरात्म्याचा गुण आहे.मग ती जाणीव पूर्ण असो किंवा अपूर्ण व एकदेशी असो.
आत्मारामउपासना । तेणें पावले निरंजना ।
निसंदेहे अनुमाना । ठावचि नाहीं ॥ ३० ॥
३०) अशा प्रकारच्या अनेक गुणांनी अंतरात्मा दृश्यामध्यें पूर्ण भरलेला आहे. असा त्याला पाहाणें ही त्याची उपासना होय. अशी उपासना जो करील त्याला निरंजन ब्रह्म प्राप्त होईल व तो निःसंदेह होईल. निःसंदेह अवस्थेंत कल्पनेला वाव राहात नाहीं.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मागुणनिरुपणनाम समास सहावा ॥
Samas Sahava AatmaGuna Nirupan
समास सहावा आत्मागुण निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment