Kahani Budha-Bruhaspatichi
This is the kahani of Budhawar and Gurwar.
कहाणी बुधबृहस्पतीची
ऐका बुधबृहस्पतीनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होत. तिथ एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या. त्यांच्या घरी रोज एक मामाभाचे भिक्षेला येत. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत, म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आले. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितले असते तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले. सर्वांत धाकटी सून शहाणी होती.तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही,ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही. ही आमची चुकी आहे. आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा.
ते म्हणाले, श्रावणमासी दर बुधवारी आणि बृहस्पती वारी जेवावयास ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे दोन बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी, अतिथीचा सत्कार करावा. म्हणजे ईच्छित हेतू पूर्ण होतात. त्याप्रमाणे ती करुं लागली.
एके दिवशी तिला स्वप्न पडल. ब्राह्मण जेवीत आहेत. मी चांदीच्या भांड्यांतून तूप वाढीत आहे. ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थत्टा केली. इकडे काय चमत्कार झाला. तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करावयाचे नाही. म्हणून तेथिल लोकांनी काय केलें? हत्तिणीच्या सोंडेंत माळ दिली व तिला नगरांत फिरविली. ज्याच्या गळ्यांत ती हत्तीण माळ घालील, त्याला राज्याभिषेक होईल, अशी दवंडी पिटवली. हत्तिणीन त्या बाईच्या नवर्याच्या गळ्यांत माळ घातली. मंडळीनीं त्याला हाकलून दिलें. परत हत्तीण फिरवली, पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणे दोनदा झालं. पुढे त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानेआपल्या माणसांची चौकशी केली. तेव्हा ते अन्न अन्न करुन देशोधडीला लागल्याची बातमी कळली.
मग राजाने काय केले? मोठ्या तलावाचं काम सुरु केलं. हजारो मजूर खपू लागले. तिथं त्याची माणसं आली. राजाने आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिनं बुधबृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीगत त्याला सांगितली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्ता केली. राजानं ही गोष्ट मनांत ठेवली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला. हिच्या हातात चांदीच भांड देऊन तूप वाढावयास सांगितले. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिले. त्यांचा सन्मान केला. मुलंबाळ झाली. दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले. जशी त्यांच्यावर बुधबृहस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हाआम्हावर करोत, ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
Custom Search
No comments:
Post a Comment