Sunday, May 27, 2018

Samas Pachava Ajapa Nirupan समास पांचवा अजपा निरुपण


Dashak Satarava Samas Pachava Ajapa Nirupan 
Samas Pachava Ajapa Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Ajapa. The Mantra, that goes on and on with our breath every now. That mantra is Soham, Soham.
समास पांचवा अजपा निरुपण
श्रीराम ॥
येकवीस सहश्र सासें जपा । नेमून गेली ते अजपा ।
विचार पाहातां सोपा । सकळ कांहीं ॥ १ ॥
१) दिवसाच्या चोवीस तासांमध्यें माणसाचे एकवीस हजार सहाशें श्वास प्रश्वास होतात. हा नैसर्गिकजप आहे. यास अजपाजप म्हणतात. विचार करुन पाहिलें तर यांत कठिण कांहीं नाहीं.   
  मुखीं नासिकीं असिजे  प्राणें । तयास अखंड येणें जाणें ।
याचा विचार पाहाणें । सूक्ष्मदृष्टीं ॥ २ ॥
२) तोंड व नाक यांत प्राणाचें राहाणें असतें. प्राण सारखा येतो व जातो. याविषयीं सूक्ष्म विचार करावा. 
मुळीं पाहातां येक स्वर । त्याचा तार मंद्र घोर ।
त्या घोराहून सूक्ष्म विचार । अजपाचा ॥ ३ ॥
३) मुळामध्यें स्वर एकच आहे. तार म्हणजे उच्च स्वर, मंद्र म्हणजे मध्य स्वर, आणि घोर म्हणजे खालचा स्वर. घोर किंवा खालच्या स्वराहून अजपा अधिक सूक्ष्म आहे.  
सरिगमपदनिस । सरिं मात्रुका सायास । 
प्रथम स्वरें मात्रुकांस । म्हणोन पाहावें ॥ ४ ॥  
४) गायन शास्त्रामध्यें सा रे ग म प ध नि सा हे सात स्वर आहेत.प्रथम सप्तकांतील सा पासून आरंभ करावा आणि दुसर्‍या सप्तकांतील रे पर्यंत स्वरमातृका प्रयत्नानें म्हणून पाहाव्या.   
परंवाचेहून अर्तें । आणि पश्यंतीखालतें ।
स्वराचेजन्मस्थान तें । तेथून उठे ॥ ५ ॥
५) अशा रीतीनें चढतें उतरतें स्वर म्हणून पहावें. तसें म्हटल्यास परावाचेच्या अलीकडे म्हणजे बेंबीच्यावर आणि पश्यन्तीच्या खाली म्हणजे हृदयाच्या खालीं स्वरांचे जन्मस्थान आहे. असे आढळून येईल. तेथून स्वर उत्पन्न होतो.  
येकांतीं उगेंच बैसावें । तेथें हें समजोन पाहावें ।
अखंड घ्यावें सांडावें । प्रभंजनासी ॥ ६ ॥
६) एखाद्या अगदी निवांत ठिकाणी बसावें. मन स्वस्थ असावें. आणि तेथें हें सगळें नीट लक्ष देऊन पाहावें. अखंड येणार्‍या व जाणार्‍या वायूवर लक्ष ठेवावें. 
येकांतीं मौन्य धरुन बैसे । सावध पाहातां कैसें भासे ।
सोहं सोहं ऐसे । शब्द होती ॥ ७ ॥
७) एकान्तामध्यें मौन धरुन बसावें आणि सावधपणें श्वास प्रश्वासाच्या येजाकडे लक्ष द्यावें. तेव्हां असें प्रत्ययास येईल कीं, श्वासाच्या येण्याकाण्यामध्यें सोहं सोहं असे शब्द होत आहेत. 
उच्चारेंविण जे शब्द । ते जाणावेसहज शब्द ।
प्रत्यया येती परंतु नाद । कांहींच नाहीं ॥ ८ ॥
८) आपणहून प्रयत्न न करतां उच्चार न करतां जे हे शब्द ऐकू येतात ते सहज शब्द समजावे. आपल्या जन्मापासून ते आपल्याबरोबर असतात. त्या शब्दांचा उच्चार झालेला समजतो. परंतु त्यांना ध्वनीचें व्यक्त स्वरुप नसतें.   
ते शब्द सांडून बैसला । तो मौनी म्हणावा भला ।
योगाभ्यासाचा गल्बला । याकारणें ॥ ९ ॥
९) सोहं सोहं असे होणारे सहज शब्द जो मागे टाकून बसतो, तो खरा उत्तम मौनी होय. हे साधन्यासाठींच योगाभ्यासाची खटपट असते. 
येकांतीं मौन्य धरुन बैसला । तेथें कोण शब्द जाला । 
सोहं ऐसा भासला । अंतर्यामीं ॥ १० ॥
१०) आपण मौन धरुन एकांतामध्यें बसलो असतां कोणतातरी शब्द उमटल्याचा भास होतो. आपण त्याला सोहं असें म्हणतो. आपल्या मनानें कल्पिलेला तो एक भास असतो.  
धरितां सो सांडितां हं । अखंड चाले सोहं सोहं ।
याचा विचार पाहातां बहु । विस्तारला ॥ ११ ॥
११) श्वास घेतांना सो असा सूक्ष्म आवाज होतो. आणि श्वास सोडतांना हं असा सूक्ष्म आवाज होतो. अशा रीतीनें अखंड सोहं सोहं शब्द चालतो. याचा विचार करावयाचा तर त्याचा विस्तार फार मोठा आहे. 
देहधारक तितुका प्राणी । श्र्वेतजउद्भिजादिक खाणी ।
स्वासोस्वास नस्तां प्राणी । कैसे जिती ॥ १२ ॥
१२) स्वेदज, उद्बिज, जारज आणि अंडज असे चार खाणींमधील जे देहधारक प्राणी आहेत, त्या सर्वांना श्वासोश्वास आहे. त्याविना देहधारक प्राणी जगूंच शकत नाहीत. वनस्पतींना देखील प्राणवायूची गरज असते. त्यांच्यामधें जीवनकला असते. हें संत जाणतात.  
ऐसी हे अजपा सकळासा । परंतु कळे जाणत्यासी । 
सहज सांडून सायासीं । पडोंच नये ॥ १३ ॥
१३) अशा रीतीनें सर्व सजीव प्राण्यांमधें अजपा श्वासोश्वासाबरोबर चालूं असतो. ही विनासायास होणारी अजपा फक्त जाणत्यांनाच आकलन होते. सहज चालणारी ही अजपा सोडून कष्टाच्या साधनामागें जाऊं नये.  
सहज देव असतचि असे । सायासें देव फुटे नासे ।
नासिवंत देवास विश्र्वासे । ऐसा कवणु ॥ १४ ॥
१४) देव आपले स्वस्वरुप असल्यानें तो आपल्यापाशीं नेहमी सहज असतोच. सायासानें व कष्टानें निर्माण केलेला देव तुटतो, फुटतो व नाश पावतो. नाशवंत देवावर कोणी विश्र्वास ठेवीत नाहीं.
जगदांतराचें दर्शन । सहज घडे अखंड ध्यान ।
आत्मइछेनें जन । सकळ वर्तती ॥ १५ ॥
१५) जगामध्यें अंतर्यामीपणानें राहणार्‍या अंतरात्म्याचें दर्शन सहज घडतें. त्याचे ध्यान अखंड राहणें हेच त्याचे दर्शन होय. त्या अंतरात्म्याच्या इच्छेने सर्व प्राणीमात्र वागतात.  
आत्मयाचे समाधान । घडे तैसेंचि आशन ।
सांडलें फिटलें समर्पण । तयासीच होये ॥ १६ ॥
१६) अंतरात्म्याचे समाधान होईल असें खाणें प्रत्येक प्राण्याचे घडत असतें. त्याचप्रमाणें जें सांडतें, लवंडते, हरवतें हे देखील अंतरात्म्यालाच समर्पण होते. अग्नपुरुष पोटीं वसती । तयास अवदानें सकळ देती ।
लोक आज्ञेमधें असती । आत्मयांचे ॥ १७ ॥
१७) प्रत्येक प्राण्याच्या पोटांत अग्निनारायण वास करतो. त्या जठराग्नीला सर्वजण आहुती देतात. अशा रीतीनें सर्व प्राणी त्या अंतरात्म्याच्या आज्ञेंतच वागतात. 
सहज देवजपध्यानें । सहज चालणें स्तुती स्तवनें ।
सहज घडे तें भगवान्नें । मान्य कीजे ॥ १८ ॥
१८) आपल्या अंतर्यामी अंतरात्मा अगदी सहज आहे. त्याचा जप, ध्यान सहज चाललेम पाहिजे. आपलें सहज बोलणें चालणें हीच त्याची स्तुति व स्तवन . अशा रीतीनें जें सहज घडेल तेंच भगवंताला मान्य होतें.  
सहज समजायाकारणें । नाना हटयोग करणें ।
परंतु येकायेकीं समजणेंद्र । घडत नाहीं ॥ १९ ॥
१९) ही सहजावस्था काय आहे हें समजण्यासाठीं साधकाला अनेक कठीण साधनें करावी लागतात. अनेक साधनें केल्याखेरीज सहजावस्था कशी असते तें चटकन समजणें जमत नाहीं.  
द्रव्य चुकतें दरिद्र येतें । तळीं लक्ष्मी वरी वर्ततें ।
प्राणी काये करील तें । ठाउकें नाहीं ॥ २० ॥
२०) द्रव्य आहे तें पुरुन ठेवलेले आहे. त्याची जागा चुकली कीं द्रव्य असून दारिद्र्य येते. माणूस ज्या ठिकाणीं बसतो त्याच्या खालींच द्रव्य तळाशीा असते.  त्याचा व्यवहार वर चालतो. त्याला माहित नसतें. त्यामुळें तो दारिद्र्य भोगतो.      
तळघरामधें उदंड द्रव्य । भिंतीमधें घातलें द्रव्य ।
स्तंभी तुळवटीं द्रव्य । आपण मधें ॥ २१ ॥
२१) तळघरामध्यें खूप द्रव्य असतें, भिंती, खांब व तुळ्या द्रव्यांनी भरलेल्या असतात. असें सभोवती द्रव्य भरलेले असून हा त्यामध्यें दरिद्रीपणानें राहतो. 
लक्ष्मीमध्यें करंटा नांदे । त्याचें दरिद्र अधीक सांदे ।
नवल केलें परमानंदें । परमपुरुषें ॥ २२ ॥
२२) आजुबाजुला संपत्ती असून तिच्यामधें भाग्यहीन माणूस असतो. तेव्हां त्याचे करंटेपण अधिकच उठून दिसते. परमानंदस्वरुप परमात्म्यानें हा केवढा मोठा चमत्कार केलेला आहे.   
येक पाहाती येक खाती । ऐसी विवेकाची गती ।
प्रवृत्ति अथवा निवृत्ती । येंणेंचि न्यायें ॥ २३ ॥
२३) व्यवहारामध्यें जसा श्रीमंत माणूस ऐश्वर्य भोगतो आणि दरिद्री माणूस त्याच्याकडे नुसता बघत बसतो, तसा परमार्थांत जो विवेकशील असतो तो भगवंताचा आनंद भोगतो व जो विवेकशील नाहीं तो त्याच्याकडे नुसता आशाळभूतपणें बघत बसतो. विवेकशील माणूस प्रपंचांतून निवृत्त होऊन अंतरात्म्याला ओळखतो तर अविवेकी माणूस दृश्यामध्यें प्रवृत होऊन नाना प्रकारची प्रापंचिक दुःखें भोगतो. 
अंतरीं वसतां नारायेणें । लक्ष्मीस काये उणें ।
ज्याची लक्ष्मी तो आपणें । बळकट धरवा ॥ २४ ॥
२४) ज्याच्या अंतर्यामीं नारायण वस्ती करतो त्याला लक्ष्मी कमी पडणें शक्य नाही. म्हणून लक्ष्मी ज्याच्या आधीन आहे तो नारायण आपण घट्ट धरुन ठेवावा.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अजपानिरुपणनाम समास पांचवा ॥
Samas Pachava Ajapa Nirupan
समास पांचवा अजपा निरुपण


Custom Search

No comments: