Dashak Solava Samas Dusara Surya Stavan Nirupan
Samas Dusara Surya Stavan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Surya. Surya stuti i.e. praise of Surya is done in this samas.
समास दुसरा सूर्यस्तवन निरुपण
श्रीराम ॥
धन्य धन्य हा सूर्यवौंश । सकळ वौंशामधें विशेष ।
मार्तंडमंडळाचा प्रकाश । फांकला भूमंडळीं ॥ १ ॥
१) सर्व वंशांमध्यें विशेष असणारा असा हा सूर्यवंश धन्य आहे. सूर्यमंडळाचा प्रकाश जगांत पसरलेला आहे.
सोमाआंगीं आहे लांछन । पक्षा येका होय क्षीण ।
रविकिर्ण फांकतां आपण । कळाहीन ॥ २ ॥
२) चंद्रबिंबावर कलंक आढळतो. महिन्याच्या एका पंधरवड्यांत तो क्षीण होतो. शिवाय सूर्य उगवला कीं, त्याच्या किरणांनीं चंद्र निस्तेज होतो.
याकारणें सूर्यापुढें । दुसरी साम्यता न घडे ।
जयाच्या प्रकाशें उजेडे । प्राणीमात्रासी ॥ ३ ॥
३) या कारणानें दुसरा कोणी सूर्याची बरोबरी करुं शकत नाहीं. सूर्याच्या प्रकाशानें सर्व प्राण्यांना उजाडते.
नाना धर्म नाना कर्में । उत्तमें मध्यमें अधमें ।
सुगमें दुर्गमें नित्य नेमें । सृष्टीमधें चालती ॥ ४ ॥
४) उत्तम, मध्यम, अधम, सुगम आणी दुर्गम अशा प्रकारचे अनेक धर्म आणि अनेक कर्मे अगदी नियमानें जगांत चालत असतात.
वेदशास्त्रें आणी पुराणें । मंत्र यंत्र नाना साधनें ।
संध्या स्नान पूजाविधानें । सूर्येविण बापुडीं ॥ ५ ॥
५) त्याचप्रमाणें वेद, शास्त्रें, पुराणें, मंत्र, यंत्र नाना साधनें, संध्यास्नान, पूजेचे प्रकार या सार्या गोष्टी सूर्यावर अवलंबून असतात. सूर्य नसेल तर या सर्व
गोष्टी लटक्या पडतात.
नाना योग नाना मतें । पाहों जातां असंख्यातें ।
जाती आपुलाल्या पंथें । सूर्यउदय जालियां ॥ ६ ॥
६) भिन्न योग व भिन्न मतें पाहूं गेल्यावर ती असंख्यांत आहेत. असें समजतें. सूर्य उदय पावला कीं त्यांना गती मिळतें. व ती आपापल्या मार्गांनीं चालूं लागतात.
प्रपंचिकअथवा परमार्थिक । कार्य करणें कोणीयेक ।
दिवसेंविण निरार्थक । सार्थक नव्हे ॥ ७ ॥
७) कार्य कोणतेही असो, प्रापंचिकअसो वा पारमार्थिक असो, तें करायचें असेल तर त्यास दिवसा उजेडीं करावें लागतें. दिवस आणि सूर्यप्रकाश नसेल तर तें नीट होत नाहीं.
सूर्याचें अधिष्ठान डोळे । डोळे नसतां सर्व आंधळे ।
याकारणें कांहींच न चले । सूर्येविण ॥ ८ ॥
८) प्राणिमात्रांच्या डोळ्यामध्यें सूर्याचे अधिष्ठान आहे. डोळे नसतील तर सगळा आंधळेपणा होतो. या कारणानें सूर्यावाचून कांहींच चालत नाहीं.
म्हणाल अंध कवित्वें करिती । तरी हेहि सूर्याचीच गती ।
थंड जालियां आपुली मती । मग मतिप्रकाश कैचा ॥ ९ ॥
९) यावर कोणी म्हणेल कीं, अहो आंधळी माणसें काव्यरचना करतात. पण हा देखील सूर्याचाच प्रभाव आहे. आपली बुद्धि जर थंड पडली तर मग तिच्यामध्यें ज्ञानाचा प्रकाश आढळणार नाहीं.
उष्ण प्रकाश तो सूर्याचा । शीत प्रकाश तो चंद्राचा ।
उष्णत्व नस्तां देह्याचा । घात होये ॥ १० ॥
१०) सूर्याचा प्रकाश उष्ण असतो तर चंद्राचा प्रकाश थंड असतो. शरीरांत उष्णता नसेल तर शरीर जगणार नाहीं.
याकारणें सूर्येविण । सहसा न चले कारण ।
श्रोते तुम्ही विचक्षण । शोधून पाहा ॥ ११ ॥
११) यावरुन असें दिसतें कीं, सूर्यावांचून जगांत कोणतेंच कार्य चालत नाहीं. तुम्ही चिकित्सक श्रोते आहात. तुमचे तुम्हीच हें शोधून बघावें.
हरिहरांच्या अवतारमूर्ती । शिवशक्तीच्या अनंत वेक्ती ।
यापूर्वीं होता गभस्ती । आतां हि आहे ॥ १२ ॥
१२) जगामध्यें हरिहरांचे अनेक अवतार झालें. शिव आणि शक्ति अनेक रुपांनी दृश्यांत आले. पण त्यासर्वांच्या पूर्वी सूर्य होता. तसाच तो आतांहि आहे.
जितुके संसारासी आले । तितुके सूर्याखालें वर्तले ।
अंतीं देहे त्यागून गेले । प्रभाकरादेखतां ॥ १३ ॥
१३) जें जें कांहीं या संसारांत दृश्यरुप धारण करुन आलें, त्या सर्वांचा आरंभ आणी शेवट सूर्याच्या नजरेखालींच झाला. संसारांत आलेले प्राणी अखेर सूर्याच्या देखतच देह सोडून गेले.
चंद्र ऐलीकडे जाला । क्षीरसागरीं मधून काढिला ।
चौदा रत्नांमधें आला । बंधु लक्षुमीचा ॥ १४ ॥
१४) चंद्राचा जन्म अलिकडचा आहे. क्षीरसागर घुसळून त्यांतून त्यास काढला आहे. एकंदर चौदा रत्नें जीं निघालीं, त्यांत हा लक्ष्मीचा बंधू निघाला.
विश्र्वचक्षु हा भास्कर । ऐसें जाणती लाहानथोर ।
याकारणें दिवाकर । श्रेष्ठांहून श्रेष्ठ ॥ १५ ॥
१५) सूर्य हा विश्र्वाचा डोळा आहे. ही गोष्ट सारे लहानथोर जाणतात. म्हणून सूर्य श्रेष्ठांहून श्रेष्ठ आहे.
अपार नभमार्ग क्रमणें । ऐसेंचि प्रत्यहीं येणें जाणें ।
या लोकोपकाराकारणें । आज्ञा समर्थाची ॥ १६ ॥
१६) सूर्य अपार आकाश मार्गानें चालतो. रोज त्याचें त्या मार्गानें येणें व जाणें चालतें. हा लोकोपकार करावा अशी सूर्याला भगवंताची आज्ञा आहे.
दिवस नस्तां अंधकार । सर्वांसी नकळें सारासार ।
दिवसेंविण तश्कर । कां दिवाभीत पक्षी ॥ १७ ॥
१७) दिवस नसेल तर अंधार असतो. अंधारामधें सर्वांना सारासार नीटपणें कळत नाहीं. दिवस नसून अंधार असेल तर चोर आणि घुबड यांना बरें वाटतें.
सूर्यापुढें आणिक दुसरें । कोण आणावें सामोरें ।
तेजोरासी निर्द्धारें । उपमेरहित ॥ १८ ॥
१८) तुलनेसाठीं सूर्यापुढें दुसर्या कोणाला आणतां येणार नाहीं. सूर्य तेजाची राशी आहे त्याला दुसरी उपमा नाहीं.
ऐसा हा सविस्तर सकळांचा । पूर्वज होय रघुनाथाचा ।
अगाध महिमा मानवी वाचा । काये म्हणोनि वर्णावी ॥ १९ ॥
१९) असा हा सूर्य सगळ्यांचा आहे. श्रीरामाचा तर तो पूर्वज आहे. त्याचा महिमा अगाध आहे. माणूस आपल्या वाणीनें त्याचे वर्णन करुं शकत नाहीं.
रघुनाथवौंश पूर्वापर । येकाहूनि येक थोर ।
मज मतिमंदार हा विचार । काये कळे ॥ २० ॥
२०) श्रीरामाचा वंश पूर्वापार चालत आला आहे. त्यामध्यें एकापेक्षां एक थोर पुरुष होऊन गेले . माझ्यासारख्या मतिमंदाला सूर्यवंशाची कल्पना येणें शक्य नाहीं.
रघुनाथाचा समुदाव । तेथें गुंतला अंतर्भाव ।
म्हणोनि वर्णितां महत्व । वाग्दुर्बळ मी ॥ २१ ॥
२१) ज्या ठिकाणी श्रीरामभक्तांचा समुदाय असतो. तेथें माझे अंतरंग गुंतलेले असते. म्हणून त्याचें वर्णन माझ्या दुर्बळ वाणीला करणें शक्य नाहीं.
सकळ दोषाचा परिहार । करितां सूर्यास नमस्कार ।
स्फूर्ति वाढे निरंतर । सूर्यदर्शन घेतां ॥ २२ ॥
२२) सूर्याला नमस्कार केला तर सर्व दोष नाहींसे होतात. सूर्य दर्शन घेत गेल्यानें स्फूर्ति निरंतर वाढत जाते.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूर्यस्तवननिरुपणनाम समास दुसरा ॥
Samas Dusara Surya Stavan Nirupan
समास दुसरा सूर्यस्तवन निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment