Kahani Gopadmanchi कहाणी गोपद्मांची
It ia a Vrata many ladies perform in the month of Shrava.
कहाणी गोपद्मांची
ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादिक पांची सभा बसलेल्या आहेत. ताशे, मर्फे वाजत आहेत, उर्वशी, रंभा नाचत आहेत. तोच तंबोर्याच्या तारा तुटल्या, मृदुंगाच्या भेर्या फुटल्या. असं झाल्यावर सभेत हुकुम सुटला, करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा, गांवात कोणी वाणवशावाचून असेल , त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा, तंबोर्याला तार लावा, कीर्तन चालू करा. रंभा, उर्वशी नाचत्या करा. असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले. माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा केला नसेल. तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं काही वाणवसा केला नाही. नंतर कृष्णांनी तिला वसा सांगितला. सुभद्रे सुभद्रे आखाड्या दशमीपासून तीसपिंपळाचे पारी, तळ्याचे पाळी व गाईच्या गोठ्यांत काढून पूजा करावी. हा वसा कार्तिक दशमीस पूर्ण करावा. याप्रमाणे पांच वर्षे करावे. उद्यापनाचेवेळी कुवारणीस जेवायला बोलवावे. पहिल्या वर्षी विडा द्यावा. दुसर्या वर्षी चुडा भरावा. तिसर्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा. चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी. पांचव्या वर्षी चोळी-परकर नेसवून आपल्या वशाच उद्यापन करावं. असं सांगून कृष्ण सभेत पूर्वीच्या ठिकाणी येऊन बसले. नंतर लगेचच सुभद्रेने कृष्णाने सांगितल्याप्रमाणे केलं. सभेंत बात उठली की, सुभद्रा वाणवशाशिवाय आहे, असे समजल्यावरुन दूत तिकडे जाऊन पाहतात तो सुभद्रेने वाणवसा वसलेला आहे. दूतांना परत येता येतां गावाबाहेर एक हत्तीण वाणवशाशिवाय त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय, उत्तरेस डोकं करुन निजलेली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. नंतर तंबोर्याच्या तारा जोडल्या, मृदंगाच्या भेर्या वाजत्या केल्या, तशाच रंभा नाचत्या केल्या. जसें या योगाच्या व्रताने सुभद्रेवरचे संकट टळले तसं तुमचं आमचं टळो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
Custom Search
No comments:
Post a Comment