Dashak Satarava Samas Choutha Anuman Nirsan
Samas Choutha Anuman Nirsan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Anuman.
समास चौथा अनुमान निरसन
श्रीराम ॥
बहुत जनासी उपाये । वक्तयास पुसतां त्रासों नये ।
बोलतां बोलतां अन्वयें । सांडूं नये ॥ १ ॥
१) लोकांमधें अध्यात्माचा प्रसार केल्यानें पुष्कळ लोकांना फायदा होतो. लोक पुष्कळ प्रश्र्न विचारतात. त्यामुळें वक्त्यानें चिडून जाऊं नये. लोकांना उत्तरे देत असतां मागचा पुढचा संदर्भ तुटणार नाहीं, अशा रीतीनें बोलावें.
श्रोत्यानें आशंका घेतली । ते तत्काळ पहिजे फेडिली ।
स्वगोष्टीनें स्वगोष्टी पेंचली । ऐसें न व्हावें ॥ २ ॥
२) एखाद्या श्रोत्यानें शंका घेतली तर तिचे ताबडतोप निरसन करावेम. अपल्या बोलण्यानें आपल्या बोलण्यास विरोध होईल असें होऊं देऊं नये.
पुढें धरितां मागें पेंचला । मागें धरितां पुढें उडाला ।
सांपडतचि गेला । ठाइं ठाइं ॥ ३ ॥
३) समजा एखाड्या वक्यानें भाषण केले व त्यांत परस्पर विरोधी विधानें केली. त्यानें नंतर केलेल्या विधानांवर आक्षेप घेतला, तर त्यानेंच आधीं केलेल्या विधानांनी पेचांत पडतो. आणि त्यानें आधी केलेल्या विधानावर आक्षेप घेतला, तर त्यानें नंतर केलेले विधान व्यर्थ होते. परस्परविरोधी विधानें करणारा वक्ता अशा रीतीनें ठिकठिकाणीं अडचणींत सापडतो.
पोहणारचि गुचक्या खातो । जनास कैसा काढूं पाहातो ।
आशय लोकांचा राहातो । ठाइं ठाइं ॥ ४ ॥
४) जो पोहणारा स्वतःच गटांगळ्या खातो, तो इतर बुडणार्या लोकांना बाहेर काढूं शकत नाहीं. त्याचप्रमाणें विषय नीट आकलन न झाल्यानें ज्याच्या भाषणांत घोटाळा असतो, त्याच्या भाषणानें ठिकठिकाणच्या लोकांच्या शंका तशाच राहून जातात.
आपणचि बोलिला संव्हार । आपणचि बोलिजे सर्वसार ।
दुस्तर मायेचा पार । टाकिला पाहिजे ॥ ५ ॥
५) एकीकडे सर्व नाशवंत आहे असें आपण म्हणतो आणि दुसरीकडे सर्व कांहीं सार आहे, घेण्यालायक आहे असे आपणच सांगतो. वक्त्याच्या अशा बोलण्यानें घोटाळा उत्पन्न होतो. उलट वक्त्याचे भाषण असें असावें कीं, त्याच्या योगानें तरुन जाण्यास कठीण असलेली माया नदी माणसाला पार करतां येईल.
जें जें सूक्ष्म नाम घ्यावें । त्याचें रुप बिंबऊन द्यावें ।
तरीच वक्ता म्हणवावें । विचारवंत ॥ ६ ॥
६) ज्या ज्या सूक्ष्म तत्वाचें नांव घ्यावें त्याचे स्वरुप स्वच्छपणें समजून द्यावें. असें केलें तरच विचारवंत वक्ता म्हणवून घेतां येतें.
ब्रह्म कसें मूळमाया कैसी । अष्टधाप्रकृती शिवशकति कैसी ।
शड्गुणेश्र्वराची स्थिति कैसी । गुणसाम्याची ॥ ७ ॥
७) उदा. ब्रह्म कसें आहे? मूळमाया कशी आहे? अष्टधा प्रकृति व शिवशक्ति कशा आहेत? षड्गुणिक्ष्वराची व गुणसाम्याची स्थिति कशी आहे?
अर्धनारीनटेश्र्वर । प्रकृतिपुरुषाचा विचार ।
गुणक्षोभिणी तदनंतर । त्रिगुण कैसे ॥ ८ ॥
८) अर्धनारी नटेश्र्वर व प्रकृतिपुरुष यांचा विचार कस? गुणक्षोभिणी व नंतर त्रिगुण कसें असतात?
पूर्वपक्ष कोठून कोठवरी । वाच्यांशलक्ष्यांशाची परी ।
सूक्ष्म नाना विचार करी । धन्य तो साधु ॥ ९ ॥
९) पूर्वपक्षाचे क्षेत्र कोठून कोठवर असावें? वाच्यांश व लक्ष्यांश यांचे प्रकार कोणतें? अशा रीतीनें अनेक सूक्ष्म विचार जो करतो तो साधु धन्य होय.
नाना पाल्हाळीं पडेना । बोलिलेंचि बोलावेना ।
मौन्यगर्भ अनुमाना । आणून सोडी ॥ १० ॥
१०) चतुर अध्यात्म वक्ता उगीच पाल्हाळ लावित नाही. तो एकदा जे बोलतो ते पुनः पुनः बोलत नाहीम. परंतु वाणीला जेथें मौन पडते, असें ब्रह्मस्वरुप आपल्या वक्तृत्वानें तो श्रोत्यांच्या कल्पनेंत आणून सोडतो.
घडी येक विमळ ब्रह्म । घडी येक म्हणे सर्व ब्रह्म ।
द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म । क्षण येक ॥ ११ ॥
११) एकदां म्हणतो ब्रह्म निर्मळ आहे. नंतर म्हणतो जें कांहीं आहे ते ब्रह्म आहे. पुनः म्हणतो ब्रह्म द्रष्टा आहे, साक्षी आहे व सत्तारुप आहे.
निश्र्चळ तेंचि जालें चंचळ । चंचळ तेंचि ब्रह्म केवळ ।
नाना प्रसंगीं खळखळ । निवाडा नाहीं ॥ १२ ॥
१२) एकदां म्हणतो ब्रह्म निश्र्चळ होतें, तें चंचळ झालें. आणि त्यावर म्हणतो कीं जें चंचल आहे तेंच ब्रह्म आहे. अशा प्रकारची परस्पर विरोधी विधानें निरनिराळ्या प्रसंगीजो वक्ता करतो, त्याला विषय नीट कळलेला नसतो. त्याच्या कल्पना स्पष्ट नसतात.
चळतें आणी निश्र्चळ । अवघें चैतन्यचि केवळ ।
रुपें वेगळालीं प्रांजळ । कदापी बोलवेना ॥ १३ ॥
१३) प्रत्यक्ष चंचळ असून तें निश्र्चळ कसें? असें विचारलें तर तो म्हणतो कीं, केवळ एकचित्स्वरुप सगळीकडे असल्यानें चंचळसुद्धा मूळ स्वरुपच समजावें. एकाच चैतन्याची ही भिन्न रुपें आहेत. पण हें आपलें म्हणणें त्याला कधीही स्पष्ट करुन सांगता येत नाहीं.
उगीच करी गथागोवी । तो लोकांस कैसें उगवी ।
नाना निश्र्चयें नाना गोवी । पडत जाते ॥ १४ ॥
१४) अशा प्रकारचा घोटळा ज्याच्या विचारामध्यें असतो तो वक्ता लोकांची समजूत योग्यप्रकारें घालूं शकत नाहीं. लोकांना योग्य व बरोबर ज्ञान देऊं शकत नाहीं. निरनिराळीं मतें ऐकत गेल्यानें नवीन नवीन घोटाळे निर्माण होतात.
भ्रमास म्हणे परब्रह्म । परब्रह्मास म्हणे भ्रम ।
ज्ञातेपणाचा संभ्रम । बोलोन दावी ॥ १५ ॥
१५) असा अर्धवट वक्ता भ्रमाला परब्रह्म म्हणतो व परब्रह्माला भ्रम म्हणतो. आपण ज्ञानी आहोत या अभिमानाने तो बोलत असतो.
घाली शास्त्रांची दडपण । प्रचितिविण निरुपण ।
पुसों जातां उगाच सीण । अत्यंत मानी ॥ १६ ॥
१६) आपल्या चुकीच्या विधानांना तो शास्त्रवचनांचा आधार दाखवतो. परंतु त्याचे बोलणें प्रचितीचे नसतें. त्याला जर प्रश्र्ण विचारलें तर तो अत्यंत नाराज होतो.
ज्ञात्यास आणी पदार्थभिडा । तो काय बोलेल बापुडा ।
सारासाराचा निवाडा । जाला पाहिजे ॥ १७ ॥
१७) जो स्वतःला ज्ञाता म्हणवतो आणि वस्तूंची अपेक्षा धरतो तो बिचारा निर्भयपणें सत्य सांगूं शकत नाहीं. सार कोणतें व असार कोणतें याचा बरोबर निवाडा झाला पाहिजे. तरच तो ज्ञाता खरा.
वैद्य मात्रेची स्तुती करी । मात्रा गुण कांहींच न करी ।
प्रचितिविण तैसी परी । ज्ञानाची जाली ॥ १८ ॥
१८) समजा, एखादा वैद्य आपल्या मात्रेची मोठी तारिफ करतो पण त्या मात्रेचा गुण मात्र कांहीं दिसत नाहीं. तर त्याची तारीफ व्यर्थ ठरते. त्याचप्रमाणें प्रत्यक्ष अनुभव नसेल तर ज्ञानाची अवस्था त्या मात्रेसारखी होते.
जेथें नाहीं सारासार । तेथें अवघा अंधकार ।
नाना परीक्षेचा विचार । राहिला तेथें ॥ १९ ॥
१९) ज्या ठिकाणी सारासार विचाराचा अभाव असतो, त्या ठिकाणीं सगळा अज्ञानाचा अंधार असतो. अशा माणसाला निरनिराळ्या परीक्षा करुन ज्ञान प्राप्त करुन घ्यावें, हा विचार सुचत नाहीं.
पाप पुण्य स्वर्ग नर्क । विवेक आणि अविवेक ।
सर्वब्रह्मीं काये येक । सांपडलें नाहीं ॥ २० ॥
२०) सर्व ब्रह्म आहे, असें एकदा म्हटलें कीं, मग तेथें पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, विवेक, अविवेक यांना स्थान उरत नाहीं.
पावन आणि तें पतन । दोनीं मानिलीं तत्समान ।
निश्र्चये आणि अनुमान । ब्रह्मरुप ॥ २१ ॥
२१) पतित आणि पावन हीं दोन्ही ब्रह्मरुपच होतात. निश्चयाचें ज्ञान आणि केवळ अनुमान दोन्ही ब्रह्मरुपच बनतात.
ब्रह्मरुप जालें आवघें । तेथें काये निवडावें ।
आवघी साकरचि टाकावें । काये कोठें ॥ २२ ॥
२२) ज्याप्रमाणें सगळीकडे साखरच साखर झाली तर साखर निराळी काढून बाजूला ठेवता येत नाहीं. त्याचप्रमाणें जें जें आहे, ते सारे ब्रह्मरुप झाल्यावर तेथें सारासार निवडायला जागाच उरत नाहीं.
तैसे सार आणि असार । अवघा जाला येकंकार ।
तेथें बळाबळा अविचार । विचार कैंचा ॥ २३ ॥
२३) जसें हें, तसें जेथें सार आणि असार हा भेद नाहींसा होऊन एकंकार झाला तेथें विचार उरत नाहीं. अविचाराचेंच प्राबल्य होतें.
वंद्य निंद्य येक जालें । तेथें काये हाता आलें ।
उन्मत्त द्रव्यें जें भुललें । तें भलतेंच बोले ॥ २४ ॥
२४) जेथें वंद्य व निंद्य यामधील भेद नाहींसा होतो, तेथें कांहींच हाती लागत नाहीं. तेथें माणूस भ्रष्टचरित बनतो. अंमली पदार्थ प्यायल्यावर नशेमधें माणूस जसें वाटेल तें बरळतो, तसें हें सर्व ब्रह्मवादी बरळतात.
