Showing posts with label Gurucharitra Adhyay 29. Show all posts
Showing posts with label Gurucharitra Adhyay 29. Show all posts

Sunday, June 22, 2014

Gurucharitra Adhyay 29 Part 3/3 गुरुचरित्र अध्याय २९ भाग ३/३


Gurucharitra Adhyay 29 
Gurucharitra Adhyay 29 is in Marathi. Name of this Adhyay is BhasmaMahima Varnanam.


आरक्त वस्त्र नेसली । जैसें दाडिंब पुष्पवेली । 
किंवा कुंकुमें डंवरिली । गिरिजा माता परियेसा ॥ १८१ ॥ 
बाहुदंड सुरेखा । करीं कंकण मिरवे देखा ।
रत्नखचित मेखळ देखा । लेहली असे अपूर्व जे ॥ १८२ ॥
चरण शोभती महा बरवे । असती नेपुरें स्वभावें । 
ऐसें पार्वती-ध्यान घ्यावें । म्हणती गण समस्त ॥ १८३ ॥ 
अष्टमीच्या चंद्रासरिसा । मिरवें टिळक कपाळीं कैसा । 
त्रिपुंड्र टिळा शुभ्र जैसा । मोतियांचा परियेसा ॥ १८४ ॥ 
नानापरीचे अलंकार । अनेकपरीचे श्रृंगार । 
कवण वर्णूं शके पार । जगन्माता अंबिकेचा ॥ १८५ ॥ 
ऐसा शंभु उमेसहित । बैसलासे सभेंत । 
तेहतीस कोटी परिवारासहित । इंद्र उभा वोळगेसी ॥ १८६ ॥ 
उभे समस्त सुरवर । देवऋषि सनत्कुमार । 
आले तेथें वेगवक्त्र । तया ईक्ष्वरसभेसी ॥ १८७ ॥ 
सनत्कुमार तये वेळीं । लागतसे चरणकमळीं । 
साष्टांग नमन बहाळीं । विनवीतसे शिवासी ॥ १८८ ॥ 
जय जया उमाकांता । जय जया शंभु विश्र्वकर्ता । 
त्रिभुवनीं तूंचि दाता । चतुर्विध पुरुषार्थ ॥ १८९ ॥ 
समस्त धर्म आपणासी । स्वामी निरोपिलें कृपेसीं । 
भवार्णवीं तरावयासी । पापक्षयाकारणें ॥ १९० ॥ 
आणिक एक आम्हां देणें । मुक्ति होय अल्पपुण्यें । 
चारी पुरुषार्थ येथे गुणें । अनायासें साधिजे ॥ १९१ ॥ 
एर्‍हवीं समस्त पुण्यासी । करावें कष्ट असमसहासीं । 
हितार्थ सर्व मानवांसी । निरोपावें स्वामिया ॥ १९२ ॥ 
ऐसें विनवी सनत्कुमार । मनीं संतोषोनियां ईश्र्वर । 
सांगता झाला कर्पूरगौर । सनत्कुमार मुनीसी ॥ १९३ ॥ 
ईश्र्वर म्हणे तये वेळीं । ऐका देव ऋषि सकळीं । 
घडे धर्म तात्काळीं । ऐसें पुण्य सांगेन ॥ १९४ ॥ 
वेदशास्त्रसंमतेसीं । असे धर्म परियेसीं । 
अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी । भस्मांकित परियेसा ॥ १९५ ॥ 
ऐकोनि विनवी सनत्कुमार । कवणें विधीं लाविजे नर । 
कवण ' स्थान ' ; ' द्रव्य ' परिकर । 'शक्ति','देवता' कवण असे ॥ १९६ ॥ 
कवण 'कर्तु', किं 'प्रमाण' । कोण मंत्रे लाविजे आपण । 
स्वामी सांगा विस्तारुन । म्हणोनि चरणीं लागला ॥ १९७ ॥ 
ऐसी विनंति ऐकोनि । सांगे शंकर विस्तारोनि । 
गोमय-द्रव्य, देवता अग्नि । भस्म करणें परियेसा ॥ १९८ ॥ 
पुरातनीचे यज्ञस्थानीं । जे का असे मेदिनी । 
पुण्य बहुत लावितांक्षणी । भस्माकिंत परियेसा ॥ १९९ ॥ 
' सद्योजाता'दि मंत्रेसीं । घ्यावें भस्म तळहस्तासी । 
अभिमंत्रावें भस्मासी । 'अग्निरित्या'दि मंत्रेकरोनि ॥ २०० ॥ 
'मानस्तोके' ति मंत्रेसीं । समर्दावे अंगुष्ठेसीं । 
'त्र्ंयबका'दि मंत्रेसी । शिरसीं लाविजे परियेसा ॥ २०१ ॥ 
' त्र्यायुषे' ति मंत्रेसीं । लाविजे ललाट भुजांसी । 
त्याणेंचि मंत्रें परियेसी । स्थानी स्थानी लाविजे ॥ २०२ ॥ 
तीनी रेखा एके स्थानीं । लावाव्या त्याच मंत्रांनी' । 
अधिक न लाविजे भ्रुवांहुनि । भ्रुसमान लाविजे ॥ २०३ । 
मध्यमानामिकांगुळेसीं । लाविजे पहिले ललाटेसी । 
प्रतिलोम -अंगुष्ठेसी । मध्यरेषा काडिजे ॥ २०४ ॥ 
त्रिपुंड्र येणेपरी । लाविजे तुम्ही परिकरी । 
एक एक रेखेच्या विस्तारीं । सांगेन ऐका एकचित्तें ॥ २०५ ॥ 
नव देवता विख्यातेसी । असती एकेक रेखेसी । 
 'अ' कार गार्हपत्यासी । भूरात्मा रजोगुण ॥ २०६ ॥ 
ऋग्वेद आणि क्रियाशक्ति । प्रातःसवन असे ख्याति । 
महादेव-देव म्हणती । प्रथम रेखा येणेंपरी ॥ २०७ ॥ 
दुसरे रेखेची देवता । सांगेन ऐका विस्तारता । 
' उकार ' दक्षिणाग्नि देवता । नभ सत्व जाणावें ॥ २०८ ॥ 
यजुर्वेद म्हणिजे त्यासी । मध्यंदिन-सवन परियेसीं । 
इच्छाशक्ति अंतरात्मेसीं । महेश्र्वर-देव जाणा ॥ २०९ ॥ 
तिसरी रेखा मधिलेसी । ' म ' कार आहवनीय परियेसीं । 
 परमात्मा दिव हर्षी । ज्ञानशक्ति तमोगुण ॥ २१० ॥ 
तृतीयसवन परियेसीं । सामवेद असे त्यासी । 
शिवदैवत निर्धारेंसी । तीनि रेखा येणेंविधि ॥ २११ ॥ 
ऐसें नित्य नमस्कारुनि । त्रिपुंड्र लाविजे भस्मेंनि । 
महेश्र्वराचें व्रत म्हणोनि । वेदशास्त्रें बोलताति ॥ २१२ ॥ 
मुक्तिकामें जे लाविती । त्यासी नाहीं पुनरावृत्ति । 
जें जें मनीं संकल्पिती । लाधे चारी पुरुषार्थ ॥ २१३ ॥ 
ब्रह्मचारी-गृहस्थासी । वानप्रस्थ-यतीसी । 
समस्तीं लाविजे हर्षीं । भस्मांकित त्रिपुंड्र ॥ २१४ ॥ 
महापापी असे आपण । उपपातकी जरी जाण । 
भस्म लावितां तत्क्षण । पुण्यात्मा तोचि होय ॥ २१५ ॥ 
क्षत्रिय-वैश्य-शूद्र-स्त्रीवध्यासी । गोहत्यादि-पातकासी । 
वीरहत्या-आत्महत्येसी । शुद्धात्मा करी भस्मांकित ॥ २१६ ॥ 
विधिपूर्वक मंत्रेसीं । जे लाविती भक्तिसीं । 
त्यांची महिमा अपारेसीं । एकचित्तें परियेसा ॥ २१७ ॥ 
जरी नेणे मंत्रासी । त्याणें लाविजे भावशुद्धीसीं । 
त्याची महिमा अपारेसीं । एकचित्तें परियेसा ॥ २१८ ॥ 
परद्रव्यहारक देखा । परस्त्रीगमन ऐका । 
असेल पापी परनिंदका । तोही पुनीत होईल जाणा ॥ २१९ ॥ 
परक्षेत्रहरण देखा । परपीडक असेल जो कां । 
सस्य आराम तोडी का । ऐसा पातकी पुनीत होई ॥ २२० ॥ 
गृहदाहादि केला दोष । असत्यवादी परियेस । 
पैशुन्यपण पापास । वेदविक्रय पाप जाणा ॥ २२१ ॥ 
कूटसाक्षी व्रतत्यागी । कौटिल्य करी पोटालागीं । 
ऐसीं पापें सदा भोगी । तोही पुनीत होय जाणा ॥ २२२ ॥ 
गाई-भूमि-हिरण्यदान । म्हैषी-तीळ-कंबळदान । 
घेतलें असेल वस्त्रान्न । तोही पुनीत होय जाणा ॥ २२३ ॥ 
धान्यदान जलादिदान । घेतलें असेल नीचापासून । 
त्याणें करणें भस्मधारण । तोही पुनीत होय जाणा ॥ २२४ ॥ 
दासी-वेश्या-भुजंगीसीं । वृषलस्त्री-रजस्वलेंसीं । 
केलें असती जे कां दोषी । तोही पुनीत होय जाणा ॥ २२५ ॥ 
कन्या विधवा अन्य स्त्रियांशीं । घडला असेल संग जयासी । 
अनुतप्त होऊनि परियेसीं । भस्म लावितां पुनीता ॥ २२६ ॥ 
रस-मांस-लवणादिका । केला असेल विक्रय जो कां । 
पुनीत होय भस्मसंपर्का । त्रिपुंड्र लावितां परियेसा ॥ २२७ ॥ 
जाणोनि अथवा अज्ञानता । पाप घडलें असंख्याता । 
भस्म लावितां पुनीता । पुण्यात्मा होय जाणा ॥ २२८ ॥ 
नाशी समस्त पापांसी । भस्ममहिमा आहे ऐशी । 
शिवनिंदक पापियासी । न करी पुनीत परियेसा ॥ २२९ ॥ 
शिवद्रव्य-अपहारकासी । निंदा करी शिवभक्तांसी । 
न होय निष्कृति त्यासी । पापावेगळा नव्हे जाणा ॥ २३० ॥ 
रुद्राक्षमाळा जयाचे गळां । लाविला असेल त्रिपुंड्र टिळा । 
अन्य पापी होय केवळा । तोही पूज्य तीन्ही लोकीं ॥ २३१ ॥ 
जितुकी तीर्थे भूमीवरी । असतील क्षेत्रें नानापरी । 
स्नान केलें पुण्य-सरी । भस्म लावितां परियेसा ॥ २३२ ॥ 
मंत्र असती कोटी सात । पंचाक्षरादि विख्यात । 
अनंत आगम असे मंत्र । जपिलें फळ भस्मांकिता ॥ २३३ ॥ 
पूर्वजन्म-सहस्त्रांती । सहस्त्र जन्म पुढें होती । 
भस्मधारणें पापें जातीं । बेचाळिस वंशादिक ॥ २३४ ॥ 
इहलोकीं अखिल सौख्य । होतीं पुरुष शतायुष्य । 
व्याधि न होती शरीरास । भस्म लावितां नरासी ॥ २३५ ॥ 
अष्टैश्र्वर्ये होतीं त्यासी । दिव्य शरीर परियेसीं । 
अंती ज्ञान होईल निश्र्चयेसीं । देहांतीं तया नरा ॥ २३६ ॥ 
 बैसवोनि दिव्य विमानीं । देवस्त्रिया शत येऊनि । 
सेवा करिती येणें गुणीं । घेऊनि जाती स्वर्गभुवना ॥ २३७ ॥ 
विद्याधर सिद्धजन । गंधर्वादि देवगण । 
इंद्रादि लोकपाळ जाण । वंदिती समस्त तयासी ॥ २३८ ॥ 
अनंतकाळ तया स्थानीं । सुखें असती संतोषोनि । 
मग जाती तेथोनि । ब्रह्नलोकीं शाश्र्वत ॥ २३९ ॥ 
एकशत कल्पवरी । रहाती ब्रह्मलोकीं स्थिरी । 
तेथोनि जाती वैकंठपुरीं । विष्णुलोकीं परियेसा ॥ २४० ॥ 
ब्रह्मकल्प तीनवरी । रहाती नर वैकुंठपुरीं । 
मग पावती कैलासपुरीं । अक्षय काळ तेथें रहाती ॥ २४१ ॥ 
शिवसायुज्य होय त्यासी । संदेह सोडोनियां मानसीं । 
लावा त्रिपुंड्र भक्तीसीं । सनत्कुमारादि सकळिक हो ॥ २४२ ॥ 
वेदशास्त्रादि उपनिषदार्थ । सार पाहिलें मीं अवलोकित । 
चतुर्विध पुरुषार्थ । भस्मधारणें होय जाणा ॥ २४३ ॥ 
ऐसें त्रिपुंड्रमहिमान । सांगितलें ईश्र्वरें विस्तारुन । 
लावा तुम्ही सकळ जन । सनत्कुमारादि ऋषीश्र्वर हो ॥ २४४ ॥ 
सांगोनि सनत्कुमारासी । गेला ईश्र्वर कैलासासी । 
सनत्कुमार महाहर्षी । गेला ब्रह्मलोकाप्रती ॥ २४५ ॥ 
वामदेव महामुनि । सांगती ऐसे विस्तारोनि । 
ब्रह्मराक्षसें संतोषोनि । नमन केलें चरणकमलासी ॥ २४६ ॥ 
वामदेव म्हणे राक्षसासी । भस्ममाहात्म्य आहे ऐसी । 
माझें अंगस्पर्शेसीं । ज्ञान तुज प्रकाशिलें ॥ २४७ ॥ 
ऐसें म्हणोनि संतोषीं । अभिमंत्रोनि भस्मासी । 
देता झाला राक्षसासी । वामदेव तया वेळीं ॥ २४८ ॥ 
ब्रह्मराक्षस तया वेळीं । लावितां त्रिपुंड्र कपाळीं । 
दिव्यदेह तात्काळीं । तेजोमूर्ति जाहला परियेस ॥ २४९ ॥ 
दिव्य अवयव झालें त्यासी । जैसा सूर्यसंकाशी । 
 झाला आनंदरुप कैसी । ब्रह्मराक्षस तया वेळीं ॥ २५० ॥ 
नमन करुनि योगीश्र्वरासी । केली प्रदक्षिणा भक्तिसी । 
विमान आले तत् क्षणेसी । सूर्यसंकाश परियेसा ॥ २५१ ॥ 
दिव्य विमानीं बैसोनि । गेला स्वर्गासी तत्क्षणीं । 
वामदेव महामुनीं । दिधला तयासी परलोक ॥ २५२ ॥ 
वामदेव महादेव । मनुष्यरुप दिसतो स्वभाव । 
प्रत्यक्ष जाणा तो शांभव । हिंडे भक्त तारावया ॥ २५३ ॥ 
त्रयमूर्तीचा अवतारु । वामदेव तोचि गुरु । 
करावया जगदोद्धारु । हिंडत होता भूमीवरी ॥ २५४ ॥ 
भस्ममाहात्म्य असे थोरु । विशेष हस्तस्पर्श गुरु । 
ब्रह्मराक्षसासी दिधला वरु । उद्धार गति परियेसा ॥ २५५ ॥ 
समस्त मंत्र असती । गुरुविणें साध्य नव्हती । 
वेदशास्त्रें वाखाणिती । ' नास्ति तत्त्वं गुरोः परम् ' ॥ २५६ ॥ 
सूत म्हणे ऋषेश्र्वरांसी । भस्ममाहात्म्य आहे ऐसी । 
गुरुहस्तें असे विशेषीं । तस्माद् गुरुचि कारण ॥ २५७ ॥ 
येणेंपरी त्रिविक्रमासी । सांगती श्रीगुरु विस्तारेसीं । 
त्रिविक्रमभारती हर्षी । चरणांवरी माथा ठेवित ॥ २५८ ॥ 
नमन करुनि श्रीगुरुसी । निघाला आपुले स्थानासी । 
 झालें ज्ञान समस्तांसी । श्रीगुरुच्या उपदेशें ॥ २५९ ॥ 
येणेंपरी सिद्धमुनि । सांगते झाले विस्तारुनि । 
ऐकतो शिष्य नामकरणी । भक्तिभावेंकरुनियां ॥ २६० ॥ 
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । 
भक्तिभावें ऐकती नर । लाधे चारी पुरुषार्थ ॥ २६१ ॥ 
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ 
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे 
भस्ममहिमावर्णनं नाम एकोनत्रिंशोऽध्यायः ॥ 
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Gurucharitra Adhyay 29 
गुरुचरित्र अध्याय २९


Custom Search

Gurucharitra Adhyay 29 Part 2/3 गुरुचरित्र अध्याय २९ भाग २/३


Gurucharitra Adhyay 29 
Gurucharitra Adhyay 29 is in Marathi. Name of this Adhyay is BhasmaMahima Varnanam.


ऐकोनि यमाचें वचन । शिवदूत सांगती विस्तारुन । 
प्रेतकपाळीं लांछन । भस्म होतें परियेसा ॥ ९१ ॥ 
वक्षःस्थळीं ललाटेसी । बाहुमूळीं करकंकणेसी । 
भस्म लाविलें प्रेतासी । केवी अतळती तुझे दूत ॥ ९२ ॥ 
आम्हां आज्ञा ईश्र्वराची । भस्मांकित तनु मानवाची । 
जीव आणावा त्या नराचा । कैलासपदीं शाश्र्वत ॥ ९३ ॥ 
भस्म कपाळीं असत । केवीं आतळती तुझे दूत । 
तात्काळीं होतों वधित । सोडिलें आम्हीं धर्मासी ॥ ९४ ॥ 
पुढें तरी आपुल्या दूतां । चुद्धि सांगा तुम्ही आतां । 
जे नर असती भस्मांकितां । त्यातें तुम्ही न आणावें ॥ ९५ ॥ 
भस्मांकित नरासी । दोष न लागती परियेसीं । 
तो योग्य होय स्वर्गासी । म्हणोनि सांगती शिवदूत ॥ ९६ ॥
शिवदूत वचन ऐकोन । यमधर्म गेला परतोन । 
आपुलें दूतां पाचारुन । सांगतसे परियेसा ॥ ९७ ॥ 
यम सांगे आपुले दूतां । भूमीवरी जाऊनि आतां । 
जे कोण असतील भस्मांकित । त्यांतें तुम्ही न आणावें ॥ ९८ ॥ 
अनेकपरी दोष जरी । केले असत धुरंधरीं । 
त्यांतें न आणावें आमुचे पुरीं । त्रिपुंड्र टिळक नरासी ॥ ९९ ॥ 
रुद्राक्षमाळा ज्याचे गळां । असेल त्रिपुंड्र टिळा । 
त्यातें तुम्ही नातळा । आज्ञा असे ईश्र्वराची ॥ १०० ॥ 
वामदेव म्हणे राक्षसासी । या विभुतीची महिमा असे ऐशी । 
आम्ही लावितों भक्तीसीं । देवादिकां दुर्लभ ॥ १०१ ॥ 
पाहें पां ईश्र्वर प्रीतीसीं । सदा लावितो भस्मासी । 
ईश्र्वरें वंदिल्या वस्तूसी । कवण वर्णूं शके सांग मज ॥ १०२ ॥ 
ऐकोनि वामदेवाचें वचन । ब्रह्मराक्षस करी नमन । 
उद्धारावें जगज्जीवना । ईश्र्वर तूंचि वामदेवा ॥ १०३ ॥ 
तुझे चरण मज भेटले । सहस्त्र जन्मींचें ज्ञान जाहले । 
कांहीं पुण्य होतें केलें । त्याणें गुणें भेटलासी ॥ १०४ ॥ 
आपण जघीं राज्य करितां । केलें पुण्य स्मरलें आतां । 
तळें बांधविलें रानांत । दिल्ही वृत्ति ब्राह्मणांसी ॥ १०५ ॥ 
इतुकें पुण्य आपणासी । घडलें होतें परियेसी । 
वरकड केले सर्व दोषी । राज्य करितां स्वामिया ॥ १०६ ॥ 
जघीं नेलें यमपुरासी । यमें पुसिलें चित्रगुप्तासी । 
माझें पुण्य त्या यमासी । चित्रगुप्तें सांगितलें ॥ १०७ ॥ 
तधीं मातें यमधर्मे आपण । सांगितलें होतें हें पुण्य । 
पंचविशति जन्मीं जाण । फळासी येईल म्हणोनि ॥ १०८ ॥ 
तया पुण्यापासोन । भेटी जाहली तुझे चरण । 
करणें स्वामी उद्धारण । जगद्गुरु वामदेवा ॥ १०९ ॥ 
या भस्माचें महिमान । कैसें लावावे विधान । 
 कवण मंत्र उद्धारण । विस्तारुन सांग मज ॥ ११० ॥ 
वामदेव म्हणे राक्षसासी । विभूतीचें धारण मज पुससी । 
सांगेन आतां विस्तारेसीं । एकचित्तें ऐक पां ॥ १११ ॥ 
पूर्वी मंदरगिरिपर्वतीं । क्रीडेसी गेले गिरिजापति । 
कोटि रुद्रादिगणसहिती । बैसले होते वोळगेसी ॥ ११२ ॥ 
तेहतीस कोटि देवांसहित । देवेंद्र आला तेथें त्वरित । 
अग्नि वरुण यमसहित । कुबेर वायु आला तेथें ॥ ११३ ॥ 
गंधर्व यक्ष चित्रसेन । खेचर पन्नग विद्याधरण । 
किंपुरुष सिद्ध साद्य जाण । आले गुह्यक सभेसी ॥ ११४ ॥ 
देवाचार्य बृहस्पति । वसिष्ठ नारद तेथें येती । 
अर्यमादि पितृसहिती । तया ईश्र्वर वोळगेसी ॥ ११५ ॥ 
दक्षादि ब्रह्मा येर सकळ । आले समस्त ऋषीकुळ । 
उर्वशादि अप्सरामेळ । आले त्या ईश्र्वरसभेसी ॥ ११६ ॥ 
चंदिकासहित शक्तिगण देखा । आदित्यादि द्वादशार्का । 
अष्ट वसू मिळोन ऐका । आले ईश्र्वर सभेसी ॥ ११७ ॥ 
अश्र्विनी देवता परियेसी । विश्र्वेदेव मिळून निर्दोषी । 
आले ईश्र्वरसभेसी । ऐके ब्रह्मराक्षसा ॥ ११८ ॥ 
भूतपति महाकाळ । नंदिकेश्र्वर महानीळ । 
काठीकर दोघे प्रबळ । उभे पार्श्र्वी असती देखा ॥ ११९ ॥ 
वीरभद्र शंखकर्ण । मणिभद्र षट्कर्ण । 
वृकोदर देवमान्य । कुंभोदर आले तेथें ॥ १२० ॥ 
कुंडोदर मंडोदर । विकटकर्ण कर्णधार । 
धारकेतु महावीर । भूतनाथ तेथें आला ॥ १२१ ॥ 
भृंगी रिटी भूतनाथ । नानारुपी गण समस्त । 
नानावर्ण मुखें ख्यात । नानावर्ण-शरीर-अवयवी ॥ १२२ ॥ 
रुद्रगणांची रुपें कैसीं । सांगेन ऐका विस्तारेसीं । 
कित्येक कृष्णवर्णेसी । श्र्वेत-पीत-धूम्रवर्ण ॥ १२३ ॥ 
हिरवे ताम्र सुवर्ण । लोहित चित्रविचित्र वर्ण । 
मंडूकासारिखें असे वदन । रुद्रगण आले तेथें ॥ १२४ ॥ 
नानाआयुधें-शस्त्रेंसी । नाना वाहनें भूषणेसी । 
व्याघ्रमुख कित्येकांसी । किती सूकर-गजमुखी ॥ १२५ ॥ 
कित्येक नक्रमुखी । कित्येक श्र्वान-मृगमुखी । 
उष्ट्रवदन कित्येकी । किती शरभ-शार्दूलवदनें ॥ १२६ ॥ 
कित्येक भैरुंडमुख । सिंहमुख कित्येक । 
दोनमुख गण देख । चतुर्मुख गण कितीएक ॥ १२७ ॥ 
चतुर्भुज गण अगणिक । कितीएका नाहीं मुख । 
ऐसे गण तेथें येती देख । ऐक राक्षसा एकचित्तें ॥ १२८ ॥ 
एकहस्त द्विहस्तेसीं । पांच सहा हस्तकेसीं । 
पाद नाहीं कितीएकांसी । बहुपादी किती जाणा ॥ १२९ ॥ 
कर्ण नाहीं कित्येकांसी । एककर्ण अभिनव कैसी । 
बहुकर्ण परियेसीं । ऐसे गण येती तेथें ॥ १३० ॥ 
कित्येकांसी नेत्र एक । कित्येका चारी नेत्र विचित्र । 
किती स्थूळ कुब्जक । ऐसे गण ईश्र्वराचे ॥ १३१ ॥ 
ऐशापरीच्या गणांसहित । बैसला शिव मूर्तिमंत । 
सिंहासन रत्नखचित । सप्त प्रभावळीचें ॥ १३२ ॥ 
आरक्त एक प्रभावळी । तयावरी रत्नें जडलीं । 
अनुपम्य दिसे निर्मळी । सिंहासन परियेसा ॥ १३३ ॥ 
दुसरी एक प्रभावळी । हेमवर्ण पिवळी । 
 मिरवीतसे रत्ने बहळीं । सिंहासन ईश्र्वराचे ॥ १३४ ॥ 
तिसरिये प्रभावळीसी । नीलवर्ण रत्नें कैसी । 
जडली असती कुसरीसीं । सिंहासन ईश्र्वराचें ॥ १३५ ॥ 
शुभ्र चतुर्थ प्रभावळी । रत्नखचित असे कमळीं । 
आरक्तवर्ण असे जडली । सिंहासन शंकराचें ॥ १३६ ॥ 
वैडूर्यरत्नखचित । मोतीं जडलीं असतीं बहुत । 
पांचवी प्रभावळी ख्यात । सिंहासन ईश्र्वराचें ॥ १३७ ॥ 
सहावी भूमि नीलवर्ण । भीतरी रेखा सुवर्णवर्ण । 
रत्नें जडलीं असतीं गहन । अपूर्व सिंहासन ईश्र्वराचें ॥ १३८ ॥ 
सातवी ऐसी प्रभावळी । अनेक रत्नें असे जडली । 
जे कां विश्र्वकर्म्यानें रचिली । अपूर्व देखा त्रिभुवनांत ॥ १३९ ॥ 
ऐशा सिंहासनावरी । बैसलासे त्रिपुरारि । 
कोटिसूर्य तेजासरी । भासतसे परियेसा ॥ १४० ॥ 
महाप्रळयसमयासी । सप्तावर्ण-मिळणी जैसी । 
तैसिया श्र्वासोश्र्वासेसीं । बैसलासे ईश्र्वर ॥ १४१ ॥ 
भाळनेत्र ज्वाळमाळा । संवर्ताग्नि जटामंडळा । 
कपाळीं चंद्र षोडशकळा । शोभतसे सदाशिव ॥ १४२ ॥ 
तक्षक देखा वामकर्णी । वासुकी असे कानीं दक्षिणीं । 
तया दोघांचे नयन । नीलरत्नापरी शोभती ॥ १४३ ॥ 
नीलकंठ दिसे आपण । नागहार आभरण । 
सर्पांचेंचि करी कंकण । मुद्रिकाही देखा सर्पाचिया ॥ १४४ ॥
मेखला तया सर्पाचें । चर्मपरिधान व्याघ्राचें । 
शोभा घंटा दर्पणाचे । ऐसेपरी दिसतसे ॥ १४५ ॥ 
कर्कोटक-महापद्म । केलीं नूपुरें पाईंजण । 
जैसा चंद्र-संपूर्ण । तैसा शुभ्र दिसतसे ॥ १४६ ॥ 
म्हणोनि कर्पूरगौर म्हणती । ध्यानीं ध्याइजे पशुपति । 
ऐसा भोळाचक्रवर्ती । बैसलासे सभेंत ॥ १४७ ॥ 
रत्नमुकुट असे शिरीं । नागेन्द्र असे केयुरीं । 
कुंडलांची दिप्ति थोरी । दिसतसे ईश्र्वर ॥ १४८ ॥ 
कंठीं सर्पांचे हार । नीलकंठ मनोहर । 
सर्वांगीं सर्पांचे अलंकार । शोभतसे ईश्र्वर ॥ १४९ ॥ 
शुभ्र कमळें अर्चिला । कीं चंदनें असे लेपिला । 
कर्पूरकेळीनें पूजिला । ऐसा दिसे ईश्र्वर ॥ १५० ॥ 
दहाभुजा विस्तारेसीं । एकेक हातीं आयुधेंसी । 
बैसलासे सभेसी । सर्वेश्र्वर शंकर ॥ १५१ ॥ 
एके हातीं त्रिशूळ देखा । दुसरा डमरु सुरेखा । 
येरे हातीं खड्ग तिखा । शोभतसे ईश्र्वर ॥ १५२ ॥ 
पानपात्र एका हातीं । धनुष्य-बाणें कर शोभती । 
खट्वांग फरश येरे हातीं । अंकुश करी मिरवीतसे ॥ १५३ ॥ 
मृग धरिला असे करीं देखा । ऐसा तो हा पिनाका । 
दहाभुजा दिसती निका । बैसलासे सभेंत ॥ १५४ ॥ 
पंचवक्त सर्वेश्र्वर । एकेक मुखाचा विस्तार । 
दिसतसे सालंकार । सांगेन ऐका श्रोतेजन ॥ १५५ ॥ 
कलंकाविणें चंद्र जैसा । किंवा क्षीरफेन ऐसा । 
भस्मभूषणें रुपें कैसा । दिसे मन्मथातें दाहोनियां ॥ १५६ ॥ 
सूर्य-चंद्र-अग्निनेत्र । नागहार कटिसूत्र । 
दिसे मूर्ति पवित्र । सर्वेश्र्वर परियेसा ॥ १५७ ॥ 
शुभ्र टिळक कपाळीं । बरवा शोभे चंद्रमौळी । 
हास्यवदन केवळीं । अपूर्व देखा श्रीशंकर ॥ १५८ ॥ 
दुसरें मुख उत्तरेसी । शोभतसे विस्तारेसीं । 
ताम्रवर्णाकार कमळेसी । अपूर्व दिसे परियेसा ॥ १५९ ॥ 
जैसें दाडिंबाचे फूल । किंवा प्रातःरविमंडळ । 
तैसें मिरवे मुखकमळ । ईश्र्वरांचें परियेसा ॥ १६० ॥ 
तिसरें मुख पूर्वदिशीं । गंगा अर्धचंद्र शिरसी । 
जटाबंधन केली कैसी । सर्पवेष्टित परियेसा ॥ १६१ ॥ 
चवथें मुख दक्षिणेसी । मिरवे नीलवर्णेसी । 
विक्राळ दाढा दारुणेसीं । दिसतसे तो ईश्र्वर ॥ १६२ ॥ 
मुखंहूनि ज्वाला निघती । तैसा दिसे तीव्रमूर्ति । 
रुंडमाळा शोभती । सर्पवेष्टित परियेसा ॥ १६३ ॥ 
पांचवें असे ऐसें वदन । व्यक्ताव्यक्त असे जाण । 
साकार निराकार सुगुण । सगुण निर्गुण ईश्र्वर ॥ १६४ ॥ 
सलक्षण निर्लक्षण । ऐसें शोभतसे वदन । 
परब्रह्म वस्तु तो जाण । सर्वेश्र्वर पंचमुखी ॥ १६५ ॥ 
काळ व्याळ सर्प बहुत । कंठी माळा मिरवे ख्यात । 
चरण मिरवीती आरक्त । कमळापरी ईश्र्वराचे ॥ १६६ ॥ 
चंद्रासारिखीं नखें देखा । मिरवी चरणीं पादुका । 
अळंकार-सर्प ऐका । शोभतसे परमेश्र्वर ॥ १६७ ॥ 
व्याघ्रांबर पांघरुण । सर्प बांधले असे आपण । 
गांठी बांधिली असे जाण । नागबंधन करुनियां ॥ १६८ ॥ 
नाभीं चंद्रावळी शोभे । हृदयीं कटाक्ष रोम उभे । 
परमार्थ मूर्ति लाभे । भक्तजनां मनोहर ॥ १६९ ॥ 
ऐसा रुद्र महाभोळा । सिंहासनीं आरुढला । 
पार्वतीसहित शोभला । बैसलासे परमेश्र्वर ॥ १७० ॥ 
पार्वतीचे शृंगार । नानापरीचें अलंकार । 
मिरवीतसे अगोचर । सर्वेश्र्री परियेसा ॥ १७१ ॥ 
कनकचाफे गोरटी । मोतियांचा हार कंठी । 
रत्नखचित मुकुटी । नागबंदी दिसतसे ॥ १७२ ॥ 
नानापरीच्या पुष्पजाति । मुकुटावरी शोभती । 
तेथे भ्रमर आलापिती । परिमळालागीं परियेसा ॥ १७३ ॥ 
मोतियांची थोर जाळी । मिरवीतसे मुकुटाजवळी । 
रत्नें असतीं जडलीं । शोभायमान दिसतसे ॥ १७४ ॥ 
मुख दिसे पूर्णचंद्र । मिरवतसे हास्य मंद । 
जगन्माता विश्र्वंद्य । दिसतसे परमेश्र्वरी ॥ १७५ ॥ 
नासिक बरवें सरळ । तेथें मिरवे मुक्ताफळ । 
त्यावरी रत्नें सोज्ज्वळ । जडलीं असती शोभायमान ॥ १७६ ॥ 
अधर पवळवेली दिसे । दंतपंक्ति रत्न जैसे । 
 ऐसी माता मिरवतसे । जगन्माता परियेसा ॥ १७७ ॥ 
कानीं तानवडें भोंवरिया । रत्नखचित मिरवलिया । 
अलंकार महामाया । लेइली असे जगन्माता ॥ १७८ ॥ 
पीतवर्ण चोळी देखा । कुच तटीं शोभे निका । 
एकाजवळी रत्नें अनेका । शोभतसे कंठीं हार ॥ १७९ ॥ 
कालव्याल सर्प थोर । स्तनपान करिती मनोहर । 
कैसे भाग्य दैव थोर । त्या सर्पांचे परियेसा ॥ १८० ॥
Gurucharitra Adhyay 29 
गुरुचरित्र अध्याय २९


Custom Search

Friday, November 29, 2013

Gurucharitra Adhyay 29 Part 1/3 गुरुचरित्र अध्याय २९


Gurucharitra Adhyay 29 
Gurucharitra Adhyay 29 is in Marathi. Name of this Adhyay is BhasmaMahima Varnanam. 
गुरुचरित्र अध्याय २९ 
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ 
नामधारक विनवी सिद्धासी । मागें कथा निरोपिलीसी । 
भस्ममाहात्म्य श्रीगुरुसी । पुसिलें त्रिविक्रमभारतीनें ॥ १ ॥ 
पुढें कथा कवणेपरी । झाली असे गुरुचरित्रीं । 
निरोप द्यावा सविस्तारीं । सिद्धमुनि कृपासिंधु ॥ २ ॥ 
ऐसें विनवी शिष्यराणा । ऐकोनि सिद्ध प्रसन्नवदना । 
सांगतसे विस्तारुन । भस्ममाहात्म्य परियेसा ॥ ३ ॥ 
श्रीगुरु म्हणती त्रिविक्रमासी । भस्ममाहात्म्य मज पुससी । 
एकचित्त करुनि मानसीं । सावधान ऐक पां ॥ ४ ॥ 
पूर्वापरी कृतयुगीं । वामदेव म्हणिजे योगी । 
प्रसिद्ध गुरु तो जगीं । वर्तत होता भूमीवरी ॥ ५ ॥ 
शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी । गृह-दारादि वर्जूनि । 
कामक्रोधादि त्यजूनि । हिंडत होता महीवरी ॥ ६ ॥ 
संतुष्ट निःस्पृह असे मौनी । भस्म सर्वांगीं लावोनि । 
जटाधारी असे मुनि । वल्कल-वस्त्र व्याघ्राजिन ॥ ७ ॥ 
ऐसा मुनि भूमंडळांत । नाना क्षेत्रीं असे हिंडत । 
पातला क्रौंचारण्यांत । जेथें नसे संचार मनुष्यमात्राचा ॥ ८ ॥ 
तया स्थानीं असे एक । ब्रह्मराक्षस भयानक । 
मनुष्यादि जीव अनेक । भक्षीतसे परियेसा ॥ ९ ॥ 
ऐशा अघोर वनांत । वामदेव गेला हिंडत । 
 ब्रह्मराक्षस अवलोकित । आला धांवोनि भक्षावया ॥ १० ॥ 
ब्रह्मराक्षस क्षुधाक्रांत । आला असे भक्षूं म्हणत । 
करकरां दांत खात । मुख पसरुनि जवळी आला ॥ ११ ॥ 
राक्षस येतां देखोनि । वामदेव निःशंक धीरें मनीं । 
उभा असे महाज्ञानी । पातला राक्षस तयाजवळी ॥ १२ ॥ 
राक्षस मनीं संतोषत । ग्रास बरवा लाधला म्हणत । 
भक्षावया कांक्षा बहुत । येवोनि धरिला आलिंगोनि ॥ १३ ॥ 
आलिंगितां मुनीश्र्वरासी । भस्म लागलें राक्षसासी । 
जाहलें ज्ञान तयासी । जातिस्मरण जन्मांतरींचें ॥ १४ ॥ 
पातक गेलें जळोनि । राक्षस झाला महाज्ञानी । 
जैसा लागतां चिंतामणि । लोह सुवर्ण केवीं होय ॥ १५ ॥ 
जैसा मानससरोवरास । वायस जातां होय हंस । 
अमृत पाजितां मनुष्यास । देवत्व होय परियेसा ॥ १६ ॥ 
जैसें कां जंबूनदींत । घालितां मृत्तिका कांचन त्वरित । 
तैसा जाहला पापी पुनीत । मुनीश्र्वराचे अंगस्पर्शें ॥ १७ ॥ 
समस्त मिळती कामना । दुर्लभ सत्पुरुषाचें दर्शन । 
स्पर्श होतां श्रीगुरुचरण । पापावेगळा होय नर ॥ १८ ॥ 
ब्रह्मराक्षस भयानक । काय सांगो त्याची भूक । 
गजतुरंग मनुष्यादिक । नित्य आहार करी सकळ ॥ १९ ॥ 
इतुकें भक्षितां तयासी । न वचे भूक परियेसीं । 
तृषाकांत समुद्रासी । प्राशन करितां न वचे तृषा ॥ २० ॥ 
ऐसा पापिष्ट राक्षस । होतां मुनीचा अंगस्पर्श । 
गेली क्षुधा-तृषा-आक्रोश । झाला ज्ञानी परियेसा ॥ २१ ॥ 
राक्षस ज्ञानी होऊनि । लागला मुनीश्र्वराचे चरणी । 
त्राहि त्राहि गुरुशिरोमणि । तूं साक्षात् ईश्र्वर ॥ २२ ॥ 
तारी तारी मुनिवरा । बुडालों अघोर सागरा । 
उद्धरावें दातारा । कृपासिंधु जगदिशा ॥ २३ ॥ 
तुझ्या दर्शनमात्रेसीं । जळल्या माझ्या पापराशी । 
तूं कृपाळू भक्तांसी । तारीं तारीं जगद्गुरु ॥ २४ ॥ 
येणेंपरी मुनिवरास । विनवीतसे राक्षस । 
वामदेव कृपासुरस । पुसतसे तये वेळीं ॥ २५ ॥ 
वामदेव म्हणे तयासी । तुवा कवणाचा कवण वंशीं । 
ऐसा अघोर ठायीं वससी । मनुष्यमात्र नसे ते ठायी ॥ २६ ॥ 
ऐकोनि मुनीचें वचन । ब्रह्मराक्षस करी नमन । 
विनवीतसे कर जोडोन । ऐक त्रिविक्रम मुनिराया ॥ २७ ॥ 
म्हणे राक्षस तये वेळीं । आपणासी ज्ञान जहालें सकळी । 
जातिस्मरण अनंतकाळीं । पूर्वापरींचें स्वामिया ॥ २८ ॥ 
तयामध्यें माझे दोष । उत्कृष्ट जन्म पंचवीस । 
दिसतसे प्रकाश । ऐक स्वामी वामदेवा ॥ २९ ॥ 
पूर्वजन्म पंचविसी । होतों राजा यवन-देशीं । 
' दुर्जेय ' नाम आपणासी । दुराचारीं वर्तलों जाण ॥ ३० ॥ 
म्यां मारिले बहुत लोक । प्रजेसी दिधलें दुःख । 
स्त्रिया वरिल्या अनेक । राज्यमदेंकरुनियां ॥ ३१ ॥ 
वरिल्या स्त्रियांव्यतिरिक्त । बलात्कारें धरिल्या अमित । 
एक दिवस देवोनि रति । पुनरपि न भोगीं तयांसी ॥ ३२ ॥ 
एके दिवशीं एकीसी । रति देऊनि त्यजीं तिसी । 
ठेविलें अंतर्गृहासी । पुनरपि तीतें न देखें नयनीं ॥ ३३ ॥ 
ऐसें अनेक स्त्रियांसीं । ठेविलें म्यां अंतर्गृहासी । 
मातें शापिती अहर्निशी । दर्शन नेदी म्हणोनियां ॥ ३४ ॥ 
समस्त राजे जिंकोनियां । आणीं स्त्रिया धरोनियां । 
एकेक दिवस भोगूनियां । त्यातें ठेविलें अंतर्गृहासी ॥ ३५ ॥ 
जेथें स्त्रिया सुरुपें असती । बळें आणोन देई मी रति । 
ज्या न येती संतोषवृत्तीं । तया द्रव्य देऊनि आणवीं ॥ ३६ ॥ 
विप्र होते माझे देशी । ते जाऊनि राहिले आणिक देशी । 
जाऊनि आणी त्यांचे स्त्रियांसी । भोगीं आपण उन्मत्तपणें ॥ ३७ ॥ 
पतिव्रता सुवासिनी । विधवा मुख्य करोनि । 
त्यांते भोगी उन्मत्तपणी । रजस्वला स्त्रियांसी देखा ॥ ३८ ॥ 
विवाह न होतां कन्यांसी । बलात्कारें भोगी त्यांसी । 
येणेंपरी समस्त देशीं । उपद्रविलें मदांधपणें ॥ ३९ ॥ 
ब्राह्मणस्त्रिया तीन शत । शतचारी क्षत्रिया ते । 
वैश्यिणी वरिल्या षट्शत । शूद्रस्त्रिया सहस्त्र जाण ॥ ४० ॥ 
एक शत चांडाळिणी । सहस्त्र वरिल्या पुलिंदिनी । 
पांच शत स्त्रिया डोंबिणी । रजकिणी वरिल्या शत चारी ॥ ४१ ॥ 
असंख्यात वारवनिता । भोगिल्या म्यां उन्मत्तता । 
तथापि माझे मनीं तृप्तता । नाही झाली स्वामिया ॥ ४२ ॥ 
इतुक्या स्त्रिया भोगून । संतुष्ट नव्हे माझें मन । 
विषयासक्त मद्यपान । करीं नित्य उन्मत्तें ॥ ४३ ॥ 
वर्ततां येणेंपरी देखा । व्याधिष्ठ झालों यक्ष्मादिका । 
परराष्ट्रराजे चालोनि ऐका । राज्य हिरतलें स्वामिया ॥ ४४ ॥ 
ऐसेपरी आपणासी । मरण जाहलें परियेसी । 
नेले दूतीं यमपुरासी । मज नरकामध्यें घातले ॥ ४५ ॥ 
देवांचीं सहस्त्र वर्षे देखा । दहा वेळ फिरविलें ऐका । 
पितृसहित आपण देखा । नरक भोगिले येणेंपरी ॥ ४६ ॥ 
पुढें जन्मलों प्रेतवंशीं । विद्रुप देही परियेसीं । 
सहस्त्र शिश्र्ने अंगासी । लागली असती परियेसा ॥ ४७ ॥ 
येणेंपरी दिव्य शत वर्षें । कष्टलों बहु क्षुधार्थे । 
पुनरपि पावलों यमपंथ । अनंत कष्ट भोगिले ॥ ४८ ॥ 
दुसरा जन्म आपणासी । व्याघ्रजन्म जीवहिंसी । 
अजगर जन्म तृतीयेसी । चवथ जाहलों लांडगा ॥ ४९ ॥ 
पांचवा जन्म आपणासी । ग्रामसूकर परियेंसी । 
सहावा जन्म जाहलों कैसी । सरडा होऊनि जन्मलों ॥ ५० ॥ 
सातवा जन्म झालों श्र्वान । आठवा जंबुक मतिहीन । 
नवम जन्म रोही-हरण । दहावा झालों ससा देखा ॥ ५१ ॥ 
मर्कट जन्म एकादश । घारीं झालों मी द्वादश । 
जन्म तेरावा मुंगूस । वायस जाहलो चतुर्दश ॥ ५२ ॥ 
जांबुवंत झालों पंचादश । रानकुक्कुट मी षोडश । 
जन्म जाहलों परियेस । पुढें येणेपरि अवधारी ॥ ५३ ॥ 
सप्तदश जन्मीं आपण । गर्दभ झालों अक्षहीन । 
मार्जारयोनीं संभवून । आलों स्वामी अष्टादशेसी ॥ ५४ ॥ 
एकुणिसावे जन्मासी । मंडूक झालों परियेसीं । 
कांसवजन्म विंशतीसी । एकविसावा मत्स्य झालों ॥ ५५ ॥ 
बाविसावा जन्म थोर । झालों तस्कर उंदीर । 
दिवांध झालों मी बधिर । उलूक जन्म तेविसावा ॥ ५६ ॥ 
जन्म चतुर्विंशतीसी । झालों कुंजर तामसी । 
पंचविंशती जन्मासी । ब्रह्मराक्षस आपण देखा ॥ ५७ ॥ 
क्षुधाक्रांत अहर्निशीं । कष्टतसें परियेंसीं । 
निराहारी अरण्यवासी । वर्ततसे स्वामिया ॥ ५८ ॥ 
तुम्हां देखतां अंतःकरणीं । वासना झाली भक्षीन म्हणोनि । 
यालागीं आलों धांवोनि । पापरुपी आपण देखा ॥ ५९ ॥ 
तुझा अंगस्पर्श होतां । जातिस्मरण झालें आतां । 
सहस्त्र जन्मींचें दुष्कृत । दिसतसे स्वामिया ॥ ६० ॥ 
मातें आतां जन्म पुरे । तुझ्या अनुग्रहें मी तरें । 
घोरांघार संसार । आतां यातना कडे करी ॥ ६१ ॥ 
तूं तारक विश्र्वासी । म्हणोनि मातें भेटलासी । 
तुझी दर्शनमहिमा कैसी । स्पर्श होतां ज्ञान झालें ॥ ६२ ॥ 
भूमीवरी मनुष्य असती । तैसा रुप दिससी यति । 
परि तुझी महिमा ख्याति । निरुपम असे दातारा ॥ ६३ ॥ 
महापापी दुराचारी । आपण असे वनांतरीं । 
तुझे अंगस्पर्शमात्रीं । ज्ञान जाहलें अखिल जन्मांचें ॥ ६४ ॥ 
कैसा महिमा तुझ्या अंगीं । ईश्र्वर होशील कीं जगीं । 
आम्हां उद्धरावयालागीं । आलासी स्वामी वामदेवा ॥ ६५ ॥ 
ऐसें म्हणतां राक्षसासी । वामदेव सांगे संतोषीं । 
भस्ममहिमा आहे ऐशी । माझे अंगींची परियेसा ॥ ६६ ॥ 
सर्वांग माझें भस्मांकित । तुझे अंगा लागलें क्वचित । 
त्याणें झालें तुज चेत । ज्ञाप्रकाश शत जन्मांतरीचें ॥ ६७ ॥ 
भस्ममहिमा अपरांपर । परि ब्रह्मादिकां अगोचर । 
याचि कारणें कर्पूरगौर । भूषण करी सर्वांगीं ॥ ६८ ॥ 
ईश्र्वरें वंदिल्या वस्तूसी । वर्णितां अशक्य आम्हांसी । 
तोचि शंकर व्योमकेशी । जाणें भस्ममहिमान ॥ ६९ ॥ 
जरी तूं पुसती आम्हांसी । सांगेन दृष्टांत परियेंसी । 
आम्ही देखिलें दृष्टीसीं । अपार महिमा भस्माचा ॥ ७० ॥ 
विप्र एक द्रविडदेशीं । आचारहीन परियेसीं । 
सदा रत शूद्रिणीसी । कर्मभ्रष्ट वर्तत होता ॥ ७१ ॥ 
समस्त मिळोनि विप्रयाति । तया द्विजा बहिष्कारिती । 
मातापिता दाईज गोती । त्यजिती त्यासी बंधुवर्ग ॥ ७२ ॥ 
येणेंपरि तो ब्राह्मण । प्रख्यात झाला आचारहीन । 
शूद्रिणीतें वरुन । होता काळ क्रमूनियां ॥ ७३ ॥ 
ऐसा पापी दुराचारी । तस्करविद्येने पोट भरी । 
आणिक स्त्रियांशीं व्यभिचारी । उन्मत्तपणें परियेसा ॥ ७४ ॥ 
वर्ततां ऐंसें एक दिवसीं । गेला होता व्यभिचारासी । 
तस्करविद्या करितां निशीं । वधिलें त्यासी एके शूद्रें ॥ ७५ ॥ 
वधूनियां विप्रासी । ओढोनि नेलें तेचि निशीं । 
टाकिलें बहिर्ग्रामेसी । अघोर स्थळीं परियेसा ॥ ७६ ॥ 
श्र्वान एक तये नगरीं । बैसला होता भस्मावरी । 
क्षुधाक्रांत अवसरी । गेला हिंडत प्रेतघ्राणीं ॥ ७७ ॥ 
देखोनि तया प्रेतासी । गेला श्र्वान भक्षावयासी । 
प्रेतावरी बैसून हर्षी । क्षुधानिवारण करीत होता ॥ ७८ ॥ 
भस्म होतें श्र्वानाचे पोटी । लागलें प्रेताचे ललाटीं । 
वक्षःस्थळीं बाहुवटीं । लागलें भस्म परियेसा ॥ ७९ ॥ 
प्राण त्यजितां द्विजवर । नेत होते यमकिंकर । 
नानापरि करीत मार । यमपुरा नेताति ॥ ८० ॥ 
कैलासपुरींचे शिवदूत । देखोनि आले तें प्रेत । 
भस्म सर्वांगीं उद् धूळित । म्हणती यातें कवणें नेलें ॥ ८१ ॥ 
यातें योग्य शिवपुर । केवीं नेलें ते यमकिंकरें । 
म्हणोनि धांवती वेगवक्त्रें । यमकिंकरा मारावया ॥ ८२ ॥ 
शिवदूत येतां देखोनि । यमदूत जाती पळोनि । 
तया द्विजातें सोडूनि । गेलें आपण यमपुरा ॥ ८३ ॥ 
जाऊनि सांगती यमासी । गेलों होतों भूमीसी । 
आणित होतों पापियासी । अघोररुपेंकरुनियां ॥ ८४ ॥ 
तें देखोनि शिवदूत । धांवत आलें मारु म्हणत । 
हिरोनि घेतलें प्रेत । वधीत होते आम्हांसी ॥ ८५ ॥ 
आतां आम्हां काय गति । कधीं न वचों त्या क्षिती । 
आम्हांसी शिवदूत मारिती । म्हणोनि विनवीती यमासी ॥ ८६ ॥ 
ऐकोनि दूतांचे वचन । यम निघाला कोपून । 
गेला त्वरित ठाकून । शिवदूतांजवळी देखा ॥ ८७ ॥ 
यम म्हणे शिवदूतांसी । कां माझ्या किंकरांसी । 
हिरोनि घेतले पापियासी । केवीं नेतां शिवमंदिरा ॥ ८८ ॥ 
याचें पाप असे प्रबळ । जितकी गंगेंत असे वाळू । 
तयाहूनि अधिक केवळ । अघोररुप असे देखा ॥ ८९ ॥ 
नव्हे योग्य हा शिवपुरासी । यातें बैसवोनि विमानेसीं । 
केवीं नेतां मूढपणेसीं । म्हणोनि कोपे यम देखा ॥ ९० ॥
Gurucharitra Adhyay 29 
 गुरुचरित्र अध्याय २९


Custom Search