Showing posts with label श्रीरामचरितमानस भाग ५६. Show all posts
Showing posts with label श्रीरामचरितमानस भाग ५६. Show all posts

Monday, October 26, 2020

ShriRamcharitmans Part 56 श्रीरामचरितमानस भाग ५६

 

ShriRamcharitmans Part 56 
Doha 256 to 259 
श्रीरामचरितमानस भाग ५६ 
दोहा २५६ ते २५९ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—मंत्र परम लघु जासु बस बिधि हरि हर सुर सर्ब ।

महामत्त गजराज कहुँ बस कर अंकुस खर्ब ॥ २५६ ॥

ब्रह्मदेव, विष्णू, शिव व सर्व देव ज्याच्या अधीन असतात, तो मंत्र अत्यंत छोटा असतो. महान मस्तवाल गजराजाला छोटासा अंकुर ताब्यात ठेवतो. ॥ २५६ ॥

काम कुसुम धनु सायक लीन्हे । सकल भुवन अपने बस कीन्हे ॥

देबि तजिअ संसउ अस जानी । भंजब धनुष राम सुनु रानी ॥

कामदेवाने फुलांच्याच धनुष्यबाणाने सर्व लोकांना वश करुन ठेवले आहे. हे देवी, हे जाणून संशय सोडून द्या. हे राणी, सांगते ते ऐका. श्रीरामचंद्र धनुष्य नक्कीच मोडतील. ‘ ॥ १ ॥

सखी बचन सुनि भै परतीती । मिटा बिषादु बढ़ी अति प्रीती ॥

तब रामहि बिलोकि बैदेही । सभय हृदयँ बिनवति जेहि तेही ॥

सखीचे वचन ऐकून राणीला विश्र्वास वाटू लागला. तिचा विषाद मावळला आणि श्रीरामांविषयी तिच्या मनातील प्रेम अधिकच वाढले. त्याचवेळी श्रीरामांना पाहून सीता बावरलेल्या मनाने ज्या त्या देवांची विनवणी करु लागली. ॥ २ ॥

मनहीं मन मनाव अकुलानी । होहु प्रसन्न महेस भवानी ॥

करहु सफल आपनि सेवाकाई । करि हितु हरहु चाप गरुआई ॥

ती व्याकूळ होऊन मनातल्या मनात आळवत होती की, ‘ हे महेश-भवानी. माझ्यावर प्रसन्न व्हा. मी जी तुमची सेवा केली आहे, तिचे फळ मला द्या आणि माझ्यावर स्नेह ठेवून धनुष्याचा जडपणा नाहीसा करा. ॥ ३ ॥

गननायक बरदायक देवा । आजु लगें कीन्हिउँ तुअ सेवा ॥

बार बार बिनती सुनि मोरी । करहु चाप गुरुता अति थोरी ॥

हे गणनायका, वरदायी गणेशदेवा, मी आजच्या या दिवसासाठीच तुमची सेवा केली होती. वारंवार केलेली माझी विनंती ऐकून धनुष्याचा जडपणा खूपच कमी करुन टाका. ‘ ॥ ४ ॥

  दोहा—देखि देखि रघुबीर तन सुर मनाव धरि धीर ।

भरे बिलोचन प्रेम जल पुलकावली सरीर ॥ २५७ ॥

श्रीरघुनाथांच्याकडे पाहात-पाहात सीता धीर धरुन देवांची आळवणी करीत होती. तिच्या नेत्रांत प्रेमाश्रू भरले होते, आणि शरीर रोमांचित झाले होते. ॥ २५७ ॥

नीकें निरखि नयन भरि सोभा । पितु पनु सुमिरि बहुरि मनु छोभा ॥

अहह तात दारुनि हठ ठानी । समुझत नहिं कछु लाभु न हानी ॥

डोळे भरुन श्रीरामांचे लावण्य पाहाताना पित्याच्या पणाची आठवण येताच सीतेचे मन क्षुब्ध झाले. ती मनात म्हणू लागली, ‘ अहो, माझ्या वडिलांनी मोठा कठीण पण ठेवला आहे. त्यांना त्यातील लाभ-हानी काही समझेनाशी झाली आहे. ॥ १ ॥

सचिव सभय सिख देइ न कोई । बुध समाज बड़ अनुचित होई ॥

कहँ धनु कुलिसहु चाहि कठोरा । कहँ स्यामल मृदुगात किसोरा ॥

मंत्री घाबरत असल्यामुळे कुणी त्यांना सल्लाही देत नाही. पंडितांच्या सभेमध्ये हे जे घडत आहे, ते अयोग्य आहे. कुठे वज्रापेक्षाही कठोर धनुष्य आणि कुठे हे कोमल शरीराचे किशोर श्यामसुंदर ! ॥ २ ॥

बिधि केहि भॉंति धरौं उर धीरा । सिरस सुमन कन बेधिअ हीरा ॥

सकल सभा कै मति भै भोरी । अब मोहि संभुचाप गति तोरी ॥

हे विधात्या, मी मनात धीर कसा धरु ? शिरीषाच्या फुलातील केशराने कुठे हिरा छेदता येईल काय ? सर्व सभेची बुद्धी बावचळली आहे म्हणून हे शिव-धनुष्या, आता मला तुझाच एक आधार आहे. ॥ ३ ॥

निज जड़ता लोगन्ह पर डारी । होहि हरुअ रघुपतिहि निहारी ॥

अति परिताप सीय मन माहिं । लव निमेष जुग सय सम जाहीं ॥

हे धनुष्या ! तू आपला जडपणा लोकांच्यावर टाकून व श्रीरामांचे सुकुमार शरीर पाहून हलका हो. ‘ अशा प्रकारे सीतेच्या मनाला मोठी व्यथा लागून राहिली होती. निमेषाचा एक अंश सुद्धा तिला युगासारखा वाटत होता. ॥ ४ ॥

   दोहा—प्रभुहि चितइ पुनि चितव महि राजत लोचन लोल ।

खेलत मनसिज मीन जुग जनु बिधु मंडल डोल ॥ २५८ ॥

प्रभु श्रीरामचंद्रांना पाहून नंतर पृथ्वीकडे पाहाणार्‍या सीतेचे चंचल नयन असे शोभत होते की, जणू चंद्रमंडलरुपी जलपूर्ण कलशात कामदेवाच्या दोन मासोळ्या खेळत आहेत. ॥ २५८ ॥

गिरा अलिनि मुख पंकज रोकी । प्रगट न लाज निसा अवलोकी ॥

लोचन जलु रह लोचन कोना । जैसें परम कृपन कर सोना ॥

सीतेच्या वाणीरुपी भ्रमरीला तिच्या मुखरुपी कमळाने कोंडून ठेवले होते. लज्जारुपी रात्र पाहून ती प्रकट होत नव्हती. ज्याप्रमाणे एखाद्या कंजूष कोपर्‍यातच सोने गाडून ठेवतो त्याप्रमाणे तिच्या नेत्रांतील पाणी कोपर्‍यातच थबकले होते. ॥ १ ॥      

सकुची ब्याकुलता बड़ि जानी । धरि धीरज प्रतीति उर आनी ॥

तन मन बचन मोर पनु साचा । रघुपति पद सरोज चितु राचा ॥

आपली व्याकुळता पाहून सीता लाजली आणि धीर धरुन तिने मनात विश्र्वास बाळगला की, ‘ जर तन, मन आणि वचन यांनी माझा पण खरा असेल आणि श्रीरघुनाथांच्या चरणकमळी माझे चित्त खरोखरच अनुरुक्त असेल, ॥ २ ॥

तौ भगवानु सकल उर बासी । करिहि मोहि रघुबर कै दासी ॥

जेहि कें जेहि पर सत्य सनेहू । सो तेहि मिलइ न कछु संदेहू ॥

तर सर्वांच्या हृदयात निवास करणारे भगवंत मला रघुश्रेष्ठ श्रीरामचंद्रांची दासी नक्कीच बनवतील, ज्याचे ज्याच्यावर खरे प्रेम असते, त्याला तो मिळतोच, यात काही शंका नाही.’ ॥ ३ ॥

प्रभु तन चितइ प्रेम तन ठाना । कृपानिधान राम सबु जाना ॥

सियहि बिलोकि तकेउ धनु कैसें । चितव गरुरु लघु ब्यालहि जैसें ॥

प्रभु श्रीरामांना पाहून सीतेच्या शरीराने प्रेमाचा निश्र्चय केला. कृपानिधान श्रीरामांनी हे ओळखले. त्यांनी सीतेकडे पाहून धनुष्याकडे असे बघितले की, गरुड जसा छोट्या सापाकडे पाहतो. ॥ ४ ॥

दोहा—लखन लखेउ रघुबंसमनि ताकेउ हर कोदंडु ।

पुलकि गात बोले बचन चरन चापि ब्रह्मांडु ॥ २५९ ॥

इकडे जेव्हा लक्ष्मणाने पाहिले की, रघुकुलरत्न श्रीरामांनी शिव-धनुष्याकडे दृष्टी टाकली आहे, तेव्हा त्याचे शरीर शहारले त्याने ब्रह्मांडाला आपल्या चरणांनी दाबून म्हटले, ॥ २५९ ॥

दिसिकुंजरहु कमठ अहि कोला । धरहु धरनि धरि धीर न डोला ॥

रामु चहहिं संकर धनु तोरा । होहु सजग सुनि आयसु मोरा ॥

‘ हे दिग्गजांनो, हे कच्छपा, हे शेषा, हे वराहा ! तुम्ही धैर्याने पृथ्वीला धरुन ठेवा. कारण ती डळमळू नये. श्रीरामचंद्र शिवांचे धनुष्य मोडू पाहात आहेत. माझ आज्ञा समजून सर्वजण सावध राहा. ‘ ॥ १ ॥

चाप समीप रामु जब आए । नर नारिन्ह सुर सुकृत मनाए ॥

सब कर संसउ अरु अग्यानू । मंद महीपन्ह कर अभिमानू ॥

श्रीरामचंद्र जेव्हा धनुष्याजवळ आले, तेव्हा सर्व स्त्री-पुरुषांनी देवांची व आपल्या पुण्यांची विनवणी केली. सर्वांचा संशय आणि अज्ञान, नीच राजांचा अभिमान, ॥ २ ॥

भृगुपति केरि गरब गरुआई । सुर मुनिबरन्ह केरि कदराई ॥

सिय कर सोचु जनक पछितावा । रानिन्ह कर दारुन दुख दावा ॥

परशुरामाचा प्रचंड गर्व, देव व मुनींची व्याकुळता ( भय ), सीतेची चिंता, जनकांचा पश्र्चात्ताप आणि राण्यांच्या दारुण दुःखाचा दावानल, ॥ ३ ३

संभुचाप बड़ बोहितु पाई । चढ़े जाइ सब संगु बनाई ॥

राम बाहुबल सिंधु अपारु । चहत पारु नहिं कोउ कड़हारु ॥

हे सर्व शिवांचे धनुष्यरुपी मोठे जहाज मिळाल्याने समूह बनवून, त्यावर आरुढ झाले. हे सर्व श्रीरामांच्या भुजांच्या बलरुपी अपार समुद्रापलीकडे जाऊ इच्छितात. परंतु कोणी नावाडी नाही. ॥ ४ ॥   



Custom Search