Tuesday, May 15, 2018

Samas Aathava AatmaRam Nirupan समास आठवा आत्माराम निरुपण


Dashak Solava Samas Aathava AatmaRam Nirupan 
Samas Aathava AatmaRam Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about AatmaRam information of AatmaRam is given in this samas. Every animal and every living is dependent on Antaratma. AatmaRam is everywhere. Jivatma, Shivatma and Parmata is Aatmaram only.
समास आठवा आत्माराम निरुपण 
श्रीराम ॥
नमूं गणपती मंगलमूर्ती । जयाचेनि मतिस्फूर्ती ।
लोक भजती स्तवन करिती । आत्मयाचें ॥ १ ॥
१) मंगळमूर्ती गणपतीला मी नमन करतो. याच्या सत्तेनें बुद्धिमधें स्फूर्ति निर्माण होते. या स्फूर्तीनें लोक आत्म्याचे भजन आणि स्तवन करितात.  
नमूं वैखरी वागेश्र्वरी । अभ्यांतरीं प्रकाश करी ।
नाना भरोवरी विवरी । नाना विद्या ॥ २ ॥ 
२) वाणींची स्वामीनी जी वैखरी तिला मी वंदन करतो. माणसाच्या अंतर्यामीं ती प्रकाश उत्पन्न करते. अनेक विद्यांची रहस्यें ती संपूर्णपणें स्पष्ट करुन देते.  
सकळ जनामधें नाम । रामनाम उत्तमोत्तम ।
श्रम जाउनी विश्राम । चंद्रमौळी पावला ॥ ३ ॥
३) सर्व लोकांमधें रामनाम हें उत्तमोत्तम आहे. रामनाम घेतल्यानें श्रीशंकराचा शीण गेला.आणि त्यास विश्रांती मिळाली. 
नामाचा महिमा थोर । रुप कैसें उत्तरोत्तर ।
परात्पर परमेश्र्वर । त्रयलोक्यधर्ता ॥ ४ ॥
४) नामाचा महिमा फार थोर आहे. त्रैलोक्यधर्ता परमेश्र्वर आणि परात्पर म्हणजें श्रेष्ठांमध्यें श्रेष्ठ असणारें निर्गुण व निराकार परब्रह्म, असें भगवंताचें चढतेंवाढतें रुप नामास प्राप्त होते.  
आत्माराम चहुंकडे । लोक वावडे जिकडे तिकडे ।
देहे पडे मृत्य घडे । आत्मयाविण ॥ ५ ॥
५) एक आत्माराम अंतर्यामीरुपानें सर्वत्र व्यापून आहे. त्याच्या योगानें जगांत सगळीकडे लोकांचा व्यवहार चालतो. तो जेथें नसतो तेथें देह पडतो, मृत्यु घडून येतो.   
जीवात्मा शिवात्मा परमात्मा । जगदात्मा विश्र्वात्मा गुप्तात्मा ।
आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा । देवदानवमानवीं ॥ ६ ॥
६) देव, दानव आणि मानव यांच्यामध्यें अंतरात्म्यास जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा, आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा अशी नावें आढळतात. 
सकळ मार्ग चालती बोलती । अवतारपंगतीची गती ।
आत्म्याकरितां होत जाती । ब्रह्मादिक ॥ ७ ॥
७) या अंतरात्म्याच्या योगानें जगांतील सर्व मार्ग चालतात. सर्व प्रकारचे व्यवहार घडतात. नाना अवतारांचे कार्य त्याच्या योगानेंच घडून येते. त्या अंतरात्म्यामुळेंच ब्रह्मादिक देव होतात आणि जातात.  
नादरुप जोतीरुप । साक्षरुप सत्तारुप ।
चैतन्यरुप सस्वरुप । द्रष्टारुप जाणिजे ॥ ८ ॥
८) अंतरात्म्याला आणखी कांहीं नावांनीं ओळखतात. तीं नांवें अशी नादरुप, ज्योतिरुप,साक्षीरुप, सत्तारुप, चैतन्यरुप, स्वस्वरुप, द्रष्टारुप, 
नरोत्तमु वीरोत्तमु । पुरुषोत्तमु रघोत्तमु ।
सर्वोत्तमु उत्तमोत्तमु । त्रयलोक्यवासी ॥ ९ ॥
९) नरोत्तम, वीरोत्तम, पुरुषोत्तम, रघूत्तम, सर्वोत्तम, उत्तमोत्तम आणि त्रैलोक्यवासी.
नाना खटपट आणी चटपट । नाना लटपट आणि झटपट ।
आत्मा नस्तां सर्व सपाट । चहुंकडे ॥ १० ॥
१०) जगांत घडून येणार्‍या सार्‍या घटना, माणसांच्या हातून होणारी सारी कर्में, त्यांच्या जीवनांतील युक्त्या, प्रयुक्त्या आणि घाई व गर्दी या सर्वांचे कारण मूळ अंतरात्मा आहे. तो जर नसेल तर चहूकडे सगळी निष्प्राण होईल.
आत्म्याविण वेडें कुडें । आत्म्याविण मडें बापुडें ।
आत्म्याविण थडें रोकडें । शरीराचें ॥ ११ ॥
११) आत्मा नसेल तर शरीरांत कांहीं अर्थ उरत नाहीं. तें वेडेवाकडें होऊन जाते. आत्म्याशिवाय तें मढें बनतें. आत्मा नसेल तर शरीराचे प्रत्यक्ष थडगे बनतें.    
आत्मज्ञानी समजे मनीं । पाहे जनीं आत्मयालागुनी ।
भुवनी अथवा त्रिभुवनीं । आत्म्याविणें वोस ॥ १२ ॥
१२) आत्मज्ञानी पुरुष अंतरात्म्याचें हें कर्तृत्व मनांत निश्र्चितपणें जाणतो. त्यामुळें लोकांमध्यें सूक्ष्मपणानें कार्य करणार्‍या आत्म्याकडेच त्याची दृष्टी असते. पृथ्वीवर तसेंच त्रिभुवनांगतही अंतरात्म्यावाचून सगळे ओसाड पडतें. अंतरात्माच हा सगळीकडे जिवंतपणाचे, चैतन्याचें मूळ आहे.  
परम सुंदर आणि चतुर । जाणे सकळ सारासार ।
आत्म्याविण अंधकार । उभय लोकीं ॥ १३ ॥
१३) हा अंतरात्मा अतिसुंदर व चतुर आहे. तो सगळे सारासार जाणतो. तो ज्ञानमय असल्यानें, तो नसेल तर इहलोकीं व परलोकीं, प्रपंचांत व परमार्थांत सर्वत्र अज्ञान-अंधार भरतो.  
सर्वांगीं सिध सावध । नाना भेद नाना वेध ।
नाना खेद आणी आनंद । तेणेंचिकरितां ॥ १४ ॥
१४) तो सर्वांगांनीं सिद्ध आहे. परिपूर्ण आहे. तो सदैव सावध असतो. सदैव तत्रपर असतो. अनेक प्रकारचे भेद, वेध, खेद, आणि आनंद अंतरात्म्याच्या योगानें होतात.  
रंक अथवा ब्रह्मादिक । येकचि चालवी अनेक ।
पाहावा नित्यानित्यविवेक । कोण्हीयेकें ॥ १५ ॥
१५) रंक असो अथवा ब्रह्मादिक देव असोत, एक अंतरात्मा या सर्वांना चालवतो. माणसानें नित्यानित्यविवेक करावा म्हणजे हें आकलन होईल.
ज्याचे घरी पद्मिणी नारी । आत्मा तंवरी आवडी धरी ।
आत्मा गेलियां शरीरीं । तेज कैचें  ॥ १६ ॥
१६) समजा एखाद्याच्या घरांत पद्मिनी स्त्री आहे. पण तिच्या शरीरांत जोपर्यंत आत्मा असतो तोपर्यंत तिच्यावर प्रेम राहाते. आत्मा शरीर टाकून निघून गेला मग तेथें कांहीं तेजच उरत नाहीं. 
आत्मा दिसेना ना भासेना । बाह्याकारें अनुमानेना ।
नाना मनाच्या कल्पना । आत्मयाचेनी ॥ १७ ॥
१७) आत्मा इंद्रियांना गोचर नाहीं. मनाच्या कक्षेंत तो येत नाहीं. कोणत्याही बाहेरील किंवा दृश्य व स्थूल साधनांनी त्याची कल्पना करतां येत नाहीं. आपल्या मनामध्यें ज्या नाना प्रकारच्या कल्पना निर्माण होतात त्या सर्व अंतरात्म्यामुळेंच असतात.  
आत्मा शरीरीं वास्तव्य करी । अवघें ब्रह्मांड विवरी भरी ।
वासना भावना परोपरीं । किती म्हणोनी सांगाव्या ॥ १८ ॥
१८) अंतरात्मा शरीरांत वास्तव्य करतो. तेथें तो सार्‍या ब्रह्मांडाचा विचार करतो. तो ब्रह्मांड भरुन राहतो. शरीरांत अनेक प्रकारच्या वासना करतो. भावना अनुभवतो. त्या सर्व सांगणें कठीण आहे.  
मनाच्या अनंत वृत्ती । अनंत कल्पना धरिती ।
अनंत प्राणी सांगों किती । अंतर त्यांचें ॥ १९ ॥
१९) अंतरात्मा शरीरांतर्यामी असतो तेव्हा मनांत अनंत वृत्ती येऊन जातात. अनंत कल्पनांचे तरंग उठतात. जगामध्यें अनंत प्राणी आहेत. त्यांच्या अंतरंगाचे संपूर्ण वर्णन करणें शक्य नाहीं. 
अनंत राजकारणें धरणें । कुबुधी सुबुधी विवरणें ।
कळों नेदणें चुकावणें । प्राणीमात्रासी ॥ २० ॥    
२०) अंनत प्रकारचे राजकारण करणें म्हणजे अनंत प्रकारच्या खटपटी लटपटी करणें चांगली व वाईट बुद्धि यामधें फरक करणें. आपला बेत कोणास कळूं न देणें. कोणास चुकवणे या सार्‍या गोष्टी जीवप्राणी अंतरात्म्याच्या योगानें करुं शकतात.       
येकास येक जपती टपती । येकास येक खपती लपती ।
शत्रुपणाची स्थिती गती । चहुंकडे ॥ २१ ॥
२१)  एक एकास जपतो. एक एकास मारण्यास टपतो. एक एकास खपतो. एक एकापासून लपतो. एक एकाचे शत्रुत्व करतो. अशा रीतीनें चहुंकडून अंतरात्म्याची गति असते.  
पृथ्वीमधें परोपरीं । येकास येक सिंतरी ।
कित्येक भक्त परोपरीं । परोपकार करिती ॥ २२ ॥
२२) जगांत एक एकास सारखा फसवतो. पण त्याचबरोबर पुष्कळ भक्त सारखा परोपकार करतात. हें अंतरात्म्यामुळेंच घडतें.  
येक आत्मा अनंत भेद । देहेपरत्वें घेती स्वाद ।
आत्मा ठाईंचा अभेद । भेद हि धरी ॥ २३ ॥ 
२३) मुळांत अंतरात्मा एकच एक आहे. पण देहपरत्वें अनंत भेद होतात. आणि प्रत्येक देहानुसार निरनिराळे भोग घेणें चालतें. याचा अर्थ असा कीं मूळ अंतरात्मा एकच एक असला, तरीही तो भेदानें पण राहूं शकतो. 
पुरुषास स्त्री पाहिजे । स्त्रीस पुरुष पाहिजे ।
नवरीस नवरी पाहिजे । हें तों घडेना ॥ २४ ॥
२४) पुरुषास स्त्री हवी असते. तर स्त्रीला पुरुष हवा असतो. नवरीला नवरी हवी असें कांहीं कधीं घडत नाहीं. 
पुरुषांचा जीव स्त्रीयांची जीवी । ऐसी नाहीं उठाठेवी ।
विषयसुखाची गोवी । तेथें भेद आहे ॥ २५ ॥  
२५) पुरुषांचा तो जीव आणि स्त्रीयांची ती जीवी असा कांहीं भेद करतां येत नाहीं. इंद्रियसुख भोगण्याच्या बाबतींत मात्र भेद आढळतो. 
ज्या प्राण्यास जो आहार । तेथेंचि होती तत्पर ।
पशूचे आहारीं नर । अनादरें वर्तती ॥ २६ ॥
२६) ज्या प्राण्याचा जो आहार असतो त्या आहाराच्या बाबातींत तो प्राणी फार तत्पर असतो. उदा. पशूचा आहार कांहीं माणसाला आवडत नाहीं.
आहारभेद देहेभेद । गुप्त प्रगट उदंड भेद ।
तैसाचि जाणावा आनंद । वेगळाला ॥ २७ ॥
२७) प्राण्यांमध्यें आहारांत भेद आहेत. शरीराचे भेद आहेत. असेच प्रगट आणि गुप्त भेद पुष्कळ आहेत. त्याचप्रमाणें प्रत्येक प्राण्याचा आनंद वेगळा असतो. 
सिंधु भूगर्भींची नीरें । त्या नीरामधील शरीरें ।
आवर्णोदकाचीं जळचरें । अत्यंत मोठी ॥ २८ ॥
२८) समुद्रामध्यें आणि पृथ्वीच्या पोटांत पाणी सांठवलेलें असतें. त्या पाण्यामध्यें व आवरणोदकामध्यें अतिशय मोठी जलचरें असतात. त्यांचा आहार व आनंद कांहीं निराळाच असतो.  
सूक्ष्म दृष्टीं आणिता मना । शरीराचा अंत लागेना ।
मा तो अंतरात्मा अनुमाना । कैसा येतो ॥ २९ ॥
२९) माणसानें सूक्ष्म दृष्टीनें बघितलें तरी शरीराचा अंत लागत नाहीं. शरीर तर दृश्य आहे स्थूल आहे त्याचा देखील थांगपत्ता लागत नाहीं. त्याचे संपूर्ण ज्ञान होत नाहीं. मग अंतरात्मा तर अति सूक्ष्म आहे. त्याचें संपूर्ण ज्ञान होणें आणखीच कठीण आहे. 
देह्यात्मयोग शोधून पाहिला । तेणें कांहीं अनुमानला ।
स्थूळसूक्ष्माचा गलबला । गथागोवी ॥ ३० ॥
३०)  देह आणि आत्मा यांचा संयोग झालेला आहे. त्या देहात्मासंबंधाचा जर शोध घेतला तर अंतरात्म्याची थोडीशी कल्पना येते. आत्मा अत्यंत सूक्ष्म, तर देह अत्यंत स्थूल आहे. या स्थूलसूक्ष्माच्या संयोगाच्या गडबडींत मोठाच गोंधळ माजतो.  
गथागोवी उगवाळ्याकारणें । केलीं नाना निरुपणें ।
अंतरात्मा कृपाळुपणें । बहुतां मुखें बोलिला ॥ ३१ ॥
३१) ही गुंतागुंत उकलता यावी यासाठीं अनेक प्रकारची निरुपणें करावी लागतात. आत्म्याची कृपा झाल्यानें अशी निरुपणें पुष्कळांच्या मुखांतून बाहेर पडली आहेत.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मारामनिरुपणनाम समास आठवा ॥  
Samas Aathava AatmaRam Nirupan
समास आठवा आत्माराम निरुपण 


Custom Search

No comments: