Wednesday, May 30, 2018

Samas Satava JagJivan Nirupan समास सातवा जगजीवन निरुपण


Dashak Satarava Samas Satava JagJivan Nirupan 
Samas Satava JagJivan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Jag Jivan. Jivan means Life. In this Samas Samarth is telling us about Atma is appearing differently in each person.
समास सातवा जगजीवन निरुपण
श्रीराम ॥
मुळीं उदक निवळ असतें । नाना वल्लीमधें जातें ।
संगदोषें तैसें होतें । आंब्ल तिक्षण कडवट ॥ १ ॥
१) पाणी मुळामध्यें स्वच्छ असते. अनेक प्रकारच्या वेली वनस्पतींमध्यें तें शिरते आणि त्यांच्या संगतीचा दोष लागून तें आंबट, तिखट किंवा कडू बनतें.  
आत्मा आत्मपणें असतो । देहसंगें विकारतो ।
साभिमानें भरीं भरतो । भलतिकडे ॥ २ ॥
२) त्याचप्रमाणें आत्मा मुळांत आत्मस्वरुपानें शुद्ध असतो. त्याला देहाची संगत लाभली कीं, त्याचें शुद्धपण लोपते. आणि त्याच्यांत विकार उत्पन्न होतात. अभिमानाच्या भरांत तो भलत्याच भरीला पडतो.
बरी संगती सांपडली । जैसी उंसास गोडी आली ।
विषवल्ली फापांवली । घातकी प्राणी ॥ ३ ॥
३) पाण्याला चांगली संगत लाभली कीं तें चांगलें होतें. जसें की, उसाची संगत लाभली की पाण्याचा गोड रस होतो. परंतु विषारी वेलीची संगत लागली तर त्याच पाण्याचा प्राणघातक रस होतो. 
अठराभार वनस्पती । गुण सांगावे ते किती ।
नाना देहाचे संगती । आत्मयास होये ॥ ४ ॥
४) अठरा प्रकारच्या वनस्पती आहेत. प्रत्येकांत पाण्यास निरनिराळे गुण प्राप्त होतात. ते सगळें सांगणें शक्य नाहीं. अंतरात्म्याचे देखील असेंच घडते. निरनिराळ्या देहांच्या संगतीनें त्याच्यामध्यें निरनिराळे गुण आढळतात. 
त्यामधें कोणी भले । ते संतसंगें निघाले ।
देहाभिमान सांडून गेले । विवेकबळें ॥ ५ ॥  
५) देहांत जें चांगलें असतात तें संतसंगतीनें कालक्रमणा करतात. सत् संगतीमुळें उत्पन्न होणार्‍या विवेकाच्या जोरावर ते देहाभिमान सोडून जातात. विवेकानें त्यांची देहबुद्धि नष्ट होते.       
उदजाचा नाशचि होतो । आत्मा विवेकें निघतो । 
ऐसा आहे प्रत्यय तो । विवेकें पाहा ॥ ६ ॥
६) परंतु पाणी व अंतरात्मा यांच्यात फरक आहे. पाणी पंचभूतांपैकी आहे. म्हणून त्याचा नाश होतो. अंतरात्मा अविनाशी असल्यानें तो आत्मानात्म विवेकानें देहांतून बाहेर पडतो. असा प्रत्यक्ष अनुभव येतो. तो विचारानें ओळखावा.
ज्यास स्वहितचि करणें । त्यास किती म्हणौन सांगणें ।
हें ज्याचें त्यानें समजणें । सकळ कांहीं ॥ ७ ॥  
७) ज्याला आपले कल्याण करुन घ्यायचे आहे, त्याला आणखी किती सांगायचें? ज्याचें त्यानेंच हें सर्व कांहीं समजून घेतलें पाहिजे.  
आपला आपण करी कुडावा । तो आपला मित्र जाणावा ।
आपला नाश करी तो समजावा । वैरी ऐसा ॥ ८ ॥
८) जो स्वतःच स्वतःस सांभाळतो तो स्वतःचा मित्र समजावा. जो स्वतःच स्वतःचा नाश करतो, तो स्वतःचा शत्रु समजावा.  
आपलें आपण अन्हित करावें । त्यास आडवें कोणें निघावें ।
येकांतीं जाऊन जीवें । मारी आपणासी ॥ ९ ॥
९) जो स्वतःचे अकल्याण करायला निघाला असेल, त्याला आडवें जाण्यांत अर्थ नाहीं. एकांतामध्यें जाऊन तो स्वतःच आपला जीव देतो.
जो आपला आपण घातकी । तो आत्महत्यारा पातकी ।
याकारणें विवेकी । धन्य साधु ॥ १० ॥
१०) जो स्वतःच आपला घात करुन घेतो तो आत्महत्यारा पातकी समजावा. म्हणून आत्मानात्म विवेक करणारा साधु धन्य होय. 
पुण्यवंतां संत्सगती । पापिष्टां असत्संगती । 
गति आणि अवगती । संगतीयोगें ॥ ११ ॥
११) पुण्यवान पुरुष सत् संगती धरतो. तर पापी वाईट संगति धरतो. त्या संगतीमुळें एकाला उत्तम गति मिळते तर दुसर्‍याला अधोगति मिळते. 
उत्तम संगती धरावी। आपली आपण चिंता करावी ।
अंतरीं बरी विवरावी । बुद्धि जाणत्याची ॥ १२ ॥
१२) म्हणून माणसानें उत्तम संगति धरावी. आपणच आपली काळजी घ्यावी. जाणत्या माणसाचे विचार घेऊन आपल्या अंतर्यामी त्यांचें विवरण करावें. 
इहलोक आणि परलोक । जाणता तो सुखदायेक । 
नेणत्याकरितां अविवेक । प्राप्त होतो ॥ १३ ॥
१३) इहलोक असो किंवा परलोक असो, दोन्हीकडे जो जाणता असेल त्यास सुख लाभते. जो नेणता आहे तो दोन्हीकडे अविवेकानें वागतो. 
जाणता देवाचा अंश । नेणता म्हणिजे तो राक्षस ।
यामधें जें विशेष । तें जाणोन घ्यावें ॥ १४ ॥
१४) जो जाणता आहे तो देवाचा अंश समजावा. तर नेणता आहे तो राक्षसाचा अंश समजावा. या दोन्हींत जें विशेष असेल, योग्य आणि ग्राह्य असेल , ते ओळखून ग्रहण करावें.
जाणतां तो सकळां मान्य । नेणता होतो अमान्य ।
जेणेंकरितां होईजे धन्य । तेंचि घ्यावें ॥ १५ ॥
१५) जो जाणता असेल तो सगळ्यांना मान्य होतो. तर जो नेणता आहे तो सर्वांना अमान्य होतो. ज्याच्या योगानें आपण धन्य होऊन जाऊं, तेच आपण ग्राह्य करावें.  
साक्षपी शाहाण्याची संगती । तेणें साक्षपी शाहाणें होती ।
आळसी मूर्खाची संगती । आळसी मूर्ख ॥ १६ ॥
१६) उद्योगी व शाहाण्या माणसाची संगत आपण धरली तर आपण देखील उद्योगी व शहाणे बनतो. आळशी व मूर्ख माणसाची संगत आपल्यला आळशी व मूर्ख बनवते.  
उत्तम संगतीचें फळ सुख । अद्धम संगतीचें फळ दुःख ।
आनंद सांडुनियां शोक । कैसा घ्यावा ॥ १७ ॥
१७) उत्तम संगतीचे सुख हें फळ आहे. तर अधम संगतीचे दुःख हे फळ आहे.  असें जर आहे तर आनंदाचा अव्हेर करुन मुद्दाम दुःख पत्करणें योग्य नाहीं.  
ऐसें हें प्रगट दिसे । जनामधें उदंड भासे ।
प्राणीमात्र वर्ततसे । उभयेयोगें ॥ १८ ॥
१८) जगांत हें उघड दिसतें. लोकांमध्यें हें पुष्कळ पाहावयास मिळतें. कांहीं लोक सत्संगतीनें वागतात तर लोक असत्संगतीनें वागतात. तर कांहीं त्यामुळें बिघडतात. या दोन्ही गोष्टी पाहावयास मिळतात. 
येका योगें सकळ योग । येका योगें सकळ वियोग ।
विवेकयोगें सकळ प्रयोग । करीत जावे ॥ १९ ॥
१९) सज्जनांशी योग आला तर सगळ्या चांगल्या गोष्टी जुळून येतात. दुर्जनांशी योग आला तर सगळ्या गोष्टींचा विचका होतो. असें असल्यानें आपली सर्व कामें विवेकी पुरुषांच्या मदतीनें करीत जावीत.   
अवचितें सांकडींत पडिलें । तरी तेथून पाहिजे निघालें ।
निघोन जातां जालें । परम समाधान ॥ २० ॥
२०) समजा एखादे अनपेक्षित संकट आपल्यावर आलें तर न घाबरतां विवेकानें आपण त्यांतून बाहेर पडावें. असे केल्यानें मनाला फार मोठे समाधान लाभते.  
नाना दुर्जनांचा संग । क्षणक्षणा मनभंग ।
याकारणें कांहीं रंग । राखोन जावें ॥ २१ ॥
२१) जीवनांत अनेक प्रकारच्या दुर्जनांशी संगत घडते. त्या योगानें पदोपदी आपला मानभंग होतो. आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात. या कराणानें आपलें महत्व राहील असेंच आपण वागावें. 
शाहाणा येत्न त्याच्या गुणें । पाहों जातां काये उणें ।
सुख संतोष भोगणें । नाना श्र्लाघ्यता ॥ २२ ॥  
२२) मनुष्य जर शहाणपणानें प्रयत्न करील, तर त्या गुणानें माणसाला कांहींच कमी पडणार नाहीम. त्याच्या प्रयत्मनानें सुखसंतोष तर लाभेलच पण लोकांमध्यें त्याला महत्व प्राप्त होईल.        
आतां लोकीं ऐसें आहे । सृष्टीमधें वर्तताहे ।
जो कोणी समजोन पाहे । त्यास घडे ॥ २३ ॥
२३) जगामध्यें आणि मानवसमाजामध्यें अशी परिस्थिती आहे त्याला इलाज नाहीं. जो माणूस हें समजून जगतो त्यास सुखसंतोष लाभतो. 
बहुरत्न वसुंधरा । जाणजाणों विचार करा ।
समजल्यां प्रत्ययो अंतरा- । माजीं येतो ॥ २४ ॥
२४) या पृथ्वीवर पुष्कळ नररत्नें आहेत. त्यांना जाणून घ्यावें व आपण विचार करावा. अशा प्रकारें जीवन समजले म्हणजे आपल्या अंतर्यामीं आपल्याला प्रचिती येते. 
दुर्बळ आणि संपन्न । वेडें आणि वित्पन्न । 
हें अखंड दंडायमान । असतचि असे ॥ २५ ॥
२५) एक दरिद्री तर एक श्रीमंत, एक वेडा तर एक विद्वान, अशी जगाची राहाटी पूर्वीपासून चालत आलेली आहे. हा भेद असाच कायम राहाणार.  
येक भाग्यपुरुष मोडती । येक नवे भाग्यवंत होती ।
तैसीच विद्या वित्पत्ती । होत जाते ॥ २६ ॥
२६) एके काळी संपत्तिमान असलेलेम पुरुष कालंतरानें संपत्तिहीन बनतात. आणि नविन संपत्तिमान पुरुष पुढें येतात. विद्येच्या आणि ज्ञानाच्या बाबतींतही असेंच घडतें. 
येक भरे येक रितें । रितें मागुतें भरतें ।
भरतेंहि रितें होतें । काळांतरीं ॥ २७ ॥
२७) एक भरतें, दुसरें रिकामें होते. रिकामें झालेलें पुनः भरते. कालांतरानें जें भरलेलें असरें तें पुनः रिकामें होऊन जाते. 
ऐसी हे सृष्टीची चाली । संपत्ति दुपारची साउली ।
वयेसा तरी निघोन गेली । हळुहळु ॥ २८ ॥
२८) सृष्टीचा व्यवहार हा असा चालतो. दुपारची सावली जशी तात्पुरती तशीच संपत्तिची स्थिती असतें. माणसाचें आयुष्य न कळत हळुहळु कमी होत असते. 
बाळ तारुण्य आपलें । वृधाप्य प्रचितीस आलें ।
ऐसें जाणोन सार्थक केलें । पाहिजे कोणियेकें ॥ २९ ॥
२९) बाळपण जातें, तरुणपण जातें आणि म्हातारपण अनुभवास येते.हें ओळखून प्रत्येकानें आपलें सार्थक करुन घ्यावें. 
देह जैसें केलें तैसें होतें । येत्न केल्यां काये साधतें ।
तरी मग कष्टाचें तें । काये निमित्य ॥ ३० ॥
३०) देहाला जसें वागवावें तसें तो वागायला शिकतो. माणसानें प्रयत्न केला तर त्याला कोणतेही कार्य साध्य करतां येते. असें असल्यानें मग विनाकारण कष्ट करण्याचें कांहींच कारण नाहीं. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे जगजीवननिरुपणनाम समास सातवा ॥    
   Samas Satava JagJivan Nirupan
समास सातवा जगजीवन निरुपण


Custom Search

No comments: