ShriShivaLilamrut Adhyay 10
ShriShivLilaMrut Adhyay 10 is in Marathi. It is from Skandha Purana, Brahmottar Khanda which is in Sanskrit. This Adhayay is very pious and tells us about Uma-Maheshwar Vrata. It starts with Story of Sharda. She welcomes old Rushi according to the customs prevailing at that time. The Rushi Naidruva blesses her and say ‘that she will have good son ‘ Naidruva Rushi was blind and very old. Not know that Sharda was widow. So his blessing was not going to come true. After knowing this, he asked the Goddess the way out. Accordingly Sharda was advised to perform Uma-Maheshwar Vrata. Further it is very interstaing to listen in the adhyay itself.
ShriShivaLilamrut Adhyay 10
श्रीशिवलीलामृत अध्याय दहावा
Custom Search
श्रीशिवलीलामृत अध्याय दहावा
श्रीगणेशाय नमः ॥
कमगजविदारकपंचानना । क्रोधजलदविध्वंसप्रभंजना ।
मदतमहारका चंडकिरणा । चंद्रशेखरा वृषभध्वजा ॥ १ ॥
मत्सरदुर्धरविपिनदहना । दंभनगच्छेदका सहस्रनयना ।
अहंकारअंधकारसुरमर्दना । धर्मवर्धना भालनेत्रा ॥ २ ॥
आनंदकैलासनगविहारा । निगमागमवंद्या सुहास्यवक्रा ।
दक्षमखदलना आनंदसमुद्रा । ब्रह्मानंदा दयानिधे ॥ ३ ॥
नवमाध्यायाचे अंतीं । उद्धरिला शबर सिंहकेतनृपती ।
यावरी सूत शौनकादिकांप्रती । नैमिषारण्यीं सांगत ॥ ४ ॥
आनर्तदेशीं वास्तव्य करीत । एक द्विज नामें देवरथ ।
वेदाध्ययनीं शास्त्ररत । पंडित आणि वंशज होय ॥ ५ ॥
त्याची कन्या चातुर्यखाणी । शारदा नामें कमलनयनी ।
जिचें स्वरुप देखोनी । जन होती तटस्थ ॥ ६ ॥
तंव ते झाली द्वादशवर्षी । पित्यानें लग्न करुनि संभ्रमेसीं ।
पद्मनाभद्विजासी । देता झाला विधियुक्त ॥ ७ ॥
तोही परम अधीत ब्राह्मण । सभाग्य आणि वेदसंपन्न ।
जयाची विद्या पाहोन । राजे होती तटस्थ ॥ ८ ॥
लग्नसोहळा जाहलियावरी । कांहीं दिवस होता श्र्वशुरघरीं ।
सायंकाळीं नदीतीरीं । संध्यावंदनासी तो गेला ॥ ९ ॥
परतोन येतां अंधार । पायास झोंबला दुर्धर विखार ।
तेथेंच पडिलें कलेवर । नगरांत हाक जाहली ॥ १० ॥
मातापित्यासमवेत । शारदा धांवोनि आली तेथ ।
गतप्राण देखोनि प्राणनाथ । शरीर घालीत धरणीवरी ॥ ११ ॥
म्हणे विद्याधनाचें सतेज । आजि बुडालें माझें जहाज ।
वोस पडली सेज । बोलें गुज कोणासीं ॥ १२ ॥
माझें बुडालें भांडार । सर्परुपें वरी पडला तस्कर ।
दग्ध झालीं आभरणें समग्र । म्हणोनि टाकी तोडोनियां ॥ १३ ॥
देखोनि शारदेची करुणा । अश्रु आले जनांचिया नयनां ।
म्हणती अहा पशुपते भाललोचना । हे आतां करील काय ॥ १४ ॥
मग त्या विप्राचें करुनि दहन । माता पिता बंधु आप्तजन ।
शारदेशी संगे घेऊन ॥ सदानाप्रति गेले ते ॥ १५ ॥
कित्येक दिवस झालियावरी । घरचीं कार्यास गेलीं बाहेरी ।
शारदा एकली मंदिरीं । तंव एकअपूर्व वर्तलें ॥ १६ ॥
नैध्रुव नामें ऋषीश्र्वर । वृद्ध तपस्वी गेले नेत्र ।
शिष्य हातीं धरोनि पवित्र । सदना आला शारदेच्या ॥ १७ ॥
शारदा आसन देऊनि सत्वर । पूजन करोनि करी नमस्कार ।
नैध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार । हो तुज पुत्र वेदवक्ता ॥ १८ ॥
विप्रास न दिसे केवळ अंध । अमोर्घ वदला आशीर्वाद ।
हांसोनि शारदा करी खेद । शोक करी दुःखभरें ॥ १९ ॥
म्हणे हें अघटित घडे केवीं पूर्ण । सांगितलें पूर्ववर्तमान ।
नैध्रुव म्हणे माझें वचन । असत्य नोहे कल्पांतीं ॥ २० ॥
माझे जिव्हेबाहेर आलें । तें माघारें न सरे कदाकाळें ।
माझें तपानुष्ठान वेगळें । अघटित तेंचि घडवीन ॥ २१ ॥
घरचीं बाहेरुनि आलीं त्वरित । माता पिता बंधु समस्त ।
समूळ कळला वृत्तांत । म्हणती विपरीत केवीं घडे ॥ २२ ॥
ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र । क्षणें रंकाचा करी सहस्रनेत्र ।
शापें न लागतां क्षणमात्र । कुळासहित संहारीत ॥ २३ ॥
शापबळेंचि विशेष । सर्प केला राजा नहुष ।
यादवकुळ निःशेष । भस्म झालें ब्रह्मशापें ॥ २४ ॥
ब्राह्मणीं क्षोभोनि निर्धारीं । शुक्राची संपत्ति घातली सागरीं ।
ब्रह्मशापें मुरारी । अंबऋषीचे जन्म घेत ॥ २५ ॥
विधिहरिहर चिंत्तीं । ब्रह्मशापाचे भय वाहती ।
विप्रशापें राव परिक्षिती । भस्म झाला क्षणार्धें ॥ २६ ॥
जमदग्नीचा क्रोध परम । चौघे पुत्र केले भस्म ।
स्रिया असतां पांडुराजसत्तम । भोग नाहीं सर्वदा ॥ २७ ॥
विप्रशापाची नवलगती । साठ सहस्र सागर जळती ।
कुबेरपुत्र वृक्ष होती । नारदशापेंकरोनियां ॥ २८ ॥
कृष्णासहित यादवकुळ । ब्रह्मशापें भस्म झालें सकळ ।
दंडकाऐसा नृपाळ । क्षणमात्रें दग्ध केला ॥ २९ ॥
ब्रह्मशाप परम दृढ । नृगराज केला सरड ।
धराधरशत्रु बळप्रचंड । सहस्रभगें त्या अंगीं ॥ ३० ॥
क्षयरोगी केला अत्रिनंदन । मेदिनीवसनाचें केलें आचमन ।
शाप देवोनि सूर्यनंदन । दासीपुत्र केला पैं ॥ ३१ ॥
पाषाणाचे करिती देव । रंकाचेही करिती राव ।
मंत्राक्षता टाकितां नवपल्लव । कोरड्या काष्ठा फुटेल कीं ॥ ३२ ॥
ब्राह्मण थोर त्रिजगतीं । हें ब्रह्मांड मोडोनि पुन्हां घडती ।
यावरी नैध्रुव तियेप्रती । बोलता झाला तें ऐका ॥ ३३ ॥
म्हणे ऐकें शारदे यथार्थ । तूं धरीं उमामहेशव्रत ।
षडक्षरमंत्र विधियुक्त । नित्य जप करावा ॥ ३४ ॥
म्हणे या व्रताचें फळ होय पूर्ण । तंववरी मी येथेंचि राहीन ।
मग त्याच्या अंगणांत मठ करुन । राहाता झाला नैध्रुव तो ॥ ३५ ॥
म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेंसी । करावा जाण चैत्रमासीं ।
अथवा मार्गशीर्षेंसी । शुक्लपक्षीं करावा ॥ ३६ ॥
पाहोनि सुमुहूर्त सोमवार । अष्टमी चतुर्दशी परिकर ।
पूजावा उमामहेश्र्वर । एक संवत्सर नेमेंसी ॥ ३७ ॥
गुरुवचन शारदा ऐकोन । तैसेंचि करी न पडे न्यून ।
नैध्रुवगुरुपासून । षडक्षर मंत्र घेतला ॥ ३८ ॥
दिव्य शिवमंदिर करुन । वरी दिधलें शुभ्र वितान ।
चारी स्तंभ शोभायमान । नानाफळें शोभताती ॥ ३९ ॥
अष्टगंधें सुवाससुमनें । भूमी शोधूनि रंगमाळा आस्तरणें ।
षोडशवर्ण यंत्र करणें । अष्टदळें तयामाजी ॥ ४० ॥
तयांमाजी चतुर्दळ । त्यावरी घालोनि तांदूळ ।
वरी घट स्थापूनि अढळ । शोभा बहुत आणिजे ॥ ४१ ॥
उमामहेश प्रतिमा दोन्ही । स्थापिजे सुवर्णाच्या करोनी ।
मग एकनिष्ठा धरनि । षोडशोपचारीं पूजिजे ॥ ४२ ॥
यथासांग ब्राह्मणसंतर्पण । सुवासिनी पूजिजे प्रीतीकरुन ।
षड्रस चतुर्विध अन्न । द्यावें भोजन तृप्तीवरी ॥ ४३ ॥
पुराणश्रवण कीर्तन । येणेंचि करावें जागरण ।
गुरुवचनीं विश्र्वास पूर्ण । धेुनि वर्तणें सर्वदा ॥ ४४ ॥
कुंदेंदुवर्ण केवळ । कर्पूरगौर पयःफेनधवल ।
ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ । रजतवर्ण निर्मळ जो॥ ४५ ॥
सूर्यकोटिसम तेज विरजित । शुभ्र आभरणीं भूषित ।
जगदानंदकंद गुणातीत। स्वर्धुनीं विराजित मस्तकीं ॥ ४६ ॥
शुभ्रजटामुकुटमंडित । सर्प मणियुक्त विराजित।
किशोरचंद्र भाळीं मिरवत । भस्मचर्चित शुभ्र दिसे ॥ ४७ ॥
उन्मीलित भाललोचन । केयूरांगद शुभ्र वीरकंकण ।
मुंडमाळा शोभायमान । दिसती लोचन सूर्येंदुवत ॥ ४८ ॥
दिव्यगरुडपाचूहूनि वरिष्ठ । विराजमान दिसे नीलकंठ ।
दशभुज आयुधें सघट । झळकती प्रळयचपळेंऐसीं ॥ ४९ ॥
खट्वांग त्रिशूळ कपाल डमरु । अंकुश पाश घंटा नागधरु ।
पिनाक पाशुपत कमलतेजाकारु । शुभ्रवर्ण आयुधें ॥ ५० ॥
शुभ्र तेजस्वी शार्दूलचर्मवसन । शुभ्र स्फटिकवर्ण गजाजिन ।
मणिमय शुभ्र सिंहासन । नाना रत्नें विराजित ॥ ५१ ॥
कैलासगिरी शुभ्रवर्ण । वरी मंडप शुभ्र सहस्रयोजन ।
स्तंभविरहित सहस्रकिरण । गगनीं जेवी प्रकाशे पैं ॥ ५२ ॥
ऐरावताहूनि विशाळ शुभ्र । पुढें शोभे नंदिकेश्र्वर ।
मणिमय कुंडलें सुंदर । शेष तक्षक झळकती ॥ ५३ ॥
ब्रह्मानंदसुख मुरोन । ओतिलें शिवस्वरुप सगुण ।
आतां भवानीचें ध्यान । शारदा ध्यानीं आणीत ॥ ५४ ॥
बाला तन्वंगीं सुंदर । विराजमान चंद्रशेखर ।
चतुर्भुज पाशांकुशधर । गदापद्मयुक्त जे ॥ ५५ ॥
सुरतरुसुमनमाळायुक्त । मल्लिकाबकुळकमळीं विराजित ।
इभमुक्तावतंस डोलत । शोभा अद्भुत कोण वर्णी ॥ ५६ ॥
हरिमध्या भुजंगवेणी । जलजवदना आकर्णनयनीं ।
द्वादशादित्यशोभा जघनीं । कांचीवरी झळकतसे ॥ ५७ ॥
मागें स्रिया वर्णिल्या बहुत । निःसीमरुपलक्षणयुक्य ।
ओंवाळूनि टाकाव्या समस्त । जिच्या पादांगुष्ठावरुनी ॥ ५८ ॥
कोटिमन्मथशोभा साजिरी । त्रिभुवन जननी त्रिौरसुंदरी ।
ब्रह्मांड फोडोनियां वरी । आंगींचा सुवास धांवत ॥ ५९ ॥
पदमुद्रा जेथें उमटती । तेथें आतक्तकमळें उगवती ।
द्विजपंक्तीचा रंग पडतां क्षितीं । खडे होती दिव्यमणि ॥ ६०॥
या ब्रह्मांडमंडपांत देख । ऐसें स्वरुप नाहीं आणिक ।
शशि मित्र द्विमुख । जिच्या तेजें शोभती ॥ ६१ ॥
विधिशक्रादि बाळें अज्ञान । स्नेहें निजगर्भी करी पाळण ।
समस्त त्रिभुवनलावण्य । ओतिलें स्वरुप देवीचें ॥ ६२ ॥
विशाल ताटंके प्रभा घन । ओतिलीं शशिमित्रतेज गाळून ।
गंडस्थळीं प्रभा पूर्ण । पडली झळके अत्यंत ॥ ६३ ॥
बिबाधर अतिरक्त । नासिकींचें वरी डोलता मुक्त ।
प्रवाळचि केवळ भासत । तेज अमित न वर्णवे ॥ ६४ ॥
नेत्रांजनप्रभा पडली मुक्तशिरीं । तों गुंजऐसें दिसे क्षणभरी ।
जगन्माता हास्य करी । तो रंग दिसे शुभ्र मागुती ॥ ६५ ॥
ओळीनें बैसल्या हंसपंक्ती । तैसे द्विज हांसतां झळकती ।
मुक्तशुभ्रवर्ण मागुती । हैमवतीचे झळकती ॥ ६६ ॥
दंतपंक्ती शुभ्र अत्यंत । अधरप्रभेनें आरक्त भासत ।
डाळिंबबीज पक्व शोभत । क्षणैक तैसें दीसती ॥ ६७ ॥
कंठींचे मुक्ताहार संपूर्ण । दिसती इंद्रनीळासमान ।
श्यामलांगप्रभा दैदीप्यमान । मुक्तांमाजी बिंबली ॥ ६८ ॥
कमंडलु तेजस्वी सुंदर । तेवीं विश्र्वजननीचे पयोधर ।
कुमार आणि इभवक्र । ज्यांतील अमृत प्राशिती ॥ ६९ ॥
प्रळयचपळा गाळोनि समग्र । रंगविलें वाटे देवीचें अंबर ।
मुक्तालग कंचुकी प्रभाकर । बाहुभूषणें झळकती ॥ ७० ॥
इंद्रनीलकीलवर्णी । लीलावेषधारिणी ।
भक्तानुग्रहकारिणी । प्रलयरुपिणी आदिमाता ॥ ७१ ॥
आदिपुरुषाची ज्ञानकळा । घडी मोडी ब्रह्मांडमाळा ।
जिचें स्वरुप पाहातां डोळां । जाश्र्वनीळा धणी न पुरे ॥ ७२ ॥
कृत्तिकापुंज झळके गगनीं । तैसे जलजघोंस डोलती कर्णी ।
अरुणसंध्यारागा उणें आणी । कुंकुमरेखा आरक्तपणें ॥ ७३ ॥
विश्र्वप्रलयीं शिव सगुणपण । टाकोनि होतां तत्काळ निर्गुण ।
परी तिचे सौभाग्य गहन । ताटंककुंकुममहिमा हा ॥ ७४ ॥
दोन वेळां वरिलें कर्पूरगौरा । भवानीनें लाविला कपाळीं बिजवरा ।
तांबूलरेखांकितवदनचंद्रा । अपार कवी वर्णिती ॥ ७५ ॥
प्रयागीं त्रिवेणी जैसी । अंबेची वेणी शोभे तैसी ।
कृष्णवर्ण कुरळ निश्र्चयेंसीं । आदित्यनंदिनी होय ते ॥ ७६ ॥
शुभ्र हार गुंफिला दिव्यसुमनीं । तेचि ब्रह्मांडावरुनि स्वर्धुनी ।
माजी आरक्तपुष्पें दिसती नयनीं । पद्मजनंदिनी गुप्त ते ॥ ७७ ॥
मूद राखडी मच्छकच्छादि अलंकार । हे प्रयागीं तळपती जळचर ।
केशाग्रीं गुच्छ विशाळ थोर । सागराकार शोभती ॥ ७८ ॥
काय ब्रह्मांडें गुंफिली सकळ । तेचि डोलत मोहनमाळ ।
जीचशिव दोन्ही तेजाळ । आवरोनि धरिले दोन पक्षी ॥ ७९ ॥
अक्षय सौभाग्य नव्हे खंडन । म्हणून वज्रचूडेमंडित कर जाण ।
दशांगुळीं मुद्रिका बंधु जनार्दन । दशावतार नटलासे ॥ ८० ॥
पायीं नेपुरें पैंजण । गर्जतां शिव समाधि विसरुन ।
पाहे मुखचंद्र सावधान । नेत्रचकोरें करोनियां ॥ ८१ ॥
भक्त जे कां एकनिष्ठ । पायीं दोल्हारे जोडवीं अनुवट ।
ऐसें स्वरुप वरिष्ठ । शारदा ध्यात ब्र्ह्मानंदें ॥ ८२ ॥
ऐसें एक संवत्सरपर्यंत । आचरली उमामहेश्र्वरव्रत ।
नैध्रुव उद्यापन करवित । यथाविधिप्रमाणें ॥ ८३ ॥
अकरा शतें दंपत्य । वस्त्रअलंकारदक्षिणायुक्त ।
पूजोनि शारदा हर्षभरित । तंव रवि अस्त पावला ॥ ८४ ॥
जप ध्यान कीर्तन करीत । शारदा गुरुजवळी बैसत ।
अर्धयामिनी झालिया अकस्मात । भवानी तेथें प्रगटली ॥ ८५ ॥
असंभाव्य तेज देखोनी । नैध्रुवासी नेत्र आले तेचि क्षणीं ।
नैध्रुव शारदा लागती चरणीं । प्रेमभावेंकरुनियां ॥ ८६ ॥
देवीचें करिती स्तवन । उभे ठाकती कर जोडून ।
परी त्या दोघांवांचून । आणिक कोणी न देखती ॥ ८७ ॥
जय जय भवानी जगदंबे । मूळप्रकृतिप्रणवस्वयंभे ।
ब्रह्मानंदपददायिनी सर्वारंभे । चिद्विलासिनी तूं माये ॥ ८८ ॥
धराधरेंद्रनंदिनी । सौभाग्यसरिते हेरंबजननी ।
भक्तहृदयारविंदचिन्मयखाणी । वेदपुराणीं वंद्य तूं ॥ ८९ ॥
तुझिये कृपें निश्र्चितीं । गर्भांधासीं नेत्र येती ।
मागें सांडूनि पवनगती । पांगुळ धांवती कृपें तुझ्या ॥ ९० ॥
मुके होतील वाचाळ । मूर्ख पंडित होय तात्काळ ।
रत्नें होती सिकताहरळ । गारा होती चिंतामणी ॥ ९१ ॥
भवभयहारके भवानी । भक्तपाळके मनोल्हासिनी ।
वेदमाते द्विजजनरंजनी । वेधले ध्यानीं ब्रह्मादिक ॥ ९२ ॥
त्रिपुरसुंदरी त्रिभुवनजननी । दोषत्रयहारके त्रितापशमनी ।
त्रिकाळ जे सादर तव ध्यानीं । त्रिदेहविरहित ते ॥ ९३ ॥
शिवमानससरोवरमराळिके । जय जय विज्ञानचंपककळिके ।
सकळ ऐश्र्वर्यकल्याणदायके । सर्वव्यापके मृडानी ॥ ९४ ॥
ऐसें ऐकतां सुप्रसन्न । देवी म्हणे माग वरदान ।
नैध्रुवें वृत्तांत मुळींहून । शारदेचा सांगितला ॥ ९५ ॥
मम मुखांतूनि वचन आलें । तें अंबे पाहिजे सत्य केलें ।
तुवां जरी मनीं धरिलें । तरी काय एक न करिसी ॥ ९६ ॥
यावरी शिवजाया बोले वचना । हे शारदा पूर्वी शुभानना ।
द्रविडदेशीं विप्रकन्या । नाम भामिनी इयेचें ॥ ९७ ॥
इच्या भ्रतारासी स्रिया दोघीजणी । ही धाकुटी प्रिया मृदुभाषिणी ।
इणें वर वश करोनी । वडील कामिनी विघडविली ॥ ९८ ॥
शेजारीं एक जार होता । तो ईस बहुत दिवस जपत असतां ।
एकांत पाहोन इच्या हाता । धरिता झाला दुर्बुद्धि ॥ ९९ ॥
इणें नेत्र करोनि आरक्त । झिटकाविला तो जार पतित ।
मग तो होवोनि खेदयुक्त । गृहासी गेला दुरात्मा ॥ १०० ॥
इचें त्यासी लागलें ध्यान । सुरतआलिंगन आठवून ।
इच्या ध्यासेंकरुन । तो जार मृत्यु पावला ॥ १०१ ॥
ईस विधवा हो म्हणून । इच्या सवतीनें शापिलें दारुण ।
मग तीही पावली मरण । इच्या दुःखेंकरुनियां ॥ १०२ ॥
मग हेही काळें मृत्यु पावली । तेचि शारदा हे जन्मली ।
पूर्वीच्या जारें ईस वरिली । ये जन्मीं जाण निर्धारें ॥ १०३ ॥
तोचि पद्मनाभ ब्राह्मण । गेला इसीं दावा साधून ।
इचा पूर्वजन्मींचा भ्रतार जाण । द्रविडदेशीं आहे आतां ॥ १०४ ॥
तीनशेंसाठ योजन । येथोनि दूर आहे ब्राह्मण ।
स्रीहीन इचें स्वरुप आठवून । तळमळीत सर्वदा ॥ १०५ ॥
तो ईस स्वप्नामध्यें नित्य येवोन । भोग देईल प्रीतीकरुन ।
जागृतीहूनि विशेष जाण । सुख होईल इयेतें ॥ १०६ ॥
ऐसे लोटतां बहुत दिवस । पुत्र एक होईल शारदेस ।
शारदानंदन नाम तयास । लोकीं विख्यात जाण पां ॥ १०७ ॥
ईस नित्य भोगीं होईल जो हरिख । तैसाच विप्र पावेल सुख ।
स्वप्नानंदें विशेष देख । तृप्ति होईल निर्धारें ॥ १०८ ॥
ऐसें तयासी सांगोन । अंबा पावली अंतर्धान ।
त्यावरी शारदा नित्य स्वप्न । देखती झाली तैसेंचि ॥ १०९ ॥
तंव ती झाली गरोदर । जन निंदा करिती समग्र ।
दीर भावे सासू श्र्वशुर । आप्त सोयरे सर्व आले ॥ ११० ॥
देवीचें करणें अघटित । खदखदां जन हांसत ।
म्हणती हें केवीं घडे विपरीत । अंबा ईस भेटली कधीं ॥ १११ ॥
एक म्हणती कर्ण नासिक छेदून । बाहेर घाला खरारोहण करुन ।
तों आकाशवाणी बोले गर्जोन । सत्य गर्भ शारदेचा ॥ ११२ ॥
जन परम अमंगळ । म्हणती हे कापट्यवाणी सकळ ।
त्यांत एक वृद्ध होता पुण्यशीळ । वदता झाला तें ऐका ॥ ११३ ॥
ईश्र्वरी मायेचें अगम्य चरित्र । अघटित घडवी निर्धार ।
स्तंभेंविण धरिलें अंबर । कुंभिनी तरे जळावरी ॥ ११४ ॥
ग्रहगण भगणें विधु मित्र । यांस आहे कोणाचा आधार ।
सर्वदेहीं व्यापक परमेश्र्वर । परी शोधितां ठायीं न पडे ॥ ११५ ॥
परस्परें पंचभूतांसी वैर । तीं एकरुपें चालती कौतुक थोर ।
जननीगर्भीं जीव समग्र । रक्षितो कैसा पहा हो ॥ ११६ ॥
काय एक न करी जगन्नाथ । राजा पूर्वी यूपकेत ।
त्याचें जळीं पडलें रेत । तें जळ प्राशित वेश्या एक ॥ ११७ ॥
तितुकेनि झाली ते गर्भिणी । पुत्र प्रसवली उत्तमगुणी ।
विभांडकाचें रेत जळीं पडोनी । तें जळ हरिणी प्राशीत ॥ ११८ ॥
तोचि झाला ऋषिशृंगी । तेणें ख्याती केली दशरथयागीं ।
सौराष्ट्रराजा स्पर्शतां करें मृगी । दिव्य पुत्र प्रसवली ॥ ११९ ॥
सत्यवति मत्स्यगर्भसंभूत । तो मत्स्य राजपुत्र होत ।
महिषासुर दैत्य । नहिषीगर्भी जन्मला ॥ १२० ॥
कित्येक ऋषि करुणावंत । वचनमात्रें गर्भ राहत ।
रेवतीरमण जन्मत । रोहिणीपोटीं कैसा पां ॥ १२१ ॥
सांबाचे पोटीं मुसळ झालें । तें कोणी कैसें घातलें ।
कुंतीपोटीं पांडव जन्मले । पांच देवा समागमें ॥ १२२ ॥्
ऐसें बोलती वृद्धजन । तरी निंदा करिती दुर्जन ।
मागुती देववाणी झाली पूर्ण । ऐका वचन मूर्ख हो ॥ १२३ ॥
शारदेस कोणी असत्य म्हणती । तरी जिव्हा चिरोनी किडे पडती ।
ऐसे ऐकतां सात्विक सुमती । सत्य सत्य म्हणती त्रिवाचा ॥ १२४ ॥
कित्येक दुर्जन पुन्हां बोलत । हें सर्वही कापट्य असत्य ।
तों जिव्हा चिरोनि अकस्मात । किडे गळों लागले ॥ १२५ ॥
हें देखोनि सर्व जन । शारदेसी घालिती लोटांगण ।
म्हणती माते तूं सत्य पूर्ण । जानकीरेणुकेसारिखी ॥ १२६ ॥
मग तीस पुत्र झाला सतेज । लोक म्हणती शारदात्मज ।
वाढत जैसा द्विजराज । शुद्धद्वितीयेपासुनी ॥ १२७ ॥
उपनयन झालिया पूर्ण । आठवें वर्षीं वेदाध्ययन ।
चारी वेद षट्शास्त्रें जाण । मुखोद्गत पुराणें ॥ १२८ ॥
नवग्रहांत जैसा वासरमणी । तेवीं पंडितांत अग्रगणी ।
जेणें अनुष्ठानें पिनाकपाणी । प्रसन्न केला सर्वस्वें ॥ १२९ ॥
यावरी शारदा पुत्रसमवेत । लक्षूनि शिवरात्रिव्रत अद्भुत ।
गोकर्णक्षेत्राप्रति जात । यात्रा बहुत मिळाली ॥ १३० ॥
तों द्रविडदेशींचा ब्राह्मण । तोही आला यात्रेलागुन ।
परस्परें पाहून । कष्टीं होतीअंतरीं ॥ १३१ ॥
परस्परां कळली खूण । पूर्वी देवी बोलिली वचन ।
उमामहेश्र्वर व्रताचें पुण्य । अर्ध देईं पतीसी ॥ १३२ ॥
पुत्र देईं त्याचा त्यास । तूं त्यापासीं राहें चार मास ।
समागम न करी निःशेष । शिवपदासी पावसी ॥ १३३ ॥
मग शिवरात्रियात्रा करुन । भ्रतारासी केलें नमन ।
म्हणे हा घ्या आपुला नंदन । म्हणोनि करीं दीधला ॥ १३४ ॥
उमामहेश्र्वरव्रत । त्याचें अर्ध पुण्य देत ।
मग शारदा सवें जात । द्रविडदेशाप्रति तेव्हां ॥ १३५ ॥
शारदा व्रतस्थ पूर्ण । दुरुन पतीचें घे दर्शन ।
विख्यात झाला शारदानंदन । महापंडित पृथ्वीवरी ॥ १३६ ॥
तप आचरला अपार । मातृपितृभजनीं सादर ।
माता भवानी पिता शंकर । हेचि भावना तयाची ॥ १३७ ॥
जो न करी जनकजननींचें भजन । धिक् त्याचे तप ज्ञान ।
धिक् विद्या धिक् थोरपण । धिक् भाग्य तयाचें ॥ १३८ ॥
घरीं सांठवी स्रियेचे गोत । आणि मायबापां शिणवीत ।
अन्न नेदी बाहेर घालीत । शब्दबाणें हृदय भेदी ॥ १३९ ॥
तो जरी पढला षट्शास्त्र । परी अनामिकाहूनि अपवित्र ।
त्याचें न पहावें वक्र । विटाळ कदा न व्हावा ॥ १४० ॥
यद्यपि झाला स्पर्श जाण । तरी करावें सचैल स्नान ।
महादोषी तो कृतघ्न । यम दारुण गांजीत ॥ १४१ ॥
यावरी शारदेचा भ्रतार । महातपस्वी योगीश्र्वर ।
शरीर ठेवोनि परत्र । पावला तो शिवपदा ॥ १४२ ॥
शारदाही चिंतूनि मदनदहन । करी विधियुक्त सहगमन ।
पतीसमवेत कैलासभुवन । पावोनि सुखें राहिली ॥ १४३ ॥
शिवलीलामृत सुरस पूर्ण । किंवा हें दिव्य रसायन ।
भवरोगी सेवितां जाण । आरोग्य होऊन शिव होती ॥ १४४ ॥
जे मृत्युनें कवळिले सहज । त्यांसी नावडे हा रसराज ।
ज्यांचीं सुकृतें तेजःपुंज । तेचि अधिकारी येथींचे ॥ १४५ ॥
ब्रह्मानंदें श्रीधर । श्रोतयां विनवी जोडोनि कर ।
शिवलीलामृत निर्जर । तुम्हीं सेवा आदरें ॥ १४६ ॥
पुढील अध्यायीं सुरस कथा । पावन होय श्रोता वक्ता ।
मृडानीसहित शिव तत्त्वतां । पाठींराखीं सर्वार्थीं ॥ १४७ ॥
शिवलीलमृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । दशमाध्याय गोड हा ॥ १४८ ॥
॥ इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
ShriShivaLilamrut Adhyay 10
श्रीशिवलीलामृत अध्याय दहावा
Custom Search
No comments:
Post a Comment