तैसा अज्ञानभ्रमें भुलला । सर्व ब्रह्म म्हणोन बैसला ।
माहांपापी आणि भला । येकचि मानी ॥ २५ ॥
२५) मादक द्रव्य घेतलेला माणूस जसें भलतेंच बोलतो, त्याचप्रमाणें अज्ञानांतून उदय पावलेल्या भ्रमानें जो मोह पावला आहे, तोच सर्व ब्रह्म आहे असें म्हणत बसतो. महापापी व पुण्यवान यांना तो एकच मानतो.
सर्वसंगपरित्याग । अव्हासवा विषयेभोग ।
दोघे येकचि मानितां मग । काये उरलें ॥ २६ ॥
२६) सर्वसंगपरित्याग ही प्रखर वैराग्य पावल्याची अवस्था, आणि बंधनरहित स्वैर विषयोपभोग या दोन्ही स्थिति एकच मानल्यावर पुढें कांहीं सांगायचें उरतच नाहीं.
भेद ईश्र्वर करुन गेला । त्याच्या वाचेन न वचे मोडिला ।
मुखामधें घांस घातला । तो अपानीं घालावा ॥ २७ ॥
२७) वास्तविक जगामध्यें ईश्र्वरानेंच भेद निर्माण करुन ठेवला आहे तो कोणासही मोडता येणार नाहीं. जगांत भेद राहणारच. जो घास तोंडांत घालायचा तो घास गुदद्वारांत घालता येणें शक्य नाहीं.
ज्या इंद्रियास जो भोग । तो तो करी येथासांग ।
ईश्र्वराचें केलें जग । मोडितां उरेना ॥ २८ ॥
२८) ज्या इंद्रियांचा जो भोग निसर्गानें नेमला आहे, तो भोग तें इंद्रिय यथासांग घेऊं शकते. ईश्र्वरानें जगाची रचना केलेली आहे, ती मोडता येत नाहीं.
अवघी भ्रांतीची भुटाटकी । प्रचितिविण गोष्टी लटकी ।
वेड लागलें जे बटकी । ते भलतेंचि बोले ॥ २९ ॥
२९) सर्वब्रह्मवाद्यांचे बोलणें, जगांत भेद मुळींच नाहीं हें म्हणणे ही भ्रमाची भुताटकी आहे. प्रत्यक्ष अनुभवाचा अभाव असल्यानें तें बोलणें खोटें आहे. दासीला वेड लागल्यानें ती जसें बरळतें तसें हें सर्वब्रह्मवाद्याचें बरळणें समजावें.
प्रत्ययज्ञाता सावधान । त्याचें ऐकावें निरुपण ।
आत्मसाक्षात्काराची खूण । तत्काळ बाणे ॥ ३० ॥
३०) जो स्वतः अनुभव घेऊन आत्म्याचे ज्ञान संपादन करतो आणि जो सावधान असतो त्याचेच निरुपण ऐकावें. आशाचें निरुपण ऐकल्यानें आत्मसाक्षात्काराची खूण ताबडतोप अंतःकरणांत बाणतें.
वेडें वांकडें जाणावें । आंधळें पाउलीं वोळखावें ।
बाश्कळ बोलणें सांडावें । वमक जैसें ॥ ३१ ॥
३१) जें वेडेवाकडें आहे तें बरोबर सनजावें. माणूस आंधळा आहे. हे त्याच्या चालण्यावरुन ओळखतात. त्याचप्रमाणें सर्वब्रह्मवाद्यांसारखें वेडेवाकडे सांगणारा ज्ञानी आहे किंवा नाहीं, स्वानुभवी आहे किंवा नाहीं, हे त्याच्या प्रत्यक्ष वागण्यावरुन ओळखावें. असलेम वाह्यात बोलणें ओकारीपणें ओकून चालतें व्हावें.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अनुमाननिर्शननाम समास चौथा ॥
Samas Choutha Anuman Nirsan
समास चौथा अनुमान निरसन
Custom Search
No comments:
Post a Comment